Home Blog Page 506

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढीबाबत प्रस्ताव सादर करा- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, दि. ९: मुद्रांक शुलक् अभय योजनांची मुदत ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झाली असून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याच्या अनुषंगाने या योजनेस मुदतवाढ देण्याकरीता प्रस्ताव सादर करावा, नागरिकांच्या दस्ताऐवजाची गोपनीयता अबाधित ठेवण्यासोबतच त्याचा गैरवापर टाळण्याकरीता प्रणाली विकसित करण्याबाबत विचार करावा, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नवीन प्रशासकीय इमारत येथे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या क्षेत्रीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे, अपर मुद्रांक नियंत्रक, प्रधान मुद्रांक संजयसिंह चव्हाण, सह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक अधीक्षक अशोक पाटील, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण व अभयसिंह मोहिते, लेखा उपसंचालक अविनाश देशमुख यांच्यासह पुणे विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक दीपक सोनवणे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विजय भालेराव, मुंबई विभागाचे राजू थोटे, नागपूर व अमरावती विभागाचे साहेबराव दुतोंडे, नाशिक विभागाचे कैलास दवंगे, कोकण विभागाचे राहुल मुंडके आदी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, विभागाच्या कामकाजाचा आढावा पाहता न्यायालयीन प्रकरणे मार्गी लावण्याकरीता ५ विधी अधिकारी व महालेखापाल तपासणीतील आक्षेपाचे निराकरण करण्याकरीता सनदी लेखापाल (सीए) नेमणूक करण्याची कार्यवाही करावी. मंत्रालयीन स्तरावरील प्रकरणांचा पाठपुरावा करुन ते मार्गी लावण्याकरीता एका समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या बांधकामाचा दरमहा आढावा घ्यावा. नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रकांने महिन्यात दोन ऐवजी चार कार्यालयीन कामकाजाची तपासणी करावी. विभागातील प्रलंबित विषय मार्गी लावून प्रकरणे शून्य प्रलंबितता (झिरो पेंडन्सी) राहील, याकरीता सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे. रिक्त पदे भरण्यासोबतच पदोन्नतीची प्रकरणे मार्गी लावण्याची कार्यवाही सुरु करावी.

राज्य शासनाच्या १५० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत ‘एक राज्य एक नोंदणी’ व ‘एक जिल्हा एक नोंदणी’ आदीबाबत माहिती देण्याकरीता अधिकाऱ्यांसाठी विभागनिहाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत करुन नागरिकांना सुलभ सेवा देण्याचे काम करावे. याकरिता इतर राज्यातील चांगल्या कामांचा अभ्यास करावा. विभागाच्यावतीने विविध लोककल्याणकारी मार्गदर्शक सूचना, नियम, आदेश पारीत करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचूकपणे कामे करावीत, पारदर्शक कामे करण्यासोबतच गैरप्रकार होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

यावेळी श्री. बिनवडे यांनी सन २०२४-२५ चे शासकीय वसुलीचे उद्दिष्ट व वसुली, सन २०२५-२६ शासकीय वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केलेले नियोजन, परतावा, अभिनिर्णय, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम १० ड ची अंमलबजावणी, कार्यालयीन तपासणी प्रक्रिया, फेसलेस नोंदणी प्रक्रियेचा आढावा, अभिलेख्याचे संगणकीकरण आणि स्कॅनिंग, १०० दिवसांचा आढावा आणि आगामी १५० दिवसात करावयाच्या कामाचे नियोजन, रिक्त पदे, महालेखापाल तपासणी, दस्त नोंदणी प्रक्रिया आदीबाबत माहिती दिली. येत्या काळात बैठकीत ठरल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. बिनवडे म्हणाले.
0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ

पुणे, दि. ९: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ हडपसर येथे करण्यात आला.

यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हनुमंत शेळके, सचिव डॉ. स्वाती शेळके आदी उपस्थित होते.

सन २०३० पर्यंत रेबीज निर्मूलन करण्याचे ध्येय
डॉ. हनुमंत शेळके व डॉ. स्वाती जोगदंड शेळके या दांपत्याने २००९ साली बीड जिल्ह्यातून युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली. सन २०३० पर्यंत रेबीज निर्मूलन करण्याचे ध्येय समोर ठेऊन हे रुग्णालय सुरू केले आहे. ग्रामीण भागात श्वानांची वाढती संख्या, श्वानदंशामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका व त्यावर उपाय योजना राबविण्यासाठी उपलब्ध असलेले व्यवस्था, कर्मचारी राहण्यासाठी गैरसोय या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी फिरता दवाखाना सुरू केला आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात पशुवैद्यकीय सेवा देत आहेत.

महिन्याला ५०० शस्त्रक्रिया करण्याची क्षमता
फिरते पशुवैद्यकीय रुग्णालयाचे क्षेत्रफळ सुमारे २ हजार चौरस मीटर आहे. पहिल्यामजल्यावर १० कर्मचारी राहण्यासाठी व्यवस्था, महिन्याला ५०० शस्त्रक्रिया करण्याची क्षमता, ज्यामध्ये १०० कुत्र्यांना ठेवण्याची सुविधा, ऑपरेशन थिएटर, ओपीडी, आणि कन्व्हर्टेबल कॉन्फरन्स रूम, किचन, अभिलेख कक्ष, चर्चासत्र कक्ष व वातानुकूलित, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती, ओपीडी, लसीकरण, आपत्कालीन उपचार, नसबंदी आदी सुविधा उपलब्ध आहेत.
0000

रा.स्व. संघ मोतीबाग नगर तर्फे ‘कौमुदी संचलन’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग नगर ; घोषवादनासह शिस्तबद्ध संचलन 

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग नगरातर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त तरुण विभागाचे ‘कौमुदी संचलन’ उत्साहात पार पडले. घोषवादनासह शिस्तबद्ध संचलनात स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात सहभाग घेतला. 

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेतून संचलनाला प्रारंभ झाला. यावेळी कसबा भाग संघचालक प्रशांत यादव उपस्थित होते. रमणबाग प्रशालेतून मुठेश्वर मंडळ, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रस्त्याने अलका टॉकीज चौक, खंडुजीबाबा चौक, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा मारून कुमठेकर रस्त्याने उंबऱ्या गणपती चौकामार्गे रमणबाग प्रशाला मैदान येथे संचालनाचा समारोप झाला. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला स्वयंसेवकांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन देखील केले. तसेच संचालनाचे ठिकठिकाणी स्वागत पुणेकरांनी केले. रा. स्व. संघाच्या आगामी शताब्दी वर्षांचा विचार करीत तरुण वर्गाची ताकद वाढावी, याकरिता देखील संचालनाचे आयोजन करण्यात आले होते. 

पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी रद्द,पण …मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

मुंबई-यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) गणेश मूर्ती तयार करण्यावरील आणि विक्री करण्यावरील बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करण्याची सक्ती कायम राहणार असून, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनास सक्त मनाई करण्यात आली आहे.

न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये कोणत्याही पीओपी मूर्तीचे विसर्जन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) तज्ञ समितीनेही हीच शिफारस केली होती, त्यानुसार पीओपी मूर्ती केवळ कृत्रिम जलसाठ्यातच विसर्जित करता येतील.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुढील तीन आठवड्यांत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात विसर्जनासाठीच्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाविषयीची माहिती असणे अपेक्षित आहे.

या निर्णयामुळे आता घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पीओपी मूर्ती साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करण्याच्या अटीचे पालन अनिवार्य राहील. यामुळे ज्या मूर्तीकारांनी आधीच पीओपी मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली होती, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये कोणत्याही पीओपी मूर्तीचे विसर्जन करण्यास परवानगी देणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की, ते कोणत्याही पीओपी मूर्तीचे नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये विसर्जन करण्यास परवानगी देणार नाही.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) तज्ञ समितीने शिफारस केली आहे की, पीओपी मूर्ती तयार करता येतील. परंतु नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जित करता येणार नाहीत. सीपीसीबी समितीने असे म्हटले आहे की, अशा मूर्ती फक्त कृत्रिम जलसाठ्यात विसर्जित केल्या जाऊ शकतात. पीओपी बनवलेल्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत आता राज्य सरकारला विवेकबुद्धी वापरावी लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल, असे खंडपीठाने म्हटले आहे.

सुनावणी दरम्यान मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत एकमेव मुद्दा समोर आला. यावेळी न्या. मारणे यांनी मंडळांना दरवर्षी एक मूर्ती बनवून ती सुरू ठेवण्यास सांगितले जाऊ शकते का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी मोठ्या मूर्तींसाठी काही “सवलत” मागितली आहे. या मोठ्या मूर्ती (20 फूट आणि त्याहून अधिक उंचीच्या) आपल्या संस्कृतीचा भाग बनल्या आहेत, असे सराफ म्हणाले.

सीजे आराधे यांनी म्हटले की, आम्हाला खात्री आहे की, कोणत्याही पीओपी मूर्तीचे नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तुम्ही कृत्रिम जलसाठे तयार करू शकता आणि तेथे पीओपी मूर्तींचे विसर्जन करू शकता. एजी सराफ यांनी म्हटले की, जर मंडळांनी कायमस्वरूपी त्याच मूर्तीचा वापर केला तर राज्य म्हणून आम्ही त्यात अडथळा आणणार नाही. यावर सीजे आराधे यांनी हो, तुम्ही निर्णय घ्या, असे म्हटले आहे.

तज्ज्ञ समितीने मान्य केले की, अशी मार्गदर्शक तत्वे नेहमीच सल्लागार स्वरूपाची असतात.
तज्ज्ञ समितीने, सीपीसीबीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कायदेशीर स्थिती आणि महाराष्ट्र सरकारकडून 09.04.2025 आणि 05.05.2025 रोजीच्या पत्रांद्वारे प्राप्त झालेल्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या प्रतिनिधित्वाची आणि समितीच्या अहवालाचा विचार केला आहे.
तज्ञ समितीचे मत आहे की, राज्य सरकार खालील अटींच्या अधीन राहून पीओपीपासून बनवलेल्या मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेऊ शकतात.
राज्य सरकारने पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी तात्पुरते कृत्रिम तलाव असल्याची खात्री करावी. परंतु पीओपी मूर्तींचे विसर्जन नद्या, तलाव, नैसर्गिक तलाव आणि समुद्रात करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
विसर्जनानंतर, राज्य सरकार तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये जमा झालेले साहित्य काढून टाकण्याची खात्री करेल. गोळा केलेले पीओपी साहित्य पुनर्जन्म आणि पुनर्वापरासाठी उचलले जाईपर्यंत पर्यावरणपूरक पद्धतीने साठवले जाईल.
पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने मूर्ती विसर्जन करण्यासाठी सीपीसीबीने 2020 मध्ये जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या इतर उपाययोजनांचे पालन करणे.

विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे दि. ९ जून : माईर्स एमआयटी विश्वशांती केंद्राद्वारे महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या “विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५” या मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये पश्चिम विभाग (सोहम गंभीर)े, मराठवाडा (अथर्व वाघचौरे) आणि विदर्भ (गौरी मुंडोकार) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती परीक्षेचे मुख्य समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माईर्स एमआयटी पुणे या शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकासाची जोड दिली आहे. संस्थेतून तयार झालेले विद्यार्थी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून जगात विश्वशांती व राष्ट्रनिर्मितीचे काम करतील. हा उद्देश्य ठेऊन गेल्या १२ वर्षापासून मूल्याधिष्टित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. २०२५ या वर्षापासून परीक्षेचे रुपांतर शिष्यवृत्ती मध्ये करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी १०वीचा विद्यार्थी बसू शकतो. त्या विद्यार्थ्याला १०वींत ७० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ही शिष्यवृत्ती त्याला ११वी आणि १२वी या दोन वर्षासाठी दिली जाईल.
विभागात गुणानुक्रमे येणार्‍या विद्यार्थी प्रथम (२५ हजार), द्वितीय (२० हजार), तृतीय (१५ हजार), चतुर्थ (१० हजार) आणि पाचवा (५ हजार) ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
या परीक्षेचा निकाल ः पश्चिम महाराष्ट्र विभागः सोहम संग्राम गंभीरे (प्रथम, संत ज्ञानेश्वर विद्यालय, कोथरूड, पुणे), दर्शन सतीश जगदाळे (द्वितीय,विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर), आर्य सचिन लोखंडे (तृतीय, अभिनव विद्यालय, पुणे), पायल संदीप बोरुडे(चतुर्थ, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरूर), वेदिका संतोष बडे (पाचवा, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरुर )
मराठवाडा विभागः अथर्व अमोल वाघचौरे (प्रथम, कै. दादाराव कराड विद्यालय, अंबाजोगाई), वैभवी तातेराव लहाडे (द्वितीय, श्री सरस्वती विद्यालय, रामेश्वर रूई), आर्या सचिन गडदे (तृतीय, कै. दादाराव कराड विद्यालय,अंबाजोगाई), सुरज विश्वंबर गायकवाड (चतुर्थ, मुकुंदराज विद्यालय, नांदगाव), दिव्या विलास धांडे (पाचवी, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, रांजणगाव)

विदर्भ विभागः गौरी गोपाळ मुंडोकार(प्रथम, श्री शिवाजी विद्यालय,अकोट), पयोष्णी विजय पार्शिवकर (द्वितीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), सह्याद्री अरविंद कळसकर (तृतीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), स्वराज नितीन बंड (चतुर्थ , जनता विद्यालय,पूर्णानगर), वैभवी नंदकिशोर अकोटकर (पाचवा, श्री शिवाजी विद्यालय, अकोट )

यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी

कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन

पुणे / लोणावळा : यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतिशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले.

लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधव भोंडे, उपाध्यक्ष नारायण भार्गव, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्रा जगदीशचंद्र मठ, राजेंद्र चतुर्वेदी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षणाधिकारी सुनील पोटे, विश्वस्त पंडित विद्यासागर,अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसाऱ्यापैकी केवळ पाच टक्के माहिती उपलब्ध झाली आहे. या पुढील काळात उर्वरित माहिती उजेडात आणण्याचे काम युवा शास्त्रज्ञांचे आहे. त्यासाठी युवकांना मोठा वाव उपलब्ध आहे, अशी जोशी यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येकाने कल्पना चावला यांच्यासारखे अंतराळवीर व्हावे असे नाही तर अभियंता, शास्त्रज्ञ, कलाकार अशा कोणत्याही भूमिकेतून मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिले जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

अंतराळ विज्ञानात भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश असून तो लवकरच प्रथम क्रमांकावर विराजमान होणार आहे. अंतराळ वैज्ञानिक घडविण्याच्या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत काटेकोरपणे या अकादमीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड करताना प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सध्याचे युग हे स्पर्धा करण्याचे नव्हे तर सहकार्य करण्याचे आहे. त्यामुळे या संस्थेसाठी इस्रो, नेहरू स्पेस सेंटर अशा अनेक संस्थांशी सहकार्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती भार्गव यांनी यावेळी दिली.

कल्पना चावला स्पेस अकादमीच्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती जगदीश चंद्र मठ यांनी दिली. उत्सुकताही प्रगतीची जननी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. प्रथम दोन वर्षात अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे. त्यानंतर अंतराळ विज्ञानातील विविध शाखांपैकी विद्यार्थ्यांना रस असलेल्या शाखेची निवड करून त्या शाखेचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंतराळ संशोधन संस्थेमध्ये उमेदवारी हा देखील अभ्यासक्रमाचा घटक असणार आहेत. त्याचप्रमाणे यशस्वी शास्त्रज्ञ घडवण्याबरोबरच नीतिवान, भावनिक दृष्ट्या सबळ व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जीवन विद्येचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे, असेही प्रा मठ यांनी सांगितले.

अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणारी कल्पना चावला स्पेस अकादमी ही भारतातील, किंबहुना जगातील एकमेव संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याची ग्वाही राजेंद्र चतुर्वेदी यांनी यावेळी दिली.

सुनील पोटे यांनी संस्थेला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. देवतोष कृष्णा यांनी सूत्रसंचालन केले तर राधिका भोंडे यांनी आभार मानले.

रेल्वे दुघर्टनेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच:त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नाही-अजित पवार

पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई लोकल अपघाताची जबाबदारी रेल्वे असून, त्यांना ती टाळता येणार नाही असे परखड मत व्यक्त केले आहे. मुंब्रा येथे झालेल्या फास्ट लोकल दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताला प्रवाशी जबाबदार असल्याचा दावा रेल्वेने केला होता. पण अजित पवारांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावत रेल्वे प्रशासनाला या अपघाताची जबाबदारी टाळता येणार नाही, असे म्हटले आहे.

अजित पवार पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवासी पडल्याची माहिती सुरुवातीला सांगितली जात हाेती. परंतु तसा काेणता प्रकार घडला नाही. साेमवारी सकाळी साडेनऊ वाजता दाेन ट्रेन रुळावरुन जात असताना मुंब्रा ते दिवा दरम्यान प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना लागल्या. त्यामुळे प्रवाशी खाली पडले. या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वेची आहे. ती ते टाळू शकणार नाही. याबाबत चाैकशीअंती वस्तुस्थिती पुढे येईल. तूर्त काेणत्या राजकीय नेत्यांना काय बाेलायचे हा त्यांचा अधिकार आहे. चाैकशी केल्यावर ज्या गाेष्टी समाेर येतील त्याबाबत खबरदारी घेण्याचे सक्त सूचना सबंधितांना दिल्या जातील.

अजित पवार म्हणाले, मुंबईत लाेकांची ये-जा करण्यासाठी रेल्वे एक महत्वाचे साधन आहे. रेल्वे प्रशासनामार्फत अनेक उपाययाेजना केल्या जात आहे. ब्रिटिश काळातील पूल काढून नवीन पुल बसवले गेले आहेत. माेठ्या प्रमाणात लाेक रेल्वे स्थानकावर येत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही रेल्वेमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. लाेकलला दरवाजे केले तर ते कितपत लागू हाेतील सांगता येत नाही. कारण प्रवाशांची कमी वेळेत चढ- उतार हाेत असते. झालेली घटना दुर्देवी असून मनाला वेदना देणारी आहे. अशाप्रकारे घटना घडल्यावर रेल्वे विभागा तर्फे मयत व जखमी यांना रेल्वे प्रशासनाकडून तातडीने मदत दिली जाते.

रेल्वेचे डबे वाढवले तरी त्या प्रमाणात स्थानकाचे प्लॅटफाॅर्म देखील वाढले पाहिजे. मेट्राे ही देखील सार्वजनिक व्यवस्था असून त्याला गती देण्याचे काम केले जात आहे. चर्चगेटकडे येणारा माेठा प्रवासी गट असून त्यांची सुरक्षा महत्वाची आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. लोकल ट्रेन दोन-तीन मिनिटांनी सुटते. डबे वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोच्या गतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. या दुर्घटनेबाबत चौकशी सुरू असून, त्यातून समोर येणाऱ्या प्रत्येक बाबीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी आश्वासन दिले.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेश

पुणे दि.9 : अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर अशा तिनही प्रवर्गातील दिव्यांग विदयार्थ्यांसाठी शासकीय बहुउददेशिय दिव्यांग संमिश्र केंद्र येरवडा येथे इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत (वयोगट 06 ते 18 वर्ष) साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अधिक्षिका रोहिणी मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या केंद्रात प्रशिक्षित शिक्षक वर्ग, डिजिटल शिक्षण, दर्जेदार वसतीगृह, भौतिक उपचार, व्यवसाय उपचार समाज उपचार, वैद्यकिय मदत, व समुपदेशन आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया यांसारख्या अत्याआधुनिक सुविधा दिल्या जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम आणि नैतिक मुल्यांचे शिक्षण केंद्रात दिले जाते. प्रवेशासाठी संपर्क शासकीय वहुउददेशिय दिव्यांग संमिश्र केंद्र, गोल्फ क्लब रोड (औद्यागिक शाळेच्या बाजुला) येरवडा पुणे. मोवाईल नंबर:-मोरे-9763895598, वाघ-9960233823, सोनवणे-9226959371, कारंडे-9765077666. सरोदे-9730515597 या नंबरवर संपर्क साधावा असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

पुण्यात आणखी एक हुंडाबळी,२० वर्षीय विवाहितेची आत्महत्या


पुणे-वाघाेली परिसरात केसनंद रस्त्यावर तळेरानवाडी येथे हुंडाबळीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नात हुंडयात पाच लाख रुपये व सात ताेळे साेने न दिल्याने विवाहितेचा सासरी छळ करण्यात आल्याने तिने राहते घराचे दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. स्वाती पाठक (वय- २०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत स्वातीच पती सुरज राजेंद्रप्रसाद पाठक (वय- २६), सासू सुनिता राजेंद्रप्रसाद पाठक (४५), दिर निरज राजेंद्रप्रसाद पाठक (२३), मामा अरुण ऊर्फ अंकु रमेश उपाध्याय (४५,रा. लाेहगाव, पुणे), मामा अरविंद रमेश उपाध्याय (४०,रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत वाघाेली पाेलिस स्टेशन मध्ये आराेपी विराेधात मयताची आई पुनम पांडे (वय- ५३, रा. सहादप पुरा, जि. महू, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांची मुलगी स्वाती हिचा सुरज पाठक साेबत ६/३/२०२४ राेजी विवाह झाला हाेता. लग्नाचे वेळी सासरच्या व्यक्तींनी लग्नात पाच लाख व साेन्याचे दागिन्याची मागणी केली. परंतु लग्नात स्वातीच्या कुटुंबियांनी एक लाख व सात ताेळे हुंडा मागणीप्रमाणे दिला. परंतु याेग्य हुंडा न दिल्याने स्वातीला सासरच्या व्यक्तींनी त्रास देणे सुरु केले.

हुंडा न दिल्याचे रागातून तिचा सासरच्या व्यक्तींनी मारहाण करुन तिला शारिरिक व मानसिक त्रास देणे सुरु केले. तसेच तिच्या अंगावरील साेन्याचे दागिने तिचा पती व सासु यांनी मुथूट फायनान्स मध्ये गहाण ठेऊन त्यावर पैसे घेतले. संबंधित साेने साेडविण्यासाठी स्वाती हिचेकडे तीन ते चार लाख रुपयांची मागणी करुन, तीन लाख रुपये राेख स्वरुपात स्विकारले. तसेच स्वाती हिला घरगुती वेगवेगळया कारणास्तव वादविवाद करुन तिचा शारिरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे या त्रासाला कंटाळून स्वाती हिने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहते घराचे दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचे पती, सासु, दीर, मामा यांचे विराेधात पाेलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८०, ११५ (२), ३ (५), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक विनायक आहिरे करत आहे.

कर्ज वाढीस चालना – पण ठेवीदारांचा बळी ! काँग्रेस नेते व बॅंकिंग तज्ञ विश्वास उटगी

पुणे दि. ९ जून २०२५बँकांत २३४.५ लाख कोटी च्या ठेवी ,ज्यांच्या खांद्यावर देश उभा आहे, त्यांच्याच खांद्यावर ओझं का?असा सवाल करत रिझर्व बँकेच्या निर्णयाने हकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज आणि उद्योग कर्ज स्वस्त होतील.मात्र बचत करणारा मध्यमवर्गीय, निवृत्त नागरिक आणि सामान्य ठेवीदार पुन्हा एकदा नुकसानात जाईल असे स्पष्ट मत काँग्रेस नेते व बॅंकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी येथे व्यक्त केले.

ते म्हणाले,’रिझर्व्ह बँकेने ६ जून रोजी आपले नवीन पतधोरण जाहीर करताना रेपो दर ६% वरून थेट ५.५% इतका अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक तज्ज्ञ फक्त पाव टक्क्याची कपात अपेक्षित धरत असताना रिझर्व्ह बँकेने अधिक आक्रमक भूमिका घेत अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.सरकारी आकडेवारीनुसार, देशाचा GDP वाढीचा दर ६.५% असून, महागाई दर ४% च्या आत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पतधोरण सुलभ करून कर्जवाटप वाढविणे व उद्योगांना चालना देणे हे उद्दिष्ट स्पष्ट होते.

त्याच वेळी, कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने ४% वरून ३% करण्यात येणार आहे, ज्यामुळे बँकिंग प्रणालीमध्ये २.५ लाख कोटी रुपये अतिरिक्त तरलता निर्माण होणार आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज आणि उद्योग कर्ज स्वस्त होतील.मात्र, एकीकडे बँका कर्जावरील व्याजदर कमी करणार असताना, दुसरीकडे त्या ठेवीवरील व्याजदरही मोठ्या प्रमाणात कपात करणार हे नक्की आहे. म्हणजेच बचत करणारा मध्यमवर्गीय, निवृत्त नागरिक आणि सामान्य ठेवीदार पुन्हा एकदा नुकसानात जाणार!

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवी सुरक्षित मानल्या जातात, परंतु महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याजदर कपात ही ठेवीदारांची क्रयशक्ती कमी करते. हे निवृत्त नागरिक, मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक दरमहा मिळणाऱ्या व्याजावर अवलंबून असतात.बचत करणार्‍यांना दंडित करून अर्थव्यवस्था चालवायची ही नीती चुकीची असून, रिझर्व्ह बँक व केंद्र सरकार ठेवीदारांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहेत.

रिझर्व्ह बँकेचे आकडे काय सांगतात?

मार्च २०२५ पर्यंत एकूण बँक ठेवी – ₹२३४.५ लाख कोटी
यात:
• महानगर – ₹२४.८ लाख कोटी
• अर्बन – ₹४९ लाख कोटी
• सेमी-अर्बन – ₹३६.२ लाख कोटी
• ग्रामीण – ₹२४.४ लाख कोटी

ठेवींचा वाढीचा दर केवळ ७% असून, बचतीत फारशी वाढ झालेली नाही. ऑक्टोबर २०२३ पर्यंत:
• बचत खाते – ₹५९.७ लाख कोटी
• चालू खाती – ₹१८.५ लाख कोटी
• मुदत ठेवी – ₹१०३ लाख कोटी

पण कर्ज बुडव्या कोण?

पैसा सुलभ होतोय हे ठीक, पण गेल्या काही वर्षांत बड्या कॉर्पोरेट कर्जदारांना मोठ्या प्रमाणात कर्जे देऊन ती बुडवली गेली आहेत. लाखो कोटींची कर्जे ‘राइट ऑफ’ करण्यात आली, वसुलीचा परिणाम नगण्य. या सर्वाचा भार मात्र ठेवीदारांवर आणि सामान्य बँक ग्राहकांवर!

व्याजदरात झालेली कपात:
• सेंट्रल बँक ऑफ इंडिया: ७.५% → ६.८५%
• बँक ऑफ महाराष्ट्र: ७.१५% → ६.५%
• फेडरल बँक: ७.५% → ७%
• इंडसइंड बँक: ७.२५% → ७%

आमचे प्रश्न:
1. बचतदार व गुंतवणूकदारांना संरक्षण कुठे आहे?
2. बँका व सरकार केवळ बड्या कर्जदारांचे हित का पाहतात?
3. खाजगी गुंतवणूक का वाढत नाही? रोजगार का निर्माण होत नाही?

या सगळ्याचा विचार करून आम्ही रिझर्व्ह बँक व केंद्र सरकारकडे ठेवीदारांची बाजू समजून घेण्याची, त्यांचे हित संरक्षित करण्याची आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची मागणी करतो.असे काँग्रेस नेते व बॅंकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी म्हटले आहे.

वेदांता.. महाराष्ट्रातील १०० अंगणवाड्यांचा कायापालट करणार

पुणे-

वेदांताच्या अनिल अगरवाल फाउंडेशनने त्यांचा नंदघर प्रकल्प गडचिरोली, महाराष्ट्र येथे लाँच करण्याचे ठरवले असून त्याद्वारे ३९०० मुलांना सक्षम केले जाईल व १७०० स्त्रिया आणि मुलींना शिक्षण,पोषण, आरोग्य व कौशल्य विकासाच्या संधी दिल्या जाणार आहेत. सर्वसमावेशक ग्रामीण विकासाच्या दिशेने लक्षणीय पाऊल पुढे टाकत अनिल अगरवाल फाउंडेशनचा प्रमुख उपक्रम – नंदघरने गडचिरोलीच्या जिल्हा परिषदेसह
सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील १०० अंगणवाड्यांचे आधुनिक नंदघरात रुपांतर केले जाणार आहे. या भागिदारीला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मूर्त स्वरूप देत सर्वात वंचित भागात विकास करण्याची राज्याची बांधिलकी दर्शवण्यात आली.

महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने हा उपक्रम सहा वर्षाखालील ३९००
मुले व १७०० स्त्रिया आणि मुलींच्या आयुष्यावर थेट परिणाम घडवून आणेल. आधुनिक केंद्रांद्वारे
प्राथमिक शिक्षण, पोषक आहार, प्राथमिक आरोग्यसेवा आणि कौशल्य विकास तसेच समग्र
विकासाच्या संधी पुरवल्या जातील. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आदिवासी भागातील विकासाची दरी
नाविन्य आणि सर्वसमावेशक भागिदारीद्वारे सांधण्याची बांधिलकी दर्शवणारा आहे.
ठाणे येथील २५ अंगणवाड्यांचे नंदघरात रुपांतर करण्यात आले असून त्याला मिळालेल्या यशाच्या
पायावर ही भागिदारी आधारित असून ती भारताच्या इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस
(आयसीडीएस) आणि पोषण २.० प्रकल्पांशी सुसंगत आहे. या उपक्रमामुळे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत
विकासाच्या ध्येयांना (एसडीजी), ४ (दर्जेदार शिक्षण), २ (भुकेचे उच्चाटन) आणि ५ (लिंग समानता)
चालना मिळणार असून त्यामुळे मुले व स्त्रियांना सर्वसमावेशक प्रगतीमध्ये केंद्रस्थान मिळेल.
आधुनिक अंगणवाडी केंद्रांमध्ये आकर्षक बीएएलए (बिल्डिंग अज अ लर्निंग एड), डिझाइन्स, एलईडी
टीव्ही – ई लर्निंग, मुलांसाठी सोयीस्कर फर्निचर आणि पिण्याचे सुरक्षित पाणी, वीज व स्वच्छता अशा
वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या व्हिजनशी सुसंगत राहात महाराष्ट्र सरकार प्रत्येक मुलाला शिक्षण, आरोग्य व पोषण
मिळेल यासाठी प्रयत्नशील असून स्त्रियांना कौशल्यविकास, अर्थार्जनाच्या संधी आणि संपूर्ण
विकासाद्वारे सक्षम केले जात आहे. गडचिरोलीतील १०० अंगणवाड्यांचे नंदघरात रुपांतर करण्यातून

सार्वजनिक- खासगी क्षेत्रात किती मजबूत भागिदारी होऊ शकते हे
दर्शवणारे आहे. अशाप्रकारचे उपक्रम महाराष्ट्रभरात राबवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

हे नंदघर दिवसभरात दोन टप्प्यात काम करतील. सकाळी मुलांचे प्राथमिक शिक्षण आणि पोषणावर
भर दिला जाईल, तर दुपारी समाजकेंद्रित उपक्रमांवर भर असेल. त्यामध्ये ६०० गरोदर स्त्रिया आणि
स्तनदा माता व १०० मुलींसाठी आरोग्य जागरूकता सत्रे, लघु उद्योग वर्कशॉप्स आणि कौशल्य
विकास यांच्यावर भर असेल. यातून त्यांना स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत
केली जाईल.
हिंदुस्थान झिंक लि. च्या अध्यक्ष आणि वेदांता लि.च्या नॉन- एक्झक्युटिव्ह संचालक प्रिया अगरवाल
हेब्बर नंदघरच्या विस्ताराच्या अग्रणी असून या प्रकल्पाच्या दीर्घकालीन परिणामाविषयी त्या म्हणाल्या,
‘प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीला विकास करण्यासाठी योग्य संधीची गरज असते.
गडचिरोली येथे नंदघर लाँच करण्यातून आम्ही कित्येक पिढ्यांपासून अस्तित्वात असलेली दरी
सांधण्यासाठी अर्थपूर्ण पाऊल उचलत आहोत. समाज कल्याणासाठी आम्ही बांधील आहोत तसेच राज्य
सरकारच्या मदतीने ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रिया व मुलांचे आरोग्य, पोषण व शिक्षणात सुधारणा
घडण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’
दीर्घकालीन परिणाम आणि शाश्वतता साध्य करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एलईडी टीव्ही व
टॅब्लेट्सद्वारे ई- लर्निंग कंटेंट दिला जाणार असून अक्रेडिटेड सोशल हेल्थ हेल्थ अक्टिव्हिस्ट्स (आशा)
आणि ऑक्सिलियरी नर्स मिडवाइव्हज (एएनएमएस) यांना प्राथमिक आरोग्यसेवांचे खास प्रशिक्षण दिले
जाईल व पर्यायाने सामाजिक आरोग्याचा निर्देशांक उंचावण्यास मदत होईल.
जिल्हा परिषद, गडचिरोलीद्वारे पात्र अंगणवाड्या ओळखून, प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल
व अद्ययावत केंद्रांची देखभाल केली जाईल. जॉइंट वर्किंग ग्रुपद्वारे सफाईदार अमलबजावणी
होण्यासाठी देखरेख केली जाईल.
सामाजिक सक्षमता आणि सेवांचे न्याय्य वाटप यावर भर देणाऱ्या या प्रकल्पाने महाराष्ट्रातील
आदिवासी व वंचित जिल्ह्यांमध्ये चौफेर विकास घडवण्याचे ध्येय ठेवले आहे.
नंदघरने यापूर्वी १५ राज्यांत ८३०० केंद्रे स्थापन केली असून त्याद्वारे लाखो स्त्रिया व मुलींच्या
आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे नुकतेच राजस्थान
सरकारसह भागिदारीचे नूतनीकरण करण्यात आले व त्याअंतर्गत २५,००० केंद्रांची राज्यभरात स्थापन
केली जाणार आहे. निरोगी, सुशिक्षित व स्वयंपूर्ण भारत घडवण्याच्या नंदर घराच्या प्रवासात
गडचिरोली येथील लाँच हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी: हर्षवर्धन सपकाळ

निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा.

मुंबई, दि. ९ जून २००२५
ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला जबाबदार धरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

रेल्वे अपघातावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले आहे पण या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपला जीवाने चुकती करावी लागते आहे. सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत.

मुंबई परिसरात लोकल हीच लाईफलाईन आहे, दररोज जवळपास ७५ लाख लोक लोकलने प्रवास करतात पण हा प्रवास अत्यंत खडतर व कठीण आहे. घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरी परत येईल का याची चिंता सारखी सतावत असते. लोकलमधील गर्दीमुळे दररोज अपघात होतात, कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो किंवा कायमचा जायबंदी होतो. लोकलमधील गर्दी कमी करून हा प्रवास सुखकर करावा यासाठी सातत्याने चर्चा होते, बैठका होतात पण पुन्हा ‘पहिले पाढे ५५’ अशी अवस्था आहे. एखादा अपघात झाली की तातडीने लोकलला बंद दरवाजे बसवण्याची घोषणा केली जाते पण कृती शून्य असते. रेल्वे प्रशासन हे मुर्दाड आहे, सुस्तावलेला अजगर आहे. सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने लोकलच्या समस्यांवर आवाज उठवलेला आहे पण रेल्वे प्रशासन व सरकार यांची कुंभकर्णी झोप काही जात नाही. भाजपा सरकारला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करायचा आहे, मुंबईकरांना बुलेट ट्रने नाही तर लोकल सेवा व्यवस्थित पाहिजे. पण रेल्वे प्रशासन व सरकार सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे आता हा खेळ थांबवा असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा साहित्य वाटप व जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धा संपन्न”

“ना. चंद्रकांतदादा पाटील हे एक संवेदनशील नेतृत्व” – संदीप खर्डेकर.

“रोलबॉल ह्या पुण्यात जन्मलेल्या खेळाने नवनवीन शिखरे गाठावीत” – श्री. बद्री मूर्ती.

पुणे-नामदार चंद्रकांतदादा पाटील हे एक अत्यन्त संवेदनशील नेतृत्व असून त्यांचे राहणीमान, त्यांचे सार्वजनिक वर्तन, त्यांचे समाजाप्रतीचे दातृत्व हे सगळेच राजकारणात दुर्मिळ असून चंद्रकांतदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना होणारा आनंद अवर्णनीय आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले. “दादा” तुम्ही शतायुषी व्हा, तुम्हाला आरोग्यसंपन्नता लाभो आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर “असेच रहा दादा”, सामान्य नागरिकांच्या आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
तर मा. चंद्रकांतदादा नसते तर पुण्यात रोलबॉल च्या विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले नसते असे भावपूर्ण उद्गार ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे सर यांनी काढले.
ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोलबॉल असोसिएशन च्या वतीने जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच विविध शाळेतील क्रीडा शिक्षकांना क्रीडा साहित्याची भेट देण्यात आली ह्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी परांजपे विद्यामंदिर, महेश विद्यालय, कोथरूड सिटी इंटरनॅशनल स्कूल, न्यू इंडिया स्कूल, एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल निगडी, टाटा मोटर्स स्कूल, पीसीएमसी सेंट उर्सुला स्कूल, पिंपरी चिंचवड फिटनेस फायटर अकॅडमी,ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल,एवरेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, अशा विविध शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप प्रमुख अतिथी श्री बी.जी मूर्ती सर, असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर,रोलबॉल या खेळाचे जनक राजू दाभाडे सर, नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर, भाजपा आय टी प्रकोष्ठ च्या सौ. कल्याणी खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भ्रमणध्वनी द्वारे उपस्थितांना संबोधित केले व ह्या खेळाच्या वाढीसाठी मी कटिबद्ध असून त्यासाठी सर्वांतोपरी मदत करेन असेही ते म्हणाले.माझा वाढदिवस अश्या अगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल त्यांनी सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
रोलबॉल ह्या खेळासाठी सर्वप्रथम मैदान मी बाल शिक्षण मंदिर येथे उपलब्ध करून दिले आणि आता हा खेळ जगभर लोकप्रिय होत आहे असे प्रमुख अतिथी श्री. बद्री मूर्ती म्हणाले. या खेळाने नवनवीन शिखरे गाठावीत अश्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.
यावेळी क्रीडा प्रशिक्षकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
चंद्रकांतदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 वर्षा खालील जिल्हा स्तरिय रोलबॉल स्पर्धा पुणे जिल्हा रोलबॉल संघटने मार्फत घेण्यात आल्या. या स्पर्धेत 17 वर्षाखालील ज्युनिअर गटातील 18 संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मुलांचे दहा तर मुलींचे आठ संघ सहभागी होते.
पहिला जूनियर वर्ल्ड कप केनिया येथे होणार असून त्याचे प्रशिक्षण बालेवाडी येथे सुरू आहे.देश भरातील विविध राज्यातील खेळाडू या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी आहेत,त्या खेळाडूंनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला यामध्ये जम्मू कश्मीर, आसाम,उत्तर प्रदेश, दिल्ली महाराष्ट्र,मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू,आंध्र प्रदेश, केरळ,अशा विविध राज्यातील खेळाडू या संघांमध्ये एकत्रित होऊन त्यांचे संघ तयार केले होते ते संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले.


स्पर्धेचे निकाल…
मुलांच्या गटात
1 इंडिया ईस्ट हा संघ प्रथम

  1. इंडिया वेस्ट हा संघ द्वितीय 3. महेश विद्यालय कोथरूड तृतीय.

मुलींच्या गटात

  1. इंडिया ईस्ट प्रथम
  2. इंडिया वेस्ट द्वितीय
  3. महेश विद्यालय तृतीय.

ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादासाहेब भोरे,प्रमोद काळे, रफिक इनामदार,प्रभाकर वडवेराव, निलेश शिंदे, जयप्रकाश सिंग इ.यांनी मोलाची कामगिरी बजावली.

रुबी हाॅलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची होस्टेल मध्ये आत्महत्या

पुणे-गुजरातच्या भावनगर येथील डाॅ.श्याम व्हाेरा (वय- २५) हा तरुण पुण्यातील नामांकित रुबी हाॅल क्लिनिक रुग्णालयात रेडियाेलाॅजिस्ट म्हणून शिक्षण घेण्यास आला हाेता. परंतु कामाच्या अतिताणामुळे त्याने रुबी रुग्णालयापासून जवळच असलेल्या ढाेले पाटील चाैकातील दामाेदर भवन या वसतिगृहातील आपल्या खाेलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. रुग्णालयातील कामाच्या अतिताणामुळे या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत पाेलिसांनी डाॅ. श्याम व्हाेरा याच्या कुटुंबियास माहिती दिली. पीडित कुटुंब गुजरात मधील भावनगर येथून साेमवारी पुण्यात दाखल झाले. त्यानंत पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला. पोलिसांच्या माहितीनुसार, डाॅ.शाम व्हाेरा हा रुबी रुग्णालयात निवासी डाॅक्टर म्हणून काम करत हाेता. रुबी रुग्णालयाचे वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात ताे अन्य एका डाॅक्टर साेबत राहत हाेता. रविवारी रात्री ताे रुममध्ये एकटाच असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पाेलिसांना प्राप्त झाली आहे. त्यात कागदावर त्याने आपल्या माेबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला होता. मृताने कुणावरही आरोप केले नसल्यामुळे त्याच्या आत्महत्या मागील गूढ वाढले आहे. दरम्यान, याप्रकरणी काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नाेंद करण्यात आली आहे. मयत डॉक्टरयाच्या कुटुंबीयांनी याबाबत कोणती अद्याप तक्रार पोलिसांकडे दाखल केली नाही. काेरेगाव पार्क पाेलिस पुढील चाैकशी करत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे.

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर संताप:म्हणाले – बाहेरून येणारे लोंढे शहरांवर आदळत आहेत,त्यामुळेच रेल्वे सेवा कोलमडली

0

मेट्रो व मोनो रेलमुळे प्रश्न सुटणार नाही,रेल्वेचा अन् ट्रॅफिकचा बोजवारा उडाला
पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी घडलेल्या रेल्वे दुर्घटनेसाठी परप्रांतीयांना जबाबदार धरले आहे. आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. बाहेरून येणआरे लोंढे आपल्या शहरांवर आदळत आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली आहे. रेल्वेचा व ट्रॅफिक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. मेट्रो व मोनो रेलमुळे हा प्रश्न सुटणार नाही. सर्वजण निवडणुका, प्रचार व इतर गोष्टींमध्येच गुंतले आहेत, असे ते म्हणालेत.

राज ठाकरे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई रेल्वे दुर्घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ही रेल्वे चालतेच कशी? हेच एक आश्चर्यच आहे. मुंबईतील लोकांनी अनेकदा या प्रकरणी एक वेगळे महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. पण त्यावर काहीही होत नाही.

ते पुढे म्हणाले, आपल्या सगळ्या शहरांचा विचका झाला आहे. कुठेही रस्ते नाहीत. पण रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली सर्वत्र उंचउंच इमारती उभ्या राहत आहेत. रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ट्रॅफिक अडली जाते. कुठे आगली लागली तर फायर ब्रिगेडचा बंबही तिकडे जाऊ शकत नाही अशी आपल्या शहरांची अवस्था झाली आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच आपल्याकडे नाही. मी गेली अनेक वर्षांपासून सांगत आहे की, बाहेरून येणारे जे लोंढे आपल्या शहरांवर आदळत आहेत, त्यामुळेच ही रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. सगळ्या ट्रॅफिकचा बोजवारा उडाला आहे.

लोकांना चालण्यासाठी फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, कोण जातंय याची माहिती नाही. मेट्रो व मोनो रेलेमुळे प्रश्न सुटणार नाही. मुंबईत मोनो रेल आहे, मेट्रो आहे, मग गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबले का? टू व्हिलर, फोर व्हिलरचे रजिस्ट्रेशन थांबले का? नाही थांबले. म्हणजे त्या गाड्या येतच आहेत. मग ही नक्की मेट्रो व मोनो रेल कोण वापरत आहे? कोण काय करतंय? कुणीही पाहायला तयार नाही. सर्वजण निवडणुका, प्रचार आणि इतर गोष्टींतच गुंतले आहेत. शहरे म्हणून याकडे पाहण्यास कुणीही तयार नाही आणि शहरांवर बोलणाऱ्यांना माध्यमांमध्ये किंमत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांवरही आगपाखड केली. ते म्हणाले, मागील काही दिवसांत राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार याच्या जेवढ्या बातम्या लावल्या, तेवढा काळ तुम्ही आज रेल्वे अपघातात जे बळी गेले त्यांच्या बातम्या लावणार आहात का? आपण कशाला महत्व द्यायचे हेच कुणाला समजत नाही. शहरी भागातील पत्रकारांनी शहरांतल्या प्रश्नांवर जास्त लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सरकारचे या गोष्टींकडे कसे लक्ष जाईल? यावर लक्ष द्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी फार किरकोळ आहेत.

असे अपघात घडणे दुर्देवी बाब आहे. केंद्र सरकारने यावर लक्ष दिले पाहिजे. तातडीने लक्ष दिले पाहिजे. रेल्वे फलाटावरील गर्दी पाहिली तर प्रवाशी कसे आत जातात व कसे बाहेर येतात याची कल्पना करवत नाही. रेल्वेने मी स्वतः प्रवास केला आहे. कॉलेजला असताना मी हार्बर लाईनवरून प्रवास केला. त्यामुळे रेल्वेचा प्रवास काय असतो? हे मला माहिती आहे. त्यावेळी गर्दी कमी असायची. पण आता गर्दी तुडुंब वाढली आहे. सायंकाळच्या वेळी रेल्वे प्लॅटफॉर्म व रेल्वेत तुम्ही शिरून दाखवा. विलक्षण आहे सगळे. रेल्वे मंत्री काय करत आहात? रेल्वेने राजीनामा देण्यापेक्षा स्थिती सुधारण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले.राज ठाकरे यांनी यावेळी लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयावरही टीका केली. लोकलला दरवाजे बसवले तर आतमधील लोक गुदमरून मरतील, असे ते म्हणाले. किती गर्दी असते कल्पना आहे का तुम्हाला. एक जागा आत जाण्यासाठी असावी, दुसरी जागा बाहेर येण्यासाठी असावी. पण काहीही नाही. जिथून आत जातात, तिथूनच बाहेर पडतात. प्रवाशांना आपल्या स्टेशनवर उतरताही येत नाही. आपल्याकडे माणसाची किंमतच नाही. हीच गोष्ट इतर देशात घडली असती तर तेथील सरकार अशा घटनांकडे फार गांभिर्याने पाहतात. आपले मंत्री जे परदेश दौऱ्यावर जातात ते तिकडून काय पाहून येतात. तुम्ही तिकडच्या रेल्वे आणू नका, किमान त्यांचे विचार तरी आणा. तेही आणत नाहीत. हे अतिशय निराशाजनक आहे, असे राज ठाकरे म्हणाले.