फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही,विकासासाठी भाजपसोबत गेलो – अजित पवार
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन आज साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी वर्धापन दिन , तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बालेवाडीत वर्धापन दिन साजरा केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जोरदार भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.लोकसभेत दारूण पराभव झाला म्हणूनच लाडकी बहीण योजना आणली अशी कबुली देत फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही,विकासासाठी भाजपसोबत गेलो असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारून भाजपसोबत सरकारमध्ये दाखल झाले. त्यांच्या भाजपासोबत जाण्याच्या या निर्णयावर अनेकजण आक्षेप घेतात. भाजप आणि राष्ट्रवादीचा वैचारिक भूमिका वेगळी आहे, असे असूनही अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? असा सवाल उपस्थित केला जातो. आजच्या वर्धापन दिन मेळाव्यात त्यांनी याच प्रश्नाचे थेट आणि जाहीर उत्तर दिले आहे. राज्याचा विकास, राज्यातील शेवटच्या माणसाचा विकास हाच मुख्य हेतू होता, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
मला काहीजण विचारतात की तुम्ही भाजपसोबत का गेले? आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019 साली शिवसेनेसोबत गेला होता. आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी आपण काही तडजोडी केल्या होत्या. फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. आपण काही साधूसंत नाही, आपण लोकांना दिशा दाखवणारे…. लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यातून बेरजेचे राजकारण करणारे आपण लोक आहोत. त्यामुळेच आपण भाजपसोबत, एनडीएसोबत तसेच महाराष्ट्रात महायुतीसोबत जायचे ठरवले, असंही अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार पुढे म्हणाले, धर्मनिरपेक्षता विचारधारा जपणारे चंद्राबाबू नायडू हे देखील एनडीएसोबत गेले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही कधीकाळी एनडीएसोबत होत्या. लालू प्रसाद यादव हेही एनडीएसोबत होते. आजही अनेकजण एनडीएसोबत आहेत. शेवटी देशाचा आणि राज्याचा सर्वांगीन विकास झाला पाहिजे. केंद्र आणि राज्याच्या योजना या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे, भाजपसोबत जाण्याचा विचार होता, असे अजित पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले की, राज्यात मागासलेला समाज आहे. त्यांना निधी द्यायचे ठरवले, तर संख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो. आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल त्याना लोकसंख्येप्रमाणे मी निधीचे वाटप करत असतो. त्याचे सूत्र आपण सर्वांनी स्वीकारले आहे. मात्र काही लोक जाणीवपूर्वक आपले सरकार आल्यापासून बदनामी करत आहेत.
काही जण म्हणतात की, मी सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. अजित पवारांनी बजेट वळवले. अजितदादा पैसे देत नाहीत, निधी देत नाहीत. अरे पण मी माझ्या खिशातले पैसे देतो का? एकदा अर्थसंकल्प मांडला की त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. निधी काही एकदम दिला जात नाही. यावेळी 7 लाख 20 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करताना 41 टक्के निधी आदिवासी विभागाला दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 38 टक्के जास्त निधी यंदा दिला आहे. हे कधीही पुढे येतच नाही. कोणी तरी सांगते अजित पवारांनी अन्याय केला. कार्यकर्ता हे ऐकून खचतो. मात्र त्याला सत्य माहीत नसते.सामाजिक न्याय विभागात मागासवर्गीय समाज आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा 38 टक्के निधी अधिक दिला. मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबत सांगितलेले आहे. पण त्याला जेवढी प्रसिद्धी पाहिजे तेवढी मिळाली नाही. मागासवर्गीय समाज व आदिवासी समाजाच्या मनात निधी वळवल्याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता, पण राष्ट्रवादीचे लोक केवळ फुले शाहू आंबेडकरांचे नाव भाषणापुरते वापरतात का? नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीत करतो, असेही अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मागच्यावेळी लोकसभेत दारूण पराभव झाला. चारच जागा मिळाल्या. 75 टक्के पराभव स्वीकारावा लागला. तिथे थोडी गडबड झाली. कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल झाली. काय झाले. कशामुळे झाले. आम्हीही विचार केला. आता लोकसभेत फटका बसल्यावर लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे. काय केल्यावर महायुतीला पाठबळ मिळेल. आम्ही चर्चा केली आणि लाडकी बहीण योजना आणली, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे निर्देश दिले. पुणे पिंपरी चिंडवडमध्ये 10 लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक कोटीचे टार्गेट आपण ठेवले आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. गरीब असो की डॉक्टर इंजिनिअर वकील असो. त्यांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा, असे अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांची खरी लढाई ….
ते पुढे म्हणाले, आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यांत आहे. 28 महापालिका, 25 जिल्हा परिषद, 285 पंचायत समित्या, अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. आम्हाला आमदारकी, खासदारकी मिळाली. कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आमदार, मंत्री, खासदार झालो. आता त्याच कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजेत. आपण कुठेच कमी नसतो. फक्त प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर म्हटले जाते.कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. आज आपण आपल्या पद्धतीने सगळ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीसाठी झोकून देऊन काम केले पाहिजे. महिला, तरुणांना आपण संधी मोठ्या प्रमाणावर देणार आहोत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी तरुण, तरुणी, माता भगिनी, डॉक्टर, वकिलांना सोबत घ्यायचे आहे.
राष्ट्रवादीला कट्टरवाद मान्य नाही. भविष्यातही राष्ट्रवादीला कट्टरवाद मान्य होणार नाही. विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. ज्या दिवशी विचारांशी तडजोड होईल त्यावेळी पक्षाचा पाया कमकुवत होईल. ही लढाई विचारांची आहे आणि विचारांनीच लढली जाईल असं अजित पवार म्हणाले.