Home Blog Page 473

यांना अध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का? -कॉंग्रेस

अध्यक्षांच्या स्थानावर बसल्यावर सभागृहाची प्रथा परंपरा संकेत पाळले पाहिजेत –
मुंबई – शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधकांनी नाव दिले होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. यावर विरोधकांनी विधानसभेत आक्षेप घेतला.

या प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तरी कामकाज सुरू ठेवले होते. पण काही सदस्य उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या स्थानावर बसून सरकारची भूमिका मांडली, असा त्यांना अधिकार आहे का? अध्यक्ष पदाची एक गरिमा आहे अस असताना तिथून राजकीय भाषण होणे योग्य नाही, तीस वर्ष या सभागृहात काम करताना असा प्रकार घडलेला नाही, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

तालिका सभाध्यक्ष बसले असले तरी त्यांना अध्यक्ष म्हणून मानून मान दिला जातो पण विरोधी पक्षातील काही सदस्य उपस्थित नाही म्हणून राजकीय टिपण्णी केली जाते. जेव्हा की सभागृहाचे कामकाज नीट व्हावे ही जबाबदारी सरकारची असते, ज्या विभागाचा प्रस्ताव असतो त्या विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित आहेत की नाही हे पाहणे संसदीय कामकाज मंत्र्यांचे असते. अश्यावेळी सभागृहात सर्वोच्च स्थानावरून सभागृहाची प्रथा परंपरा किंवा संकेत पाळले पाहिजे. राजकीय भाष्य करणाऱ्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली. संविधानाने दिलेल्या आदेशाने जे नियम आहेत त्या चौकटीत राहून पीठासीन अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. सभागृहात अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी यावेळी दिले.

विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीतून तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांच्याकडून झाल्या चुका ; वाचा कोण-कोणती विधाने चुकीची ?

विधानसभेचे अध्यक्षपद हे सभागृहाच्या निष्पक्ष आणि तटस्थ कारभाराचे प्रतीक आहे. त्याच्याकडून पक्षपातरहित आणि संयमित वर्तन अपेक्षित आहे. पण पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीतून राजकीय विधाने करून या परंपरेचा भंग केल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांमुळे सभागृह अध्यक्षांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

खाली वाचा तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी केलेली काही राजकीय विधाने…

चेतन तुपे म्हणाले, या विषयावरील चर्चा दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी सुरु झाली. विरोधी पक्षाने शेतकऱ्यांसंबंधी हा नियम २९३ चा प्रस्ताव आणला होता. आता जवळपास रात्रीचे ९ वाजून ५० मिनिटे झाली आहेत. म्हणजे बरोबर पावणे सहा तास ही चर्चा या सभागृहात सुरु होती. २३ सन्माननीय सदस्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि अनेक चांगल्या सूचना केल्या. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूकडून मांडण्यात आले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यात राजकारण येता कामा नये. परंतु काही सन्माननीय सदस्यांनी त्यावर खोचक अशा प्रतिक्रियाही नोंदविल्या.

विरोधकांनी ३ दिवस गोंधळ घातला आणि हा प्रस्ताव आणला आणि आजही लक्षवेधी सूचना न होऊ देता हा प्रस्ताव चर्चेला घ्या, असा आग्रह धरला. शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसतो आणि त्याच्या ताटात वाढले गेले पाहिजे, अशी भूमिका सरकारने घ्यावी. सरकार पक्षाचे मंत्री आणि सर्वजण या चर्चेसाठी उपस्थित आहेत. पण स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायला मात्र विरोधक तयार नव्हते. भूक लागल्यावर जो तो निघून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणे आणि किती आवश्यक आणि किती राजकारणी व नाटकी आहे, हे या सर्व प्रकरणातून दिसते, असाही खोचक टोला काही सन्माननीय सदस्यांनी लगावला आहे. त्यामुळे हे सभागृह चर्चेचे आहे, कायदेमंडळ आहे, येथे चर्चा होते. सरकार चर्चेसाठी तयार आहे.

आजही सर्वजण बसून आहेत. मंत्री महोदय बसून आहेत, मध्यरात्रीपर्यंत चर्चा करण्याची तयारी आहे. पण दुर्दैवाने माझ्यासमोर अनेक नावे आहेत, ती मी वाचतो. पण ते आज येथे उपस्थित नाहीत. त्यामध्ये सन्माननीय सदस्य सर्वश्री, बापूसाहेब पठारे, बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटील हे तिघेही उपस्थित नाहीत. सन्माननीय सदस्य सर्वश्री, अबु आझमी, रईस शेख हेही उपस्थित नाहीत. त्याचप्रमाणे सन्माननीय सदस्य सर्वश्री, मनोज जामसुतकर, महेश सावंत, अनंत नर हेही या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्यामुळे नक्की काय समजायचे ?

आज सकाळी सभागृहाची विशेष बैठक होती. अध्यक्ष म्हणून मी सकाळपासून या सभागृहात ९ वाजल्यापासून उपस्थित आहे. आता १३ तास झाले. मी या सभागृहाच्या लॉबीच्या बाहेर गेलो नाही. मी जर बसू शकतो तर ज्यांनी प्रस्ताव आणला ते का बसू शकत नाहीत ? शेतकऱ्यांसारख्या विषयावर चांगल्या सूचना कोणत्या येत आहेत आणि शेतकरी हिताचे उद्या आपल्याला काय बोलायचे आहे, हे का ऐकू शकत नाहीत, हा प्रश्न अध्यक्ष म्हणून मलाही पडलेला आहे. त्यामुळे असो… हे मगरीचे नकाराश्रु सुरु आहेत की काय, की केवळ राजकारण करायचे आहे की काय, असे हे सर्व बघून एकंदर वाटू लागले आहे. ठीक आहे. ज्याचे त्याच्या पाशी. शेवटी शेतकरीच त्याचा निर्णय करतील, असे चेतन तुपे म्हणाले.

विधानसभेत पुणेरी रिंगण …: वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवा-आमदारांची मागणी

पुण्याचे प्रश्न,पुण्याचे आमदार,सभापती पुण्याचे आणि मंत्री पुण्याचे….विधानसभेत पहा कसा जुळून आला की आणला योग..

पुण्याच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना तालिका अध्यक्ष म्हणून चेतन तुपे उपस्थित होते. उत्तर देण्यासाठी माधुरी मिसाळ होत्या, तर प्रश्न विचारणारे पुण्यातील सर्व आमदार होते. त्यामुळे या प्रश्नावर दुपारी २.४५ ते ३.३९ या दरम्यान ५४ मिनिटे सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच सीएमपी, रिंगरोड, प्रस्तावित मेट्रो, उड्डाण पूल हे प्रकल्प लवकर मार्गी लागावेत, अशी मागणी करण्यात आली.शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात चर्चेसाठी विरोधक प्रतीक्षेत असताना हे पुणेरी रिंगण त्यासाठी आडवे आणल्याचा आरोप या प्रकरणी होत होता .

पुणे शहरातील वाहतूक धोरणाचा कोंडीचा प्रश्न गंभीर झालेला असताना अतिक्रमणे, रस्त्यावरील अनधिकृत होर्डिंग यांसह अन्य कारणांनी त्यात आणखी भर पडत आहे. याविरोधात आज पुण्यातील आमदारांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवला. शहरातील विदारक स्थिती सभागृहात मांडून २०४७ पर्यंतचे नियोजन सोडा, आत्ता पुण्यातील कोंडी सोडविण्यासाठी काय करणार? ते सांगा, नागरिकांना दिलासा द्या, अशी आर्त हाक आमदारांनी दिली आहे. सुमारे तासभर केवळ पुण्यातील कोंडी, प्रस्तावित प्रकल्प, सुरू असलेल्या कामाची गती वाढविणे असे मुद्दे आमदारांनी मांडले. यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेणार असल्याचे तालिकाध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले,पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधी मांडली. त्यावरभीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, बापू पठारे, शंकर जगताप, राहुल कुल, विजय शिवतारे, प्रशांत बंब, योगेश सागर आदी आमदारांनी चर्चेत सहभाग घेतला.

शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागरिकांना होणारा मनस्ताप, वाहनांची वाढलेली भरमसाट संख्या यावर उपाययोजना केल्या जात नाहीत, पोलिस, महापालिका आणि ‘आरटीओ’कडून दुर्लक्ष होत आहे. महापालिका रस्त्यांचे रुंदीकरण करत असली तरी त्यावर वारंवार अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे, अनधिकृत होर्डिंगमुळे वाहतूक कोंडी आहे. अपघातांच्याभीतीने घराबाहेर पडलेली व्यक्ती परत येईल का नाही, असा विचार पुणेकरांच्या मनात येतो. याबाबत शासन काय करणार, असा प्रश्न सुनील कांबळे यांनी उपस्थित केला.”दाट लोकवस्तीमध्ये अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करणार ही मागणी पूर्ण होत नाही. पथारीधोरणाची अंमलबजावणी होत नाही. नो एंट्रीमध्ये वाहने घुसत आहेत, त्यावर काय कारवाई करणार? यावर शासन करणार आहे. शहरात रस्त्यात लाकडी पहाड उभारून फ्लेक्स लावले जात आहेत. वारंवार सांगूनही महापालिकेचे अधिकारी कारवाई करत नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न हेमंत रासने यांनी विचारला.

आमदारांनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर प्रश्न उपस्थित केले. त्यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले. “शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेकडून रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र या नव्या रस्त्यांवर अनधिकृत फलक, व्यावसायिक अतिक्रमण आणि पार्किंगमुळे वाहतूक कोंडी पुन्हा गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने अतिक्रमणे हटविली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा मिसाळ यांनी विधानसभेत दिला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी म्हणाल्या ,’ पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांचीही संख्या वाढत असून, प्रादेशिक परिवहन यांच्या अहवालानुसार पुण्यामध्ये एकूण ४० लाख ४२ हजार ६५९ इतकी वाहने रस्त्यावर धावत असतात. कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यावरील वाहतुक सुरळीत होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग, नो होल्टिंग झोन करणे, सिग्नल व्यवस्था अद्ययावत करण्यात येत असून स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत स्मार्ट सिग्नल, सीसीटिव्ही यंत्रणा अधिक अद्ययावत करण्यात येत आहे. पुणे शहराची सन २०५४ पर्यंत होणारी वाढ लक्षात घेऊन वाहतुक सुरळीत व सक्षम करण्यासाठी रिंगरोड, बायपास रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो अशा पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा समावेश आहे. मुख्य कार्यालय व क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर वाहतूक पोलिस विभाग व पुणे महानगरपालिकेचे संबंधित विभाग यांच्या नियमितपणे वाहतूक सुधारणा विषयक बैठका घेऊन वाहतूक दिव्यांची व्यवस्था, चौक सुधारणा. वाहतूक बेटांची निर्मीती, पथ दुभाजक उभारणी, वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती, दिशादर्शक फलक बसविणे, लेन माकिंग, झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगवणे, वाहतुकीस अडथळा होणाऱ्या बसथांब्यांचे स्थलांतर अशा आवश्यक कामांची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील इतर घटकांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी वाहतूक आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये सूचना हरकती मागविल्या जाणार आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीं सोबत बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू

  • उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी सरकारने तीन टप्प्यांत प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे आणि परिसरातील पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे संपूर्णपणे शुद्धीकरण करण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांचे पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनीही उपप्रश्न विचारला.

याबाबत अधिक माहिती देताना उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, इंद्रायणी आणि पवना नदी प्रकल्पाचा (PMRDA मार्फत) एकूण खर्च: ₹671 कोटी असून यास 60 टक्के केंद्र शासन, 40 टक्के पीएमआरडीए निधी वाटप करण्यात येणार आहे. पवना नदी प्रकल्पाचा (PMRDA मार्फत) खर्च: ₹218 कोटी असून याबाबतचा निधी 60 टक्के केंद्र, 40 टक्के स्थानिक तर सीईटीपी प्रकल्पाचा खर्च (MIDC मार्फत) ₹1200 ते ₹1500 कोटी असून एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक सांडपाण्याची शुद्धता तपासणे हा याचा उद्देश आहे.

या संपूर्ण प्रकल्पासाठी ‘जायका’ कडून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू असून प्रस्ताव दाखल केला गेला आहे. यावर “इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमपासून संगमापर्यंत संपूर्ण शुद्धीकरण करण्यात येणार आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले असल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या तीनही विभागांची बैठक होईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ताखुला करण्यास पीएमआरडीएकडून प्रारंभ

पिंपरी : हिंजवडी, मान, मारुंजी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलली असून अतिक्रमित रस्ते खुले करण्यास सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने अतिक्रमित असलेला हिंजवडी फेज २ – विप्रो सर्कल ते मारुंजी लक्ष्मी चौक दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता गुरुवारी (दि.३) वाहतुकीसाठी खुला करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला.

हिंजवडी तसेच मेट्रो मार्गासह परिसरातील अतिक्रमणासह इतर काही ठिकाणी ओढे – नाल्यांतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह परस्पर बदल / अडवल्याने संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने वाहतूक कोंडी तसेच नागरी समस्या सोडवण्यासाठी गुरुवारपासून पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला सुरुवात करण्यात आली. यात काही वर्षांपासून अतिक्रमित बंद असलेला हिंजवडी फेज २ – विप्रो सर्कल ते मारुंजी लक्ष्मी चौकदरम्यानचा रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठी पीएमआरडीएसह विविध विभागांच्या समन्वयातून संयुक्त कारवाई सुरुवात करण्यात आली.

या रस्त्यादरम्यान अतिक्रमण केलेल्या काही व्यवसायिकांनी स्वतः आपले अतिक्रमण काढून घेत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिल्याचे कारवाईदरम्यान पुढे आले. अतिक्रमणामुळे रखडलेल्या या रस्त्याचे काम पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आल्याचे वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटाव्यात यासाठी आमदार बापूसाहेब पठारे आग्रही

मुख्यमंत्री, पालकमंत्री, महानगरपालिका व आमदारांची संयुक्त बैठक बोलवून निर्णय घ्या; पठारे यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (ता. ०३) पुणे शहरासह वडगावशेरी मतदारसंघातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी, अंमलात न आणलेले उपाय व नागरिकांना होणारा त्रास अधोरेखित करत कार्यवाहीची मागणी केली.

पठारे यांनी येरवड्यातील स्व. बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे चौक येथे उड्डाणपूल उभारण्याची गरज स्पष्ट केली. “वडगावशेरी मतदारसंघात आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सतत व्हीव्हीआयपींची ये-जा होते. परिणामी वाहतूक थांबवली जाते, सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतो,” असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे नमूद केले. गुंजन चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ग्रेड सेपरेटर व पादचाऱ्यांचा विचार करून विमानतळाहून पुण्याला जाताना वाहनांकरिता अंडरपास करत सिग्नल फ्री वाहतूक करता येईल, असेही ते म्हणाले.

पदपथांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. “संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे का? किंवा ती होणार आहे का?” असा थेट प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. कळस ते दिघी दरम्यानचा रस्ता अरुंद असून गेल्या १०-१२ वर्षांपासून रुंदीकरणाची वाट पाहत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पीएमआरडीकडून होत असलेल्या रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेबाबतही त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. “महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडला मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा पीएमआरडीएकडून मिळणारा मोबदला खूपच कमी आहे. डीपी आराखडा मंजूर न झाल्यामुळे हा अन्याय शेतकऱ्यांवर होतोय,” असेही त्यांनी नमूद केले.

पुणे-नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग ज्या पद्धतीने काढला, त्याच धर्तीवर आळंदी रोडवरील ३ किमी लांबीचा बीआरटी मार्ग काढण्याचीही मागणी त्यांनी व्यक्त केली.

एकूणच वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, महानगरपालिका व आमदार तसेच संबंधित विभागांची एकत्र बैठक घेणे गरजेचे असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी ठामपणे अधिवेशनात सांगितले.

हिंजवडी आयटी पार्क व चिंचवड मतदारसंघातील वाहतूक कोंडीवर तातडीच्या उपाययोजना व्हाव्यात-आमदार शंकर जगताप

मुंबई-

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हिंजवडी आयटी पार्क व परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या रस्त्यांची स्थिती व प्रशासनातील समन्वयाचा अभाव या गंभीर समस्यांकडे राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांनी लक्ष वेधले . या विषयावर लक्षवेधी सूचना सादर करत वाहनचालक व आयटीयन्सच्या दैनंदिन त्रासाबद्दल आवाज उठवला.

यावेळी आमदार जगताप यांनी मांडलेले मुद्दे

  • हिंजवडी फेज १, २ व ३ कडे येणाऱ्या नागरिकांना व आयटीयन्सना भूमकर चौक, डांगे चौक, लक्ष्मी चौक, ताथवडे, वाकड, पुनावळे, ॲम्स्टरडॅम कंपनीमार्गे जाणे भाग पडते. परिणामी, या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. या भागात ३० मीटरचा रिंग रोड, वाकड ते फेज थ्री मुळा नदीच्या पात्रातून रस्ता विकसित करणे शक्य आहे का, असा सवाल सभागृहात उपस्थित केला.
  • त्याचबरोबर, हिंजवडी आयटी पार्कमधील नागरिकांनी वाहतूक समस्येमुळे थेट न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली असून, त्यामुळे पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडीए आणि अन्य यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी एकच वाहतूक नियोजक (Traffic Planner) नेमण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
  • सार्वजनिक वाहतुकीसाठी निधी, स्मार्ट सिग्नलिंग प्रणालीची मागणी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने निधी मंजूर करून इंटेलिजंट स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम लागू करण्याची गरजही व्यक्त केली. ‘Urban Plan Development’ अंतर्गत फूटपाथची रुंदी कमी करून वाहनांसाठीचा मार्ग (Carriage Way) वाढविण्याचा विचार शासन करेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी, चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या गंभीर आहे. लवकरच या संदर्भात सर्व संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन संयुक्त बैठक घेण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले. तसेच, पुण्यात फर्ग्युसन रोडवर वाहतूक व्यवस्थापनासाठी राबवण्यात येत असलेल्या AI पायलट प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातही लागू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरांमध्ये ‘डक्ट पॉलिसी’शासनाने सक्तीची करावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई : उत्तम दर्जाची आणि सुरक्षित इंटरनेट सेवा द्यायची असेल, तर शासनाने ‘डक्ट पॉलिसी ‘ सक्तीची केली पाहिजे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडली.

याविषयी बोलताना आमदार शिरोळे यांनी सांगितले पुणे शहरात नांदेड सिटी कडून येताना अचानक तुटलेली केबल दुचाकीस्वाराच्या मानेला घासून अपघात झाला. शहरातील बहुतांश रस्त्यांवर अनधिकृतपणे इंटरनेट आणि केबल टीव्हीसाठी च्या केबल टाकण्यात आल्या आहेत, या केबल कशाही पसरल्या असल्याने शहराचा चेहराही विद्रुप झालेला आहे. तसेच वारा आणि पाऊस झाला तर या केबल तुटण्याची शक्यता असते जेणेकरून नागरिकांना एक मोठा धोका निर्माण झाला आहे.

महापालिका प्रशासनाने २०१८ मध्ये डक्ट पॉलिसीला मंजुरी दिली होती पण अमलात आणली नाही. महापालिकेकडून भूमिगत केबल टाकण्याकरिता खासगी इंटरनेट कंपन्यांकडून १२०००/-₹ प्रति रनिंग मीटर असे शुल्क घेतले जाते. हे शुल्क टाळण्याकरिता खासगी कंपन्या ओव्हरहेड केबल्स टाकून सुविधा पुरवितात. हे शुल्क जास्त असून त्या बद्दल फेरविचार होणे आवश्यक आहे, असे आमदार शिरोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

शहरात डक्टिंग झाल्यास इलेक्ट्रिक केबल्स, सीसीटीव्ही वगैरे यंत्रणेच्या केबल्स त्यातून टाकता येतील. त्यामुळे शहरांचे विद्रुपीकरण थांबेल आणि अपघाताचा धोका टळेल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले आणि पुणे शहरासाठी ‘डक्ट पॉलिसी’ अमलात आणावी, अशी सूचनाही शासनाला केली.

‘रामायण’ — जगातील सर्वात भव्य महाकाव्याचा आरंभ

पुणे : सुमारे २.५ अब्ज लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली, ५,००० वर्षांपूर्वीची कथा आता नव्या रूपात साकारली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या सिने-प्रकल्पांपैकी एक ठरणाऱ्या नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ या दोन भागांच्या थरारक live-action सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रास्ताविक भाग ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ आज जागतिक स्तरावर सादर करण्यात आला.

जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटात्मक उपक्रमाच्या निर्मात्यांनी ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ या जागतिक लॉन्चसह रामायणाच्या भव्य विश्वाचा अनावरण केला — ज्यामध्ये पौराणिक काळातील दोन सर्वात प्रतिष्ठित शक्तींमधील शाश्वत युद्धाचा मंच तयार करण्यात आला आहे: राम वि. रावण.
या लॉन्चचा प्रसार संपूर्ण जगभर झाला — भारतातील नऊ शहरांमध्ये चाहत्यांसाठी खास स्क्रीनिंग्स आणि न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये नेत्रदीपक बिलबोर्ड ताबा घेण्यात आला.

दृष्टीकोन असलेले चित्रपट निर्माते आणि निर्माता नमित मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहनिर्माते म्हणून यश यांच्या सहभागाने, ‘रामायण’ या चित्रपटात ऑस्कर-विजेते तंत्रज्ञ, हॉलीवूडमधील आघाडीचे निर्माते आणि भारतातील मोठमोठ्या कलाकारांचा समावेश आहे — हे सर्व मिळून भारतीय संस्कृतीत रुजलेली ही महान गाथा एका आधुनिक सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या स्वरूपात जगासाठी पुन्हा साकारत आहेत.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या कल्पक दिग्दर्शनाखाली, नमित मल्होत्रा यांच्या प्राईम फोकस स्टुडिओज व आठ वेळा ऑस्कर विजेते DNEG VFX स्टुडिओ, तसेच यश यांच्या Monster Mind Creations यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या या भव्य चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दसरा भाग दिवाळी २०२७मध्ये IMAX वर प्रदर्शित होणार आहे.
या भव्य प्रकल्पाच्या घोषणेनंतर भारतातील ९ प्रमुख शहरांमध्ये चाहत्यांसाठी खास स्क्रीनिंग्सचे आयोजन करण्यात आले, तर न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर भव्य बिलबोर्ड्सद्वारे जागतिक स्तरावर या प्रकल्पाची झलक सादर करण्यात आली.

कथा — राम वि. रावण: एक शाश्वत संग्राम
या विश्वाची समतोलता ब्रह्मा (सृष्टीकर्ता), विष्णू (पालक) आणि शंकर (संहारक) यांच्या त्र्यीमध्ये टिकून असते. मात्र या संतुलनातूनच उगम होतो एक अनोख्या राक्षस बालकाचा — जो पुढे रावण बनतो. एक अमर, अजेय आणि विध्वंसक शक्ती. त्याचे उद्दिष्ट एकच विष्णूचा नाश करणे.
याला थोपवण्यासाठी विष्णू स्वतः मानवाचा — राम या क्षीण रूपात — पृथ्वीवर अवतार घेतो. इथूनच सुरू होते एक अखंड लढाई —
राम वि. रावण
माणूस वि. अमरता
प्रकाश वि. अंध:कार
हीच आहे रामायण — एका विश्वयुद्धाची, नशिबाच्या वळणांची आणि सत्त्वाच्या विजयाची अमर कथा — जी आजही अब्जोंच्या श्रद्धा व मूल्यांना आकार देते.

तगडी कलाकार मंडळी व जागतिक दर्जाचा तांत्रिक बाजू

कलाकार:
रणबीर कपूर— राम यांच्या भूमिकेत
यश — रावण या सशक्त भूमिकेत (सह-निर्मातेही)
साई पल्लवी— सीता
सनी देओल— हनुमान
रवी दुबे — लक्ष्मण या वेगळ्या अविष्कारी भूमिकेत

तांत्रिक टीम

हँस झिमर व ए. आर. रहमान — प्रथमच एकत्र संगीत दिग्दर्शन
टेरी नोटरी (Avengers, Planet of the Apes)
गाय नॉरिस (Mad Max: Fury Road) — अ‍ॅक्शन कोरिओग्राफी
रवि बन्सल (Dune 2, Aladdin)
रॅम्सी एव्हरी (Captain America) — प्रॉडक्शन डिझाईन

भारताकडून जगाला एक सांस्कृतिक देणगी
नमित मल्होत्रा निर्माते आणि DNEG चे सीईओ, सांगतात, “रामायण हा केवळ एक चित्रपट नाही, तर हे एक सांस्कृतिक चळवळ आहे. आपण आपली परंपरा जागतिक पातळीवर नव्या सादरीकरणात आणतो आहोत. आतापर्यंत रामायण विविध प्रकारे पाहिलं गेलं आहे, पण आता आपण त्याला एका अशा भव्य आणि प्रगत रूपात आणतोय, जे जागतिक चित्रपटमंचावर भारताची ओळख ठरू शकेल.”

नितेश तिवारी , दिग्दर्शक, म्हणतात, “ ही कथा आपल्यात खोल रुजलेली आहे. ती केवळ पौराणिक नसून एक शाश्वत सत्य आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हा आत्मा सांभाळून, जागतिक स्तरावर तिचं नव्या भव्यतेत सादरीकरण करणं हे माझं कर्तव्य आणि सन्मान आहे.”

प्रस्ताविक संस्था परिचय
Prime Focus Studios— नमित मल्होत्रा यांनी स्थापन केलेले हे स्टुडिओ जागतिक स्तरावर सिनेमा, टीव्ही, गेमिंगसाठी नावीन्यपूर्ण व दर्जेदार कंटेंट निर्मिती करतात. DNEG च्या आंतरराष्ट्रीय यशाची आणि तांत्रिक कौशल्याची ताकद या स्टुडिओला लाभली आहे.

Monster Mind Creations— प्रसिद्ध अभिनेता यश यांची निर्मिती संस्था, जी सर्जनशील प्रतिभेला चालना देणाऱ्या आणि नव्या दृष्टिकोनातून कथा सादर करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करत आहे. “Toxic” आणि “Ramayana” हे त्यांचे दोन प्रमुख प्रकल्प आहेत.

वडगावशेरी मतदारसंघातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना राबवा; आमदार बापूसाहेब पठारे यांची अधिवेशनात मागणी

मुंबई: वडगावशेरी मतदारसंघातील बहुतांशी भाग दरवर्षी पावसाळ्यात गंभीर पूरस्थितीला सामोरा जात असतो. येरवडा, शांतीनगर, विश्रांतवाडी, कळस अशा भागांमध्ये मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीचे पाणी घरांमध्ये शिरते. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याच पार्श्वभूमीवर आज पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडत राज्य सरकारचे लक्ष वेधले.

ते म्हणाले, मागील वर्षी शांतीनगर परिसरात अतिवृष्टीमुळे मुळा नदीला पूर आला होता. या पुरामुळे शांतीनगरसह एकतानगर, आदर्शनगर, निंबोजीनगर या दाट लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरले. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती, की सुमारे ६५० घरांना अग्निशमन दल व प्रशासनाच्या मदतीने तत्काळ स्थलांतरित करावे लागले. पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे घरातील वस्तूंचे, कागदपत्रांचे व जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. एकूणच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते.

वडगावशेरी मतदारसंघातील नदी काठच्या भागांमध्ये पुन्हा ही परिस्थिती उद्भवू नये व पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी काही मागण्या सभागृहात स्पष्टपणे मांडल्या. ज्यात, नदीकाठच्या भागात तातडीने पूर प्रतिबंधक भिंती उभाराव्यात, जलनिकासी यंत्रणा सक्षम करून पाणी साचू नये यासाठी पायाभूत सुधारणा कराव्यात, पूरस्थितीच्या संभाव्य घटनांपूर्वी नागरिकांना वेळेत इशारा मिळावा यासाठी यंत्रणा स्थापित करावी, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील गाळ नियोजनबद्ध पद्धतीने काढावा या मागण्या प्रामुख्याने समाविष्ट होत्या. सर्व उपाययोजना तात्पुरत्या नाही, तर कायमस्वरूपी स्वरूपात राबवाव्यात अशी त्यांनी मागणी केली.

या मागण्यांच्या संदर्भाने पठारे म्हणाले, की “वडगावशेरी मतदारसंघातील पूर प्रश्न दरवर्षीचा न राहता कायमस्वरूपी सुटला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. सरकारनेदेखील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन याबाबत कार्यवाही सुरू करावी.”

राज्य सरकार पठारे यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा आहे.

कोंढव्यातील अत्याचाराच्या घटनेची उपसभापती नीलम गोऱ्हेंनी घेतली गंभीर दखल, पोलिसांना तात्काळ करावाईचे दिले निर्देश

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याची अपेक्षा- उपसभापती डॉ. नीलम गो-हे

पुणे, दि. ३ जुलै:
कोंढवा येथील उच्चभ्रू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गेटेड सोसायटीत एका २५ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे तत्काळ आणि प्रभावी कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, दि. २ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका गेटेड सोसायटीमध्ये एका व्यक्तीने स्वतःला कुरिअर बॉय म्हणून दर्शवत प्रवेश मिळवला आणि पीडितेच्या घरी जाऊन तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर धमकीवजा मेसेज ठेवून निर्ढावलेपणा दाखवला.

डॉ. गोऱ्हे यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची तत्काळ स्थापना करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत करून घटनेचा सखोल तपास केला जावा, असे त्यांनी सुचवले आहे.

तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेतील इतर तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अनुभवी विधी अधिकाऱ्यांच्या मदतीने लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी, अशी त्यांनी सूचना केली आहे.

या घटनेनंतर सोसायटीमधील सुरक्षाव्यवस्थेची त्रुटी स्पष्टपणे समोर आली असल्याने डॉ. गोऱ्हे यांनी सुरक्षारक्षक, रजिस्टर नोंदी व प्रवेश नियंत्रण यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांनी सर्व गेटेड सोसायट्यांमध्ये प्रवेश नोंदणी सक्तीची करणे, बायोमेट्रिक किंवा डिजिटल लॉग प्रणाली अनिवार्य करणे आणि महिला सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक सोसायटीमध्ये दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

तसेच, पोलीस प्रशासनाने “सोसायटी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे” तयार करून सर्व सोसायट्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, अशीही त्यांनी सूचना केली आहे.

ही घटना केवळ एका महिलेवर झालेला अत्याचार न राहता संपूर्ण शहरातील महिलांच्या सुरक्षेला गालबोट लावणारी आहे. म्हणूनच, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अशा घटनांच्या पुनरावृत्तीला आळा बसावा यासाठी तत्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली असून पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.यासोबतच नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे तसेच सर्वच कुरियरवाल्यांना एकाच तराजूत न तोलण्याचे आवाहन करत महिला सुरक्षेसाठी पुरुषी मानसिकतेमध्ये बदलाबाबत देखिल त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.

सांगलीत डॉक्टर महिलेचा तिच्याच गाडीत संशयास्पद मृतदेह;”आत्महत्या की हत्या?… प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश

सांगली, दि. ३ जुलै २०२५ : इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे डॉक्टर शुभांगी वानखडे (वय ४४, रा. मुंबई) यांच्या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

डॉ. शुभांगी वानखडे यांचा मृतदेह दिनांक २ जुलै २०२५ रोजी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्याच गाडीत संशयास्पदरित्या सापडला. त्यांच्या हातावर आणि गळ्यावर नसा कापल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या. ही आत्महत्या आहे की यामागे अन्य कोणती पार्श्वभूमी आहे, हे शोधणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

त्यांनी मागणी केली आहे की, या प्रकरणाचा तपास भारतीय दंड संहितेच्या व अन्य अनुषंगिक तरतुदी अंतर्गत तातडीने सुरू करण्यात यावा. याशिवाय, आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा धमकी देणे यासारखे कोणतेही संकेत मिळाल्यास त्यांचाही तपास करण्यात यावा.

डॉ. शुभांगी वानखडे यांच्या मोबाईल फोन, पत्रव्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, ई-मेल्स आणि सोशल मीडियावरील संवाद यांची सखोल तपासणी करून मृत्यूमागील खऱ्या कारणांचा शोध घेण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मानसिक, आर्थिक किंवा सामाजिक दडपण होते का, हेही तपासण्यात यावे.

डॉ. गोऱ्हे यांनी मृत्यूपूर्वी कोणी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा थेट किंवा अप्रत्यक्ष दबाव टाकला होता का, याची शहानिशा करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणात कोणतेही साक्षीदार असतील, तर त्यांना साक्षीदार संरक्षण कायदा २०१८ अंतर्गत संरक्षण द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने व्हावी, अशी ठाम भूमिका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे. ही घटना केवळ एका महिला डॉक्टरच्या आत्महत्त्येपुरती मर्यादित न राहता, समाजात अशा दुर्दैवी घटनांना आळा बसण्यासाठी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

मुद्रण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रकाश जोशी यांचा सन्मान

दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड पुणे चा १०६ वा वर्धापन दिन ; ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स चे अध्यक्ष सतीश मल्होत्रा यांच्या हस्ते सत्कार

पुणे : दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे आणि अखिल भारतीय मुद्रक फेडरेशनच्या पश्चिम क्षेत्राचे माजी अध्यक्ष प्रकाश जोशी याचा विशेष सन्मान ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स चे अध्यक्ष सतीश मल्होत्रा यांच्या हस्ते करण्यात आला.

दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड पुणेच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेखक अच्युत गोडबोले, प्रमुख मुद्रण व्यावसायिक रवी जोशी, सु. वा. जोशी, संजय घटवाई, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन पुणे चे अध्यक्ष राहुल मारुलकर, उपाध्यक्ष कृष्णा जागडे,  चिटणीस किशोर गोरे उपस्थित होते.

प्रकाश जोशी यांनी प्रेस ओनर्स असोसिएशन मध्ये विविध पदे सांभाळून मुद्रण भांडार आणि संघटना यांच्या कार्याला विशेष गती प्राप्त करून दिली.  मुद्रण विषयक चतुरस्त्र कार्याबद्दल   पूना प्रेस असोसिएशनच्या वतीने मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

रोलबॉल विश्वविजेत्या संघाचा नागरी सत्कार

पुणे : केनिया मधील नैरोबी येथे झालेल्या पहिल्या जूनियर रोलबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या रोलबॉल संघांचा आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने  नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात रोलबॉलचे संस्थापक आणि इंटरनॅशनल रोल बॉल फेडरेशनचे सचिव राजू दाभाडे  तसेच महिला संघाची कर्णधार प्रांजल जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सत्कार सोहळ्याचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ससून रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव, कॉसमॉस कन्स्ट्रक्शन ग्रुप संचालक मेहुल शाह, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, राज्य रोलबॉल संघटना अध्यक्ष संदीप खर्डेकर, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

प्रशिक्षक हेमांगिनी काळे, फिटनेस ट्रेनर तेजस्विनी यादव, तसेच टीम सपोर्टर प्राची फराटे, मिलिंद क्षीरसागर, आणि फोटोग्राफर सुभाष सुर्वे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

डॉ. यल्लप्पा जाधव म्हणाले, जागतिक रोलबॉल स्पर्धेतील मुलींची कामगिरी प्रेरणादायी आहे. आजच्या काळात विविध कारणांनी मानसिक ताण वाढला आहे. अशा वेळी  योग, ध्यान आणि सकारात्मक संवादाद्वारे मानसिक आरोग्य जपणे ही आपली जबाबदारी आहे.

संदीप वांजळे म्हणाले, रोलबॉल हा अत्यंत चांगला  खेळ आहे. आता खेळाडूंना चांगले दिवस आले आहेत. खेळांमध्ये करिअर केले जाऊ शकते आणि सोबतच आरोग्यही उत्तम राहते. खेळातून केवळ शरीरसंपदा नव्हे, तर मानसिक ताकदही वाढते. भारताने वर्ल्ड कप जिंकणं ही खूप मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

संदीप खर्डेकर म्हणाले, रोलबॉल या खेळाचा जन्म २० वर्षांपूर्वी पुण्यात झाला आणि आज हा खेळ ५७ देशांमध्ये खेळला जात आहे. ही पुणेकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. खेळ झपाट्याने वाढत असून त्याचे जनक म्हणजेच राजू दाभाडे यांचे हे यश आहे.

हेमंत जाधव म्हणाले, रोल बॉल विश्वचषक जिंकणे भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद यश आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे प्रांजल जाधव ही पुण्यातील मुलगी या जागतिक विजेत्या संघाची कर्णधार आहे. हा फक्त क्रीडाजगतासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.

हातावरचे पोट असणारे पथारीवाले आता महापालिकेला विचारणार जोरदार जाब

सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमण विरोधी कारवाईचा निषेध 

पुणे, :सिंहगड रस्त्यावरील   फन टाईम टॉकीजजवळील पथविक्रेत्यांवर झालेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर- जिल्हाच्या वतीने  धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर- जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने महापालिका अधिकारी व अतिक्रमण निरीक्षकांवर पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे. आंदोलन दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता म.न.पा. आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर येथे केले जाणार असून ढोल वाजवत निषेध व्यक्त केला जाईल.

पथविक्रेत्यांचा माल विनापत्र न घेता जप्त आहे.उचलेल्या मालाची यादी दिलेली नाही.नाशवंत माल मागणी केल्याच्या दिवशी परत देण्याचा नियम असताना  पीडित विक्रेत्यांनी वस्तू परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली गेली.अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत,पालिकेच्या सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला जाणार आहे.