नागपूर, 14 मे 2026
एनसीसी म्हणजेच, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नं 2 (एमएएच) एअर स्क्वॉड्रन, नागपूरतर्फे बीए/ बी-कॉम/ बीएससी प्रथम वर्ष, बीई/बीद्वितीय वर्ष तसेच कोणत्याही पाच वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना तीन वर्षांच्या एनसीसी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थी नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असावा तसेच ते महाविद्यालय नागपूर शहराच्या महानगरपालिका हद्दीत असणे आवश्यक आहे.
नोंदणी केलेल्या छात्राना, मायक्रो लाइट फ्लाइंग, एरोमॉडेलिंग, स्कीट शूटिंग, 22 कॅलिबर रायफल फायरिंग, ड्रिल, ड्रोन प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक सेवा, सामुदायिक विकास आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे प्रशिक्षण दिले जाईल. अभ्यासक्रमातील नियमित उपक्रमांव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय स्तरावरील शिबिरे तसेच ट्रेकिंग, गिर्यारोहण आणि पॅरासेलिंग यांसारख्या साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. छात्रांची नोंदणी एनसीसीच्या “बी” आणि “सी” प्रमाणपत्रांसाठी तीन वर्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी करण्यात येईल.

