पुणे -यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. ‘लडेंगे और जितेंगे’, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याचा निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काही घोषणा किंवा संकेत देतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, सुळे यांनी आपण महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच पुढे जाणार असल्याचे सांगितले. तसेच स्वत:वर विश्वास ठेवला तर एक दिवस आपण नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि गेल्या 26 वर्षांची वाटचाल, ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने झालेली आहे. यासोबत संघर्ष हा येतच असतो. मात्र त्यामुळे निराश होण्याची आवश्यकता नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आठ खासदारांची संसदेत दखल घेतली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दखल घेतल्याशिवाय देशातील एकही महत्त्वाचा निर्णय पूर्ण होत नसल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करावी, ही मागणी आम्ही राजकारणासाठी करत नाही. तर राज्यातली परिस्थिती तशी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. गरिबांचे आणि अनाथ मुलांचे पैसे देखील आज त्यांना मिळत नाहीत. अनेक योजना बंद होण्याची वेळ आली आहे. लाडक्या बहिणींचे नावे यादीतून काढली जात असल्याचा आरोप देखील सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्याचे संकेत देखील या वेळी दिले आहेत. पक्षांतर्गत बैठका, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. इतकेच नाही तर पुढच्या महिन्यापासून मी स्वतः राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असल्याचे त्या म्हणाल्या. आज पासून पूर्ण ताकतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व सामाजिक प्रश्नासाठी पेटून उठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘लडेंगे और जितेंगे’ म्हणत अजित पवारांसोबत जाणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांचे स्पष्ट संकेत
Date: