Home Blog Page 470

पिंपरी – चिंचवडच्या विकास आराखड्याचा मुद्दा:देवस्थानच्या जमिनींवरील आरक्षणे रद्द करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

0

पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखडा अंतिम करताना कोणत्याही भूमिपुत्रावर अन्याय होणार नाही. गोरगरिबांची घरे बाधित होणार नाहीत. देवस्थानच्या जमिनींवर पडलेल्या आरक्षणांची तपासणी करुन रद्द केली जातील, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सभागृहात दिले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि नगर रचना विभागाने शहराचा प्रारुप विकास आराखडा 15 मे 2025 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यावर 14 जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. भाजपाचे आमदार महेश लांडगे व आमदार शंकर जगताप यांनी या प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली. आमदार शंकर जगताप म्हणाले की, डीपी तयार करताना चुकीच्या पद्धतीने केला आहे. बांधकाम परवाने घेतलेल्या जमिनींवर आरक्षण टाकले आहे. पुनावळे येथील कचरा डेपोचे आरक्षण रद्द केले आणि त्या ठिकाणी कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे आरक्षण टाकले आहे. एचसीएमटीआर मधील साडेतीन किलोमीटरवर लिनिअर गार्डन विकसित केले आहे.

पण, प्रारुप विकास आराखड्यामध्ये त्याचा विचार केलेला नाही. आहे तसे आरक्षण ठेवले आहे. थेरगाव येथेसुद्धा हजारो नागरिक बेघर होणार आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मंत्री यांना माहिती दिली. त्यामुळे मंत्री यांनी गोलगोल फिरवणारे उत्तर दिले. सभागृहाला अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. बांधकाम परवागनी घेतलेले आरक्षणे रद्द करावीत.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, सध्या प्रारुप आराखडा तयार झाला आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील. पण, जुन्या डीपीतील 850 आरक्षणे नव्याने प्रस्तावित केली आहेत. जागेवर जावून आरक्षणे निश्चित करावीत. मोशी-आळंदी भागातील कत्तलखाना मुख्यमंत्र्यांनी रद्द केला. देवस्थानच्या जमिनींवर आरक्षण पडले आहे. ती आरक्षणे रद्द केली पाहिजेत. शहरातील गोरगरिबांनी अर्धा गुंठा, एक गुंठा घेवून बांधलेली घरे बाधित होता कामा नये. भूमिपुत्र भूमिहीन झाला नाही पाहिजे. यासह कोणावरही अन्याय होवू नये, २५ एकरावर असलेले चऱ्होलीतील गार्डनचे आरक्षण कमी करावे आणि ग्रामस्थांसह स्थानिक नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानच्या जमिनींवरील प्रस्तावित आरक्षणे रद्द करावीत.

आमदार लांडगे पुढे म्हणाले, भूमिपुत्रांच्या हिताचा विचार केला पाहिजे. शेतकरी भूमिहीन होता कामा नये. ब्लू लाईन व रेड झोनमधील आरक्षणे विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळावा. यासाठी ‘युडीसीपीआर’च्या नियमावलीमध्ये सुधारणा केली पाहिजे. प्रत्येक पिंपरी-चिंचवडकरांनी दाखल केलेल्या हरकती-सूचनांवर नि:पक्षपणे कार्यवाही केली पाहिजे. विकास आराखडा अंतिम करावा.

या दोन्ही आमदारांच्या मागणीनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी योग्य ती काळजी घेण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, एमआरटीपी अधिनियम 1966 कलम 22 अन्वये सुधारित आराखड्यामध्ये आरक्षणे प्रस्तावित केली जातात. डीपीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तक्रारी व सूचनांचा विचार केला जातो. त्यानंतर प्रारुप आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी जातो. आराखड्यामध्ये सुधारणा करण्याचे अधिकार शासनाला आहेत. पूर्वीपासून असलेल्या देवळांवर आरक्षणे पडली असतील, तर ती तपासून घेतली जाईल.

शासन कुणावरही अन्याय होवू देणार नाही. हरकती आणि सूचनांचा विचार करुन पिंपरी-चिंचवडचा डीपी निश्चित केला जाईल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. घरमालकांवर अन्याय होणार नाही, अशी शासनाची भूमिका आहे आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

तिसऱ्या मजल्यावर खिडकीत अडकली 4 वर्षांची चिमुरडी; अग्निशमन जवानाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुणे शहरातील गुजर निंबाळकरवाडी येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये थरारक प्रकार घडला आहे. चार वर्षांची भाविका ही तिच्या आईने, मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना तिसऱ्या मजल्यावरील घरात एकटीच बंद करून बाहेरून कुलूप लावले. घरात अडकलेली भाविका चालत खिडकीजवळ गेली आणि लोखंडी गजामधून डोकं बाहेर काढत सज्जावर पोहोचली. तिथून तिने खिडकीचा गज घट्ट पकडून ठेवला, कारण तीला समजलं की ती धोकादायक ठिकाणी आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

हा धक्कादायक प्रकार पाहून सोसायटीतील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी अग्निशमन दलात तांडेल म्हणून कार्यरत असलेले योगेश चव्हाण हे सुटीमुळे घरीच होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली, मात्र दरवाजाला कुलूप असल्याने त्यांनी पुन्हा खाली जाऊन मुलीच्या आईकडून चावी घेतली. त्यांनी दरवाजा उघडत सज्ज्यावर अडकलेल्या भाविकाला आत खेचून सुखरूप वाचवले.ही घटना सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी घडली. काही क्षणांनी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. परिसरात काही वेळ गोंधळाची स्थिती होती, मात्र भाविका सुखरूप आत घेतल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अमराठी व्यापाऱ्यांना हिरवा कंदिल मग मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाही? देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

मुंबई-अमराठी व्यापारांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून मराठी अस्मितेसाठी शांती पार्क येथील ओम शांती चौकापासून ते मिरा रोड रेल्वे स्थानकापर्यंत मनसेकडून मोर्चाचे आयोजन करण्याता आले होते. पोलिसांनी मोर्चाला नाकारली होती, मध्यरात्रीपासून मनसेच्या मुख्य नेत्यांना अटकही झाली होती. तर सकाळी आंदोलनस्थळ आलेल्या कार्यकर्त्यांसह लोकांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरूवात केली. मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी का नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोणीही मोर्चाला परवानगी मागितली की आपण देतो. या मी पोलिस आयुक्तांना विचारलं की परवानगी का दिली नाही? यावर त्यांनी सांगितलं की, मोर्चाच्या मार्गासंदर्भात चर्चा सुरू होती पण ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा मार्ग होते ती तिथे संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असं होतं की, काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे इनपूट आले होते की त्यांना वेगळ्या प्रकारची कारवाई करायची आहे. पोलिसांनी इतकंच सांगितलं की नेहमीचा जो मार्ग आहे तो घ्या. पण त्यांनी नकार दिला आणि आम्ही हाच मार्ग घेणार असं म्हटल्यामुळे पोलिसांनी नाकारल्याचं मला सीपींनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.जर मनसेचं काय कोणालाही मोर्चा काढायला परवानगी मिळेल पण आम्हाला इथेच काढायचा आहे, अशाच प्रकारचा काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये. शेवटी आपल्याला एकाच राज्यात एकत्रिपतणे राहायचं आहे, राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे. योग्य मार्ग घेऊन परवानगी मागितली तर ती कधीही मिळेल. आजही मिळेल आणि उद्याही मिळेल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
सीपींनी मला सांगितलं आहे, जो मार्ग दिला त्यावर अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. त्यांनी कोणत्याही मार्गाचा आग्रह केला नाही. मात्र यांनी स्पेसिफिक अशा मार्गाचा आग्रह केला जिथे मोर्चा काढणं कठीण आहे. त्यांनी सभा घ्यायची मागणी केली त्यालाही आम्ही मान्यता दिली. मात्र त्याच ठिकाणी मोर्चा काढायचा होता, ज्यातून काही अडचणी निर्माण झाल्या असत्या त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. इतके वर्षे आपण मोर्चे काढत असतो. आता मागे ५ तारखेला दोन संघटनांनी मोर्चा काढायचं ठरवलं होतं. चर्चा होऊन तेव्हा मार्ग ठरला होता. पण एखाद्या मोर्चाने जर गडबड होणार असेल किंवा पोलिसांना कंट्रोल राखणं अवघड जात असेल. मिरा भाईंदरच्या स्टेशनवर तो मोर्चा गेला असता तर तु्म्हालाही मीहित आहे तिथे कशी परिस्थिती असते. पोलिसांनी सातत्याने मार्ग बदलायला लावला पण त्यांनी बदलला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पोलिसांची गुंडगिरी, हिंमत असेल तर मला अटक करा; मंत्री सरनाईकांचं चॅलेंज, थेट CM विरोधी भूमिका

मुंबई: मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने आज मध्यरात्रीपासून शहरात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या या कारवाईवर मराठी भाषिक संताप व्यक्त करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पोलिसांची ठामपणे पाठराखण केली. आम्हाला अमूक एका मार्गावरून मोर्चा काढायचा आहे, अशी भूमिका घेऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवणं योग्य नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोर्चाच्या आयोजकांना फटकारलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली असतानाच सरकारमधीलच एक मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मोर्चेकरांची बाजू घेत पोलिसांवर गंभीर आरोप केले असून मी या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असल्याचं जाहीर केलं आहे.

“आज सकाळपासून पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी माणसाची गुंडगिरीच्या मार्गाने जी धरपकड सुरू केली आहे त्याचा मी निषेध करतो. मुख्यमंत्र्यांकडे मी हा निषेध व्यक्त केला आहे. आता मी स्वत: या मोर्चात सहभागी होण्यासाठी मिरा भाईंदरकडे निघालो आहे. पोलिसांची हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी,” असं खुलं आव्हान प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना दिलं आहे. एकीकडे मोर्चावरून मुख्यमंत्री पोलिसांची पाठराखण करत असतानाच त्यांच्याच मंत्रिमंडळातील सरनाईक मात्र पोलिसांवर आगपाखड करत असल्याने सरकारमध्ये या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं उघड झालं आहे.

मराठी स्वाभिमान मोर्चावरून महायुतीत मतभेद:पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले ,मी प्रथम मराठी,नंतर आमदार ,मंत्री ..

मराठी भाषिकांच्या आंदोलनात पोलीस कारवाईमुळे मोर्चेकरी संतापले; मिरा भाईंदरमध्ये गंभीर स्थिती

पोलिस राजकीय पक्षाचा अजेंडा चालवताय का?
मुंबई-प्रताप सरनाईक म्हणाले मी पण शेवटी मराठी आहे, आमदार किंवा मंत्री नंतर पण मराठी आधी आहे. मराठी बांधव जर मोर्चा काढत असतील तर त्यांना परवानगी दिली पाहिजे. ती देऊ शकत नसाल तर त्यांच्यावर कारवाई करा, पण रात्री-अपरात्री जाऊन अशी धरपकड करणे योग्य नाही. कुणाला रात्री अशी अटक करायला महायुती सरकारने सांगितले नाही. गृह खात्याने अशी काही आदेश दिले नाही, मी यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. पोलिसांना असे वागणे शोभत नाही, त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. मराठी माणसांच्या भावना लक्षात घेता पोलिसांची कार्यपद्धती ही निंदणीय आहे. पोलिस कुठल्यातरी राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत आहे का? असा सवाल माझ्या मनात निर्माण झाला आहे, असे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

दरम्यान प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की,मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मी मंत्री नंतर आहे, आधी मराठी आहे. पोलिसांनी एका पक्षासाठी (भाजप) काम करू नये. व्यापाऱ्यांच्या (गुजराती, मारवाडी) मोर्चाला परवानगी दिली जाते, मग मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी का नाही?

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मी पोलिस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. गृहखात्याचे कोणतेही आदेश नसताना पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून ही धरपकड केली हे समजून घ्यावे लागेल. मीरा रोडमध्ये मराठी स्वाभिमान मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापले असून, याचे पडसाद महायुतीतही उमटू लागले आहेत. शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिस कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले आहे.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, कधी-कधी पोलिसांच्या काही भूमिकेबद्दल संशय निर्माण होतो. मी आताच पोलिस आयुक्तांशी चर्चा करत नाराजी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांना पोलिसांनी परवानगी दिली नव्हती तरी त्यांनी मोर्चा काढला. मग जर मराठा एकीकरण समीतीचे लोक मीरा-भाईंदरमधील मराठी लोक एकत्र येत मोर्चा काढत असतील आणि त्याला परवानगी देत येत नसेल तर शांततेच्या मार्गाने त्यांना तो काढू द्या. पण रात्री-अपरात्री कुणाच्या घरी जायचे आणि त्यांना अटक करायची त्यांच्या नावाने नोटीस काढायची हे चुकीचे आहे.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, महायुतीचे सरकार आहे, आमच्या गृहखात्याने पोलिस खात्याला असे काही आदेश दिलेले नाही. असे असताना शहरातील वातावरण खराब करत असतील तर कुठल्यातरी राजकीय पक्षाला किंवा नेत्याला फायदा व्हावा म्हणून पोलिसांकडून ही कारवाई सुरू आहे का? असा सवाल सरनाईक यांनी केला आहे.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रताप सरनाईक पण शेवटी मराठी आहे, आमदार किंवा मंत्री नंतर पण मराठी आधी आहे. मराठी बांधव जर मोर्चा काढत असतील तर त्यांना परवानगी दिली पाहिजे. ती देऊ शकत नसाल तर त्यांच्यावर कारवाई करा, पण रात्री-अपरात्री जाऊन अशी धरपकड करणे योग्य नाही. कुणाला रात्री अशी अटक करायला महायुती सरकारने सांगितले नाही. गृह खात्याने अशी काही आदेश दिले नाही, मी यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. पोलिसांना असे वागणे शोभत नाही, त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. मराठी माणसांच्या भावना लक्षात घेता पोलिसांची कार्यपद्धती ही निंदणीय आहे. पोलिस कुठल्यातरी राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत आहे का? असा सवाल माझ्या मनात निर्माण झाला आहे.

‘अशा’ मंडळांना आर्थिक साह्य करणार नाही:पुनीत बालन

डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुढाकार

पुणे :
पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून अवघ्या जगाचे आकर्षण झाला आहे. हा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि धार्मिक व आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे साजरा झाला
पाहिजे, यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जाहीर केली आहे.
‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या वाद्य पूजन कार्यक्रमात बालन बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी, कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बालन म्हणाले, ‘‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला १३२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत जनतेने एकत्र येऊन लढा देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचे आढळते. यामुळे गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे, हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. त्यामुळे डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची गरज असून त्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे.’’

गणेश मंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी माणिकचंद ऑक्सिरीच आणि पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून जाहिरातीच्या स्वरुपात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य केले जाते. परंतु आपल्या गणेशोत्सवाचे वैभव कायम राखण्यासाठी डीजे वर नको ती गाणी लावून आपल्या बाप्पाचे पावित्र्य भंग करणार्या मंडळांना यापुढील आर्थिक साह्य केले जाणार नाही, असे बालन यांनी स्पष्ट करतानाच आपल्या हिंदू देवतांचा उत्सव हा धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे अशी ठाम भुमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे समाजातील सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.

भारतीय जनता पक्षाचे षड्यंत्र:मनसे नेत्यांच्या अटकेनंतर संदीप देशपांडे यांचा संताप

हिंदू मुस्लीम झाले आता ..

गुजराती ,मारवाडी विरोधात मराठी वादंग पेटविणारे राजकारण हजारो कोटीच्या महापालिकेच्या प्राप्तीसाठी

बळी जाणार सामान्य नागरिकांचे …

मुंबई–मीरा भाईंदर मध्ये उत्तर भारतीय हिंदी भाषिकांकडून काढण्यात आलेल्या राज ठाकरे यांच्या विरोधातील मोर्चाला उत्तर म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील मीरा भाईंदर मध्ये मराठी व्यापाऱ्यांचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मोर्चाच्या आधीच पोलिसांच्या वतीने मोर्चाला परवानगी नाकारत या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काल मध्य रात्रीपासूनच मनसेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही भारतीय जनता पक्षाची दडपशाही असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

नुकताच भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणीबाणी विरोधी दिवस पाळण्यात आला. मग आता महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते. ही आणीबाणी नाही तर काय? महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना मोर्चा काढण्याची परवानगी मिळते. आणि मराठी माणसाला मिळत नाही? यावर त्यांनी आक्षेप घेतला. आता मनसेच्या नेत्यांना अटक केली असली तरी देखील सर्वसामान्य मराठी माणूस या मोर्चाचे नेतृत्व करेल आणि हा मोर्चा निघेलच असा दावा देखील देशपांडे केला आहे.

या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल. मात्र मीरा-भाईंदर परिसरामध्ये मोर्चा निघणार असल्याचे देखील संदीप देशपांडे यांनी ठणकावून सांगितले. ही पोलिसांची दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजराती व्यापाऱ्यांना खुली सुट द्यायची आणि मराठी माणसाला आत टाकायचे, याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा देखील देशपांडे यांनी दिला आहे.

ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे दुबे सारखे नेते, प्रक्षोभक विधान करत आहेत, त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत. मात्र, आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. आम्ही असल्या कोणत्याही घाणेरड्या वादाला बळी पडणार नाही. हे सर्व शड्यंत्र सुरू आहे. महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण करायचे षड्यंत्र भारतीय जनता पक्ष करत आहे. या षड्यंत्रात आम्ही बळी पडणार नाही. त्याचे नेते आताच का बोलले? आताच हे कुठून निर्माण झाले? हे जाणीवपूर्वक बिहार निवडणुकीमध्ये मध्ये याचा फायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहणारे गुजराती, उत्तर भारतीय, बिहारी लोकांचे मला फोन आले आहेत. त्यांचा याला पाठिंबा नसल्याचे त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले आहे. हे भारतीय जनता पक्षाचे षड्यंत्र आहे. त्यामुळे असे भडक वक्तव्य देऊन भाजप तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे वातावरण मराठी विरुद्ध अमराठी तयार व्हावे आणि त्याचा फायदा आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये उचलण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न चालू आहे. दुबे महाराष्ट्रात आहे का? कुठे बसलाय? बिहारमध्ये बसून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील देशपांडे यांनी केला आहे. भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकल्या आहेत. असा आरोप देखील त्यांनी केला. महाराष्ट्रात आम्हाला शांती हवी आहे. असे वाद पेटवण्याचा प्रयत्न जो करत असेल सरकारने त्यावर योग्य ती कारवाई करावी. कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. अशी धमकी आम्हाला दिली जात आहे, मग अशा लोकांवर महाराष्ट्र सरकारने कारवाई करायला हवी, अशी मागणी देखील देशपांडे यांनी केली आहे.

मराठी माणसांना आपटण्याची भाषा करणाऱ्या निशिकांत दुबेला तुडवायचे की तुडवून घ्यायचे हे ठरवा

मुंबई-मराठी माणसांना उचलून आपटण्याची भाषा करणाऱ्या निशिकांत दुबे यांना तुडवायचे की त्याच्याकडून तुडवून घ्यायचे हे ठरवा, असा तिखट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना केला आहे. निशिकांत दुबे यांनी दिलेली धमकी कोणत्याही एका व्यक्तीसाठी नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री व आमदारांसाठी आहे, असे त्या म्हणाल्या.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाराष्ट्राचे देशाच्या विकासात योगदान काय? असा अवमानकारक सवाल उपस्थित केला होता. राज व उद्धव ठाकरे यांनी बिहार व उत्तर प्रदेशात येऊन दाखवावे तिकडे त्यांना उचलून आपटतील, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांना उपरोक्त सवाल केला आहे.

निशिकांत दुबे यांची धमकी केवळ एखाद-दुसऱ्या व्यक्तीसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री व आमदारासाठी आहे. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मराठी आहेत. ही धमकी त्यांनाही आहे. दुबेची धमकी महाराष्ट्रातील भाजपचे सर्वच मंत्री व भाजपाईंसाठी आहे. त्यांनाही त्याने तुडवायची भाषा केली आहे. आता त्याच्याकडून तुडवून घ्यायचे की निशिकांत दुबेला तुडवायचे हे भाजपच्या मराठी आमदार व खासदारांनी ठरवावे, असे सुषमा अंधारे सोमवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकशाहीचा उमाळा फुटला होता. महाराष्ट्रात कुणालाही हिंसा करू देणार नाही असे ते म्हणाले होते. तसा अविर्भावही दाखवत होते. मग आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वापरलेली भाषा कोणत्या शासन पद्धतीत बसते. या प्रकरणी फडणवीस यांची काय भूमिका आहे? भाजप खासदार मराठी माणसाला आपटून मारण्याची भाषा करत आहे. हिंमत असेल तर त्यांनी बाहेर पडावे. मग आम्ही काय करायचे ते करू. पण पहिला वार आम्ही करणार नाही. पण आमच्यावर वार झाला तर तो हात मुळापासून उखडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला दिलेली धमकी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्वच भाजप नेत्यांसाठी आहे. त्याने तुम्हाला तुडवायची भाषा केली आहे. तुमच्या पाठीला रबर नसेल, कणा असेल, मराठी मान, अभिमान, मराठीचा ताठा व स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेला तुडवायचे की त्याच्याकडून तुडवून घ्यायचे हे ठरवा, असेही सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या.

शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार १५ ऑगस्टच्या आधी महाराष्ट्रात परत येणार !

सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांची माहिती

मुंबई, दि. 7 जुलै
शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा १५ ऑगस्टच्या आधी लंडनहून महाराष्ट्रात परत आणू, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज दोन्ही सभागृहात दिली.

विधानसभा सभागृहामध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ नुसार विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने जी चर्चा उपस्थित केली होती तसेच विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावाला उत्तर देताना आज सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री अँड आशिष शेलार यांनी उत्तर दिले.

यावेळी त्यांनी सांगितले की,
नागपूरच्या भोसले घराण्यातील शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसले यांची तलवार ही लिलावात निघाली होती आणि त्याला भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची मालमत्ता समजून ती पुन्हा आणण्यासाठी एक चांगला प्रयोग, चांगला प्रयत्न हा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रयत्नातून सफल झाला. आपल्या इतिहासातली एक विरासत असलेली ही पराक्रमाची आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाची असलेली तलवार ही आपण पुन्हा एकदा मिळवण्यात आपण सफल झालेलो आहोत. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रघुजी भोसले प्रथम १६९५ ते १७५५ हे मराठा सैन्यातील सेनापती होते नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक त्यांना केले. शौर्यासाठी आणि युद्धनीतीसाठी रघुजी भोसले यांना ‘सेना साहेब सुभा’ ही पदवी छत्रपती शाहू महाराजांनी दिली. २९ एप्रिल २०२५ ला त्या ठिकाणी सोतेबायस लंडनमधल्या एका लिलाव करणाऱ्या कंपनीने ती तलवार ज्याच्यावर रघुजी भोसले यांचं नाव कोरलेला आहे आणि त्या तलवारीची वजमूठ सुद्धा सोन्याची आहे आणि या युद्धामध्ये पराक्रमात वापरली गेलेली तलवार कदाचित त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतातून महाराष्ट्रातून परदेशात गेली.
त्या लंडनच्या लिलावात गेल्यावर आपण महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याला ज्या गतीने परवानग्या मिळण्यामध्ये कार्यालयीन व्यवस्था उभ्या केल्या. त्या व्यवस्थेमध्ये प्रवीण चल्ला यांच्या माध्यामतून महाराष्ट्र शासनाने त्या लिलावात बोली केली आणि जवळ जवळ ६९ लाख ९४ हजार ४३७ करासहीत ही तलवार आपल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्या व्यवस्थेबरोबर करारनामा आपला बदली झाला. त्यासाठीच्या खर्चास २१ मे २०२५ रोजी मान्यता दिली. आता कस्टम क्लीअरन्स, पॅकिंग, हाताळणी या सगळ्या बाबतीसाठी स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती करून १५ ऑगस्टच्या आधी जुलै महिन्यातच आपल्या मराठ्यांच्या, मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या पराक्रमाची साक्ष असलेली ही तलवार आपण सन्मानपूर्वक महाराष्ट्रात या भूमीमध्ये परत आणू आणि ती सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी सविस्तर माहिती मंत्री शेलार यांनी सभागृहासमोर ठेवली.

पुणे शहरासाठी पूर्णवेळ रेशनिंग ऑफिसर (एफ डी ओ ) नेमावा-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

0

मुंबई : अन्न धान्य वितरणातील गैरप्रकार टाळले जावेत आणि कारभार सुरळीत व्हावा, याकरीता पुणे शहरासाठी पूर्णवेळ रेशनिंग ऑफिसरची (अन्नधान्य वितरण अधिकारी) नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत आज (सोमवारी) बोलताना केली.

विभागातील पब्लिक लॉगिन मध्ये ऑनलाईन काम करताना आरसीएमएस ही साईट सुरळीत चालत नाही आणि ती खूप स्लो असते आणि बऱ्याचदा बंदही असते, त्यामुळे नवीन रेशन कार्ड काढणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे अशी नागरिकांची कामे होत नाहीत, अशी माहिती शिरोळे यांनी सभागृहाला दिली.

तसेच नुकतेच पुणे शहरातील काही रेशन दुकानातून ग्राहकांना सिमेंटमिश्रित गहू आणि तांदूळ वितरीत करण्यात येत असल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला. असे प्रकार सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळणारे आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सभागृहात बोलताना सांगितले.

पुणे शहरासाठी पूर्ण वेळ रेशनिंग ऑफिसर (एफ डी ओ) उपलब्ध नसल्यामुळे देखील असे गंभीर प्रकार घडत आहेत. नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाने पूर्णवेळ रेशनिंग ऑफिसर नेमावा आणि पुण्यातील रेशनिंग ऑफिसचा कारभार सुरळीत करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

सीडीके इंडियातर्फे पुण्यात कॉन्व्हर्न्स २०२५: गाणी, गोष्टी आणि अविस्मरणीय क्षणांच्या माध्यमातून नाती साजरी

पुणे– सीडीके इंडिया या आघाडीच्या ऑटोमोटिव्ह रिटेल सॉफ्टवेयर पुरवठादार कंपनीने कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या आपल्या संस्कृतीला पुण्यातील कॉनर्व्हजन्स २०२५ या वार्षिक कौटुंबिक सोहळ्यात मध्यवर्ती स्थान दिले. ही संध्याकाळगाणीअविस्मरणीय क्षण आणि सर्वांच्या चेहऱ्यावरच्या हास्याने रंगली होती. या सोहळ्यात कंपनीचे कर्मचारी आपल्या कुटुंबासह सर्जनशीलता, परस्परांशी असलेले नाते आणि सामाजिक भावना साजरी करण्यासाठी सहभागी झाले होते.

उपस्थितांचे स्वागत करताना सीडीके इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप कुमार जैन यांनी कुटुंबाचा खरा अर्थ उलगडून सांगितला. कुटुंबाची व्याख्या प्रत्येकाची भूमिका किंवा नावावरून ठरत नसतेतर तुमच्या पाठीशी उभे राहाणारेतुम्हाला प्रोत्साहन देणारे आणि तुम्हाला स्वतःवर शंका वाटत असतानाही विश्वास दाखवणाऱ्यांवरून ठरत असतेअसे ते म्हणाले. प्रत्येकाला या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी प्रेरणा देत त्यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांबरोबर नृत्य करायलाआपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबाशी कनेक्ट व्हायला आमंत्रित केलं. एरवी टीम मीटिंगच्या नजरेतून एकमेकांकडे पाहाणारे कर्मचारी मनमोकळ्या हास्यासह खुलले होते.

या वेळी लाइव्ह परफॉर्मन्सेस तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या सादरीकरणाचा उपस्थितांनी आनंद घेतला. मनमुराद संगीत, नृत्य, कला आणि खास स्किट्ससह सर्वजण विनोद व मनोरंजनात रंगले होते. भारताच्या सैनिकांना आदरांजली वाहणाऱ्या फिनाले परफॉर्मन्सनं ही संध्याकाळ नव्या उंचीवर नेली. या परफॉर्मन्सने सर्वांना भावनिक करत अनोख्या पर्वणीचा अनुभव दिला. सर्वांनी या परफॉर्मन्सला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. सन्मान आणि पुरस्कार प्रदान सोहळ्यात वेगवेगळी पदांवरच्या व्यक्ती व टीम्सने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली. यातून कंपनीची प्रशंसा करण्याची संस्कृती ठळकपणे दिसून आली.

या वेळी आयोजित करण्यात आलेल्या औपचारिक सन्मान सोहळ्यात सीडीके इंडियाच्या ह्युमन रिसोर्सेस विभागाचे वरिष्ठ संचालक श्री. आशिष सक्सेना यांनी पडद्यामागे राहात लक्षणीय योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेतली. कार्यक्रमाची सांगता ‘मेकिंग ऑफ’ व्हिडिओने झाली व त्यात बॅकस्टेजवरचे क्षण, सर्वांनी केलेले प्रयत्न, हास्य आणि या कार्यक्रमाला अविस्मरणीय करणारी उर्जा यांची झलक पाहायला मिळाली.

पुण्यात महिंद्रा सिटाडेलमध्ये नवीन टॉवरची उभारणी

हा टॉवर एकूण 2500 कोटी रु. GDV असलेल्या प्रकल्पाचा एक भाग

पुणे, – महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा असलेल्या महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल) ने महिंद्रा सिटाडेल येथे नवीन टॉवरच्या उभारणीची घोषणा केली आहे. या टॉवरमध्ये तरुण व्यावसायिक, छोटी कुटुंबे आणि प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी डिझाइन केलेली प्रीमियम 1 बीएचके घरे असतील. हा टॉवर पिंपरी-चिंचवड, पुणे येथील अंदाजे ~9.66-एकर निवासी विकास प्रकल्पाचा एक भाग असून त्याचे एकूण ग्रॉस डेव्हलपमेंट मूल्य (GDV) जवळपास 2500 कोटी रु. आहे. याआधीच्या टप्प्यांना मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर हा टॉवर सादर करण्यात आला असून, उच्च दर्जाच्या नागरी जीवनशैलीसोबतच संत तुकाराम मेट्रो स्थानकाजवळ असल्यामुळे उत्कृष्ट दळणवळण सुविधाही येथे उपलब्ध आहेत.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी (रेसिडेन्शियल) श्री. विमलेन्द्र सिंग म्हणाले, “महिंद्रा सिटाडेलमधील सातत्यपूर्ण मागणी आणि जोरदार विक्रीमुळे पिंपरी-चिंचवड ही उच्च क्षमतेची निवासी मायक्रो-बाजारपेठ आहे यावर आमचा विश्वास दृढ झाला आहे. फेज 1 आणि फेज 2 यामधील बहुतेक घरांची विक्री झाल्यामुळे आता आम्ही खास 1 बीएचके पर्याय सादर करत आहोत. त्यायोगे घर खरेदीदारांच्या विस्तृत गटापर्यंत आमची पोहोच वाढेल. सोयी, कनेक्टिव्हिटी आणि आराम यांचा समतोल साधणाऱ्या दर्जेदार वास्तव्याच्या जागा सादर करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण बांधिलकीत आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.”

नवीन सादर करण्यात आलेला टॉवर याच एकात्मिक समुदायाचा भाग असून विचारपूर्वक आखलेल्या पायाभूत सुविधा आणि सोयी सुविधा यांचा समावेश आहे. यामध्ये लँडस्केप केलेली हरित क्षेत्रे, क्लबहाऊस, जॉगिंग ट्रॅक, जिम्नेशियम, मल्टीपर्पज कोर्ट्स आणि समर्पित वेलनेस स्पेसेसचा समावेश आहे. याआधीच्या टप्प्यांप्रमाणेच, या टॉवरमधील घरे देखील IGBC Gold pre-certified आहेत आणि यामध्ये उर्जासंवर्धन करणारे लाइटिंग, पाण्याच्या बचतीची यंत्रणा आणि घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था यांसारखी पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये असतील. जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेले हे स्थान शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा केंद्रे आणि मनोरंजन स्थळे यांच्या जवळ असल्यामुळे आणखी आकर्षक बनलेले आहे.

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित

‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते. परंतु आता ‘येरे येरे पैसा ३’ मध्ये सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याने बबलीचे मन तुटले आहे. बबली तिच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त करताना दिसतेय. या गाण्याची पार्श्वभूमी जरी भावनिक असली तरी हे गाणे जबरदस्त संगीत आणि हटके स्टाईलमध्ये सादर करण्यात आले आहे. हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रेक्षकांना थिरकायला लावणारे असून याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गाण्याचे खास आकर्षण म्हणजे निर्माते अमेय खोपकर यांचे सुपुत्र ईशान अमेय खोपकरही या गाण्यात दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ईशानचे मराठी चित्रसृष्टीत पदार्पण झाले आहे. तर या गाण्यात चित्रपटातील इतर कलाकारांसोबतच सोनाली खरेचीही झलक दिसत आहे.

सायली पंकज, रविंद्र खोमणे, राधा खुडे, सौरभ साळुंके, मुनव्वर अली, अपूर्वा निशाद व सावनी भट्ट यांच्या जबरदस्त आवाजातील या गाण्याला पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून डॉ. विनायक पवार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “ ‘येरे येरे पैसा ३’ मध्ये सनी-बबलीच्या नात्याला एक इमोशनल तरीही फन टच द्यायचा प्रयत्न केला आहे. हे एक मजेशीर गाणे असले तरी या गाण्यात खूप काही घडत आहे. ज्याने कथा पुढे जातेय. आता ते काय आहे याचे उत्तर चित्रपटगृहातच मिळेल.”

निर्माते अमेय खोपकर म्हणतात, “ हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. कारण या गाण्यातून माझ्या मुलाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असून हा आमच्यासाठी एक भावनिक क्षण आहे.मला खात्री आहे संगीतप्रेमींना हे गाणं नक्कीच आवडेल.”

निर्माते निनाद बत्तीन म्हणतात, “ हे गाणे भावनिक आणि मनोरंजक आहे. सनी-बबलीच्या नात्याचा हा टर्निंग पॉईंट असून, त्यातली मजा आणि स्टोरी पाहाणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल हे नक्की.”

धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता म्हणतात, “ ये रे ये रे पैसा’ ही सिरीज मजा आणि मनोरंजनासाठी ओळखली जाते आणि हे गाणे त्याला चारचाँद लावणारे आहे.”

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर, ईशान अमेय खोपकर, यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. येत्या १८ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करम प्रतिष्ठान आयोजित ‌‘करम रजनीगंधा‌’ : रंगले ज्येष्ठांचे कविसंमेलन

कवितेतून प्रौढत्वी निज शैशवास जपणे शक्य

पुणे : कवितारूपी मैत्रीण अलगदपणे जीवनात येते आणि रजनीगंधासारखी दीर्घकाळ आयुष्य दरवळून टाकते. यातूनच प्रौढत्वी निज शैशवास जपणे शक्य होते, असे मत ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांनी व्यक्त केले.

करम प्रतिष्ठानतर्फे नवी पेठेतील पत्रकार भवन येथे ‌‘करम रजनीगंधा‌’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कविसंमेलन आणि चर्चासत्र असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. बाबुल पठाण होते. कार्यक्रमाचे संयोजक, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, स्वाती सामक मंचावर होते.

प्रज्ञा महाजन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बाबुल पठाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि करम प्रतिष्ठानची वाटचाल सांगितली. स्वाती सामक, अनुराधा काळे, सुजाता पवार आणि डॉ. दाक्षायणी पंडित यांनी उपस्थितांशी संवाद साधला व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित कविसंमेलनात जयंत कुलकर्णी, धनंजय तडवळकर, वासंती वैद्य, डॉ. रेखा देशमुख, माधुरी डोंगळीकर, शैलजा किंकर, स्मिता जोशी-जोहरे, रेखा येळंबकर, माधुरी दीक्षित, प्रतिभा पवार, प्रज्ञा कुलकर्णी यांनी कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. वयाने ज्येष्ठ परंतु मनाने चिरतरूण असणाऱ्या कवींच्या सादरीकरणाने रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे संयोजन वैजयंती आपटे, मुक्ता भुजबले यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे, प्राजक्ता वेदपाठक यांनी केले. भूषण कटककर यांनी आभार मानले.

सह्याद्रि रुग्णालयात पुण्यातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ञातर्फे ट्रिपल व्हेसल बायपास शस्त्रक्रियेतून यशस्वी उपचार

पुणे, जुलै ०७, २०२५ : शस्त्रक्रियेतील अचूकता आणि नाविन्यपूर्ण रुग्णकेंद्री तंत्रज्ञान यांचा मेळ साधत पुण्यातील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी रुग्णालय, डेक्कन जिमखाना येथील डॉक्टरांनी मोठी किमया साधली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी पुण्याच्या ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकावर छोट्या आकाराच्या छेदातून ट्रिपल व्हेसल बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. डॉ. स्मृती हिंदारिया यांनी २८ एप्रिल २०२५ रोजी ही शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणा-या त्या पुण्यातील पहिल्या महिला हृदय शल्यचिकित्सक ठरल्या आहेत. या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीरावर शस्त्रक्रियेचा छेद कमीत कमी झाल्याने रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन हृदयाचे कार्य पूर्ववत होण्यास मदत झाली.

श्री. रमेश (रुग्णाचे मूळ नाव बदललेले आहे) असे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नाव आहे. रमेश यांना तीन महिन्यांपासून चालताना खूप धाप लागत होती. दैनंदिन कामे करणेही त्यांना अवघड होऊन बसले होते. डॉक्टरांनी रमेश यांची कोरोनरी अँजिओग्राफी तपासणी करून त्यांना ‘ट्रिपल वेसल कोरोनरी आर्टरी डिसीज’ हा गंभीर हृदयाचा आजार झाल्याचे निदान केले. या आजारामुळे त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणा-या तिन्ही मुख्य धमन्यांमध्ये अडथळे आले होते. कोर्डे यांच्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाली होती. प्रत्येक माणसाच्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता साधारणतः ६० टक्क्यापर्यंत असते. रमेश कोर्डे यांच्या केसमध्ये, त्यांच्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता केवळ ३५ टक्क्यापर्यंत खाली घसरली होती. कोर्डे यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल. परंतु रमेश कोर्डे यांनी पारंपरिक पद्धतीने ओपन हार्ट सर्जरी करण्यास नकार दिला.

रुग्णाच्या वय, शारीरिक स्थिती आणि तब्येतीचा विचार करून, सह्याद्रीच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेऐवजी कमी छेदातून (मिनिमली इनव्हेसिव्ह) केली जाणारी आधुनिक बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही पद्धत पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा अधिक सुरक्षित, परिणामकारक आणि रुग्णासाठी सोपी ठरते. या नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना, पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सल्लागार कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. स्मृती हिंदारिया म्हणाल्या, “या प्रकारच्या बायपास शस्त्रक्रियेत आम्ही छातीच्या मधोमध मोठा छेद देत नाही. त्याऐवजी छातीच्या डाव्या बाजूला फक्त २-३ इंचांचा लहान छेद देऊन (छातीचे हाड न कापता), बरगड्यांमधून शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात, रक्तस्त्राव कमी होतो आणि तो लवकर बरा होतो.”

पारंपरिक शस्त्रक्रियेत छातीचे हाड कापण्यासाठी १० ते १२ इंचाचा छेद करावा लागतो. २००-३०० मिली रक्तस्त्राव होतो. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येण्यासाठी ६ ते ८ आठवडे लागतात. हा प्रकार अत्याधुनिक शस्त्रक्रियेत घडत नाही. या नव्या अत्याधुनिक शस्त्रक्रियेचे डॉ. हिंदारिया यांनी फायदे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘या अत्याधुनिक प्रकारात आम्ही छातीवरील छोट्या छेदामधून लांब आणि खास साधनांचा वापर करुन हृदयाजवळील मांसपेशी बाजूला सारत हृदयापर्यंत पोहोचतो. या प्रक्रियेत हाडांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. परिणामी बरेच रुग्ण १० ते १५ दिवसांतच बरे होतात. त्यांना फारशा वेदना होत नाहीत. त्यामुळेच, रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधीही कमी होतो. आणि त्यांना शरीरावरील जखमेचा व्रणदेखील फारसा जाणवत नाही.’’

ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कोर्डे यांना फायदेशीर ठरला. शस्त्रक्रियेनंतर ते केवळ ४८ तास अतिदक्षता विभागात राहिले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागल्याने पाचव्या दिवशी कोर्डे यांना डिस्चार्ज दिला गेला. रमेश कोर्डे यांच्या प्रकृतीबद्दल शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांच्या टीमने आनंद व्यक्त केला. त्यांनी पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेतील मर्यादेविषयी माहिती दिली. पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेत रुग्णाला ७ ते १० दिवसांपर्यंत रुग्णालयात राहावे लागते. रुग्णाला पूर्णपणे सावरण्यासाठी बराच वेळ लागतो. प्रकृतीत सुधारणा दिसायलाही बराच काळ लागतो, असे टीमच्या वतीने सांगण्यात आले.

ही शस्त्रक्रिया हृदय भूलतज्ज्ञ (कार्डियाक अ‍ॅनेस्थेटिस्ट) डॉ. शंतनु शास्त्री, हृदय आणि फुफ्फुसाच्या नियंत्रणाची मशीन हाताळणारे पर्फ्युजनिस्ट, अनेक फिजिशियन आणि प्रशिक्षित परिचारिका या अनुभवी टीमने अचूक समन्वयातून यशस्वीरित्या पार पाडली. डॉ. शंतनु शास्त्रीकार्डियाक अ‍ॅनेस्थेटिस्टसह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलडेक्कन जिमखाना यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “हृदयाच्या रक्तवाहिनीवर कमी आकाराचा छेद घेऊन केली जाणारी बायपास शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी रुग्णाची निवड अत्यंत महत्त्वाची असते. आम्ही शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची सखोल वैद्यकीय तपासणी करतो. यामध्ये कोरोनरी अँजिओग्राफी, 2D इकोकार्डिओग्राफी, हृदयाचा हाय-रिझोल्युशन सिटी स्कॅन आणि पल्मनरी फंक्शन टेस्ट यांचा समावेश असतो. या तपासण्या केल्याने रुग्णाच्या हृदयाची संरचना, धमन्यांचे कार्य आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता यांचा स्पष्ट अंदाज येतो. या प्रकारच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची श्वसनप्रक्रिया केवळ एका फुफ्फुसाच्या साहाय्याने सुरु ठेवावी लागते आणि ही प्रक्रिया अत्यंत मोलाची भूमिका बजावते.”

ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अत्यंत परिणामकारक ठरते. मात्र सर्व रुग्णांना ही शस्त्रक्रिया सूचवली जात नाही. मोठे हृदय असलेल्या रुग्णांवर हृदयाच्या रक्तवाहिनीवर कमी आकाराचा छेद घेत करणारी बायपास शस्त्रक्रिया सूचवली जात नाही. हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता २५ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या तसेच झडप दुरुस्तीसाख्या इतर आवश्यक उपचारांची एकाच वेळी गरज असलेल्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केली जात नाही. ही शस्त्रक्रिया छातीतील बरगड्यांची हाडे नाजूक असलेल्या, पंच्याहत्तरी उलटून गेलेल्या रुग्णांवर देखील केली जात नाही. 

डॉ. हिंदारिया यांच्या मते हृदयाच्या रक्तवाहिनीवर कमी आकाराचा छेद घेत करणारी बायपास शस्त्रक्रिया हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. रुग्णांच्या उपचारपद्धतीत ही शस्त्रक्रिया महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या नव्या तंत्रज्ञानाने शरीरातील लहान छेद करुन केल्या जाणा-या शस्त्रक्रियांमध्ये मोठा बदल केला आहे. शिवाय हृदयाशी संबंधित उपचारपद्धतीतील मानसिकतेतही बदल केल्याचे समाधान डॉ. हिंदारिया यांनी व्यक्त केले. या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाद्वारे आता दुर्बिणीतून तसेच रोबोटच्या सहाय्याने (Robotic Assisted) शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

सहयाद्रि हॉस्पिट्ल्सने नेहमीच अत्याधुनिक, अचूक, वेगवान आणि संवेदनशील उपचारपद्धती उपलब्ध करुन देत आधुनिक उपचारपद्धतींना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. रुग्णालयाने हाच यशस्वी दृष्टिकोन बाळगत नव्या आधुनिक शस्त्रक्रियेचा पाया रचला आहे. किमान आकाराचा छेद घेत असलेली हृदय शस्त्रक्रिया करणे हे आता अशक्यप्राय नाही. ही शस्त्रक्रिया आधुनिक काळातील गरज आहे. पारंपरिक ओपन-हार्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार नसलेल्या किंवा पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी कमकुवत असलेल्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया आशेचा नवा किरण ठरली आहे.

About Sahyadri Hospital: Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra with 11 hospitals across four cities of Pune, Nashik, Karad and Ahilyanagar. The