पुणे- औंध भागात दहशत माजवणा-या प्रतिक कदम,अतुल चव्हाणसह ७ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक २८/०६/२०२५ रोजी ००/३० वा चे सुमारास विधाते वस्ती, औंध, पुणे याठिकाणी फिर्यादी व त्यांचे मित्र हे गप्पा मारत असताना त्याठिकाणी १२ ते १५ आरोपींनी हातामध्ये लाकडी दांडके व हत्यारे घेवुन येवुन त्यांच्या हातातील हत्यारे हवेत फिरवत सदर भागात दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या मित्रांना हत्याराने व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. सदरबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, गु.र.नं.२५३/२०२५, भा.न्यां.सं.क. ११८(२),११५(२),३५२,३५१(२),१८९(२), १८९(४),१९०,१९१(२),१९१ (३), १९४ (२), म.पो. अधिनियम कलम-३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ. ॲमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्हयामधील आरोपींचा शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अनिकेत पोटे व तपास पथकामधील अंमलदार यांनी आरोपींची माहिती प्राप्त करून मुळशी भागामधून आरोपी १) प्रतीक सुनिल कदम, वय-२६ वर्ष, रा-कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रोड, औंध, पुणे, २) अमीर अल्लाउददीन शेख, वय-२८ वर्ष, रा- कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रोड, औंध, पुणे, ३) अतुल श्याम चव्हाण, वय-२७ वर्ष, रा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, डी. पी. रोड, औंध, पुणे, ४) रॉबीन दिनेश साळवे, वय-२६ वर्ष, रा-फ्लॅट नं.०७, अजिंक्य ०१, दर्शनपार्क, डी.पी. रोड, औंध, पुणे, ५) समीर अल्लाउददीन शेख, वय-२६ वर्ष, रा- कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रोड, औंध, पुणे, ६) जय सुनिल चेंगट, वय-२१ वर्ष, रा-कस्तुरबा गांधी वसाहत, जुनवणे शाळेसमोर, गणेशखिंड रोड, औंध, पुणे व ७) अभिषेक अरुण आवळे, वय-२४ वर्ष, रा-कस्तुरबा गांधी वसाहत, मारुती मंदिराजवळ, गणेशखिंड रोड, औंध, पुणे यांना दिनांक ०१/०७/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींकडुन एकुण ०७,६०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये एक गावठी कट्टा, तीन कोयते व एक चारचाकी गाडी, दोन मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असुन त्यांचेवर चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन येथे वेगेवेगेळे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परि-४, पुणे शहर, सोमय मुंडे, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा, पुणे शहर हिंमत जाधव, मा. सहा पोलीस आयुक्त, येरवडा विभाग अति कार्यभार खडकी विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन उल्हास कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आश्विनी ननवरे, सपोनि नरेंद्र पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के, महेंद्र वायकर, वाघेश कांबळे व सुरज खाडे यांनी केली आहे.
औंध भागात दहशत: प्रतिक कदम,अतुल चव्हाणसह ७ जणांच्या टोळीला अटक, अजून ८ जणांचा शोध सुरूच
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश
कोठडीतील मृत्यूबाबत न्यायालयाचा हा महत्वपूर्ण निर्णय : ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे : परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर त्या विरोधात आंदोलन करणाऱ्या उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचे पुराव्यातून सिद्ध झालं आहे. त्यामुळं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय कोठडीत मृत्यूबाबत महत्वाचा असून, हा निर्णय म्हणजे आमचा सर्वांत मोठा विजय आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्याबद्दल राज्य सरकार आणि पोलीस दोघे मिळून हे हार्ट अटॅकचे प्रकरण आहे असे मांडत होते, त्याला न्यायालयाने खोडून काढले आहे. हा सर्वात मोठा विजय आहे. आता जे न्यायालयीन कोठडीत मृत्यू होतील, त्या सर्व प्रकरणांमध्ये न्याय देण्याची जबाबदारी न्यायालयावर असेल. या लढाईत आम्ही शेवटपर्यंत लढू, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भातील दिलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाजूने आम्ही आहोत. त्याचे आम्ही समर्थन करतो. कोठडीतील मृत्यूबाबत त्याला कायदेशीर निकालात आणल्याचे हे पहिले पाऊल आहे. आता कोठडीत असताना जे मृत्यू होतील, त्या सर्व प्रकरणांमध्ये न्याय देण्याची जबाबदारी न्यायालयावर असेल, हे आपण सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आम्ही मांडलेल्या प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.
पीडितांनी जे निवेदन दिले आहे, त्या निवेदनाच्या आधारे एफआयआर नोंदवावा, असा आदेश मोंडा, परभणी पोलीस ठाण्याला न्यायालयाने दिला आहे. एका आठवड्यात एफआयआर नोंदवावा असा आदेश दिला आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात न्यायालयाने पोलिस अधीक्षकांना आदेश दिले आहेत की, सर्व कागदपत्रे डीवायएसपीला द्यावीत. यावरून एसपीवर कोर्टाचा कमी विश्वास आहे असे दिसून येत आहे.
मागील ७० वर्षांत केवळ २-३ टक्के कस्टोडियल डेथ (कोठडीतील मृत्यू) प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा झाली आहे. उर्वरित मोकळे सुटले आहेत. एखाद्याचा कोठडीत असताना मृत्यू झाला तर अशा प्रकरणात न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर पुढे काय करायचे याबाबत कोणताही स्पष्ट कायदा किंवा निर्देश नाहीत. त्यामुळे आज न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दिलेल्या आदेशामुळे यापुढे अशी प्रकरणे घडल्यास त्याला न्याय देण्याची जबाबदारी न्यायालयांवर असेल. न्यायालयाने ३० जुलैला पुढील तारीख दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे सोमनाथ सूर्यवंशी केस पहिल्या दिवसापासून रस्त्यावर आणि न्यायालयीन पातळीवर स्वतः लक्ष घालून लढत आहेत. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनी औरंगाबाद खंडपीठात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत: नाना पटोले
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा.
मुंबई, दि. ४ जुलै
राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे,” असे उत्तर देतात. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले, त्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतील, तर हे राज्याला भूषणावह नाही. ही सर्व परिस्थिती बिघडवण्याचे काम सरकारने केले आहे असा सरकारवर हल्लाबोल ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.
विधानसभेत बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात खरीप हंगामाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. DBT च्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले, असा गवगवा करण्यात आला. शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य समर्थन मूल्याने खरेदी केले गेले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने योजना आणली; आणि ते धान्य घेतल्यानंतर ते पैसे देणे भाग आहे. पण एक वर्षापासून सरकारने शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. शेतकऱ्याने शेती कशी करावी, हा प्रश्न आहे.
लातूर जिल्ह्यातील एक शेतकरी स्वतःला औताला जुंपून घेतो आणि शेतकरी भगिनी त्याला हाकते आहे, असे चित्र संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. लातूर जिल्ह्यातील ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणीय नाही. राज्यातील शेतकऱ्याने स्वतःला जुंपून घ्यावे, आणि मग नंतर सरकारने त्या शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे, त्याला बैलजोडी देऊन मदत करावी, त्यासाठी वाट बघावी का?
पटोले पुढे म्हणाले की, सरकारने गोरक्षणाचा कायदा केला. गोंदिया जिल्ह्यात शेतकरी उन्हाळ्यात शेतीसाठी बैल घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांचे बैल जप्त केले आणि तथाकथित गोरक्षकांच्या स्वाधीन करून त्यांच्या संस्थेत पाठवले. मी कलेक्टरला फोन केला असता, त्यांनी ठाणेदाराला सांगून सोडविण्यासाठी सांगितले; परंतु या तथाकथित गोरक्षकांनी ते बैल देण्यास नकार दिला. त्यांनी ते परस्पर विकून टाकले. हे तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांना लुटत आहेत. यावर सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे. काल घडलेली घटना राज्याला भूषणावह नाही. शेतकऱ्यांची चेष्टा सरकारने लावली आहे.
शेतकऱ्यांवर जिथे अन्याय झाला, तिथे खासदारकी सोडली, ही खुर्चीची लढाई नाही पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, सत्तेतील लोक जर शेतकऱ्यांचा अपमान करत असतील, तर हे कदापि सहन केले जाणार नाही. काल सभागृहात मंत्री नव्हते, अदृश्य लॉबीमध्ये अधिकारी नाहीत. शेतकऱ्यांविषयी या सरकारची काय मानसिकता आहे, हे जनतेने पाहिले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्याची चेष्टा पोलिस प्रशासन आणि व्यवस्थेच्या माध्यमातून केली गेली, अशी परिस्थिती या राज्याची झाली आहे. खरीप हंगामाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. हे पैसे व्याजासकट शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत.
केंद्रावर शेतकऱ्यांनी धान्य विकले, परंतु अद्याप पैसे मिळालेले नाहीत. बँकेने व्याज आकारण्यास सुरुवात केली आहे. मार्चच्या आधी पैसे न भरल्यास, पैसे व्याजासकट भरावे लागतात. ते थकीत राहिले आहेत, आणि हेच कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीये. पर्यायाने त्यांना सावकाराकडे जावे लागते. मी ज्या मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे, तिकडे रब्बी हंगामात देखील धान पिकवले जाते आणि त्याकरिता केंद्र सरकारने खरेदी केंद्रे सुरू केली. अद्याप शेतकऱ्यांचे विकलेले धान सरकार घेण्यास तयार नाही. केंद्रावर अजूनही ते धान तसेच आहे, अजूनही कृषी विभागाकडून मान्यता मिळत नाहीये. यात शेतकऱ्यांचा काय दोष आहे?
आज २३०० रुपये धानाचे समर्थन मूल्य असले तरी, त्याला बाजारात ५०० रुपये भाव मिळतो. सरकार बोनसची गोष्ट करते, पण ५०० रुपये देखील देत नाही. सरकारने केंद्रावर घेतलेले धान घेणार का? याचे उत्तर सरकार देणार का? धान खरेदीत घोटाळा होत आहे. शेतकऱ्यांसाठी समर्थन केंद्र उघडले, परंतु तिथे सरकारने दलाल बसवले आहेत. त्या दलालांसाठी खरेदी चालू आहे का? उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे, कारवाईचे आदेश दिले पण काही उद्योगपतींच्या दबावामुळे ती मीटिंगच रद्द करण्यात आली. गडचिरोली येथे चाललेल्या धान घोटाळ्यावर चौकशी आणि कारवाई करा अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सरकारने गेल्या वर्षीचे पैसे दिले नाहीत. आणि या वर्षी पूर्ण वर्षभर अवकाळी पाऊस पडला. शेतकऱ्यांच्या तोंडातील घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. शेतकरी अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटांचा सामना करत आहे. ज्यावेळी अवकाळी पाऊस पडतो, त्यावेळी तहसीलदारांना सांगूनदेखील पंचनामे होत नाहीत. शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेवर झालेले नाहीत, शासनाचे धोरण फक्त कागदोपत्री आहे. नैसर्गिक आपत्तीत वेळेवर पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली पाहिजे अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.
राज्यातील दूध उत्पादकांची व्यथा वेगळी आहे. आज दुधाचा भाव ३९ रुपये आहे, परंतु जनावरांसाठी लागणारे खाद्य महागले आहे. त्यामुळे दुधाचे भाव वाढवले गेले पाहिजेत आणि दुधाला ५० रुपये भाव द्यावा. २०१४ पासून डिझेल, कीटक नाशके, बियाणे, तसेच खताच्या किमती वाढल्या आहेत. प्रत्येक गोष्टीवर १८ टक्के GST लावण्यात येतो. शेतकऱ्याने एक लाख रुपये खर्च केला, तर त्याला १८ हजार रुपये टॅक्सच्या रुपात द्यावे लागतात आणि त्याच्या बदल्यात सरकार फक्त ६००० रुपये देते. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन “आम्हीच सर्व काही देतो” असा आव आणून, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप सरकार करत आहे. शेतकऱ्यांना लुटायचं आणि मूठभर लोकांना वाटायचं हे सरकारचं धोरण बदललं पाहिजे.
नाना पटोले पुढे म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन कापले आहेत ते पुन्हा जोडावेत. तसेच कमीत कमी बारा तास लाईट दिली पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार असताना पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीची भूमिका घेण्यात आली. मग या सरकारला काय अडचण आहे? अंबानींचे ४८००० कोटी रुपये माफ होतात. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला १४००० कोटी रुपयांचे टेंडर देता. परंतु सुप्रीम कोर्टाने त्यात भ्रष्टाचार झाल्याचे सांगितल्यावर तुम्हाला ते टेंडर रद्द करावे लागले. हजारो कोटी रुपये मूठभर उद्योगपतींना सरकार देते. मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवतात? घोषणा केल्याप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी याच अधिवेशनात करा, नाहीतर सरकारच्या जुमलेबाजीला शेतकरी कधीच माफ करणार नाही.
राज्यात ३४,७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, ८२,९९९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी राज्य सरकारने १०० कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. सर्वाधिक नुकसान नागपूर विभागात १०,०९५ हेक्टरवरील २६,२८७ शेतकऱ्यांचे झाले आहे. कोकणात ३,००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, २,९५९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पुणे महसूल विभागात २,६९२ हेक्टर बाधित झाले. ८२,९९९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केवळ १०० कोटी रुपयांची मदत – हजारो कोटींच्या नुकसानीपुढे अत्यंत तुटपुंजी. निसर्गही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही, आणि सरकारही नाही – अशी अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे नाईलाजास्तव शेतकरी आत्महत्या करतो. सरकारने प्रथम प्राधान्य शेतकऱ्याला दिलं पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.
‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम; महाराष्ट्राला लागलेला गद्दारी व लाचारीचा कलंक: हर्षवर्धन सपकाळ
एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंची शिकवणही धुळीस मिळवली; गुजराती ‘मालका’ला खूष करण्यासाठी किती खालच्या थराला जाणार ?
मुंबई, दि. ४ जुलै २०२५
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून पक्ष व चिन्ह गुजरातच्या मालकाने शिंदेंना दिले व मुख्यमंत्रीपदी बसवले त्या शिंदेच्या तोंडून मोदी शाह स्तुती करणे समजू शकतो पण आपल्या गुजराती मालकाला खूष करण्यासाठी चक्क जय गुजरात म्हणावे एवढी लाचारी बरी नव्हे. अमित शाह यांचा ‘वफादार’ शिलेदार होण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली. महाराष्ट्राच्या सत्तेत एकापेक्षा एक नमुने बसलेत हे पुन्हा एकदा दिसले. एकनाथ शिंदे गुजरातचे नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत याचा त्यांना विसर पडला का ? असा सवाल करत महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मुंबई व महाराष्ट्र विकून गुजरातची तिजोरी भरण्याचे काम शिंदे करत आहेत. मागील ११ वर्षात महाराष्ट्रातील उद्योग, संस्था, कार्पोरेट ऑफिसेस आणि कोट्यवधी निधी हा फडणवीस आणि शिंदेंमुळेच गुजरामध्ये जात आहेत. वेदांता फॅाक्सकॅान सारखे मोठे प्रकल्प ज्यामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता तो गुजरातला पाठवून दिला. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुणांना रोजगार नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, कुपोषण वाढले आहे पण सत्तेतील हे लाचार गुजरातची गुलामी करण्यात व्यस्त आहेत. अशा महाराष्ट्रद्रोह्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..
‘अभंगरंग’ मधून भक्तिरसाचा आविष्कार !
पुणे :भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन आणि संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभंगरंग’ या अभंग गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि. ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे करण्यात आले.आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात भक्तिरसात न्हालेल्या अभंग गायनाने रसिकांची मने जिंकली. गुरुकुलच्या युवा गायिका अनुष्का साने, रसिका पैठणकर आणि नुपूर देसाई यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. गीत इनामदार(तबला), आकाश नाईक(हार्मोनियम), स्वप्नील सूर्यवंशी (पखवाज)आणि आनंद टाकळकर(तालवाद्य) यांनी गायिकांना साथसंगत केली , तर कार्यक्रमाचे भावपूर्ण निरूपण ह. भ. प. मानसी बडवे यांनी केले.
‘जय जय राम,कृष्ण हरी’ या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अनुष्का साने यांनी ‘अवघे गर्जे पंढरपूर,पाहावा नयनी’,’छंद लागला’ हे अभंग सादर केले.रसिका पैठणकर यांनी ‘एकच रे मागणे’,’श्रीरंगा’,’जोहार’ हे अभंग सादर केले. नुपूर देसाई यांनी ‘रूप पाहता लोचनी’,’अवघाचि संसार’,’परब्रम्हम निष्काम ‘हे अभंग सादर केले.’अगा वैकुंठच्या राया ‘ या अभंगाने सांगता झाली.सांस्कृतिक प्रसाराच्या उपक्रमांतर्गत भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणारा हा २५१ वा कार्यक्रम ठरला.कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रवेश विनामूल्य होता. पुणेकर रसिक,भाविकांनी या भक्तिपर्वाचा लाभ घेतला.
भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ज्ञानेश्वरीची प्रत देऊन कलाकारांचा सत्कार केला.संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान चे गोविंद बेडेकर,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे माजी प्रमुख अभियंता अविनाश शेटजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विश्वराज हॉस्पीटलमध्ये पुण्यातील प्रथमच ‘ट्रान्सकॅथेटर फॉन्टन कम्प्लिशन’ शस्त्रक्रिया यशस्वी
पुणे, दि.४ : बारामती येथील १८ वर्षीय योगेश शिंदेला थोडे चालल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत होता. तो इतर मुलांसारखा खेळू शकत नव्हता. घरातील लोक चिंतेत होते. हळू हळू त्याचा आजार वाढत चालला होता. जेव्हा सरकारी दवाखान्यामध्ये तपासणी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ही शस्त्रक्रिया करायची असेल तर लाखो रुपये लागत होते. त्याची परिस्थिती गरीबीची असल्यामुळे हा खर्च ते करू शकत नव्हते. परंतू लोणी-काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलने ‘ट्रान्सकॅथेटर फॉन्टन कम्प्लिशन’ या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विनाचिरफाड करता निःशुल्क शस्त्रक्रिया केली.
१० हजार बालकांमध्ये एखादयालाच असणार्या हृदयाच्या आजाराला दोन वेळा ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. योगेश बाळू शिंदे हा त्यापैकीच एक आहे. त्याच्यावर पारंपरिक पद्धतीऐवजी आम्ही एका अत्याधुनिक व कमी धोकादायक प्रक्रियेचा अवलंब करून फॉन्टन प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्णपणे ट्रान्सकॅथेटर मार्गाने यशस्वी केला. त्यामुळे उघड्या छातीची शस्त्रक्रिया टाळता आली. पारंपरिक शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांचा डिस्चार्जचा कालावधी लागतो. परंतू आम्ही रुग्ण केवळ तीन दिवसांतच डिस्चार्ज दिला. अशी माहिती लोणी-काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलचे बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिषकुमार बनपुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही पत्रकार परिषद हॉस्पीटलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कातकडे, वैद्यकीय संचालक डॉ. सुजितकुमार एम., कार्डिओलॉजिस्ट डॉ. सूरज इंगोले, बालरोग विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत सहारे, आयसीयू विभाग प्रमुख डॉ. विजय खंडाळे, भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल शेंडगे हे उपस्थित होते.
डॉ.बनपुरकर म्हणाले, ही एक अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, मात्र आम्ही कॅथेटर-आधारित तंत्र वापरून रुग्णाचा धोका, शारीरिक आघात आणि रिकव्हरीचा कालावधी फारच कमी केला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन ९६% पर्यंत वाढले आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा दिसून आली.
डॉ. सुजितकुमार एम. म्हणाले, योगेश बाळू शिंदे (वय १८) हा नुकत्याच पार पडलेल्या एका वैद्यकीय शिबिरात उपस्थित राहिला, तेव्हा त्याला तीव्र दम लागणे आणि केवळ ७०% ऑक्सिजन सॅच्युरेशन अशी स्थिती होती. त्याच्या हृदयात ट्रायकसपिड अॅट्रेशिया, डबल आउटलेट राईट व्हेंट्रिकल (DORV), व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) आणि पल्मोनरी स्टेनोसिस (PS) अशा अनेक जन्मजात दोषांची चिकित्सा झाली होती. २०१८ मध्ये बायडायरेक्शनल ग्लेन शंट व फॉन्टन प्रिपरेशन शस्त्रक्रिया करून त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता.
पेशंटची आई सुनीता शिंदे म्हणाल्या, २०१८ साली आर्थिक मदतीच्या जोरावर पहिली शस्त्रक्रिया झाली, आणि नुकत्याच एका वैद्यकीय शिबिरात विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी झालेल्या भेटीनंतर दुसरी टप्प्यातील शस्त्रक्रिया एका नव्या आणि कमी जोखमीच्या पद्धतीने मोफत करण्यात आली. त्यामुळे माझ्या मुलाला नवीन जीवन जगण्याची उमेद मिळाली. यासाठी मी विश्वराज हॉस्पीटल व डॉक्टरांचे आभार मानते.
ही शस्त्रक्रिया IPF योजनेअंतर्गत पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही अत्याधुनिक उपचार घेण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त, हॉस्पिटलने आतापर्यंत सुमारे ५० बालहृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.
या यशामुळे भविष्यात अधिक रूग्णांसाठी ट्रान्सकॅथेटर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.
अतिक्रमण विरोधी कारवाईचा महापालिकेसमोर निषेध
पुणे:
पुणे महापालिका हद्दीतील सिंहगड रस्त्यावर फन टाईम टॉकीज परिसरात पथविक्रेत्यांवर करण्यात आलेल्या अन्यायकारक अतिक्रमण कारवाईच्या विरोधात लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर-जिल्हा शाखेच्या वतीने दि. ४ जुलै २०२५ रोजी महापालिके समोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. निवृत्त सहाय्यक पोलिस अधीक्षक मिलिंद गायकवाड, के.सी.पवार, राहुल उभे, कल्पना जावळे,विजय अठवाल, अंकल सोनवणे,एड.अमित दरेकर,नारायण भिसे,रणजित सोनावळे,अभिजीत पाटील,आलोक गिरणे,कुसुम दहिरे,श्रावण कांबळे,अब्दुल शेख,स्वाती देशमुख,राजू म्हसके,शोभा कुडाळकर,मयूर विटेकर, राम आल्हाट, बंडू वाघमारे, इत्यादी उपस्थित होते.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता व पथविक्रेता संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत विक्रेत्यांचा माल विनापत्र जप्त केला. यादीही दिली गेली नाही. नाशवंत माल तत्काळ परत द्यायचा नियम असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत विक्रेत्यांना न्याय नाकारला. त्यामुळे संतप्त झालेल्या पथविक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक जनशक्ती पार्टीने आज ढोल ताशांच्या गजरात निषेध करत महापालिकेच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.यावेळी अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत, सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. पथविक्रेत्यांच्या हक्कांचे उल्लंघन थांबवावे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
आंदोलनात पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, आणि पथविक्रेते सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून, लवकरात लवकर न्याय न दिल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
सुप्रिया सुळेंकडून ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचे स्वागत
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या ,’ मी स्वतः महिन्यातून दोन वेळा हिंजवडीला भेट देऊन कामाची पाहणी करणार असून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सरकार आम्ही एकत्र येऊन हिंजवडी परिसरातील अडचणी सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. हिंजवडी आणि परिसरातील विकास कामे आणि देखरेखीसाठी एक सक्षम व्यवस्था असणे गरजेचे आहे, त्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी केली आहे . तसेच मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांची एकत्रित बैठक घेऊन हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे. या समस्यांबाबत आपण ८ जुलैला उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहे . हिंजवडीतील नाले सफाई, राडारोडा आणि अतिक्रमणविरोधी कारवाई ही कामे २६ जुलैपर्यंत झाल्यास अधिकाऱ्यांचा सत्कार करु पण कामे न झाल्यास आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले. हिंजवडी परिसरातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे. शाळांच्या वेळेत थोडासा बदल केल्यास ट्राफिक कमी करण्यास मदत होईल का याबाबत आपण शाळांची चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बंगरुळूचे खासदार पी.सी मोहनजी यांनी तिथल्या कंपन्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याशी संपर्क साधून त्या पद्धतीने आपणही पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. महत्वाचे म्हणजे आपण विरोधी पक्षात असलो तर समस्या सोडवण्यासाठी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचे आवर्जून सांगितले.-
पुणे-ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रात मोठे योगदान दिले आहे. ठाकरे हे फक्त एक नाव नाही, तर एक ब्रँड आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य एकत्र आले, तर त्यांचे मनापासून स्वागत करू. कोणतीही गोष्ट मनापासून केली पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमीलनावर शुक्रवारी भाष्य केले.

खासदार सुप्रिया सुळे शुक्रवार सकाळपासून हिंजवडी आयटी पार्कसह माण मारुंजी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या समस्येची पाहणी केली. त्यानंतर त्या बोलत होत्या. सुळे यांनी 26 जुलैपर्यंत हिंजवडीतील रस्ते दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला अल्टीमेटमदेखील दिला आहे. सुळे म्हणाल्या, की 26 जुलैपर्यंत परिस्थिती सुधारली पाहिजे. अन्यथा, आमचा नाईलाज होईल. हिंजवडीचा विकास झाला पाहिजे. हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विलीन करण्याबाबत नागरिकांचे मत महत्त्वाचे आहे. वेळेत परिस्थिती सुधारली, तर हिंजवडीला येऊन संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करू, असेही त्यांनी सांगितले.
ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रात मोठे योगदान दिले आहे. ठाकरे हे फक्त एक नाव नाही, तर एक महत्त्वाचा ब्रँड आहे. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता ठाकरे आहे. त्यांनी मोठ्या श्रद्धेने शिवसेना बांधली आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य एकत्र आले तर त्यांचे मनापासून स्वागत केले जाते. कोणतीही गोष्ट मनापासून केली पाहिजे. यश आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देश आणि राज्यासाठी योगदान दिले आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्याचा उल्लेख केला जाईल. त्यांचे योगदान कोणीही संपवू शकत नाही, असे मतही सुळे यांनी नोंदवले. राज्यातील गुन्हेगारीला राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारमुळे राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी, माण, मारुंजी या भागाला भेट सुळे यांनी देऊन पाहणी केली. यावेळी हिंजवडी फेज-१ ते माण रस्ता, माण फेज-३ ते मेट्रो स्टेशन कारशेड रस्ता, माण फेज-३ ते मेगापोलीस रस्ता, भोईरवाडी रस्ता, हिंजवडी फेज-२ ते डोहेलर कंपनी रस्ता, हिंजवडी ते मारुंजी रस्ता टी जंक्शन या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ते मंजूर होऊनही ते रस्ते अद्याप झालेले नाहीत. पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. त्याचबरोबर या भागात वीज पुरवठा देखील सतत खंडित होत आहे. या भागात अनेक नवीन प्रकल्प सुरू असून त्यांच्याकडून नियमांचा भंग होत असल्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदूषण आणि इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रचंड त्रास आणि मनस्तापही सहन करावा लागत आहे. या भागातील वाहतुकीची समस्या देखील कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक पायाभूत सुविधांची देखील दुरावस्था झालेली आहे. हिंजवडी येथे देशातील महत्वाचे आयटी पार्क असल्यामुळे येथे अनेक नामांकित कंपन्या आणि हजारो तज्ज्ञ इंजिनियर कार्यरत आहेतं त्यांना या समस्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत लवकरच पुणे जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आणि एमआयडीसी यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्या सोडवण्याबरोबरच आगामी काळात समस्या टाळण्यासाठी उपाययोजना यावर चर्चा करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, प्रशासकीय अधिकारी, नागरिक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज-उद्धव मनोमिलनामागे फडणवीस यांचाच हात,ठाकरे एकत्र आले तर शिंदेंनाच मोठा फटका
जे ठाकरेंचे नाही राहिले ते फडणविसांचे काय राहणार ?
मुंबई-
इम्तियाज जलील आज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येत आहेत. त्यांच्या एकत्र येण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. फडणवीस यांना माहिती आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी केव्हाही त्यांची साथ सोडू शकतात. जे उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊ शकतात, ते उद्या इतर कुणी ऑफर दिली तर त्यांच्यासोबतही जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याची चाल खेळली आहे.
इम्तियाज जलील यांनी यावेळी मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसणार असल्याचाही दावा केला. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा फटका बसेल. सध्या मराठी माणसांना जे हवे आहे, तेच होत आहे. आम्ही विरोधात असूनही शिवसेना ही मराठी माणसाची ताकद आहे हे मान्य करतो, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाद्वारे एमआयएम भविष्यात महाविकास आघाडीशी आघाडी करण्याचे संकेत मिळत आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा दावा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी दगाफटका करू शकतात अशी भीती देवेंद्र फडणवीस यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी राज व उद्धव यांना एकत्र आणण्याचा प्लॅन आखला आहे, असे ते म्हणालेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे सद्यस्थितीत मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतरही वातावरण शांत झाले नाही. आता उद्या शनिवारी मुंबईत राज व उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याद्वारे हे दोन्ही बंधू एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यांची ही एकी पुढील सर्वच निवडणुकांत दिसून येण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकली पाहिजे-थेट अजितदादांचा आता इशारा
मुंबई-पुण्यात एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना अशा प्रकारच्या नाऱ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यात अमित शहा यांचे दोन-तीन कार्यक्रम झाले. पहिल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलले नंतर मी एका कार्यक्रमात होतो. मी असे पर्यंत तर मी असे काही ऐकले नाही. कारण मी माझा कार्यक्रम झाला की निघून आलो होतो. त्यामुळे एकनाथ शिंदे काय म्हणाले हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही असे म्हणत थेट राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, आपला देश हा अनेक जाती धर्मात विखुरला गेलेला देश आहे. अनेक भाषा बोलल्या जातात. 14 महत्त्वाच्या भाषांचा उल्लेख केला जातो. आपल्या महाराष्ट्रातील मातृभाषा ही मराठी आहे. इतके वर्ष आपण प्रयत्न करत होतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी तो दर्जा दिला. आपल्या महाराष्ट्रात जो कोणी शिक्षण घेतो त्याला मराठी लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मराठी भाषा ही सक्तीची सुद्धा केली आहे. आपण इंग्रजीत शिका किंवा इतर कोणत्याही माध्यमात शिका त्यात मराठी असणारच. कोल्हापूर भागातील सीमावर्ती गावात्या लोकांना महाराष्ट्रात यायचे आहे. तिथल्या कर्नाटक सरकारने तिथे कानडी भाषा सक्तीची केली आहे. मराठी जवळपास बंदच केली आहे. परंतु, तिथल्या भागातील अनेक शाळांमध्ये आपण आपल्या शाळांमध्ये मराठीची सक्ती केली आहे.
मुंबई हे कॉस्मो पॉलिटन शहर आहे. इथे अनेक भागांतून लोक राहायला येतात. महाराष्ट्रात राहायचे असेल तर तुमच्या मुलांना शाळेत मराठी शिकवले पाहिजे, असेच आमचे धोरण आहे. पण त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य का केले असेल, यामागची पार्श्वभूमी काय आहे हे बघावे लागेल. कारण मी आत्ता पुण्यातून आलो. आता त्याला मराठी येतच नसेल तर तो म्हणणारच की बाबा मला येत नाही मराठी. कोणतीही भाषा बोलण्याचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण मराठी बहुतेकांना समजते. तुम्ही ज्या राज्यात राहतात तिथली नवीन पिढी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असते. जुने लोक तेवढा प्रयत्न करत नाहीत, असे अजित पवार म्हणाले.
बाजीराव पेशवे यांच्या युद्धनिती अंगिकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित : अमित शहा
प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा, वीर योद्ध्यांचा खरा इतिहास जगासमोर यावा : अमित शहा
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा एनडीएतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल : अमित शहा
स्वराज्याची मशाल पेटती ठेवत पेशवे यांनी देशाच्या सीमाही विस्तारल्या : अमित शहा
एनडीएमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूप पुतळ्याचे अनावरण
पुणे : मृत्यूपर्यंत पराजयाला जवळही येऊ न देणाऱ्या अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा एनडीए येथे उभारला ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पुढील पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली त्यातून स्वराज्याचे संस्कार पेरले. ही ज्योत छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी, तानाजी यांनी तेवत ठेवली. हीच परंपरा पुढे चालवत थोरले बाजीराव पेशवे यांनी स्वराजाची मशाल पेटती ठेवली. युद्ध कौशल्याच्या माध्यमातून स्वराज्याची सीमा विस्तारण्याचे मोठे कार्य पेशवे यांनी केले आहे. मातृभूमी, धर्मभूमी आणि स्वराज्यासाठी सातत्याने युद्ध करणारे ते एकमेव अजेय आणि पराक्रमी योद्धा आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे साडेतेरा फुट उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण आज (दि. 4 जुलै) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंह, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंचावर होते.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास मोलाचे सहकार्य करणारे सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, शिल्पकार विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोईर यांचा या वेळी अमित शहा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करून लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांच्या क्रांतिकारी विचारांना उजाळ देऊन अमित शहा पुढे म्हणाले, युद्ध नियम कालबाह्य नसतात. व्यूहरचना, त्वरा, समर्पणभाव, देशभक्ती, बलिदानाची वृत्ती योद्ध्याला नेहमीच प्रेरित करते आणि यश देते. या सर्वांचा संगम असलेले श्रीमंत बाजीराव पेशवे हे एकमेव लढवय्ये होत. त्यामुळे अवघ्या 19व्या वर्षी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पुढील 20 वर्षात 41 लढाया लढूनही पेशवे एकही लढाई हरले नाहीत. ते पुढे म्हणाले, संरक्षण दलांमधील तीनही विभागांचे प्रशिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दिले जाते. या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा कायम प्रेरणा देईल. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीच्या कौशल्यातून देशाच्या सीमा भविष्याही सुरक्षित राहतील. छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शौर्य वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. मला निराशा आली तर बाल शिवाजी, श्रीमंत बाजीराव पेशवे या वीर योद्ध्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आठवतो आणि माझी निराशा नाहीशी होते.
देशासाठी समर्पण, बलिदान देणाऱ्या अनेक योद्ध्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडला गेला तसेच पुसलाही गेला. विकास आणि विरासत या पंतप्रधान मोदी यांच्या सूत्रातून प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा, वीर योद्ध्यांचा खरा इतिहास जगासमोर यावा यासाठी हा इतिहास भावानुवादीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही अमित शहा यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील नामांकित प्रबोधिनीत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजीगिषु वृत्तीने स्वराज्याची ज्योत सामान्य मराठी माणसाच्या रक्तात फुलविली ती अखंडित ठेवत तिचा विस्तार करण्याचे महान कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. सर्व दिशांना हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना त्यांनी वेगाची रणनिती अवलंबिली. आज अनेक महानायकांचा इतिहास पुसला गेला आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळा उभारणीतून मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल.
विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित उभारलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याने पराक्रमाची पूजा बांधण्याचा अनुषेश भरून निघाला आहे. हा केवळ पुतळा नसून हे पराक्रमाचे स्मारक आहे. वीर सेनानींच्या पराक्रमाच्या गाथांचे विविध भाषांत अनुवाद व्हावेत ज्यायोगे विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला उजाळा मिळेल.
प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण गोखले म्हणाले, वीर योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असून देशासाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना वाढीस लागणार आहे. सेवा परमो धर्म या भावनेतून कार्य करणाऱ्या देशाच्या सेनेला पेशवे यांच्या युद्धनितीची शिकवण मिळणार आहे.
मान्यवरांचे स्वागत भूषण गोखले, कुंदनकुमार साठे, चिंतामणी क्षीरसागर, पुष्करसिंह पेशवा, श्रीपाद करमरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी तर आभार कुंदनकुमार साठे यांनी मानले.
मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा:व्यावसायिक सुशील केडियांचे ठाकरे यांना थेट आव्हान
सुशील केडिया हे एक प्रसिद्ध व्यावसायिक व केडियानोमिक्सचे संस्थापक आहेत. ते शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. त्यांची गुंतवणूक सल्लागार म्हणूनही ओळख आहे. त्यांची कंपनी गुंतवणूक व बाजारपेठेतील विश्लेषणाचे काम करते.
Shri @RajThackeray threatening me by 100s of your workers is not going to make me a fluent Marathi speaker.
— Sushil Kedia (@sushilkedia) July 4, 2025
If I am not confident of the quality of Marathi I can speak, with so much threatening around even more fear happens that if I miss speaking any word(s) improperly more…
मुंबई- काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंसारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.
महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. पण या प्रकरणी वाद झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. पण आता या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला केलेली मारहाण व त्यानंतर व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे स्थिती अधिकच चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर केडियोनोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना उपरोक्त आव्हान दिले आहे.
काय म्हणाले सुशील केडिया?
मागील 30 वर्षे मी मुंबईत राहिलो. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करावे लागेल बोल? असे सुशील केडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केडिया यांनी आपले हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
ही तर शहा सेना!: ‘महाराष्ट्राचं खायचं. महाराष्ट्रात राहायचं अन जय गुजरात म्हणायचं, चालणार नाही -संजय राऊत कडाडले
मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ असे म्हटले. त्यावरून आता विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘शहा सेना’ असे म्हणत शिंदेंवर निशाणा साधला आहे.डुप्लीकेट शिवसेनेचे खरे रूप आले समोर, ‘महाराष्ट्राचं खायचं, महाराष्ट्रात राहायचं अन जय गुजरात म्हणायचं, चालणार नाही असेही ते म्हणाले आहेत
खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले, अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर ‘जय गुजरात’ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी देखील सहभाग घेतला. या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या जय गुजरातच्या घोषणेमुळे आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेची सारवासारव केली जात असल्याचे दिसत आहे.
पुण्यात शिकणाऱ्या गरजू-गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणार विनायकी – विनायक निम्हण शिष्यवृत्ती
विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्ताने सोमेश्वर फाउंडेशनतर्फे उपक्रमाचे आयोजन
पुणे – कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक (आबा) निम्हण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ’विनायकी – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपाचा हा समारोह दि. ५ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन नाव नोंदणी करावी, अशी माहिती सनी विनायक निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेला सनी विनायक निम्हण यांच्यासह उमेश वाघ, बिपीन मोदी,येवल्याचे निलेश पटेल,वेदांत बांदल हे उपस्थित होते.
सनी निम्हण पुढे म्हणाले की, जगात कोणीही शिक्षण आणि आरोग्यापासून वंचित राहू नये असे नेहमीच कार्यसम्राट मा. आ. विनायक (आबा) निम्हण म्हणायचे. तसेच ते त्यादृष्टीने सातत्याने कार्य देखील करायचे. त्यांच्या कार्याचा वसा पुढे घेऊन जात सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिर तसेच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून विनायकी शिष्यवृत्ती उपक्रम राबवत आहोत. शिष्यवृत्तीचे हे तिसरे वर्ष असून, प्रथम वर्षी ३९६ विद्यार्थ्यांना व दुसऱ्या वर्षी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाचवी आणि आठवीच्या ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थोड्या मार्कांनी हुकलेली आहे त्यांनादेखील प्रोत्साहनपर या उपक्रमात शिष्यवृत्ती दिली जाईल.
गरीब घरातील अनेक होतकरू मुला-मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा असते. परंतु परिस्थितीमुळे त्यांना बऱ्याचदा ते शक्य होत नाही. अशा वेळेस त्यांची फार कोंडी होते. त्यामुळे पुणे शहरातील अशा गरीब व होतकरू मुला-मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे
ते पुढे म्हणाले की, ’विनायकी – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ घेण्यासाठी पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दि. ७ जुलै ते २० जुलै दरम्यान ऑनलाईन नोंदणी करावी. अर्जांमधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची २६ व २७ जुलै रोजी सोमेश्वर फाउंडेशनचे कार्यालय, शैलजा हॉटेल लेन, जंगली महाराज रोड, पुणे येथे प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना दि. ५ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल.
अधिक माहितीसाठी 8308123555 या क्रमांकावर किंवा www.sunnynimhan.com या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी सनी विनायक निम्हण यांनी केले.
एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले CM:शरद पवारांच्या ‘जय कर्नाटक’ घोषणेची दिली आठवण
पुणे-येथील एका कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवर राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली.इतकेच नाही तर शरद पवार यांनी कर्नाटक मध्ये ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली होती. याची आठवण देखील मुख्यमंत्र्यांनी करून दिली. मराठी भाषेचा आग्रह योग्यच आहे, मात्र दुराग्रह नको, असा सल्ला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार देखील कर्नाटक मधील एका कार्यक्रमात जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते. याचा अर्थ त्यांचे कर्नाटक वर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही, असे म्हणायचे का? आपण ज्या समाजाच्या कार्यक्रमात जातो त्यावेळी तसे आपण म्हणत असतो. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हटले म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रावरचे प्रेम कमी झाले, असं होत नाही.
इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणसे ही वैश्विक आहेत. मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला आहे. संपूर्ण भारताला देखील मराठी माणसाने स्वतंत्र केले आहे. मराठीचा भगवा झेंडा दिल्लीत लावण्याचे काम देखील महाराष्ट्रातील मराठी माणसाने केले आहे. त्यामुळे इतका संकुचित विचार जर कोणी करत असेल, तर ते चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही. लोकांच्या मनात काय? हे देखील त्यांना माहित नाही. त्यामुळे जे मुद्दे ते मांडत आहेत, त्याचा लोकांवर परिणाम होणार नाही. असेच मुद्दे ते उचलत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आपण आग्रह करू शकतो. मात्र दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तामिळनाडूमध्ये गेलो तर मला कोणी तामिळनाडूची भाषा शिकवण्याचा दुराग्रह करू शकत नाही. मी जर वाटले की मी मराठीत बोलायचे तर मराठी बोलेल. मात्र कोणी दुराग्रह करेल ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो. बाजूचे राज्य काही पाकिस्तान नाही. एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवूच शकत नाही, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.
मराठी मुलांच्या हिताचा जो निर्णय असेल, तोच निर्णय राज्य सरकार घेणार आहे. आम्ही स्थापन केलेली समिती योग्य अहवाल देईल. मराठी मुलांच्या हिताचा जो निर्णय असेल तोच समितीच्या अहवालातून समोर येईल आणि तोच निर्णय आम्ही घेऊ. कोणाच्याही दबावाला सरकार बळी पडणार नाही, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाषेवरून मारहाण करणे हे अतिशय चुकीचे आहे. आम्ही मराठी आहोत, मराठीचा अभिमान आम्हाला देखील आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली गेली पाहिजे. मात्र एखाद्या व्यावसायिकाला मराठी भाषा आलीच पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. महाराष्ट्रातील देखील अनेक मराठी लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्यवसाय करतात. त्यांना देखील तिथली भाषा येत नसेल. त्यांच्यासोबत देखील अशीच वागणूक मिळेल का? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गुंडशाही योग्य नाही. अशी गुंडशाही करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
