पुणे- मुंबई बेंगलोर हायवे लगत परराज्यातील मुलींकडुन देहविक्रीचा व्यवसाय करुन घेणा-या महिला एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०७/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना माहिती मिळाली की, सपना कदम नावाची महिला एजंट हि मुलींचे फोटो पाठवून वेश्या गमनसाठी रक्कम ठरवून ग्राहकांना मुली ठरविलेल्या ठिकाणी पाठवते व ते वेश्या गमनाकरिता आलेल्या ग्राहकाकडून ४ हजार रूपये नमूद मुली मार्फत अथवा तिचे साथीदाराकडून वेश्या गमनाचे पैसे स्वीकारते. सदरची महिला ही सिंहगड रोड भागात ग्राहकांच्या मागणीनुसार एका हॉटेलमध्ये मुली पुरवते व ती वेश्या व्यवसाय चालविते.
अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी छापा कारवाई करुन पराराज्यातील एका महिलेची सुटका करुन सदरचा वेश्या व्यवसाय करणारी महिला एजंट सपना राजाराम कदम वय ३६ वर्षे, रा. मु.पो खडकी, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद व तीचे इतर ०३ साथीदारा विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४१/२०२५ अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर, अति. कार्य गुन्हे, श्री विवेक मासाळ, सहा पो आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, सचिन माळवे, संदिप शिर्के, विपुन गायकवाड, सुहारा डोगंरे, दयानंद तेलंगे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.
मुंबई बेंगलोर हायवे लगत परराज्यातील मुलींकडुन देहविक्रीचा व्यवसाय: महिला एजंट गजाआड
भारतीय संविधान हे रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन-भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई
‘ज्या विधीमंडळाशी माझ्या वडिलांचं अतिशय प्रेमाचं नातं तिथे सन्मान…’
मुंबई- “थोरांची जन्मभूमी असलेले संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संज जनाबाई, संत चोखामेळा यांनी महाराष्ट्रात अत्यांतिक लोकशाहीचा पारा रचला. अर्थात स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ केलेले यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहावं याकरता, ज्यांनी स्वातंत्र्याचा ऐतिहासिक लढा उभारला ते छत्रपती शिवाजी महाराज,ज्याला भारताचे पुनर्जीवन म्हणता येईल ते भारताचे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जनेतेचे रयतेचे राजा छत्रपती शाहू महाराज, या घटनेच्या निर्मितीमध्ये आणि देशामध्ये सामाजिक, आर्थिक समानता आणण्यात ज्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृीताला मी सर्वप्रथम वंदन करतो”, असं सरन्यायाधीश म्हणाले.भारतीय संविधान हे रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी मंगळवारी विधिमंडळात बोलताना व्यक्त केले. हे विधान करताना त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला दिला. भारताची राज्यघटना ही देशात एक रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन आहे असे बाबासाहेब म्हणायचे. निश्चितच आपण मागील 75 वर्षांच्या कालखंडात याच दृष्टिकोनातून काम केले आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल आज त्यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सर्वच मंत्री व आमदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, घटनात्मक पदावर काम करताना सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्टाचा न्यायाधीश असो, तुम्हाला संविधानात नमूद मुलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांनुसारच कार्य करणे अभिप्रेत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, भारताची राज्यघटना या देशात एक रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन आहे. निश्चितच आपण 75 वर्षांत या दृष्टिकोनातूनच काम केले. माझ्याविषयी सांगायचे तर, मला जेव्हा केव्हा संधी मिळाली, तेव्हा – तेव्हा मी मार्गदर्शक तत्वे व मुलभूत हक्क यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. ही तारेवरची कसरत असते. परंतु हे पद मला या देशाची व समाजाची सेवा करण्यासाठी मिळाले आहे. त्यामुळे न्यायदानात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मी ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
ते पुढे म्हणाले, मला मागील 22 वर्षांच्या कालखंडात न्यायदानाचे चांगले काम करता आले. बाबासाहेब आंबेडकर व घटनाकारांचे देशात सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित करण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या कार्यात मला खारीचा वाटा उलचण्याची संधी मिळाली. आज आपण सर्वांनी माझा बहुमान केला. हा बहुमान महाराष्ट्राच्या 12 कोटी 87 लाख जनतेने दिलेला सन्मान आहे. मी या जनतेला तुमच्या माध्यमातून वंदन करतो. हा सत्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण, याच विधिमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्षे लोकप्रतिनिधित्व केले. आज त्याच सभागृहात माझा सत्कार होत आहे. ही माझ्यासाठी भूषणावह बाब आहे.
सरन्यायाधीश म्हणाले, देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव संपूण आपण आता शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. कोणत्याही संविधानासाठी 75 वर्षांचा काळ फार मोठा मानला जात नाही. पण मला अभिमानाने सांगावे वाटते की, या 75 वर्षांच्या कालखंडात आपल्या कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ व न्याय मंडळाने भारतीय संविधानाला अभिप्रेत असेच काम केले. सामाजिक व आर्थिक न्याय तथा सामाजिक व आर्थिक समानतेच्या दृष्टिकोनातून संसद व देशातील विधिमंडळांनी अनेक महत्वपूर्ण कायदे केले. त्याचा जनतेला मोठा फायदा झाला. भाडेपट्टा कायदा रद्द केल्यामअळे देसातील लाखो नागरीक ते कसत असणाऱ्या जमिनीचे मालक झाले. यामुळे गरिबांना रोजगार व उपजिविकेचे साधन मिळाले. महाराष्ट्रात महार वतन उच्चाटन कायदा आहे. या कायद्यांतर्गत महार वतन असणाऱ्या वतनदारांना जमिनीचे मालक होता आले.
या देशात महिला सर्वाधित मागास असल्याचे बाबासाहेब नेहमीच म्हणायचे. त्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली. त्यानंतर संपूर्ण देशात एक क्रांती झाली. त्यामुळे आज कोणत्याही क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या देशाला महिला पंतप्रधान मिळाल्या. 2 महिला राष्ट्रपती मिळाल्या. पहिल्या महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील व दुसऱ्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आदिवासी समाजाचा अजून राष्ट्रपती झाला नव्हता. पण भारतीय संविधानामुळे हे शक्य झाले.
या देशाचे अनुसूचित जातीचे 2 व्यक्ती के आर नारायण व रामनाथ कोविंद हे ही भारताचे प्रथम नागरीक अर्थात राष्ट्र्पती झाले. अनुसूचित जातीचेच बालयोगी व मीराताई लोकसभेचे सभापती झाले. अनेक मुख्य सचिव व पोलिस महासंचालक या वंचित समाजातून झालेत. त्यानंतर आज बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक म्हणून मला सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो, असे सरन्यायाधीश म्हणाले.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे, दि. ८ : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ११ जुलै रोजी मध्यरात्री १२:०५ वाजल्यापासून ते २४ जुलै २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोट कलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
पुणे, दि. 8: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि हरीभाई व्ही देसाई वाणिज्य, कला व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार मंगळवार, 15 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता हरीभाई व्ही देसाई वाणिज्य, कला व विज्ञान महाविद्यालय, 596, भाऊ रंगारी रोड, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, बुधवार पेठ, पुणे येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी 2 हजारपेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. त्यांच्याकडून ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
इच्छुकांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांना अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, 481, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे 411011 येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.
