सांगली:२४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सांगली महापालिका उपायुक्त वैभव विजय साबळे (३१, रा. फ्लॅट क्रमांक ४०३, ग्रीन एकर्स धामणी रस्ता, मूळ रा.सातारा) लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली.
उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर सांगलीत प्रथमच कारवाई झाल्याने खळबळ उडाली. उपायुक्त साबळे याच्या घराची सायंकाळी उशीरापर्यंत छडती सुरू होती. लाचलुचपच्या सांगली विभागाने ही कारवाई केली असून साबळे याला अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, की तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे याने दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. याबाबत १७ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत साबळे याने स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडी अंती सात लाखांच्या लाचेची मागणी साबळे याने केल्याने आज कारवाई करण्यात आली आहे. साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान, साबळे याला पालिकेच्या मुख्यालयातूनच दुपारी ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी उशीरा त्याच्या सांगलीतील घराची छडती घेण्यात आली. काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
लाचलुचपतचे नूतन उपाधीक्षक अनिल कटके, तत्कालीन उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, कशोर खाडे, अंमलदार प्रतीम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, विणा जाधव यांचा कारवाईत सहभाग होता.
उपायुक्त वैभव साबळे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. आज कारवाई झाल्यानंतर सांगलीतील घरावर छापे टाकण्यात आले. साताराच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मूळ घराचीही झडती घेण्यात आली आहे. काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचेही समजते आहे.
महापालिका उपायुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात…
Date: