Home Blog Page 338

दिवाळीच्या रॉकेटमुळे खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग

मुंबई-शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर राहत असलेल्या उच्चभ्रू इमारतीच्या 22व्या मजल्यावर दिवाळीच्या रॉकेटमुळे आग लागली. दिवाळीच्या रात्री अचानक लागलेली ही आग पाहताच रवींद्र वायकर स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, इमारतीच्या फायर सिस्टिममध्येच पाणी नव्हते, हे समोर आल्यानंतर वायकर यांचा संताप अनावर झाला. या घटनेनंतर त्यांनी थेट इमारतीच्या व्यवस्थापनावर तसेच महानगरपालिकेच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आग लागल्याचे समजताच रवींद्र वायकर स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दल येण्यापूर्वीच त्यांनी रहिवाशांसोबत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेळी इमारतीतील फायर सिस्टिममधून पाणीच येत नव्हते. त्यामुळे ते संतापले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर मुंबईतील नव्या इमारतींमध्येच फायर सिस्टिम कोरडी असेल, तर इतर इमारतींचं काय? त्यांनी महानगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागाला आदेश देत म्हटले की, मुंबईतील प्रत्येक इमारतीची फायर सिस्टिम योग्य स्थितीत आहे का, याची तपासणी तात्काळ करण्यात यावी. रवींद्र वायकर यांच्या या वक्तव्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि हौसिंग सोसायट्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत मुंबईत फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढल्या आहेत. वायकर यांनी सांगितले की, यंदा रॉकेटमुळे अनेक ठिकाणी इमारतींना आग लागल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घातक फटाक्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. त्यांनी म्हटले की, लोकसभेत या विषयावर मी प्रश्न उपस्थित करणार आहे. रॉकेट फटाके इमारतींच्या परिसरात सोडणे धोकादायक आहे. नागरिकांनी जबाबदारीने दिवाळी साजरी करावी. मुंबईत अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक जणांचा जीव गेला असून, आता कायद्यात सुधारणा आणि नियंत्रण आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली.

महेश कोठारेंची मोदी स्तुती सुनेला वाचवण्यासाठी:किशोरी पेडणेकर

मुंबई-अभिनेते महेश कोठारे यांनी आपल्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे महेश कोठारे यांच्या भाजप प्रेमाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.महेश कोठारे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचा भक्त असल्याचे स्पष्ट् केले आहे. तेव्हापासून ते ठाकरे गटाच्या रडारवर आहेत. खासदार संजय राऊत यांनी कालच या प्रकरणी त्यांना तात्या विंचू रात्री तुमचा गळा आवळेल असा टोला हाणला होता. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत स्वतःच्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी त्यांना भाजप प्रेमाचे भरते आल्याचा दावा केला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, अभिनेते महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे ही एका अपघात प्रकरणात अडकली आहे. तिला त्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठीच महेश कोठारे यांनी भाजपची स्तुती केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, महेश कोठारे एक कलाकार आहेत. ही खरी गोष्ट आहे. पण त्यांच्या सुनबाई एका अपघात प्रकरणात अडकल्यात. तिला कसे वाचवायचे? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. भाजपवर अशी मुक्ताफळे उधळल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही हे त्यांना ठावूक आहे. महाराष्ट्रात एक वेगळीच संस्कृती तयार होत आहे. मी या प्रकरणी नाव घेऊन कोणत्याही जातीचा अपमान करणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवले, त्यासोबतच क्रौर्यही दाखवले, असे त्या म्हणाल्या.

उर्मिला कोठारे यांच्या कारचा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भीषण अपघात झाला होता. त्यात एक मजूर ठार झाला होता. यासंबंधीच्या माहितीनुसार, ठाणे ते घोडबंदर रस्त्यावर गत डिसेंबर महिन्यात मध्यरात्री 12.54 च्या सुमारास हा अपघात घडला होता. त्यावेळी उर्मिला कोठारे आपल्या मैत्रिणीला भेटून तिच्या घरी जात होती. तिचा चालक गजानन पाल हा कार चालवत होता. कांदिवाली पोईसर मेट्रो स्थानकालगत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. तत्पूर्वी, तिने मेट्रो स्थानकालगत काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले होते. त्यापैकी सम्राटदास जितेंद्र नामक मजूर ठार झाला होता.

या अपघातात उर्मिला कोठारेही जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून कार चालकाच्या रक्ताचे नमुणे घेतले होते. पण त्याने कार चालवताना मद्यपान केले होते का? हे अजून स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाचा तपास अद्याप पोलिसांकडून सुरू आहे.

महेश कोठारे यांनी भाजपच्या मागाठाणे येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. ते मी मोदी भक्त असल्याचे म्हणाले होते. तसेच मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. भाजप म्हणजे आपले घर आहे. कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे.विशेषतः यावेळचा महापौरही येथूनच निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की, तुम्ही खासदार नव्हे तर मंत्री निवडून देत आहात. आताही या विभागातून नगरसेवक नव्हे तर महापौर निवडला जाईल, असे महेश कोठारे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची मराठी सिनेसृष्टीसह राजकारणात खमंग चर्चा रंगली असताना त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चारही केला आहे.

रवींद्र धंगेकरांना एकनाथ शिंदेंचे दरवाजे होणार बंद ?

पुणे- महायुतीत असलेले शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री हे महायुतीत एकमेकांना नेहमी समजून घेत आलेत आणि युती धर्म पाळत आलेत ते भाजपची बदनामी करणाऱ्या रविंद्र धंगेकर यांची लवकरच हकालपट्टी करतील असा दावा भाजपचे पदाधिकारी येथे करत आहेत .या साठी आज खुद्द्द धंगेकर यांनी केलेल्या ट्वीट चा हवाला देखील हे पदाधिकारी देऊ लागलेत

पुणे शहरातील भाजपा नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबतची युती वाचविण्यासाठी रविंद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला आहे. लवकरच कारवाई होईल. महायुतीमध्ये दंगा नको, असे एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना पुण्यात जाहीरपणे सांगितले होते तरीही धंगेकरांनी भाजपा नेत्यांना टार्गेट करणे थांबवले नाही. धंगेकर हे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पाठवलेला हस्तक असून उद्धव सेनेचे संजय राऊत त्यांना हँडल करत आहेत. धंगेकरांचा धोका ध्यानात आल्यानंतर त्यांच्या बद्दलचे एकनाथ शिंदे यांचे मत बदलले आहे तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी धंगेकरांसाठी भाजपाशी दुरावा निर्माण करू नये, असा दबाव आणला आहे. धंगेकरांना संभाव्य कारवाईची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी सर्वप्रथम आपण, मग नंतर पक्ष, युती असे ट्वीट केले आहे.असे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा देताना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केले आहे. पाडव्याचा दिवस हा नवसंकल्पाचा दिवस असतो, याकडे लक्ष वेधत त्यांनी कार्यकर्त्यांना ‘पुणेकरधर्म’ पाळण्याचा सल्ला दिला आहे. धंगेकर म्हणाले की, समाजात कुठलीही चुकीची घटना घडत असताना जर ती आपल्या निदर्शनास आली, तर एक जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवर व्यक्त व्हा. खरा कार्यकर्ता तोच असतो जो समाजातले चांगले-वाईट ओळखून त्यावर व्यक्त होतो आणि आपल्या शहराला वाईट घटना घडण्यापासून वाचवतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.रवींद्र धंगेकर म्हणाले की, आज आपण सर्वजण जे काही आहोत ते ह्या शहरातील लोकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आहोत. त्यामुळे युतीधर्म किंवा आघाडीधर्म पाळण्याअगोदर सर्वात अगोदर पुणेकरधर्म पाळा, असे आवाहन त्यांनी केले.

दुसरीकडे रवींद्र धंगेकरांनी मोहोळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या ऑफरच्या किस्सावर बोलताना म्हटलंय की, बरं झालं हे महाराज त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये गेले नाही… नाहीतर आज जैन मंदिराची जागा चोरून 3 हजार कोटींचा घोटाळा म्हणून अजितदादांनी तर पहिल्याच दिवशी राजीनामा घेतला असता.

जैन ट्रस्ट–मॉडेल कॉलनी,खरेदीखतापूर्वीच १८ मजली इमारतीचा समावेश असलेल्या ८ लाख चौ. फुटाच्या बांधकामाला महापालिकेने दिला परवाना

‘PMC ने एवढा मोठा प्रकल्प एक महिना आधीच कसा मंजूर केला? कोणी या प्रकरणाचा पाठपुरावा केला ? आणि का?

पुणे-जैन ट्रस्ट – मॉडेल कॉलनी येथील साडेतीन एकराच्या भूखंड खरेदी प्रकाराचे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटत असताना आता याच भूखंडावर एका आर्किटेक्टला भूखंड खरेदी व्यवहार होण्या अगोदरच महापालिकेने ८ लाख चौ. फुटाच्या इमारतीला बांधकाम परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जैन ट्रस्ट – मॉडेल कॉलनीला खरेदीखतापूर्वीच इमारत बांधकाम परवानगी दिली गेल्याचे या व्हायरल नकाशावरून दिसते आहे. ट्रस्टीने इमारत बांधकाम परवानगीसाठी अर्ज खरेदीखताआधीच का आणि कसा केला ? या प्रश्नासमवेत म्हणजेच सर्व प्रक्रिया, मंजुरी आणि कागदपत्रांची पूर्तता खरेदी डील फायनल होण्याआधीच झाली होती असे दिसते आहे मग 8 ऑक्टोबर 2025 रोजी झालेली नोंदणी आणि मॉर्गेज हा फक्त दिखावा (eyewash) होता का? PMC ने एवढा मोठा प्रकल्प एक महिना आधीच कसा मंजूर केला? कोणी या प्रकरणाचा पाठपुरावा केला ? आणि का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत .

हा बांधकाम परवाना देताना नकाशावर .. प्रकल्पाचे नाव: सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, मॉडेल कॉलनी मालक:SETH HIRACHAND NEMCHAND SMARAK TRUST (Through Mr. Jayant Narayan Nandurkar – Trustee) आर्किटेक्ट: मनोज सुरेश ताटूस्कर मंजुरीची तारीख:8 सप्टेंबर 2025 नोंदणी व मॉर्गेज तारीख:8 ऑक्टोबर 2025 एकूण बांधकाम:2 इमारती, 77,458.17 चौ.मी. (सुमारे 8 लाख चौ.फुट) FSI:3.53

असेही नोंदविले गेलेले आहे.

विजय कुंभार (आम आदमी पार्टी )

मोहोळ यांच्यानंतर आता धंगेकर देखील मॉडेलिंग करत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल

पुणे- गोखले बिल्डर च्या प्रकल्पातील फ्लॅटच्या विक्रीसाठी ग्राहक वर्गाला प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती राजकारणी करू लागलेत असे वाटावे अशी स्थिती सध्या पुण्यात दिसून येऊ लागली आहे अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागलेत . आपले मित्र गोखले बिल्डर्स असे द्संग्त मोहोळ यांनी केलेला जाहिरातीचा व्हिडीओ गेल्या २ दिवसात व्हायरल होताच आज त्यांच्यावर घनघाती आरोपांच्या फैरी झाडणारे रवींद्र धंगेकर यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात त्यांनी एका कापडाच्या दुकानाची जाहिरात केल्याचे दिसते आहे. आता या दुकानात त्यांची मोहोळ यांच्या प्रमाणे कधी काळी किंवा सध्या भागीदारी होती किंवा नाही याबाबत मात्र काही माहिती बाहेर आलेली नाही .

गेल्या २० ऑक्टोबरला मोहोळ यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ..

ज्याबाबत खुद्द रवींद्र धंगेकर यांनी ट्वीट केले होते .

कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे… कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का…? काय वाटतं…? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय

असे या ट्वीट मध्ये धंगेकर यांनी म्हटले होते .

वर्तमानपत्रात “वर पाहिजे” अशी जाहिरात करून साडेअकरा लाखाला एकाला घातला गंडा, महिलेला जामीन

पुणे- वर्तमान पत्रातील ‘छोट्या जाहिराती’ या सदराचा वापर करून हातोहात फसविणाऱ्या टोळ्या वर्षानुवर्षे कार्यरत असून आज अशाच एका “वर पाहिजे” अशा जाहिराती द्वारे एकाला साडेअकरा लाखाला गंडा घालणारी महिला पोलिसांनी पकडली आहे. आणि यात लुबाडल्या गेलेल्या फिर्यादी ला त्याची सुमारे साडेअकरा लाखाची रक्कमही परत मिळवून दिली आहे.आरोपपत्र हि पोलिसांनी दाखल केले आहे .आणि आता या महिलेला न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १८/०४/२०२५ रोजी फिर्यादी त्यांचे राहते घरी असताना सकाळ टुडे पेपरमध्ये “वर पाहिजे” अशी अॅड पाहुन तेथे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फिर्यादी यांनी संपर्क केल्यानंतर समोरुन आकांशा पाटील बोलत असल्याचे सांगुन, फिर्यादी यांना दुस-या मोबाईलवर सपंर्क करायला सांगुन, ममता जोशी या वधु असतील असे सांगून, त्यांना सपंर्क करण्यास सांगितलेने फिर्यादी यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता, त्यांनी ममता जोशी बोलत असल्याचे सांगून फिर्यादीशी फोनवर बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने ती कोल्हापुर येथे तिची मावस बहिण आजारी असल्याने तिकडे गेले असल्याचे सांगुन, तिची मावस बहिण आजारी आहे, तसेच काही दिवसानंतर तिचा स्वतः चा अपघात झाला असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे. उपचाराकरीता पैश्यांची आवश्यकता आहे, ती पुण्याला परत आल्यानंतर पैसे परत देईल असे खोटे सांगुन, युपीआय आयडी वरती वारंवार पैसे पाठविण्यास भाग पाडून दिनांक १८/०४/२०२५ ते दिनांक ०१/०६/२०२५ रोजीच्या दरम्यान फिर्यादीस ११,४५,३५०/-रु.ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगुन, फोनपे मर्चेंट यांचे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करुन फिर्यादी यांची ११,४५,३५०/-रु. किं.ची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली. सदरबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१५५/२०२५ भा. न्या. सं क. ३१८ (४), ३१९ (२), ३(५) सह माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या गुन्हयातील आरोपी महिलेचा वरिष्ठ अधिकारी यांचे सुचनेनुसार शोध चालू असताना बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील सायबर टीमने तांत्रिक विश्लेषणाव्दारे महिला आरोपी हर्षला राकेश डेंगळे, वय २८ वर्षे, रा. प्लॉट नं.२०, हुडकेश्वर रोड, पुण्यधाम मंदिर जवळ, न्यु ओमनगर हुडकेश्वर नागपूर असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेस नोटीस पाठवुन गुन्हयाच्या तपासकामी हजर राहणेबाबत कळविले असता ती पोलीस स्टेशन येथे हजर झाली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांनी तिच्याकडे या गुन्हयाबाबत तपास करता तिने संबधित गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या महिलेने गुन्हा करण्यासाठी वापरलेले तीन मोबाईल जप्त केलेले आहेत. तसेच फिर्यादी यांनी फसवणूक करून घेतलेली रक्कम ११,४५,३५०/-रूपये ही पुन्हा फिर्यादी यांना परत मिळवून दिलेली आहे. या महिलेला दि.१५/१०/२०२५ रोजी चार्जशीटसह न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या महिलेला जामीन मंजुर केलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर राजकुमार शिदे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेद्रे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार संतोष जाधव, विशाल जाधव, मेघा गायकवाड व प्रतिक करंजे यांनी केलेली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात अनेक बोगस वधू वर सूचक मंडळे निर्माण झाली असून ती अशा जाहिराती करून तरुण आणि इच्छुक वरांना आकर्षित करून त्यांना प्रथम ऑनलाईन शुल्क नावाखाली फीज भरायला लावून नंतर फसवे नंबर देऊन तर कधी न देता तर कधी त्यांच्याच खेळीत अडकवून लाखो रुपयांची कमाई करत वृत्त आहे नागपूर संगमनेर अशा भागातील असे भामटे पुण्या मुंबईत जाहिराती करून मलिदा खेचण्याचा धंदा करत आहेत.

मुंबईत मोठ्या घातपाताचा कट ?बनावट शास्त्रज्ञाच्या ताब्यातून अणुबॉम्बचे संवेदनशील नकाशे जप्त; राष्ट्रीय सुरक्षेला धोका

मुंबई-भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा बनावट शास्त्रज्ञ असल्याचा बनाव करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या इसमाला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे.प्राथमिक तपासात या व्यक्तीने स्वतःला BARC मधील वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ असल्याचे भासवून विविध ठिकाणी दिशाभूल करणारी कागदपत्रे आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, तपास यंत्रणांना त्याच्या निवासस्थानातून अणुबॉम्ब डिझाइनशी संबंधित 14 अत्यंत संवेदनशील नकाशे आणि अनेक गुप्त कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर प्रचंड खळबळ माजली असून, अख्तर हुसेनचा उद्देश नेमका काय होता, हे उलगडण्यासाठी केंद्र आणि राज्य यंत्रणा उच्चस्तरीय तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेला काही काळापासून एका संशयास्पद व्यक्तीच्या हालचालींबाबत माहिती मिळत होती, जो स्वतःला BARC मधील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून कारवाई करताना पोलिसांनी अख्तर हुसेनला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर चौकशीतून मिळालेल्या माहितीने तपास यंत्रणेला धक्काच बसला. घरातून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये अणुबॉम्ब तयार करण्याच्या आराखड्याशी साधर्म्य असलेले नकाशे, तांत्रिक टिपा आणि इतर दस्तऐवज होते.

प्राथमिक तपासात हे नकाशे देशांतर्गत तयार केलेले नाहीत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा धागा परदेशी गुप्तचर नेटवर्कशी जोडला गेला असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. अख्तर हुसेनकडे हे नकाशे कसे आले, त्यामागे कोणाचा हात आहे आणि या माध्यमातून घातपाताचा कट तर रचला नव्हता ना, याची चौकशी सध्या केंद्रस्थानी आहे.

या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA आणि गुप्तचर विभाग म्हणजेच IB यांनी आपल्या हाती घेतला असून, अनेक दिशांनी चौकशी सुरू आहे. अख्तर हुसेनने मागील काही वर्षांपासून भाभा अणु संशोधन केंद्राच्या नावाचा वापर करून अनेकांना फसवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील काही संपर्कांचा तपास घेतला असता काही परदेशी नागरिकांशी त्याचे संवाद असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर पैलू दडलेले असावेत, अशी शंका वर्तवली जात आहे. तपास यंत्रणांनी अख्तर हुसेनकडून मिळालेल्या संगणक, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी सुरू केली असून, या उपकरणांतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात येईल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भाभा अणु संशोधन केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांमध्येही हालचाल सुरू झाली आहे. देशातील सर्व अणु संशोधन केंद्रे आणि संवेदनशील प्रयोगशाळांमध्ये सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे. भारताच्या अणु कार्यक्रमाच्या सुरक्षिततेबाबत देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच सजगता बाळगली जाते. भाभा अणु संशोधन केंद्र हे भारताच्या अणु ऊर्जा आणि संशोधन क्षेत्राचे केंद्रबिंदू मानले जाते. मुंबईतील ट्रॉम्बे येथे असलेले हे केंद्र अणुशक्ती निर्मिती, अणु भौतिकशास्त्र, रेडिओआयसोटोप्स उत्पादन, वैद्यकीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात उपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कामात अग्रस्थानी आहे. त्यामुळे या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून बनावट ओळख निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला देशद्रोहाच्या तरतुदींनुसार कठोर शिक्षा होऊ शकते.

भाभा अणु संशोधन केंद्राचा इतिहासही या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी 1954 मध्ये अॅटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट, ट्रॉम्बे या नावाने या संस्थेची स्थापना केली. भारताच्या अणु संशोधनाला स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या निधनानंतर 1967 मध्ये या संस्थेचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र करण्यात आले. आज या संस्थेमुळे भारत अणुऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनला आहे. अशा संस्थेच्या नावाशी जोडलेला हा बनावटपणा केवळ गुन्हा नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला धक्का देणारा गंभीर कट असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत देश हादरवणारी नवी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस ठाकरे बंधूंशी युती करणार नाही

मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे.

भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची असते, नेत्यांची नाही. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की, त्यांनी देखील कधीतरी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, त्यांना निर्णय घेऊ द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक आहोत, त्यामुळे आम्ही स्वबळावर लढूया, हीच आमची भूमिका आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय कामकाज समितीच्या बैठकीतही त्यांनी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच भूमिका स्पष्ट मांडली आहे. राज ठाकरे तर दूरच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही, असे वक्तव्य त्यांनी करून काँग्रेसच्या रणनीतीवर नवीन चित्र निर्माण केले आहे.

दरम्यान, भाई जगताप यांनी उद्धव ठाकरेंसोबतची परिस्थिती स्पष्ट करताना म्हटले की, महाविकास आघाडीत शिवसेना एकटी नव्हती. उद्धव ठाकरे मविआत आले तेव्हा त्यांची शिवसेना होती, पण आता दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे युतीबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनी घ्यावा. त्यांनी आणखी स्पष्ट केले की, काँग्रेसने आजवर कधीही राज ठाकरेंसोबत जाण्याचा विचार केलेला नाही. उद्धव ठाकरेंसोबत देखील स्थानिक कार्यकर्त्यांची तयारी नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजे. भाई जगताप यांच्या या विधानाने काँग्रेसच्या भविष्यातील धोरणाबाबत नवी दिशा सुचवली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनीदेखील पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत आणि त्याबाबत कोणतीही शंका नाही. आमची बैठक चेन्निथला यांच्यासोबत झाली, त्यावेळी आम्ही आमची मते स्पष्टपणे मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेतले जातात. काँग्रेस हायकमांड सर्व नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल, असे सावंत यांनी सांगितले. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, काँग्रेस सध्या कोणत्याही युतीच्या दबावाखाली न येता, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार पुढे जाण्याच्या तयारीत आहे.

पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 40 हून अधिक ठिकाणी आगी

अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ

पुणे-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात सलग 40हून अधिक ठिकाणी आग लागल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या सर्व वाहनांची अक्षरशः धावपळ सुरू होती. सकाळी 5 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या सुमारे 25 गाड्यांनी 40 हून अधिक ठिकाणी आगी विझवल्या. सकाळी 5.12 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत अग्निशमन विभागाला सतत कॉल येत राहिले. हडपसर, वारजे, कोथरूड, कसबा पेठ, धानोरी, सिंहगड रोड, बाणेर, औंध, येरवडा, विश्रांतवाडी, मार्केट यार्ड, कोंढवा खुर्द अशा सर्व भागांमध्ये एकापाठोपाठ एक आग लागल्याच्या घटना समोर आल्या. काही ठिकाणी इमारतींच्या गॅलऱ्यांमध्ये, पार्किंगमध्ये, झाडांना, गवताला किंवा कचऱ्याला आग लागल्याच्या नोंदी आहेत, तर काही ठिकाणी दुकानं आणि घरांनाही आग लागल्याचं दिसून आलं. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 42 ठिकाणी आग लागल्याचे कॉल प्राप्त झाले होते. बहुतेक ठिकाणी आगीचे कारण आकाशकंदील, फटाके किंवा इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही, मात्र काही ठिकाणी किरकोळ जखमी झाल्याच्या घटना आहेत.मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, नवले, वारजे, बाणेर, येरवडा, कोथरूड, धानोरी आणि गंगाधाम केंद्रातील अधिकारी आणि जवान दिवसभर रस्त्यावर होते. काही ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास दीड-दोन तास लागले. दिवाळीच्या दिवशीसुद्धा अग्निशमन कर्मचारी घरच्यांपासून दूर राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आजचा दिवस आम्हाला सर्वात धकाधकीचा गेला. अनेक कॉल एकाचवेळी आले, पण आमच्या पथकांनी तातडीने प्रतिसाद देऊन मोठे अनर्थ टाळले. नागरिकांनी आकाशकंदील, इलेक्ट्रिक माळा आणि फटाके वापरताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.

शनवार वाड्यात नमाज पठण: महायुतीच्या महिला नेत्यात जोरदार रस्सीखेच

पुणे- गेल्या १९ आक्टोबर रोजी पुण्याच्या भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा घेत शनवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप करत येथे पतित पावन च्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जोरदार धडक मारली आणि आंदोलन केले . त्यानंतर भाजपच्या राज्यातील सरकारमधील सहयोगी असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या रुपाली पाटील यांनी मेधा कुलकर्णी हिंदू मुस्लीम वाद पेटवून अशांतता पसरवत असल्याचा आरोप केला . या दोन्ही घटनांना माध्यमांतून मोठी प्रसिद्धी देखील मिळाली .

मुरलीधर मोहोळ यांच्या जमीन घोटाळ्याचे लक्ष हटवण्यासाठी शनिवारवाडा प्रकरणाचे उत्खनन – इम्तियाज जलील

शिवाजी महाराजांनी मुस्लीम समाजाचा विरोध केला नाही, मग हे कोण चिंधीचोर ?:शनिवारवाडा प्रकरणावरून इम्तियाज जलील यांची टीका

नमाज ही श्रद्धेची गोष्ट आहे, राजकारणाची नाहीनमाज वेळ झाली म्हणून त्यांनी प्रार्थना केली

मस्तानीने सुद्धा कधी तिथे नमाज पढली असेल, तेव्हा कुणी वाद घातला नव्हता

छत्रपती संभाजीनगर – ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याच्या घटनेवरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून एआयएमआयएम पक्षाचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र टीका केली आहे. मुस्लीम महिलांनी नमाज वेळ झाल्याने प्रार्थना केली, यात काय गुन्हा झाला? त्यांनी शनिवारवाड्यावर आपला दावा केला नाही. मात्र, मुद्दा दुसरीकडे वळवण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळ यांच्या जमीन घोटाळ्याचे लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण उकरण्यात आले आहे, असा गंभीर आरोप जलील यांनी केला.

या संदर्भात जलील म्हणाले की, शनिवारवाड्यात आमच्या बहिणींनी नमाज पडली म्हणून एवढं मोठं वादंग निर्माण केलं जात आहे. नमाज ही श्रद्धेची गोष्ट आहे, राजकारणाची नाही. नमाज वेळ झाली म्हणून त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी कोणत्याही दगडाला रंग मारून तो आमचा आहे असं म्हटलं नाही. शिवाजी महाराजांनी कधी मुस्लीम समाजाचा विरोध केला नाही. मग हे कोण चिंधीचोर आहेत जे आता हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात भेदभावाचं विष पेरत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे आरोप केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पॉलिसीच आहे की, जेव्हा स्वतःवर संकट येतं तेव्हा मुद्दा दुसरीकडे वळवायचा. भाजपच्या दबावाखाली पोलिसांनी निरपराध महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

चिंकू-पिंकू हिंदुत्ववादी झालेत, असे म्हणत जलील यांनी भाजपच्या नेत्यांना टोलाही लगावला. नमाज पढली म्हणजे वाडा ताब्यात घेतला असा हास्यास्पद दावा करणारे लोक हे समाजात विष पसरवत आहेत. मस्तानीने सुद्धा कधी तिथे नमाज पडली असेल, तेव्हा कुणी वाद घातला नव्हता. पण आज हेतुपुरस्सर धार्मिक द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू आहे. मुस्लीम समाजाला चिथावणी देऊन राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही या राजकारणाला बळी पडणार नाही, असे जलील म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मुस्लीम समाजाने हे समजून घ्यायला हवे. आमच्या बहिणींनी अजान ऐकली आणि नमाज अदा केली, यात काही चूक नाही. तुम्ही सभा घेता, शिव्या देता, मग आमचीही सभा होऊ द्या. आम्हीही बोलू, आमची जीभही चालेल, असा इशाराही त्यांनी दिला.

राजकारण हि घाणेरडी दलदल -माझ्या मुलाला कधीही यात ढकलणार नाही -मुंबई वगळता राज्यातील एमआयएम पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडल्याचेही जलील यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केलं की, आम्ही आगामी सर्व निवडणुका लढवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला असून स्थानिक स्तरावर युतीबाबतचा निर्णय तेथील पदाधिकारी घेतील. आम्ही उमेदवारांसाठी कडक नियम तयार करत आहोत. जर कुठे दारुण पराभव झाला, तर जबाबदार नेत्याला घरचा रस्ता दाखवला जाईल. वैयक्तिक भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं, माझा मुलगा कधीही नगरसेवक, आमदार किंवा खासदारकीच्या निवडणुकीत उतरणार नाही. हे घाणेरडं राजकारण आहे आणि मी माझ्या मुलाला यात ढकलणार नाही. काही पित्यांना वाटत असेल की त्यांचा मुलगा या दलदलीत जावा, तर तो त्यांचा निर्णय आहे, पण माझा नाही.

पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरण:आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार कोणी दिला? फौजदारी गुन्हे दाखल करा, धंगेकरांची मागणी

पुणे -पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील जैन बोर्डिंग हाऊस जागा विक्री या वादग्रस्त प्रकरणाची मुंबईतील धर्मादाय आयुक्तालयात सोमवारी तातडीची सुनावणी पार पडली. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’म्हणजेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला. मात्र, या आदेशानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी स्थगिती नाही, व्यवहार रद्द करा, अशी मागणी केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे.

धंगेकर यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पदाचा गैरवापर करणारे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जमिनीच्या विक्रीस नियमबाह्य परवानगी देणारे राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त, तसेच कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती देत फसवणूक करणारे मेरिट कन्सल्टन्सी आणि बिल्डर विशाल गोखले यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. धंगेकरांचा आरोप असा आहे की, मोहोळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून राज्याच्या धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकला, सार्वजनिक ट्रस्टची मालमत्ता विक्रीसाठी नियमबाह्य परवानगी मिळवून दिली, तसेच दोन बँकांना फक्त दोन दिवसांत ७० कोटींचं कर्ज मंजूर करण्यासाठी दबाव आणला. त्यांनी म्हटलं की, ही पूर्ण प्रक्रिया अवघ्या दोन दिवसांत पूर्ण झाली. जमीन विक्री, तारण आणि कर्ज व्यवहार हे सर्व नियमबाह्य पद्धतीने झाले. त्यामुळे मोहोळ यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे.
या प्रकरणात सोमवारी झालेल्या सुनावणीत धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी Status Quo आदेश जारी केला. म्हणजेच, सध्याची स्थिती कायम ठेवण्यात आली आहे आणि कोणताही पुढील व्यवहार करता येणार नाही. या निर्णयामुळे जैन समाजातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी दिलासा व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही केवळ कायदेशीर विजयाची पहिली पायरी आहे, पण न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील.

शिवाजीनगरमधील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा पुण्यातील अत्यंत महत्त्वाच्या भागात आहे.
येथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग अशी दोन वसतिगृहे आहेत.
1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतिगृहाची उभारणी केली होती.
या जागेचा उपयोग जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी केला जात होता.
गेल्या काही महिन्यांपासून या मालमत्तेवर नवीन विकास आणि विक्री प्रक्रियेबाबत वाद सुरू होता.
काही विश्वस्तांनी जागेचा विकास करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
तर समाजातील इतर घटकांनी धर्मादाय मालमत्ता विक्री म्हणजे ट्रस्टचा विश्वासघात असा विरोध केला होता.
जैन समाजाचा आरोप आहे की, विश्वस्तांनी ही जागा परस्पर हडप करून विक्रीस ठेवली, आणि पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी सर्व नियमांची पायमल्ली करत या विक्रीला परवानगी दिली.

या विक्री व्यवहारात गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव समोर आले असून, या कंपनीचा मुरलीधर मोहोळ यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धंगेकर म्हणाले की, गोखले बिल्डर्स आणि मेरिट कन्सल्टन्सी यांनी नकाशावरील जैन मंदिराला ‘Old Structure’ म्हणून दाखवून धर्मादाय आयुक्त व बँक यांची फसवणूक केली. त्यांनी मागणी केली की, या कंपन्यांवर देखील फौजदारी गुन्हे दाखल करून चौकशी केली पाहिजे.

या प्रकरणात आता दोन्ही बाजूंची मते मांडली गेली असून धर्मादाय आयुक्तालयाकडून पुढील सुनावणीची तारीख लवकरच निश्चित होणार आहे. जैन समाजाने जागेचा व्यवहार पूर्णतः रद्द व्हावा, अशी मागणी कायम ठेवली आहे, तर संबंधित विश्वस्तांनी आम्ही कायदेशीर चौकटीत काम केलं असा दावा केला आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण आता केवळ धार्मिक किंवा सामाजिक न राहता राजकीय स्वरूपाचं बनलं आहे. एका बाजूला जैन समाज ट्रस्टच्या विश्वासाचा प्रश्न मांडत आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी केंद्रीय मंत्र्यांवर पदाचा गैरवापर केल्याचे आरोप केले आहेत. धर्मादाय आयुक्तालयाने दिलेल्या स्टेटस्को आदेशामुळे विक्री प्रक्रियेला तात्पुरता अडथळा निर्माण झाला असला तरी या प्रकरणाचा निकाल पुढील सुनावणीवरच अवलंबून आहे.

राणी मुखर्जीचा भारतीय पोलिस दलाला सलाम — “त्यांच धैर्य, त्याग आणि निस्वार्थ सेवा भाव आपल्यासाठी प्रेरणादायी आहे”

यशराज फिल्म्सच्या मर्दानी ३ मधून राणी मुखर्जी पुन्हा एकदा पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत झळकणार आहेत. या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात राणी पुन्हा गुन्हेगारी जगताशी सामना करताना दिसणार आहे. भारतीय पोलिस दिन २०२५ च्या निमित्ताने अभिनेत्रीने देशभरातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सलाम करत त्यांच्या अदम्य धैर्याला, समर्पणाला आणि निस्वार्थ सेवाभावाला अभिवादन केले आहे.

राणी मुखर्जी म्हणाल्या,“माझ्यासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे की मर्दानी या चित्रपटा द्वारे मी भारतीय पोलिस दलाला सलाम करू शकते. देशभरात पोलिस दल जे कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम करते, त्यांचा सन्मान करण्याची प्रत्येक संधी मी घेत असते. आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोलिस अधिकारी लोकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस तत्पर असतात — स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या कुटुंबापासून दूर राहून. त्यांच्या या कार्याचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.”

त्या पुढे म्हणाल्या,“भारतीय पोलिस दिनानिमित्त मी भारतीय पोलिस दलाच्या शौर्य, निष्ठा आणि निस्वार्थ सेवा भावाला मनःपूर्वक सलाम करते. ते प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी अहोरात्र झटत असतात. आपण हे विसरू नये की त्या वर्दीच्या मागे एक माणूस असतो — ज्याने चांगुलपणाचा मार्ग निवडला आहे, सेवा हीच आपली जबाबदारी मानली आहे आणि देशाला प्रथम स्थान दिले आहे. तेही कोणाचे तरी लेकरू, पती, पत्नी, वडील, आई आहेत. मला या दलाबद्दल मनापासून आदर आहे आणि प्रत्येक भारतीयापर्यंत ही भावना पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे.”

राणी मुखर्जी यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या साहसाचे कौतुक करत सांगितले,“पोलिस अधिकारी जे करतात ते खरंच अद्वितीय आहे. ते घरातून निघतात, पण परत येतील याची खात्री नसते. ते धोकादायक गुन्हेगारांना सामोरे जातात, निर्भयपणे उभे राहतात. त्यांचे धैर्य आणि चिकाटी पाहून मी नेहमी प्रभावित झाले आहे. त्यांच्या आयुष्याने मला निर्भय राहण्याची शिकवण दिली आहे. त्यांच्या त्यागाची दखल आपण नेहमी घेतली पाहिजे — कारण ते देशासाठी आपल्या आयुष्यातील अमूल्य क्षण गमावतात. यापेक्षा मोठा निस्वार्थ भाव दुसरा कोणता असू शकत नाही, आणि मला अभिमान आहे की मर्दानीच्या माध्यमातून मी त्यांना सलाम करू शकते.”

त्या म्हणाल्या,“भारतीय पोलिस दल हे आपल्याला खऱ्या शौर्याचा, समर्पणाचा आणि देशभक्तीचा अर्थ दाखवते. आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून शिकायला हवे की आपल्या परीने देशासाठी उभे राहणे म्हणजे काय.”

आदित्य चोप्रा निर्मित आणि अभिराज मिनावाला दिग्दर्शित मर्दानी ३ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

“तो क्षण कधीच विसरणार नाही, जेव्हा सगळे डीडीएलजे  पाहायला येऊ लागले… आणि प्रेमात पडले!”

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या ३०व्या वर्षपूर्तीनिमित्त शाहरुख खान आणि काजोल यांनी खास आठवणी शेयर  केल्या 

आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (डीडीएलजे ) ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडती आणि अमर प्रेमकहाणी मानली जाते. शाहरुख खान आणि काजोल यांच्या या ऐतिहासिक ब्लॉकबस्टरने गेल्या तीन दशकांपासून भारतासह जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. ‘राज आणि सिमरन’ ही जोडी आजही प्रेमाचं प्रतीक बनली आहे. चित्रपटाच्या ३०व्या वर्धापनदिनी या दोघांनी त्या जादुई प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.

शाहरुख खान म्हणाला “विश्वास बसत नाही की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेला ३० वर्षं झाली आहेत. असं वाटतं जणू कालच रिलीज झाला होता… कारण ‘बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं’! पण खरं सांगायचं तर अजूनही हे अविश्वसनीय वाटतं. ‘राज’च्या भूमिकेसाठी जगभरातून मिळालेलं प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा लोक सिनेमागृहात येऊ लागले आणि हा चित्रपट पाहून प्रेमात पडले — तो क्षण आयुष्यभर स्मरणात राहील.”

तो पुढे म्हणाला ,“या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जो परिणाम केला, तो अप्रतिम आहे. आजही अनेक जोडपी मला भेटतात आणि सांगतात की त्यांनी लग्न केलं किंवा पहिल्यांदा प्रेमात पडले डीडीएलजे पाहिल्यावर! मला वाटतं, या चित्रपटाने भारतीय आणि दक्षिण आशियाई संस्कृतीच्या पॉप कल्चरवर एक आनंददायी छाप सोडली आहे.”

शाहरुख पुढे म्हणाला ,“या चित्रपटाच्या यशाचे श्रेय संपूर्ण टीमला, विशेषतः आदित्यच्या दृष्टिकोनाला आणि यशजींच्या आशीर्वादाला जातं. आम्ही सगळ्यांनी ही फिल्म प्रेम आणि प्रामाणिकपणाने बनवली होती. आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत हे प्रेम असंच जिवंत राहो…”

काजोल, म्हणजेच सिमरन, म्हणाली ,“डीडीएलजे चे ३० वर्षं पूर्ण होणं म्हणजे एखादं स्वप्न सत्यात उतरलयं असं वाटतं. हा चित्रपट आता एक वारसा झाला आहे, एक अशी आठवण ज्यात संपूर्ण पिढी जगते. ही फिल्म तरुणाईच्या बिनधास्तपणातून आणि पहिल्या प्रेमाच्या प्रामाणिक भावनेतून तयार झाली होती. आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती की राज आणि सिमरनचा ट्रेन स्टेशनवरील तो सीन इतका अमर होईल. गाणी, संवाद, सरसोंची शेते — सगळं पॉप कल्चरचा भाग बनलं.”

काजोल पुढे म्हणाली “डीडीएलजे चा एक अंश प्रत्येक रोमँटिक चित्रपटात आजही दिसतो. माझ्यासाठी सिमरन अजूनही जिवंत आहे — ती लाखो भारतीय मुलींचं प्रतिनिधित्व करते, ज्या आपल्या आई-वडिलांचा आदर करतात पण मनातून स्वातंत्र्याची आसही बाळगतात. म्हणूनच ती आजही लोकांच्या मनात घर करते. ‘जा सिमरन, जा’ ही ओळ आजही फक्त एक डायलॉग नाही, तर ती धैर्य आणि प्रेमाचं प्रतीक बनली आहे.”

काजोल म्हणाली ,“जे प्रेक्षक १६ वर्षांचे असताना डीडीएलजे वर प्रेम करू लागले, ते आज आपल्या मुलांसोबत हा चित्रपट पाहतात. कदाचित हीच डीडीएलजे ची खरी जादू आहे — प्रत्येक पिढीला ती स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडते. जेव्हा एखादा चित्रपट ३० वर्षं लोकांच्या हृदयात टिकतो, तेव्हा तो फक्त सिनेमा राहत नाही — तो त्यांच्या ओळखीचा भाग बनतो.”

शाहरुख आणि काजोलची जोडी भारतीय सिनेमातील सर्वात आयकॉनिक ऑनस्क्रीन जोडी ठरली. यावर काजोल म्हणाली,“डीडीएलजे ला मिळालेलं प्रेम माझ्यासाठी सदैव खास राहील. हा चित्रपट एक सांस्कृतिक टप्पा ठरला ज्याने लोकांना दाखवून दिलं की खरं प्रेम नेहमी जिंकतं. एखादा चित्रपट जेव्हा फेनोमेनन बनतो, तेव्हा ते केवळ कथा नसते — ती भावना असते.”

ती पुढे म्हणते “आदित्य चोप्राचा दृष्टिकोन आणि संवेदनशीलता हा या चित्रपटाचा खरा आत्मा होता. परंपरा आणि आधुनिकतेतला समतोल, आणि आपल्या मनाचा आवाज ऐकण्याचं धैर्य — ही थीम्स कधीच जुन्या होत नाहीत.”

शाहरुखसोबतच्या केमिस्ट्री बद्दल काजोल म्हणाली ,“शाहरुखसोबत काम करणं नेहमीच सहज होतं. आमच्यात एक अनोखं समजून घेणं आणि विश्वास आहे. स्क्रीनवर ते इतकं नैसर्गिक वाटतं की अभिनय आणि वास्तव यांच्यातील सीमाच पुसट होते. म्हणूनच प्रेक्षकांना तो जादूई अनुभव जाणवतो.”

जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश,आवारात मंदिर आहे की नाही पाहण्याचे सहधर्मदाय आयुक्तांना निर्देश

धर्मदाय आयुक्त, मुबंई यांच्याकडे तातडीची सुनावणी : 

पुणे : मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (जैन बोर्डिंग) जागेच्या विक्रीव्यवहाराला धर्मदाय आयुक्त, मुंबई यांनी स्थगिती दिली असून पुढील आदेशापर्यंत व्यवहार जैसे थे ठेवण्याबरोबरच जैन बोर्डिंगच्या आवारात मंदिर आहे की नाही याची पाहणी करावी, असे निर्देश दिले आहेत.

पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली असा आरोप करत जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने दि. 20 रोजी  धर्मदाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे या प्रकरणाची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी याचिका ॲड. सुकौशल जिंतूरकर, ॲड. योगेश पांडे, लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन, प्रशांत बज यांनी धर्मदाय आयुक्त अमोल कलोटी यांच्याकडे दाखल केली होती. जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने ॲड. पांडे यांनी भक्कमपणे बाजू मांडली.

जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांनी शासनाची फसवणूक करून खोट्या कागदपत्रांद्वारे चुकीच्या पद्धतीने जागा विक्रीसंदर्भात धर्मदाय आयुक्तांकडून आदेश प्राप्त करून घेतला होता. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. जैन बोर्डिंगच्या जागेत मंदिर नाही, असे कागदपत्रांद्वारे दाखविण्यात आले होते, त्यावर बुलडाणा अर्बन आणि गिरेश्वर क्रेडिट सोसायटीचा बोजा चढविण्यात आला होता. त्यामुळे हे मंदिर नेमके कोणाचे याविषयीही आज सुनावणी घेण्यात आली. या व्यवहाराची राज्य सरकारच्या वतीने धर्मदाय आयुक्तांनी दखल घेतली असून त्याविषयी येत्या 28 तारखेपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश धर्मदाय सहआयुक्त पुणे यांना देण्यात आले आहेत. जागेची प्रत्यक्ष पाहणी करून मंदिर आहे की नाही हे तपासण्याचेही निर्देश दिलेले आहेत. ट्रस्टद्वारे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये, महापालिकेच्या कागदपत्रांमध्ये कुठेही मंदिराचा उल्लेख नाही. त्यामुळे हा विषय खूप गंभीर आहे, असे मत नोंदवले आहे. येत्या 28 तारखेला या विषयी सुनावणी होणार आहे, अशी माहिती ॲड. योगेश पांडे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला.. लक्ष्मीकांत खाबिया

जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. जैन समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. याची प्रचिती आजच्या घटनाक्रमावरून आली आहे. महाराष्ट्रातील जैन समाज मुख्यमंत्र्यांचे आभार मानत आहे. जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या लढ्याचा हा पहिला टप्पा आहे. भविष्यात अनेक लढाया लढायच्या आहेत. भविष्यातही मुख्यमंत्र्यांची साथ लागणार आहे, अशा भावना कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत. जमीन विक्री प्रकरणासंदर्भात मंत्री, राजकीय पक्ष यांच्याविषयी जैन समाजाला आकस नाही. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिहिर कुलकर्णी यांची या प्रकरणात मोठी मदत झाली.