Home Blog Page 580

निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करुन प्रसारित केल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करुन सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल भोरमध्ये गुन्हा दाखल- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांची माहिती

पुणे, दि. 16: भोर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमिशनींगच्या कामकाजाचे मोबाईलवरुन बेकायदेशीरपणे व्हिडीओ चित्रीकरण करुन समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) प्रसारित केल्याबद्दल दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करुन पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे.

सरदार कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर येथे बुधवारी (दि. 13 नोव्हेंबर) ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमीशनींगचे कामकाज सुरु होते. यावेळी मोबाईल आदी उपकरणांना बंदी असताना उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांचे प्रतिनिधी विजय हनुमंत राऊत, रा. लवळे (ता. मुळशी) आणि कुलदिप सुदाम कोंडे यांचे प्रतिनिधी नारायण आनंदराव कोंडे रा. केळवडे (ता. भोर) यांनी बेकायदेशीरपणे मोबाईल घेऊन येऊन मॉकपोलचे चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर प्रसारित करुन गोपनियतेचा भंग केला. त्यामुळे विजय हनुमंत राऊत आणि नारायण आनंदराव कोंडे यांच्यावर 14 नोव्हेंबर रोजी भोर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.222/2024, बी.एन.एस.171(1), 223, आय.टी. अॅक्ट 72 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. या आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

या घटनेचे गांर्भीय लक्षात घेता घेता जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली, असेही डॉ. खरात यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी: ईव्हीएम कमिशनींग, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यादरम्यान निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, मतदान प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे. तसेच निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ तसेच छायाचित्रे काढून विविध व्हॉटस्अॅप ग्रुप, सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल.

अनाथांच्या यशोदेच्या घरी कृष्णाचं आगमन

पुणे : १४ नोव्हेंबर म्हणजे अनाथांची यशोदा अर्थात पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांचा आज वाढदिवस आणि बालदिन म्हणजे दुग्धशर्करा योग. या दिवसाचे औचित्य साधून या यशोदेच्या घरी कृष्णाचे आगमन झाले आहे. मांजरी येथील सन्मती बाल निकेतनच्या आवारात श्रीकृष्णाचे मंदीर उभारण्यात आले असून यामध्ये श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.या कार्यक्रमास शिक्षणमहर्षी डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला), माई देशमुख (मुंबई ), ममता सिंधुताई सपकाळ, दिपक गायकवाड, विनय सपकाळ व माईंच्या सर्व संस्थांमधील मुलं-मुली आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, ‘देव सगळीकडे आहे. तरीही त्याचं अस्तित्व डोळ्यांना दिसत राहावं असंच कायम वाटत राहतं. त्या मुर्तीसमोर उभं राहून हात जोडता यावे आणि प्रार्थना करता यावी..कधी स्वतःसाठी, कधी इतरांसाठी तर कधी अवघ्या विश्वासाठी. रोज संध्याकाळी प्रार्थना म्हटल्यानंतर आई आमच्याकडून वदवून घेत असे की, “देवा, आम्हाला हसायला शिकव..परंतु , आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस.” त्याची आठवण आजही आम्हाला आहे.

आजच्याच दिवशी माईंच्या शिरूर येथील शारदार्जुन व्हटकर बालभवन (माईनगरी) येथे नवीन इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. शिक्षणमहर्षी डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला), माई देशमुख (मुंबई), पोपटराव पवार, (आदर्श सरपंच, हिवरे बाजार) गिरीष कुलकर्णी (स्नेहालय, अहमदनगर) यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे.

पर्वती मतदारसंघासाठी ‘विकासाची दशसूत्री’ दिशादर्शक : आबा बागुल

पुणे-.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी तयार केलेली ‘विकासाची दशसूत्री’ दिशादर्शक ठरणार आहे. पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढविताना, सद्यस्थितीत भेडसावणाऱ्या समस्यांतून नागरिकांची सुटका करून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘विकासाची दशसूत्री’ हा जाहीरनामा निश्चितच आधारवड ठरणार आहे. त्यामुळे येत्या बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी हिरा निशाणीसमोरील बटन दाबून विजयी करा आणि ‘विकासाची दशसूत्री’साठी अनुक्रमांक’ दहा’ लक्षात ठेवा, असे आवाहन अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी केले आहे.
आबा बागुल म्हणाले की, विकासाच्याबाबतीत गत दहा वर्षात मतदारसंघाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहतूक, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, सुरक्षितता, कचरा, रोजगार, महिला सक्षमीकरण, पर्यावरण यावर आधारित ‘विकासाची दशसूत्री’ जाहीरनामा मतदारसंघाच्या विकासाला दिशा देणार आहे. पाच वर्षात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे.
वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शहरांतर्गत रिंग रोड(एचसीएमटीआर ), बीआरटी मार्गावर भुयारीमार्ग, ग्रेडसेपरेटर उभारणी,मुबलक व समान पाणीपुरवठ्यासाठी ऑनलाईन वॉटर डिस्ट्रिब्युशन सिस्टीम, दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेल्या राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलच्या धर्तीवर पाच शाळांची उभारणी, आधुनिक अभियांत्रिकी महाविद्यालय, निरामय आरोग्यासाठी रुग्णालये,मॅटर्निटी होम, युथ सेंटरद्वारे पाच वर्षात दहा हजार तरुणांना स्वयंरोजगार देण्याचे नियोजन, गुन्हेगारी मुक्त मतदारसंघासाठी ‘एआय’तंत्रज्ञानावरील स्वयंचलित सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी पोलिसांना पाठबळ, महिला सक्षमीकरणासाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबणार नाही यासाठी पावसाळी चेंबरमध्ये बोअर होल्स घेऊन त्यासाठी स्वतंत्र ‘सोक पिट’ यंत्रणा, पर्यटनाला चालना मिळावी त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय टुरिस्ट हबची निर्मिती करणार असून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कला -संस्कृतीचे प्रदर्शन होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा हे वैशिष्ट्ये असणार आहे. झोपडपट्टीवासीयांसह पूरग्रस्त, ओटा स्कीममधील नागरिकांना मालकी हक्काची घरे देण्याबाबत नियोजन. पर्यावरण पूरक विकासाचे प्रकल्प अशी सर्वसमावेशक ‘विकासाची दशसूत्री’ मुळे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावणार असल्याचा ठाम विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे.

वडगाव शेरीला बदनाम करणाऱ्या आमदाराला घरी बसवा ! :जयंत पाटील गरजले 

पुणे, वडगावशेरी:  

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता परांडे  नगर, धानोरी येथे बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी भव्य जनकल्याण जाहीर सभा घेतली. या सभेत जयंत पाटील यांनी त्रिकुट सरकारने राज्याचे अतोनात नुकसान केल्याने त्यांना शिक्षा करा, गद्दारांना शिक्षा करा, शिवाजी महाराजांचा पुतळा गलथान कारभाराने पाडणाऱ्यांना शिक्षा करा,विचारांची लढाई जिंका,असे तळमळीचे आवाहन केले.

फडणवीस,शिंदे, अजित पवार हे भित्रे त्रिकुट असून भोपळा देणाऱ्यांना, श्रीमंतांची चाकरी करणाऱ्यांना महाराष्ट्राने अद्दल घडवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

पोर्शे अपघात प्रकरणातील बळींना श्रध्दांजली वाहण्यासाठी जयंत पाटील यांनी स्वतःचा सत्कार बाजूला ठेवला.

बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्व, जनसंपर्क, आणि लोकांसाठी केलेल्या कामाचे त्यांनी जोरदार कौतुक केले. पठारे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आणि वडगाव शेरीचे नाव बदनाम करणाऱ्या आमदाराला घरी बसविण्याचे  आवाहन त्यांनी या सभेत मतदारांना केले. 

 महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती. बापूसाहेब पठारे, जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के,जयदेव गायकवाड,रेखा टिंगरे, श्री. टिंगरे,स्वाती पोकळे, कैलास पठारे, जयवंत गोसावी, सुनील माने, सागर माळकर, खांदवे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अंबुज पार्टी, रिपब्लिकन डेमोक्रॅटीक सह अनेक पक्ष, व्यक्तींनी पाठिंबा जाहीर केला.

आपल्या घणाघाती भाषणात जयंत पाटील म्हणाले, “विकास करणारा आमदार हवा कि विनाश करणारा आमदार हवा ,हे तुम्ही राज्याला दाखवून दिले पाहिजे.बापूसाहेब पठारे हे एक कर्तबगार उमेदवार आहेत. त्यांनी वडगावशेरीतील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या रुपाने वडगावशेरीत विकासाचे नवे पर्व सुरू होईल. असा दमदार उमेदवार  विधानसभेत गेला पाहिजे.”  

त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “राज्यातील सध्याचे सरकार चुकीच्या मार्गाने सत्तेवर आले असून चुकीच्या कामाने चालत राहिले.त्यामुळे राज्य २० वर्ष मागे पडले आहे.हे सरकार केवळ घोषणाबाजी करते; मात्र, प्रत्यक्षात जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. विकास फक्त कागदावर आहे, पण त्याचा लाभ सामान्य लोकांना मिळालेला नाही.समाजा-समाजात आणि धर्मा-धर्मात लढाया लावून भाजप सरकार स्वतःच्या भाकऱ्या भाजत असून त्यांचा सुपडा साफ केला पाहिजे.”  

वडगाव शेरीला मॉडर्न विकासाचे मॉडेल करू :बापूसाहेब पाठारे यांचा निर्धार:  

सभेत बापूसाहेब पठारे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आपण काय करतो आहोत याचे भान नसणारे उमेदवार या मतदारसंघात आहेत.त्यांनी हा मतदारसंघ राज्यात बदनाम केला.मी निवडून आल्यावर वडगाव शेरीची  मान खाली जाऊ देणार नाही आणि वडगाव शेरीला मॉडर्न विकासाचे मॉडेल करू.  पाण्यासाठी लॉकअप मध्ये वास मारणारी भाकरी खाणारा मी कार्यकर्ता आहे. कमी पडणार नाही, असे आवर्जून सांगीतले.

वडगावशेरीच्या जनतेने मला नेहमीच विश्वास दिला आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माझा एकमेव उद्देश हा वडगावशेरीचा विकास साधणे आहे, आणि त्यासाठी मी सातत्याने कार्यरत राहीन.”*  

परांडे  नगर येथे झालेल्या या सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. लोकांनी पठारे यांना पाठिंबा दर्शवत घोषणाबाजी केली. या सभेमुळे वडगावशेरीतील निवडणूक प्रचाराला अंतिम टप्प्याची गती प्राप्त झाली.वडगावशेरीत रंगतदार लढत होण्याची चिन्हे असून बापूसाहेब पठारे यांचा प्रचार जोरदार गतीने आघाडीवर  आहे.  

हेमंत रासनेंनी कसब्यात केलंय तरी काय ?-गणेश भोकरे

कृतघ्न वृत्तीच्या लोकांना कसब्यातील मतदार घरी बसवणार; कार्यकर्त्यांना धमक्या देणाऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी
पुणे: हेमंत रासने यांनी अनेक वर्षे नगरसेवक राहून २ वेळा स्थायी समिती अध्यक्ष पद अक्षरशः भोगून स्वतःचा स्वार्थच साधला कसब्या साठी त्यांनी केलंय तरी काय ?असा सवाल करत पुण्याच्या स्थायी समितीमच्या काळात पुणेकरांचे पैसे हे गोवा निवडणुकीसाठी वापरले गेले, याबाबतचे पुरावे मी लवकरच देणार आहे. भाजप उमेदवाराचे हिंदुत्व बेगडी आहे. त्यामुळे अशा धूर्त लोकांपासून जनतेने सावध राहावे.असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने दिलेला बिनशर्त पाठिंबा भाजपचे उमेदवार हेमंत रासने विसरले आहेत. कृतघ्न वृत्तीच्या अशा लोकांना यावेळी कसबावासीय घरी बसवतील, असा विश्वासही व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश भोकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस ऍड. गणेश सातपुते, शहर संघटक निलेश हांडे, रवी सहाणे आदी उपस्थित होते. हेमंत रासने यांनी माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या धमक्यांना भीक घालत नसून, यापुढे असे प्रकार घडले, तर धमक्या देणाऱ्यांशी दोन हात करू, असा इशाराही त्यांनी दिला. मुलांची फी भरून त्यांना मदत केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. मात्र, सामाजिक कार्यासाठी अशा गुन्ह्यांना सामोरे जायला तयार आहे.
गणेश भोकरे म्हणाले, “यंदा राज्यात मनसेची सुप्त लाट असून, ४० आमदार निवडून येतील. आम्ही टोलविरोधात आंदोलन केले आणि राज्यात ६५ टोलनाके बंद केले. मनसे स्वतंत्र पक्ष आहे. राज ठाकरे सातत्याने पक्षाची भूमिका मांडत असतात. गेल्या ३० वर्षांपासून भाजपचा आमदार येथे आहे आणि आता काँग्रेसचा आमदार आहे. पण लोकांच्या दैनंदिन समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या स्वार्थी राजकारणाला वैतागलेली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
रवींद्र धंगेकर २०१७ मध्ये मनसेमधून बाहेर पडले. सुरवातीला भाजपकडे गेले. पण त्यांनी पक्षात घेतले नाही. नंतर ते काँग्रेस पक्षात गेले आणि आमदार झाले. ज्या मनसेने त्यांना घडवले, त्यावर आज ते खालच्या भाषेत टीका करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप उमेदवार हेमंत रासने अनेक वर्षे नगरसेवक होते. पण त्यांनी प्रभाग १५ विकास झालेला नाही. चारवेळा ते स्थायी समिती अध्यक्ष राहिले. मतदारसंघात ५०० कोटीचा विकासनिधी दिल्याचे ते सांगतात. पण ते कुठेही दिसत नाही. पराभूत होऊनही त्यांनाच तिकीट दिले जाते, यामागे मोठे अर्थकारण आहे. पुण्याच्या स्थायी समितीमधील पैसे हे गोवा निवडणुकीसाठी वापरले गेले, ही गंभीर बाब आहे. याबाबतचे पुरावे मी लवकरच देणार आहे. भाजप उमेदवाराचे हिंदुत्व बेगडी आहे. त्यामुळे अशा धूर्त लोकांपासून जनतेने सावध राहावे.
कसबा मतदारसंघाच्या विकासाच्या व्हिजन विषयी बोलताना गणेश भोकरे म्हणाले, “इथे मुलांसाठी मैदाने नाहीत. त्याची व्यवस्था करणार आहे. येथे अनेक तालमी आहेत. जुने वाडे आहेत. त्यांचा पुनर्विकास गरजेचा आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही उंच टॉवर उभारण्यासाठी धोरण आणणार आहे. पेठांमधील तालमींची डागडुजी करण्यासह चांगले प्रशिक्षक उपलब्ध करण्यावर भर देणार आहे. महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कटिबद्ध आहे.”
ऍड. गणेश सातपुते म्हणाले, “मनसे पुण्यात चार, तर राज्यात १३६ जागा लढवत आहे. ही छोटी संख्या नाही. कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. त्यामुळे मनसेचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे.

हडपसरला वाऱ्यावर सोडणाऱ्या चेतन तुपेंना घरी पाठवायचेयजयंत पाटील यांचे प्रतिपादन; प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ केशवनगरमध्ये जाहीर सभा

पुणे: “शरद पवारसाहेबांनी हडपसरच्या विकासासाठी चेतन तुपे यांना संधी दिली होती. मुंढवा-केशवनगर दोन मतदारसंघांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे इकडे चेतन तुपे आणि तिकडे सुनील टिंगरे या दोन गद्दार आमदारांनी लावलेल्या दिव्यांमुळे तुमच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिलेला आहे. या समस्या सोडवण्याची जबाबदारी महापौर म्हणून प्रभावी काम केलेल्या प्रशांत जगताप यांनी घेतली असून, त्यांना हडपसरच्या प्रतिनिधित्वाची संधी द्यायची आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ केशवनगरमधील झेड कॉर्नर येथे आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. प्रसंगी प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख समीर तुपे, राष्ट्रवादी’चे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे, विजय देशमुख, दिलीप तुपे, निलेश मगर, यशवंतराव गोसावी आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, “मतदारसंघात तीनशे कोटी आणल्याचे चेतन तुपे म्हणतात. पण त्यातून काम तर काहीच दिसत नाही. मग हे पैसे गेले कुठे? याचा जाब जनतेने विचारावा. गेल्या पाच वर्षात शहराला न्याय देऊ शकले नाहीत. मतदारसंघातील एकही प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. ज्यांनी सर्वकाही दिले, त्यांच्या वयावर टीका करीत गद्दारी केली. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांच्या मांडीवर जाऊन ते बसलेत. म्हणून निष्ठेने काम करणाऱ्या प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तुमच्या आशीर्वादाने त्यांना विधिमंडळात पाठवायचे आहे. या मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्याचा आराखडा आणि इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे.”

“लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरु केला. सगळेच लाडके असल्याचे सांगत  प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली. राज्यावर लाखो कोटींचे कर्ज केले आहे. मात्र, हे लोक २० नोव्हेंबरपर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार आहेत. त्यानंतर त्या लाडक्या राहणार नाहीत. सल्लागारांच्या भरोशावर हे राज्यकर्ते काम करत आहेत. मागच्या अडीच वर्षात महायुती सरकारने महागाई दिली. जीएसटीचा बोजा लादला. समस्यांचा डोंगर उभा केला. कराच्या माध्यमातून वर्षाला तुमच्याकडून लाखभर रुपये वसूल करून वर्षाकाठी तुम्हाला सात-आठ हजार रुपये देतात आणि स्वतःचा ऊर बडवून घेताहेत, हे दुर्दैवी आहे,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

“आमचे घड्याळ चोरून नेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चिन्हाखाली ‘न्यायप्रविष्ट’ लिहिण्याची सक्ती केली. हे जगातील पहिलेच उदाहरण असावे. ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष जन्माला घातला, त्यांना त्यापासून तोडण्याचे पाप भाजपने केले. त्यामध्ये ज्यांना आम्ही मोठे केले, तेच लोक होते. मात्र, आजही ८४ वर्षांचा हा योद्धा दिवसाला चार-पाच सभा घेतो. त्यांचा उत्साह, जिद्द आपल्याला प्रेरणा देणारी आहे. आपल्यासाठी थांबलेल्या लोकांना भेटण्यासाठी अंधार पडला, तरी हेलिकॉप्टर सोडून मोटारीने सभेला जाण्याची त्यांची इच्छाशक्ती महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारी आहे.त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवा,” असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

“हडपसरमध्ये तुपे अधिक आहेत. चेतन तुपे सोडून इतर सर्वच तुपे पवार साहेबांच्या पाठीशी येत आहेत. त्यामुळे गद्दारी केलेल्या लोकांना घरी पाठवून प्रायश्चित द्यायचे आहे. प्रशांत जगताप आघाडीवर आहेत. पुढचा आमदार तेच होणार आहेत आणि हडपसरचा विकास फुले, शाहू आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जात संविधानाचे महत्व अबाधित ठेवण्याचे काम प्रशांत जगताप करणार आहेत. महाराष्ट्राला अग्रस्थानी घेऊन जायचे असेल, पुण्याचे व हडपसरचे वैभव परत मिळवायचे असेल, तर आपल्याला महाविकास आघाडीला निवडून द्यावे लागेल. आपले चोरलेले घड्याळ बंद पाडून आपल्याला तुतारी फुंकायची आहे. आमदार झाल्यावर पवार साहेब त्यांना चांगली जबाबदारी देतील, जेणेकरून हडपसरकारांची मान अभिमानाने उंचावेल,” असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

जयंत पाटील पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी गुजरातचे मांडलिकत्व स्वीकारून राज्य मोदी-शहांच्या दावणीला बांधले आहेत. हे लोक त्यांच्यासमोर चकार शब्दही काढत नाहीत. त्यामुळे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडला असून, ११ व्या स्थानी फेकला गेला आहे. या अपयशाचे धनी फडणवीस आहेत. महाराष्ट्राला पिछाडीवर घेऊन जाण्याचे पाप यांनी केले आहे. राज्य अधोगतीकडे जात असून, कर्जबाजारी होत आहे. आजघडीला महाराष्ट्रावर नऊ लाख कोटींचे कर्ज आहे. शिवतीर्थावर झालेल्या मोदींच्या सभेला माणसे नाहीत. शिराळ्यात अमित शहांच्या सभेला माणसे नाहीत. जनता यांच्याकडे पाठ फिरवू लागली आहे. भ्रष्ट सरकारमुळे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये पुतळा कोसळला. यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे.”

प्रशांत जगताप म्हणाले, “गेल्या पाच वर्षात हडपसरच्या नागरिकांना काय मिळाले, याचा विचार करा. चार वर्षे सत्तेत राहूनही तुपे यांना प्रश्न सोडवता आलेले नाहीत. मुंढवा-केशवनगर, मांजरी या ठिकाणी वाहतूक कोंडी, पाणीटंचाईची मोठी समस्या आहे. गुन्हेगारी, ड्रग्जमाफी, कोयता गॅंगमुळे हडपसरचे नाव बदनाम झाले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी अकार्यक्षम, गद्दार आमदाराला घरी बसवायचे आहे. पवार साहेबांच्या नावावर निवडून येऊनही चेतन तुपे यांनी पक्षाशी गद्दारी केली. या संघर्षाच्या काळात आम्ही पवार साहेबांची साथ सोडलेली नाही. याच निष्ठेचे आणि माझ्या कामाचे फळ मला मिळालेली उमेदवारी आहे. पवार साहेबांविषयी वाईटसाईट बोलणाऱ्या तुपे यांना धडा शिकवायचा आहे.”

सक्षणा सलगर म्हणाल्या, “हडपसरमध्ये वातावरण फिरले असून, यंदा निश्चित तुतारी वाजणार आहे. पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि घड्याळ चोरून त्यावर गद्दार लोक निवडणूक लढवत आहेत. लाडकी बहीण योजना राबवतात. मात्र, महिला सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली आहे. गृहखाते काय करतेय, पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही का? हा जाब विचारण्याची वेळ आली आहे. दीड हजार रुपये देऊन महिला सुरक्षेवरून लक्ष विचलित केले जात आहे. संघर्षाच्या काळात धैर्याने पवार साहेबांच्या पाठीशी राहिलेले प्रशांत जगताप हे निष्ठावान व स्वाभिमानी आहेत. त्यांना विजयी करून पक्षाशी गद्दारी करणाऱ्या चेतन तुपे यांना पराभूत करायचे आहे.”

यशवंतराव गोसावी, योगेश ससाणे, समीर तुपे यांनीही मनोगते व्यक्त केली. इलियास इसाक बागवान, आकाश गायकवाड, संजय येरळे, सुजल जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

धारावीची एक लाख कोटींची जमीन उद्योगपती अदानीला देण्यासाठी मविआचे सरकार चोरले, भाजपाचे सरकार असंवैधैनिक: राहुल गांधी

जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यास इंडिया आघाडी आग्रही, भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मात्र मौन.

मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या अमरावती व चिमूरमध्ये प्रचंड जाहीर सभा.

मुंबई, दि. १६ नोव्हेंबर २०२४
देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली. धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम अदानींना देण्यासाठी मविआचे सरकार पाडण्याचे काम संविधानाला धाब्यावर बसून केल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या अमरावती व चिमूर येथे प्रचार सभा झाल्या. या सभेत राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला, संसदेच्या अधिवेशनात जातनिहाय जनगणना व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची भूमिका काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मांडली. सर्व समाज घटकाला न्याय देण्यासाठी हे महत्वाचे निर्णय झाले पाहिजेत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड तास भाषण केले पण जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवण्यावर एक शब्द काढला नाही. नरेंद्र मोदी हे मन की बात करतात पण जनतेबद्द्ल बोलत नाहीत. जीएसटी व नोटबंदी ही अदानी-अंबानी यांच्या हितासाठी केली होती, यामुळे देशातील छोटे, मध्यम व लघु उद्योगधंदे देशोधडीला लागले. मोदी हे फक्त अरबपतींसाठी काम करतात आता त्यांनी अरबपतींसाठी काम करण्याचे बंद करून जनतेची कामे करावीत. शेतमालाला हमीभाव द्यावा, रोजगार निर्मिती करावी, महागाई कमी करावी असे राहुल गांधी म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच काँग्रेसच्या ५ गॅरंटीसह शेतकऱ्यांची ३ लाखांची कर्जमाफी, सोयाबीनला ७ हजार रुपयांचा भाव, कांदा व कापसाच्या भावासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे सांगून २५ लाखांचा आरोग्य विमा, महिलांना प्रतिमहिना ३ हजार रुपये व मोफत बस प्रवास, सरकारी रिक्त जागांची भरती करणार असे राहुल गांधी यांनी सांगितले.

आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतले बाबा आढाव यांचे आशीर्वाद-रिक्षा पंचायतीच्या मागण्या विधानसभेत मांडणार

पुणे-कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्र पक्षांचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

डॉ. बाबा आढाव यांनी हमाल, रिक्षाचालक तसेच अन्य कष्टकरी वर्गाचा आवाज बुलंद करून शासन दरबारी त्यांच्या अनेक प्रश्नांची तड लावली आहे. बाबांच्या प्रयत्नांमुळे अनेक कष्टकऱ्यांना आता जगणे बऱ्याच अंशी सुसह्य झाले आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

यावेळी रिक्षा पंचायतीच्या वतीने तसेच कष्टकऱ्यांच्या संघटनांच्या वतीने आमदार धंगेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

धंगेकर यांच्याकडे रिक्षा चालकांचा मागणी जाहीरनामाही सादर करण्यात आला. त्यात रिक्षाचा मुक्त परवाना त्वरित बंद करणे, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ शासनाचे महामंडळ करणे व ते स्वावलंबी होण्यासाठीची तरतूद करणारे नियम तयार करणे, बाईक टॅक्सीला राज्याच्या केवळ दुर्गम भागातच परवानगी देणे, आणि ई रिक्षाला सुद्धा ऑटो रिक्षा प्रमाणेच परवाना आणि इतर नियम लागू करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांचा आपण साकल्याने पाठपुरावा करू आणि विधानसभेत त्याविषयी आवाज उठवू अशी ग्वाही धंगेकर यांनी यावेळी दिली.

यावेळी धंगेकर यांनी डॉ. बाबा आढाव आणि त्यांच्या प्रतिनिधींशी कष्टकऱ्यांच्या अन्य प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली, आणि त्यांचे म्हणणे नेमकेपणाने समजावून घेतले. यावेळी रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांनी सांगितले की याआधीही धंगेकर यांनी रिक्षा चालकांसाठी विधानसभेत आवाज उठवला आहे उशिरा रिक्षा पासिंग करून घेणाऱ्या रिक्षा चालकांना रोज 50 रुपये दंड आकारला जात होता, पण त्याच्या विरोधात धंगेकर यांनी आवाज उठवल्यानंतर ही दंड आकारणी स्थगित झाली. धंगेकर आमदार म्हणून यापुढेही रिक्षा चालकांच्या प्रश्नावर असेच सहकार्य करतील अशी अपेक्षाही नितीन पवार यांनी व्यक्त केली. यावेळी ओंकार मोरे, रमेश उणेचा, शफिक भाई पटेल, अर्जुन लोखंडे, विजया रांजणे, मधुकर यादव, राहुल व्यास, इत्यादी उपस्थित होते.

सदानंद शेट्टी यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश,प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा पुढाकार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सदानंद शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेट्टी यांच्या पक्षप्रवेशाचा पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना मोठा फायदा होणार आहे. रमेश बागवे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे सांगून प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आणि रमेश बागवे यांनी शेट्टी यांचे स्वागत केले. तसेच त्यांना नियुक्तीपत्र दिले. शेट्टी हे काँग्रेसमध्ये असताना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. शेट्टी आता स्वगृही परतल्याने खूप आनंद झाल्याची भावना जोशी आणि बागवे यांनी व्यक्त केली. शेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरात आमची ताकद वाढली असून, कँटोन्मेंटसह राज्यात महाविकास आघाडी विजयी होऊन सरकार येणार असल्याचा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.

जुने मित्र, सहकारी सदानंद शेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणखी मजबूत झाली आहे. या निवडणुकीत ते सोबत असल्याचा आनंद आहे, अशी भावना रमेश बागवे यांनी व्यक्त केली. काँग्रेसमध्ये पुन्हा परतताना खूप आनंद होत आहे. कँटोन्मेंटसह शहरातील सर्व मतदारसंघांत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी वीरेंद्र राय आणि बाबू नायर उपस्थित होते. शेट्टी हे कँटोन्मेंट परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन कामासाठी (एसआरए) ओळखले जातात. या भागात त्यांचे मोठे संघटन असून लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख आहे.

त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांनीही नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ बौद्ध समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक क्वार्टर गेट येथील पीजीआय हॉलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते डॉ. अमोल देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पार पडली. रमेशदादांना विजयी करणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. काशेवाडी येथील चमनशाह दर्गा चौकात झालेल्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हरकारनगर येथील शिवमंदिर मैदानात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठिया यांची सभा जल्लोषात पार पडली. वानवडी येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि अभिजित शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी रमेशदादांच्या मोठ्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करण्यात आला.

भिमराव तापकीर २४/७ जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी- देवेंद्र फडणवीस

पुणे- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी खडकवासला मतदारसंघातील बालाजी नगर येथे जाहीर सभेत प्रचंड जनसमुदायासमोर भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार भिमराव तापकीर यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या कार्यकाळातील लोकोपयोगी निर्णय व प्रकल्पांची माहिती देत मतदारांना महायुतीच्या उमेदवारांसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे – समाविष्ट गावांवरील कर सवलत: ५ वर्षांसाठी ग्रामपंचायतीनुसारच कर आकारणीची सवलत लागू केली जाणार, तिहेरी एलिव्हेटेड रस्त्यांचे नियोजन: पुण्यातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रकल्प, ‘इंजिनियरिंग मार्वेल’ चांदणी चौक: आंतरराष्ट्रीय दर्जाचा आधुनिक प्रकल्प, मेट्रोसह विविध विकास प्रकल्प: शहरी सुविधांचा विस्तार व दळणवळणाच्या साधनांमध्ये सुधारणा.

या सभेनंतर आज, १६ नोव्हेंबर रोजी भिमराव तापकीर यांनी बिबवेवाडी-राजीव गांधी नगर येथे पदयात्रा व गाठीभेटी घेऊन प्रचार मोहिमेला चालना दिली.
ज्येष्ठ नागरिक, तरुणाई, महिला, आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या सहभागामुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण पसरले होते. तापकीर यांच्या कार्यकाळात रस्ते, ड्रेनेज लाईन, आणि स्थानिक विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण झाली. २४/७ जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या मायाळू स्वभावामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. या दरम्यान मा. नगरसेविका राणीताई भोसले, रुपाली धाडवे, दिनेश धाडवे, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी, प्रभाग अध्यक्ष अमोल चौधरी, भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा ओंकार डवरी, जितेंद्र कोंढरे, चिन्मय भोसले, राहुल पाखरे, रितेश रासकर, आनंद साळुंखे, महेश भोसले व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

महायुतीची ताकद वाढवण्यासाठी कमळाचे बटन दाबा सांगत फडणवीस यांनी जाहीर सभेत मतदारांना आवाहन केले की, “भिमराव तापकीर यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या मागे उभे राहून व्होट जिहाद्यांचे नापाक इरादे गाडून टाका.”

या सभेनंतर आणि पदयात्रेदरम्यान पाहिल्या गेलेल्या उत्साहामुळे खडकवासला मतदारसंघात महायुतीचा विजय सुनिश्चित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रकांत पाटलांच्या सोसायटी संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे-दादा, तुमच्यातला कार्यकर्ता आणि साधेपणा आम्हाला खूप भावतो. अशी भावना कोथरूड मधील सिद्धार्थ पॉलेसमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील आपल्या प्रचारार्थ आज कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत.

आज त्यांनी कोथरुड मधील जोशी म्युझियम परिसरातील सिद्धार्थ पॅलेसमधील नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, भाजपा नेते प्रशांत हरसुले प्रभाग क्रमांक १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, प्रतिक खर्डेकर, विनिता काळे उपस्थित होते.

यावेळी सोसायटीचे पादाधिकारी कोल्हटकर म्हणाले की, “दादा, तुम्ही महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून मोठे आहातच; पण या मंत्रीपदापेक्षा तुमच्यातला कार्यकर्ता आणि साधेपणा आम्हाला खूप भावतो.” त्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनीही नम्रपणे क‌तज्ञता व्यक्त केली.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी ४० टक्के कर सवलती मुळे सर्व पुणेकरांना दिलासा मिळाला असल्याची माहिती दिली. तसेच, मेट्रो सारख्या प्रकल्पामुळे कोथरुड मधील नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच, कोथरूडकरांच्या सेवेसाठी सदैव समर्पित असल्याची भावना ही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडके ज्येष्ठ नागरिक महायुतीच्या पाठीशी

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास

ज्येष्ठ नागरिकांना मिळतोय विविध योजनांमधून लाभ

मुंबई, ता. १६ नोव्हेंबर २०२४

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबरोबरच महायुती सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा लाखो ज्येष्ठ नागरिकांना फायदा झाला. त्यामुळे लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडके ज्येष्ठ नागरिक निवडणुकीत महायुतीच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांविषयीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

त्या म्हणाल्या की राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास लागू केला. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्यात ३००० रुपये थेट डीबीटीमधून दिले जातात. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत आतापर्यंत राज्यभरातून ६ लाख अर्ज सरकारला प्राप्त झाले, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने ज्येष्ठ नागरिकांचा महिन्याचा औषधांचा खर्च भरुन निघाला. ग्रामीण भागातील ज्येष्ठांना या योजनेचा मोठ लाभ झाला.

उतारवयात देवदर्शन करण्याची ज्येष्ठांची इच्छा असते पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यासाठी राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्यात आली. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या, ऋषीकेश, काशी मथुरा,पंढरपूर, अशा तिर्थक्षेत्रांना नेले जाते. मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगरमधून तिर्थयात्रा सुरु होते. आतापर्यंत राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला, असे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ नागरिकांवर होणारा अन्याय, त्यांची सायबर फसवणूक, त्यांच्यासंदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यान्वित केल्याचेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून दोन वर्षात ४० हजार रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली. यासाठी ३५० कोटींची मदत देण्यात आली. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आरोग्य विम्याचे संरक्षण १.५ लाखांवरुन ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आले. राज्यात ९ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली. बार्टी आणि महाज्योतीमधून लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने राज्यातील महिलांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सरकारने पाच महिन्यांचे ७५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात पाठवले. शिवसेनेने प्रत्येक मतदार संघातील २५ हजार लाडक्या बहिणींशी संवाद साधला. त्यामुळे लाडक्या बहिणी विरोधी पक्षांना मतदानातून धडा शिकवतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर; प्रियंका गांधींचे नरेंद्र मोदींना चोख प्रत्युत्तर.

भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटलांचा पराभव करून शिर्डी मतदार संघातील दादागिरीचा कायमचा बिमोड करा: बाळासाहेब थोरात.

काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापूरात प्रचारसभांचा झंझावात.

शिर्डी/ कोल्हापूर, दि. १६ नोव्हेंबर २०२४
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले पण ते स्मारक आजही झालेले नाही. संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारने हटवला. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला मालवणमधील महाराजांचा पुतळा तर अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. भाजपा सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते, शिवरायांचा हा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ठणकावून सांगितले.

काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापूरात प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्लाबोल केला, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला उत्तर देत प्रियंका गांधी म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षाची विचारधार वेगळी आहे पण बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाला नितांत आदर आहे, असे स्पष्ट सांगून शिवसेना वा काँग्रेसचा कोणताही नेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापी सहन करणार नाही असे बजावले. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे असे आव्हान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी खुल्या व्यासपीठावरून जातनिहाय जनगणना करणार व ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार ही घोषणा करुन दाखवावी, असे प्रतिआव्हानही प्रियंका गांधी यांनी दिले आहे.

राहुल गांधी आरक्षण विरोधी असल्याच्या आरोपाचा समाचार घेत प्रियंका गांधी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर व मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमिटरची पदयात्रा काढून आजही संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत, त्यांच्यावर मोदी शाह हे संतांच्या भूमीतून खोटे आरोप लावत आहेत. भाजपा, मोदी व शाह हे राहुल गांधी यांना घाबरले आहेत असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

महाराष्ट्र मजबूत करण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींची पोलखोल करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंडित नेहरुंनी देशातील विविध राज्यात संस्था उभा केल्या, धरणे बांधली, आयआयएम, आयआयटी स्थापन करताना कधीच भेदभाव केला नाही पण मोदी सरकारने मात्र भेदभाव केला आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला पळवले, टाटा एअरबस प्रकल्प पळवला, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पळवला, अशी यादी वाचून महाराष्ट्रातील उद्योग व रोजगार मोदी सरकारने पळवल्याचे सांगितले. मोदी सरकारमुळेच महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण व महिला मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. ११ वर्षापासून सत्तेत असताना भाजपा व नरेंद्र मोदींना महिला, तरुण, शेतकरी यांची आठवण झाली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना प्रियंका गांधी यांनी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिर्डी के साईबाबा की जय, अशा घोषणा दिल्या. तसेच महाराष्ट्राची भूमी साधू संतांची आहे असे सांगताना, संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा यांचा आवर्जून उल्लेख केला. “जें का रंजलें गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा”, या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओव्यांचा उल्लेख केला.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, संगमनेरमध्ये विकास झालेला नाही तेथे गुंडगिरी आहे या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आरोपाला थोरात यांनी उत्तर दिले. विखे पाटील यांनी समोरासमोर येऊन संगमनेर व शिर्डी मतदारसंघात किती विकास झाला हे, कुठे दादागिरी सुरु आहे हे मांडावे असे पुन्हा एकदा थेट आव्हान दिले. शिर्डी मतदार संघातील दहशतवाद संपवून जनतेला मुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या श्रीमती घोगरे यांना विजयी करा व शिर्डी भागातील विखे पाटलांची दादागिरी मोडीत काढा, असे आवाहन थोरात यांनी केले.

यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डी विधानसभेच्या उमेदवार प्रतिभाताई घोगरे, युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात, जयंतराव वाघ, किरण काळे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ‘कटेंगें बटेंगे’ चालणार नाही; भाजपा युतींच्या नेत्यांमध्येच मतभेद

लोकसभेला उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने भाजपाला धडा शिकवला; या निवडणुकीतही भाजपा युतीला घरी बसवा.

मुंबई, दि. १६ नोव्हेंबर २०२४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने सर्वांनाच मान सन्मान, रोजीरोटी दिली आहे, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न साकारले जाते. सर्व जातीधर्मांना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्रात ‘कटेंगे बटेंगे’, ‘एक हैं तो सेफ है’, ‘व्होट जिहाद’ सारख्या घोषणा देऊन फूट पाडण्याचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही असे स्पष्ट करुन ‘कटेंगे बटेंगे’ वरून भाजपा व युतीतील नेत्यांमध्येच मतभेद आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांनी सांगितले.
टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज बब्बर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची एक वेगळी ओळख आहे, संस्कृती, परंपरा आहे. या राज्याची मान सन्मान, प्रतिष्ठेला इतर राज्यातून येऊन कोणीही धक्का लावू शकत नाही. भाजपाने जातीधर्मात फूट पाडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातील जनतेने त्याला प्रतिसाद दिला नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण, पंकजा मुंडे यांनीही बटेंगें तो कटेंगे घोषणेला विरोध करत हे महाराष्ट्रात चालणार नाही असे म्हटले आहे. भाजपा युतीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही द्वेष पसरवणारी भाषा महाराष्ट्रात चालणार नाही, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फोडीफोडीचा डाव चालणार नाही हे लक्षात आल्यानेच पंतप्रधान प्रचार सोडून परदेश दौऱ्यावर गेले असे नाव घेता राज बब्बर म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला. उत्तर प्रदेशात ३० जागा कमी केल्या तर महाराष्ट्रात १६ जागा कमी करुन त्यांना त्यांची जागा दाखवली आहे आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाला धडा शिकवा आणि महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन राज बब्बर यांनी केले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, चयनिका उनियाल, चरणजित सप्रा, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते निजामुद्दीन राईन आदी उपस्थित होते.

हजारो दिव्यांनी उजळले चतु:श्रृंगी मंदिराचे प्रांगण

पुणे: हजारो दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने चतुःशृंगी मंदिराचे प्रांगण शुक्रवारी उजळून निघाले. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून नवचैतन्य हास्ययोग परिवार व चतुःशृंगी देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. चतुःशृंगी मंदिराच्या प्रांगणात रचनात्मक पद्धतीने प्रज्वलित केलेल्या दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळाला. आनंदी व हास्यमय जीवन जगण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 

येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या मराठी व हिंदी चित्रपटाचे नायक अनुपसिंग ठाकूर, निर्माते केतनराजे भोसले व टीमने या दीपोत्सवाला उपस्थिती लावली. दीपोत्सवावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजयराव भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, हरीश पाठक, जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे यांच्यासह नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे सदस्य व मंदिर देवस्थानाचे विश्वस्त श्रीकांत अनगळ, नंदकुमार अनगळ, सुहास अनगळ, डॉ. विनायक देडगे, पराग पोतदार, किशोर सरपोतदार, स्वाती महाळंक, चैताली माजगावकर भंडारी, आदी उपस्थित होते.

अनुपसिंग ठाकूर म्हणाले, “मागील वर्षी मी चतुःश्रृंगी मातेचे दर्शन घेतले आणि मला या चित्रपटाची संधी मिळाली. आईच्या दर्शनासाठी पुढच्या वर्षी पुन्हा येईन. छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाची भूमिका साकारायला मिळणे, हा मातेचा आशीर्वाद आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवार खूप चांगले काम करत आहे. मला या परिवाराचा आणि तुम्ही केलेल्या कामाचा हेवा वाटतो.”

मकरंद टिल्लू म्हणाले, “आम्ही गेल्या अकरा वर्षांपासून हा दीपोत्सव करतो. या माध्यमातून आम्ही सर्व ज्येष्ठांना व तरुणांना हास्यमय जीवन जगण्याचा संदेश देतो. या परिवारामध्ये पंचवीस हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत. या दीपोत्सवाच्या माध्यमातून ताण-तणावाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी आपण हास्याचे दिवे प्रज्वलित करूया आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरूया.”
दीपोत्सवाचे आरेखन विजयराव भोसले यांच्या संकल्पनेतून केले होते.