काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा पुढाकार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सदानंद शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेट्टी यांच्या पक्षप्रवेशाचा पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना मोठा फायदा होणार आहे. रमेश बागवे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे सांगून प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आणि रमेश बागवे यांनी शेट्टी यांचे स्वागत केले. तसेच त्यांना नियुक्तीपत्र दिले. शेट्टी हे काँग्रेसमध्ये असताना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. शेट्टी आता स्वगृही परतल्याने खूप आनंद झाल्याची भावना जोशी आणि बागवे यांनी व्यक्त केली. शेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरात आमची ताकद वाढली असून, कँटोन्मेंटसह राज्यात महाविकास आघाडी विजयी होऊन सरकार येणार असल्याचा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.
जुने मित्र, सहकारी सदानंद शेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणखी मजबूत झाली आहे. या निवडणुकीत ते सोबत असल्याचा आनंद आहे, अशी भावना रमेश बागवे यांनी व्यक्त केली. काँग्रेसमध्ये पुन्हा परतताना खूप आनंद होत आहे. कँटोन्मेंटसह शहरातील सर्व मतदारसंघांत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी वीरेंद्र राय आणि बाबू नायर उपस्थित होते. शेट्टी हे कँटोन्मेंट परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन कामासाठी (एसआरए) ओळखले जातात. या भागात त्यांचे मोठे संघटन असून लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख आहे.
त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांनीही नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ बौद्ध समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक क्वार्टर गेट येथील पीजीआय हॉलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते डॉ. अमोल देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पार पडली. रमेशदादांना विजयी करणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. काशेवाडी येथील चमनशाह दर्गा चौकात झालेल्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हरकारनगर येथील शिवमंदिर मैदानात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठिया यांची सभा जल्लोषात पार पडली. वानवडी येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि अभिजित शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी रमेशदादांच्या मोठ्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करण्यात आला.