Home Blog Page 49

खरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई करा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

▪️एल-निनोची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचन

पुणे, दि. १५ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. बोगस बियाणे व खतांच्या तक्रारींवर गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत धडक कारवाई करण्याचे आदेश देतानाच ‘एल-निनो’ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे खरीप हंगाम आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार नीलमताई गोऱ्हे, दिलीप वळसे पाटील, शरद सोनवणे, राहुल कुल, विजय शिवतारे, शंकर जगताप, सुनील शेळके, बाबासाहेब काळे, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडेकर आणि भीमराव तापकीर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रत्यक्ष बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री म्हणाल्या, खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कृषी विभागाने निविष्ठा पुरवठा व वितरण प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात यावी. नैसर्गिक शेतीचा प्रसार वाढवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावी जनजागृती व मार्गदर्शन करावे. यंदा ‘एल-निनो’च्या संभाव्य परिणामांचा विचार करून शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत आवश्यक बदल करावेत, असेही त्यांनी सांगितले.

महिला शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर ‘ड्रोन दीदी’ योजनेप्रमाणे ड्रोन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगून एकल महिला शेतकऱ्यांना विविध योजनांमध्ये प्राधान्याने सवलती देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील सुधारणांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कडधान्ये, डाळिंब, पेरू, द्राक्ष यांसह विविध पिकांचे नियोजन वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी ऍग्री स्टॅक प्रणालीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात शेती अधिक निर्यातक्षम व व्यावसायिक बनवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खरीप हंगामाच्या तयारीचे सादरीकरण केले. यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एमएसपी व एनपीके खतांची पुरेशी उपलब्धता असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यासाठी १ लाख ९४ हजार ५०० मेट्रिक टन खत मंजूर असून, १४ मेअखेर ७६ हजार ७६९ मेट्रिक टन खत उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

खत पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सर्व खत उत्पादक व वाहतूकदारांची समन्वय बैठक घेण्यात आली. वस्तुनिष्ठ उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी दि. १ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत विशेष साठा पडताळणी मोहीम राबविण्यात आली. पॉस प्रणाली व प्रत्यक्ष साठा तपासणीत विसंगती आढळून सुमारे ५ हजार मेट्रिक टन काल्पनिक साठा कमी करण्यात आला.

पॉस प्रणालीवरील साठा अद्ययावत न ठेवणाऱ्या १७ वितरकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पॉस प्रणाली हाताळणी, अभिलेख अद्ययावत ठेवणे आदी विषयांवर वितरकांना प्रशिक्षण देण्यात आले. खत विक्रीत लिंकिंगला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक दुकानात जनजागृती फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निरीक्षकनिहाय खत नमुने घेण्याचे नियोजन तयार करण्यात आले असून रेक पॉईंटनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करून पुरवठ्यावर देखरेख वाढविण्यात आली आहे. खत साठा, वितरण व उपलब्धतेवर नियमित नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेऊन यंदाच्या खरीप हंगामात अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जनगणना प्रशिक्षणास गैरहजर ७ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. १५ : भारत शासनाच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषद क्षेत्रात जनगणना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वॉलनट स्कूल, फुरसुंगी येथील ७ शिक्षक व सपोर्ट स्टाफ सदस्यांनी प्रशिक्षणास गैरहजर राहून जनगणना कामकाज करण्यास नकार दिल्याची तक्रार फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.

कर अधिकारी आबासो दादासो मुढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नगर परिषद क्षेत्रातील १६ वॉर्डांमध्ये २८४ घरगट तयार करण्यात आले असून जनगणना कामकाजासाठी २८४ प्रगणक व ४२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार २३ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषद कार्यालयात जनगणना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षणासाठी वॉलनट स्कूल येथील प्रणिता सिन्हा, अश्विनी देवरे, इपशिता मोहंती, श्रद्धा तमशेट्टी, मनिषा हतागळे, उज्वला लोंढे व शशिकला सिद्धे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र संबंधितांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता प्रशिक्षणास गैरहजर राहत जनगणना कामात अडथळा निर्माण केला तसेच नेमून दिलेले काम करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, हवेली यांनी दिलेल्या आदेशान्वये संबंधितांविरुद्ध जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्याबाबत प्राधिकृत करण्यात आले असून पुढील कार्यवाही फुरसुंगी पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.
00000

दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा सुरू करा!- ना. पाटील

0

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोथरुड येथील निवासस्थानी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत काटकसरीचा आदर्श घालून दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला.

या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वेळेची बचत आणि अनावश्यक प्रशासकीय खर्च टाळता येतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. या बैठकीत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सूचना मांडल्या.

नुकत्याच घडलेल्या नसरापूर येथील दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत, ना. पाटील यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला. दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून विशेष बससेवा सुरू करावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली.

नसरापूर सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच विकृत मानसिकता असलेल्या संशयित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल का, यावर पोलीस प्रशासनाने तातडीने विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कम्पाऊंड वॉल (संरक्षक भिंत) उभारण्यात यावी. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र ‘बचत गट मॉल’ उभारण्यात यावा. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये हक्काची व सुसज्ज स्मशानभूमी असावी, अशा महत्वपूर्ण सूचना ही त्यांनी यावेळी केल्या.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या डिजिटल सहभागामुळे आणि महत्त्वपूर्ण सूचनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देतानाच, शासकीय संसाधनांचा योग्य व काटकसरीने वापर करण्याचा एक सकारात्मक संदेश प्रशासनाला मिळाला आहे.

‘सुमिरन’च्या पहिल्याच प्रयोगाने कोथरुडकर मंत्रमुग्ध!

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून साकारली भक्तिसंगीताची अविस्मरणीय संध्याकाळ

कोथरूड : मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण ऑडिटोरियममध्ये गुरुवारी संध्याकाळी सुरांचे एक अद्भुत विश्व अवतरले होते. उपस्थित प्रत्येक रसिकाला मंत्रमुग्ध आणि भावविवश करणारी ही मैफल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे लोकप्रिय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. देवगांवकर फाऊंडेशन संयोजनातून ‘सुमिरन’ या पहिल्याच भावगीत आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवले.

आजच्या धावपळीच्या, डिजिटल आणि यांत्रिक जीवनशैलीत भावगीत आणि भक्तिगीतांची मैफल म्हणजे जणू वाळवंटात सापडलेला गोड झरा! कलाप्रेमी आणि सुजाण कोथरूडकरांच्या मनातील सुरांचा हा आनंद कायम फुलत राहावा, या संवेदनशील विचारातून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून हा विनामूल्य सुरांचा नजराणा रसिकांसाठी खुला करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, राजकारणातील व्यस्त दिनचर्या बाजूला ठेवत स्वतः चंद्रकांतदादा पाटील संपूर्ण वेळ कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. सर्वसामान्य रसिकांमध्ये बसून एका खऱ्या कलारसिकाप्रमाणे ते भक्तिरसात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलली.

सुप्रसिद्ध गायक अमोल निसळ यांच्या भावपूर्ण गायकीने, बासरीवादक अमर ओक यांच्या बासरीतून उमटणाऱ्या दैवी सुरांनी आणि युवा गायक करण देवगांवकर यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. दादांनीही कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटात मनापासून दाद दिली.

अमर ओक यांच्या बासरीच्या प्रत्येक सुरासोबत जणू रसिकांच्या मनातील जुन्या आठवणी, सुख-दुःख आणि ईश्वराविषयीची आत्मीय भावना जागृत होत होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक रसिक तृप्त मनाने आणि आनंदाची अविस्मरणीय शिदोरी सोबत घेऊन घरी परतला.

“पोटाची भूक भागल्यानंतर मनाची भूक निर्माण होते आणि अशा सांस्कृतिक उपक्रमांमधून ती भूक योग्य रीतीने भागवली जाते. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विविध अडचणींमुळे अनेकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत नाही. अशा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत,” असे प्रतिपादन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्ता मानकांसाठी ‘बीव्हीजी’च्या सहकार्याने देशातील पहिलाच मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

0

पुणे, दि. १५ मे २०२६ : भारत सरकारच्या आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषद आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका सेवा मानांकन निकषांनुसार देशातील पहिलाच “मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम” पुण्यात यशस्वीरित्या संपन्न झाला. १३ ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण उपक्रमात देशभरातील तज्ज्ञ, प्रशिक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

देशभरातील रुग्णवाहिका सेवांची गुणवत्ता अधिक सक्षम, परिणामकारक आणि रुग्णकेंद्री करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून प्रशिक्षित आणि प्रमाणित मूल्यांकनकर्त्यांची फळी तयार करण्यात आली असून, हे मूल्यांकनकर्ते देशातील विविध रुग्णवाहिका सेवांचे परीक्षण करून उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुख्य अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. प्रसाद राजहंस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपत्कालीन आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता, रुग्ण सुरक्षितता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्त्व अधोरेखित करत अशा संरचित प्रशिक्षण कार्यक्रमांची गरज स्पष्ट केली. प्रशिक्षित मूल्यांकनकर्त्यांमुळे रुग्णवाहिका सेवांचा दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भारत सरकारच्या हेल्थ सेक्टर स्किल कौन्सिल (HSSC) रुग्णवाहिका सेवा प्रदाता मानांकन निकष समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये व्यवहार्य, संवेदनशील आणि परिस्थितीनुरूप मूल्यांकन प्रणालीची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. गुणवत्ता हमी, सातत्यपूर्ण सुधारणा आणि कार्यक्षम प्रतिसाद व्यवस्थेसाठी प्रशिक्षित मूल्यांकनकर्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन दिवसांच्या सत्रांमध्ये रुग्णालयपूर्व आरोग्य सेवांमधील मानकीकरण, कौशल्य विकास, गुणवत्ता सुधारणा, मूल्यांकन प्रक्रिया आणि क्षमता वृद्धी या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. देशातील रुग्णवाहिका आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेमध्ये गुणवत्ता हमी यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकास, मानकीकरण आणि गुणवत्ता हमी अधिक सक्षम करण्यासाठी ‘बीव्हीजी’ सातत्याने कार्यरत असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे देशातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला.

पुणे महापालिकेतील कथित ‘बोगस भरती’ आणि आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हा दाखल करा.

पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या 2022 मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीत नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टी यांच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले होते
आम आदमी पार्टीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुणे महानगरपालिकेतील काही विभागांत नोकरी देण्याच्या नावाखाली बोगस भरती आणि आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. राजेंद्र बबनराव खेडेकर, नमिता बनसोडे, शिवानंद बाळासाहेब पाटील यांच्या टोळीने संगनमताने उमेदवारांकडून प्रत्येकी 45 लाख रुपये उकळले असून, त्यांना बनावट नियुक्ती आदेश आणि प्रशिक्षण आदेश दिले आहेत.या सर्व गैरव्यवहारात प्रशासकीय नावाचा गैरवापर या फसवणुकीत पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि सह्यांचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत.बेरोजगार तरूण नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक तरुणांची मोठी आर्थिक फसवणूक झाली असून, प्रशासनावरील लोकांचा विश्वास डळमळीत होत आहे.
निष्पक्ष चौकशीची मागणी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग तपासावा ? या घोटाळ्यात महापालिकेतील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी आम्ही करत आहोत.
या प्रकरणी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे गंभीर प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून देऊन या प्रकरणात आपण लक्ष घालून SIT मार्फत चौकशी करण्याची विनंती करणार आहे.

“हा केवळ आर्थिक गुन्हा नसून प्रशासकीय व्यवस्थेचा गैरवापर करून तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक होणे गरजेचे आहे.”
— रविराज बबन काळे (प्रदेशाध्यक्ष ,युवा आघाडी आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्य)

भारत-UAE मध्ये LPG पुरवठ्याचा करार:राष्ट्रपती अल नाहयान यांच्यासोबत बैठकीत निर्णय

दुबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्याचा भाग म्हणून अबू धाबी येथे दाखल झाले. अबू धाबीमध्ये आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत करण्यात आले. वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलाच्या एफ-१६ लढाऊ विमानांनी पंतप्रधानांच्या विमानाला संरक्षण दिले.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. एलपीजी पुरवठ्याबाबत दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वाचा करार झाला. सामरिक पेट्रोलियम साठे, संरक्षण सहकार्य आणि वडीनार येथील जहाज दुरुस्ती क्लस्टरबाबतही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

संयुक्त अरब अमिरातीने भारतीय पायाभूत सुविधा, आरबीएल बँक आणि सन्मान कॅपिटलमध्ये ५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली.

पीएमआरडीए’ गृहयोजना : ३९९ विजेत्यांनी स्वीकारल्या सदनिका

  • पेठ क्रमांक १२ व ३०-३२ मधील १,०२९ सदनिकांच्या सोडतीनंतर पुढील कार्यवाही सुरू!
  • ४,२६३ अर्जदारांना १५ दिवसांत मिळणार अनामत रकमेचा परतावा!
  • ‘पीएमआरडीए’ गृहयोजना अंतिम टप्प्यात; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरच संधी!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ मधील शिल्लक १,०२९ सदनिकांसाठी काढलेल्या गृहयोजनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या सोडतीतील सदनिका नाकारलेल्या व सोडतीत अयशस्वी ठरलेल्या एकूण ४,२६३ अर्जदारांची अनामत रक्कम पुढील १५ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार असल्याची माहिती ‘पीएमआरडीए’कडून देण्यात आली आहे. दरम्यान, ३९९ विजेत्यांनी सदनिका स्वीकारल्या असून, ज्या लाभार्थ्यांनी सदनिका नाकारल्या आहेत, त्या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील (Waiting List) अर्जदारांना लवकरच संधी देण्यात येणार आहे.

‘पीएमआरडीए’ने ८ एप्रिल २०२६ रोजी या १,०२९ सदनिकांची सोडत जाहीर केली होती. यामध्ये ८७१ लाभार्थी पात्र ठरले होते. या लाभार्थ्यांना सदनिका स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी सुरुवातीला ११ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी कोणताही पर्याय निवडला नसल्याने जमीन व मालमत्ता विभागाने ही मुदत २४ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवली होती. एकूण ८७१ विजेत्यांपैकी ३९९ लाभार्थ्यांनी सदनिका स्वीकारल्या आहेत.

दरम्यान, ‘पीएमआरडीए’ने पारदर्शकतेवर भर देत परताव्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. जे अर्जदार सोडतीत अयशस्वी ठरले आहेत किंवा ज्यांनी सदनिका नाकारली आहे, अशा अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा दिला जाणार आहे :

एकूण अर्जदार : ५,३१७
सोडतीत यशस्वी अर्जदार : ८७१
प्रतीक्षा यादीतील अर्जदार : ६५५
सदनिका नाकारणारे अर्जदार : ४७२

सदनिका स्वीकारणारे अर्जदार : ३९९
या सर्व अर्जदारांच्या अर्जासोबत जोडलेल्या बँक खात्यांमध्ये १५ दिवसांच्याआत अनामत रक्कम जमा केली जाईल, असे ‘पीएमआरडीए’ने स्पष्ट केले आहे. ज्या लाभार्थ्यांनी सदनिका नाकारल्या आहेत, त्या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील (Waiting List) अर्जदारांना संधी दिली जाणार आहे. मात्र, ही प्रक्रिया सर्व ४,२६३ अर्जदारांना त्यांची अनामत रक्कम परत केल्यानंतरच सुरू केली जाईल. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरच स्वप्नातील घर साकारण्याची संधी मिळणार आहे.

“सोडतीमधील पारदर्शकता आणि लाभार्थ्यांची सोय लक्षात घेऊन आम्ही अनामत रकमेची परतावा प्रक्रिया तातडीने राबवत आहोत. १५ दिवसांत पैसे संबंधितांच्या खात्यात जमा होतील. तसेच, प्रतीक्षा यादीनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.”

पूनम मेहता, सहआयुक्त, जमीन व मालमत्ता विभाग, पीएमआरडीए

महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत जनगणना-2027 साठी घरयादी आणि गृहगणना मोहीम राबवणार

मुंबई, 14 मे 2026

‘जनगणना-2027’ अंतर्गत 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घरयादी आणि गृहगणना राज्यभरात राबवली जाईल, असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे. या वेळापत्रकाची अधिसूचना 26 फेब्रुवारी 2026 च्या अधिकृत राजपत्रात काढण्यात आली आहे.

भारत सरकारने निर्धारित केलेल्या 33 प्रश्नांची राज्य सरकारने पुन्हा अधिसूचना काढली आहे. हे प्रश्न या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेत विचारले जातील. जनगणनेअंतर्गत प्रगणक  प्रत्येक घराला भेट देतील आणि त्यांच्या अधिकृत मोबाईल उपकरणांवर इन्स्टॉल केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे घरांची स्थिती, घरातील सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित माहिती गोळा करतील.

ज्या नागरिकांनी आपल्या घरांसाठी स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी प्रगणकांच्या भेटीदरम्यान पडताळणी सुलभ व्हावी आणि प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण व्हावी यासाठी आपला ‘स्व-गणना ओळख क्रमांक’ प्रगणकांना द्यावा.

प्रत्येक उत्तरदात्याला त्यांच्या माहितीनुसार किंवा समजुतीनुसार अधिसूचित प्रश्नांची उत्तरे देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. ‘जनगणना कायदा, 1948’ च्या कलम 8 नुसार जनगणना अधिकाऱ्यांना अशी माहिती मागण्याचा अधिकार आणि उत्तरदात्यांना अचूक माहिती देण्याची सक्ती आहे.

जनगणनेदरम्यान गोळा केलेली सर्व वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती ‘जनगणना कायदा, 1948’ च्या कलम 15 अंतर्गत अत्यंत गोपनीय ठेवली जाईल अशी हमी राज्य सरकारने नागरिकांना दिली आहे. ही माहिती कोणत्याही न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही आणि तिचा वापर केवळ सांख्यिकीय आणि विकासात्मक उद्देशांसाठीच केला जाईल.

‘जनगणना-2027’ मध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे आणि या महत्त्वाच्या राष्ट्रीय मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी क्षेत्रीय भेटींदरम्यान जनगणना अधिकाऱ्यांना पूर्ण आणि अचूक माहिती देऊन संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र सरकारने 9 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या राजपत्रित अधिसूचनेद्वारे नागरिकांना केले आहे.

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे! पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरु

मुंबई, दि. १४ मे २०२६: पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमिवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरणने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरु केला आहे. दरम्यान सर्व संचालकांसाठी गुरूवारी (दि. १४) नवीन विद्युत वाहने उपलब्ध झाले असून या ईव्ही वाहनांचा वापर देखील सुरु करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या विद्युत वाहन धोरण २०२५ ला अनुसरून महावितरणने पेट्रोल व डिझेल वाहनांऐवजी विद्युत वाहनांना प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात महावितरणच्या मुख्य व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी विद्युत वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी विद्युत वाहनांचा याआधीच वापर सुरु केला आहे. गेल्या आठवड्याभरात आणखी १० विद्युत वाहने महावितरणच्या ताफ्यात दाखल झाले. या विद्युत वाहनांचा प्रादेशिक विभागांचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सर्व कार्यकारी संचालकांनी नुकताच वापर सुरु केला आहे.

दरम्यान मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उर्वरित विद्युत वाहनांच्या उपलब्धतेसाठी महावितरणकडून विशेष पाठपुरावा करण्यात आला. ही वाहने गुरुवारी (दि. १४) उपलब्ध झाली. त्यानंतर संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांनी देखील तात्काळ या विद्युत वाहनांचा वापर सुरु केला आहे. 

महावितरण अंतर्गत सर्व मुख्य अभियंता तसेच क्षेत्रीय अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागप्रमुख अभियंता यांच्या कार्यालयात देखील पेट्रोल किंवा डिझेलऐवजी फक्त विद्युत वाहनांचा वापर होईल याबाबतच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.

हडपसर, मुंढवा, वानवडीचा वीजपुरवठा विस्कळीत

नांदेडसिटी, पर्वती, कोथरुड, बाणेर, औंध भागालाही बसला फटका

पुणे, दि. १४ मे, २०२६ : महापारेषण कंपनीच्या थेऊर ते मगरपट्टा या २२० केव्ही अतिउच्चदाब वाहिनीत आज (दि. १४) दुपारी १.२० च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने हडपसर, मुंढवा, कॅम्प व वानवडीसह परिसरातील वीज ग्राहकांना याचा फटका बसला असून, जवळपास ५० मेगावॅटचे भार व्यवस्थापन कंपन्यांना करावे लागले आहे.

मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची नियोजित कामे करण्यासाठी महावितरण व महापारेषण या दोन्ही कंपन्यांनी गुरुवारी (दि. १४) सकाळी ७ ते १२ या वेळेत वीजपुरवठा बंद केला होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास कामे पूर्ण करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र काही वेळाने दुपारी १.२० वाजता महापारेषणच्या थेऊर ते मगरपट्टा २२० केव्ही अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड झाला आणि वीजपुरवठ्याचे गणित बिघडले.

उन्हाचा पारा वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली असून, बहुतांश वाहिन्या अतिभारीत झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यास मर्यादा येत आहेत. अशा परिस्थितीत सूक्ष्म नियोजन करुन बऱ्याच भागाचा वीजपुरवठा पर्यायी माध्यमातून सुरळीत करण्यात आला. महापारेषणच्या एनसीएल, कोथरुड व पर्वती या अतिउच्चदाब उपकेंद्रांनाही काही प्रमाणात भार व्यवस्थापन करावे लागले. त्यामुळे नांदेडसिटी, पर्वती, कोथरुड, औंध, बाणेर या भागाच्या वीजपुरवठ्यावर दुपारी परिणाम झाला होता.

रात्री ८ पर्यंत बाधित झालेल्या थेऊर ते मगरपट्टा या २२० केव्ही वाहिनीचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतरच महापारेषणकडून वीजपुरवठा पूर्ववत होईल. दरम्यान आपत्कालिन परिस्थितीत वीज ग्राहकांनी संयम बाळगून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

मुंबई, दि १४ : भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

  • बीएलओच्या प्रत्यक्ष घरांना भेटी
    महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (BLO)नियुक्त करण्यात येणार आहे. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले ‘बूथ लेव्हल एजंट्स’ (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.

जनगणनेच्या कामाशी सांगड
सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल.

महाराष्ट्रासाठीचे महत्त्वाचे वेळापत्रक:
दिनांक २० ते २९ जून २०२६ या कालावधील बीएलओ यांना प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येतील. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येतील आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिद्ध करण्यात येईल.

राजकीय पक्षांना आवाहन
भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले एजंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.

पुण्याच्या विभागीय आयुक्तपदावर शीतल तेली-उगले

0

पुणे- क्रीडा व युवक सेवा आयुक्त शितल तेली-उगले यांची शासनाने बदली केली असून, त्यांची नियुक्ती विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे या पदावर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या जागी केली आहे. क्रीडा व युवक सेवा आयुक्त पदावर दिपक सिंगला, यांची नियुक्ती केली आहे.तर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारयांची नियुक्ती सचिव (ग्रामविकास व पंचायत राज), ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई या रिक्त पदावर ते पद अधिकालिक वेतन श्रेणीत अवनत करून केली आहे.

शीतल उगले -तेली यांनी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर काम केलेलं आहे. त्यांच्या काळात त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात आपल्या गतिशील आणि बेधडक कामाची लक्षणीय झलक दाखवून दिली होती.

शहरात प्राणी उपचार केंद्र,पाळीव प्राण्यांसाठी गार्डन संकल्पना राबवा

0

महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवून ,तीन शिफ्टमध्ये नेमणुका करा

समान पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करा .

महापौरांनी घेतली महापालिकेच्या विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा बैठक

पुणे : शहरातील नागरिकांना अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी दुपारी ३.०० वा. महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीस अति. महापालिका आयुक्त पवनीत कौर, अतिक्रमण विभागाचे सोमनाथ बनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) नंदकिशोर जगताप, उपआयुक्त (सुरक्षा) आशा राऊत, मुख्य अभियंता (ड्रेनेज) जगदीश खानोरे तसेच आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे उपस्थित होत्या.

बैठकीदरम्यान विविध विभागांकडील अंदाजपत्रक तरतूद, सुरू असलेली विकासकामे व नागरिकाभिमुख सेवा यांचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनास खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण सूचना दिल्या:

🔹 समान पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी गती द्यावी.
🔹 मेट्रो कामांमुळे दांडेकर पूल ते सिंहगड रस्ता जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान पाईपलाईन स्थलांतरासाठी वाहतूक शाखेकडून तातडीने परवानगी मिळवावी.
🔹 मनपा इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवून जलसंधारणाला चालना द्यावी.
🔹 सांडपाणी थेट नदीत न सोडता ते एसटीपी प्रकल्पांपर्यंत पाईपलाईनद्वारे वळविण्याची कार्यवाही करावी.
🔹 तलावातील गाळ काढण्याची कामे महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फतच प्रभावीपणे राबवावीत.
🔹 शहरात नवीन टँकर पॉईंटसाठी जागा ताब्यात घेऊन जलपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करावी.

🔹 महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ६ प्रसूतिगृहे व ५ सर्वसाधारण रुग्णालयांसह ६ एनआयसीयू अद्ययावत करण्याचे काम पुढील ६ महिन्यांत पूर्ण करावे. सिंहगड रस्ता परिसरातील लायगुडे दवाखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
🔹 शहरी गरीब योजनेअंतर्गत रुग्णालयांना वेळेवर देयके मिळावीत यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारावी. तसेच के.ई.एम. रुग्णालयासह उपचार सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
🔹 समाविष्ट गावांमध्ये लसीकरणासाठी कार्यरत निरामय संस्थेला आवश्यक प्रशासकीय सहकार्य द्यावे.
🔹 जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हस्तांतरित नसल्याने उद्भवणाऱ्या अडचणी डीपीडीसीमध्ये मांडाव्यात.

🔹 भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टरसोबत उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शहरात प्राणी उपचार केंद्र स्थापन करावे. पाळीव प्राण्यांसाठी ‘डॉग गार्डन’ विकसित करण्याची संकल्पना राबवावी.
🔹 डुकरांच्या नियंत्रणासाठी नियुक्त एजन्सींचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करावेत.
🔹 १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी शववाहिका (पुष्पक) व बसेस उपलब्ध करून द्याव्यात.

🔹 सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवून आवश्यकतेनुसार तीन शिफ्टमध्ये नेमणुका करण्याबाबत पडताळणी करावी.
🔹 पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाने विशेष मोहीम राबवावी तसेच आऊटसोर्स पद्धतीने अतिक्रमण निरीक्षक नेमण्याबाबत कार्यवाही करावी.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनास सर्व कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देत, नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

एनसीसीच्या हवाई तुकडीसाठी नोंदणी : 2026-27

नागपूर, 14 मे 2026

एनसीसी म्हणजेच, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नं 2 (एमएएच) एअर स्क्वॉड्रन, नागपूरतर्फे बीए/ बी-कॉम/ बीएससी प्रथम वर्ष, बीई/बीद्वितीय वर्ष तसेच कोणत्याही पाच वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना तीन वर्षांच्या एनसीसी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी आमंत्रित  करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थी नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असावा तसेच ते महाविद्यालय नागपूर शहराच्या महानगरपालिका हद्दीत असणे आवश्यक आहे.

नोंदणी केलेल्या छात्राना, मायक्रो लाइट फ्लाइंग, एरोमॉडेलिंग, स्कीट शूटिंग, 22 कॅलिबर रायफल फायरिंग, ड्रिल, ड्रोन प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक सेवा, सामुदायिक विकास आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे प्रशिक्षण दिले जाईल. अभ्यासक्रमातील नियमित उपक्रमांव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय स्तरावरील शिबिरे तसेच ट्रेकिंग, गिर्यारोहण आणि पॅरासेलिंग यांसारख्या साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. छात्रांची नोंदणी एनसीसीच्या “बी” आणि “सी” प्रमाणपत्रांसाठी तीन वर्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी करण्यात येईल.