क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन आणि अकाउंटिंग विषयावरील लेखिका डॉ. भाग्यश्री देशपांडे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
पुणे : ब्लॉकचेन हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून, ते समजून घेणे आजच्या डिजिटल युगात अत्यावश्यक बनले आहे. संगणक व नेटवर्कच्या माध्यमातून होणारी डिजिटल फसवणूक, माहितीची चोरी यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणून ब्लॉकचेनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे तंत्रज्ञान सध्या बँकिंग, वित्त आणि उद्योग क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडवत आहे, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. प्रणती टिळक यांनी केले.
डॉ. भाग्यश्री देशपांडे लिखित ‘वित्तीय बाजारपेठेत क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन’ आणि ‘भविष्यातील डिजिटल युगासह अकाउंटिंग’ या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेमिनार हॉलमध्ये संपन्न झाले. कार्यक्रमावेळी देशपांडे क्लासेसचे प्रमुख प्रा. मुकुंद देशपांडे, लेखिका डॉ. भाग्यश्री देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. मुकुंद देशपांडे म्हणाले, आज भारतात देखील एआय सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अकाउंटिंग क्षेत्रातील चार कंपन्या करीत आहेत. अजून सर्वत्र त्याचा वापर झाला नसला, तरी लवकरच संपूर्ण अकाउंटिंग प्रणाली डिजिटल होईल. मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता व विश्वासार्हता वाढेल. तसेच भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे भारत आज जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्थाता असलेला देश आहे, असे ही त्यांनी सांगितले.
डॉ. भाग्यश्री देशपांडे म्हणाल्या, “‘क्रिप्टोकरन्सी अँड ब्लॉकचेन इन फायनान्शिअल मार्केट्स’ हे पुस्तक ब्लॉकचेन तंत्रज्ञानामागील मूलभूत संकल्पना, बिटकॉइन आणि इथेरियमसारख्या क्रिप्टोकरन्सीचा उदय आणि जागतिक वित्तपुरवठा पुनःसंरचित करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा अभ्यास मांडते. दुसरे पुस्तक ‘डिजिटल युगातील अकाउंटिंग’ या बदलांचा सखोल अभ्यास करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर, अकाउंटिंग क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. हे दोन्ही पुस्तके डिजिटल युग समजून घेण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील.