Home Blog Page 505

आंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी सकारात्मक चर्चा

पुणे :  मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तार करावा, त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी घेऊन आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय  नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.   सदर निवेदनाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सदर स्मारकाच्या जागेबाबत आपण सकारात्मक असून शासनाच्या वतीने शक्य तितक्या लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. 

मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, राहुल डंबाळे, संजय सोनवणे यांचा समावेश होता. 

दरम्यान सदर अनुषंगाने आंबेडकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.  यावेळी फडणवीस यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांना संपूर्ण विषय सांगितला होता त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या  स्मारकासाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र काही  निर्णय यापूर्वी झाले असल्यामुळे तांत्रिक अडचण दूर झाल्याशिवाय यात निर्णय घेता येणार नाही असे त्यांनी कळवले होते. त्या अनुषंगाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

लोकसभेत दारूण पराभव झाला म्हणूनच लाडकी बहीण योजना आणली

फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही,विकासासाठी भाजपसोबत गेलो – अजित पवार
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन आज साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी वर्धापन दिन , तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बालेवाडीत वर्धापन दिन साजरा केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जोरदार भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.लोकसभेत दारूण पराभव झाला म्हणूनच लाडकी बहीण योजना आणली अशी कबुली देत फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही,विकासासाठी भाजपसोबत गेलो असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारून भाजपसोबत सरकारमध्ये दाखल झाले. त्यांच्या भाजपासोबत जाण्याच्या या निर्णयावर अनेकजण आक्षेप घेतात. भाजप आणि राष्ट्रवादीचा वैचारिक भूमिका वेगळी आहे, असे असूनही अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? असा सवाल उपस्थित केला जातो. आजच्या वर्धापन दिन मेळाव्यात त्यांनी याच प्रश्नाचे थेट आणि जाहीर उत्तर दिले आहे. राज्याचा विकास, राज्यातील शेवटच्या माणसाचा विकास हाच मुख्य हेतू होता, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मला काहीजण विचारतात की तुम्ही भाजपसोबत का गेले? आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019 साली शिवसेनेसोबत गेला होता. आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी आपण काही तडजोडी केल्या होत्या. फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. आपण काही साधूसंत नाही, आपण लोकांना दिशा दाखवणारे…. लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यातून बेरजेचे राजकारण करणारे आपण लोक आहोत. त्यामुळेच आपण भाजपसोबत, एनडीएसोबत तसेच महाराष्ट्रात महायुतीसोबत जायचे ठरवले, असंही अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले, धर्मनिरपेक्षता विचारधारा जपणारे चंद्राबाबू नायडू हे देखील एनडीएसोबत गेले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही कधीकाळी एनडीएसोबत होत्या. लालू प्रसाद यादव हेही एनडीएसोबत होते. आजही अनेकजण एनडीएसोबत आहेत. शेवटी देशाचा आणि राज्याचा सर्वांगीन विकास झाला पाहिजे. केंद्र आणि राज्याच्या योजना या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे, भाजपसोबत जाण्याचा विचार होता, असे अजित पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले की, राज्यात मागासलेला समाज आहे. त्यांना निधी द्यायचे ठरवले, तर संख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो. आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल त्याना लोकसंख्येप्रमाणे मी निधीचे वाटप करत असतो. त्याचे सूत्र आपण सर्वांनी स्वीकारले आहे. मात्र काही लोक जाणीवपूर्वक आपले सरकार आल्यापासून बदनामी करत आहेत.

काही जण म्हणतात की, मी सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. अजित पवारांनी बजेट वळवले. अजितदादा पैसे देत नाहीत, निधी देत नाहीत. अरे पण मी माझ्या खिशातले पैसे देतो का? एकदा अर्थसंकल्प मांडला की त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. निधी काही एकदम दिला जात नाही. यावेळी 7 लाख 20 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करताना 41 टक्के निधी आदिवासी विभागाला दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 38 टक्के जास्त निधी यंदा दिला आहे. हे कधीही पुढे येतच नाही. कोणी तरी सांगते अजित पवारांनी अन्याय केला. कार्यकर्ता हे ऐकून खचतो. मात्र त्याला सत्य माहीत नसते.सामाजिक न्याय विभागात मागासवर्गीय समाज आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा 38 टक्के निधी अधिक दिला. मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबत सांगितलेले आहे. पण त्याला जेवढी प्रसिद्धी पाहिजे तेवढी मिळाली नाही. मागासवर्गीय समाज व आदिवासी समाजाच्या मनात निधी वळवल्याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता, पण राष्ट्रवादीचे लोक केवळ फुले शाहू आंबेडकरांचे नाव भाषणापुरते वापरतात का? नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीत करतो, असेही अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मागच्यावेळी लोकसभेत दारूण पराभव झाला. चारच जागा मिळाल्या. 75 टक्के पराभव स्वीकारावा लागला. तिथे थोडी गडबड झाली. कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल झाली. काय झाले. कशामुळे झाले. आम्हीही विचार केला. आता लोकसभेत फटका बसल्यावर लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे. काय केल्यावर महायुतीला पाठबळ मिळेल. आम्ही चर्चा केली आणि लाडकी बहीण योजना आणली, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.

अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे निर्देश दिले. पुणे पिंपरी चिंडवडमध्ये 10 लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक कोटीचे टार्गेट आपण ठेवले आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. गरीब असो की डॉक्टर इंजिनिअर वकील असो. त्यांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा, असे अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले.

आता स्थानिक स्वराज्य संस्थांची खरी लढाई ….

ते पुढे म्हणाले, आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यांत आहे. 28 महापालिका, 25 जिल्हा परिषद, 285 पंचायत समित्या, अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. आम्हाला आमदारकी, खासदारकी मिळाली. कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आमदार, मंत्री, खासदार झालो. आता त्याच कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजेत. आपण कुठेच कमी नसतो. फक्त प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर म्हटले जाते.कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. आज आपण आपल्या पद्धतीने सगळ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीसाठी झोकून देऊन काम केले पाहिजे. महिला, तरुणांना आपण संधी मोठ्या प्रमाणावर देणार आहोत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी तरुण, तरुणी, माता भगिनी, डॉक्टर, वकिलांना सोबत घ्यायचे आहे.

राष्ट्रवादीला कट्टरवाद मान्य नाही. भविष्यातही राष्ट्रवादीला कट्टरवाद मान्य होणार नाही. विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. ज्या दिवशी विचारांशी तडजोड होईल त्यावेळी पक्षाचा पाया कमकुवत होईल. ही लढाई विचारांची आहे आणि विचारांनीच लढली जाईल असं अजित पवार म्हणाले.

तंत्रज्ञान, बँकिंग व उद्योग क्षेत्रात ब्लॉकचेन क्रांती घडवत आहे-डॉ. प्रणती टिळक

क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन आणि अकाउंटिंग विषयावरील लेखिका डॉ. भाग्यश्री देशपांडे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : ब्लॉकचेन हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून, ते समजून घेणे आजच्या डिजिटल युगात अत्यावश्यक बनले आहे. संगणक व नेटवर्कच्या माध्यमातून होणारी डिजिटल फसवणूक, माहितीची चोरी यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणून ब्लॉकचेनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे तंत्रज्ञान सध्या बँकिंग, वित्त आणि उद्योग क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडवत आहे, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. प्रणती टिळक यांनी केले.

डॉ. भाग्यश्री देशपांडे लिखित ‘वित्तीय बाजारपेठेत क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन’ आणि ‘भविष्यातील डिजिटल युगासह अकाउंटिंग’ या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेमिनार हॉलमध्ये संपन्न झाले. कार्यक्रमावेळी देशपांडे क्लासेसचे प्रमुख प्रा. मुकुंद देशपांडे, लेखिका डॉ. भाग्यश्री देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रा. मुकुंद देशपांडे म्हणाले, आज भारतात देखील एआय सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अकाउंटिंग क्षेत्रातील चार कंपन्या करीत आहेत. अजून सर्वत्र त्याचा वापर झाला नसला, तरी लवकरच संपूर्ण अकाउंटिंग प्रणाली डिजिटल होईल. मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता व विश्वासार्हता वाढेल. तसेच भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे भारत आज जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्थाता असलेला देश आहे, असे ही त्यांनी सांगितले.

डॉ. भाग्यश्री देशपांडे म्हणाल्या, “‘क्रिप्टोकरन्सी अँड ब्लॉकचेन इन फायनान्शिअल मार्केट्स’ हे पुस्तक ब्लॉकचेन तंत्रज्ञानामागील मूलभूत संकल्पना, बिटकॉइन आणि इथेरियमसारख्या क्रिप्टोकरन्सीचा उदय आणि जागतिक वित्तपुरवठा पुनःसंरचित करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा अभ्यास मांडते. दुसरे पुस्तक ‘डिजिटल युगातील अकाउंटिंग’ या बदलांचा सखोल अभ्यास करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर, अकाउंटिंग क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. हे दोन्ही पुस्तके डिजिटल युग समजून घेण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील.

निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार:NCP नेतृत्व बदलावर शरद पवारांचे मोठे विधान; इलेक्शन कसे लढवणार, ते सुद्धा सांगितले

पुणे-पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवार यांच्याविषयी तसेच पक्षाच्या संघर्षाविषयी भाष्य केलं. त्यानंतर शरद पवारांनी पक्षातील नेतृत्व बदलावर देखील मोठे विधान केले आहे. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.शरद पवार म्हणाले, 26 वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जनतेचा प्रचंड मेळावा आणि पक्षाला उभारी आली. थोड्या दिवसातच महाराष्ट्राचा कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सामान्य जनतेने संधी दिली. लोकांची सेवा करायची संधी दिली. सामान्य माणसाला संधी दिली तर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालवू शकतो. नावं घ्यायला अनेकांची नावं आहेत. जयंत पाटलांनी अर्थमंत्री म्हणून 10 वर्षं काम केलं आहे.पुढे पक्षनेतृत्वावर देखील शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करणार. राष्ट्रवादी पक्षाने सामान्य माणसाला संधी दिली आहे. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच 50 टक्के महिलांना निवडून द्या, असे आवाहन देखील शरद पवारांनी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याने लढवायच्या की कशा, याचा विचार जिल्हा नेतृत्वाला सोबत घेऊन करू, असे शरद पवार म्हणाले. विश्वास निर्माण करण्याच काम भगिनी सुद्धा करतात. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका दोन-तीन महिन्यांवर आल्या आहेत. आपल्याला 50 टक्के भगिनींना निवडून द्यायचे आहे. कर्तृत्वाचा वाटा पुरुषांचाच असतो यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्या सुद्धा कर्तुत्व दाखवू शकतात. उद्याच्या निवडणुकीत 50 टक्के जागा भगिनींना द्यायच्या आहेत. हा धोरणात्मक निर्णय आपण घेतला आहे. तो यशस्वी करण्याचं काम दोन-तीन महिन्यात करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

काही संकट आली, तर नाउमेद न होता पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं. पक्षात फूट पडली. फूट पडेल असं कधी वाटत नव्हतं, पण पडली. मी याच्या संबंधी अधिक भाष्य करु इच्छित नाही. जे राहिले ते विचाराने राहिले. 1980 साली माझ्या हातात सत्ता नव्हती, त्याआधी होती. निवडणुका आल्या, 50 आमदार निवडून आले. सहा शिल्लक राहिले, बाकी पक्ष सोडून गेले. सहा राहिले त्यातले एक मला इथे दिसतायत कमल किशोर कदम. आमचा पक्ष सहाजणांवर आला. त्यानंतर पुन्हा निवडणूक आली. राष्ट्रवादीची संख्या 72 झाली. राज्य सरकारमध्ये पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे चिंता करू नका. आपण एकसंध राहू. जनतेशी बांधिलकी ठेवायची आहे.

शरद पवार यांनी देशहिताला पाठिंबा देण्याचा विचार मांडला. ते म्हणाले, देशाचा विचार दोन दृष्टिने केला पाहिजे. देशाचा विचार करताना राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही. पहलगाममध्ये हत्या झाल्यानंतर राष्ट्रवादीने देशहिताची भूमिका घेतली. शेजारी राष्ट्रासोबत आपले संबंध चांगले राहिले नाही. सुसंवादाची परिस्थिती बांगलादेश, श्रीलंका, चीन, पाकिस्तानसोबत नाही.

ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची आहे – अमोल कोल्हेंचे वर्धापनदिनी जोरदार भाषण

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार ,अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, फार सुंदर ओळ दिली आहे ‘ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची आहे. त्यामुळे योगायोग बघा आपण पराभव कसा झाला, सत्ता कधी येणार, सत्तेचं काय, आपण ही सगळी समिकरणं मांडत असतो. पण याच्या पलीकडे जाऊन समाजाचं काय, ज्या समाजाचं प्रतिनिधी म्हणून आपण काय करतो, त्या समाजकारणाचं काय याचा विचार आपण कधी करतो? म्हणजे योगायोग बघा आज 10 जून आहे, मागे 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण साजरा केला आणि आता आणखी आठ दिवसांनी माऊली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आहे. आणि या दोन तारखांचा जर योगायोग बघितला तर पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात जो वैष्णवांचा मेळा जमणार आहे, तिथे अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत. जेव्हा समाजात जातीच्या भिंती उभ्या राहत असताना अठरा पगड जातीच्या लोकांचं एकत्र येणं हे अशा देवाच्या समोर लीन होणं की 33 कोटी देव आहेत, प्रत्येक देवाच्या हाती शस्त्र आहे. पण एकच पांडूरंग आहे ज्याच्या हातात शस्त्र नाही, ज्याचे हात कमरेवर आहेत, पण सगळं जग त्याच्या समोर लीन होतं हा प्रेमाचा संदेश आपण कधी देणार आहोत?

पुढे अमोल कोल्हे म्हणाले, जेव्हा सत्तेच्याबाबतीत कोणी प्रश्न विचारतो तेव्हा आवर्जून सांगा निवडणूक केवळ माध्यम असतं, सत्ता हे साध्य नाही, सत्ता हे केवळ साधन असतं आणि साध्य असेल तर ते लोकांचं कल्याण असतं आणि हे लोकांचं कल्याण 55 वर्ष अविरतपणे करत असलेला वटवृक्ष आदरणीय पवार साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्या मार्गदर्शनाची आपल्या सगळ्यांना गरज आहे.

‘लडेंगे और जितेंगे’ म्हणत अजित पवारांसोबत जाणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांचे स्पष्ट संकेत

0

पुणे -यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. ‘लडेंगे और जितेंगे’, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याचा निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काही घोषणा किंवा संकेत देतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, सुळे यांनी आपण महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच पुढे जाणार असल्याचे सांगितले. तसेच स्वत:वर विश्वास ठेवला तर एक दिवस आपण नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि गेल्या 26 वर्षांची वाटचाल, ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने झालेली आहे. यासोबत संघर्ष हा येतच असतो. मात्र त्यामुळे निराश होण्याची आवश्यकता नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आठ खासदारांची संसदेत दखल घेतली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दखल घेतल्याशिवाय देशातील एकही महत्त्वाचा निर्णय पूर्ण होत नसल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करावी, ही मागणी आम्ही राजकारणासाठी करत नाही. तर राज्यातली परिस्थिती तशी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. गरिबांचे आणि अनाथ मुलांचे पैसे देखील आज त्यांना मिळत नाहीत. अनेक योजना बंद होण्याची वेळ आली आहे. लाडक्या बहिणींचे नावे यादीतून काढली जात असल्याचा आरोप देखील सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्याचे संकेत देखील या वेळी दिले आहेत. पक्षांतर्गत बैठका, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. इतकेच नाही तर पुढच्या महिन्यापासून मी स्वतः राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असल्याचे त्या म्हणाल्या. आज पासून पूर्ण ताकतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व सामाजिक प्रश्नासाठी पेटून उठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सनदी लेखापालांसाठी ‘नवोन्मेष २०२५’, दोन दिवसीय विभागीय परिषद

‘आयसीएआय’तर्फे १३, १४ जूनला सिद्धी बँक्वेट येथे आयोजन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पुणे: दी इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवोन्मेष २०२५’ या सनदी लेखापालांच्या दोन दिवसीय विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता. १३) व शनिवार (ता. १४) या दोन दिवशी एरंडवणे येथील सिद्धी बँक्वेटमध्ये होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १३) सकाळी ९.३० वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी आयसीएआय’च्या विभागीय समितीचे सदस्य सीए रेखा धामणकर, सीए राजेश अग्रवाल, सीए अभिषेक धामणे, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए वैभव मोदी, सचिव सीए निलेश येवलेकर, सीए नेहा फडके, सीए ऋषिकेश बडवे, सीए प्रीतेश मुनोत आदी उपस्थित होते.

सीए सचिन मिणियार म्हणाले, ‘डब्ल्यूआयआरसी’चे सीए केतन सैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही विभागीय परिषद सनदी लेखापाल व्यावसायिकांसाठी करसुधारणा, वित्तीय तयारी, ऑडिट यंत्रणा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट्सना बदलत्या आर्थिक, तांत्रिक आणि कायदेशीर वातावरणाशी समरस होण्याची संधी देणार आहे. पहिल्या दिवशी सीए गिरीश आहुजा ‘भारतीय उत्पन्न कर व्यवस्थेतील बदलते परिदृश्य’, सीए अनिकेत तलाठी ‘स्टॅच्युटरी ऑडिटपासून फॉरेन्सिक ऑडिटकडे बदलत्या जबाबदाऱ्या’, सीए अर्पित जैन ‘व्यावसायिक ब्रँडिंग – प्रॅक्टिशनर ते थॉट लीडर’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. 

‘एआय ऑटोमेशन व सीए क्षेत्रातील बदल’ या विषयावरील सीए सचिन चितळांगे, सीए यश गोयंका, सीए सुप्रिया बंसल, सीए निकिता पंजाबी सहभागी होणार आहेत. चर्चासत्राचे संचालन सीए शेखर साने करणार आहेत. दुसऱ्या दिवशी अ‍ॅड. सीए अविनाश पोद्दार ‘जीएसटीतील महत्त्वाचे निर्णय व त्याचे परिणाम’, सीए मनीष बक्षी व सीए आनंद राठी ‘आयपीओ रेडिनेस व भांडवली बाजाराचे भविष्य’ व सीए ललित वलेचा ‘स्टार्टअप फिनान्सिंग: २०२५ मध्ये सीएंना आवश्यक माहिती’ या विषयावर सत्रे होणार आहेत. अधिक माहितीसाठी www.puneicai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सीए वैभव मोदी यांनी नमूद केले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ औंध नगर तर्फे रक्तदान शिबिर-७६ जणांनी केले रक्तदान.

पुणे- ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,औंध नगर तर्फे रक्तदानाचा एक कार्यक्रम रविवार दिनांक ८ जुन रोजी आयोजित केला होता.औंध येथील अभिमानश्री सोसायटी समोरील भुवनेश्वर सोसायटी च्या सभागृहात झालेल्या ह्या रक्तदान शिबिरात एकुण ७६ जणांनी रक्तदान करून आपले योगदान दिले.सदर कार्यक्रम ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या जवानांना समर्पित करण्यात आला होता.

या रक्तदान कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये अशी होती.

जनकल्याण रक्तकेंद्र संस्था पुणे यांनी अद्ययावत उपकरणे, निष्णात डाॅक्टर टीम व योग्य माहितीसह सदर कार्यक्रम यशस्वी केला.
पर्यावरण गतीविधीच्या माध्यमातून रक्तदात्यांना छोटी रोपटी देण्यात आली.
प्रथमच रक्तदान करणारे युवक-युवती तसेच महिलांचा सहभाग या शिबीरात मोठया प्रमाणावर होता.
डाॅक्टर प्रोफेशनमध्ये असणाऱ्या डॉ प्रवीण पारगावकर या रक्तदात्याने आपले १०० वे रक्तदान या कार्यक्रमात केले.

प्रतिथयश उद्योजक सुभाष चुत्तर यांनी द्वीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग स्तरावरील सर्व अधिकारी,नागरिक तसेच सुप्रसिद्ध होमिओपाथ कर्नल डाॅ अनिल हब्बू यांची मुख्य उपस्थिती होती.

मनोज धारप यांनी थोडक्यात शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व विशद केले.

योगेश तळेकर,ऋषिकेश इजंतकर,गिरीश लेले, संजय पानसरे,मधुसूदन बडवे,चंद्रशेखर कुलकर्णी,मुकुंद पुराणिक आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

सुवर्ण भिशीच्या नावाखाली ज्वेलर्सकडून ४२ लाखांची फसवणूक


पुणे ,सुवर्ण भिशी योजनेच्या आमिषाने धायरीतील ‘श्री ज्वेलर्स’ या सराफी पेढीच्या मालकाने तब्बल ३६ गुंतवणूकदारांची ४२ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच, २१ तोळे सोन्याचे दागिने घेऊन दहिवाळ दांपत्य फरार झाले आहे.या प्रकरणी नऱ्हे येथील एका व्यावसायिकाने सोमवारी (ता. ९) फिर्याद दिली. त्यानुसार नांदेड सिटी पोलिसांनी ‘श्री ज्वेलर्स’चा मालक विष्णू सखाराम दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती ( दोघे रा. रासकरमळा, धायरी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

धायरी परिसरात दहिवाळ यांचे ‘श्री ज्वेलर्स’ हे सराफी दुकान आहे. त्यांनी सुवर्ण भिशी योजना सुरू केली होती. या योजनेत अनेकांनी आकर्षक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक केली. तक्रारदार आणि त्याच्या पत्नीने मिळून तीन लाख ३९ हजार रुपये गुंतवले. चार तोळ्यांचे गंठण घेण्यासाठी ही रक्कम दिली होती. यामध्ये एका जुन्या गंठणाचे मोडीतून आलेले एक लाख रुपये रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहाराचाही समावेश होता. तक्रारदार दांपत्य २५ मे रोजी ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचले असता, दुकान बंद असल्याचे समजले. चौकशीअंती दहिवाळ दांपत्य पसार झाल्याचे उघड झाले. यानंतर तक्रारदाराने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.पोलिस तपासात ३६ गुंतवणूकदारांनी दहिवाळ यांच्याकडे पैसे आणि सोने गुंतवले असल्याचे समोर आले आहे. दहिवाळ दाम्पत्याने मिळून ४२ लाख ७८ हजार रुपयांची रोकड आणि २१ तोळे सोने घेऊन पलायन केले आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गुरूदत्त मोरे पुढील तपास करीत आहेत.

महापालिका उपायुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात…

सांगली:२४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सांगली महापालिका उपायुक्त वैभव विजय साबळे (३१, रा. फ्लॅट क्रमांक ४०३, ग्रीन एकर्स धामणी रस्ता, मूळ रा.सातारा) लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली.
उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर सांगलीत प्रथमच कारवाई झाल्याने खळबळ उडाली. उपायुक्त साबळे याच्या घराची सायंकाळी उशीरापर्यंत छडती सुरू होती. लाचलुचपच्या सांगली विभागाने ही कारवाई केली असून साबळे याला अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, की तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे याने दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. याबाबत १७ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत साबळे याने स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडी अंती सात लाखांच्या लाचेची मागणी साबळे याने केल्याने आज कारवाई करण्यात आली आहे. साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान, साबळे याला पालिकेच्या मुख्यालयातूनच दुपारी ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी उशीरा त्याच्या सांगलीतील घराची छडती घेण्यात आली. काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
लाचलुचपतचे नूतन उपाधीक्षक अनिल कटके, तत्कालीन उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, कशोर खाडे, अंमलदार प्रतीम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, विणा जाधव यांचा कारवाईत सहभाग होता.
उपायुक्त वैभव साबळे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. आज कारवाई झाल्यानंतर सांगलीतील घरावर छापे टाकण्यात आले. साताराच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मूळ घराचीही झडती घेण्यात आली आहे. काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचेही समजते आहे.

डॉ. संजीव वावरे, डॉ. कल्पना बळीवंत यांना बजावली नोटीस


पुणे:महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्यासह अंतर्गत महिला चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना बळीवंत यांना नोटीस बजावून महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीची दखल वेळीच का घेतली नाही? अशी विचारणा केली आहे.
भाजपचा पदाधिकारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याला त्रास देत असल्याच्या तक्रारीची दखल का घेतली नाही,’ याचा खुलासा करण्याबाबतची नोटीस आरोग्य प्रमुखांनी दोन अधिकाऱ्यांना बजावली आहे.भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याने जानेवारी २०२५ मध्ये महापालिका आयुक्तांसह आरोग्य प्रमुखांकडे केली होती. तसेच, महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेदेखील तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात न आल्याने संबंधित पदाधिकाऱ्याकडून त्रास देणे सुरूच राहिले.
त्यामुळे महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. महापालिका आयुक्तांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन भाजपच्या पदाधिकाऱ्याला महापालिकेत येण्यास बंदी घातली आहे.
आयुक्तांच्या कारवाईनंतर महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्यासह अंतर्गत महिला चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना बळीवंत यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीची दखल वेळीच का घेतली नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे.

पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या देशी झाडांची लागवड व्हावी

0
  • प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन; पद्मा प्रतिष्ठान, ज्ञानमाउली फाउंडेशनतर्फे ‘जागर पर्यावरणाचा’ कार्यक्रम

पुणे: “माणसाने सिमेंटचे जंगल उभारताना नैसर्गिक संपत्तीवर आघात केला. त्यामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. जागतिक तापमान वाढ, प्रदूषणाची समस्या जगभर सतावत आहे. अशावेळी पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या सुवर्णपिंपळ, वड, आंबा, चिंच, बांबू यांसारख्या देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘जागर पर्यावरणाचा’सारख्या कार्यक्रमाची आज गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

पद्मा प्रतिष्ठान व ज्ञानमाऊली फाऊंडेशन आयोजित ‘जागर पर्यावरणाचा’ कार्यक्रमावेळी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी बोलत होत्या. या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, उद्योजक जवाहरशेठ चोरगे, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा. फुलचंद चाटे, पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत कांबळे, ज्ञानमाउली फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पा रणदिवे-कांबळे, पर्यावरण तज्ज्ञ प्रभाकर कुकडोलकर, उद्योजक नितीन हणमघर, हेमंत कांबळे आदी उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षणात जागतिक पातळीवर योगदान देत असलेले ट्रीमॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर, उद्योजक तुषार गोसावी, माजी नगरसेविका ज्योती गोसावी, राष्ट्रीय खेळाडू प्रियांका यादव व मयानी कांबळे, गायिका मनीषा निश्चल, सोनाली कांबळे यांना ‘जागर पर्यावरणाचा’ सन्मान देऊन गौरविण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील मोंटेरोजा सोसायटी क्लब हाऊसमध्ये हा कार्यक्रम झाला. ज्ञानगंगोत्री विशेष मुलांची निवासी शाळा संस्थेला ५१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा निश्चय करावा. निसर्गातील प्रत्येक घटकाचे, अगदी कीटकाचेही अनन्यसाधारण स्थान आहे. एकेकाळी पुण्याचे पर्यावरण देशात आदर्श मानले जात होते. अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. हे टाळण्यासाठी येथील वनराई, टेकडी जतन करण्याची जबाबदारी आपली आहे.”

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरणाचा जागर करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आपले आरोग्य चांगले राहायचे असेल, तर पर्यावरणाचे संवर्धन खूप गरजेचे आहे. प्रदूषणाच्या अनेक समस्या माणसाला सतावत आहेत. त्यामुळे आजूबाजूला खूप झाडे लावण्याची गरज आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण यज्ञात सहभाग घेतला पाहिजे.”

विष्णू लांबा म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये एक लाख झाडे लावण्याचा संकल्प कांबळे यांनी हाती घेतला आहे. वृक्षरोपणाच्या या मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. ‘जागर पर्यावरणाचा’ हा कार्यक्रम या मोहिमेचा शुभारंभ आहे. केक कापून, नको तिथे पैशांची उधळपट्टी करून वाढदिवस करण्यापेक्षा हा उपक्रम अतिशय विधायक असा आहे.”

धीरज घाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले. जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा रणदिवे-कांबळे यांनी आभार मानले.

पालखी मार्गावर केलेल्या कामांचा घेतला आढावा

पुणे: शहरात पालखी मार्गावर केलेल्या कामांचा आढावा म्हणून आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी आढावा बैठक घेतली .
आज दुपारी ३.०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दुसरा मजला या ठिकाणी अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि)ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व खाते प्रमुख व अधिकारी यांच्या समवेत पालखी मार्गावर केलेल्या कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांचे पुणे शहरात आगमनापूर्वी पालखी संबंधित कामांची माहिती घेतली व सर्व उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व खाते प्रमुख यांना दिले.
याप्रसंगी नगरसचिव योगिता भोसले, मुख्य उद्यान अधिकारी श्अशोक घोरपडे, मुख्य अभियंता (पथ) अनिरुद्ध पावसकर, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संदीप कदम, उप आयुक्त (सांस्कृतिक विभाग) सुनील बल्लाळ, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, अधीक्षक अभियंता (मलनि:सारण) जगदीश खानोरे इत्यादी खाते प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन

महसूली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी महसूल विभागाला बहुउद्देशीय वाहने- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, दि. ९ : नागपूर जिल्ह्यात महसूल विभागाला अत्याधुनिक बहुउद्देशीय (मल्टिपर्पज) वाहने देण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला असून राज्यातील पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण महसूली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणीदेखील यावर्षी अशी वाहने महसूल विभागाला देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राज्यात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात आयोजित केलेल्या महसूल लोक अदालतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पक्षकार, वकील यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

अधिकाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांनाही पायाभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात सर्व विभागीय आयुक्तालयांच्या ठिकाणी आणि त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर जिल्ह्यांतील महसूल विभागाला वाहने उपलब्ध करून दिली जातील.

आजच्या महसूल अदालतीत जवळपास ११ हजार महसूली दावे तडजोडीने निकाली निघणार असल्याने महसूल विभाग आणि न्याय व्यवस्थेवरीलही ताण कमी होणार आहे. पुढील अनेक वर्षे चालणारे खटले थांबणार असून त्यातून जनतेच्या आणि प्रशासनाच्या वेळेची, पैशाची आणि श्रमाची बचत होणार आहे. वाद संमतीने किंवा तडजोडी मिटल्याने गावातील भांडणे संपतील, जमिनीच्या वादामुळे कलुषित झालेली मने स्वच्छ होतील. घरात, गावात शांततेचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उर्वरित २० हजार दावेही अशा महसूल अदालतीचे आयोजन करुन तडजोडीने निकाली काढावेत, असेही ते म्हणाले.

प्रशासन आपली जबाबदारी बजावत असताना जे गुन्हेगारीवृत्तीने काम करतात अशांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली पाहिजे. त्यादृष्टीने कायद्यात बदल करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

शासनाचे जे विभाग अधिकाधिक महसूल शासनाच्या तिजोरीत आणतील त्यांना त्याप्रमाणात प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

राज्य शासनातर्फे विविध भव्य शासकीय इमारती उभारण्यात येत आहेत. यशदा येथे मसुरीच्या धर्तीवर राज्यातील अधिकाऱ्यांसाठी देशात इतर कोणत्याही राज्यात नसेल असे भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १२० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीदेखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोकअदालतीची मोहीम यापुढे राज्यभरात राबविली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.

पुणे येथे भरलेल्या महसूल परिषदेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 6 विभागीय आयुक्तांना महसूल विभागाच्या परिवर्तनाच्या दृष्टीने काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यानुसार पुणे जिल्ह्याने हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यात नायब तहसील ते मंत्रालय पातळीवर तीन ते साडेतीन लाख महसूली दावे प्रलंबित आहेत. ही मोठ्या प्रमाणावरील प्रकरणे कशी संपतील यासाठी महसूल लोक अदालतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तसेच पक्षकार आणि वकीलांचे सहकार्य घेण्यात येईल.

महसूल विभाग हा राज्याचा चेहरा आहे. वेळ आणि पैशाची बचत, मैत्रीपूर्ण न्यायव्यवस्था निर्माण करण्याकरिता, स्वखुशीने तडजोड निर्माण करण्याची व्यवस्था, महसूल व्यवस्थेवरील ताण कमी करणे आदी काम या महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून झाले आहे. महसूल विभागात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणण्यात येत आहे. विभागातील मागील २५ वर्षापासून प्रलंबित असलेले विषय शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्याने सादरीकरण केलेल्या बाबींच्या अनुषंगाने विविध शासन निर्णय काढण्यात येणार असून त्यामुळे राज्याच्या महसूलात २० हजार कोटींची वाढ होईल. ई-फेरफार प्रणालीच्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकाचे राज्यभरात अभिनंदन झाले असून या परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणीसाठी शासन निर्णय करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले असून ‘एम-सँड’म्हणजेच दगडापासून केलेली वाळू बांधकामात वापरली जाईल. त्यादृष्टीने शासकीय, खासगी जागा उपलब्ध करून देऊन क्रेशर उभारण्यात येतील. महाखनिजच्या माध्यमातून ऑनलाईन संनियंत्रण करून मागणीप्रमाणे वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. जेणेकरून बुडणारा महसूल वाचण्यासह नदीच्या वाळूवरुन होणारे गैरप्रकार बंद होणार आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ अभियानासाठी ज्याप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला त्याप्रमाणे महसूल लोक अदालतीला द्यावा, महसूल विभागाला अत्याधुनिक मल्टीपर्पज वाहने मिळाल्यास विभागाच्या कामाला गती येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी महसूल लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. ते म्हणाले राज्यातील मोठ्या प्रमाणात प्रलंबित महसूल प्रकरणांबाबत उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे जिल्ह्याने पुढाकार घेऊन ही लोक अदालत आयोजित केली आहे. जिल्ह्यात मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी स्तरावर 31 हजारावर महसूली प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी ११ हजार ५८९ प्रकरणे या अदालती मध्ये ठेवण्यात आली आहे. यापुढेही दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालतीचे आयोजन करून दाव्यांची संख्या ३१ हजारावरून १० हजारापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ईक्यूजे कोर्ट, ई- हक्क प्रणाली, ई- फेरफार नोंदणी, पानंद रस्ते खुले करण्याची मोहीम, नाविन्यपूर्ण असा सेवादूर उपक्रम आदींची माहिती दिली. महाखनिज व बांधकाम परवानगी एकात्मिक प्रणालीवर आणल्यामुळे १५० कोटी रुपयांच्या महसूलात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महसूल लोक अदालतीत निकाली निघालेल्या प्रकरणातील पक्षकारांना प्रातिनिधीक स्वरुपात निकालपत्रांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वकील आणि पक्षकार यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.

अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी आभार व्यक्त केले.
०००००

शेतजमिनीशी निगडित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लोकअदालतीचे आयोजन करा-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0

पुणे, दि. ९: शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता माहे जुलैअखेर जिल्हानिहाय लोकअदालतीचे आयोजन करावे, त्याचबरोबर नागरिकांना शेतजमिनीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्याकरीता याबाबत इतर राज्याच्या प्रणालीचा अभ्यास करावा, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नवीन प्रशासकीय इमारत येथे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, उपसंचालक कमलाकर हटेकर, राजेंद्र गोळे, सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

श्री. बाबनकुळे म्हणाले, राज्यातील समुद्र व खाडी किनारपट्टीवरील महसूली सीमा व उच्चतम भरती रेषेपर्यंतच्या जमिनीचे सर्वेक्षण व मोजणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभाग, महसूल प्रशासन, मेरीटाईम बोर्ड, वनविभाग, कांदळवन संरक्षण विभाग आदींच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करावी. मोजणी प्रक्रियेमध्ये सुटसुटीतपणा आणून नागरिकांना सुलभ सेवा देण्याकरीता प्रयत्न करावे. स्वामित्व योजनेअंतर्गत येणारी प्रकरणे बारकाईने हाताळून मार्गी लावावेत. योजनेअंतर्गत येणाऱ्या मालमत्तापत्रकांवर बँकेने कर्ज देण्याकरीता पुढे यावे. नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही करावी.

विभागाच्या आकृतीबंधाबाबत मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करावे. विभागातील रिक्तपदे भरण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. मंत्रालयीन स्तरावरील प्रकरणांचा पाठपुरावा करुन ते मार्गी लावण्याकरीता एका समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. राज्य शासनाच्या १५० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विभागनिहाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. राज्य शासन गतीमान पद्धतीने कामे करीत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजात गतिमानता आण्यासोबतच पारदर्शक पद्धतीने कामे करावीत, असेही श्री. बावनकुळे म्हणाले.

डॉ.दिवसे म्हणाले, गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजनेअंतर्गत ३० हजार ४२२ गावे समाविष्ट असून त्यापैकी १८ हजार २८३ गावांचे मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहेत. माहे जून २०२५ ते माहे मे २०२६ पर्यंत प्रती महिना सुमारे १ हजार याप्रमाणे स्वामित्व योजना पूर्ण करण्याबाबत लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ३० भु-प्रणाम केंद्राचे लोकार्पण करण्यात आले असून येत्या काळात दुसऱ्या टप्प्यात ३५ भु-प्रणाम केंद्राचे लोकार्पण करण्याचा मानस आहे.

यावेळी डॉ. दिवसे यांनी माहिती तंत्रज्ञान कक्षाद्वारे करण्यात येणारे संगणकीकरण उपक्रम, नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार प्रकरणे, स्वामित्व योजना, नक्शा प्रकल्प, भू-प्रणाम केंद्र -प्रगती अहवाल, प्रलंबित अपील प्रकरणे, ईक्युजे कोर्ट २ प्रकल्प, रिक्तपदे, पी.जी.संकेतस्थळावरील प्रकरणे व निकाली काढण्याच्यादृष्टीने करण्यात येणारे प्रयत्न आदीबाबत माहिती दिली.
0000