पुणे : १४ नोव्हेंबर म्हणजे अनाथांची यशोदा अर्थात पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांचा आज वाढदिवस आणि बालदिन म्हणजे दुग्धशर्करा योग. या दिवसाचे औचित्य साधून या यशोदेच्या घरी कृष्णाचे आगमन झाले आहे. मांजरी येथील सन्मती बाल निकेतनच्या आवारात श्रीकृष्णाचे मंदीर उभारण्यात आले असून यामध्ये श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.या कार्यक्रमास शिक्षणमहर्षी डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला), माई देशमुख (मुंबई ), ममता सिंधुताई सपकाळ, दिपक गायकवाड, विनय सपकाळ व माईंच्या सर्व संस्थांमधील मुलं-मुली आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, ‘देव सगळीकडे आहे. तरीही त्याचं अस्तित्व डोळ्यांना दिसत राहावं असंच कायम वाटत राहतं. त्या मुर्तीसमोर उभं राहून हात जोडता यावे आणि प्रार्थना करता यावी..कधी स्वतःसाठी, कधी इतरांसाठी तर कधी अवघ्या विश्वासाठी. रोज संध्याकाळी प्रार्थना म्हटल्यानंतर आई आमच्याकडून वदवून घेत असे की, “देवा, आम्हाला हसायला शिकव..परंतु , आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस.” त्याची आठवण आजही आम्हाला आहे.
आजच्याच दिवशी माईंच्या शिरूर येथील शारदार्जुन व्हटकर बालभवन (माईनगरी) येथे नवीन इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. शिक्षणमहर्षी डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला), माई देशमुख (मुंबई), पोपटराव पवार, (आदर्श सरपंच, हिवरे बाजार) गिरीष कुलकर्णी (स्नेहालय, अहमदनगर) यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे.