पुणे, दि. १२: मतदानाच्या आणि एक दिवस आधीच्या दिवशी मुद्रित माध्यमात (प्रिंट मीडिया) प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक आहे. पूर्व- प्रमाणीत करुन घेतल्याशिवाय जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी म्हणजेच दि. २० नोव्हेंबर २०२४ आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर) मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसू शकेल अशा जाहिराती प्रसिद्ध होऊ नयेत याबाबत दक्षता घेण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.
कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी या तारखेला प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती प्रमाणीत करुन घ्याव्यात. प्रमाणीकरणाचे अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या किमान २ दिवस अगोदर एमसीएमसी समितीकडे सादर करावेत, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.