पुणे-कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्र पक्षांचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
डॉ. बाबा आढाव यांनी हमाल, रिक्षाचालक तसेच अन्य कष्टकरी वर्गाचा आवाज बुलंद करून शासन दरबारी त्यांच्या अनेक प्रश्नांची तड लावली आहे. बाबांच्या प्रयत्नांमुळे अनेक कष्टकऱ्यांना आता जगणे बऱ्याच अंशी सुसह्य झाले आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
यावेळी रिक्षा पंचायतीच्या वतीने तसेच कष्टकऱ्यांच्या संघटनांच्या वतीने आमदार धंगेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
धंगेकर यांच्याकडे रिक्षा चालकांचा मागणी जाहीरनामाही सादर करण्यात आला. त्यात रिक्षाचा मुक्त परवाना त्वरित बंद करणे, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ शासनाचे महामंडळ करणे व ते स्वावलंबी होण्यासाठीची तरतूद करणारे नियम तयार करणे, बाईक टॅक्सीला राज्याच्या केवळ दुर्गम भागातच परवानगी देणे, आणि ई रिक्षाला सुद्धा ऑटो रिक्षा प्रमाणेच परवाना आणि इतर नियम लागू करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांचा आपण साकल्याने पाठपुरावा करू आणि विधानसभेत त्याविषयी आवाज उठवू अशी ग्वाही धंगेकर यांनी यावेळी दिली.
यावेळी धंगेकर यांनी डॉ. बाबा आढाव आणि त्यांच्या प्रतिनिधींशी कष्टकऱ्यांच्या अन्य प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली, आणि त्यांचे म्हणणे नेमकेपणाने समजावून घेतले. यावेळी रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांनी सांगितले की याआधीही धंगेकर यांनी रिक्षा चालकांसाठी विधानसभेत आवाज उठवला आहे उशिरा रिक्षा पासिंग करून घेणाऱ्या रिक्षा चालकांना रोज 50 रुपये दंड आकारला जात होता, पण त्याच्या विरोधात धंगेकर यांनी आवाज उठवल्यानंतर ही दंड आकारणी स्थगित झाली. धंगेकर आमदार म्हणून यापुढेही रिक्षा चालकांच्या प्रश्नावर असेच सहकार्य करतील अशी अपेक्षाही नितीन पवार यांनी व्यक्त केली. यावेळी ओंकार मोरे, रमेश उणेचा, शफिक भाई पटेल, अर्जुन लोखंडे, विजया रांजणे, मधुकर यादव, राहुल व्यास, इत्यादी उपस्थित होते.