Home Blog Page 507

निवडणूक आयोग मोदी – शहाच्या पिंजऱ्यातील पोपट:निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाला भाजप का उत्तर देत आहे? – राऊत


मुंबई:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी निवडणूक आयोग, भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला आहे. खरा पोपट विठू विठू तरी बोलतो. पण हा पोपट तेवढाही बोलत नाही. सद्यस्थितीत हा पोपट जिवंत आहे की मेला? हे ही सांगण्याची कुणाची हिंमत होत नाही, असे ते म्हणाले.राहुल गांधी यांनी शनिवारी एका संपादकीय लेखाद्वारे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा आरोप फेटाळून लावत त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेद्वारे या घटनाक्रमावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाला भाजप का उत्तर देत आहे? असा कळीचा प्रश्न उपस्थित केला.

भाजपला EC च्या चेहऱ्यावरील धूळ पुसण्याचा ठेका मिळाला का?

संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची भूमिका उर्दुला विरोध करण्याची आहे. योगी आदित्यनाथ किंवा त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी उर्दुला विरोध केला. पण फडणवीस यांनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी उर्दू शायरीला आधार घेतला. ही जुनी शायरी आहे. ती शाळेतील मुलेही वापरतात. मूळ मुद्दा बाजूलाच राहत आहे. तुम्ही निवडणुकीच्या चेहऱ्यावरील धूळ का पुसत आहात? ही धूळ स्वतः आयोगाने पुसली पाहिजे. त्यांना आयोगाच्या चेहऱ्यावर जी काही धूळ बसली आहे किंवा सर्व राष्ट्रीय पक्ष व जगभरातून जी चिखलफेक होत आहे ती साफ करण्याचा ठेका मिळाला आहे का?

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेत. भाजपला नाही. उत्तर राजीव कुमारांपासून ज्ञानेशकुमारांपर्यंतच्या लोकांनी द्यायचे आहे. हे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते नाहीत. गेल्या 10 वर्षांत आयोगाने जे कांड केलेत, ते मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या हातात देण्यापासून मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या हयातीत अजित पवारांना देण्याचे काम हे अमित शहांच्या दबावाखाली झाले. हा सुद्धा निवडणूक जिंकण्याचाच एक भाग होता. याचे सुद्धा आयोगाला उत्तर द्यावे लागतील. फडणवीस यांची उत्तरे केवळ थातूरमातूर आहेत. छाछुगिरी आहेत. तुम्ही आयोगाची अथॉरिटी नाहीत.

EC मोदी – शहाच्या पिंजऱ्यातील पोपट

ते म्हणाले, गेल्या 10 वर्षांत निवडणूक आयोग मोदी- शहा यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला आहे. पोपट विठू विठू तरी बोलतो. पण हा पोपट तेवढाही बोलत नाही. आयोग हा अकबर बादशहाचा पोपट झाला आहे. तो जिवंत आहे की मेला? हे सांगण्याचीही कुणाची हिंमत होत नाही. महाराष्ट्रात याला उत्तर द्या, त्याला उत्तर द्या असे जे प्रकार सुरू आहेत, ती सर्व ढोंग व सोंग आहेत. राज्याच्या व केंद्राच्या निवडणूक आयोगाने आपला आत्मा विकला आहे. आयोग भाजपची एक शाखा म्हणून काम करत आहे हे आता लपून राहिले नाही. आम्ही भाजप व सरकारवर आरोप केला तर राजीवकुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर देतात.

निवडणूक आयोग हे एक घटनात्मक पद आहे. त्यांनी निष्पक्षपणे या देशातील निवडणुका घ्यायच्या असतात. मोदी – शहा सांगतील त्या पद्धतीने निवडणुका घ्यायच्या नसतात. हे फडणवीस यांनी लक्षात घेतले पाहिजे. फडणवीस वकील असतील, पण कायद्याचा अभ्यास त्यांच्यापेक्षा जास्त आमचा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

ठाण्यात ट्रेनमधून 13 प्रवासी पडले, 4 जणांचा मृत्यू:जखमी आणि मृतांच्या आकडेवारी बाबतही प्रशासन अनभिज्ञ

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे प्रवासी ट्रेनच्या दरवाज्याला लटकलेले होते, जिथून ते खाली पडले. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना लोकल ट्रेनची आहे. सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. मात्र, या घटनेत किती प्रवासी जखमी आहेत आणि किती जणांचा मृत्यू झाला? या बाबत प्रशासन अद्याप माहिती देऊ शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 13 प्रवासी पडले, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.
जखमी

  1. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.) 2. आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.) 3. रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 4. अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.) 5. तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.) 6. मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 7. मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 8. स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 9. प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

साहित्यिकाला सत्याचा, विवेकाचा धर्म असावा : डॉ. श्रीपाल सबनीस

वैशाखी वादळ वारा काव्य महोत्सव उत्साहात

पुणे : मराठी कवी, साहित्यिक हे प्रेम, अलिंगन, चुंबन, शेती-माती, नाती-गोती यांच्यातच अडकून पडले आहेत. कवीने महाराष्ट्राच नव्हे तर देशाचा नकाशा ओलांडून विश्वात्मकता अंगीकारण्यासाठी प्रयत्न करावेत. साहित्यात वैश्विक संस्कृती, अर्थकारण, शोषण, युद्ध, जागतिक प्रश्न अशा विषयांवर भाष्य करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. साहित्यिकाला सत्याचा, विवेकाचा धर्म असावा, असेही त्यांनी सूचित केले.
ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांनी आयोजित केलेल्या वैशाखी वादळ वारा काव्य महोत्सवाचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळा डॉ. सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाऊंडेशन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पन्नासहून अधिक कवींनी कविता सादर केल्या. कवी आणि साहित्यिकांचा या वेळी पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, सागर मिटकरी, सूर्यकांत तिवडे, प्रकाश देशमुख, कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र भणगे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, सांस्कृतिक लोकशाही बळकट झाल्यास राजकारणी लोकशाही बळकट होईल. या कविसंमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संस्था द्वेष भावनेशिवाय कार्यरत आहेत असे जाणवते. ही सांस्कृतिक एकात्मकता राजकीय नेत्यांनीही शिकावी. जाती-पातीच्या भिंती ओलांडून निधर्मी, संविधान संस्कृती निर्माण व्हावी. आजच्या काळात नव्या हिटलरांची उपज थांबविणे गरजेचे आहे. विश्वात शांतता नांदावी या करिता साहित्यिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
बबन पोतदार म्हणाले, साहित्यिकाच्या हातून साहित्यकृती कशी निर्माण होते याची अनुभूती या काव्य संमेलनातून आली. कवींच्या सान्निध्यात खूप आनंद होत आहे. प्रकाश देशमुख, सुर्यकांत तिवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात चंद्रकांत जोगदंड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

आगग्रस्त भागाची केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी केली पाहणी

पुणे-‘वनाज सोसायटी’मध्ये आगीने नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल केली आणि तेथील आग ग्रस्त नागरिकाच्या समस्या जाणून घेतल्या

कोथरुड परिसरातील वनाझ सोसायटी येथे दोन दिवसांपूर्वी मीटर रूमला आग लागून त्या आगीची झळ इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. या दुर्दैवी घटनेत नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण मीटर जळाल्याचे प्रकार घडले आहेत. स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हानी टळली असून आज या सर्व परिसराची पाहणी करत नागरिकांनी आधार देण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी केला.

या परिसरात डी-बिल्डिंगमधील संपूर्ण मीटर जळून खाक झाले होते. त्याचबरोबर मीटर रूमपासून नागरिकांच्या घरापर्यंत गेलेल्या सर्व वाहिन्या देखील जळून खाक झाल्या होत्या. इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावरील सदनिका धारकांना याची सर्वात जास्त झळ पोचली.

यावेळी महावितरण आणि अग्निशामक दलाचे अधिकारीही उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांना यावेळी तातडीने नवीन मीटर बसवून देण्याच्या सूचना मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या असून नवीन ट्रान्सफार्मर मोकळ्या जागेच बसविण्यासंदर्भाच सूचित केले. तसेच पुन्हा असा प्रकार घडू नये तसेच तातडीने उपाययोजना कराव्यात, याबाबतची सूचना केल्या.

आजपासून 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी

आणखी 7 देशांवर अंशतः बंदी; सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांनी घातली बंदी
वाशिंग्टन-
अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावरील बंदी आजपासून लागू होईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ जून रोजी याबाबतचा आदेश जारी केला होता, जो आज, ९ जूनपासून लागू होईल.१२ देशांव्यतिरिक्त, आजपासून ७ देशांच्या नागरिकांवर अंशतः बंदी घालण्यात येणार आहे. ही स्थलांतर आणि नॉन-इमिग्रेशन व्हिसाला लागू असेल.

ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयामागे अमेरिकन लोकांच्या जीविताची सुरक्षा आणि संरक्षणाचा उल्लेख केला होता. ट्रम्प यांनी ४ जून रोजी म्हटले होते-दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचवणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या किंवा इमिग्रेशन कायद्यांचा गैरवापर करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून अमेरिकेचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मते, संपूर्ण बंदी म्हणजे त्या देशातील बहुतेक नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी आहे. यामध्ये पर्यटक व्हिसा, विद्यार्थी व्हिसा, कामाचा व्हिसा आणि स्थलांतरित व्हिसा शोधणारे लोक समाविष्ट आहेत.त्याच वेळी, आंशिक बंदी म्हणजे त्या देशातील नागरिकांसाठी विशिष्ट प्रकारचे व्हिसा किंवा प्रवेश प्रतिबंधित आहेत, परंतु इतरांसाठी नाही.म्हणजे तुम्हाला इमिग्रंट व्हिसा मिळणार नाही, पण तुम्हाला टुरिस्ट व्हिसा मिळू शकेल. विद्यार्थ्यांना परवानगी मिळेल, पण वर्क व्हिसा बंदी असेल.

४ जून रोजी ट्रम्प यांनी इतर देशांच्या नागरिकांना व्हिसा देताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, व्हिसा देताना असे लोक अमेरिकेत येऊ नयेत जे अमेरिकन लोकांना किंवा देशाच्या हिताला हानी पोहोचवू शकतात याची काळजी घेतली पाहिजे.

ट्रम्प म्हणाले…इमिग्रेशन व्हिसावर येणारे लोक कायमचे रहिवासी बनतात, म्हणून त्यांची चौकशी अधिक महत्त्वाची आणि कठीण असते. सुरक्षेचा धोका असला तरीही या लोकांना बाहेर काढणे कठीण असते. दुसरीकडे, नॉन-इमिग्रेशन व्हिसावर येणाऱ्या लोकांची चौकशी कमी होते. म्हणून, ज्या देशांची ओळख आणि माहिती सामायिकरणाशी संबंधित व्यवस्था चांगली नाही अशा देशांमधून येणाऱ्या लोकांवर बंदी घालणे आवश्यक आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१७ मध्ये प्रवास बंदी लागू केली, ज्याला मुस्लिम बंदी म्हणून संबोधले जाते, ज्यामध्ये बहुतेक मुस्लिम बहुल देशांचा समावेश होता.जानेवारी २०१७ मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, सुरुवातीच्या बंदीमध्ये ज्या सात देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती त्यात इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन यांचा समावेश होता.नंतर त्यात बदल करण्यात आले. प्रथम इराकला या यादीतून काढून टाकण्यात आले. नंतर सुदानला काढून टाकण्यात आले आणि त्याच्या जागी चाडला जोडण्यात आले. नंतर उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला सारख्या गैर-मुस्लिम देशांचाही समावेश करण्यात आला, जेणेकरून त्याला धार्मिक भेदभाव म्हणता येणार नाही.
ट्रम्प म्हणाले- दहशतवाद थांबवण्यासाठी निर्बंध आवश्यक आहेत-ट्रम्प यांनी दहशतवाद थांबवण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परदेशी सरकारांकडून सहकार्य मिळवता यावे, इमिग्रेशन कायदे लागू करता यावेत आणि राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि दहशतवादविरोधी काम पुढे नेता यावे यासाठीही हे निर्बंध आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.या आदेशात असे म्हटले आहे की अफगाणिस्तानवर तालिबान या दहशतवादी गटाचे नियंत्रण आहे आणि पासपोर्ट किंवा नागरी कागदपत्रे जारी करण्यासाठी कोणतेही सक्षम किंवा समर्थक सरकार नाही. तसेच, तेथे योग्य पडताळणी पद्धती नाहीत.आदेशानुसार, म्यानमारवरील बंदी घालण्याचे कारण म्हणजे तेथील लोक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत राहतात.अहवालानुसार, म्यानमारमधून B1/B2 व्हिसावर येणारे 27.07% लोक आणि F, M, J व्हिसावर येणारे 42.17% लोक मुदतवाढीपूर्वी वास्तव्य करून राहिले. याशिवाय, म्यानमारने अमेरिकेतून हद्दपार केलेल्या नागरिकांना परत घेण्यास सहकार्य केलेले नाही.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कृतीवर महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे आक्षेप

बासी ईदला सारसबाग खासदार मेधा कुलकर्णींच्या आदेशाने महापालिकेने ठेवली बंद

सारसबागेत मांसाहार चालणार नाही – हिदुत्ववादी संघटनांची भूमिका

पुणे- पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्या नंतर आता भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या कट्टर हिंदूत्ववादी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत . मेधा कुलकर्णी यांनी मध्यंतरी एका मशिदीतील आवाजा विरोधात उठविलेला आवाज , नंतर हडपसरच्या आमदाराने मंगळवार पेठेत एका मुस्लीम प्रर्थानास्थळातील अतिक्रमणाविषयी केलेले आंदोलन या सर्व पार्श्वभूमीवर आता अशा घटनेत बासी ईद ला सारस बाग बंद ठेवण्याच्या प्रकाराची भर पडली आहे. हिंदुत्ववादी संघटनानी सारस बागेत मांसाहार चालणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

पुण्याच्या राज्यसभा सदस्य असलेल्या खासदार यांनी दिलेल्या पत्रानुसार महापालिकेने रविवारी सारस बाग बंद ठेवल्याने महाराष्ट्र मुलीम कॉन्फरन्स ने थेट महापालिका आयुक्त यांना मुस्लीम विरोधी ठरवून त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात मुलीम कॉन्फरन्स चे हाजी फरीद खान आणि हाजी जुबेर मेमन यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे …

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम हटाव मोहीम
बासी ईद निमित्त पुणे शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने कुटुंबासमवेत सारसबागेत येत असतात दिवसभर खेळीमेच्या आणि हास्य विनोदाने वेळ घालवत असतात गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा कायम चालू होती मात्र आजच्या बासी ईदला सारसबागेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते परिणामी मुस्लिम बांधवांना सारसबागेत जाता आले नाही त्यामुळे मुस्लिम बांधवात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती प्रथमच अशा प्रकारचा अनुभव मुस्लिम बांधवांना आला पण सारसबाग बंद का आहे याबाबत नागरिकांना सकाळी समजू शकले नाही याबाबत महापालिकेशी संपर्क केला असता राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिल्याचे समजले आहे आयुक्तांनी त्या पत्राच्या आधारे आज दिनांक 8 जून रोजी सारसबाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती आजच्या दिवशी मुस्लिमच बांधवच नाही तर इतर समाजातील नागरिक ही सारसबागेत येत असतात त्यांचीही गैरसोय झाली होती नव नियुक्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बासी ईदला जाणून बुजून सारसबाग बंद ठेवून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत अशा जातीवादी महापालिका आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फेरन्सच्या वतीने घेण्यात आली असून उद्या सकाळी सोमवार दिनांक नऊ रोजी दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ आयुक्तांना हटवण्याची मागणी करणार असल्याचे महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी पत्रकार द्वारे कळविले आहे
.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या सारस बाग लक्षवेधी हिंदूंचे श्रद्धास्थान मुस्लिम लोक या ठिकाणी एकत्रिकरण करून मांसाहार करतात आणि त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होते

दरम्यान या संदर्भात भाजपच्या नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठाम भूमिका घेत महापालिका आयुक्तांना पत्र दिल्याने सारस बाग बंद ठेवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मेधा कुलकर्णी यांनी नेमके या पत्रात काय म्हटले होते ते जसेच्या तसे त्यांच्याच शब्दात …

मा. महापालिका आयुक्त, पुणे, मनपा पुणे.
विषय: सारसबागेमध्ये दिनांक 8 जून या दिवशी बाशी ईद साजरी करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली आहे. त्याविरुद्ध हिंदू संघटनांनी केलेल्या तक्रारी संदर्भात.
महोदय,
सारसबागेमध्ये श्री सि‌द्धिविनायकाचे पेशवेकालीन मंदिर असून हे लक्षावधी हिंदूंचे श्र‌द्धास्थान आहे. या मंदिराभोवती एक उ‌द्यान आहे. त्या उ‌द्यानामध्ये बकरीईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येत उपस्थित राहतो आणि सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून त्या ठिकाणी मांसाहारी भोजन करण्यासाठी डबे आणले जातात या गोष्टीमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे विविध हिंदू संघटना आक्रमक झाले असून त्यांनी 8 जूनला सारसबागेमध्ये सामाजिक एकत्रीकरणाचा उपक्रम करण्याचेही ठरवले आहे. यामुळे दोन्ही समाज समोरासमोर येऊन धार्मिक तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. हिंदू समाजाच्या या तक्रारीमध्ये तथ्य आहे असे दिसते कारण अनेक मुस्लिम लोक या ठिकाणी एकत्रिकरण करून मांसाहार करतात आणि त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होते आहे. ही गोष्ट सहन करण्यासारखी नाही.
त्यामुळे दिनांक 8 जून या दिवशी सारसबाग उ‌द्यान बंद ठेऊन फक्त मंदिरात भाविकांना जाण्याची मुभा राहिली तर संभाव्य अनुचित प्रकार टळून सार्वजनिक शांततेचे यथायोग्य पालन होईल तरी याबाबत तातडीने आदेश द्यावेत.
या दिवशी हिंदू भाविकांसाठी मात्र मंदिर खुले राहणे अत्यावश्यक आहे याची नोंद घ्यावी.
धन्यवाद.
प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी,
खासदार राज्यसभा.
मोबाइल क्रमांक 9422037306

‘देशातील वास्तव जनाधाराची’ बूज राखून फडणवीसांनी भाष्य करावे..!

देशास सक्षम ‘विरोधी पक्ष नेता’ देण्यासाठी, जनतेने काँग्रेस ला ५२ वरून १०२ जागा दिल्या..!
आयोगाच्या प्रश्नांमध्ये’ आगंतुकपणे ढवळाढवळ करण्याची माकड चेष्टा करण्याचे कारण काय..?
काँग्रेस चे सवाल..?
पुणे दि ८ जुन –
विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी निवडून आयोगा समोर (सर्व संदर्भा सह) वृत्तपत्रे माध्यमातुन उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर “भाजप’चा कोणताही संविधानीक अधिकार पोहोचत नसतांना”, मुख्यमंत्री फडणवीसां सह भाजप नेते विसंगत राजकीय विधाने व आरोप करण्याची माकडचेष्टा का करताहेत असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.
वास्तविक “निवडणूक आयोगाच्या कार्य व कर्तव्यपुर्तीवर” प्रश्न विचारले असतांना, अचानक वावटळ उठल्या प्रमाणेच, ‘निवडणूक आयोगास पाठीशी घालण्याचे, भाजप नेत्यांचे प्रयत्नच मुळात संशयावर शिक्कामोर्तब करणारे’ असुन, भाजप नेत्यांचे हे प्रकार असंविधानीक व निंदनीय प्रयत्न असल्याचे प्रतिपादन काँग्रेस’चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
आपल्या प्रसिद्धी निवेदनात ते पुढे म्हणाले की,
२०१९ च्या तुलनेत, २०२४ निवडणुकीत, काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वावर जनतेने १००% शिक्कामोर्तब करून काँग्रेसला ५२ वरून १०२ जागा बहाल केल्या व देशास सक्षम ‘विरोधी पक्ष नेता’ देण्यासाठी जनतेने काँग्रेस’ला अधिक मजबूत केले.
याच जबाबदारीच्या जाणीवेतुन, लोकशाहीच्या जपणुकीसाठी मविआ आघाडीच्या वतीने, विरोधी पक्ष नेते मा राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकी संदर्भात गंभीर मुद्दे सर्व प्रथम संसदेत उपस्थित केले. त्या नंतर मविआ नेत्यांचे सोबत पत्रकार परिषदेत ही ते उपस्थित केले. अ भा काँग्रेस’च्या जेष्ठ नेत्यांनी देखील “केंद्रीय निवडणूक आयोगाकडे” लेखी तक्रारी केल्या, राज्यातील प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते, प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री इ नी पत्रकार परीषदेत देखील वेळोवेळी उपस्थित केले. राज्यातील जाहीर नोंदणीकृत मतदार (सज्ञान लोकसंख्या) संख्ये पेक्षा झालेले मतदान जास्त कसे (?) व इतर अनेक गंभीर मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले तसेच अनेक काँग्रेस व मविआ उमेदवारांनी न्यायालयात देखील दाद मागितली आहे.
या सर्व पार्श्व भुमिवर.. कुठेही सत्य व वास्तवतेला दाद दिली जात नाही हे पाहून राहुलजी गांधींनी वृत्त माध्यमातुन हा प्रकार जनतेसमोर आणण्याचा संविधानीक कर्तव्यपुर्तीचा भाग आहे.
मात्र सदर च्या लेखात राहुल गांधींनी कुठेही सत्तापक्षाला विचारणा केली नसतांना मात्र विनाकारण निवडणूक आयोगा ऐवजी लक्ष भरकटण्याचे निंदनीय प्रकार भाजप नेते करत असल्याचे काँग्रेस ने म्हटले आहे..!

राज्यात पुणे जिल्ह्यात प्रथमच पहिल्या ‘महसूल लोक अदालत’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन

पुणे दि. ८: महसूल दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी तयार असल्यास महसूल दाव्यांची संख्या कमी होण्यासह सामंजस्याने न्याय मिळविणे सोपे होण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात उद्या सोमवार ९ जून रोजी ‘महसूल लोक अदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. या महसूल लोक अदालतीत ठेवण्यात आलेल्या ११ हजार ५८९ पैकी आतापर्यंत ६६६ प्रकरणात तडजोड झाली असून उर्वरित १० हजार ९२३ प्रकरणात तडजोडीसाठी ९ जून रोजी ठेवली आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली आहे.

महसूल प्रशासनातील मंडल अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामकाजामध्ये अनेक वेळा महसुली दावे दाखल झाल्यानंतर विविध कारणांमुळे प्रलंबित राहतात. त्यामुळे बऱ्याच वेळा पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यानंतर जेव्हा दाव्यांचे निकाल दिले जातात तेव्हा एका पक्षाचे समाधान झाले नाही तर ते वरिष्ठ न्यायालयात पुन्हा प्रतिदावे दाखल करतात. विशेषतः जमिनींशी संबंधित प्रलंबीत दाव्यांमध्ये महसुली दाव्यांचे प्रमाण मोठे असून वारंवार महसुली दावे दाखल झाल्यामुळे वर्षानुवर्षे महसुली दावे चालू राहतात. ते निकाली काढण्यासाठी या लोक अदालतीचे आयोजन सर्व मंडळ , तहसील व प्रांत कार्यालयात एकाच वेळी करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुउद्देशीय सभागृह पाचवा मजला जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे .

ही महसूल लोक अदालत मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. लोक अदालतीमध्ये मंडळ अधिकारी स्तरावर १ हजार २०१ प्रकरणे, तहसीलदार स्तरावर ५ हजार ४४३, उपविभागीय अधिकारी स्तरावर ३७६८ तर अपर जिल्हाधिकारी स्तरावर १ हजार १७७ प्रकरणे ठेवण्यात आली असून आतापर्यंत या चार स्तरावर अनुक्रमे १०७ प्रकरणे, ३४५, १७३ आणि ५१ प्रकरणामध्ये तडजोड झाली आहे. उर्वरित प्रकरणे उद्याच्या लोक अदालतीमध्ये मांडण्यात येणार आहेत.

विधी सेवा प्राधिकरण कायदा-१९८७ अन्वये स्थापन झालेली लोक अदालत ही एक पर्यायी विवाद निवारण यंत्रणा आहे. ज्यामध्ये मुख्यतः दिवाणी दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तडजोडीने मोठ्या संख्येने दावे निकाली काढले जातात. दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होऊन सदर महसुली दावे कायमस्वरूपी निकाली काढणेत यावेत, याबाबतची सर्व संबंधित पक्षकारांना महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून संधी देण्यात येणार आहे.

दीर्घकाळ चालणाऱ्या महसुली दाव्यांमध्ये तडजोड झाल्याने काही प्रमाणात अर्धन्यायिक यंत्रणेवर पडणारा ताण कमी होऊन पक्षकारांनाही समाधान मिळू शकेल. दाव्यांचा कमी कालावधीत व सहमतीने निकाल प्राप्त झाल्यामुळे वेळेची मोठी बचत होईल. या प्रकारच्या दाव्यांमध्ये फी ची आवश्यकता नसल्याने पक्षकारांवरील आर्थिक भार सुद्धा कमी होईल व सामंजस्यावर आधारित यंत्रणा असल्यामुळे न्याय मिळविणे तुलनेने सहज व सुलभ होणार आहे, अशी माहितीही श्री. मापारी यांनी दिली आहे.

भीमथडी मराठी साहित्य संमलेनाध्यक्षपदी म.भा.चव्हाण यांची निवड,महादेव जानकर संमेलनाचे उदघाटक

राज्यस्तरीय चौथे संमेलन १४ व १५ जून रोजी चौफुुला येेेेथे होणार

दौंड,ता.८ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला ( ता.दौंड ) येथे होणा-या चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमलेनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी म.भा.चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रमोद ढमाले यांची तर निमंत्रकपदी सुयश देशमुख व सह निमंत्रकपदी मोहन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष ढमाले हे गेली २० वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करीत असून, आरोग्य व शिक्षण या मूलभूत घटकात अग्रेसर काम करीत आहे.

चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दि.१४ व १५ जून २०२५ रोजी चौफुला ता.दौंड येथे होणार आहे. संमेलनाच्या संयोजन बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दीपक पवार, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे,विठ्ठल थोरात, सुशांत जगताप, अरविंद जगताप, रामभाऊ नातू, आनंदा बारवकर, अनिल गायकवाड, दत्तात्रय डाडर,कैलास शेलार,डॉ.अशोकराव जाधव, सौ .रेश्मा जाधव आदी उपस्थित होते.

भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून दौंड तालुका आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार संभाजी कुंजीर, संभाजी बिर्गेडचे प्रवक्ते संतोष शिंदे,भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक दौंड तालुकाध्यक्ष सागर फडके,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश पासलकर, तानाजी केकाण, आनंद थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस दौंड तालुका अध्यक्ष नितिन दोरगे, केशवराव जेधे फाऊंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे, भाऊसाहेब फडके, नितीन भागवत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

संमेलनाध्यक्ष म.भा.चव्हाण यांची दूरदर्शन आणि चित्रपट या माध्यमातून त्यांची गीते सर्वदूर लोकांपर्यंत पोहचलेली आहे. संगीतकार राम कदम,गजानन वाटावे,चंद्रशेखर गाडगीळ,अच्युत ठाकूर,रोशन सातारकर,भीमराव पांचाळे आदी संगीतकारांनी त्यांची गीते स्वरबद्ध केलेली आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात कविता आलेल्या आहेत. पुणे विद्यापीठात ते बहिशाल व्याख्याते आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार, मृत्युंजय स्मृती पुरस्कार,भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार आणि यु आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रेष्ठता पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. प्रेमशाळा कविता दर्शन या त्यांच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. पृथ्वीराज प्रकाशन ही संस्था गेली ४० ते वर्ष ते पाहत आहेत, त्यांची ‘धर्मशाळा’ ,’वाहवा’, ‘दुनिया’ आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

स्मार्ट पुण्यातील हिंजवडी आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा भाजपसाठी लाजीरवाणी-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पहिल्याच पावसात आय.टी पार्क असलेल्या हिंजवडी येथे रस्ते जलमय होऊन उडालेली दैना महाराष्ट्रातील भाजप सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

आय.टी पार्क क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणे, त्यांना मुलभूत नागरी सुविधा पुरविणे, यासाठी प्राधान्य देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण त्यात संपूर्णपणे कुचराई होत आहे. या कारणारे अनेक उद्योग पुण्यातून बाहेर जात आहेत. आय.टी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना पुण्यात वास्तव्य करणे अवघड झाले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी बाहेरून आणावे लागत आहे, अशा तक्रारी ऐकू येतात. महायुती सरकारचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेजण आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही भरीव काम करू शकलेले नाहीत, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कोरोना साथीच्या काळात २१साली पुणे शहरात दहा दिवसांसाठी दुसऱ्यांदा निर्बंध लागू केले होते. तेव्हा विद्यापीठ रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्यात आला. तिथे दुसरा उड्डाणपूल तातडीने उभा करण्यात पालकमंत्र्यांना साफ अपयश आले. औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी या भागातील रहिवाशांची वाहतुकीसाठी गैरसोय झाली. प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. परंतु, भाजप सरकारला त्याची फिकीर वाटली नाही. शिवाजीनगर -हिंजवडी मेट्रोचे काम संथ गतीने चालू आहे. प्रत्यक्ष कामाऐवजी भूमीपूजन आणि एकाच प्रकल्पाची वारंवार उदघाटने करणे यातच भाजपचे नेते रमले आहेत, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्याचे धोरण माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांनी आखले. त्यातूनच हैदराबाद, पुणे बंगळूर येथे आय.टी पार्क विकसित झाले. हिंजवडीतील प्रकल्पाला उत्तेजन देऊन अधिकाधिक उद्योजक पुण्याकडे यावेत याकरीता ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्य मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी अथक प्रयत्न केले. पुणे महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असताना आय.टी क्षेत्राला वाव देण्यासाठी अनेक सवलती देऊ केल्या होत्या. २०१४ साल नंतर केंद्रात आणि राज्यात भाजप चे सरकार आल्यावर पुण्यातील आय.टी क्षेत्राला गती मिळण्याऐवजी ब्रेक लागला, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

शेतीला कृषी पर्यटनाची जोड दिल्यास शेतकरी समृद्ध होईल अभिनेते मिलिंद शिंदे यांचे प्रतिपादन

परभन्ना फाउंडेशन आणि कृषी पर्यटन विश्व आयोजित परिसंवा

पुणे: “अवकाळी पाऊस, शासनाची बदलती धोरणे, पर्यावरणीय बदल यामुळे शेतीचे स्वरूप अनिश्चित होत आहे. अनेकदा शेतकऱ्यांच्या हाती निराशाच येते. त्यातून सर्वत्र हताशाचे वातावरण पहायला मिळते. मात्र, शेतीला जोडव्यवसाय म्हणून कृषी पर्यटन व्यवसाय उभा केला, तर शेतकरी समृद्ध होईल. महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी शेतीला कृषी पर्यटनाची जोड देऊन यशस्वी वाटचाल केल्याचे पाहून आनंद वाटतो,” असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी केले.

परभन्ना फाउंडेशन, कृषी पर्यटन विश्व आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान आयोजित जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त ‘महाराष्ट्र कृषी पर्यटन परिसंवाद २०२५’ कार्यक्रमात मिलिंद शिंदे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ‘शासकीय धोरणे आणि कृषी पर्यटनाचा विकास’ या विषयावर मान्यवरांनी विचार मांडले. शिंदे यांच्यासह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, जिल्हा पर्यटन अधिकारी अजिंक्य लुगडे, मुलुख फार्म्स कृषी पर्यटन केंद्राचे कृषिराज पिलाणे यांनी विचार मांडले. प्रसंगी परभन्ना फाउंडेशनचे संस्थापक गणेश चप्पलवार, मनीषा उगले, धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठानचे पंकज चव्हाण, वल्लरी प्रकाशनाचे व्यंकटेश कल्याणकर, सारंग मोकाटे, असीम त्रिभुवन, सूर्यकांत पोतुलवार, अजित मांदळे, महेश गोरे, महेश चप्पलवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

वल्लरी प्रकाशन प्रकाशित व गणेश चप्पलवार लिखित ‘कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा’ पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच सुरेश जनाबाई गोविंदराव मराठे (तिकोणा फार्म कृषी पर्यटन केंद्र), मंगल रमेश भिंगारे (रमणीय कृषी पर्यटन केंद्र), अजय मिठारे (वेदभूमी इको व्हिलेज ऍग्रो टुरिझम), कृषिभूषण बन्सी तांबे (कृषिभूषण कृषी पर्यटन केंद्र), डॉ. अमोल पुंडे (वेदकस्तुरी कृषी पर्यटन केंद्र), अनिल मगर (चित्री ऍडव्हेंचर इको अँड ऍग्री टुरिझम), मानसिंगराव वसंतराव जगदाळे (शिवांजली कृषी पर्यटन केंद्र), युवराज सांडभोर (अमलताश कृषी पर्यटन केंद्र), सरस्वती कनिफनाथ हेंद्रे (आनंदी जीवन कृषी पर्यटन केंद्र), धनश्री हेमंत गायकवाड (अंजली कृषी पर्यटन केंद्र) यांना ‘कृषी पर्यटन उद्योजकता पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. मीनाक्षी पाटील म्हणाल्या, “उपलब्ध साधनसामुग्रीच्या वापर करून शेतीला पुरक व्यवसाय कसा करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. आपणच आपला आवाज बनून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. शासनाच्या योजनांचा फायदा घेऊन कृषी पर्यटन उद्योजक वाढवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत.” कृषी पर्यटनाची ओळख महाराष्ट्राने भारताला करून दिली. कृषी पर्यटन ही केवळ संकल्पना नसून देशाला दिशा देण्याच काम सुरू असल्याचे गणेश चप्पलवार यांनी नमूद केले.

अजिंक्य लुगडे, कृषिराज पिलाणे यांनीही विचार मांडले. व्यंकटेश कल्याणकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. पंकज चव्हाण यांनी आभार मानले.

धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा थाटात

जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती 

पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय… जय भवानी, जय शिवाजी… हर हर महादेव… च्या घोषणांनी मध्य पुण्याचा परिसर दुमदुमून गेला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात प्रथमच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशात  शंभूभक्तांनी मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला. 

जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या येथून  आयोजित धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, पुणे च्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, ट्रस्टचे प्रकाश ढमढेरे, शिरीष मोहिते, पियुष विजय शहा, निलेश खाणेकर, अनिल ढमढेरे, वसंत खुटवड, हेमंत तिरळे, रोहन जाधव, शंतनू मुक्कावार, ओंकार ठाकूर आदींसह शेकडो शंभूभक्त यावेळी उपस्थित होते. 

पालखी सोहळ्यात घोडे, विविध रथ, बँड पथक, शंखनाद पथक, ढोल ताशा पथके सहभागी झाली होती.  याशिवाय दिवसभरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ऍड. हेमंत झंझाड यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. यामध्ये १८० रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. तसेच शिवकालीन शस्त्र व नाणी यांच्या प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले. 

कवींच्या आशयघन भावभावनांचा फुलला ‌‘करम बहावा‌’करम प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पुणे : ‌‘माझ्या आजीच्या गावाला मोठा चौसोपी वाडा‌’, ‌‘बंद मुठी डोळ्यासमोर नाचवत छकुली म्हणाली‌’, ‌‘माझ्या मधल्या मुक्ताईने साद घातली, माझ्या देहाची ताटी झाली‌’, ‌‘आजोबांच्या ताठ कण्याचा पाठ वाचला आहे‌’, ‌‘का तुझ्या पश्चातही इच्छा अवास्तव राहिल्या‌’, ‌‘जपत जगाला कार हाकणे नामंजूर‌’, ‌‘ती वात होऊनी जळते कणाकणाने‌’ अशा विविध आशयघन कविता, गझला, रुबाया, बाल कवितांद्वारे ‌‘करम बहावा‌’ मैफल रंगली. रसिकांची मनमुराद दाद, हशा, टाळ्या तर कधी पापण्यांच्या कडा ओलावत रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 8) सदाशिव पेठेतील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ‌‘करम बहावा‌’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिलिंद छत्रे, निरुपमा महाजन, डॉ. मंदार खरे, वैशाली माळी, भालचंद्र कुलकर्णी, शिवाजी सुतार, योगेश काळे, राहुल कुलकर्णी या करम प्रतिष्ठानच्या नामवंत कवी, कवयित्रींचा सहभाग होता.

प्रास्ताविकात करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर यांनी ‌‘करम बहावा‌’ या कार्यक्रमाची संकल्पना विशद केली. तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांविषयी अवगत केले. ‌‘शेर गुंफायची प्रेरणा देऊनी एक मिसरा तरी ऐकला पाहिजे‌’ हा शेर सादर केला. ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन यांची उपस्थिती होती.

‌‘बाबा माझ्या वाढदिवशी विमान आणा भारी‌’, ‌‘पूर्वी शब्द स्फूरायचे उसळून यावी जशी लाट‌’ या सादरीकरणातून कल्पक लहान मुलाने वडिलांकडे केलेला हट्ट तसेच पुरुषांची अंर्तमुखता मांडण्यात आली. ‌‘दोष व्यथेचा सांग‌’, ‌‘देव थाटला आहे ज्यांनी दगडा दगडांमध्ये‌’, ‌‘साळसुदांच्या सभेत मन अवघडले आहे‌’, ‌‘आज का तक्रार तुमची मी न काही बोलतो‌’, ‌‘मी माझा आसरा शोधला आहे‌’ या रचनांमधून प्रेम, विरह, सामाजिक वास्तव यांवर भाष्य केले गेले.

‌‘सागराला भेटायला नदी दूर दूर जाते, संगमाच्या क्षणी मात्र तिची घालमेल होते‌’ या अष्टाक्षरीतून घडलेल्या नवविवाहित स्त्रीच्या मानसिक आंदोलनांचे यथार्थ वर्णन रसिकांना भावले. ‌‘कुणीच नसते आईनंतर, बाल्य संपते आईनंतर‌’ या कवितेच्या सादरीकरणाने रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

देशासाठी लढणारे सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यातील भावनोत्कटता दर्शविणारे ‌‘धो धो कोसळणाऱ्या या पावसात तो बोलत राहिला रात्रभर तिच्याशी अखंड‌’ हे काव्य रसिकांना विशेष भावले.

ग. दि. माडगुळकर, सुरेश भट, रॉय किणीकर यांच्या जीवनप्रवासातील काही बोलके किस्सेही या प्रसंगी उलगडले गेले. कार्यक्रमाची सांगता ‌‘दुर्लभ हा देह फुकाचा मिळाला, मज चांडाळाला चाड नाही‌’ या आशयपूर्ण अभंगाने करण्यात आली.

युद्धभूमीवरील अनुभव कथन

लेफ्टनंट कर्नल चारुदत्त रानडे यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनुभव कथन केले. भारतीय सैन्याची ताकद, राजनैतिक धोरण, कूटनीती, नवीन तंत्रज्ञान, विविध कार्यप्रणाली, राष्ट्रीय आपत्ती समयी दिसलेली राष्ट्रीय एकता, दळणवळणाच्या सोयी, सुव्यवस्था ठेवण्यासाठी केलेले उपाय, देशवासियांना सामाजिक अस्थिरतेपासून दिलेले संरक्षण यांविषयी त्यांनी सविस्तर कथन केले. युद्ध प्रसंगी सैन्यदलाचा शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस लागलो. कुटुंबियांची भक्कम साथ, त्यांचे मानसिक स्थैर्य आणि धीर यांच्या आधारे आम्ही एकाग्रतेने कार्य करू शकतो, असे रानडे यांनी अभिमानाने सांगितले. दीप्ती रानडे यांची विशेष उपस्थिती होती.

कवींचा परिचय मुक्ता भुजबले, वासंती वैद्य यांनी करून दिला तर वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार भूषण कटककर यांनी मानले.

कार्यक्रमाचे यशापयश निवेदकावर अवलंबून,निवेदन ही 66वी कला : डॉ.सदानंद मोरे

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे स्नेहल दामले यांचा उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने गौरव

पुणे : सार्वजनिक कार्यक्रमांमधील निवेदक-सूत्रसंचालक हा महत्त्वाचा घटक असून निवेदकाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालेले आहे. निवेदन ही सुद्धा कला असून कार्यक्रमाचे यशापयश निवेदकावर अवलंबून असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिवंगत कवी, निवेदक उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांचा आज (दि. 8) गौरव करण्यात आला. पुरस्कराचे वितरण डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी संस्थेच्या 33 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.

रंगत-संगत प्रतिष्ठानच्या 33 वर्षांच्या वाटचालीचा आणि उद्धव कानडे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून डॉ. मोरे पुढे म्हणाले, पुरस्कार वितरण सोहळा औचित्यपूर्ण आहे. 14 विद्या आणि 64 कला असे पूर्वी म्हटले जायचे. आधुनिक काळात जाहिरात ही सुद्धा कला मानली जाऊ लागली. आजच्या काळात निवेदक-निवेदनाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले असल्याने निवेदन ही 66वी कला आहे.

डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, निवेदन ही सुंदर कला असून आशयपूर्ण निवेदन रसिकांच्या मनापर्यंत पोहोचते आणि कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त होते. सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम हा चंगळवाद नाही तर अशा कार्यक्रमांद्वारे होणाऱ्या वैचारिक अदानप्रदानातून प्रगल्भता येते. अंतरीचा ज्वर शांत होण्यासाठी कार्यक्रम उपयुक्त ठरतात, असेही त्या म्हणाल्या.

सत्काराला उत्तर देताना स्नेहल दामले म्हणाल्या, प्रसिद्ध निवेदक, कवी उद्धव कानडे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने आनंदाची धनी झाल्याची भावना आहे. शून्यातून सुरू केलेल्या वाटचालीत कुटुंबिय, मित्र, संयोजक आणि रसिक यांचा मोठा वाटा आहे. सुहृदांनी गुण-दोषांसकट स्वीकार केला याचा सात्विक अभिमान आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात प्रभा सोनवणे, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, स्वाती दाढे, डॉ. मिलिंद शेंडे, चंचल काळे, सचिन हनमघर, विनायक अनिखिंडी, केतकी देशपांडे, सुजाता पवार यांचा सहभाग असणार होता. अंजली कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या. ऋचा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

पावसाळी अधिवेशनात विधान भवनाला घेराव घालण्याची राहुल डंबाळे यांची घोषणा

देशभरातील एसआरए सारख्या योजनांचा पुनर्विचार व्हावा यासाठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी चर्चा करणार – अॅड. असीम सरोदे

रिपब्लिकन युवा मोर्चा आयोजित झोपडपट्टी अधिकार परिषद संपन्न

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन कायदा म्हणजे एसआरए ने महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे. अतिश्रीमंत बिल्डरला अधिक श्रीमंत करण्याची योजना म्हणजे एसआरए स्किम ठरत आहेत. कोथरूड भागात काही नेत्यांना भीमनगर नको आहे मात्र हा केवळ घरांचा नाही तर मूलभूत हक्काचा विषय आहे. पुणे किंवा महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील शहरांमध्ये गरिबांना विस्थापित  करुन श्रीमंतांना घरे देणाऱ्या एसआरए सारख्या योजनांचा पुनर्विचार व्हावा यासाठी देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी देशभरातील प्रकल्पाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी रविवारी दिली. 

रिपब्लिकन युवा मोर्चा आयोजित झोपडपट्टी अधिकार परिषदेमध्ये अॅड. असीम सरोदे बोलत होते. यावेळी रिपब्लिकन मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, एस.आर.ए. संघर्स समितीचे देवीदास ओव्हाळ, जावेद शेख, अॅड. बाळकृष्ण निराळकर, सागर किरण सोनवणे, राहुल नागटिळक, सिकंदर मुलाणी  आदि मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना अॅड. सरोदे म्हणाले, गरिबांचे हक्क गुंडाळून ठेवण्याचे काम अलीकडे वाढले आहे. नेत्यांना फक्त मतदानाच्या वेळी झोपडपट्टी आठवते. एसआरए मध्ये नसलेले विभाग सुद्धा त्यात दाखवण्याचे काम सुरू आहे, यामागे बिल्डर आणि अधिकारी यांचे संगनमत असल्याचे वारंवार समोर येत आहे, तरीही शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. भीमनगरच्या मुद्द्यावर प्रशासकीय अधिकारी, पोलिस प्रशासन आणि सर्व संबंधितांची जनसुनावणी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

झोपडपट्टी अधिकार परिषदेचे अध्यक्ष राहुल डंबाळे म्हणाले, भीमनगर प्रकरणांमध्ये बिल्डरने फक्त झोपडपट्टी वासीयांची नव्हे तर एसआरए ची सुद्धा फसवणूक केलेली आहे. ही बाब बिल्डर, एसआरए अधिकारी आणि पोलिस  यांच्यातील भ्रष्ट युटीशिवाय शक्य नाही. गरिबांच्या मुळावर उठलेल्या लोकांना मुळासकट फेकून देण्याची वेळ आली आहे. भीमनगर सह अन्य एसआरए प्रकल्पातील भ्रष्ट्राचारच्या  मुद्द्यावर राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात विधान भवनाला घेराव घालण्याची घोषणा डंबाळे यांनी यावेळी केली. 

याप्रसंगी भीमनगर वासीयांच्या वतीने जावेद शेख, सचिन डमरे, सागर सपकाळ यांच्यासह शहरातील अन्य भागातील प्रतिनिधींनीही आपल्या समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल नागटिळक यांनी केले, जावेद शेख यांनी आभार मानले. 

झोपडपट्टी अधिकार परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेले ठराव पुढीलप्रमाणे –

१.  एरंडवणे येथील भीमनगर एसआरए प्रकल्प रद्द करण्यात यावा.

२. एसआरए मध्ये झोपडपट्टी धारकांच्या संमतीची अट पूर्वीप्रमाणे ७० टक्के करण्यात यावी.

३. झोपडपट्टी धारकांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी.

४. झोपडपट्टी धारकांवर अन्याय करणाऱ्या विकसकांना सहयोग करणाऱ्या भ्रष्टाचारी एसआरए अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

५. एसआरए मधील तक्रार निवारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण कक्ष स्थापन करून त्याच्या त्रैमासिक बैठका घेण्यात यावी.