मुंबई-राज्यात मराठीच्या मुद्द्यावर वातावरण तापले असतानाच, भोजपुरी अभिनेता आणि भाजप खासदार दिनेश लाल यादव उर्फ ‘निरहुआ’ याने “मी मराठी बोलत नाही, दम असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा,” अशी मुक्ताफळे त्याने उधळली. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला चांगलेच फटकारले. कलाकार भोजपुरीअसला तरी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जीवावर तू मोठा विसरू नकोस ,तू महाराष्ट्रात येऊन उभा रहा म्हणजे कळेल तुला तुझी भोजपुरी कुठे आहे? असे जोरदार प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी निरहुआ याला दिले. शिवाय त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल 18 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले. त्यांनी मराठीचा हुंकार भरत, मुंबईत मराठीत बोलण्याचा आग्रह पुन्हा ठामपणे मांडला. मुंबईत मराठीत बोलण्याचा आग्रह दोन्ही बंधूंनी धरला. मुंबईत येऊन मराठी लोकांवर जो दादागिरी करेल, त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिला. कालच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळव्याला काँग्रेस नेते अनुपस्थित होते. पण आज काँग्रेस राज ठाकरेंच्या मदतीला धावली.
दिनेश लाल यादव निरहुआ भोजपुरी कलाकार असला तरी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भरोशावर मोठा झाला आहे, एखाद्या भाषेचा असा अपमान करणे म्हणजे त्या खासदाराच्या बुध्दीची दिवाळखोरी आहे, तू महाराष्ट्रात येऊन उभा रहा म्हणजे कळेल तुला तुझी भोजपुरी कुठे आहे? असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांना पहलगाम आठवायला लागले आहे, तुम्ही पाकिस्तानात जाऊन शंभर अतिरेकी मारल्याचे छाती ठोकून सांगत आहेत. मात्र पहलगामचे चार आतंकवादी अजून सापडलेले नाही, पुलवामामध्ये अडीचशे किलो आरडीएक्स आले, तुम्ही लोकांना वारंवार मूर्ख बनवू शकत नाही, त्यामुळे यांची भीती साहजिक आहे, दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांची पंचायत झाली आहे, म्हणून ते असे वक्तव्य करत आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
मीरा रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एका फास्ट फूड विक्रेत्याला मराठीत बोलण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडल्यानंतर, निरहुआने प्रतिक्रिया दिली. “मी मराठी बोलत नाही. मी भोजपुरी बोलतो. जर तुमच्यात दम असेल, तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा,” असे खुले आव्हानच त्याने दिले होते. . त्याच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याचे कान टोचले आहेत.
शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, हेमंत पेंडसे, सावनी शेंडे-साठ्ये राधिका ताम्हनकर, प्रज्ञा देशपांडे यांचे भक्तीभावपूर्ण सादरीकरण पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत मीराबाई, संत सोयराबाई, संत चोखामेळा, समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या भक्तीरचनांचे भावपूर्ण सादरीकरण ‘स्वरविलास’ या कार्यक्रमात रसिकांनी अनुभवले. आषाढी एकादशीनिमित्त मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराच्या आवरातील सभागृहात रविवारी (दि. 6) संगीत प्रेमी विलास जावडेकर यांच्या ‘स्वरविलास : लय विठ्ठल, सूर विठ्ठल’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित हेमंत पेंडसे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि रसिकाग्रणी विलास जावडेकर यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातील अनेक भक्तीरचनांचे संगीतही पंडित पेंडसे यांचेच होते. या कार्यक्रमात पंडित शौनक अभिषेकी, पंडित रघुनंदन पणशीकर, विदुषी सावनी शेंडे-साठ्ये, पंडित हेमंत पेंडसे यांच्यासह राधिका ताम्हनकर, प्रज्ञा देशपांडे यांनी संतरचना सादर केल्या. सुरुवातीस सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे, शुभदा मोघे, संध्या पटवर्धन, कल्पना जावडेकर, मधुरा पेंडसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‘जय जय रामकृष्ण हरी’चा सामुहिक गजर करण्यात आला. ‘मन रे परसी हरी के चरण’ या भक्तीरचनेने विदुषी सावनी शेंडे-साठ्ये यांनी कार्यक्रमाचा आरंभ केला. .‘आधी रचिली पंढरी’, ‘राम बरवा’, ‘टाळ दिंडीचा गजर’, ‘राम गावा राम घ्यावा’, ‘संत भार पंढरीत’, ‘मै गोविंद गुण गाणा’, ‘बादल देख डरी’, ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘अबिर गुलाल’, ‘येरे येरे माझ्या रामा’, ‘बोलावा विठ्ठल’ या संत रचना सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता पंडित शौनक अभिषेकी, पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित हेमंत पेंडसे यांनी सादर केलेल्या ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या सुप्रसिद्ध रचनेने केली.
पंडित हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मौनाच्या संध्याकाळी’, ‘बादल देख डरी’, ‘येरे येरे माझ्या रामा’ आणि ‘मन रे परसी हरी के चरण’ चार भक्तीरचनांचे या प्रसंगी रसिकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे माहितीपूर्ण निवेदन स्नेहल दामले यांचे होते. राहुल गोळे (ऑर्गन), प्रणव गुरव (तबला), मनोज भांडवलकर (पखवाज), तुषार दीक्षित (की-बोर्ड), अवधुत पायगुडे (तालवाद्य) यांनी समर्पक साथसंगत केली.
सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आठवणींना उजाळा देताना पंडित शौनक अभिषेकी म्हणाले, माझे वडिल बहुश्रुत व बहुआयामी होते. त्यांच्यातील संगीत रचनेचा पैलू पंडित हेमंत पेंडसे यांनी आत्मसात केला आहे. यातूनच पंडित पेंडसे यांच्या हातून उत्तमोत्तम संगीत रचना होत आहेत आणि त्या रचनांवर गुरूंची कृपासावली असलेली जाणवते.
प्रास्ताविकात अनिल पटवर्धन यांनी कार्यक्रमाची संकल्पना विशद केली. कलाकारांचा सत्कार विलास जावडेकर, कल्पना जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे- निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापूजा, अभिषेक आणि महाआरती
पुणे – पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या व राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. या दिवशी त्यांनी पांडुरंगाच्या चरणी देश व राज्यासाठी केलेल्या मागील वर्षीच्या संकल्पाच्या सिद्धतेबद्दल विठ्ठल-रुक्मिणी मातेस कृतज्ञता व्यक्त केली.
या धार्मिक विधींमध्ये डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्त्या जेहलम ताई जोशी, मंदिराचे विश्वस्त आणि माजी नगरसेवक विशाल धनवडे, सामाजिक कार्यकर्त्या सुदर्शना त्रिगुणाईत, डॉ. गोऱ्हे यांची सून डॉ. सतलज आणि नात ईरा उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मागील आषाढी एकादशीस विठोबाच्या चरणी प्रार्थना केली होती की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार यावे आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे. विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने ती प्रार्थना पूर्ण झाली. त्यामुळे या वर्षी मी कृतज्ञतेने पांडुरंगाच्या चरणी महापूजा अर्पण करत आहे.”
त्याचबरोबर त्यांनी राज्याच्या विकासासाठी सुरू असलेल्या योजनांचा उल्लेख केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जलसंधारण, स्वच्छता, जेवण, दिंडी अनुदान, वारीसाठी पायाभूत सुविधा, अशा विविध स्तरांवर काम सुरू आहे. मंदिर परिसरात होणाऱ्या गळतीवर नियंत्रण, टोकन प्रणालीमुळे दर्शनासाठी वेळेची बचत, हे महत्त्वाचे बदल होत आहेत,” असे त्या म्हणाल्या.
राज्य विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी निर्णायक पावले उचलण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. महिलांसाठी ‘स्वयंसिद्धा’ मोहिम, बालक व एकल महिलांसाठी सुरक्षात्मक उपक्रम, वंचित विद्यार्थ्यांसाठी महाज्योती, सारथी, बार्टी आदी संस्थांमार्फत सुविधा देण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव करताना त्यांनी म्हटले, “महाराष्ट्रातील समस्त महिलांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब संकटग्रस्त प्रवाशांसाठी काश्मीर, हिमाचल, महाराष्ट्रात जिथे गरज असेल तिथे धावून जातात. तसेच, त्यांनी ‘लाडक्या सुनेचे हुंडा बळी’ प्रकरणात स्पष्टपणे शिवसेना महिलांच्या पाठीशी उभी राहील, हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या कार्याला गती देणार आहे.”
समारोप करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “खरा विश्वास आणि श्रद्धा देव जाणतो. टीका, निंदा, अपप्रचार याकडे दुर्लक्ष करून समाजासाठी निःस्वार्थपणे काम करत राहण्याचा संकल्प मी आज विठोबाच्या चरणी करत आहे.”
या भावपूर्ण आणि सामाजिक संदेशांनी परिपूर्ण पूजाविधीने पुणेकर विठ्ठल भक्तांच्या श्रद्धेला नवीन उर्जा दिली आहे असे डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या.
स्वरपंढरीच्या वारीत रसिक दंग ‘तुका म्हणे’ कार्यक्रमात अर्पणा केळकर यांची गायन सेवा अपर्णा केळकर यांच्या सादरीकरणाराला रसिकांची दाद विठ्ठल भक्तीचे संगीतमय दर्शन
पुणे : संत तुकाराम महाराज यांचा सामान्य व्यक्ती ते संतत्वार्पंतचा प्रवास, त्या काळात त्यांच्या आयुष्यात आणि मनात चाललेला बाह्य आणि आंतरिक झगडा, त्यांना विठ्ठलाच्या रूपाचा-कृपेचा लागलेला ध्यास, संतपदाला पोहोचल्यानंतर त्यांच्यातून प्रकट झालेला अनुभवसंपन्न वाग्वविलास, पांडुरंग भेटीची उत्कटता-निकटता या सर्वांचे अनोखे संगीतमय दर्शन रसिकांना घडले. निमित्त होते आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘तुका म्हणे’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अपर्णा केळकर यांनी रसाळ, मधुर वाणीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज रचित अभंगांचे सादरीकरण करत रसिकांना भक्तीरसाचा अनुभव दिला. टिळक रस्त्यावरील हिराबाग येथील श्रीराम लागू रंगावकाश येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ हा गजर केल्यानंतर आत्मशक्तीचा परमविलास दर्शविणाऱ्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘भेटी लागी जीवा, लागलीसे आस’ या अभंगाच्या सादरीकरणातून संत तुकाराम महाराज यांना पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली आस रसिकांना भावपूर्णतेचा आनंद देऊन गेली. नाम संकीर्तनाची महती दर्शविणाऱ्या ‘घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे’ या अभंगाला रसिकांनीही गायन साथ देत नामाची महती अनुभवली. विठ्ठलाला माऊलीच्या स्वरूपात पाहताना संत तुकाराम महाराज यांनी रचलेला ‘विठ्ठल माझी माय, आम्हा सुख उणे काय’ या अभंगाच्या सादरीकरणानंतर अपर्णा केळकर यांनी ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ हा अभंग भक्तीरसपूर्णतेने सादर केला. ‘पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे’ या अभंगातून ‘मी’पणाचा विलय दर्शविणारा भाव उत्पन्न झाला. ‘पद्मनाभा नारायणा’ या अभंगाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली. तर कार्यक्रमाची सांगता पद्मविभूषण किशोरी अमोणकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाने केली. अपर्णा केळकर यांना प्रसाद जोशी (पखवाज), कौशिक केळकर (तबला), लीलाधर चक्रदेव (ऑर्गन), मंगेश जोशी (तालवाद्य), क्षितिज भट (कीबोर्ड), धवल जोशी (बासरी) यांनी सुमधुर साथसंगत केली. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निरूपण डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले. स्वरसाथ रुचीर इंगळे, गार्गी काळे, शर्विन पिंगे, श्रुती डोरले यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षते खालील समिती उपाय सुचवणार.
मुंबई, दि. ६ जूलै विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ७ सदस्यांची ही समिती असून या समितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परिक्षित विरेंद्र जगताप हे सदस्य आहेत तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे समन्वयक आहेत.
मतदार याद्यामधील गैरप्रकाराबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केलेली आहे. पण आयोगाने अद्याप समाधानकारक खुलासा केलेला नाही. भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी गैरमार्गाचा वापर करत असून मतदार याद्यांमध्ये मोठया प्रामणात घोटाळे केले जात आहेत. हे सर्व रोखण्यासाठी ही समिती अभ्यास करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करेल.
पुणे, ता. 6 जुलै : स्कूल बस आणि व्हॅनमधून होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, या विषयीच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी वाहनचालक, शिक्षक पालक आणि प्रशासनाने जागरूक राहिले पाहिजे असे मत राज्याच्या परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील दोन हजार विद्यार्थ्यांना मिसाळ यांच्या हस्ते शालेय साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मिसाळ बोलत होत्या. माजी नगरसेवक महेश वाबळे आनंद रिठे यांनी संयोजन केले.
मिसाळ म्हणाल्या, “वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांची दर आठवड्याला अल्कोहोल चाचणी, पोलिस पडताळणी, अपघात किंवा गुन्ह्याचा इतिहास तपासणी, वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा, पॅनिक बटन, अग्नी नियंत्रण स्प्रिंकलर, महिला अटेंडंट आदी बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. स्कूल बसचालकांनी या नियमावलीची जबाबदारीने अंमलबजावणी करावी.”
मुंबई-मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे आव्हान भाजप नेता व भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. उद्योजक सुशील केडियाने देखील काही दिवसांपूर्वी मी मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा, अशा शब्दात आव्हान दिले होते. परंतु केडियाने आता माघार घेतली आहे. परंतु, आता दिनेश लाल यादव यांनी केलेल्या आव्हानामुळे नवीन वाद सुरू होणार आहे.
#WATCH | Varanasi, UP: On Maharashtra language row, BJP leader, Dinesh Lal Yadav 'Nirahua' says, "…This should not happen anywhere in the country. This country is renowned for its diverse languages and cultures, yet it maintains unity in the midst of this diversity. People who… pic.twitter.com/R6ioTWAKYo
दिनेश लाल यादव म्हणाले, अशा प्रकारची गोष्ट देशात कुठेही घडू नये. आपला देश विविध भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो आणि या विविधतेतूनही एकतेचे उदाहरण घालून देतो. गलिच्छ राजकारण करणाऱ्या लोकांनी असे वागू नये आणि त्यांनी स्वतःला सावरावे. मी मराठी बोलत नाही. मी उघड आव्हान देतो, तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे म्हणत त्यांनी थेट ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.
पुढे बोलताना दिनेश लाल यादव म्हणाले, हे तोडण्याचे राजकारण करू नका. जोडण्याचे राजकारण करा. तुम्ही घाण राजकारण करू नका. मी स्वतः एक राजकारणी देखील आहे. राजकारण लोकांच्या भल्यासाठी असले पाहिजे, असे मी मानतो. देशाच्या भल्यासाठी असली पाहिजे. कोणाची क्षमता असेल की, तो अनेक भाषा शिकू शकतो. तर त्याने शिकली पाहिजे. मराठी फार चांगली भाषा आहे. प्रेमळ भाषा आहे. भोजपुरी देखील प्रेमळ भाषा आहे. गुजराती आहे, मराठी आहे, तेलगू आहे, तमिळ आहे.. प्रत्येक भाषेचे एक वेगळे सौंदर्य आहे. क्षमता असेल तर सगळ्या भाषा शिकायला हव्यात.
पुणे- मुठा नदीच्या पात्रात दिवाळी च्या काळात फटके स्टॉल ला आपण जागा देतो त्याच धर्तीवर गणेशोत्सवासाठी ढोल ताशा लेझिम पथकाला देखील जागा व सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोघांकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’‘पुणे शहर’ राज्याची ‘सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर’ असल्याने, पुणे शहरात देशाच्या व राज्याच्या विविध भागातून शिक्षणा करीता हजारो विद्यार्थी येत असतात. स्वातंत्र्य पूर्व काळात सामाजिक ऐक्य व प्रबोधनाच्या हेतूने पुण्यनगरीत सुरू झालेला, विघ्नहर्त्या “श्री चा गणेशोत्सव” आज देशभरात आदर्श ठरत असून, देशाला विधायक सांस्कृतिक उत्सवाची दिशा व नेतृत्व देण्याचे काम करत आहे.महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेली “ढोल ताशा लेझिम” पथके ही “श्रीच्या मिरवणुकीत” मोठ्या दिमाखाने सहभागी होतात. श्रीच्या गणेशोत्सवाची आरास, देखावे बघण्यास प्रेक्षकांची गर्दी होते, तशीच गर्दी “ढोल – ताशा पथकांचे वादन” बघण्या करीता देखील होते. या पथका मध्ये असंख्य ‘तरुण – तरुणी – विद्यार्थी’ सहभागी असतात. ‘संस्कृति व संस्कार’ जोपासले जात असतांना, त्यात विकृतीचा शिरकाव होऊ न देणे याकडे ‘ढोल – ताशा पथकांचे संचालक’ लक्ष देऊन असतात, मात्र ‘सरावा करिता व वाद्ये’ ठेवण्या करीता किमान सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे, सुरक्षितता देणे प्रशासकीय कर्तव्य ठरते. तिवारी यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’या सरावा करीता “पुणे मनपा” ने “ढोल ताशा पथक संघटनेचे सहकार्य घेऊन” पथकांना रीतसर मान्यता द्यावी. मुठा नदीचे विस्तीर्ण पात्रातील जागा ‘पथकातील अंतराचे धोरण – वेळ ठरवून, विशिष्ठ कालावधी करीता, शुल्क आकारून (फटाके स्टॉल’चे धर्तीवर) उपलब्ध केल्यास पथके त्याकरिता अधिकृत वीज कने इ घेऊ शकतील, वाद्ये ठेवण्यास मंडप उभारून ढोल इ वाद्ये सुरक्षित ठेऊ शकतील तसेच पथकांची अधिकृत नोंद राहून पथकांना, वादकांना होणारा इतर खर्चीक जाच कमी होईल. मागील वर्षी “मुठा नदी पुरात अनेक ढोल वाहून गेले होते” व पथकांचे नुकसान झाले होते. वादन पथकाचे ‘अनावश्यक खर्च’ वाचल्यास, पथकांना सहभागी वादकांसाठी -कल्याणकारी योजना राबविता येतील. साधारण हे वादानाचे सराव २ – २|| महिन्या पेक्षा जास्त काळ होत नाहीत. ठरवून दिलेली वेळ, अंतर इ प्रमाणे वादन केल्यास, परिसरातील जेष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना प्रदीर्घकालीन आवाजाचा त्रास होणार नाही. जागा हस्तगत करणे, वाद्यांचे गोडाऊन, लाइट कने इ करीता वादक पथकांना होणारा त्रास, आर्थिक ससेहोलपट होणार नाही. कृपया मनपा प्रशासनाने सत्वर सकारात्मक निर्णय घ्यावा,असेही गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.
पिंपरी — आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आज पिंपळे निलख येथील मुख्य बसस्थानक येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अजित फाटके पाटील (प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी महाराष्ट्र) यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमामध्ये रविराज काळे यांनी कै. नारायण शंकर घोडके यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलांकरिता महात्मा जोतिबा फुले स्कॉलरशिप (७,०००/- रु.), मुक्ताबाई रामचंद्र बालवडकर यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलींसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप (७,०००/- रु.), आणि पिंपरी चिंचवड शहरातील १०वी व १२वी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आम आदमी पार्टी विशेष स्कॉलरशिप (११,०००/- रु.) या शिष्यवृत्ती जाहीर केल्या.यावेळी अजित फाटके पाटील यांनी बोलताना शहराध्यक्ष रविराज काळे व आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड यांचे विशेष कौतुक केले. रविराज काळे यांनी पिंपळे निलख परिसरात केलेल्या नवनवीन उपक्रमांमुळे परिसराचा कायापालट झाला असून आम्हाला त्यांचा अभिमान आहे अश्या शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले. ज्या ज्या अंगणवाडी व शाळांमध्ये रविराज काळे यांनी उपक्रम राबवले त्या त्या शाळांतील शिक्षक-शिक्षिकांनी मनोगत व्यक्त करत आभार मानले.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सकारात्मक पाऊल टाकत, आम आदमी पार्टीने गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य प्रदान करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच विविध क्षेत्रात उत्तम यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमास पक्षाचे वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, यल्लाप्पा वालदोर, पुणे शहर युवक शहराध्यक्ष अमित मस्के, दत्तात्रेय काळजे, चंद्रमणी जावळे, सुनील शिवशरण, शुभम यादव, अजय सिंग इत्यादी पदाधिकारी,पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
वारकरी बांधवांना आणि राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
शेतकरी, कष्टकरी बांधवांसह महाराष्ट्र सुखी, समृद्ध, सक्षम होवो…
मराठी भाषेचा, संस्कृतीचा आवाज सगळीकडे दुमदुमु दे… महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा दिमाखात फडकत राहू दे…
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने पुढे जाण्याची ताकद आम्हाला दे… उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बा विठ्ठलाच्या चरणी साकडे…
मुंबई, दि. ५ :- “आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची सशक्त चळवळ आहे. गेली अनेक शतकं पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला दिशा देण्याचं, समृद्ध करण्याचं काम केलं. आजही लाखो वारकरी ‘हरिनामा’च्या गजरात पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेनं चालताना आपल्या कृतीतून एकतेचा, समतेचा, बंधुत्वाचा संदेश देत आहेत. ही महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक एकजुटीची ताकद आहे. ती टिकवणं, वाढवणं ही आपली जबाबदारी आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी साष्टांग दंडवत घालत वारकरी बांधवांना, राज्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणतात की, “आषाढीवारीच्या रूपानं महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, सांस्कृतिक चळवळ जपत, वाढवत पुढे नेत असताना मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवणे, मराठीचा आवाज आसमंतात दुमदुमत, महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा सदैव फडकत राहिला पाहिजे, त्यासाठी कष्ट करण्याचे बळ आम्हाला दे. राज्यात यंदाही चांगला पाऊस होवो. शेतकऱ्याच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची सुबत्ता येवो. राज्यातल्या घराघरात सुख, शांती, समाधान, समृद्धी नांदो,” असं साकडंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगाच्या चरणी घातलं आहे.
वारीतील शिस्त, स्वच्छता, सेवाभाव, परस्पर सहकार्य, सामाजिक बंधिलकी याबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौरवोद्गार काढत, “वारीनं आपल्याला सामाजिक ऐक्य, समर्पणाची भावना आणि माणुसकीचा खरा अर्थ शिकवला आहे. हीच ऊर्जा आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरली पाहिजे,” असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना केलं आहे. —-०००००००—–
पिंपरी (दि.५) : हिंजवडीतील आपत्कालीन पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या तसेच ओढे – नाल्यांवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करणाऱ्या विरोधात पीएमआरडीएने हिंजवडी पोलीस ठाण्यात ४ गुन्हे नोंदवले आहे. संबंधित जागा मालक आणि त्याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांनी संगणमताने ओढे – नाल्यातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेल्या पात्रात अनधिकृतपणे बांधकाम केल्याने त्यांच्यावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ही मोठी कारवाई करण्यात आली.
हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे – नाल्यांभोवती अनाधिकृतपणे बांधकाम तसेच पाण्याचा प्रवाह अडवल्यासह परस्पर इतरत्र वळल्याने काही दिवसापूर्वी हिंजवडीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या अनुषंगाने हिंजवडी येथील नाल्यां लगत / नाल्याच्या पात्रात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर शुक्रवारी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्यात ४ गुन्हे नोंदविण्यात आले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार संबंधित कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी नोंदवले गुन्हे हिंजवडीतील गट क्र. २६२ येथे पंकज साखरे (जागामालक), गुरुकृपा मोटर्स, महावीर कुरिअर सर्व्हिसेस, सिटी सेल, हॉटेल मयुरी (विकासक) यांनी नैसर्गिक ओढे – नाले परिसरात अनधिकृत बांधकाम केले आहे. हिंजवडी गट क्र. १५२, २६३ या ठिकाणी शशिकांत साखरे, शालिवाहन साखरे (जागा मालक), विठ्ठल तडकेवार, गुरुकृपा बँगल्स स्टोअर (विकासक). हिंजवडी गट क्र. २६२ या ठिकाणी पंकज साखरे (जागा मालक), सरकारमान्य ताडी विक्री केंद्र, भंगार दुकान (विकासक). हिंजवडी गट क्र. १५२, २६३ येथे शालिवाहन साखरे (जागा मालक), हिना चिकन, वाशिंग सेंटर यांनी ओढे – नाल्यावर अनाधिकृतपणे बांधकाम केल्याचे पुढे आल्याने विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले.
अनधिकृत इमारतीचे निष्कासन मारुंजी भागातील अनाधिकृत बांधकाम आणि इमारतींवर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभाग गत काही दिवसापासून निष्कासन कारवाई करत आहे. यात मारुंजी गट क्र. ४५/१/२ येथील परिहार यांची जी+८, भिसेन यांची जी+४, चाकले यांची जी+२ या अनधिकृत बांधकामाचे निष्कासण पूर्ण झाले आहे आणि चौधरी यांची जी+५ या अनधिकृत बांधकाम असणाऱ्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. यासह डॉ. खेनट यांच्या जी+५ या इमारतीचे स्ट्रक्चर पाडण्याची कारवाई सुरू (२० टक्के बांधकाम तोडले) असताना मा. न्यायालयाच्या आदेशाने संबंधित कारवाई थांबवण्यात आले. उर्वरित बांधकामांबाबत पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल.
व्यावसायिक सुशील केडियांची माफी—–महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया (Sushil Kedia)यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. नंतर केडिया यांनी एक्सवर माफीचा व्हिडिओ पोस्ट केला.मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर एक दिवस मीरा-भाईंदर शहरातील अमराठी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यानंतर संतापलेल्या केडिया यांनी एक्सवर पोस्ट करत मी मराठी (Marathi) बोलणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे थेट आव्हान राज ठाकरे यांना दिले होते.या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी वरळी येथील डोममध्ये मेळाव्यासाठी जात असताना केडिया यांच्या कार्यालयावर नारळ आणि दगडफेक केली.या घटनेत कार्यालयाच्या काचा फुटल्या असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना असा धडा शिकवला जाईल अशी भूमिका मनसैनिकांनी घेतली असून सुशील केडियाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी म्हटले. पोलिसांनी तणाव वाढू नये म्हणून तत्काळ हस्तक्षेप करत काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.यानंतर केडिया यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या वक्तव्याची माफी मागितली. त्यात त्यांनी म्हटले, मी केलेलं ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिलं गेलं होतं. पण माझ्या त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा होता. पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुप्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांचे कार्यालय फोडले आहे. केडिया यांनी परवा एका पोस्टद्वारे मी मराठी बोलणार नाही असे ठणकावून सांगितले होते. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा असे आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांना दिले होते. त्यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयावर ‘नारळ’फेक केली. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे मुंबईतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. पण मनसे व ठाकरे गटाने या निर्णयाला कडाडून विरोध केल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. पण आता या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला केलेली मारहाण व त्यानंतर व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे स्थिती अधिकच चिघळली आहे. यामुळे संतापलेल्या सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना उपरोक्त शब्दांत आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी त्यांचे कार्यालय फोडले आहे. आज वरळी येथील डोम येथे ठाकरे बंधूंचा विजयी मेळाव्याला निघालेल्या मनसैनिकांनी सकाळीच सुशील केडिया यांचे कार्यालय गाठून त्याच्यावर ‘नारळ’फेक केली. या घटनेत कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. या अनपेक्षित घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. काय म्हणाले होते सुशील केडिया?
मी मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहतो. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. पण तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. राज ठाकरे काय करावे लागेल बोल? असे सुशील केडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. गंभीर म्हणजे केडिया यांनी आपले हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केले होते. त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी आज त्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.
कोण आहेत सुशील केडिया?
सुशील केडिया हे एक प्रसिद्ध व्यावसायिक व केडियानोमिक्सचे संस्थापक आहेत. ते शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. त्यांची गुंतवणूक सल्लागार म्हणूनही ओळख आहे. त्यांची कंपनी गुंतवणूक व बाजारपेठेतील विश्लेषणाचे काम करते. मागील 25 वर्षांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांसोबत काम करत आहेत. मार्केट टेक्निशियन्स असोसिएशनाच्या संचालक मंडळावर वर्णी लागलेले ते आशियातील पहिले व्यक्ती आहेत. सुशील केडिया अनेक बिझनेस चॅनेलवर पाहुणे म्हणून जातात. तिथे ते शेअर बाजार आणि गुंतवणूक विषयावर अधिकारवाणीने बोलतात. मुंबईत राहणाऱ्या केडियांना हिंदी, इंग्रजीशिवाय बंगाली, गुजराती, मराठी भाषा अवगत आहे.
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. हा केडीया नाही.. कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसाने सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नये. …आणि हो, केडीया! या मग्रूरीचे उत्तर जरूर मिळेल, असे ते म्हणाले.
सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरवात केली. दोघांची भाषणे संपले की एकत्र आरोळ्या ठोक्या. आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचे एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले असते. नुसत्या मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली असे म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठी हा मोर्चाचा अजेंडा, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे बाळासाहेबांना जमले नाही ते आज घडले. आजचा हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. संपूर्ण मैदान ओसंडून वाहिले असते. पाऊस असल्याने जागा मिळत नाही म्हणून हा कार्यक्रम इथे करावा लागला. माझ्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही, जे अनेकांना जमले नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीस यांना जमले.
राज ठाकरे म्हणाले की, मुळ विषय सोडून अनेकांना बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त रस असतो. सायंकाळी आता चर्चा सुरू होतील की कोण कमी हसले, कोण कमी बोलले. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता मराठी ही अजेंडा समोर ठेवून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राकडे कुणी वेडा वाकड्या नजरेने पाहायचे नाही. हिंदीचा प्रश्नच नव्हता अचानक कुठून हा विषय आला. लहान मुलांना हिंदी शिकावी ही जबरदस्ती तुम्ही करत आहात.कुणाला काहीच विचारायचे नाही शिक्षण तज्ञांचे मत विचारात घ्यायचे नाही. केवळ आमच्याकडे बहुमत आहे म्हणून आम्ही निर्णय लादणार.तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात रस्त्यावर आमच्याकडे सत्ता आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मी एक पत्र लिहले, दुसरे लिहले मग दादा भुसे माझ्याकडे आले.मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो समजून घ्या. ऐकूण घ्या. म्हटले दादा तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकूण घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दूवा म्हणून आणण्यात आले. आज सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात इंग्रजी आहे तिथे हे सूत्र नाही. केंद्रीय शैक्षणिक धोरणातही हे सूत्र नाही.इतर कोणत्या राज्यात ही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुण पाहिला. दक्षिणेतील राज्य तर यांना विचारतही नाही. पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होते हे सत्ताधाऱ्यांना दिसले असेल. त्याशिवाय का माघार घेतली.
राज ठाकरे म्हणाले की, मी त्या दिवशी दादा भुसेंना सांगितले उत्तरेकडील राज्य कोणती तिसरी भाषा आणणार आहेत. त्यांनी तिसरी भाषा आणली पाहिजे. हिंदी भाषीक राज्य हे आर्थिकदृष्या मागस आहेत.हिंदी न बोलणारी राज्य आर्थिक दृष्टीने प्रगत आहे, यावरही आम्ही हिंदी शिकायचे. यांना हिंदीतून राज्य सांभाळता आली नाही त्यांचा विकास करता आला नाही. हिंदी न बोलणाऱ्या राज्यात हिंदी बोलणाऱ्या राज्यातून लोक कामासाठी येत आहे. हिंदी कुणासाठी शिकायचे मुलं काय हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जाणार आहे का? हिंदी भाषेबद्दल मला कधीच वाईट वाटत नाही. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते. एक लिपी उभी करण्यासाठी खूप ताकद लागते. भाषा अशीच उभी राहत नाही.
राज ठाकरे म्हणाले की, अमित शहा म्हणाले पुढे इंग्रजी येणारे म्हणतील की मला इंग्रजी येते हे सांगण्याची लाज वाटेल पण त्यांनाच इंग्रजी येत नाही. 125 वर्षे मराठ्यांनी राज्य केले पण आम्ही कुणावर मराठी लादली का? 200 वर्षांपूर्वी हिंदी आली, शिवरायांच्या काळात हिंदी नव्हती. हिंदीचे काय करायचे आहे नेमके, यांनी फक्त मुंबई वेगळी करता येते का यासाठी भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कुणाची माय व्यायली आहे त्याने महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावा. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू आहोत असा नाही. आता माघार घेतली तर प्रकरण वेगळ्या ठिकाणी वळवत ठाकरेंची मुले इंग्रजी माध्यमामध्ये शिकलीकडे वळवलं. दादा भुसे मराठी माध्यमामध्ये शिकले आणि राज्याचे शिक्षणमंत्री झाले.देवेंद्र फडणवीस इंग्रजी माध्यमामध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध. कोणाकोणाची मुलं परदेशात शिकताय याची यादी आहे आमच्याकडे. मंत्रिमंडळातील एकेकाची हिंदी ऐका फेफर येईल.
राज ठाकरे म्हणाले की, आम्ही मराठी माध्यमात शिकलो आणि आमची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकली. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, आणि माझे वडील हे इंग्रजी माध्यमामध्ये शिकले. या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकतात का? लालकृष्ण अडवाणी हे मिशनरी शाळेत शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? दक्षिण भारतात सर्व जण भाषेसाठी एकत्र येतात पण तिथे असले प्रश्न उपस्थित केले जात नाही. उद्या मी हिबरूमध्ये शिकेल आणि मराठीचा अभिमान बाळगेल. तुम्हाला काय समस्या आहे का?
राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही कुठे शिकलात यावर तुमचा कडवटपणा नसतो तर तो आतमध्ये असावा लागतो. बाळासाहेब ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, इंग्रजी वृत्तपत्रासाठी काम करत होते पण मराठीचा अभिमानासाठी त्यांनी तडजोड केली नाही. सैन्यदलांमध्ये वेगवेगळ्या प्रांतामधील लोकं हेत ते शत्रू दिसला की तूटून पडतात त्यांना भाषेचा प्रश्न आला का? मग एक भाषा लोकांना बांधून ठेवते याचा काय अर्थ? या गोष्टीमागे काय राजकारण आहे? मराठी म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, लक्षात ठेवा हे आता जातीचे कार्ड खेळतील मराठी म्हणून एकत्र होऊ देणार नाही. काल मीरा-भाईदरमध्ये एकाला मारले तर गुजरात्याला मारले का? अजून तर काहीच केले नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजेच, पण त्यासाठी ऊठसूट मारहाण करण्याची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तरी कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची पाहिजे. अश्या गोष्टीचे व्हिडीओ काढू नका. मारणारा सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारले त्यांना सांगू द्या.उगाच कुणाला मारु नका.
राज ठाकरे म्हणाले की, 1999 मध्ये शिवसेना- भाजपचे सरकार येणार नाही येणार अशी परिस्थिती होती. मी मातोश्रीवर खाली बसलो होतो तेव्हा प्रकाश जावडेकर आले ते म्हणाले बाळासाहेबांना भेटायचे आहे मी त्यांना सांगितले आता झोपायची वेळ आहे ते भेटणार नाही. तुम्ही विषय काय ते सांगा मी त्यांना निरोप देतो. जावडेकर म्हणाले मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला आहे, मी विचारले काय झाले तेव्हा जावडेकरांनी सांगितले की सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचे ठरवले आहे हे बाळासाहेबांना सांगायचे आहे. मी काकांना आवाज दिला तेव्हा बाळासाहेबांना सुरेश जैन यांचे नाव घेऊन जावडेकर आल्याचे सांगताच बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी होईल दुसरा कुणी होणार नाही. मला तेव्हाच कळाले मराठीसाठी सत्ता सोडली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्यावर सडकून टीका केली. आमच्यात (राज व उद्धव) असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी. हे पाहून अनेक बुवा- महाराज आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, तर कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत आहेत. कदाचित रेडेही कापत असतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आज बऱ्याच वर्षांनंतर राज व माझी भेट व्यासपीठावर झाली. आता पंचाईत अशी आहे की, ते मला सन्माननीय उद्धव ठाकरे असे म्हणाले… आणि साहजिकच आहे की, त्यांचेही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिले आहे. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरूवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी, हिंदू बांधवांनो, भगिनीनो व मातांनो. राज यांनी अप्रतिम मांडणी केली आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची गरज आहे असे मला वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर, सर्वांचे लक्ष या भाषणाकडे आहे. पण आज आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आज सर्वांनी मराठी भाषेसाठी वज्रमुठ दाखवली. महादेवराव जानकर यांनाही मी बऱ्याच वर्षांनी पाहिले.
पण एक गोष्ट नक्की, की आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी… मला कल्पना आहे की, अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सर्वांना सांगतो की, या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यापुढे उभे टाकलो आहोत.
ते पुढे म्हणाले, भाषेवरून एखादा विषय निघतो, तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात अगदी दोघांनी म्हणजे मी व राज काय आपण सर्वांनी या नतदृष्टांचा अनुभव घेतला आहे. वापराये आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात, अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते. कोणत्या भाषेत बोलत होतात. राज यांनी सर्वांच्या शाळा काढल्या, पण मोदींची शाळा कोणती? सर्वात उच्चशिक्षित आहेत….
पण हे जे काही मध्यंतरी बोललो तसे भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केले होते की, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. हिंदुत्व ही काही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहून जास्त कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता? 1992-93 साली जे काही घडले, तेव्हा आमच्या शिवसैनिकांनी अमराठी माणसांना वाचवले.
उद्धव म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी भाषेच्या आधारावर गुंडगिरी सहन करणार नाही असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तु्म्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंडच आहोत. आहोत आम्ही गुंड. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही. तुमच्या दरबारात गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करू. पण हे सगळे राजकीय बाटगे. देवेंद्र फडणवीस यांचे आजचे हे विधान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी स. का. पाटील यांनी केलेले एक विधान मला आठवते.
दिल्लीत बसलेल्यांचे पाय चाटणाऱ्यांना मी बाटगे म्हणतोय. मुंबई आपण मराठी माणसांनी मिळवली. तेव्हाही तत्कालीन सत्ताधारी मुंबई मराठी माणसांना देण्यास तयार नव्हते. तेव्हाही मराठी माणूस एकजूट आला. आज ते मराठी असल्याचा दावा करतात. पण ते केवळ नावाने मराठी आहेत. तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही हे आता तपासावे लागेल. स का पाटील बोलले होते, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळणार? झुकवल. वाकवल. गुडघ्यावर आणले. मराठी माणसांनी लढून आपल्या हक्काची मुंबई मिळवली, असे ते म्हणाले.
कशासाठी हा सगळा घोळ तुम्ही घालत आहात. काश्मीरमधील कलम 370 हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. तेव्हा यांनी एक निशाण, एक प्रधान, एक विधान ही घोषणा दिली होती. बरोबर आहे. देश एक असला पाहिजे, संविधान एक असले पाहिजे. निशाणही एकच असले पाहिजे, ते म्हणजे आपला तिरंगा असला पाहिजे, भाजपचे भांडी पुसण्याचे फडके असू नये. हे फडके म्हणजे आपला राष्ट्रध्वज नाही.
त्यांनी आता एक नवीन टुमणे काढले आहे, वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे हळुवारपणे सगळे एकेक करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान… हे आम्हाला हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही समित्या लावा, हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही करू देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आता हे आमच्याविरोधात फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. हे उद्धव ठाकरे यांच्याच काळातले. उद्धव ठाकरे एवढे काम करत होता तर पाडले कशाला गद्दारी करून? का नाही बोंबलात तेव्हा, पण मी अभिमानाने सांगेन की, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी इथे बसलेत. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली होती. त्याचा मला अभिमान आहे. काय केले त्याचे तुम्ही. महाराष्ट्रात मराठीची सक्ती का करावी लागली? कोण आमच्या मराठीचे दुश्मन आहेत. पण महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्यानंतरही काही लोक कोर्टात गेले. ती गुंडगिरी नव्हे काय.
आता कोण तरी भेडिया (सुशील केडिया) ही यांची पिलावळ आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा. आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या. शिवसेनेने काय केले? असा प्रश्न ते करत आहेत. राज आता तुला मी एकत्र घेतो, कारण तेव्हा ही आपण एकत्र होतो आणि यापुढेही आपण एकत्रच राहणार आहोत. त्यामुळे आपले सगळे तेव्हाचेच… मराठी माणूस म्हणे मुंबईबाहेर नेला. मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेला असे तर तुम्हाला वाटत असेल, तर 2014 नंतर तुम्ही जे काही महाराष्ट्र व मुंबईचे लचके तोडलेत, महाराष्ट्रातून सर्वच उद्योगधंदे बाहेर पळवले. आर्थिक केंद्र गेले. हिरे व्यापार गेले. मोठमोठी ऑफिस गेली. आपल्या काळात महाराष्ट्रात उद्योदधंदे येत होते, ते कुठे गेले? मग काय तेवढाच हिंदुस्तान आहे किंवा तेवढेच हिंदू आहेत? आम्ही सर्वकाही करत होतो. केले होते. पण तुम्ही आमच्यात गद्दारी करवलीत. आमचे सरकार पडलेत. तिकडे तुमचे जे दोन मालक बसलेत व्यापारी, त्यांच्यासाठी तुम्ही हे सर्व करत आहात.
आपल्या डोळ्यादेखत हे लचके तोडले जात होते. आपल्या दोघांनाही भांडवले जात आहे आणि हे नतदृष्ट आपल्या डोक्यावर बसत आहेत. हे किती वर्षे सहन करायचे. प्रत्येकवेळी काही झाले की, भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार आणि आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? असे म्हणणार. काही जण म्हणत आहेत की, यांचे म मराठीचे नाही तर महापालिकेचे आहे. अरे, नुसता महापालिकेचे नाही तर महाराष्ट्राचे आहे. आम्ही महाराष्ट्रसुद्धा काबिज करू. आज निवडणुका नाहीत. सत्ता येते आणि जाते. पण आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे. दरवेळी संकट आले की, आपण सर्व मराठी एकवटतो आणि संकट गेले की आपणच एकमेकांशी भांडतो. पण आता असा नतदृष्टपणा अजिबात करायचा नाही.
कारण मागील विधानसभेत त्यांनी जे काही केले ते बटेंगे तो कटेंगे. आपल्याला वाटले हे हिंदू-मुस्लिम करतील. त्यांनी हे केलेच. पण त्यांनी हे मराठी व मराठीतेतर यांच्यात केले. यांचे हेच धोरण आहे. त्यांनी जे गुजरातमध्ये केले ते महाराष्ट्रात केले. गुजरातमध्ये मागच्यावेळी असे वातावरण केले की, पटेल यांना आपटेल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण त्यांनी पटेलांना भडकावून पटेलेतरांना एकत्र केले. त्यांनी हरियाणातही तेच केले. जाट लोकांना भडकावून त्यांनी जाटेतरांना एकत्र करून सत्ता मिळवली. महाराष्ट्रातही त्यांनी तेच केले. मराठींना उचकवले आणि मराठेतरांना एकत्र करून सत्ता प्राप्त केली. मराठी माणूस आपसात भांडले आणि दिल्लीचे गुलाम आपल्यावर राज्य करायला लागले.
आपण त्यांच्या पालख्या वाहायच्या. नुसत्या पालख्यांचे भोई होणार की कधी तुम्ही आपल्या मराठीला सन्मानाने पालखीत बसवणार आहात? बस झाले. यांची जोखडे आता फेकून द्या. एकमेकांशी भांडून त्यांचे जे काही डाव असतात ते साधतात.
आमचे पंतप्रधान जगभर फिरत आहे. काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना… कुठे आला घाना देश? इकडे घाण व तिकडे स्टार ऑफ घाणा… पण एका बाजूला मोदींचा फोटो व दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला बैलही मिळत नाही. त्यामुळे त्याच्यावर जू खांद्यावर घेऊन शेती करत आहे. याची त्यांना लाज वाटली पाहिजे.
आज पेपरमध्ये बातमी आली आहे. लाडक्या बहिणींचे पोर्टल बंद झाले आहे. बसा बोंबलत आता. त्याहून अधिक भयानक गोष्ट म्हणजे आपल्या देशात सर्वात कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र आता थांबणार नाही, कर्ज काढतच राहणार. ही यांची जी काही खेळी आहे, आपसात भांडणे लावून द्यायची. मी एक साधी गोष्ट केली होती की, आपण चौपाटीला मराठी रंगभूमीचे दालन उभे करण्याचा निर्णय घेतला होता. आपण सर्व आराखड्याला मंजुरी दिली होती. पण 2-3 महिन्यांपूर्वी यांनी तो आराखडा केराच्या टोपलीत टाकून ती जागा यांनी त्यांच्या मालकाच्या घशात टाकली. हा त्यांचा मराठी अभिमान आहे.
मराठी भाषा भवनाचे भूमीपूजन मी केले होते. माझ्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार होते. कुठे गेले मराठी भाषा भवन? कुठे गेले मराठी रंगभूमीचे दालन? का तुम्ही आमची मराठी मारत आहात. का तुम्ही आमच्यावर सक्ती करत आहात. अनेकदा सांगितले की, आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. पण आमच्यावर सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर एकदा आमची शक्ती तुम्हाला अशी दाखवू की तुम्ही पुन्हा आपले डोके वर काढणार नाही.
आज एकत्र आलो आहोत. पुन्हा आपल्यात काड्या घालण्याचे काम होईल. पंतांचा धंदाच तो आहे. कुणाच्याही लग्नाला भाजपवाल्यांना बोलावू नका. ते येतील श्रीखंड, बासुंदी खातील आणि नवरा बायकोत भांडणे लावून दुसऱ्या लग्नाला जेवायला जातील. बरे एवढे केले तर पुरे. पण ते पोरीलाच पळवून घेऊन जातील. कारण, यांचे स्वतःचे असे काहीच नाही. भाजप कोणत्याही लढ्यात नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही तो नव्हता. भाजप हा सर्वात शेवटी आला आणि 57 ची निवडणूक झाली की हे सर्वात अगोदर बाहेर पडले. तेव्हा त्यांचे नाव जनसंघ असे नाव होते. आम्ही त्यांच्याकडून देशाभिमान व महाराष्ट्राभिमान शिकायचा का? हे लोक मुंबईच्या चिंधड्या उडवत आहेत. अख्खी मुंबई एका व्यक्तीच्या घशात घालत आहेत. आपण केवळ बघत बसायचे का. आज मुंबईतील सर्वात जास्त जागेचा कुणी मालक असेल तर तो यांच्या मालकाचा मित्र आहे तो म्हणजे अदानी.
कुणाची जागा, कुणी रक्त सांडले. हुतात्माच्या बलिदानाने मिळालेली मुंबई आपण राखू शकणार नसू, तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्यामुळे आपण रक्ताची शपथ घेऊन आपण मुंबई व मराठीच्या रक्षणासाठी उभे राहिले पाहिजे. यापुढे आम्ही मराठी व महाराष्ट्र धर्माचे रक्षण करणार.
आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही. पण मारुती स्त्रोत आम्हाला का विसरवायला लावता? आमचा जय श्रीरामला विरोध नाही. पण भेटल्यानंतर राम-राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आलोत. तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा देत आहात. पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळी होऊन गेलेत, त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्यामुळे यांचा काहीच आगापिच्छा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत. वापरा आणि फेका.
तो काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी करायची. पुष्पा पिक्चरमधला हिरो झुकेगा नही साला असे म्हणतो. पण हे लोक उठेगा नही साला असे म्हणतात. कुछ भी बोलो उठेगाही नही. अरे कसे उठणार, आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखे. म्हणजे विचार मी म्हणतोय… हिंदी भाषेला विरोध न करणारा माणूस बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल. आपला मालक आला म्हणून त्याच्यापुढे जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांचा पाईक असू शकेल. मग आता उघडा डोळे बघा नीट. आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघड्याची वेळ येणार नाही. कायमचे मिटून जातील.
आत्ताच डोळे उघडा. आत्ताच जागे व्हा. आत्ता आलेली जाग जाणार असेल तर मग मराठी आईची मुले म्हणू नका. एक तर कुणावर अन्याय करू नका. पण तुमच्या अंगावर कुणी हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका. देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही असे तुम्ही म्हणत आहात. तुम्ही मला दुसऱ्या राज्यात जाऊन गुंडगिरी करणारा एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे चेलेचपाटे उठून कुणावरूनही आरोप करून तमाशे करत आहेत. यापुढे मराठी माणसांनी एकजूट ठेवावी. अगदी भाजपमधील मराठी माणसांनीही यात आले पाहिजे, असे ते म्हणाले.
विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) चा मराठी प्रकाशन विभाग आणि विवेकानंद केंद्र पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मार्क्स आणि विवेकानंद (एक तौलनिक अध्ययन)’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक व भाजपा प्रवक्ते माधव भांडारी होते. प्रमुख वक्ते म्हणून ‘चाणक्य मंडल’ चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी व अभिजीत जोग उपस्थित होते. उभयतांनी विचारप्रवर्तक मनोगत व्यक्त केले.
स्व. पी. परमेश्वरन लिखित आणि स्व. चं. प. भिशीकर अनुवादित या पुस्तकामध्ये मार्क्स आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास मांडण्यात आला आहे. कार्यक्रमात विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) च्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर , विवेकानंद पुणे केंद्राचे संचालक माधव जोशी, पुस्तकाचे संपादक आनंद हर्डीकर उपस्थित होते.
सूत्रसंचालन स्वाती कुलकर्णी आणि मंजुषा कानिटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर जोगळेकर यांनी केले, तर आनंद हर्डीकर यांनी पुस्तक परिचय करून दिला.
माधव भांडारी म्हणाले, भारतातील मार्क्सवाद-समाजवाद संपला अशी हाकाटी मारली जाते, पण ते काही खरे नसून आजही भारतात समाजवाद, मार्क्सवाद जिवंत आहे, आज जरी समाजवादाचा राजकीय निवडणुकीत पराभव झालेला दिसत असला तरी, या विचारांचा प्रभाव अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. त्याचा मतपेटीतून आविष्कार होताना दिसत नाही ही त्यांना चिंता आहे. परंतु हा विचार पुन्हा प्रभावी होऊ शकतो, असे मत भांडारी यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अविनाश धर्माधिकारी, अभिजित जोग, सुधीर जोगळेकर, आनंद हर्डीकर, माधव जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले,”आजही भारतात शिक्षण, माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात समाजवाद मार्क्सवाद जिवंत आहे. गुलामगिरीची व्यवस्था आणि संस्कृती संपविण्याच्या दृष्टीने हा मार्क्सवाद चुकीचा आहे. त्या ऐवजी धर्म, मोक्ष, काम यावर आधारीत असलेली माणसाला माणूसपण बहाल करणारी भारतीय विचारसरणी, जी विवेकानंदांना अभिप्रेत होती, तीनुसारच हे विश्व चालले तरच जगाचे आणि मानवी संस्कृतीचे उत्थान होईल ” असे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
भारतीय संस्कृती आणि विचार हे समानतेवर अवलंबून असून ते भांडवलशाही अर्थव्यवस्था वा दुसऱ्याच्या लुटीवर अवलंबून नाहीत, असेही मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले
मार्क्सचा जडवाद हाच मुळी अंधश्रद्धेचा विचार होता हे आता सिद्ध झाले आहे, आणि विवेकानंदांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म हाच सर्व धर्मांची जननी आहे, हा विचार आजच्या जागतिकीकरणामुळे पुढे येत आहे, असे विचार धर्माधिकारी यांनी मांडले.
मार्क्सची पूर्ण मांडणी ही केवळ आर्थिक विकास, अर्थ व्यवस्था या मुद्द्यावर होती तर विवेकानंदांची मांडणी ही अध्यात्मिक आणि संपूर्ण विश्वातील मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणाची होती, असेही धर्माधिकारी म्हणाले.
या कार्यक्रमाला अनेक अभ्यासक, आणि युवक-युवतींच्या उपस्थितीने चांगला प्रतिसाद लाभला.