पुणे-पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळा येथील टायगर पॉइंटजवळ असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी हे टोकाचे पाऊल का घेतले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ हे खडकी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर देखील नव्हते आले. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्कही होत नव्हता. त्यानंतर आज त्यांचा शोध लागला तेव्हा अण्णा गुंजाळ हे लोणावळा येथील टायगर पॉइंट जवळ एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. टायगर पॉइंटजवळ त्यांची गाडी देखील सापडली आहे. या गाडीत एक डायरी देखील पोलिसांना सापडली आहे. पोलिस आता या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
दरम्यान, खडकी पोलिस यांच्यासह लोणावळा ग्रामीण पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले असून मृत पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच त्यांची गाडी देखील पोलिसांनी टायगर पॉइंटवरून ताब्यात घेतली आहे. आता त्यांच्या गाडीत सापडलेल्या डायरीचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या डायरीमध्ये कदाचित आत्महत्येचे कारण सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पुण्यात एका वाहतूक पोलिसावरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसावरच प्राणघातक हल्ला केल्याचे समजते. यात वाहतूक पोलिस राजेश गणपत नाईक जखमी झाले असून उपचार सुरू आहेत. ही घटना पुण्यातील फुरसुंगी भेकराईनगर चौकात घडली.
पुण्यातील फुरसुंगी भेकराईनगर चौकात राजेश नाईक हे कर्तव्यवर असताना त्यांना एक दुचाकी चालक फोनवर बोलत गाडी चालवताना दिसला. तेव्हा त्यांनी त्याला अडवले. मात्र, याचा राग येऊन दुचाकी चालकाने रस्त्यात पडलेला दगड वाहतूक पोलिस राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.