Home Blog Page 589

महागाईने हैराण जनतेचा अंत, हे चोर सरकार पाहत आहे- पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे …

पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल, डिझेलच्या सेसची व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात आज बालगंधर्व चौक येथे केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘निवडणुकीच्या आगोदर केंद्रातील मोदी सरकारने महागाई कमी करू त्याचप्रमाणे अनेक लोकपयोगी आश्वासने दिली होती. निवडणुक झाल्यानंतर ही सर्व आश्वासने फेल ठरली असून केंद्र सरकार सातत्याने महागाईमध्ये सातत्याने वाढ करून गोरगरीब नागरिकांची हेळसांड करीत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ५०० रूपयात घरगुती गॅस सिलेंडर देणार असे घोषित केले असताना सत्तेत आल्यावर त्यांनी आता पाठ फिरविली आहे ही सामान्य जनतेची फसवणुक व चेष्ठा आहे. जनतेला लालच दाखवून सत्तेत आलेले हे खोटे सरकार आहे. केंद्र व राज्य सरकार निवडणुकीच्या आधी अनेक फसव्‍या योजना जाहिर करतात व त्या बळावर मते मिळवून निवडणुका जिंकतात. निवडुन आल्यावर दिलेला शब्द पाळत नाही. हे खोटारडे सरकार कराचा बोजा सामन्य जनतेकडून वसूल करतात. हे काँग्रेस पक्ष कदापीही सहन करणार नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार.’’ यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, रफिक शेख, माजी नगरसेकविका लता राजगुरू, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, राजेंद्र शिरसाट, अविनाश साळवे, राज अंबिके, नीता रजपूत, प्राची दुधाने, प्रियंका मधाळे, ॲड. राजश्री अडसूळ, अर्चना शहा, प्रियंका रणपिसे, शिवानी माने, शारदा वीर, रेखा जैन, अंजली सोलापूरे, मंदा जाधव, माया डुरे, स्वाती शिंदे, सीमा सावंत, सुंदर ओव्‍हाळ, ज्योती चंदेवळ, अनिता धिमधिमे, यशराज पारखी, गुलाम खान, मुन्ना खंडेलवाल, प्रकाश पवार, अविनाश अडसूळ, जयसिंग भोसले, समीर गांधी, अक्षय जैन, संदिप मोकाटे, संतोष आरडे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, राजू ठोंबरे, रमेश सकट, हेमंत राजभोज, अक्षय माने, सचिन दुर्गोडे, किशोर मारणे, राजेश मोहिते, राजाभाऊ कदम, लतेंद्र भिंगारे आदी उपस्थित होते.

पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

२१ ते २४ एप्रिल दरम्यान ‘चित्रपताका’ नावाने होणार महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अनावरण

मुंबई दि.८: ‘मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थाने राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे नाव ‘चित्रपताका’ असे ठेवण्यात आले आहे. त्याचेच प्रतिकात्मक रूप बोधचिन्हात उमटले असून घोड्यावर बसलेला, हातात पताका आणि रिळ स्वरूपातील ढाल घेऊन पुढे चाललेला मराठी चित्रपटकर्मी मावळा या बोधचिन्हात आहे’ अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार- मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, तसेच महोत्सवाचे संचालक ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे उपस्थित होते.

२१ ते २४ एप्रिल दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे ‘ चित्रपताका ‘ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी एक झळाळती पताका म्हणजेच ‘चित्रपताका’ ही संकल्पना या महोत्सवामागे आहे. प्रेक्षक आणि मराठी सिनेमा घडवणारे लेखक, दिग्दर्शक, निर्माते,सर्व चित्रकर्मी अशा घटकांचा हा महोत्सव असणार आहे’ असे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

या चार दिवसांच्या चित्रपट महोत्सवात एकूण ४१ दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये पूर्ण लांबीचे सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरण विषयक, स्त्री जीवना विषयक प्रश्न मांडणारे चित्रपट, बालचित्रपट, विनोदी अशा विविध जॉनरच्या चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांची निवड करण्यासाठी डॉ.संतोष पाठारे, सुकन्या कुलकर्णी, समीर आठल्ये आणि पुरुषोत्तम बेर्डे या तज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. या महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध विषयांवर पाच परिसंवाद, दोन मुलाखती आणि दोन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. सिने पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच, मराठी चित्रपटांविषयीचे प्रदर्शनही या महोत्सवात असणार आहे. पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, सुबोध भावे, अलका कुबल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर महोत्सवास उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. नवे आणि जुने चित्रकर्मी, उत्तम प्रेक्षक यांना एकत्र आणणारा, मराठी चित्रसृष्टीचा हा चार दिवसांचा सोहळा असणार आहे.

‘चित्रपताका’च्या माध्यमातून मराठी सिनेमा साता समुद्रपार पोहोचावा, आणि ही घौडदौड यापुढेही अशीच सुरू राहावी, हीच या महोत्सवामागील प्रेरणा आहे. हा महोत्सव विनामूल्य असून ऑनलाईन वा प्रत्यक्ष कला अकादमी येथे येऊन महोत्सवासाठी नावनोंद करणे गरजेचे आहे. सर्व मराठी चित्रपट रसिकांना या महोत्सवाला हजेरी लावण्याचे आवाहन ह्या वेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचार:निदर्शकांनी दगडफेक केली, वाहने जाळली; पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये मंगळवारी वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू असताना हिंसाचार उसळला. निदर्शकांनी अनेक वाहने पेटवून दिली. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश आहे. निदर्शकांशी झालेल्या संघर्षात अनेक पोलिस जखमी झाले.

मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधात मुस्लिम संघटना निदर्शने करत होत्या. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.

जमाव हिंसक झाला. लोकांनी पोलिसांच्या गाड्या आणि इतर वाहनांना आग लावली. यानंतर घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वास्तविक, वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेने २ एप्रिल रोजी आणि राज्यसभेने ३ एप्रिल रोजी मंजूर केले. १२ एप्रिल रोजी उशिरा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला मान्यता दिली आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाले. सरकारने नवीन कायद्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी केली होती.

नवीन कायद्याबाबत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात १२ याचिका दाखल झाल्या आहेत. त्याच वेळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ११ एप्रिलपासून देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, या कायद्याचा उद्देश वक्फ मालमत्तेमध्ये भेदभाव, गैरवापर आणि अतिक्रमण रोखणे आहे. राज्यसभेत १२८ सदस्यांनी या विधेयकाला (आता कायदा आहे) पाठिंबा दिला, तर ९५ सदस्यांनी विरोध केला. हे विधेयक २ एप्रिल रोजी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. या काळात २८८ खासदारांनी समर्थनात मतदान केले, तर २३२ खासदारांनी विरोधात मतदान केले.
वक्फ कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ११ याचिका दाखल
नवीन वक्फ कायद्याच्या घटनात्मकतेविरुद्ध जमियत उलेमा-ए-हिंद व्यतिरिक्त ७ एप्रिलपर्यंत सर्वोच्च न्यायालयात ११ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. जमियत उलेमा-ए-हिंदने म्हटले आहे की, आमच्या राज्य युनिट्स देखील या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देतील.

याचिकांवरील सुनावणीबाबत, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, नवीन वक्फ कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची यादी करण्याचा म्हणजेच सुनावणी करण्याचा निर्णय ते घेतील. जमियत उलेमा-ए-हिंदचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे तातडीने सुनावणीची मागणी केली होती.

यावर सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले- तुम्ही वकिलांना आम्हाला मेल किंवा पत्र पाठवायला सांगा. यावर सिब्बल म्हणाले की, ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. खरं तर, सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणीसाठी तोंडी उल्लेख करण्याची म्हणजेच तोंडी अपील करण्याची पद्धत रद्द करण्यात आली आहे. सिब्बल यांच्यानंतर, सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले- ठीक आहे, आपण पत्रे आणि मेल पाहू. यावर निर्णय घेतला जाईल. आम्ही त्यांची यादी करू.

तृप्ती भोईर, आदिनाथ कोठारे, तर ऋषीकेश जोशी, दिपक करंजीकर प्रमोद पवार यांचा मराठी चित्रपट अनुदान शिफारस समितीत समावेश

मुंबई- मराठी चित्रपटासाठी अनुदान देणारी शिफारस समिती गठीत करण्यात आली असून त्यात पाच अशासकीय सदस्यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक कला व क्रीडा व्यक्तीच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट /माहितीपट /लघुपट या अनुदान देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने छाननी समिती गठीत केली असून “छाननी समिती”मध्ये प्रमोद पवार, श्रीमती तृप्ती भोईर, आदिनाथ कोठारे, तर ऋषीकेश जोशी, दिपक करंजीकर यांची “निवड समिती”मध्ये अशासकीय सदस्य म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे

थॅलेसेमिया मुक्त भारतासाठीसर्वंकष, संघटित प्रयत्नाचा पुण्यात निर्धार

पुणे
थॅलेसेमिया या रक्ताच्या गंभीर आजारावर रुग्णांचे उपचार व्यवस्थापन, वाहक शोध आणि समाजप्रबोधन या त्रिसूत्रीवर काम करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ आणि ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’ यांच्या वतीने संयुक्त प्रयत्न केले जाणार असून त्याचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला.

पुण्यातील ‘सेवा भवन’ येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून या उपक्रमासंबंधीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, ‘जनकल्याण समिती‘चे अध्यक्ष डॉ. अजित मराठे, ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. थॅलेसेमिया या समस्येच्या संदर्भात काम करणारी रक्त केंद्र आणि सामाजिक संस्थांना एकत्र आणून त्यांच्या कार्याचे सुसूत्रिकरण ‘जनकल्याण समिती’ आणि ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’ यांच्यातर्फे केले जाणार आहे.

जेव्हा सामूहिक व प्रभावी प्रयत्न होतात तेव्हा वैद्यक क्षेत्रासमोर येणाऱ्या नित्य नवीन आव्हानांवर मात करता येते, असे पूर्वीचा इतिहास सांगतो. अशाच पद्धतीचे प्रयत्न सर्वांनी मिळून आणि सर्वंकष पद्धतीने आपण केले तर आपण याही आव्हानावर मात करून थॅलेसेमिया मुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असा विश्वास भय्याजी जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.

रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी या समस्येच्या वेगवेगळ्या अंगांचा विचार प्रतिनिधींसमोर मांडला. डॉ. चिन्मय उमरजी यांनी आजाराची शास्त्रीय माहिती आणि सध्याचे प्रचलित व्यवस्थापन याची माहिती दिली. थॅलेसेमिया सोसायटी पुण्याच्या अध्यक्ष डॉ. नीता मुन्शी आणि राज्य रक्त संक्रमण परिषद, सहाय्यक संचालक, डॉ. महेंद्र केंद्रे यांनी थॅलेसेमिया आजार आणि त्याच्याशी सामना करण्यासाठी आवश्यक प्रयत्न या विषयावर मार्गदर्शन केले.

थॅलेसेमिया रुग्णांचे व्यवस्थापन या विषयावर संभाजीनगरच्या डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि डॉ. लिझा बलसारा यांनी थॅलेसेमिया मुक्त समाजासाठी थॅलेसेमिया तपासणी या विषयावर डॉ. अतुल कुलकर्णी आणि डॉ. अमर सातपुते यांनी तसेच थॅलेसेमिया विषयाचे व्यापक समाज प्रबोधन या विषयावर प्रदीप पराडकर आणि डॉ. आशुतोष काळे यांनी
चर्चा समन्वयन केले.

थॅलेसेमिया हा रक्ताचा एक अनुवांशिक आणि अतिशय गंभीर आजार आहे. वाहक पती-पत्नी एकत्र आले तर मुलांना हा आजार होतो. या आजारावर आज किफायतशीर उपचार नसल्यामुळे ठराविक कालावधीनंतर वारंवार त्यांना रक्त द्यावे लागते. या आजाराबाबतचा सर्वंकष विचार कार्यशाळेत करण्यात आला. राज्यातील १८ जिल्ह्यांतील २४ संस्थांचे तसेच १५ रक्त केंद्रांचे प्रतिनिधी कार्यशाळेत उपस्थित होते. या आजाराच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या विविध संस्थांचा सत्कारही कार्यशाळेत करण्यात आला.

अरुण दातेंमुळे तीन पिढ्या भावगीताच्या विश्वात रमल्या – खासदार मेधा कुलकर्णी

‘नवा शुक्रतारा’च्या १०० व्या कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद

१०० व्या कार्यक्रमानिमित्त गायक, संगीतकार मंदार आपटे यांचा विशेष सत्कार

पुणे दि. ७ एप्रिल, २०२५ : १९६३ साली शुक्रतारा हे गाणे लिहिले गेले असेल, त्या काळी आमचा जन्मही झाला नव्हता, त्या काळची तरुण पिढी अरुण दातेंची भावगीते ऐकायची, त्यामध्ये रमायची. आम्ही तरुण वयात असताना त्या भावविश्वात आम्हीही रंगलो आता आमची मुले तारुण्यात येत असताना अरुण दाते यांच्या गीतांमधील गोडवा आजही कायम आहे. त्यामुळे अरुण दातेंमुळे तीन पिढ्या या भावगीतांच्या विश्वात रमल्या, अशा भावना खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. ‘शुक्रतारा’, ‘लाजून ते हसणे…’, ‘झोपाळ्या वाचून झुलायचे…’, ‘या जन्मावर…’ अशी कित्येक गाणी आजही रसिकांच्या मनावर गारुड घालत अरुण दाते यांच्या आठवणी जाग्या करतात, असेही त्यांनी नमूद केले.

स्व. अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांच्या ‘नवा शुक्रतारा’ च्या १०० व्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या, त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माणिक निर्मित, अतुल अरुण दाते प्रस्तुत आणि मॅजिस्टिक्स लँडमार्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम आज कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला. अतुल अरुण दाते, मॅजिस्टिक्स लँडमार्क्सच्या प्रीती पानसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. १०० व्या ‘नवा शुक्रतारा’ निमित्त आज गायक, संगीतकार मंदार आपटे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.

यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “शुक्रतारा हा कार्यक्रम लोकप्रिय ठरतो कारण त्यातील गाणी पुन्हा पुन्हा ऐकण्याची मागणी ही रसिकांची आहे. यामध्ये गाण्यांच्या चालींचे. पाडगांवकरांच्या गीतांचे आणि अरुण दाते यांच्या आवाजाचे महात्म्य आहे, असे मला वाटते. आज आपण यु ट्यूबवर अनेकदा गाणी ऐकतो, अगदी पुन्हा पुन्हा ऐकतो. पण, ती मजा येत नाही. अशा कार्यक्रमांमधील मजा इथेच लाईव्ह ऐकण्यात आहे. कार्यक्रमामध्ये आपण गायक, कलाकारांचे सादरीकरण पाहतो, दाद देतो, वन्स मोर देतो, कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने मित्र मंडळी, कुटुंबियांसोबत मजा घेतो. त्यामुळे असे कार्यक्रम हे होत रहायला हवे असे मला वाटते.”

अरुण दाते मला मुलगी मानायचे. त्यांच्या आवाजात जेवढा गोडवा होता तेवढाच गोडवा त्यांच्या स्वभावातही होता. त्यांचे वागणे देखील खूप छान असायचे. आज नवा शुक्रताराचे प्रयोग पाहताना अरुण दाते यांच्या आवाजाची, गाण्याच्या गोडव्याची प्रचीती येते, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.

बाबांनी शुक्रताराचे तब्बल पावणे तीन हजार कार्यक्रम केले. ‘नवा शुक्रतारा’ हा त्यांच्या याच कार्यक्रमांपुढील १०० कार्यक्रमांचा भाग आहे असे मी मानतो. ‘नवा शुक्रतारा’चा पहिला प्रयोग पुण्यात झाला, १०० वा प्रयोगही पुण्यात होतोय आणि २०० वा प्रयोगही आपण पुण्यातच करू असा विश्वास यावेळी अतुल अरुण दाते यांनी व्यक्त केला.

मी भावगीत गायकाचा मुलगा असलो, तरी सर्व प्रकारचे संगीत ऐकतो. फक्त भावगीतच ऐकले पाहिजे असे कधीच मनात आले नाही. मी पाकिस्तानी कलाकारांची गाणीही ऐकली आहेत. मात्र मराठी भावसंगीत टिकावे म्हणून काम करायचे असे मी ठरविले होते, त्यामुळे याच क्षेत्रात कार्यरत आहे, असेही दाते यांनी नमूद केले.

अरुण दाते जरी हिंदू होते तरी त्यांनी गायकीमध्ये कधीच धर्म आणला नाही. ते मेहेंदी हसन आणि मायकल जॅक्सन दोघांचे ही संगीत ऐकायचे अशी आठवण अतुल दाते यांनी सांगितली.

२०१६ पासून ‘नवा शुक्रतारा सुरु झाला तेव्हापासून मी त्याचा भाग आहे. कार्यक्रमांच्या गर्दीत आपला स्वत:चा एक वेगळा कार्यक्रम असावा याचे समाधान मला या कार्यक्रमाने दिले. माझा हा ८५ वा सोलो शुक्रतारा कार्यक्रम असल्याचा मला आनंद आहे असे सांगत मंदार आपटे म्हणाले, “९९ व्या कार्यक्रमावेळी मी अंतर्मुख होतो, आपण कुठे बसलो आहोत, इथे बसण्याची आपली पात्रता आहे का? हे विचार सातत्याने माझ्या मनात येत होते. १९९६ साली कोल्हापूर ला असताना एका प्रेक्षकाने तिकीट रद्द केले म्हणून अरुण दाते यांच्या शुक्रताराचा कार्यक्रम मी मागच्या रांगेत बसून पाहिला होता. आज मी दाते कुटुंबातील एक भाग आहे हे माझे भाग्य आहे, असे मी समजतो.”

‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम करताना माझ्या आवाजात प्रेक्षकांनी अरुण दातेंचा आवाज शोधू नये असे मी कायम सांगतो, आपण शुक्रतारा नाही आपण केवळ या कार्यक्रमाद्वारे त्यातली गाणी लोकांसमोर नेत आहोत याची मला जाणीव आहे. अरुण दाते यांचा आवाज एकमेव आहे, अरुण दाते हेच एकमेव ‘शुक्रतारा’ आहेत असे मंदार आपटे म्हणाले. मी फक्त अरुण दाते यांनी गायलेली उत्तम गाणी, उत्तम शब्द, उत्तम संगीत हे रसिकांसमोर सादर करतो कारण संगीत हा माझा आनंद आहे. संगीत हे व्यावसायिकतेपेक्षा जास्त माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे असेही आपटे यांनी नमूद केले.

‘नवा शुक्रतारा’च्या १०० व्या कार्यक्रमानिमित्त सहभागी कलाकारांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये गायिका पल्लवी पारगांवकर, वर्षा जोशी यांसोबतच प्रसन्ना बाम, अमित कुंटे, अभय इंगळे, प्रणव हरिदास, झंकार कानडे, अमेय ठाकुरदेसाई, प्रशांत कांबळे, सायली सोनटक्के, शुभंकर कुलकर्णी, तुषार जोशी यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम जय राम जय जय राम या अरुण दाते यांनी गायलेल्या एकमेव भजनाने झाली. यानंतर ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला…’, ‘सखी शेजारिणी तू हसत रहा…’, ‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे…’, ‘दिवस तुझे हे फुलायचे.. झोपाळ्यावाचून झुलायचे…’ ही गीते सादर झाली. कार्यक्रमाची संकल्पना अतुल अरुण दाते यांची होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती जोशी यांनी केले.

भारतीय सिनेसृष्टीत नवा अध्याय: एटली, अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्स एकत्र

दिग्गज एकत्र! एटली, अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्सचा मोठा प्रकल्प

एटली, अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्सचा महत्त्वाचा पॅन-इंडिया चित्रपटासाठी ऐतिहासिक संयोग

भारतीय चित्रपट उद्योगात धूम माजवणाऱ्या, दिग्दर्शक एटली, स्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख कंपनी कलानिधी मारन यांच्या सन पिक्चर्स यांनी एक ऐतिहासिक पॅन-इंडिया चित्रपटासाठी त्यांच्या बहुप्रतिक्षित सहकार्याची औपचारिक घोषणा केली आहे.

हा अद्याप अनटाइटल्ड फिल्म असलेला चित्रपट तीन जबरदस्त क्रिएटिव्ह ताकतींच्या संयोगाचे प्रतीक आहे — एटली, ज्यांनी जवान, थेरी, बिगिल, मर्सल सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा दिग्दर्शन केला; अल्लू अर्जुन, पुष्पा चे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि देशभर पसरलेल्या फॅंडमचे प्रतीक; आणि सन टीव्ही नेटवर्क, जे भारतातील सर्वात प्रभावशाली मीडिया गटांपैकी एक आहे.

सध्यातरी ‘AA22 x A6’ म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट भारतीय भावनांशी संबंधित परंतु जागतिक आकर्षण असलेली कथा, भव्यता, भावना आणि अॅक्शनने भरपूर एक ऐतिहासिक सिनेमॅटिक अनुभव होणार आहे.

हा प्रोजेक्ट या वर्षाच्या अखेरीस फ्लोअरवर जाईल, आणि कास्ट, क्रू आणि रिलीज शेड्यूल संदर्भातील अधिक माहिती लवकरच शेअर केली जाईल.

अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्ससोबतच्या या मोठ्या सहकार्याबद्दल एटली यांनी आपली आनंद व्यक्त करत म्हटले,
“ही ती फिल्म आहे जी मी वर्षानुवर्षे स्वप्न पाहिली होती. या कथेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी मी खूप वेळा शांतपणे मेहनत घेतली आहे. आणि आता अल्लू अर्जुन सरांसारख्या आयकॉन स्टारसोबत, कलानिधी मारन सरांसारख्या दूरदर्शी निर्मात्याच्या नेतृत्वाखाली सन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाचे निर्माण करणे — हे माझ्यासाठी स्वप्नाचे सत्य होण्यासारखे आहे. हा चित्रपट आत्म्याने ‘मास’ आहे आणि त्याच्या कथेच्या मांडणीमध्ये जादुई आहे — जे प्रत्येक प्रेक्षकाला स्पर्श करेल आणि मनोरंजन देईल.”

सन पिक्चर्सने या ऐतिहासिक संयोगाबद्दल सांगितले,
“मास स्टोरीटेलर एटली यांच्या भव्य दृष्टिकोन आणि आयकॉनिक अल्लू अर्जुन यांच्या बॉक्स ऑफिसवरील सीमांची ओळख तोडणारी उपस्थिती यासह, सन पिक्चर्सचा हा संयोग एक जादुई अनुभव देणारा ठरेल. हा एक असा प्रोजेक्ट आहे जिथे उद्योगातील सर्वोत्तम लोक एकत्र आले आहेत, आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसह, जागतिक स्तरावरही नवे मानक स्थापित करेल.”

बारामती आणि पुरंदर तालुक्यात वारस नोंदी उपक्रमाचे आयोजन

उद्योजक व भूखंडधारकांनी वारसनोंदी करुन घ्यावे-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांचे आवाहन

बारामती, दि. ८: राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने प्रादेशिक कार्यालय, बारामती येथे ९ एप्रिल तर असोसिएशन हॉल, जेजुरी, पुरंदर येथे ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वारस नोंदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात बारामती व पुरदंर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, भुखंडधारकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. तरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व भूखंडधारकांनी उपस्थित राहून वारस नोंदी करुन घ्याव्यात, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले आहे.

शास्त्रीय सूर संगीतातून रंगली मैफल

सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात कलापिनी कोमकली यांचे सुश्राव्य गायन
पुणे: सुस्वर स्वर, शास्त्रीय संगीतातील विविध रागांमधील बंदिशींचे चपखल सादरीकरण आणि रसिकांची मनमुराद दाद, अशा भारावलेल्या वातावरणात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम पार पडला.

सद्गुरु जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी महोत्सवात विदुषी कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये त्यांनी शास्त्रीय संगीत व भजन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 प्रशांत पांडव (तबला), स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), आणि राजगोपाल गोसावी (पखवाज) यांनी कलापिनी कोमकली यांना सुमधुर साथ संगत केली. ट्रस्टचे राजेंद्र तांबेकर यांच्या हस्ते कलापिनी कोमकली यांचे स्वागत करण्यात आले.

विदुषी कलापिनी कोमकली यांनी त्यांच्या वडिलांनी आणि गुरूंनी पंडित कुमार गंधर्व यांनी रचलेल्या ‘देवो दान मोहे’ या राग कल्याणमधील बंदिशीने मैफिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बडा खयाल आणि धृत रचनांनी मैफल रंगवत नेली. रसिकांनी त्यांच्या गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मैफिलीचा मनमुराद आनंद घेतला.

कलापिनी कोमकली म्हणाल्या, मी माझ्या गायनाचे अनेक ठिकाणी सादरीकरण केले आहे, परंतु प्रत्यक्ष सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या समाधीसमोर गायन करण्याची संधी मला मिळत आहे, याबद्दल मी आभारी आहे. एक प्रकारे मी देवाच्या दरबारातच माझे सादरीकरण करत आहे.

स्टार हेल्थ इन्शुरन्सने महाराष्ट्रात आपले स्थान विस्तारले, पुण्यात नवीन प्रादेशिक कार्यालय सुरू

 पुणे विभागातील निम-शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये विमा प्रवेश वाढवण्याच्या उद्देशाने
धोरणात्मक विस्तार
 महाराष्ट्र विभागाचा सध्या 2,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय पोर्टफोलिओ असून आर्थिक वर्ष
26 मध्ये 20% वाढीचा अंदाज
 1,17,000 हून अधिक एजंट्सच्या मजबूत नेटवर्कच्या सहाय्याने संपूर्ण प्रदेशात ग्राहकांपर्यंत पोहोच
आणि समुदायाशी दृढ संबंध निर्माण

 स्टार हेल्थ इन्शुरन्सने महाराष्ट्रात 32 लाखांहून अधिक लोकांना आणि पुण्यात 6.8 लाख हून अधिक
लोकांना आरोग्य विम्याचे संरक्षण दिले आहे

Pune, : भारतातील सर्वात मोठी रिटेल हेल्थ इन्शुरन्स कंपनी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स
कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) ने पुण्यात येरवडा येथे नवीन प्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटनासह
महाराष्ट्रातील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. हा विस्तार या भागातील निम शहरी आणि ग्रामीण
बाजारपेठांमध्ये आपले स्थान वाढवण्याच्या स्टार हेल्थच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. येथे लाखो
कुटुंबांसाठी आरोग्य सेवांसाठी आर्थिक साहाय्याची गरज महत्त्वाची आहे. कंपनी पुणे विभागात ग्राहकांशी
अधिक दृढ नाते निर्माण करण्यावर आणि त्यांचा सहभाग वाढवण्यावर देखील लक्ष केंद्रित करेल.
उद्घाटन प्रसंगी स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रॉय
म्हणाले, “पुणे नेहमीच आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे आणि आमच्या नवीन प्रादेशिक
कार्यालयाच्या उद्घाटनाने आम्ही या प्रदेशाशी असलेली आमची बांधिलकी अधिक मजबूत करत आहोत.
महाराष्ट्र व्यवसाय आणि दर्जेदार आरोग्य सेवा संरक्षण शोधणाऱ्या व्यक्तींसाठी केंद्र म्हणून विकसित होत
असताना आमचे लक्ष आरोग्य विमा अधिक सुलभ आणि अखंड विना अडथळा करण्यावर आहे. आम्ही IRDAI
च्या ‘सर्वांसाठी विमा’ या दृष्टिकोनाशी सुसंगत आहोत आणि वैद्यकीय आणीबाणीत व्यक्ती आणि कुटुंबांना
आवश्यक आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी जागरूकता वाढवून प्रवेश सखोल करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
मजबूत स्थानिक टीम आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासह, आरोग्य संरक्षणाचा विस्तार आणि या प्रदेशासाठी
आरोग्यदायी, सुरक्षित भविष्य घडवण्याच्या या प्रवासाचा भाग होण्याचा आम्हाला आनंद आहे.”

नवीन प्रादेशिक कार्यालय 13 ते 16, KIA शो रूमच्या वर, पहिला मजला, येरवडा, पुणे – 411006 येथे
स्थित आहे. येथे प्रशासन, दावे, वित्त आणि खाती, रुग्णालय संबंध, शिक्षण आणि विकास, कायदेशीर आणि
विक्री यांसारख्या प्रमुख विभागांतील काम पाहणाऱ्या टीम आहेत. मुंबई वगळता महाराष्ट्रात कंपनीकडे सध्या
2,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय पोर्टफोलिओ आहे आणि आर्थिक वर्ष 26 मध्ये 20% वाढ होण्याचा
अंदाज आहे. या विभागाला 1,17,000 पेक्षा जास्त एजंट्सच्या मजबूत नेटवर्कचे पाठबळ आहे. त्यापैकी
बहुतांश एजंटनी ग्रामीण समुदायांच्या आरोग्य विम्याच्या विशिष्ट गरजांवर लक्ष केंद्रित करून प्रशिक्षण घेतलेले
आहे. आर्थिक वर्ष 25 (एप्रिल-डिसेंबर’24) मध्ये, स्टार हेल्थ इन्शुरन्सने महाराष्ट्रात 32 लाखांहून अधिक
लोकांना आणि पुण्यात 6.8 लाखांहून अधिक लोकांना आरोग्य विम्याचे संरक्षण दिले आहे. तसेच येत्या काही
वर्षांत ग्रामीण भागांत विमा संरक्षण वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. पुण्यात, स्टार हेल्थकडे
जवळपास 470 रुग्णालयांचे नेटवर्क, 20 शाखा आणि 360 कर्मचारी आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेडी आणि लहान गावांपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रवेशद्वार म्हणून कार्य करत पुणे
विभाग स्टार हेल्थच्या ग्रामीण विस्तार धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. येरवड्यातील नवीन कार्यालय
स्टार हेल्थच्या हिंजवडी, तळेगाव, चाकण आणि इतर विकसीत होत असलेले औद्योगिक कॉरिडॉर आणि
टाउनशिपसह अनेक सेवांपासून वंचित बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरणात्मक केंद्र म्हणून काम करेल.
जोडीला शहरी केंद्रांच्या तुलनेत आरोग्य विमा प्रवेश पारंपारिकपणे कमी असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हे
आणि जुन्नर तालुक्यांतील लहान गावांमध्ये आरोग्य विमा प्रवेश वाढवेल.
या नवीन प्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटनासह स्टार हेल्थ पुणे विभागातील एजंट्स आणि
पॉलिसीधारकांसोबत अधिक वैयक्तिकृत, जवळचे संबंध निर्माण करून ग्राहक सेवा वाढवण्याचा आणि त्यायोगे
त्यांचे म्हणणे ऐकले जाईल, त्यांना महत्त्व दिले जाईल आणि काळजी घेतली जाईल हे सुनिश्चित करण्याचा
प्रयत्न करेल.

समता पंधरवड्यानिमित्त जात पडताळणीचे अर्ज दाखल करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. ८: समता पंधरवड्यानिमित्त शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या व आता व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या; परंतु, मुदत संपूणही जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज न दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या व आता सीइटी, जेईई, नीट आदी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुविशारदशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, कृषी, पशुसंवर्धन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच पदवीनंतर एम.बी.ए. एम.सी.ए. एल.एल.बी. आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. त्याकरीता ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल केले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ही मुदतवाढ दिली आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://ccvis.barti.in किंवा https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन त्याची मूळ प्रत (हार्ड कॉपी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, आळंदी रोड, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे या ठिकाणी ३० एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणेचे सदस्य संजय दाणे यांनी केले आहे.

तनिषा भिसे मृत्यू नंतर झोपलेल्या आरोग्य प्रमुख झाल्या जाग्या … सर्व खासगी रुग्णालयांना दिली नोटीस:उपचारापूर्वी डिपॉझिट न घेण्याची ताकीद

पुणे- महापालिकेचे आरोग्य खाते झोपले आहे काय ? असा ठणठणीत सवाल केल्यावर महापालिकेच्या झोपी गेलेल्या आरोग्य प्रमुख अखेरीस जाग्या झाल्या आणि शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून उपचारापूर्वी डिपॉझिट घेण्यास सक्त मनाई केली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णावर प्रथम उपचार करा त्यानंतर त्यांच्याकडे पैसे मागा, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

तनिषा भिसे नामक गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, उपचारास विलंब झाल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून दीनानाथ रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.

महापालिकेने आपल्या नोटीसीत सर्वच खासगी रुग्णालयांना रुग्णांकडून उपचारापूर्वी डिपॉझिट न घेण्यास बंदी घातली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणतीही अनामत रक्कम घेतली जाऊ नये. सर्वप्रथम रुग्णावर उपचार करण्यास प्राधान्य दिले जावे, असे निर्देश मनपाने आपल्या तातडीच्या नोटीसीद्वारे दिलेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे इमर्जन्सी स्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, पुणे पोलिसांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात वैद्यकीय दुर्लक्षीपणा आढळला तर गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिलेत. या प्रकरणी पोलिसांनी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले आहे. यासंबंधीच्या सरकारी अहवालात तनिषा भिसे यांना रुग्णालयात गंभीर स्थितीत तब्बल साडेपाच तास बसवून ठेवल्याची बाब समोर आली आहे. ही वैद्यकीय नेगलिजन्सची बाब आहे. यामुळे उपचारास विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आपल्या पत्रासोबत जोडल्याची माहिती आहे.

प्रशासनात लोकाभिमुख काम करण्याची सांघिक भावना हवी ⁃ माजी आयुक्त रमानाथ झा

आयुक्त – निर्णयांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा अधिकारी ते सेवक वर्ग असते..!
⁃ पुणे दि ७ एप्रील
आयुक्त निर्णय घेतात, मात्र अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेस प्रशासन संबोधतात, मात्र यामध्ये लोकाभिमुख काम करण्याची सांघिक भावना (टिम वर्क) हवी, असे वक्तव्य पुणे महापालिकेचे माजी आयुक्त (आय ए एस) श्री रमानाथ झा यांनी पुणे महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात केले.
ते पुढे म्हणाले के अनेक वर्षे महापालिकेत काम करताना ऊत्तरदायीत्वाची सांघीक भावना उत्पन्न होते व आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आपण अधिकारी ते सेवकवर्ग करता, हेच प्रशासकीय कामाचे गमक आहे. माझ्या कारकिर्दीत झालेल्या कामांची आपण स्तुती केलीत, मात्र निर्णयांची अंमलबजावणी करणारे तुम्हीच असल्याने ते निर्णय फलद्रुप ठरल्याचे सांगून निवृत्त अधिकारी ते सेवकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सेवानिवृत्ती नंतर चे आयुष्यमान वाढत असल्याचे सांगून ते दर्जेदार व लोकोपयोगी पद्धतीने जगून समाजाचे देणे फेडणे हेच आपल्या हाती असल्याचे सांगितले.
⁃ या प्रसंगी पुणे मनपाचे माजी उपायुक्त व निवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष जयंत पवार, माजी अध्यक्ष संभाजी राजे भोसले,माजी कार्याध्यक्ष विठ्ठलराव शेटे सर ,ज्येष्ठ सल्लागार गोपाळदादा तिवारी, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, माजी उपायुक्त नंदकुमार जगताप, कार्याध्यक्ष संजीव मोरे व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक स्व भाई वैद्य यांच्या प्रतिमेस मानयवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुणे “महापालिका स्थानिक स्वराज्य (स्वायत्त) संस्था असुन “लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या संविघानिक कर्तव्यपुर्तीतुन चालते” असे प्रतिपादन संघटनेचे जेष्ठ सल्लागार गोपाळदादा तिवारी यांनी केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “अधिकारी ते सेवक वर्ग हे प्रशासन असुन ‘लोकशाही’चा प्रथम स्तंभ असल्याने, या घटकाच्या संविधानीक हक्कांची पुर्तता होणे, यास संरक्षण व नैतिक बळ मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मा. ‘रमानाथ झा यांच्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीत’ मनपा सेवकांना न्याय मिळाला व अशा आयुक्तांच्या कारकिर्दीचे सर्वचजण स्मरण करतात असे उदगार कामगार नेत्या काॅ. मुक्ता मनोहर यांनी काढले. “पुणे मनपा सेवा निवृत्त संघटनेच्या पारदर्शक समाजिक कार्यास उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार” ही आमच्या कामास मिळालेली पावती असल्याचे गौरवोद्गार संघटनेचे अध्यक्ष जयंत पवार यांनी प्रस्ताविक भाषणात काढले.
⁃ या प्रसंगी संघटनेच्या परंपरे प्रमाणे ‘विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या’ सेवा निवृत्त सेवकांचे व कुटुंबियांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. (त्यांची नांवे वैशाली बर्गे,उषा सातव)
⁃ पाहुण्यांचे स्वागत व सत्कार कार्याध्यक्ष संजीव मोरे व पदाधिकारी यांनी केले.
⁃ सुत्र संचालन – शिल्पा देशपांडे यांनी केले.
⁃ आभार प्रदर्शन सरचिटणीस बापुसाहेब खलाटे यांनी केले.
सदर कार्यक्रमास पुणे महानगरपालिका,पीएमपीएमएल, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त सेवक उपस्थित होते.

तुमचं लाडकं, महागाईच्या गोदीत बसलेलं मोदी सरकार!:’मोदी सरकारचे गॅस दरवाढीवर खुले पत्र’ म्हणत शरद पवार गटाचा टोला


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचे एक कथित खुले पत्र सोशल मीडियावर शेअर करत ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’ असा सणसणीत टोला हाणला आहे.

केंद्र सरकारने सोमवारी स्वयंपाकाच्या गॅसमध्ये तब्बल 50 रुपयांची दरवाढ केली. या निर्णयावरून केंद्रावर चौफेर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोदी सरकारचे जनतेला एक कथित खुले पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या पत्राद्वारे मोदी सरकारच्या धोरणावर तिरकस टीका करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांचा समाचार घेतानाच शरद पवार गटाने जनतेला आता ही दरवाढ सहन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

शरद पवार गटाने आपल्या ट्विटर अकाऊंटरवर हे पत्र शेअर केले आहे. गॅस दरवाढीवर मोदी सरकारचं खुलं पत्र, असे शिर्षक असणाऱ्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, प्रिय देशवासीयांनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत. पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतीची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची सौम्य दरवाढ करतोय. तर आता तुम्हाला महागईची धग सहन करावी लागेल. तर कृपया निमूटपणे सहन करा. वाईट वाटून घेऊ नका. ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’, हे तुम्हाला एव्हाना कळालं असेलच. चिंता करू नका… पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू व सामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तुमचं लाडकं, (महागाईच्या गोदीत बसलेलं) मोदी सरकार.उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारने केलेली गॅस दरवाढ ही आजपासून म्हणजे 8 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.

शेअरमार्केट ट्रेडिंग नावाने १ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणा-या ६ भामट्यांना १२ दिवसांची कोठडी

पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. पुणे सायबर पोलिसांनी देशपातळीवरील फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून, आरोपींचे दुबई, गुजरात आणि पश्चिम बंगाल कनेक्शन असल्याचे समोर आले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे अनन्या गुप्ता नावाच्या महिलेने संपर्क केला. तिने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळेल, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एक कोटी ६० लाख रुपये जमा करण्यास प्रवृत्त करून फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान १७ मार्च रोजी वाघोलीतील एका बँकेच्या खात्यातून पाच लाख ८२ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे काढल्याचे निष्पन्न झाले. यावरून खराडीतील केतन भिवरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तांत्रिक तपासातून इतर आरोपींची नावे समोर आली. गोविंद सूर्यवंशी (रा. वाघोली, मूळ रा. हिंगोली), रोहित कंबोज (रा. वाघोली, मूळ रा. पंजाब), ओंकार भवर (रा. वाघोली, मूळ रा. हिंगोली), जब्बरसिंह पुरोहित (रा. चऱ्होली, मूळ रा. धारावी), निखिल ऊर्फ किशोर सातव (रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.यातील सूर्यवंशी आणि कंबोज बी.टेक पदवीधर असून, डिजिटल मार्केटिंग आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारात सक्रिय आहेत. सूर्यवंशी हा वाघोलीतील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को.ऑप बँकेचा संचालक आहे. कंबोज बँकेतील तांत्रिक कामे बघत होता. सातव हा बनावट बँक खाती पुरवठा करीत होता.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम, तुषार भोसले, संदीप पवार, दिनेश मरकड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.या टोळीने दीडशे बँक खाती वापरून सायबर गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नॅशनल सायबर पोर्टलवर विविध राज्यांत २९ तक्रारी दाखल असून, त्यात या टोळीचा हात असल्याचे सायबर पोलिसांनी उघड केले आहे.