कृतघ्न वृत्तीच्या लोकांना कसब्यातील मतदार घरी बसवणार; कार्यकर्त्यांना धमक्या देणाऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी
पुणे: हेमंत रासने यांनी अनेक वर्षे नगरसेवक राहून २ वेळा स्थायी समिती अध्यक्ष पद अक्षरशः भोगून स्वतःचा स्वार्थच साधला कसब्या साठी त्यांनी केलंय तरी काय ?असा सवाल करत पुण्याच्या स्थायी समितीमच्या काळात पुणेकरांचे पैसे हे गोवा निवडणुकीसाठी वापरले गेले, याबाबतचे पुरावे मी लवकरच देणार आहे. भाजप उमेदवाराचे हिंदुत्व बेगडी आहे. त्यामुळे अशा धूर्त लोकांपासून जनतेने सावध राहावे.असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने दिलेला बिनशर्त पाठिंबा भाजपचे उमेदवार हेमंत रासने विसरले आहेत. कृतघ्न वृत्तीच्या अशा लोकांना यावेळी कसबावासीय घरी बसवतील, असा विश्वासही व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश भोकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस ऍड. गणेश सातपुते, शहर संघटक निलेश हांडे, रवी सहाणे आदी उपस्थित होते. हेमंत रासने यांनी माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या धमक्यांना भीक घालत नसून, यापुढे असे प्रकार घडले, तर धमक्या देणाऱ्यांशी दोन हात करू, असा इशाराही त्यांनी दिला. मुलांची फी भरून त्यांना मदत केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. मात्र, सामाजिक कार्यासाठी अशा गुन्ह्यांना सामोरे जायला तयार आहे.
गणेश भोकरे म्हणाले, “यंदा राज्यात मनसेची सुप्त लाट असून, ४० आमदार निवडून येतील. आम्ही टोलविरोधात आंदोलन केले आणि राज्यात ६५ टोलनाके बंद केले. मनसे स्वतंत्र पक्ष आहे. राज ठाकरे सातत्याने पक्षाची भूमिका मांडत असतात. गेल्या ३० वर्षांपासून भाजपचा आमदार येथे आहे आणि आता काँग्रेसचा आमदार आहे. पण लोकांच्या दैनंदिन समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या स्वार्थी राजकारणाला वैतागलेली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
रवींद्र धंगेकर २०१७ मध्ये मनसेमधून बाहेर पडले. सुरवातीला भाजपकडे गेले. पण त्यांनी पक्षात घेतले नाही. नंतर ते काँग्रेस पक्षात गेले आणि आमदार झाले. ज्या मनसेने त्यांना घडवले, त्यावर आज ते खालच्या भाषेत टीका करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप उमेदवार हेमंत रासने अनेक वर्षे नगरसेवक होते. पण त्यांनी प्रभाग १५ विकास झालेला नाही. चारवेळा ते स्थायी समिती अध्यक्ष राहिले. मतदारसंघात ५०० कोटीचा विकासनिधी दिल्याचे ते सांगतात. पण ते कुठेही दिसत नाही. पराभूत होऊनही त्यांनाच तिकीट दिले जाते, यामागे मोठे अर्थकारण आहे. पुण्याच्या स्थायी समितीमधील पैसे हे गोवा निवडणुकीसाठी वापरले गेले, ही गंभीर बाब आहे. याबाबतचे पुरावे मी लवकरच देणार आहे. भाजप उमेदवाराचे हिंदुत्व बेगडी आहे. त्यामुळे अशा धूर्त लोकांपासून जनतेने सावध राहावे.
कसबा मतदारसंघाच्या विकासाच्या व्हिजन विषयी बोलताना गणेश भोकरे म्हणाले, “इथे मुलांसाठी मैदाने नाहीत. त्याची व्यवस्था करणार आहे. येथे अनेक तालमी आहेत. जुने वाडे आहेत. त्यांचा पुनर्विकास गरजेचा आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही उंच टॉवर उभारण्यासाठी धोरण आणणार आहे. पेठांमधील तालमींची डागडुजी करण्यासह चांगले प्रशिक्षक उपलब्ध करण्यावर भर देणार आहे. महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कटिबद्ध आहे.”
ऍड. गणेश सातपुते म्हणाले, “मनसे पुण्यात चार, तर राज्यात १३६ जागा लढवत आहे. ही छोटी संख्या नाही. कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. त्यामुळे मनसेचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे.