Home Blog Page 337

“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकलेत”, मंत्री बावनकुळेंचं कडक वक्तव्य

“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असं खळबळजनक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. “कार्यकर्त्यांचे मोबाईल व भंडाऱ्यातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असंही ते म्हणाले. “तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील”, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “तुमचं एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. तुमच्या एका चुकीमुळे भंडारा शहराचं नुकसान होईल. तुमचं एक चुकीचं पाऊल भंडारा शहर उद्ध्वस्त करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही तर रागाच्या भरात काही लोक तमाशा उभा करतात, चुकीचं मत व्यक्त करतात. तुमचं एक चुकीचं मत व तुमच्या बंडखोरीचा पक्षाला मोठा फटका बसेल.”

बावनकुळे म्हणाले, “तुमच्या चुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे चुकीचं बटण दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. सर्वांचे मोबाईल फोन सर्वेलन्सवर टाकले आहेत. सर्व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत. कोण काय बोलतंय त्यावर लक्ष आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा भाजपाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेली त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच सरकारच्या कामाचा बट्ट्याबोळ होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं.

या कार्यक्रमाला भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयार, माजी राज्यमंत्री व आमदार परिणय फुके, माजी आमदार सुधाकर कोहळे, भंडारा जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी आमदार हेमकृष्ण कापगते भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी जिल्हा अध्यक्ष शिवराम गिऱ्हिपुंजे, माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाश बाळबुधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विवेक नखाते, भंडारा जिल्हा भाजप युवामोर्चा अध्यक्ष सचिन बोपचे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा माहेश्वरी नेवारे, अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश वासनिक, अनुसुचित जमाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक उईके, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डिम्मू शेख, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन उपस्थित होते.

नगरसेविका होण्याच्या महत्वाकांक्षेने नवऱ्याचा पत्नीने पतीचा केला गळा आवळून खून; पती होता शरद पवार गटाचा कार्यकर्ता

पुणे- शरद पवारांच्या पक्षाच्या समर्थक आणि पिंपरी चिंचवड येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याचा त्याच्या पत्नीनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नकुल भोईर असं मृत व्यक्तीचं नाव असून, तो शहरात विविध सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राजकीय कार्यक्रमात सक्रिय होता.या प्रकरणातील पत्नी चैताली भोईर या आगामी महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या इच्छुक असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, दोघांमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या वादातूनच चैतालीने ओढणीने गळा दाबून नकुलचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून चौकशी सुरू केली आहे.

ही घटना चिंचवड परिसरातील नकुल आणि चैताली यांच्या राहत्या घरी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. रात्री उशिरा नकुल आणि चैताली यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात चैतालीने घरातील ओढणीने पतीचा गळा दाबला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही वेळानंतर नकुल बेशुद्ध पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन आणि पाच वर्षांची लहान मुलं शेजारच्या खोलीत झोपलेली असताना घराच्या हॉलमध्ये हा सगळा प्रकार घडला.घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिक धक्कादायक अवस्थेत आहेत.पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, नकुल भोईर पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. या संशयावरून त्यांच्यात सतत वाद व्हायचे. चैताली ही प्रकृतीने मजबूत आणि आत्मविश्वासू स्त्री असून, तिचा स्वभावही हट्टी असल्याचे सांगितले जाते. मध्यरात्री झालेला वादही हाच मुद्दा घेऊन सुरू झाला. नकुलने पुन्हा आरोपात्मक बोलणे सुरू केले, त्यावरून संतापलेल्या चैतालीने ओढणी घेऊन नकुलचा गळा दाबला. काही क्षणांत नकुलचा श्वास थांबला. मुलं झोपेत असतानाच हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांच्या मते, ही घटना पूर्णतः कौटुंबिक रागातून घडली असून, यामागे कोणताही पूर्वनियोजित हेतू नाही. तथापि, आरोपीची चौकशी सुरू आहे .

नकुल भोईर हे पिंपरी चिंचवड परिसरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते होते. विविध समाजकारण, शिक्षण आणि नागरिकांच्या समस्यांसाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. चिंचवडगाव परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता आणि अनेकदा ते शासकीय यंत्रणांकडे नागरिकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करत असत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी त्यांचे राजकीय संबंध होते आणि अलीकडच्या काळात ते स्थानिक निवडणुकीत सक्रिय झाले होते. त्यांच्या पत्नी चैतालीनेही नगरसेवक पदासाठी तयारी सुरू केली होती. दोघांचं हे राजकीय आणि कौटुंबिक आयुष्य एकमेकांत मिसळलं होतं; मात्र, याच नात्यातून वारंवार वाद निर्माण होत होते. त्या वादांनीच अखेर भीषण वळण घेतलं आणि नकुलचा जीव घेतला.

पोलिस तपास सुरू; स्थानिकांत संताप

चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, चैताली भोईरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, वाद नेमक्या कोणत्या कारणावरून विकोपाला गेला, याची खात्री करण्यासाठी आम्ही शेजाऱ्यांची आणि नातेवाईकांचीही चौकशी करत आहोत. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय असल्याने आर्थिक कारणांवरूनही वाद होत असावेत, अशी शक्यता पोलिस तपासत आहेत.

बंगळुरूला जाणाऱ्या बसला आग, 25 प्रवासी जिवंत जळाले:एका दुचाकीची बसच्या इंधन टाकीला धडक झाल्याने आग लागली

कुर्नुल –
आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील चिन्नाटेकुरजवळ एका खासगी बसला आग लागली. या अपघातात पंचवीस प्रवासी जिवंत जाळल्याचे वृत्त आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर प्रवास करत असताना बस आणि दुचाकीची टक्कर झाली. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे बसने लगेचच पेट घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. त्यापैकी सुमारे २५ जणांना जिवंत जाळण्यात आले. पोलिसांनी सांगितले की अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते.

महापौरपद व केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रींग त्यामुळेच मोहोळांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली- धंगेकरांचा पुन्हा प्रहार

पुणे- रवींद्र धंगेकर हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करताना काही थांबताना दिसत नाहीत.जैन बोर्डिंगच्या जागे संदर्भात धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावरील आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे.एकीकडे आपल्या X म्हणजे ट्वीटर हँडलावरून त्यांनी पोस्टर बदलून केवळ सत्यमेव जयते आणि पुणेकर फर्स्ट अशा शब्दांचे नवे पोस्टर ठेवले आणि आज मध्यरात्री पुण्याचे माजी महापौर असलेल्या आणि सध्या पुण्याचे खासदार,केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवे जोरदार टीकास्त्र सोडले आहे.अद्याप पावेतो मोहोळ यांची स्पष्टीकरणे धंगेकर यांच्या टीकास्त्रांपुढे फिकी पडत असल्याचे दिसत असताना आता या नव्या टीकास्त्राने मोहोळ हे आणखी पेचात पडू शकतील अशी स्थिती आहे. महापौरपद व केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रींग चा प्रकार त्यामुळेच मोहोळांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली,बढेकर बिल्डर नावापुरतेच आहेत.बढेकर कंपनीत दमदाट्या करतच त्यांनी पार्टनरशिप मिळविली होती.महापौर असताना ते बढेकर यांचीच मोटार वापरत होते.आणि विशेष म्हणजे महापौर असताना पदाचा गैरवापर करून कोथरूड मध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्यांचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला दिले गेले.वेताळ टेकडी येथे टनेल,HCMTR रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला. तो हे सर्व ते ट्राफिक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी नाही तर गोखले,बढेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत. वेताळ टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत,यासाठी त्यांनी हा घाट घातला आहे.असाही आरोप आता धंगेकर यांनी केल्याने याची स्पष्ट उत्तरे मोहोळ देतात कि राजीनामा घेऊन त्यांचा पक्ष त्यांच्यावर ED चौकशी सुरु करतो हे पाहणे धंगेकर यांना महत्वाचे वाटते आहे.

धंगेकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये नेमके काय म्हटले आहे ते वाचा जसेच्या तसे …

पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत.परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतात. मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो,मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते.हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे.त्या गाडीचा नंबर होता Mh12 SW 0909 ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची. हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर….पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का..? साडेनऊ हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता नाही आली का..? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले..? विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत. – वेताळ टेकडी येथे टनेल,HCMTR रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी माननीय इतके अतिउत्साही आहेत की, त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला. तुम्हाला वाटेल की हे सर्व ते ट्राफिक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी करत आहेत. परंतु नाही गोखले, बढेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत. वेताळ टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत ,यासाठी त्यांनी हा घाट घातला आहे. अर्थात बिल्डर नावाला असतात हेच मालक असतात. आता हे शपथ पत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील..? याचा विचार न केलेला बरा. – या बढेकर बिल्डरचे मागच्या ५ वर्षातले बॅलन्सशीट काढले तर लक्षात येईल की यांनी किती कोटीच्या कोटी उड्डाणे सहज गाठली आहेत. अर्थात महापौरपद व केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रींग चा प्रकार या कंपनीतद्वारे केल्याचे लक्षात येईल. त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली आहे. – खरंतर या बढेकर बिल्डर सोबत पार्टनरशिप ही दमदाट्या करूनच करण्यात आली होती. अगोदर दमदाट्या केल्या.त्या बिल्डरने वैतागून गुन्हा दाखल केला आणि मग महापौरांचा मोबाईल हॅक झाल्याचा कांगावा केला. आता बढेकर कंपनीत केवळ नावाला उरले आहेत. परंतु माननीय म्हणतील की,आता मी राजीनामा दिला आहे आणि बढेकर बिल्डरचे नाव जैन बोर्डिंग प्रकरणात येणं हा निव्वळ योगायोग आहे.यांच्या अनेक प्रतापाकडे मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु ज्या दिवशी यांनी जैन मंदिराच्या विषयात अतिशय चुकीच्या पद्धतीने जागा लुटली तेव्हा मला हे प्रकरण लावून धरावं असं वाटले. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे आणि पुरावे देत असताना त्याची निपक्ष:पातीपणे चौकशी झाली पाहिजे. आपल्या देशात अनेक तपास यंत्रणा आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा तपास केला पाहिजे तर पुणेकरांची झालेली फसवणूक लुटमार लोकांच्या समोर येईल. एक गोष्ट मी निश्चितपणाने सांगू इच्छितो, या पुण्यनगरीच्या विकासात आजवर अनेक महापौरांनी योगदान दिले परंतु यात अतिशय विक्रमी भ्रष्ट कारकीर्द राहिली ती विद्यमान खासदारांची. कुठल्याही कामाचे एक वर्षाचे टेंडर देण्याची पूर्वापार पद्धत बदलत 5/10/15/20 वर्षांचे टेंडर देण्यात आले. यामुळे महापालिकेची अतिशय दुरावस्था झाली ती यांच्या काळातच. असो…… जैन बोर्डींग प्रकरणी व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ही जमीन लुटणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

दिवाळी पाडवा आणि अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बनविण्यात आला ६१० किलोचा विश्वविक्रमी मोतीचूर लाडू!

बाणेर, :दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रायकर फार्म, बाणेर येथे तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करून एक अनोखा विश्वविक्रम रचण्यात आला आहे.

हा विशाल लाडू तयार करण्यासाठी १५० किलो बेसन, ३०० किलो साखर, आणि १५० किलो तूप यांचा वापर करण्यात आला. हा लाडू “सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू” म्हणून Winners Book of World Records मध्ये अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे.

या लाडूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी Winners Book of World Records चे चेअरमन अभिनेत्री मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी या विश्वविक्रमाची घोषणा केली.

कार्यक्रमादरम्यान विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र १८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय बी.के. डॉ. दीपक हरके,प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बाणेर सेवाकेंद्राच्या संचालिका बी.के. डॉ. त्रिवेणी, आणि समृद्धी केटरर्स चे संचालक जालिंदर वाळके पाटीलयांना चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हा उपक्रम अमित शाह यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून, समाजात प्रेम, ऐक्य आणि स्नेहाचा संदेश देणारा ठरला. सदर 610 किलो लाडूचे वितरण चार अनाथ आश्रमात वितरीत करण्यात आला.

धंगेकरांवर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल- उदय सामंत

आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार:पण, कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू; उदय सामंत यांचा इशारा

मुंबई- आगामी निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये अनेक भागांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे समोर येत आहे.पुण्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे अनेक दिवसांपासून भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईक हे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत नेमके काय चित्र पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.या पार्श्वभूमीवर रवी धंगेकरांवर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल असे सांगत आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. पण, स्थानिक पातळीवर कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महायुतीत राहूनच निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांना त्रास होणार नाही. महायुतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला असेल त्यानुसारच निर्णय होतील. तसेच महायुतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांना मात्र बाजूला केले पाहिजे, अशी भूमिका सामंत यांनी मांडली आहे.

सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते व केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, रवींद्र धंगेकर यांच्या सोबत मी स्वतः बोलणार आहे. त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे. धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल. कोणी सुरुवात केली हे सर्वांना माहीत आहे, असे म्हणत सामंत यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी बालनाट्य परिषदेवर झालेल्या आरोपांवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, हा पूर्णपणे बालनाट्य परिषदेचा विषय आहे आणि ज्यांनी आरोप केले त्यांनीच आता खुलासा केला पाहिजे. तसेच संजय राऊत यांच्या राहुल गांधी पंतप्रधान वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले, राहुल गांधी पंतप्रधान होणार हे दिवास्वप्न आहे. राहुल गांधी पंतप्रधान होतील असे म्हणणे म्हणजे मी ट्रम्प झालो, असेच आहे, अशी खोचक टीका सामंत यांनी केली.

अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाल्यांचा पक्ष होत चाललाय.. मोहोळांवर टीका करताना धंगेकर यांचे वक्तव्य


पुणे- अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाल्यांचा पक्ष होत चाललाय तर पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना हे माहिती आहे त्यांना वाटतेय हे बंद झालं पाहिजे. माझा राग विकृतीवर आहे, मोहोळांवर नाही . महानगरपालिकेत टेंडरमध्ये विकृती, शासनाच्या टेंडरमध्ये ही विकृती मेट्रोच्या टेंडरमध्ये ही विकृती आहे. ह्याचा जर तपास केला तर तुम्ही हिशोब लावला तर चक्कर येईल तुम्हाला अशा वाक्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिटोला लगावला आहे.

एका वृत्तपत्राच्या डिजिटल वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धंगेकर यांनी भाजपमधील अनेक जण अशा घोटाळेबाज तथाकथित नेत्यांवर नाराज आहेत असा सूर आवळला आहे ते म्हणाले ,’ माझी सातत्याने भूमिका ही असेल की अशा विकृतीच्या विरुद्ध लढणं. आणि जे पुणेकरांच्या हिताचे पुणेकरांसाठी पोषक आहे. याच्यासाठी सातत्याने मी बोलत राहिल. गुन्हेगारी जी पुण्यात चालली आहे त्यावर बोलेल अहो सातशे टोळ्या पुणे शहरामध्ये काम करतात. आणि त्या पुणेकरांना किती त्रास देतात . आमच्या माता भगिनींचे कुंकू पुसले जातं व पादचार्‍यांना सुद्धा मारतात . त्यातच आता म्हणजे अशी पद्धत जर या पुण्यनगरीत असेल आणि असे लोक सत्तेच्या आजूबाजूला घुटमळत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही. मला वाटतं की मी काही कोणाच्या पक्षावर बोलत नाही हा सगळ्यांचा गैरसमज आहे. मी विकृती वर बोलतोय आणि पुणे शहरामध्ये ते अड्ड्यावाले गुत्त्यावाले जे एकत्र आलेत आणि ह्या पक्षाला हायजैक करून बिल्डर लॉबीच्या हातात हात घालून ज्या पद्धतीने पुणे लुटण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर बोलणे गैर नाही. आणि माझी देवेंद्र फडणीस साहेबांना विनंती आहे की जैन बोर्डींग आणि महावीरांची मंदिर ह्याच्यावर ज्या पध्दतीनं काम करून ही जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. बँक असेन, धर्मादाय आयुक्त असतील, महानगरपालिका असेल यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. ह्या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेवटी लोकशाही मध्ये लढणं हे आपलं लढणं आपल्या रक्तात आहे.
त्यांचाही पक्षातील अनेकांना वाटतंय की हे धंगेकर बोलतायत ते बरोबर आहे.पण ते बोलत नाही. त्यांना माहितीये की अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाल्यांचा पक्ष होत चाललाय तर हे बंद झाले पाहिजे. मी ही त्यांच्या मताचा आहे. फक्त ते बोलत नाही एवढंच .
मी टीकेला घाबरत नाही. पण जर महावीरांचे देऊळ जर गहाण ठेवलं असेल तर मी बोलायचा नाही का? कोणी जर जगातला असा माणूस आला आणि म्हणला महावीरांचे देऊळ गहाण ठेवलं ,हे तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे तर मी माझं तोंड तातडीने बंद करे,न कुठलाही भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता येऊ द्यात आणि सांगू द्यात . फक्त त्यांनी सांगितलं पाहिजे.
अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाले पुणेकरांना लुटत आहेत. दिवसाढवळ्या दरोडे टाकताहेत हे काही एक प्रकरण नाही. अनेक प्रकरणे आहेत याच्यावर मी बोलणार आहे. पण ही अनेक प्रकरणे आहेत. कालच एका जैन समाजाच्या एका व्यापार्‍याने टाकलं की माझं दोन हजार वीस साली माझे बांधकाम बंद पाडले. काहीच चूक नसताना बंद पाडले तो किती तळमळत असेल. हे लोक तळमळत आहेत. जिथं बघावं तिथं ही हीच विकृती. महानगरपालीका टेंडर मध्ये ही विकृती. शासनाच्या टेंडर मध्ये ही विकृती मेट्रोच्या टेंडर मध्ये ही विकृती . यांचा जर तपास केला तर तुम्ही चक्कर येऊन पडाल. जिथे जाल तिथे लुटायचे आणि खायचं लुटायचे आणि खायचे लुटायचे आणि यांच्या या पद्धतीवर जर बोललो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करेल का?
अहो जैन समाजाच्या ट्रस्टच्या जागेचे ज्या पद्धतीने हे सगळ मॅनेज झालेलं टेंडर आहे त्याच्यामध्ये बडेकर बिल्डर कसा काय आला? योगायोगाने आला ? मेरीट कम्पनी योगायोगाने आली? आयुक्त महानगरपालीका योगायोगाने आलेत? अहो हे सगळे ठरून आले. रेशनकार्ड काढायला दोन वर्ष लागतात यांना. आपण दहा दिवसात सगळं प्लॅन पास सगळं लोन बिन पास . आता लोन कसं काय दिलं? ह्या बँकेची चौकशी केली पाहिजेच . सत्तर सत्तर कोटी एका दिवसात देणार कुठली बँक?
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास आहे . चुकीच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांना पुरवण्याची काही एक टीम ही माझ्या मागे लागली तर ह्यात खरे काय नाय. शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे. ते कार्यकर्त्याच्या पाठिशी राहतील. कुठल्याही पद्धतीची त्यांनी मला नोटीस दिलेली नाही किंवा कुठला फोन नाही. मी जर चुकीचं वाटलो, मला कुणी सांगावं? माझ्या नेत्याने सांगितलं तर प्रश्नच नाही.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझी तक्रार केली पाहिजे. पण त्या विकृतीने नाही . प्रदीप रावत यांनी माझ्यावर तक्रार केली पाहिजे. कारण त्यांनी स्वच्छ मनाचे खासदार अशी त्यांची प्रतिमा मी पाहिली आहे. अत्यंत प्रामाणिक अशा लोकांनी केली तक्रार तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस ऐकतील. पण जे अड्ड्यावाले गुत्त्या वाले तक्रार करत असतील तर .. तर देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. ते काय त्यांची दखल घेतील असं मला वाटत नाही.

लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे शिवसेना उभी राहते. माझं चुकीचं असेल तर मला भाजपच्या कुठल्याही लोकांनी येऊन सांगायचं माझं चुकलं. पण माझी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आमचा महावीर तुम्ही गहाण ठेवलाय. आमचं जैन बोर्डिंग युवक जे गोरगरीब युवक महाराष्ट्रात येऊन शिकतात, मोठी जातात. विद्येचं माहेरघर अनेक संस्था या पुणे शहरात आहेत. जगामधील विद्यार्थी इथे येऊन शिकायला येतात. तुम्ही त्यांच्यावर संस्कार करताय. थोडी जनाची नाही मनाची. तुम्हाला लोकप्रतिनिधी केलंय.

आमची भूमिका आहे की जैन ट्रस्टच्या जागेचा हा सगळा प्रोजेक्ट शासनाने हातात घेतला पाहिजे. ह्याच्यामध्ये भगवान महावीरांचे देऊळ दिमाखदारपणे बांधलं पाहिजे. हजारो विद्यार्थ्यांना तिथे शिकण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याचा सगळा खर्च शासनाने करावा. आणि जैन धर्माच्या लोकांच्या हातात ते द्यावं. योग्य लोकांच्या हातात देऊन तो दिमाखदारपणे ते उभं रहावं.

मी सांगतो, मी परत एकदा म्हणालो की प्रदीप रावत सारखे नेते आहेत. विजय काळे सारखे नेते आहेत. त्यांनी जर मला बोलवलं. त्यांनी नुसता फोन केला तर त्यांच्या दारात मी स्वतः जाऊन उभा राहील. पण मला ती विकृती वाल्यांनी बोलावलं तर मी कसा जाईन?
विकृतीवाल्याला फोन करायचा कसा? मला विजय काळेंनी केला पाहिजे. तेव्हा आमचे नेते प्रदीप रावत, अनिल शिरोळे यांनी बोलावलं तरी जाणार मी, अहो यांनी मोठी कामं केलीत. अनिल शिरोळे साहेबांना मी जवळून बघितलं. महानगरपालिकेत ज्या ज्या वेळेला त्यांना जर चुकीचं वाटत होतं तर पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका मांडताना मी त्यांना पाहिलंय. त्यांनी आणि रावत यांनी पक्षाच्या बाजू न पाहता जनतेच्या बाजूने शहराच्या हिताचे काम केलं. त्यांनी बोलावलं तर नक्कीच जाईन. पण मला कुणी एखाद्या घोटाळेबाजाने बोलावलं तर मी कसा जाईन?असेही धंगेकर यांनी म्हणत पुन्हा पुन्हा दंड थोपटणे सुरूच ठेवले आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे दिवाळीचे ३ दिवस सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत.

हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम, कपड्यांचे वाटप व आरोग्य कॅम्पचे आयोजन.

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे २६ वर्षांपासूनचे व्रत.

मुंबई, दि. २३ ऑक्टोबर..

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नसून माणसांमधील नाळ अधिक घट्ट करणारा उत्सव आहे. दिवाळीचे तीन दिवस हर्षवर्धन सपकाळ यांनी सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा, चालीस टपरी, गोमाल या गावांतील गावकऱ्यांसोबत साजरे केले. दरवर्षी या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे त्यांचे हे मागील २६ वर्षांपासूनचे व्रत आहे..

आदिवासींसोबत दिवाळी साजरी करण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “हा गोमाळ परिसर माझ्यासाठी केवळ एक भूभाग नाही; माझे येथे सखोल ऋणानुबंध आहेत. येथील लोक माझे केवळ आप्तजन नाहीत, तर ते माझे स्वकीय, माझे कुटुंब आहेत. या सर्वांशी माझे अतूट आणि दृढ नाते जोडले गेले आहे. गेल्या २६ वर्षांपासून मी एक व्रत जपले आहे. माझ्या क्षमतेनुसार, माझ्या कुवतीनुसार माझ्याजवळ असलेला प्रकाश घेऊन, जिथे अंधार आहे तिथे पोहोचण्याचे. दिवाळी म्हणजे प्रकाशाची आराधना, आणि माझा हाच प्रयत्न असतो की माझी संपूर्ण शक्ती पणाला लावून हा प्रकाश येथे आणावा, अंधाराचे रूपांतर प्रकाशात करावे. ही परंपरा अखंड ठेवत, यावर्षी मी सलग २७ वे वर्ष येथील आदिवासी बांधवांच्या वस्त्यांमध्ये आणि गावांमध्ये दिवाळी साजरी करत आहे. आमची ही पद्धत केवळ सणापुरती मर्यादित नसून, मिष्टान्न वाटपाबरोबरच सामुदायिक भोजन, ग्रामसभा आयोजन, वैद्यकीय शिबिरे आणि वस्त्रवाटप हे या उत्सवाचे अविभाज्य घटक आहेत.हे कोणतेही बाहेरून येऊन केलेले औपचारिक सोहळे नाहीत. जसे आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो, तसेच हे माझे कुटुंब आहे आणि आम्ही सर्व मिळून हा प्रकाशाचा सण एकत्रितपणे साजरा करतो”, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

सातपुडा पर्वतरांग ही मध्य भारतातील एक विस्तृत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशी पर्वतरांग आहे. या पर्वतरांगांमध्ये अनेक आदिवासी जमातींचे पारंपरिकरीत्या वास्तव्य आहे. या समाजांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. ते पर्वत, वने, झरे, शेती व निसर्गाला जिवंत देवता मानून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करतात. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचेही या आदिवासी बांधवांशी अतूट नाते निर्माण झाले आहे. प्रत्येक दिवाळीला हे नाते अधिक घट्ट होत आहे. येथे जाण्यास रस्ताही नसल्याने गावात पोहोचणे मोठे दिव्य ठरले मात्र आदिवासी बांधवांसाठी दिवाळीनिमित्त नवीन कपडे, जीवनावश्यक साहित्य आणि औषधे घेऊन जाण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागला. पाऊस पडल्यामुळे ट्रॅक्टर फसले तरी स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांनी आदिवासींसोबतची दिवाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली.

एक माणूस पुण्याच्या राजकीय संस्कृतीची वाट लावतोय, मिडीयाने सावध राहावं- केंद्रीय मंत्री मोहोळांची सूचना

पुणे-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग भूखंड विक्री प्रकरणात आपल्यावर होणारे आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत. तसेच रवींद्र धंगेकर वगळता इतर कोणताही व्यक्ती माझ्यावर आरोप करत नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात माझ्यावर आरोप करणारा एकच माणूस आहे. कदाचित त्यांना चावी देणारा माणूस दुसरा कुणीतरी असेल, असे ते म्हणाले. पुण्यातील जैन बोर्डिंग वसतिगृहाची जागा शिवाजीनगर येथे आहे. ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समुदायाने केला आहे. या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी हा विषय लावून धरत मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी मोहोळ यांनी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी केलेली एक व्हिडिओ जाहिरातही पोस्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी पुढे येत या प्रकरणाचा आपल्याशी कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.

मुरलीधर मोहोळ गुरूवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी यापूर्वीच माझी बाजू स्पष्ट केली आहे. सध्या माझ्यावर आरोप करणारा माणूस एकच आहे. मी त्याच्यावर बोलणे सोडून दिले आहे. हा व्यक्ती उठसूठ माझ्यावर आरोप करतो. या लोकांमुळे शहराचे वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे पत्रकारांनी प्रथम त्यांचे कागद तपासावेत. त्यानंतर त्यांच्या मुलाखती चालवाव्यात. मी वैफल्यग्रस्त माणसांकडून काहीही अपेक्षा करत नाही. मी पुन्हा त्यावर बोलणार नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रवींद्र धंगेकरांना भाजपचेच काही लोक रसद पुरवत असल्याचा आरोप केला आहे. पत्रकारांनी याविषयी मोहोळ यांना विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात. त्यांना किती सीरियस घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. मला पुन्हा – पुन्हा या प्रकरणात आपली बाजू स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही. विशाल गोखले (गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा) हा माझा मित्र होता, आहे व पुढेही राहील. त्यात बदल होणार नाही. पण त्यांनी (रवींद्र धंगेकर) 5 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ काढून मी त्यांची जाहिरात करत असल्याचा आरोप केला. तुम्ही जैन बोर्डिंग प्रकरणातील सत्यता तपासा. पडताळून पाहा. तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात येईल. पण आत्ता त्यांचाही एक व्हिडिओ समोर आला आीहे. मग त्यांच्यावरही ते त्या व्यवसायात पार्टनर असल्याचा आरोप करावा का? मला असे वाटते की, आपण त्यात पडू नये. या शहराचे नाव खराब होऊ नये. कारण, या शहराची एक राजकीय संस्कृती आहे. कुठेतरी एक माणूस या राजकीय संस्कृतीची वाट लावत आहे. या प्रकरणी सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. मोहोळ पुढे म्हणाले, बाणेर, बालेवाडीतील काही शेतकरी 5 वर्षांपूर्वी माझ्याकडे आले होते. त्यांनी माझ्याकडे या बिल्डरने खोटी मोजणी करून प्लॅन मंजूर केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मी त्याची माहिती काढली. तेव्हा प्रशासनाने त्यापूर्वीच त्याला स्टे दिल्याचे निष्पन्न झाले. हे काम महापालिकेचे आहे. आज मी महापालिकेत नाही. मी महापालिका सोडून 5 वर्षे झाली. त्यानंतर 3 वर्षे मी लोकप्रतिनिधीही नव्हतो. त्यानंतर वर्ष दीड वर्षांनी मी पुन्हा लोकप्रतिनिधी झालो. या प्रकरणाचे उत्तर महापालिका प्रशासन देईल. पण कुणीही उठायचे आणि काहीही आरोप करायचे हे बरोबर नाही. कदाचित यामागे चावी देणारे दुसरे कुणीतरी असेल. मी त्याकडे लक्ष देत नाही, असे ते म्हणाले. स्थानिकच्या निवडणुकीत वरिष्ठ जे सांगतील तेच होईल मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन होणार असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, आमची राज्यपातळीवर महायुती आहे. आम्ही अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना सर्वजण एकत्र आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचे नेते जो आदेश देतील त्याचे पालन आम्ही करू. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. उद्या पुण्यातही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा विचार आला तर आमच्या कोर्टात बॉल येईल. पण आता तरी राज्याचे नेते सांगतील तेच त्यामध्ये होईल.

बिहारमधील तीन गुन्हेगारांचे दिल्लीत एन्काउंटर: सिग्मा अँड कंपनी गँगचा म्होरक्या रंजन पाठकही ठार

दिल्ली-येथे झालेल्या चकमकीत चार गुन्हेगार ठार झाले. त्यापैकी तीन जण बिहारमधील सीतामढी येथील रहिवासी होते. ही कारवाई दिल्ली गुन्हे शाखा आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.ठार झालेले कुख्यात गुन्हेगार बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये दहशत पसरवण्याचा कट रचत होते, असे पोलीस सांगत आहे.बुधवारी रात्री २:२० च्या सुमारास ही चकमक झाली. डॉ. आंबेडकर चौक ते पानसाळी चौक या बहादूर शाह रोडवर ही चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये जोरदार गोळीबार झाला.

या चकमकीत रंजन पाठक (२५), बिमलेश महतो उर्फ ​​बिमलेश साहनी (२५), मनीष पाठक (३३) आणि अमन ठाकूर (२१) यांना गोळ्या लागल्या. सर्वांना रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात आणण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.रंजन पाठक (25), बिमलेश महतो उर्फ ​​बिमलेश साहनी (25), मनीष पाठक हे बिहारमधील सीतामढी येथील रहिवासी आहेत, तर अमन ठाकूर (21) हे दिल्लीचे रहिवासी होते.असे म्हटले जाते की पोलिस बऱ्याच काळापासून या चार गुन्हेगारांचा शोध घेत होते. ही टोळी “सिग्मा अँड कंपनी” या नावाने गुन्हे करत असे. रंजन पाठक हा या टोळीचा प्रमुख होता.त्यांचे नेटवर्क बिहारपासून नेपाळपर्यंत पसरले होते. रंजन पाठकने सीतामढीमध्ये अनेक गुन्हे केले होते.सीतामढीतील व्यावसायिकाच्या हत्येनंतर रंजन पाठक यांनी त्यांचा बायोडेटा माध्यमांना पाठवला होता.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी प्रथम गोळीबार सुरू केला, त्यानंतर पोलिसांना प्रत्युत्तर द्यावे लागले.

दिल्ली -मुंबईत दिवाळीत प्रदूषणाचा कहर -: दिल्ली AQI 353, आनंद विहारमध्ये AQI 500च्या पुढे; लोकांना घरातच राहण्याचा सल्ला

नवी दिल्ली-

दिवाळीपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावली आहे. गुरुवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता “खूपच खराब” राहिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) वेबसाइटनुसार, सकाळी ६ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३५३ नोंदवण्यात आला, ज्यामध्ये अनेक भाग “रेड झोन” मध्ये आहेत.अक्षरधाम मंदिराजवळील रस्त्यांवर दृश्यमानता कमी होती. सकाळी येथील बहुतेक भाग धुराने झाकलेले होते. दिल्लीतील बहुतेक भागात AQI 300 ते 400 पर्यंत होता, म्हणजेच हवेची गुणवत्ता “खूपच खराब” ते “गंभीर” होती.दिवाळीच्या काळात झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. सध्या मुंबई शहरभर धूरकट वातावरण असून, सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 133 वर, म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत असला तरी, अनेक महत्त्वाच्या ठिकाणी तो नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘घातक’ पातळीवर पोहोचला आहे. यामुळे दृश्यमानता कमी झाली असून, मुंबईकरांना श्वसनाचे त्रास जाणवत आहेत.मुंबईत सध्या हवामान धूसर, दृश्यमानता कमी आणि हवा प्रदूषित असल्याने तज्ज्ञांनी नागरिकांना गरज असल्याशिवाय बाहेर न पडण्याचा, मास्क वापरण्याचा आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

दिल्लीत आनंद विहारमध्ये सर्वात वाईट परिस्थिती होती, जिथे सकाळी ५:३० वाजता AQI ५११ वर पोहोचला. आरोग्य तज्ञांनी दिल्ली-एनसीआरमध्ये AQI मध्यम पातळीवर परत येईपर्यंत बाह्य क्रियाकलाप मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आठ महानगरांमध्ये दिल्लीमध्ये सर्वात वाईट AQI होता.

बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये सकाळी AQI ७० पेक्षा कमी नोंदवले गेले, तर अहमदाबाद आणि मुंबईमध्ये सकाळी ११० AQI नोंदवले गेले. दरम्यान, दिल्लीमध्ये कृत्रिम पावसाची चाचणी पुन्हा एकदा थांबली आहे. जुलैमध्ये सुरू होणारा हा प्रयोग अद्याप झालेला नाही कारण हवामान खात्याने (IMD) आवश्यक ढगाळ वातावरण नसल्याचे म्हटले आहे.

दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की ढग दिसू लागताच चाचणी ताबडतोब सुरू होईल. सर्व मंजुरी, निधी आणि विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, मुंबईतील काही भागांमध्ये प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती भायखळा येथे असून, तेथे AQI 213 नोंदवला गेला, जो ‘गंभीर’ हवेची गुणवत्ता दर्शवतो. याव्यतिरिक्त, सिद्धार्थ नगर-वरळी (204), वांद्रे हिल रोड (191), चेंबूर (187) आणि देवनार (187) यांसारख्या ठिकाणीही उच्च पातळीचे प्रदूषण नोंदवले गेले आहे. याचा अर्थ शहरातील बहुतांश नागरिक दूषित हवेत श्वास घेत आहेत.
प्रदूषणामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांना अधिक त्रास होत आहे. अनेक ठिकाणी AQI 200 च्या पुढे गेल्याने लोकांना घसा खवखवणे, डोळ्यांत जळजळ, श्वास घेण्यात अडचण अशा समस्या जाणवत आहेत. निरोगी व्यक्तींनाही हवेतील धूर आणि धूळकणांमुळे अस्वस्थता निर्माण होत आहे.

या वाढत्या प्रदूषणामागे अनेक घटक जबाबदार आहेत. शहरात हिवाळ्याची सुरुवात झाल्यामुळे वाऱ्याचा वेग कमी असल्याने प्रदूषक कण हवेत स्थिर राहतात. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात सुरु असलेली बांधकाम आणि वाहतुकीमुळे धूळ व धूर वाढतो. याशिवाय दिवाळी उत्सवाच्या काळात झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे.

१५ ऑक्टोबर रोजी, दिवाळीपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये हिरव्या फटाक्यांची विक्री आणि फोडणी करण्यास परवानगी दिली. न्यायालयाने सांगितले की या चार दिवसांत, लोकांना सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत एकूण तीन तासांसाठीच हिरवे फटाके फोडण्याची परवानगी असेल.

तथापि, दिवाळीच्या दिवशी दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. दिवाळी आणि त्यानंतरच्या दिवशी लोकांनी फटाके फोडले. यामुळे गुरुवारी सकाळी दिल्लीत दाट धुराचे साम्राज्य निर्माण झाले. रात्रभर जोरदार फटाके फोडल्यानंतर हवेची गुणवत्ता रेड झोनमध्ये घसरली.
GRAP चे टप्पे जाणून घ्या

पहिला टप्पा ‘खराब’ (AQI २०१-३००)
दुसरा टप्पा ‘खूपच खराब’ (AQI 301-400)
तिसरा टप्पा ‘गंभीर’ (AQI ४०१-४५०)
चौथा टप्पा ‘गंभीर प्लस’ (AQI >४५०)
GRAP-I लागू, N95 किंवा डबल सर्जिकल मास्कची शिफारस

जेव्हा AQI २०० ते ३०० च्या दरम्यान असतो तेव्हा GRAP-I सक्रिय होतो. या अंतर्गत, NCR मधील सर्व संबंधित एजन्सींना २७ प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते.

यामध्ये अँटी-स्मॉग गनचा वापर, पाणी शिंपडणे, रस्ते बांधकामात धूळ नियंत्रण, दुरुस्ती प्रकल्प आणि देखभाल उपक्रमांचा समावेश आहे.

गाझियाबाद येथील फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. शरद जोशी यांनी सर्वांना संरक्षणासाठी बाहेरच्या क्रियाकलापांमध्ये N95 किंवा डबल सर्जिकल मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

पुण्यातला संघर्ष मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून भाजपमधील एक गट विरुद्ध मोहोळ असा- संजय राऊत

धंगेकरांच्यामागे भाजप सरकारमधील बडा नेता:

लक्षात ठेवा, आमच्या शिवसेनेचा पराभव म्हणजे मराठी माणसाचा पराभव-

मुंबई-मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी महायुतीचे तिघे एकत्र आले आहेत. या सर्वांचे लक्ष मुंबई आहे. बाकी इतरत्र ते एकत्र नाही. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवणे म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणे त्याविषयी त्यांचे एकमत आहे. बाळासाहेबांचा मुंबई मनपा वरील भगवा काढण्यासाठी हे तिघे एकत्र आहेत, इतर ठिकाणी ते एकत्र नाहीत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत म्हणाले की,पुण्यात भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आला आहे.मोहोळ विरुद्ध धंगेकर असे नसून भाजपमधील एक गट मोहोळाविरोधात आहे. धंगेकर हा मोहरा आहे, त्यांच्या मागे असणारे त्यांच्याच सरकारमध्ये बसलेले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, अमित शहा आणि त्यांच्या बेनामी कंपन्या हे मुंबई अदानींना देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2029 पर्यत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहतील का? 2029 पर्यत मोदी प्रधानमंत्री पदी राहु शकले तरच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहू शकतील. केंद्रात भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकारणात बहुमत हे चंचल असते. महाराष्ट्रातील बहुमत हे खूप चंचल आहे. देवेंद्र फडणवीसांना अजित पवार, एकनाथ शिंदेंचा गट फोडायचा आहे. त्यांना स्वयंभू राजकारण करायचे आहे. येणाऱ्या काळात दिल्ली अस्थिर होणार आहे. फडणवीस शिंदेंचा बंदोबस्त करण्यास सक्षम आहे.

संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा इंडिया आणि महा विकास आघाडीतील मित्रपक्ष आहे. या दोन्ही आघाड्या या एकाच पक्षामुळे अस्तित्वात नाही. काँग्रेससोबत आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत म्हणून महा विकास आघाडी आणि इंडिया आघाडी निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जर कुणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्रपक्षांना आणि सहकाऱ्यांना अडचणीत आणणारे कोणतेही विधान करणार नाही. राज ठाकरे हे मनसेप्रमुख आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यामुळे जर कुणी ही भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अदानींच्या धशात जाऊ द्यायची नाही ती वाचवायची आहे. या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्यामध्ये अशा प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले होते. हा इतिहास काँग्रेसच्या नेत्यांनी समजून घेणं गरजेचे आहे. मुंबईसाठी सर्व मतभेद विसरत सर्व पक्ष एकत्र आले होते, त्या प्रमाणे पुन्हा एकदा तसे वातावरण निर्माण झाले आहे. बिहारमध्ये राज ठाकरे आहे का? तिथे राजद आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. हे ही नको ते ही नको असे वाक्य एक दिवसाच्या प्रसिद्धीसाठी असतात असे म्हणत राऊतांनी भाई जगताप यांना टोला लगावला आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे ती मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे त्यासाठी काँग्रेसमधील मराठी नेतृत्वाने मुंबईवरील संकटाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्हाला बोलायचे असेल तर आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू. लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, आम्हाला काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता. पण नाही होऊ शकला ना? आम्ही इंडिया आघाडी केली कारण आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे होते. आम्ही कधी असे म्हंटलो नाही की शिवसेनेचा किंवा इतर पक्षाचा पंतप्रधान करायचा आहे. काँग्रेस दिल्लीतील सर्वात मोठा पक्ष आहेच, त्यामुळे आमचे मन फार मोठे आहे, आम्हाला राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. तुम्ही मुंबई महापौरांचे काय घेऊन बसलात.27 मनपामध्ये तुम्ही काँग्रेसचे महापौर करा. भाजपला रोखणे आणि मराठी महापौर होणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत. यापूर्वी 30 वर्षे मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर आहे त्यांचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल यात एकदा काँग्रेसने आम्हाला मदत केली हे देखील विसरता येणार नाही. त्यामुळे मुंबईतील काँग्रेसचे नेते काय बोलतात हे महत्त्वाचे नाही. आतापर्यंत काँग्रेस आमच्यासोबत पूर्णपणे सामील झालेला आहे. वेगळा होण्याचा काही मुद्दा चर्चेला गेलेला नाही. समाजवादी पार्टीला त्यांची फार ताकद आहे असे वाटत असेल किंवा भाजपला मदत करण्याची त्यांची इच्छा असेल पण जनता आमच्यासोबत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड,ठाणे भाजपा स्वबळावर तर मुंबईत मात्र महायुती एकत्र लढेल- फडणवीस

पुण्यात फुटणार होते सुमारे २५ नगरसेवक,ते फुटू नये म्हणून स्वबळावर …

मुंबई- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वीच पुण्यासारख्या शहरात नेत्यांच्या विरोधात असलेल्या वातावरणामुळे सुमारे २५ नगरसेवक कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस यांनी मोजक्या पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, भाजप मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिथे महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत, तिथे आम्ही वेगळे लढू. मात्र, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. “मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजप स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू. मुंबईत एकत्र, पण राज्यात म्हणजेच इतर महापालिकांमध्ये वेगळे लढून निकालानंतर एकत्र येऊ.दरम्यान ठाणे महापालिकेत शिंदे गटाची ताकद मोठी आहे तिथे भाजपा नेमकी काय भूमिका कशा पद्धतीने राबविणार याकडे लक्ष लागून राहणार आहे .

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत. हे दोन्ही बंधू एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कुठलीही जोखीम न घेता, मुंबई महापालिकेत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा भाजपचा विचार आहे. फडणवीस यांनी यावेळी मुंबई महापालिकेवर युतीचाच महापौर असेल, असा विश्वास व्यक्त केला.मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कसा फायदा झाला, याचे पुरावे देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यावरही त्यांनी यावेळी स्पष्ट भाष्य केले. “सध्या तरी मी वर्षावरच राहणार आहे. दिल्लीत जाण्याबाबत 2029 नंतर बघू,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दुसरीकडे, ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे मोठे वर्चस्व असल्याने युती झाल्यास संभाव्य राजकीय नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेच्या फुटीनंतरही एका नगरसेवकाचा अपवाद वगळता सर्व नगरसेवक शिंदे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेत शिंदे गटाची ताकद मोठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जर महायुतीअंतर्गत निवडणूक लढवली गेली, तर काही जागा भाजपसाठी सोडाव्या लागतील. याचा थेट फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कारण, शिंदे यांच्यासोबतच्या आजी-माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात तयारी सुरू केली आहे. जागावाटपात त्यांची जागा भाजपकडे गेल्यास, या इच्छुकांच्या मनात नाराजी निर्माण होऊ शकते.

या नाराजीतून उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाकडे परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही राजकीय जोखीम टाळण्यासाठी आणि ठाण्यातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी, युती आणि जागावाटपाचा निर्णय पूर्णपणे एकनाथ शिंदे यांनीच घ्यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय महायुतीत झाल्याची माहिती आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत आता श्रीनाथ भिमाले यांच्यावरही आता जैन विरोधी असल्याचा आरोप

व्हिडीओ प्रसारित होताच मोहोळ समर्थक चाहते अभिनेते खवळले आणि सुरु झाले कमेंट वॉर

पुणे- जैन होस्टेल आणि जैन मंदिर जमीन खरेदीचा वाद जैन मुनी आणि समाजाच्या मोर्चाने सामाजिक विषय बनविलेला असताना आता त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि महापालिकेतील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव घेत,ज्यांनी भाजपाला भरभरून मते दिली त्या जैन समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, यांनी जैन समाजाला त्रास दिला असा स्पष्ट आरोप करणारा व्हिडीओ जैन समाजातील ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि बांधकाम व्यावसायिक निलेश नवलाखा यांनी काल सोशल मिडीयात प्रसारित केला आहे. यामुळे भाजपच्या वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.एकामागे एक आता ‘व्हिक्टिम’ पुढे येतात कि काय ? असे वातावरण निर्माण होऊ पाहते आहे. कृतघ्न नेते म्हणत याचा धडा त्यांना शिकवावाच असेही या व्हिडीओत नवलाखा यांनी म्हटले आहे. तथापि मराठी चित्रपट सृष्टीतील कोथरूडच्या एका अभिनेता असलेल्या त्यांच्या चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट बॉक्स मधून जोरदार प्रहार करत मोहोळ हे आपले मित्र असल्याचे सांगत त्यांची बाजू मांडायला काल सुरुवात केली.नवलाखा यांच्यावर बेकायदा बांधकामे आणि शेतकऱ्यांना फसविल्याचे आरोप काहींनी केले आहेत तसेच काहींनी नवलाखा यांना ट्रोल करण्याचे काम ही कमेंट पाहता दिसून आले.दरम्यान यावरही नवलाखा यांनी संबधित अभिनेत्याला मोहोळ यांचे लाळघोटे म्हणत धमक्या देणे बंद करा,ढोस देऊ नका,जैन आहोत म्हणून घाबरणार नाही असेही सुनावले आहे. तर नंतर पुन्हा याच व्हिडीओ रीपोस्ट करत यावरून थेट नवलाखा यांनी मुरलीधर मोहोळ यांनाच उद्देशून असे म्हटले आहे कि,’ माझ्या ह्या पोस्टवर खासदार मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते मला जेल मधे टाकण्याची धमकी देत आहेत,माझ्यावर defamation चा गुन्हा नोंदवण्याची भाषा करत आहेत. जर Murlidhar Mohol यांना अशी भाषा आणि जैन समाजाच्या एका व्यक्तीला आणि मराठी चित्रपट निर्मात्याला ज्यांनी एक नाही मराठी सिनेमा चे तीन राष्ट्रीय पारितोषिक मराठी सिनेमा साठी घेतले आहे अशा माणसाला जर तुमचे लोकं धमकावत असतील तर तुम्हीच हे कृत्य करायला लावले आहे असे समजण्यात येईल नाहीतर त्वरित तुमच्या लोकांना समज द्या आणि ढोस धमक्या बंद करा.

काय म्हटले आहे नवलाखा यांनी या व्हिडीओत ते वाचा जसेच्या तसे….
नमस्कार जय नरेंद्र मी निलेश नवलाखा आपल्याला माहीतच आहे की मी चित्रपट निर्माता आहे, अॅक्टीव्हिस्ट आहे आणि बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहे. मी आज आपल्या बरोबर बोलतो आहे तो जैन हॉस्टेल या विषयावर आणि खास करून त्यात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव आल्या मुळे मी तुमच्या बरोबर हा संवाद साधतो आहे. त्याचं कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कुत्याचा एक व्हिक्टिम आहे.२०२० साली पुण्याचे महापौर असताना माझं कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला. आज दोन हजार पंचवीस आहे. तरीसुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे. त्यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले आहे. पण मला अस वाटलं की हा एक अपवाद असेल. निलेश नवलाखा किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते. पण जेव्हा हे जैन हॉस्टेल चा विषय रवींद्र धंगेकर यांनी मांडला आणि उचलून धरला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुरलीधर मोहोळ हे कदाचित Habitual offender आहेत की काय? कारण जैन हॉस्टेल मध्ये जमिनीचा व्यवहार केला. तो एक भाग आहे. परंतु सर्वात जास्त लज्जास्पद गोष्ट ही आहे की तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा गहाण ठेवलं व्यवसायासाठी. असा निर्लज्जपणाचा कळस याआधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता.कुठल्याही खासदारांनी केला नव्हता. त्यामुळे मला असं वाटलं की यावर मी पण माझं मत व्यक्त करावं. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय योग्य कायदेशीर व बरोबर आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना उत्तर देताना श्रीनाथ भिमाले यांनी अतिशय खालच्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर जी काही भाषेचा वापर केला तो अतिशय चुकीचा व निषेधार्ह आहे. आपल्याला माहीतच आहे, जे श्रीनाथ भिमाले आहेत त्यांनी काय काय प्रताप सॅलिसबरी पार्क मध्ये केले आहे. किती जैनांना त्रास तिथे दिला आहे? किती त्यांचे शेकडो तक्रारी तुम्हाला ऐकायला मिळतात. मिळत नाही. परंतु ते भाजपचे नेते आहेत. मुरलीधर मोहोळ सुद्धा हे भाजपचे नेते आहेत. आज कुणीही त्यांना काही बोललं की ते देशद्रोही होतात. त्यांच्यावर आरोप लावले जातात. त्यांना त्रास दिला जातो. लोक बोलत नाही. पण मला असं वाटलं या प्रकरणात मी बोललं पाहिजे. जे काही मुद्दे आहेत. रवींद्र धंगेकरांनी मांडलेल्या आहेत. माझे त्याला समर्थन आहे आणि जे काही गोष्टी या भाजपच्या नेत्यांनी हितं चालू आहे त्या भाजपला जैन समाजाने भरभरुन मतदान केलं आहे. ते मला जिथे राहतात सॅलिसबरी पार्क असो किंवा पर्वती असो किंवा पुणे असो, पर्वती मध्ये एक लाख जैन लोक राहतात आणि भरभरून मते यांना देतात.मला असं वाटतं की भाजपचे काही नेते कृतघ्न झालेले आहेत आणि त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे आणि याचा धडा त्यांना शिकवावा लागेल. माझे समर्थन रवी धंगेकरांना आहे आणि मी मुरली मोहोळ असो. भिमाले असो. यांचा निषेध करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.

१३ हजार ८५० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीसाठी आर्थर रोड कारागृहात बराक सज्ज

मुंबई
१३ हजार ८५० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी उद्योगपती मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाचे अधिकृत फोटो बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहेत. याद्वारे, चोक्सीला त्याच्या प्रत्यार्पणानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवल्यावर कोणत्या सुविधा मिळतील हे सांगण्यात आले.

बुधवारी झालेल्या सुनावणीत बेल्जियमच्या न्यायालयाने चोक्सीविरुद्ध दाखल केलेले गुन्हे भारत आणि बेल्जियम या दोन्ही देशांच्या कायद्यांनुसार प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर, मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते असे म्हटले जात आहे.

खरं तर, बेल्जियममधील अँटवर्प येथील न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. भारतीय एजन्सींच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोक्सीची केलेली अटक कायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले.

मेहुलच्या सेलमध्ये ६ ट्यूबलाईट्स आणि ३ पंखे .
चोक्सीच्या सेलमध्ये एक टीव्ही आणि नैसर्गिक प्रकाशासाठी तीन खिडक्या.या कक्षात एक संलग्न शौचालय .संलग्न शौचालयात सर्व सुविधा पुरविल्या आहेत
.बाथरूमसह दोन खोल्या आहेत.चोक्सीला वैद्यकीय तपासणी आणि हजेरीसाठी तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी असेल.
त्याची कोठडी कोणत्याही तपास संस्थेकडे नाही, तर न्यायालयीन देखरेखीखाली असेल.

फोटोंमध्ये ४६ चौरस मीटरचा बराकदाखवण्यात आला आहे ज्यामध्ये दोन सेल (खोल्या) आहेत, प्रत्येकी एक खाजगी शौचालय आणि मूलभूत सुविधांनी सुसज्ज आहेत. हे फोटो चोक्सीच्या भारतीय तुरुंगांमध्ये गर्दी आणि असुरक्षितता असल्याच्या दाव्याला भारताच्या अधिकृत प्रतिसाद म्हणून पाठवण्यात आले आहेत.कागदपत्रांनुसार, चोक्सीला मुंबईच्या उच्च-सुरक्षा असलेल्या आर्थर रोड तुरुंगाच्या बराकक्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येईल, त्याच तुरुंग संकुलात २६/११ चा दहशतवादी अजमल कसाब यालाही ठेवण्यात आले होते.

भारतीय तपास संस्थांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला या वर्षी १२ एप्रिल रोजी अटक केली. तो सध्या तुरुंगात आहे.चोक्सीवर १३ हजार ८५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मेहुल त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत होता, ज्यांच्याकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी चोक्सीच्या उपस्थितीची माहिती दिली होती.अटकेच्या वेळी मेहुल चोक्सी बेल्जियममार्गे स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. चोक्सीला अटक करताना पोलिसांनी २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा उल्लेख केला.