मते देईपर्यंत पात्र, अन मतदान झाल्यावर अपात्र .. पहिल्या टप्प्यात ५ लाख वजा .. आता पुढे पहा आणखी किती होतील वजा …
आम्हालाही नकोय योजना पण ऑनलाईन लिंक पाठवा -अनेक महिलांची मागणी
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकुण अपात्र महिला – ५,००,०००
मुंबई- महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली. या अपात्र महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या सुमारे 2 लाख 30 हजार महिलांचा समावेश आहे हे विशेष.
महायुती सरकारने गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची अर्थसहाय्य केले जात आहे. त्याचा महायुतीला निवडणुकीत मोठा फायदा झाला. पण आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. त्यात अनेक महिलांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर येत आहे. विशेषतः इतर सरकारी योजनांतील लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामु्ळे सरकार या प्रकरणी काटेकोट पडताळणीवर भर देत आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी एका ट्विटद्वारे लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती दिली. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या 2 लाख 30 हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे 65 हून अधिक असणाऱ्या 1 लाख 10 हजार महिलांची नावेही या योजनेतून हटवण्यात आली आहेत.
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1 लाख 60 हजार महिलांची नावेही लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 5 लाख महिला लाभार्थ्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.