पुणे-पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूरमधून एका काश्मिरी तरुणाला अटक केली आहे. आरोपी अमन प्रेमलाल वर्मा (३८) याने मॅट्रिमोनियल वेबसाइटवर नोंदणी करून अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
हडपसर परिसरातील एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ४५ लाख रुपये उकळले. पोलीस तपासात आरोपीने भोपाळ, इंदूर, दिल्ली आणि फरिदाबाद या शहरांमध्येही अशाच पद्धतीने तरुणींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील बिश्ना येथील रहिवासी असलेला आरोपी सोशल मीडियावरील विवाह विषयक संकेतस्थळांद्वारे तरुणींशी संपर्क साधत असे. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळात अडकवत असे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीला इंदूर येथून ताब्यात घेतले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक विलास सुतार, हवालदार युवराज दुधाळ आणि श्रीकृष्ण खोकले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.