पुणे-
भाषा कौशल्य विकासासाठी कृतियुक्त शिक्षण महत्त्वाचे असल्याचे मत ‘आयआयटी मुंबई’चे
प्राध्यापक के. रामसुब्रमनियन यांनी व्यक्त केले.
‘डीईएस पुणे विद्यापीठा’ने ‘भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद’, ‘इकोटोको’ आणि ‘कोल्टर’ यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘कृतियुक्त भाषा शिक्षण’ या आंतरराष्ट्रीय आणि ‘आर्थिक समृद्धी व शाश्वतता’ या राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले होते. या परिषदांच्या उद्घाटन कार्यक्रमात के. रामसुब्रमनियन बोलत होते.
‘गुजरात विद्यापीठा’चे आचार्य डॉ. दीप कोयराला, ‘रोटरी’चे सुरेंद्र गुप्ता, ‘आरोही रिसर्च फाउंडेशन’चे संचालक एम. एस. चैत्रा, ‘डीईएस पुणे विद्यापीठा’चे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ. ललित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
के. रामसुब्रमनियन म्हणाले, “आपल्याकडे आजीच्या गोष्टी ऐकत भाषेचे शिक्षण आणि संस्कार पिढ्यानंपिढ्या होत होते. आता मुलांना द्यायला पालकांकडे वेळ नाही. त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी तिसऱ्या वर्षांपासून हातात मोबाईल दिला जातो, ही खेदाची बाब आहे. खेळावर आधारित शिक्षण दिले पाहिजे.”
गुप्ता म्हणाले, “ई-कचऱ्याची समस्या मोठी आहे. ती सोडविण्यासाठी ई साधनांचा वापर कमी करणे, पुन्हा वापर, पुनःप्रक्रिया याबरोबर ती नव्याने घेताना पुनः विचार करण्याची आवश्यकता आहे.”
डॉ. खांडेकर यांनी प्रास्ताविक, डॉ. कुलकर्णी यांनी स्वागत, नेहा जोशी यांनी सूत्रसंचालन आणि डॉ. सागर विध्वंस यांनी आभार प्रदर्शन केले.