भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटलांचा पराभव करून शिर्डी मतदार संघातील दादागिरीचा कायमचा बिमोड करा: बाळासाहेब थोरात.
काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापूरात प्रचारसभांचा झंझावात.
शिर्डी/ कोल्हापूर, दि. १६ नोव्हेंबर २०२४
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले पण ते स्मारक आजही झालेले नाही. संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारने हटवला. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला मालवणमधील महाराजांचा पुतळा तर अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. भाजपा सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते, शिवरायांचा हा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ठणकावून सांगितले.
काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापूरात प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्लाबोल केला, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला उत्तर देत प्रियंका गांधी म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षाची विचारधार वेगळी आहे पण बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाला नितांत आदर आहे, असे स्पष्ट सांगून शिवसेना वा काँग्रेसचा कोणताही नेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापी सहन करणार नाही असे बजावले. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे असे आव्हान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी खुल्या व्यासपीठावरून जातनिहाय जनगणना करणार व ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार ही घोषणा करुन दाखवावी, असे प्रतिआव्हानही प्रियंका गांधी यांनी दिले आहे.
राहुल गांधी आरक्षण विरोधी असल्याच्या आरोपाचा समाचार घेत प्रियंका गांधी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर व मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमिटरची पदयात्रा काढून आजही संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत, त्यांच्यावर मोदी शाह हे संतांच्या भूमीतून खोटे आरोप लावत आहेत. भाजपा, मोदी व शाह हे राहुल गांधी यांना घाबरले आहेत असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
महाराष्ट्र मजबूत करण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींची पोलखोल करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंडित नेहरुंनी देशातील विविध राज्यात संस्था उभा केल्या, धरणे बांधली, आयआयएम, आयआयटी स्थापन करताना कधीच भेदभाव केला नाही पण मोदी सरकारने मात्र भेदभाव केला आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला पळवले, टाटा एअरबस प्रकल्प पळवला, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पळवला, अशी यादी वाचून महाराष्ट्रातील उद्योग व रोजगार मोदी सरकारने पळवल्याचे सांगितले. मोदी सरकारमुळेच महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण व महिला मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. ११ वर्षापासून सत्तेत असताना भाजपा व नरेंद्र मोदींना महिला, तरुण, शेतकरी यांची आठवण झाली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना प्रियंका गांधी यांनी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिर्डी के साईबाबा की जय, अशा घोषणा दिल्या. तसेच महाराष्ट्राची भूमी साधू संतांची आहे असे सांगताना, संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा यांचा आवर्जून उल्लेख केला. “जें का रंजलें गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा”, या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओव्यांचा उल्लेख केला.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, संगमनेरमध्ये विकास झालेला नाही तेथे गुंडगिरी आहे या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आरोपाला थोरात यांनी उत्तर दिले. विखे पाटील यांनी समोरासमोर येऊन संगमनेर व शिर्डी मतदारसंघात किती विकास झाला हे, कुठे दादागिरी सुरु आहे हे मांडावे असे पुन्हा एकदा थेट आव्हान दिले. शिर्डी मतदार संघातील दहशतवाद संपवून जनतेला मुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या श्रीमती घोगरे यांना विजयी करा व शिर्डी भागातील विखे पाटलांची दादागिरी मोडीत काढा, असे आवाहन थोरात यांनी केले.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डी विधानसभेच्या उमेदवार प्रतिभाताई घोगरे, युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात, जयंतराव वाघ, किरण काळे आदी उपस्थित होते.