Home Blog Page 48

पुणे महापालिकेच्या देशातील पहिल्या पीपीपी तत्त्वावरील कॅन्सर रुग्णालयाचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : एकाच छताखाली सर्वसमावेशक कर्करोग (कॅन्सर) उपचार देण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने बाणेर येथे उभारलेल्या देशातील पहिल्या सार्वजनिक खाजगी तत्त्वावरील (पीपीपी) रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.१७) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे,विरोधी पक्षनेते निलेश निकम, सभागृहनेते गणेश बिडकर, आयुक्त नवलकिशोर राम, उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

श्रीनाथ भिमाले पुणे महानगरपालिकेत सभागृह नेते असताना सॅलिसबरी पार्क परिसरात हे रुग्णालय उभारावे यासाठी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. भिमाले यांनी आपल्या ‘स’ यादीतून १४.८५ कोटी रुपये इतका निधी या रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिला होता. परंतु जागेची उपलब्धता आणि व्यवहार्यता लक्षात घेता हा प्रकल्प सॅलिसबरी पार्क येथून बाणेर येथे उपलब्ध जागेवर स्थलांतरित करण्यात आला. भिमाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सहा वर्षांमध्ये तो पूर्ण झाला. या रुग्णालयातून गरीब आणि गरजू रुग्णांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतून (सीजीएचएस) सवलतीच्या दरात परवडणारे उपचार दिले जाणार आहेत.

कॅन्सरचे रुग्णालय उभारणारी पहिली महापालिका आहे. पुण्यातील रुग्णांना आता मुंबईमध्ये उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णाने वेळीच तपासणी केल्यास आजाराचे निदान लवकर होण्यास
मदत होणार आहे. शहरातील कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येचा रुग्णसंख्येचा विचार करून पुणे महापालिकेने बाणेर येथे स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक कॅन्सर उपचार उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

महापालिकेचे हे पहिले स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल असणार असून, शहरातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. सध्या कॅन्सर उपचारांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यात खर्चिक उपचारामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा हा उपक्रम महत्वाचा ठरणार असल्याचा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.

या रुग्णालयात कॅन्सर तपासणी, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया तसेच आधुनिक निदान सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पीईटी-सीटीसारख्या अत्याधुनिक यंत्रणेसह डे-केअर ऑन्कोलॉजी विभागही उभारण्यात आला आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनुदानित दरात उपचार देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

बाणेर परिसर आरोग्य सुविधांच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत असून, तेथे आधीच काही प्रगत रुग्णालये कार्यरत आहेत. त्यामुळे या भागात कॅन्सर उपचारांचे केंद्र विकसित होत आहे. महापालिकेच्या या प्रकल्पामुळे शहरातील तसेच परिसरातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, कॅन्सर व डायलिसिस रुग्णांसाठी महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची मर्यादा वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे उपचारांचा खर्च काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. या योजनेंतर्गत पात्र रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळू शकते.

पुणे महानगरपालिका व आपुलकी हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी ) अंतर्गत बाणेर, पुणे येथे अत्याधुनिक “आपुलकी मेडिकल सेंटर” सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून सुमारे एक एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेसाठी मनपाकडून सुमारे रुपये १४.८५ कोटी इतका निधी (Viability Gap Funding) देण्यात आला आहे.

सदर प्रकल्पामध्ये आपुलकी हेल्थ केअरकडून रुग्णालयाचे बांधकाम, अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी तसेच सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. हे केंद्र १५० बेडचे अत्याधुनिक कर्करोग व हृदयरोग उपचार केंद्र असून निदान, उपचार आणि पुनर्वसन या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवा सी.जी.एच.एस. (Central Government Health Scheme) दरांनुसार उपलब्ध होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.

या मेडिकल सेंटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून त्यामध्ये लिनियर अॅक्सिलरेटर – ट्रूबीम व हायपरआर्क, डिजिटल PET स्कॅनर, जीनोम सिक्वेन्सिंग सुविधा, ३ टेस्ला MRI, १६०-स्लाइस CT स्कॅनर, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, समर्पित ICU/CCU तसेच केमोथेरपी व न्यूक्लियर मेडिसिन विभागाचा समावेश आहे. विशेष म्हणजे PPP प्रकल्पांतर्गत अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे हे भारतातील पहिलेच केंद्र ठरणार आहे.

रुग्णांच्या सोयीसाठी खाजगी, अर्ध-खाजगी व सामान्य वॉर्डची व्यवस्था करण्यात आली असून सर्व शासकीय आरोग्य योजना तसेच खासगी विमा कंपन्यांच्या सेवा येथे उपलब्ध राहणार आहेत. पुरुषांमध्ये मुख, अन्ननलिका, जठर, फुफ्फुस व प्रोस्टेट कर्करोग तसेच महिलांमध्ये स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर अत्याधुनिक रेडिओथेरपी व इतर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मान्सून 26 मे रोजी केरळममध्ये पोहोचणार:वेळेच्या 5 दिवस आधी

हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, मान्सून केरळममध्ये 26 मे रोजी दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळममध्ये पोहोचतो, त्यानंतर देशाच्या इतर भागांना व्यापण्यासाठी उत्तरेकडे सरकतो. गेल्या वर्षी मान्सून 24 मे रोजी आला होता.

2025 मध्ये सामान्यपेक्षा 8% जास्त पाऊस झाला होता. 30 सप्टेंबर 2025 रोजी हवामान विभागाने (IMD) सांगितले होते की, देशभरात सामान्यपेक्षा 8 टक्के अधिक पाऊस (937.2 मिमी) नोंदवला गेला. IMD प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी याला खूप यशस्वी हंगाम म्हटले होते.
देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे. उत्तर प्रदेशात बुधवारी वादळ आणि पावसाने मोठी हानी केली. राज्यात 111 लोकांचा मृत्यू झाला. सर्वाधिक 21 मृत्यू प्रयागराजमध्ये आणि 17 मृत्यू भदोहीमध्ये झाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही या मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केले.

दुसरीकडे, देशाचा अर्ध्याहून अधिक भाग उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये गुरुवारी तापमान 40°C च्या वर नोंदवले गेले. महाराष्ट्रातील अकोला 45.9°C सह देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. जळगाव, वर्धा आणि अमरावतीमध्येही पारा 45°C च्या वर नोंदवला गेला.

राजस्थानमधील फलोदीमध्ये तापमान 45.2°C, जैसलमेर आणि बाडमेरमध्ये 45.1°C नोंदवले गेले. श्रीगंगानगरमध्ये 44.8°C आणि जोधपूरमध्ये 44°C तापमान होते. जयपूर, बिकानेर आणि नागौरमध्ये दिवसभर उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती राहिल्यानंतर संध्याकाळी पाऊस पडला. यामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला.
यावर्षी मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा कमी राहू शकतो. खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदरने यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार, पाऊस सामान्यपेक्षा 6% कमी राहू शकतो.

जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या 4 महिन्यांत देशात पावसाची सामान्य सरासरी 868.6 मिलीमीटर आहे. सामान्यपेक्षा कमी मान्सूनचा अर्थ असा आहे की, पाऊस 90% ते 95% च्या दरम्यान राहील. संस्थेने 94% पावसाचा अंदाज दिला आहे.

जूनमध्ये सामान्य पाऊस होईल, परंतु जुलैपासून घट सुरू होऊन ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मान्सून कमकुवत होईल. विशेषतः ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाची कमतरता जास्त राहण्याची चिन्हे आहेत.

मध्य आणि पश्चिम भारताच्या मुख्य भागांमध्ये पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

जुलैपासून पावसात घट होण्याचा अंदाज

एलपीएच्या तुलनेत जूनमध्ये 101% पाऊस अपेक्षित. या महिन्याचा एलपीए 165.3 मिमी आहे.
सप्टेंबरमध्ये एलपीएच्या तुलनेत 89% पावसाचा अंदाज. एलपीए 167.9 मिमी आहे.
एलपीएच्या तुलनेत जुलैमध्ये 95% पाऊस होईल. या महिन्यात एलपीए 280.5 मिमी आहे.
एलपीएच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 92% पाऊस अपेक्षित. या महिन्याचा एलपीए 254.9 मिमी आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना ; दोनदिवसीय पाहणी दौऱ्याची सांगता

पुणे, दिनांक – 15 मे 2026

दर वर्षी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि विना अडथळ्यांची व्हावी, या उद्देशाने  श्रद्धा व आधुनिकतेचा प्रभावी संगम साकारत पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-965 जी) कामाचे आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-965 जी) हा पाटस ते पंढरपूर असा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा 3 पॅकेजमध्ये या मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून इंदापूर ते तोंडले भागाचे काम 96% आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम 84% पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल. सदर काम वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच यंदाच्या वारीत वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशा पद्धतीने हे काम करण्यात यावे, असेही ते म्हणाले. 

हा महामार्ग बारामती, भिगवण, अकलूज आणि श्रीपूर यांसारख्या भागांना बायपास करून जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाप्रमाणेच या मार्गावरही स्वतंत्र पदयात्रा मार्ग, आधुनिक पूल, अंडरपास आणि बायपास मार्गांच्या सहाय्याने यात्रा अधिक सुरक्षित आणि वेळेवर होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पालखी मार्गांचा विकास केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून, तो एक समग्र विकास मॉडेल म्हणून साकार झाला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सदर पालखी मार्गावर पॅकेज क्र. 2 व 3 वर सुमारे 400 वृक्षांचे पुनर्स्थापन (ट्रान्सप्लांटेशन) यशस्वीरीत्या करून त्यांचे संगोपन केले गेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बारामती, निमगाव केतकी, भवानीनगर, बावडा, अकलूज व श्रीपूर/बोरगाव याठिकाणी बायपास रस्ते प्रस्तावित केले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल आणि वाहतूक जलद गतीने होईल. 

महामार्गाच्या परिसरातील जलसंधारण क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जवळपास 25 तलावांचे खोलीकरण करून अतिरिक्त जलसाठी निर्माण करण्यात आला आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या 25 गावांना याचा फायदा झाला आहे. 

पालखी मार्गासंदर्भात ही माहिती देत असताना दिवंगत नेते अजित पवार यांची आठवण येत असल्याचे केंद्रीय मंत्री गडगरी यांनी सांगितले. अजित पवार यांनी बारामतीच्या बायपासवर कान्हेरी गावाजवळ तलावाचे खोलीकरण करून घेतले होते. यामध्ये महामार्गाच्या कामासाठी जवळपास 2 लाख क्युबिक मटेरियल काढून वापरण्यात आले. पुढे याचे खोलीकरण झाल्यावर तलावाच्या इरिगेशन मधून कॉंक्रीटचा सांडवा तयार करून घेतला, अशी आठवणही त्यांनी सांगितली. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने हिंगणगडा व कान्हेरी येथे वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग निर्माण करून वन्य प्राण्यांचे अधिवास जतन केले आहेत. त्यामुळे प्राणी व वाहनांच्या अपघाताला आळा बसला आहे.
गडकरी यांच्या आजच्या भेटीसोबतच त्यांच्या दोनदिवसीय पालखी मार्ग पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

एकल महिला शेतकऱ्यांना योजनांमध्ये प्राधान्य द्या :शिवसेना नेत्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे

योजनेचा महिला शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी ‘समाधान शिबीर’ आयोजित करावीत

पुणे.दि.१५: जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यामध्ये योजना अंमलबजावणी व लक्षांक साध्य करण्याकरिता करण्यात येत असलेल्या कार्यवाही अंतर्गत, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्ज वाढीकरिता विशेष मोहीम संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेअंतर्गत, आमदार व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला एकल महिला शेतकरी, शेतमजूर महिला, अपघातग्रस्त, आत्महत्याग्रस्त व प्रकल्पग्रस्त महिलांना लाभधारक योजनांमध्ये प्राधान्याने समाविष्ट करत त्यांच्यासाठी विशेष हेड करून किंवा त्या-त्या कामांमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या.

संयुक्त कुटुंब पद्धतीत महिलांना अधिकारांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांच्या नावावर जमीन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष समाधान शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत एम. एस. स्वामिनाथन फाउंडेशनची (दि.११मार्च) बैठक झाली होती आणि त्या बैठकीत राज्याच्या कृषी विभागाने महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासोबत एक करार देखील केलेला आहे. त्यामुळे आगामी काळात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने केलेल्या उपक्रमांचा प्रभावी आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली आहे. राज्यातील महिला शेतकऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठीच्या धोरणात्मक मसुद्यावर काम करणे, या प्रक्रियेअंतर्गत विविध स्तरावरील भागधारकांशी थेट संवाद साधून पुण्यासाठीही व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आराखडा तयार करण्यात यावा.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनांचे स्वागत करत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी एकल महिला शेतकऱ्यांना योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात येईल तसेच ड्रोन योजना तातडीने राबविण्यात येईल, असे सांगितले.

मांजरीच्या दुकानदाराने ठेवली होती बॉम्ब वाटेल अशी वस्तू,जी स्फोटक नव्हती, डिजिटल घड्याळाला जोडून केली होती

हडपसरच्या ‘त्या’ रुग्णालयाने बिल जादा लावल्याच्या रागातून केले कृत्य हडपसर बॉम्ब सदृश घटना दहशतवादी कृत्य नाही:वैयक्तिक वादातून घडला प्रकार, आरोपी शिवाजी राठोड पोलिसांच्या ताब्यात

पुणे- रुग्णालये , वैद्यकीय सेवा हि सेवा राहिली नसून तो धंदा झाला आहे अशी भावना ज्या वेगाने समाजात पसरते आहे याच भावनेतून मांजरी त राहणाऱ्या एका दुकानदाराने कोणतेही स्फोटक नसलेले , डिजिटल घड्याळ वापरून यु ट्युबचा आधार घेत बॉम्ब वाटेल अशी नकली वस्तू बनवून हडपसरच्या रुग्णालयात ठेवली होती असे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.हडपसर येथील रुग्णालयात ठेवण्यात आलेली बॉम्ब सदृश वस्तू दहशतवादी कृत्य नसून वैयक्तिक वादातून घडलेला प्रकार आहे, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. ही वस्तूची त्याच दिवशी व्कयवस्रथित पाहणी करत ती जणू निकामी करण्यात आली होती.याप्रकरणी पकडलेला आरोपी मूळचा सोलापूरचा रहिवासी असून, हडपसर परिसरातील मांजरी येथे त्याचे शूज आणि कपड्यांचे दुकान आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ ते १७ जणांची चौकशी केली आहे.

या प्रकरणात पकडलेल्या आरोपी शिवाजी राठोड याच्या घर आणि दुकानाची झडती घेण्यात आली. त्याच्या घरातून घड्याळाचा रिकामा बॉक्स मिळाल्याने आरोपीची ओळख पटली. तांत्रिक तपासानंतर त्याचे लोकेशन नागपूर दिशेने असल्याचे निष्पन्न झाले. हडपसर आणि अकोला येथे पोलिसांनी ऑपरेशन राबवून त्याला नागपूर रेल्वे जंक्शन येथे एटीएसच्या मदतीने ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीनं 10 तारखेला संबंधित रुग्णालयात उपचारासाठी नोंदणी केली होती. उपचारासाठी पैशांची गरज असल्यानं खंडणी उकळण्याच्या उद्देशानं त्याने सुमारे 400 रुपयांचं साहित्य खरेदी करून बॉम्बसदृश वस्तू तयार केली आणि ती रुग्णालयात ठेवली होती.

अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब सदृश वस्तूत कोणतेही स्फोटक नव्हते. आरोपीने ऑनलाइन डिजिटल घड्याळ मागवून ते बॉम्ब असल्याचे भासवले होते. यासाठी त्याने विविध ठिकाणांहून वस्तू गोळा केल्या होत्या, ज्याची सीसीटीव्ही फुटेजद्वारे खातरजमा करण्यात आली आहे. आरोपीने यू ट्यूबवरून बॉम्ब सदृश वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

घटनास्थळावरून फॉरेन्सिक लॅबने काही नमुने घेतले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर इतर कोणते घटक तिथे होते का, याचा तपास केला जाईल.

दहा मे रोजी आरोपी संबंधित रुग्णालयात गेला होता आणि त्याच्या उपचाराच्या बिलावरून त्याचा वाद झाला होता. त्याने बिलाची रक्कम कमी करण्याची मागणी केली . पुणे पोलीस रुग्णालयांची आणि इतर सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा सुनिश्चित करतील, असे आयुक्तांनी सांगितले. पोलिसांच्या तपास यंत्रणा सक्षम असून, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ आहेत.

पुणे जिल्हा नियोजन बैठकीत अवकाळी पाऊस, वाहतूक कोंडी, पर्यटनस्थळी सुरक्षिततेकडे आ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष

पुणे.दि.१५: जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाइन बैठकीत शिवसेना नेत्या आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी, नवले पुल तसेच पुणें शहर परिसरातील ब्लॅक स्पॉट्सबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. पर्यटनस्थळी मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या घटना व अपुऱ्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर “पर्यटन रक्षक” नेमण्याची मागणी त्यांनी केली. तसेच आदिवासी महिला व अत्याचारग्रस्त मुलींसाठी न्यूक्लियस बजेटमधून तात्पुरत्या आर्थिक मदतीची यंत्रणा उभारण्याची सूचना केली.

यावर स्पष्टीकरण देताना, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र वॉर्डन पुनश्च नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यटनस्थळी सुरक्षा रक्षक नेमणूक व न्यूक्लियस बजेटच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

शिवसेना नेत्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची आनंदाश्रम व शक्तीस्थळाला भेट; धर्मवीर आनंदजी दिघे यांना अभिवादन

मुंबई दि.१५: सलग पाचव्यांदा विधान परिषदेत बिनविरोध निवडून आल्यानंतर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवार दि.१४ मे रोजी, ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंदाश्रम व शक्तीस्थळाला भेट देत अभिवादन केले.

ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील आनंदाश्रमात जाऊन डॉ. गोऱ्हे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस चाफ्याचा पुष्पहार अर्पण केला. आनंदाश्रम येथील देवीच्या मूर्तीस वंदन करून फुलांचा हार अर्पण केला.

दिघे साहेबांच्या कार्याची आठवण काढताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, हिंदुत्वाचा विचार मांडणाऱ्यांना, विरोधाचा सामना करावा लागत असतानाच्या काळात धर्मवीर आनंदजी दिघे यांनी ठाणे, कल्याणसह अनेक भागांत शिवसेनेची विचारधारा ताकदीने रुजवली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांनी संघटना वाढवताना समाजातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धर्मवीरांचे खरे शिष्य असून शिवसेनेचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून ते कार्यरत आहेत. आनंदाश्रमातील वातावरण, धर्मवीरांची कार्यशैली आणि त्यांचे कार्यालय पाहताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “पाचव्यांदा विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर पुन्हा येथे येताना अंतःकरणाला वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळाल्यासारखे वाटले,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

याप्रसंगी, ठाणे महापौर शर्मिला पिंपोळलकर यांनी डॉ. गोऱ्हे यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना या भेटीवेळी, ठाणे महानगरपालिका महापौर शिवसेना शर्मिला पिंपोळलकर, उपनेत्या कला शिंदे, रिना मुदलियार, संपर्क प्रमुख कविता गावंड, ठाणे उपजिल्हा प्रमुख वंदना डोंगरे, यांच्यासह रंजना कुलकर्णी (लातूर संपर्क प्रमुख), सुरेखा गव्हाणे (शिर्डी संपर्क प्रमुख), संगीता चव्हाण (बीड संपर्क प्रमुख), सविता किवंडे (जालना-परभणी संपर्क प्रमुख), उज्वला भोपळे (अहिल्यानगर संपर्क प्रमुख), मुंबई विभाग प्रमुख राजश्री मांडविलकर, मालती हवालदार, शालिनी सुर्वे, मीना पानमंद, सुनीता वैती, रुची वाडकर, वैशाली सूर्यवंशी, स्वाती राणे, लता पाटील, कीर्ती मेश्राम, वर्षा जाधव, शालिनी देशपांडे तसेच सुधीर कुरुमकर (शिव कामगार सेना, पुणे) आणि राजू विटकर (झोपडपट्टी शहर प्रमुख, पुणे) उपस्थित होते.

२ दिवसात कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरणातील ४८ मिळकतींचे २५००० चौ. मी. क्षेत्र महापालिकेने घेतले ताब्यात

पुणे-कात्रज कोंढवा येथील भुसंपादन चालू असलेल्या ठिकाणी, महापौर मंजुषा नागपुरे यांनी भेट देऊन येथील रस्त्याच्या कामाची माहिती घेतली.
कात्रज कोंढवा येथील भुसंपादन चालू असलेल्या ठिकाणी, महापौर मंजुषा नागपुरे, व महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जागा पाहणी करून आढावा घेतला. मौजे कात्रज व मौजे कोंढवा येथील कात्रज चौक ते पिसोळीपर्यंत ८४ मीटर विकास योजना रस्त्यापैकी ५० मीटर विकास योजना रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही शासनामार्फत सुरू होती. दिनांक २७.०४.२०२६ रोजी सुमारे ४१,००० चौ. मी. क्षेत्राचा निवाडा विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक १५ पुणे यांचे मार्फत जाहीर झालेला आहे.पुणे महानगरपालिकेने प्रस्तुत भूसंपादनाकरिता सुमारे १९७ कोटी रुपये शासनाकडे जमा केलेली आहे. तदनंतर निवाड्याची व ताबेबाबत पंधरा दिवसांची नोटीस देऊन, दिनांक १४.०५.२०२६ पासून प्रत्यक्ष ताबे घेण्यास सुरुवात केलेली आहे. दिनांक १४.०५.२०२६ व दिनांक १५.०५.२०२६ या दोन दिवसांमध्ये एकूण १०९ मिळकतींपैकी ४८ मिळकती ताब्यात घेण्यात आलेले असून जवळपास २५००० चौ. मी. क्षेत्र पुणे मनपाच्या ताब्यात आलेले आहे. NHAI मार्फत चालू असलेले कात्रज उड्डाणपूल उतरण्यासाठी आवश्यक असलेली जागा आज ताब्यात घेण्यात आलेली असून सदर ठिकाणी पथ विभागामार्फत काम सुरु करण्यात आलेले आहे. यामुळे या उड्डाणपूलाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. याप्रसंगीआमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, प्रभाग समिती अध्यक्ष रंजना टिळेकर, नगरसेविका अर्चना जगताप, पुजा कदम, अति.महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे अधिक्षक अभियंता अजित बांबळे, भुसंपादन अधिकारी श्वेता दारुणकर व इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुण्यात २० मे रोजी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबिर,युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

पुणे, दि. १५ : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गत MY Bharat, पुणे यांच्या वतीने २० मे २०२६ रोजी गेट क्रमांक २, महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड, चाकण येथे इंटर्नशिप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि रोजगारक्षम कौशल्ये उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

या शिबिरामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५०० जागा तसेच आयटीआय पात्र उमेदवारांसाठी १० जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या १८ ते २५ वयोगटातील आणि पूर्णवेळ नोकरीत नसलेल्या युवकांना प्रतिमहिना १८ हजार रुपये मानधन तसेच ६ हजार रुपये जॉइनिंग ग्रँट देण्यात येणार आहे. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिन्यांचा राहणार आहे.
पात्र युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, बायोडाटा तसेच आधार कार्ड किंवा इतर जन्मतारीख पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी सोबत देण्यात आलेल्या QR कोडद्वारे नोंदणी करावी, असेही कळविण्यात आले आहे.

खरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई करा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

▪️एल-निनोची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचन

पुणे, दि. १५ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. बोगस बियाणे व खतांच्या तक्रारींवर गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत धडक कारवाई करण्याचे आदेश देतानाच ‘एल-निनो’ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे खरीप हंगाम आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार नीलमताई गोऱ्हे, दिलीप वळसे पाटील, शरद सोनवणे, राहुल कुल, विजय शिवतारे, शंकर जगताप, सुनील शेळके, बाबासाहेब काळे, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडेकर आणि भीमराव तापकीर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रत्यक्ष बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री म्हणाल्या, खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कृषी विभागाने निविष्ठा पुरवठा व वितरण प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात यावी. नैसर्गिक शेतीचा प्रसार वाढवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावी जनजागृती व मार्गदर्शन करावे. यंदा ‘एल-निनो’च्या संभाव्य परिणामांचा विचार करून शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत आवश्यक बदल करावेत, असेही त्यांनी सांगितले.

महिला शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर ‘ड्रोन दीदी’ योजनेप्रमाणे ड्रोन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगून एकल महिला शेतकऱ्यांना विविध योजनांमध्ये प्राधान्याने सवलती देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील सुधारणांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कडधान्ये, डाळिंब, पेरू, द्राक्ष यांसह विविध पिकांचे नियोजन वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी ऍग्री स्टॅक प्रणालीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात शेती अधिक निर्यातक्षम व व्यावसायिक बनवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खरीप हंगामाच्या तयारीचे सादरीकरण केले. यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एमएसपी व एनपीके खतांची पुरेशी उपलब्धता असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यासाठी १ लाख ९४ हजार ५०० मेट्रिक टन खत मंजूर असून, १४ मेअखेर ७६ हजार ७६९ मेट्रिक टन खत उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

खत पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सर्व खत उत्पादक व वाहतूकदारांची समन्वय बैठक घेण्यात आली. वस्तुनिष्ठ उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी दि. १ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत विशेष साठा पडताळणी मोहीम राबविण्यात आली. पॉस प्रणाली व प्रत्यक्ष साठा तपासणीत विसंगती आढळून सुमारे ५ हजार मेट्रिक टन काल्पनिक साठा कमी करण्यात आला.

पॉस प्रणालीवरील साठा अद्ययावत न ठेवणाऱ्या १७ वितरकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पॉस प्रणाली हाताळणी, अभिलेख अद्ययावत ठेवणे आदी विषयांवर वितरकांना प्रशिक्षण देण्यात आले. खत विक्रीत लिंकिंगला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक दुकानात जनजागृती फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निरीक्षकनिहाय खत नमुने घेण्याचे नियोजन तयार करण्यात आले असून रेक पॉईंटनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करून पुरवठ्यावर देखरेख वाढविण्यात आली आहे. खत साठा, वितरण व उपलब्धतेवर नियमित नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेऊन यंदाच्या खरीप हंगामात अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जनगणना प्रशिक्षणास गैरहजर ७ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. १५ : भारत शासनाच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषद क्षेत्रात जनगणना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वॉलनट स्कूल, फुरसुंगी येथील ७ शिक्षक व सपोर्ट स्टाफ सदस्यांनी प्रशिक्षणास गैरहजर राहून जनगणना कामकाज करण्यास नकार दिल्याची तक्रार फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.

कर अधिकारी आबासो दादासो मुढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नगर परिषद क्षेत्रातील १६ वॉर्डांमध्ये २८४ घरगट तयार करण्यात आले असून जनगणना कामकाजासाठी २८४ प्रगणक व ४२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार २३ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषद कार्यालयात जनगणना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षणासाठी वॉलनट स्कूल येथील प्रणिता सिन्हा, अश्विनी देवरे, इपशिता मोहंती, श्रद्धा तमशेट्टी, मनिषा हतागळे, उज्वला लोंढे व शशिकला सिद्धे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र संबंधितांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता प्रशिक्षणास गैरहजर राहत जनगणना कामात अडथळा निर्माण केला तसेच नेमून दिलेले काम करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, हवेली यांनी दिलेल्या आदेशान्वये संबंधितांविरुद्ध जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्याबाबत प्राधिकृत करण्यात आले असून पुढील कार्यवाही फुरसुंगी पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.
00000

दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा सुरू करा!- ना. पाटील

0

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोथरुड येथील निवासस्थानी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत काटकसरीचा आदर्श घालून दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला.

या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वेळेची बचत आणि अनावश्यक प्रशासकीय खर्च टाळता येतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. या बैठकीत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सूचना मांडल्या.

नुकत्याच घडलेल्या नसरापूर येथील दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत, ना. पाटील यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला. दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून विशेष बससेवा सुरू करावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली.

नसरापूर सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच विकृत मानसिकता असलेल्या संशयित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल का, यावर पोलीस प्रशासनाने तातडीने विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कम्पाऊंड वॉल (संरक्षक भिंत) उभारण्यात यावी. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र ‘बचत गट मॉल’ उभारण्यात यावा. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये हक्काची व सुसज्ज स्मशानभूमी असावी, अशा महत्वपूर्ण सूचना ही त्यांनी यावेळी केल्या.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या डिजिटल सहभागामुळे आणि महत्त्वपूर्ण सूचनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देतानाच, शासकीय संसाधनांचा योग्य व काटकसरीने वापर करण्याचा एक सकारात्मक संदेश प्रशासनाला मिळाला आहे.

‘सुमिरन’च्या पहिल्याच प्रयोगाने कोथरुडकर मंत्रमुग्ध!

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून साकारली भक्तिसंगीताची अविस्मरणीय संध्याकाळ

कोथरूड : मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण ऑडिटोरियममध्ये गुरुवारी संध्याकाळी सुरांचे एक अद्भुत विश्व अवतरले होते. उपस्थित प्रत्येक रसिकाला मंत्रमुग्ध आणि भावविवश करणारी ही मैफल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे लोकप्रिय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. देवगांवकर फाऊंडेशन संयोजनातून ‘सुमिरन’ या पहिल्याच भावगीत आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवले.

आजच्या धावपळीच्या, डिजिटल आणि यांत्रिक जीवनशैलीत भावगीत आणि भक्तिगीतांची मैफल म्हणजे जणू वाळवंटात सापडलेला गोड झरा! कलाप्रेमी आणि सुजाण कोथरूडकरांच्या मनातील सुरांचा हा आनंद कायम फुलत राहावा, या संवेदनशील विचारातून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून हा विनामूल्य सुरांचा नजराणा रसिकांसाठी खुला करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, राजकारणातील व्यस्त दिनचर्या बाजूला ठेवत स्वतः चंद्रकांतदादा पाटील संपूर्ण वेळ कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. सर्वसामान्य रसिकांमध्ये बसून एका खऱ्या कलारसिकाप्रमाणे ते भक्तिरसात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलली.

सुप्रसिद्ध गायक अमोल निसळ यांच्या भावपूर्ण गायकीने, बासरीवादक अमर ओक यांच्या बासरीतून उमटणाऱ्या दैवी सुरांनी आणि युवा गायक करण देवगांवकर यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. दादांनीही कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटात मनापासून दाद दिली.

अमर ओक यांच्या बासरीच्या प्रत्येक सुरासोबत जणू रसिकांच्या मनातील जुन्या आठवणी, सुख-दुःख आणि ईश्वराविषयीची आत्मीय भावना जागृत होत होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक रसिक तृप्त मनाने आणि आनंदाची अविस्मरणीय शिदोरी सोबत घेऊन घरी परतला.

“पोटाची भूक भागल्यानंतर मनाची भूक निर्माण होते आणि अशा सांस्कृतिक उपक्रमांमधून ती भूक योग्य रीतीने भागवली जाते. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विविध अडचणींमुळे अनेकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत नाही. अशा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत,” असे प्रतिपादन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्ता मानकांसाठी ‘बीव्हीजी’च्या सहकार्याने देशातील पहिलाच मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

0

पुणे, दि. १५ मे २०२६ : भारत सरकारच्या आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषद आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका सेवा मानांकन निकषांनुसार देशातील पहिलाच “मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम” पुण्यात यशस्वीरित्या संपन्न झाला. १३ ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण उपक्रमात देशभरातील तज्ज्ञ, प्रशिक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

देशभरातील रुग्णवाहिका सेवांची गुणवत्ता अधिक सक्षम, परिणामकारक आणि रुग्णकेंद्री करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून प्रशिक्षित आणि प्रमाणित मूल्यांकनकर्त्यांची फळी तयार करण्यात आली असून, हे मूल्यांकनकर्ते देशातील विविध रुग्णवाहिका सेवांचे परीक्षण करून उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुख्य अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. प्रसाद राजहंस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपत्कालीन आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता, रुग्ण सुरक्षितता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्त्व अधोरेखित करत अशा संरचित प्रशिक्षण कार्यक्रमांची गरज स्पष्ट केली. प्रशिक्षित मूल्यांकनकर्त्यांमुळे रुग्णवाहिका सेवांचा दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भारत सरकारच्या हेल्थ सेक्टर स्किल कौन्सिल (HSSC) रुग्णवाहिका सेवा प्रदाता मानांकन निकष समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये व्यवहार्य, संवेदनशील आणि परिस्थितीनुरूप मूल्यांकन प्रणालीची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. गुणवत्ता हमी, सातत्यपूर्ण सुधारणा आणि कार्यक्षम प्रतिसाद व्यवस्थेसाठी प्रशिक्षित मूल्यांकनकर्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन दिवसांच्या सत्रांमध्ये रुग्णालयपूर्व आरोग्य सेवांमधील मानकीकरण, कौशल्य विकास, गुणवत्ता सुधारणा, मूल्यांकन प्रक्रिया आणि क्षमता वृद्धी या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. देशातील रुग्णवाहिका आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेमध्ये गुणवत्ता हमी यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकास, मानकीकरण आणि गुणवत्ता हमी अधिक सक्षम करण्यासाठी ‘बीव्हीजी’ सातत्याने कार्यरत असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे देशातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला.

पुणे महापालिकेतील कथित ‘बोगस भरती’ आणि आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हा दाखल करा.

पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या 2022 मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीत नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टी यांच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले होते
आम आदमी पार्टीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुणे महानगरपालिकेतील काही विभागांत नोकरी देण्याच्या नावाखाली बोगस भरती आणि आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. राजेंद्र बबनराव खेडेकर, नमिता बनसोडे, शिवानंद बाळासाहेब पाटील यांच्या टोळीने संगनमताने उमेदवारांकडून प्रत्येकी 45 लाख रुपये उकळले असून, त्यांना बनावट नियुक्ती आदेश आणि प्रशिक्षण आदेश दिले आहेत.या सर्व गैरव्यवहारात प्रशासकीय नावाचा गैरवापर या फसवणुकीत पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि सह्यांचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत.बेरोजगार तरूण नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक तरुणांची मोठी आर्थिक फसवणूक झाली असून, प्रशासनावरील लोकांचा विश्वास डळमळीत होत आहे.
निष्पक्ष चौकशीची मागणी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग तपासावा ? या घोटाळ्यात महापालिकेतील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी आम्ही करत आहोत.
या प्रकरणी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे गंभीर प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून देऊन या प्रकरणात आपण लक्ष घालून SIT मार्फत चौकशी करण्याची विनंती करणार आहे.

“हा केवळ आर्थिक गुन्हा नसून प्रशासकीय व्यवस्थेचा गैरवापर करून तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक होणे गरजेचे आहे.”
— रविराज बबन काळे (प्रदेशाध्यक्ष ,युवा आघाडी आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्य)