पुणे: भारतीय टेनिकाईट महासंघाच्या ‘चीफ पेट्रॉन’पदी माजी आमदार मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाची वार्षिक सभा नुकतीच झाली. या सभेत एकमताने मोहन जोशी यांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला.
टेनिकाईट(रिंग टेनिस) या क्रीडा प्रकाराला उत्तेजन देण्यासाठी तुम्ही निष्ठेने प्रयत्न करीत आहात. तुमचे मार्गदर्शन आणि पाठिंब्याने टेनिकाईट च्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, अशा शब्दांत मोहन जोशी यांचा महासंघाने गौरव केला आहे. भारतीय टेनिकाईट महासंघाचे अध्यक्ष राजीव शर्मा आणि सेक्रेटरी जनरल एम.आर.दिनेशकुमार यांनी नियुक्तीचे पत्र मोहन जोशी यांना दिले आहे.
टेनिकाईट क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात मोहन जोशी यांचा पुढाकार राहिला आहे. टेनिकाईट (रिंग टेनिस) महाराष्ट्र संघटनेचे मोहन जोशी अध्यक्ष आहेत. हा खेळ अधिक लोकप्रिय व्हावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित करून खेळाडूंच्या कौशल्याला अधिक वाव देण्याचा प्रयत्न करू, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.
भाषा कौशल्य विकासासाठी कृतियुक्त शिक्षण महत्त्वाचे असल्याचे मत ‘आयआयटी मुंबई’चे प्राध्यापक के. रामसुब्रमनियन यांनी व्यक्त केले.
‘डीईएस पुणे विद्यापीठा’ने ‘भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद’, ‘इकोटोको’ आणि ‘कोल्टर’ यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘कृतियुक्त भाषा शिक्षण’ या आंतरराष्ट्रीय आणि ‘आर्थिक समृद्धी व शाश्वतता’ या राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले होते. या परिषदांच्या उद्घाटन कार्यक्रमात के. रामसुब्रमनियन बोलत होते.
‘गुजरात विद्यापीठा’चे आचार्य डॉ. दीप कोयराला, ‘रोटरी’चे सुरेंद्र गुप्ता, ‘आरोही रिसर्च फाउंडेशन’चे संचालक एम. एस. चैत्रा, ‘डीईएस पुणे विद्यापीठा’चे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ. ललित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
के. रामसुब्रमनियन म्हणाले, “आपल्याकडे आजीच्या गोष्टी ऐकत भाषेचे शिक्षण आणि संस्कार पिढ्यानंपिढ्या होत होते. आता मुलांना द्यायला पालकांकडे वेळ नाही. त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी तिसऱ्या वर्षांपासून हातात मोबाईल दिला जातो, ही खेदाची बाब आहे. खेळावर आधारित शिक्षण दिले पाहिजे.”
गुप्ता म्हणाले, “ई-कचऱ्याची समस्या मोठी आहे. ती सोडविण्यासाठी ई साधनांचा वापर कमी करणे, पुन्हा वापर, पुनःप्रक्रिया याबरोबर ती नव्याने घेताना पुनः विचार करण्याची आवश्यकता आहे.”
डॉ. खांडेकर यांनी प्रास्ताविक, डॉ. कुलकर्णी यांनी स्वागत, नेहा जोशी यांनी सूत्रसंचालन आणि डॉ. सागर विध्वंस यांनी आभार प्रदर्शन केले.
पुणे दि. ७: देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारमार्फत स्थापन राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन ‘एल्डरलाईन- १४५६७’ वर मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूतीपूर्वक सेवा करून सुखी आणि निरोगी जीवन वृद्धींगत करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेली ही हेल्पलाईन महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येत आहे.
ही हेल्पलाईन कनेक्ट सेंटर व फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून व मदतीने कार्यरत आहे. आज अखेर राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाइनने केली आहे. तसेच तीस हजाराहून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत.
एल्डर लाईनचे कार्य २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर वगळता वर्षातील ३६२ दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत चालते. याद्वारे आरोग्यविषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती पुरविण्यात येते.
वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयक, मालमत्ता, शेजारी आदींच्या अनुषंगाने वाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, वेळ, ताण, राग आदीच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापन, मृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व आदी मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी अनुषंगाने भावनिक मदत करण्यात येते, अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी दिली आहे.
पुणे-पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूरमधून एका काश्मिरी तरुणाला अटक केली आहे. आरोपी अमन प्रेमलाल वर्मा (३८) याने मॅट्रिमोनियल वेबसाइटवर नोंदणी करून अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
हडपसर परिसरातील एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ४५ लाख रुपये उकळले. पोलीस तपासात आरोपीने भोपाळ, इंदूर, दिल्ली आणि फरिदाबाद या शहरांमध्येही अशाच पद्धतीने तरुणींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील बिश्ना येथील रहिवासी असलेला आरोपी सोशल मीडियावरील विवाह विषयक संकेतस्थळांद्वारे तरुणींशी संपर्क साधत असे. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळात अडकवत असे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीला इंदूर येथून ताब्यात घेतले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक विलास सुतार, हवालदार युवराज दुधाळ आणि श्रीकृष्ण खोकले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पुणे, ७ फेब्रुवारीः हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस आज प्रारंभ झाला. स्पर्धेत पुण्यासह पिंपरी, चिंचवड, बारामती, मावळ, हवेली, शिरूर, मुळशी, इंदापुर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे या वेगवेगळ्या जिल्ह्यातून कुस्तीपटू सहभागी झाले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या या मान्यतेने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धेत १४ वर्षाखालील कुमार गटामध्ये २७४ खेळाडू, १७ वर्षाखालील गटामध्ये १९९, वरिष्ठ गटामध्ये १९८, महिला गटात ६०, कुमार खुला गटामध्ये ३५, वरिष्ठ खुल्या गटामध्ये ७६ आणि महिला खुल्या गटामध्ये २७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
टिळक रोड येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आज सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेत १४ वर्षाखालील कुमार गटाच्या लढती घेण्यात आल्या. मध्यभागी कुस्तीचे आखाडे आणि प्रेक्षक गॅलरी असे भव्य कुस्ती स्टेडियमची निमिर्ती या स्पर्धेसाठी केली गेली आहे. मैदानावर मातीचे दोन स्वतंत्र आखाडे तयार करण्यात आले असून आखाड्यांच्या बाजुने क्रीडारसिकांची १० हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय केली आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी येणार्या पुरूष आणि महिला पैलवानांसाठी राहण्याची आणि भोजनाची सोय करण्यात आल्याचे पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी सांगितले.
संध्याकाळच्या सत्रामध्ये (संध्याकाळी ६ वाजता) स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता मामा भरणे हे उपस्थित राहणार आहेत.
मते देईपर्यंत पात्र, अन मतदान झाल्यावर अपात्र .. पहिल्या टप्प्यात ५ लाख वजा .. आता पुढे पहा आणखी किती होतील वजा …
आम्हालाही नकोय योजना पण ऑनलाईन लिंक पाठवा -अनेक महिलांची मागणी
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,००० वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,००० कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,००० एकुण अपात्र महिला – ५,००,०००
मुंबई- महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली. या अपात्र महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या सुमारे 2 लाख 30 हजार महिलांचा समावेश आहे हे विशेष.
महायुती सरकारने गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची अर्थसहाय्य केले जात आहे. त्याचा महायुतीला निवडणुकीत मोठा फायदा झाला. पण आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. त्यात अनेक महिलांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर येत आहे. विशेषतः इतर सरकारी योजनांतील लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामु्ळे सरकार या प्रकरणी काटेकोट पडताळणीवर भर देत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी एका ट्विटद्वारे लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती दिली. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या 2 लाख 30 हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे 65 हून अधिक असणाऱ्या 1 लाख 10 हजार महिलांची नावेही या योजनेतून हटवण्यात आली आहेत.
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1 लाख 60 हजार महिलांची नावेही लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 5 लाख महिला लाभार्थ्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे-पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळा येथील टायगर पॉइंटजवळ असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी हे टोकाचे पाऊल का घेतले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ हे खडकी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर देखील नव्हते आले. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्कही होत नव्हता. त्यानंतर आज त्यांचा शोध लागला तेव्हा अण्णा गुंजाळ हे लोणावळा येथील टायगर पॉइंट जवळ एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. टायगर पॉइंटजवळ त्यांची गाडी देखील सापडली आहे. या गाडीत एक डायरी देखील पोलिसांना सापडली आहे. पोलिस आता या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
दरम्यान, खडकी पोलिस यांच्यासह लोणावळा ग्रामीण पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले असून मृत पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच त्यांची गाडी देखील पोलिसांनी टायगर पॉइंटवरून ताब्यात घेतली आहे. आता त्यांच्या गाडीत सापडलेल्या डायरीचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या डायरीमध्ये कदाचित आत्महत्येचे कारण सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पुण्यात एका वाहतूक पोलिसावरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसावरच प्राणघातक हल्ला केल्याचे समजते. यात वाहतूक पोलिस राजेश गणपत नाईक जखमी झाले असून उपचार सुरू आहेत. ही घटना पुण्यातील फुरसुंगी भेकराईनगर चौकात घडली.
पुण्यातील फुरसुंगी भेकराईनगर चौकात राजेश नाईक हे कर्तव्यवर असताना त्यांना एक दुचाकी चालक फोनवर बोलत गाडी चालवताना दिसला. तेव्हा त्यांनी त्याला अडवले. मात्र, याचा राग येऊन दुचाकी चालकाने रस्त्यात पडलेला दगड वाहतूक पोलिस राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
पुणे, दि. ७: जिल्ह्यात आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ई-कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.
‘आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना’ व ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना राज्यात एकत्रित स्वरूपात राबविण्यात येत आहेत. आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी कुटुंबासाठी प्रत्येक सदस्याला आयुष्मान कार्डचे मोफत वितरण करण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ई-कार्ड बनविण्यासाठी अँड्रॉईड वर्जन आयुष्मान ॲप हे मोबाइल उपयोजक (अप्लिकेशन) तयार केले आहे. या मोबाइल ॲपद्वारे बेनिफिशरी लॉगिनमधून लाभार्थी व ऑपरेटर लॉगिनमधून सीएससी केंद्रचालक, ग्रामपंचायत ‘आपले सरकार सेवा केंद्र’चालक व आशा सेविका हे पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार ओटीपी किंवा चेहरा ओळखद्वारे (फेस ऑथेंटिकेशन) ई-कार्ड तयार करू शकतात.
पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी ५२ लाख लाभार्थ्यांचे ई-कार्ड तयार झालेले नाहीत. जिल्ह्यातील राहिलेल्या लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड लवकरात लवकर ई-केवायसी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
त्यानुसार प्रत्येक गाव तसेच शहरातील वार्ड मध्ये रास्त भाव दुकानदार, आशा स्वयंसेविका, सीएससी केंद्र चालक यांनी एकत्रित येऊन नियोजन करावे. प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने त्यांच्याकडे नोंद असलेल्या सर्व कुटुंबांच्या सदस्यांची यादी तयार करावी. यादी केल्यानंतर त्यातील आयुष्मान कार्ड असलेले कुटुंब व नसलेले कुटुंब यांचे वर्गीकरण करावे. रास्त भाव दुकानदाराने आयुष्यमान कार्ड काढले नसलेल्या लाभार्थ्यांना रेशन दुकानात बोलवावे, याची जबाबदारी दुकानदारावर राहील.
गावातील सर्व आशा स्वयंसेविका व सीएससी केंद्रचालक यांनी रास्त भाव दुकानात दिवसभर उपस्थित राहून आलेल्या सर्व लाभार्थ्यांची मोबाइल अँप्लिकेशन द्वारे ई-केवायसी करावी. सदर ई-केवायसी कार्ड काढण्याची प्रक्रिया २५ दिवसात पूर्ण करावी.
ई-केवायसी करण्याच्या कामाचा आढावा तालुका स्तरावर घेण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात गटविकास अधिकारी सहअध्यक्ष, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिव आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी सहसचिव असतील असेही नमूद करण्यात आले आहे. अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्यात व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत उर्वरित आयुष्यमान कार्ड (ई-केवायसी) काढण्याची प्रक्रिया २५ दिवसात पूर्ण करावी, असेही निर्देश श्री. डूडी यांनी दिले आहेत.
पुणे, दि. ७: सन २०२४-२५ करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ स्तरावरुन सुरु आहे.
प्रस्तुत योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणीची सुविधा (अर्ज करण्यासाठी) https://register.mshfdc.co.in या पोर्टलवर १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
पुणे-राहुल सोलापुरकर ने जाहीर पणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी अशी व्यवस्था पोलीसां मार्फत व्हावी. अन्यथा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या सन्मानार्थ सोलापूरकरला अटक होउन गुन्हे दाखल करेपर्यंत सातत्याने आंदोलनं घ्यावे लागेल. असा इशारा देत शिवसेनेने आज पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख, उपशहरप्रमुख आबा निकम, राम थरकूडे, युवराज पारीख. प्रवीण डोंगरे, उमेश वाघ,अनिल दामजी, राजेंद्र शाह, मुकुंद चव्हाण, अजय परदेशी, सूरज लोखंडे, नितीन परदेशी उपस्थित होते.
शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे याप्रसंगी म्हणाले कि,’महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम जनतेच्या मनात आदराची त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची, शौर्याची व किर्तीची भावना आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेउन जीवनाची वाटचाल जनतेने ठरवलेली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात, परदेशात त्यांच्या कार्यशैलीवर अभ्यास केला जातो, स्वराज्याची राजधानी रायगड येथील माती परदेशातील नागरिक व संस्था येथून घेउन जातात आणि आपल्या देशातील मातीत मिसळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधीचा, पराक्रमाची व गनिमी काव्याचा अभ्यासक्रम अनेक देशातील शाळामधे विकलेले जातो.अशा विश्वव्यापी, गौरवशाली महापुरुषा बद्द्ल मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर याने एका पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी अनेकांना लाच दिली होती. असे वक्तव्य केले असून ह्या वक्तव्यामुळे शिवप्रेमी जनतेमधील प्रचंड चीड निर्माण झाली आहे. शिवाजी महाराजांचा परिक्रमेत पुसण्याचे काम या समाजकंटकांनी होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण दूषित झाले आहे, विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तसेच पोलीस प्रशासनावरही ताण वाढला आहे, समाजविघातक कृत्य केले आहे. त्यामुळे सदर व्यक्तीवर आपण तत्पर सामाजिक तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान करणे, सामाजिक सलोखा बिघडविणे, ह्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच त्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी अशी व्यवस्था आपल्या मार्फत व्हावी. अन्यथा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या सन्मानार्थ सोलापूरकरला अटक होउन गुन्हे दाखल करेपर्यंत सातत्याने आंदोलनं घ्यावे लागेल.
पुणे-शहर आणि परिसरात अगदी अल्प वयातील तरुणाईत पिस्टल चा मोठा बाजार होत असून कायम अधून मधून पिस्टल घेऊन वावरणारे तरुण पकडले जात आहेत . आता पुन्हा कात्रज आणि येव्लेवादीच्या दोन तरुणांना पकडून पोलिसांनी एक पिस्टल आणि १ राउंड जप्त केला आहे. पिस्टल पुण्यात येतात कुठून, आणते कोण कोण ? तरुणांना विकतो कोण कोण?याबात मात्र काही वर्षांपासून पायबंद घालणे जरुरीचे असतानाही ते घातले गेलेले नाहीत किंवा त्यात यश आलेले नाही हे स्पष्ट आहे.
दरम्यान पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले कि,’येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख हे दि.०५/०२/२०२५ रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाडिया बंगलाजवळ, येरवडा, पुणे येथे दोन इसम अग्नीशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस अंमलदार तुषार खराडे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १ पिस्टल व १ राऊंड मिळून आले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता १. प्रविण विकास कसबे वय २९ वर्षे रा आंबेगाव कात्रज, पुणे २. प्रतिक दादासाहेब रणवरे वय २५ वर्षे रा येवलेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं १०४/२०२५ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३०,०००/-रु. किं.चे १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळुंके करत आहेत. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, पुणे श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे श्रीमती प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती स्वाती खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळुंके, सर्व्हेलन्सचे पोलीस उप-निरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी केलेली आहे.
पुणे, दि. ७ फेब्रुवारी : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १४वीं ‘भारतीय छात्र संसद’ दि.८ ते १० फेब्रुवारी रोजी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून छात्र संसदेचे हे १४ वे वर्ष आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी कर्टन रेझर पत्रकार परिषदेत दिली. १४ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन, शनिवार, दि.८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे, राजस्थान विधान परिषदेचे माजी सभापती डॉ.सी.पी. जोशी आणि सीएमओ बीओएटीचे सह संस्थापक अमन गुप्ता हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या छात्र संसदेमध्ये ४ सत्रे आयोजित केली गेली आहेतः पहिले सत्रः शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.०० वाजता सुरू होणार आहे. ‘भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर’ या विषयावर हिमाचल प्रदेश विधानसभेचे सभापती कुलदिपसिंह पठानिया, एनएसयुचे प्रमुख डॉ. कन्हैया कुमार, माजी खासदार अॅड.ए.ए.रहिम, खासदार राजकुमार रौत हे आपले विचार मांडतील. विद्यार्थ्यांसाठी दुपारी ४.१५ वा. ‘युथ टू युथ कनेक्ट’ हे विशेष सत्र होईल. दूसरे सत्र, रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होणार आहे. ‘रेवडी संस्कृती- एक आर्थिक भार किंवा आवश्यक आधार’ या विषयावर झारखंड विधानसभेचे सभापती रवींद्र नाथ महातो हे अध्यक्षस्थानी असतील. प्रसिद्धी टिव्ही जर्नालिस्ट रुबिका लायक्वत, कॉग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुघ, खासदार रणजीत रंजन हे विचार मांडतील. तिसरे सत्र, रविवार दि ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.४५ वा. सुरू होणार आहे. ‘भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर : भारतीय युवकांची कोंडी’ या विषयावर बिहार विधानसभेचे अध्यक्ष नंद किशोर यादव हे विचार मांडतील. या वेळी सिव्हिल एव्हिएशन मंत्री राम मोहन नायडू किंजीरापू यांना भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर व लोकसभा सदस्य अरूण गोविल हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी दुपारी ३ ते ५ या कालावधीत ‘युथ टू युथ कनेक्ट’ या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर संध्याकाळी ७.३० मिनीटांनी ‘लोकतंत्र का रंगमंच’ ह्या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. चौथे सत्र, सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वा. सुरू होणार आहे. ‘एआय आणि सोशल मिडिया : सामर्थ्य की अनपेक्षित संकट’ या विषयावर मेघालय विधानसभेचे सभापती थॉमस ए. संगमा, वरिष्ठ पत्रकार राजेश बादल, टीव्ही ९ नेटवर्क चे कार्यकारी संपादक आदित्यराज कौल व आयटेकचे व्यवस्थापकीय संचालक असिम पाटील हे आपले विचार मांडणार आहेत. तसेच सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ११.४५ वा. होणार्या समारोप प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित राहणार आहेत. जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, तुषार गांधी, प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, जस्टिस एन. संतोष हेगडे, डॉ. विजय भटकर आणि नानीक रुपानी हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद आणि भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार, असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे. सविस्तर माहितीसाठी www.bharatiyachhatrasansad.org या संकेतस्थळांना भेट द्यावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावे.
आमदारांसाठी ‘नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम’
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने आमदारांकरीता ‘नेतृत्व क्षमता संर्वधन कार्यक्रम’ ८ व ९ फेब्रुवारी दरम्यान कोथरूड येथील डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. या परिषदेत देशातील जवळपास २५० आमदारांनी उपस्थित राहण्याची संमती दर्शविली आहे. या वर्षी आयोजित नेतृत्व क्षमता संर्वधन कार्यक्रमात’ सहभागी सर्व आमदार हे भारतीय छात्र संसद मध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. येथे आमदारांसाठी सुद्धा विशेष ३ सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सत्र १ : रोजगाराचे मार्ग मतदारसंघात निर्मिती सत्र २ : कायदेकर्त्या आणि नोकरशहाः विकासाचे एजंट सत्र ३ : धोरणात्मक संवादः सोशल मीडियाचा प्रभावी वापर अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डाॅ. मुकेश शर्मा, प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर, डाॅ. हितेश जोशी, डाॅ. अंजली साने, डाॅ. पौर्णिमा इनामदार, प्रा. गोपाळ वामने, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्टूडेन्ट कॉन्सिलचे अध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, उपाध्यक्ष कु. अपूर्वा भेगडे व नितीश तिवारी उपस्थित होते.
हजारो आंबेडकरी जनतेसह पुणेकरांचा एल्गार; बिल्डरसोबतचा करार रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व प्रस्तावित स्मारकासाठी राखीव भूखंड राज्य सरकारने बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव उधळून लावण्यासाठी व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील हजारो बंधू-भगिनी रस्त्यावर उतरले. समस्त पुणेकरांच्या वतीने झालेल्या या धरणे आंदोलनावेळी झालेल्या निषेध सभेत ही जागा स्मारकाला दिली नाही, तर राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला. दरम्यान या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्या सरकारकडे मांडून ठरवत दुरुस्ती करण्याचे तसेच या जागेवर भव्य संविधान भवन उभारू, असे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणेच्या अंतर्गत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था व पुणेकर जनता यामध्ये सहभागी झाली. मालधक्का चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध सभेचे आयोजन केले होते. ज्येष्ठ आंबेडकरी नेते वसंत साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निषेध सभेला मुख्य निमंत्रक शैलेश चव्हाण, माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड, माजी आमदार एल. टी. सावंत, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, ऍड. अविनाश साळवे, ज्येष्ठ नेते परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, रिपाइं अध्यक्ष संजय सोनवणे, राहुल डंबाळे, भगवान वैराट, शैलेंद्र मोरे, मनसेचे बाबू वागस्कर, ‘आप’चे मुकुंद किर्दत, पँथर नेते रोहिदास गायकवाड, बापूसाहेब भोसले, ऍड. अरविंद तायडे, युवराज बनसोडे, श्याम गायकवाड, भाई विवेक चव्हाण, महिला नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, संगीता आठवले, युवानेते निलेश आल्हाट, गौतम भोसले, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, सर्जेराव वाघमारे यांच्यासह शहरातील सर्व चळवळीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार करण्याची मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. येथील भूखंड वारंवार विविध समाजोपयोगी कामासाठी वापरण्याचे कारण पुढे करण्यात आले. २००० मध्ये ही जागा मुख्य सभेने स्मारकाला देण्याचे ठरले होते. २०१६-१७ मध्ये ही जागा ठराव करून सरकारने आरक्षण बदलून एमएसआरडीसीला जागा देण्यात आली. पुढे ससून रुग्णालयाचे कँसर विभाग उभारण्याचे कारण दिल्याने आम्ही सहकार्य केले. मात्र, २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा व्यावसायिक स्वरूपात वापरण्याचा निर्णय झाला. त्यामुळे ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे काम झाले. हा भूखंड स्मारकासाठी राखीव असून, आमचा तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी त्वरित हा निर्णय मागे घेऊन या जागेवर भव्य स्मारक उभारावे.”
ऍड. अविनाश साळवे म्हणाले, “हे आंदोलन प्रतीकात्मक स्वरूपाचे आहे. स्मारकाची जागा बिल्डरला देणे दुर्दैवी असून, आंबेडकरी जनता हे कदापि सहन करणार नाही. लढू आणि जिंकू या निर्धाराने ही जनता रस्त्यावर उतरलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्याचे एक वेगळे आणि ऐतिहासिक असे नाते आहे. त्यामुळे येथे भव्य स्मारक होण्याची आवश्यकता आहे.”
हा लढा यापुढे अधिक तीव्र होईल. राज्य सरकारने आंबेडकरी जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. बिल्डरला हा भूखंड देण्याचा ठराव त्वरित रद्द करून येथे स्मारक उभारावे, अन्यथा शांततेत होणारे हे आंदोलन पुढील काळात तीव्र होईल आणि राज्य सरकारला उलथवून टाकेल, असा इशारा परशुराम वाडेकर यांनी दिला.
राहुल डंबाळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण देशाचे दैवत आहे. त्यांच्या स्मारकाच्या जागेवर व्यावसायिक इमारती उभारून पैसे कमावण्याचा डाव सरकारचा दिसत आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी ही जागा सरकार वाणिज्य विभागात आरक्षित करतेय. हा डाव आंबेडकरी जनता उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”
शैलेश चव्हाण म्हणाले की, “सांस्कृतिक भवनाच्या विस्ताराची, स्मारक उभारण्याची मागणी प्रलंबित असताना सरकारमधील काही लोक भूखंड लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक झाल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. हा ठराव मागे घेतला नाही, तर सरकारला आंबेडकरी जनतेची ताकद दाखवून देऊ.”
ऍड. जयदेव गायकवाड, ऍड. अरविंद तायडे, संजय सोनावणे, शैलेश मोरे, रोहिदास गायकवाड, बापूसाहेब भोसले, बाबू वागस्कर यांनीही राज्य सरकारला हा ठराव मागे घेण्याचे आवाहन केले. वसंत साळवे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
शेतक-यांच्या नावाखाली कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून युती सरकारकडून लूट
बॅटरी स्प्रेअरचा दर २४५० रुपये असताना ३४२५.६० रुपयाने खरेदी, मर्जीतील अपात्र कंपन्यांना पुरवठ्याचे कंत्राट बहाल.
निविदा काढण्यापासून खरेदीपर्यंत अनियमत्ता सर्व प्रक्रिया चुकीची आणि बेकायदेशीर- पुरवठेदारा सोबत संगनमत करून रिंग केली
भ्रष्टाचाराची रक्कम महाव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले व महाव्यवस्थापक (लेखा व वित्त) सुजीत पाटील यांच्या कडुन वसुल करून दोषींवर कठोर कारवाई करा
मुंबई, दि. ७ फेब्रुवारी २०२५ महायुती सरकारमध्ये कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे प्रकार उघड होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमधून पैसा खाऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा उद्योग महायुती सरकारने केला आहे. कापूस साठवणूक बॅग पुरवठ्याच्या घोटाळ्यासारखाच शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रेअर पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या आशिर्वादाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व कृषी विभागाने संगनमताने ८०.९९ कोटींच्या खरेदीत २३.०७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराची पोलखोल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेतून खिसे भरण्याचा गोरखधंदा जोरात सुरु होता. कृषी विभागाची घोटाळी करण्याची एक मोडस ऑपरेंडी असून कापूस साठवणूक पिशवी खरेदी घोटाळ्याप्रमाणे बॅटरी स्प्रेअर खरेदीतही त्याच पद्धतीने भ्रष्टाचार केला आहे. बॅटरी स्प्रेअर खरेदीत घोटाळा कसा झाला हे सांगताना नाना पटोले म्हणाले की, कापूस सोयाबीन योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर वस्तू पुरवठा करण्याच्या योजनेत कृषी उद्योग विकास महामंडळ व कृषी मंत्रालयाने बॅटरी स्प्रेयर व्यवहारात मोठा घोटाळा केला आहे. कृषी उद्योग विकास महामंडळ आयुक्तालयाकडून बॅटरी स्पेअर उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी निधी अग्रीम स्वरुपात २८/३/२०२४ रोजी ८०.९९ कोटी रुपये महामंडळास अदा करुन घेतले. उत्पादकाकडून बॅटरी स्पेअर खरेदी करुन पुरवठा करायचे असताना कच्च्या मालाचा प्रश्नच येत नाही तरीही महामंडळाने दिशाभूल केली. यासाठी ई निविदा न काढताच पुणे येथील महामंडळाच्या वर्कशॉपची जागा भाड्याने देणे आहे या शिर्षकाखाली निविदा अभियांत्रिकी पोर्टलवर प्रकाशित न करता NOGA (Tomato Ketchup/JAM) च्या पोर्टलवर प्रकाशित केली. कृषी अवजार खरेदी निविदा ही कृषी अभियांत्रिकी पोर्टलवर प्रकाशित केली जाते. महाराष्ट्रातील एमएसएमई नोंदणीकृत उत्पादक पुरवठादार यांना या प्रक्रियेतून वगळण्यात यावे यासाठी हा उद्योग करण्यात आला. विशेष म्हणजे लोकसभा आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच ५/४/२०२४ रोजी ही निविदा प्रकाशित करण्यात आली. कृषि उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले व महाव्यवस्थापक (लेखा व वित्त) सुजीत पाटील यांच्या मर्जीतील पुरवठादारांनाच माहिती देऊन संगनमताने हा गैरव्यवहार करण्यात आला. इंदोरच्या नवकार ऍग्रो कंपनीच्या उद्यम आधारमध्ये कृषी उपकरणे किंवा फवारणी पंपाचा उत्पादक म्हणून उल्लेख नाही तसेच स्प्रेअरचा NIC code 28213 नमूद नसतानाही त्यांना २५ लाख रुपयांची बयाना रक्कम भरण्यापासून सूट देण्यात आली व ते अपात्र असतानाही त्यांना पात्र घोषीत करण्यात आले. इंदोरच्या मसंद ऍग्रो यांनी जागा भाडे तत्वावर घेण्यास व भाडे देण्यास मान्य नाही असे निविदेच्या दस्तावेजासोबत जोडले आहे. निविदेचा मुळ उद्देश मान्य नाही असे लेखी दिले असतानासुद्धा त्यांना अपात्र न करता पात्र ठरवण्यात आले. इंदौरच्या सतिष ऍग्रो व आदर्श प्लांट प्रोटेक गुजरात यांनी BIS परवाना निविदेतील दस्तावेजासोबत जोडला नाही, BIS/ISI परवाना निविदेतील अटीनुसार बंधनकारक होती परंतु याची पुर्तता केली नसताना त्यांनाही पात्र ठरवण्यात आले. ही पूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीरपणे राबवली आहे. नागपूरच्या एन. के. ऍग्रोटेक यांचा बॅटरी कम हँड स्प्रेअरचा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला पुरवठा करण्यात येत असलेला दर २४५० रुपये आहे पण महामंडळाने निविदेत आलेल्या दरानुसार ३४२५.६० रुपये प्रमाणे शासनास पुरवठा केला. म्हणजे ९७६ रुपये प्रति नग जादा दराने खरेदी करुन २३ कोटी ७ लाख ५२ हजार ७७२ रुपयांचे शासनाचे नुकसान केले. बॅटरी कम स्प्रेअरचे दर फक्त २ निविदाधारकाने कोट केले होते. किमान ३ पात्र निविदाधारक बंधनकारक असताना फक्त २ व दोन्ही अपात्र होणाऱ्या निविदाधारकांनि दिलेले दर मान्य करण्यात आले. इंदोरच्या नवकार ऍग्रो यांनी कोट केलेले सर्व १७ उपकरणांचे दर, त्यांचेच एल वन आले, एकाच निविदाधारकाचे सर्व १७ वस्तूंचे दर एल वन येणे हे संशयास्पद आहे. या प्रक्रियेत भाग घेतलेल्या सर्व निविदाधारकांनी संगनमत करुन अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने निविदेत भाग घेऊन अवाजवी एल वन दर मंजूर करुन भ्रष्टाचार करण्यात आला आहे असे पटोले म्हणाले. बॅटरी स्प्रेअरच्या खरेदीत भ्रष्टाचार करणाऱ्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व तत्कालीन कृषीमंत्री यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी विभागातील भ्रष्टाचाराकडे गांभिर्याने पहात नाहीत असे दिसत आहे. पण जनतेचा पैसा व शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्यांना काँग्रेस पक्ष सोडणार नाही. विधिमंडळात या घोटाळ्यासंदर्भात सरकारला जाब विचारू व भ्रष्ट मंत्री तसेच अधिकाऱ्यांना सळो की पळो करुन सोडू, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
पुणे: ‘पुण्यात राहणारऱ्या २९ वर्षीय आयटी इंजिनियर असलेलया स्वाती ने (नाव बदलले) करियर मध्ये सेटल झाल्यावर वर्षभरापूर्वी मॅट्रिमोनियल साईट वर जोडीदार शोधण्यास सुरवात केली. त्यावरून तिला तिच्याच समाजातील ३२ वर्षीय मुलासोबत ओळख झाली. त्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बुटीक वस्तू विक्रीचा बिझनेस असल्याचे आणि कुर्ल्यात स्वतःचे घर असल्याचे स्वातीला सांगितले. दोघे अनेकवेळा भेटले आणि त्यांनी एकत्र येण्याचे ठरवले. स्वातीने ही बाब घरच्यांच्या कानावर घातली. काही दिवसांनी मग दोन्ही परिवारामध्ये लग्नाची बोलणी सुरु झाली व दोघेही विवाहबंधनात अडकले. आता सर्व काही मनासारखे झाल्याच्या आनंदात सुखी संसार करण्याचे स्वप्न स्वाती पाहत होती. पण लग्नाच्या पहिलाच रात्री तीच्या स्वप्नांना सुरुंग लागला. पहिल्याच रोमँटिक क्षणाच्या रात्री त्याने स्वातीला तो खूप आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत पाच लाख दे नाहीतर तिच्या शरीराला हातही लावणार नाही अशी अजब अट घातली. केवळ हेच नाही तर यानंतरही अनेक कारणे सांगून त्याने स्वातीला कर्जबाजरी करून नंतर काही महिन्यातच तिला १६ ते १७ लाखांचा चुना लावून हा ‘लखोबा लोखंडे’ पसार देखील झाला.
याबाबत स्वातीने पोलिसांची मदत घेणायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ही कौटुंबिक बाब असल्याचे सांगत हात झटकले. आता त्याचा माग काढण्यासाठी स्वातीने स्विफ्ट डिटेक्टिव्ह या डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली असून आता त्या माध्यमातून त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट वरून सावज हेरने आणि लुटणे असा त्याच्या धंदा असल्याचे समजले. याआधी त्याने असे ३ प्रकरणे केल्याचे देखील माहिती मिळाली आहे. त्यामध्ये त्याची आई देखील सामील आहे. आता लवकरच स्वाती स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मदतीने पुरावे गोळा करून त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडून त्याचा परदा फाश करणार आहे. लग्नाच्या अमिशाने फसवणूक झालेली स्वाती हे एक प्रतिनिधीक उदाहरण असले तरी पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेल्या अनेक तरुणीसोबत असे ‘मॅट्रिमोनियल फ्रॉड’ होत आहेत. त्यासाठी या तरुणींनी मॅट्रिमोनियल साईट वरून संपूर्ण विश्वास न टाकता भावी वधु किंवा वराची माहिती घेऊन त्याची पडताळणी करून मगच विवाहाचा निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. कारण समाजात असे अनेक लखोबा लोखंडे या तरुणींची फसवणूक करण्यासाठी व तिच्या आयुष्यासोबत खेळण्यासाठी टपून बसलेले आहेत. परंतु त्यांना ओळखणे देखील आव्हानात्मक बनलेले आहे.
स्वातीच्या बाबतही असेच झाले. अनेक प्रकरणात विवाह करताना मुली घरच्यांना सांगत नाहीत आणि मग फसतात. परंतु या प्रकरणात तर दोन्ही घरचे इन्व्हॉल्व होते. या लखोबाने स्वतःचा म्हणून मित्राचा फ्लॅट त्यांना दाखवला. पहिल्या रात्रीचा अनुभव आल्यावर स्वातीने ही बाब घरच्यांना सांगितली नाही. तिला वाटले त्याला त्याचा खरोखर आर्थिक प्रॉब्लेम असेल असे समजून दुर्लक्ष केले. पण यानंतरही त्याने हनिमून ला जाऊ असे सांगून स्वातीला कर्ज काढायला लावले. घर रेंटने घेतले तेथे फर्निचर केले. खर्चासाठी तिने डाग दागिने देखील विकले. असे अनेक करणे सांगून १५ ते १६ लाख तिच्याकडून उकळले आणि अवघ्या ४ महिन्यात नवरोबाने त्याच्या आईने म्हणजे स्वातीच्या सौसून पळ काढला. जाताना अगदी निरमा डिटर्जंट, किराणा माल, सोफा, टीव्ही देखील चट पसार केले. यावेळी स्वाती माहेरी गेली होती. परत येऊन पाहते तर हा प्रकार तिच्या लक्षात आला. त्यांचा मोबाईल देखील स्विच ऑफ येत होता. काहीच संपर्क होत नसल्याने यानंतर स्वातीने स्विफ्ट डिटेक्टिव्ह ची मदत घेतली असून माहिती आणि पुरावे गोळा करत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना स्विफ्ट डिटेक्टिव्ह च्या संचालक प्रिया काकडे म्हणाल्या की, आमच्या टीम ने या प्रकरणाची माहिती घेण्यास आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचे कुर्ल्यामध्ये १० बाय १० चे घर असून तेथे त्याचे वडील एकटेच राहतात. त्यांचा याबाबत काही संबंध नाही. पण त्यांचा मुलगा आणि आणि पत्नी मात्र फरार असून त्याचे दुसऱ्या मुलीसोबत आता अफेअर सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. तो अजूनही रिल्स बनवतो आणि त्या माध्यमातून आणखी काही तरुणींना जाळ्यात ओढू शकतो. त्याची सर्व माहिती गोळा करून त्याच्यापासून घटस्फोट घेणे, पोटगी मिळवणे आणि लुबाडलेली पूर्ण रिकव्हर करणे हा आमचा पुढील उद्देश आहे.
जेव्हा तुम्ही मॅट्रिमोनियल साईटवर कोणाला भेटता तेव्हा त्याबाबत सर्व माहीती करून घ्या. अशा सायिटवर जवळपास 90 टक्के प्रोफाइल फेक असतात. अगदी मुलींना विकण्यापर्यंत काही केसेस घडलेल्या आहेत. म्हणून लग्न जमवण्यासाठी सोशल मीडिया हा योग्य प्लॅटफॉर्म नाही. भावी वराची स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सी च्या मदतीने प्री मॅट्रिमोनियल प्रोफाइल काढा. त्याने सांगितलेल्या प्रॉपर्टीवर प्रत्यक्ष जा. त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याचे क्रिमिनल रेकॉर्ड काढा. शेजारी पाजारी चौकशी करा. जरी असा फ्रॉड झाला तरी पोलीस कौटुंबिक बाब म्हणून त्यात फारसी दखल देत नाही. म्हणून स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मदतीने त्याची पूर्ण माहिती काढून त्याच्या विरोधात पुरावे गोळा करून तुम्हाला न्याय देण्याचे आणि एक प्रकारे खूप मदत करण्याचे काम करते. अशा प्रकारच्या अनेक केसेस आम्ही सोडवल्या आहेत. – प्रिया काकडे, संचालक, स्विफ्ट डिटेक्टिव्ह
स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्वेस्टीगेशन बद्दल –
स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सी हि भारतातील एक नावाजलेली डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. या एजेन्सीच्या माध्यमातून प्रिया काकडे यांनी २००६ पासून आजतागायत १०४५ केसेस यशस्वीरित्या हाताळल्या आहेत. यामध्ये न्यायालयीन बाबींसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्यासाठी अतिशय कौशल्यपूर्ण कामगिरी केली आहे. कॉर्पोरेट केसेस, विवाहबाह्य संबंध, आर्थिक फसवणूक सारख्या केसेसचा यामध्ये समावेश आहे.