Home Blog Page 326

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात शानदार उद्घाटन

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२ वी ज्युनिअर राज्यस्तरीय ज्यूडो क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र ज्यूदो संघटना व जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी असोसिएशनतर्फे दि. १ नोव्हेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आली असून. स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० जिल्हयाचे सुमारे ३५० खेळाडू व ८० संघ व्यवस्थापक, कोच, मॅनेजर, पंच सहभागी झाले आहेत. काल स्पर्धेचा पहिला दिवस होता.

महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि जळगाव जिल्हा ज्यूदोचे अध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्या सहकार्याने या स्पर्धा सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या या स्पर्धेमुळे खेळाडूंना ज्यूदो खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून ज्यूदोचा प्रसार देखील होण्यास मदत होत आहे.

स्पर्धा महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक व सचिव दत्ता आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते काल करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे शैलेश टिळक, जैन इरिगेशन चे रवींद्र धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य ज्यूदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेटकर, पारोळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण, गणेश शेटकर, संचालक अनिल देशमुख, महेश पाटील आंतरराष्ट्रीय पंच विजय यादव, टुर्नमेंट डायरेक्टर अमोल देसाई , राज्य सॉफ्ट बॉल संघटनेचे सचिव व शिव छत्रपती अवार्ड विजेते प्रदीप तळवेलकर, टेक्निकल मेम्बर अतुल बामनोदकर, सचिन देवळे,वृषाली लेग्रस महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन चे उपाध्यक्ष ऍड. विकास पाटील, तांत्रिक समिती अध्यक्ष दर्शना लखानी आदी उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती पाटील व महेश पाटील यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ उमेश पाटील,योगेश महाजन, अतुल गोरडे, अजय काशीद, डिंगबर महाजन, सचीन वाघ, डॉ चांद खान, अशफाक शेख,पदाधिकारी जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी संघटना हे परिश्रम घेत आहेत. दरम्यान , उद्या या स्पर्धेचा समारोप होणार असून या प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील ,राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार , सुप्रसिद्ध वकील उज्ज्वलजी निकम , खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

वनराजच्या हत्येतील आरोपीच्या भावाचा भरदिवसा गोळ्या घालून खून, मेल्यावरही कोयत्याने घातले घाव .. आंदेकर टोळी अजूनही आहे सक्रिय ?

0

खडी मशीन चौकात थरार

पुणे- कोंढवा येथे रिक्षाचालक असलेल्या गणेश काळे (वय 30) या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी सहा राऊंड फायर करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा तपास सुरू केला आहे. मृत गणेश काळे हा सोमा गायकवाड टोळीतील समीर काळेचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. समीर काळे हा सध्या कारागृहात असून, त्याच्यावर वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे.त्यामुळे आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात २ आरोपींनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळे याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या गणेश काळे याला लागल्या. तो गतप्राण झाला. त्याचवेळी दुचाकीवरून उतरलेल्या दोघांनी त्याच्या शरीरावर कोयत्याचे वार केले. काही मिनिटांतच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दोन आरोपी गणेशच्या मागावर होते. त्यांनी गणेशला रिक्षात बसू दिले, काही अंतर कापल्यानंतर त्यांनी गणेशला लक्ष्य केले.

आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सह अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं या हत्येतून दिसून येतंय.वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या समीर काळेचा भाऊ हा गणेश काळे आहे. त्यामुळे त्याच्या हत्येमागे गँगवॉर आहे काय ? याचा तपास पोलीस करत आहेत.

गेल्या वर्षी वनराज आंदेकरची हत्या कोमकर गँगकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक करण्यात आली.वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर 2025 रोजी प्लॅनही आखला होता. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला.गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नाना पेठेमध्ये गोळ्यांचा आवाज झाला. एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डीजे सुरू होता, त्यामध्ये ‘टपका रे टपका, एक ओर टपका’ हे गाणं सुरू होतं. त्याचवेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजे आयुष कोमकरला ठार केलं. या घटनेनंतर पोलीस कारवाई सुरू आहे.

अध्यक्ष अजित पवार आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मोहोळ पण सोबतच …मोहोळ गटाला 11 जागा,सचिव आणि खजिनदारपदही…

मुंबई- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तोडगा काढला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच या असोसिएशनचे अध्यक्ष राहतील तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे वरिष्ठ उपाध्यक्ष असतील. त्याचसोबत मोहोळ गटाला 11 जागा देण्यात येतील. मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या तोडग्यानंतर मुरलीधर मोहोळ अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे.अजित पवारांना अध्यक्षपद दिलं असलं तरी असोसिएशनच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाचे ठरणारे सचिवपद हे मोहोळ गटाला देण्यात येणार आहे. तसेच खजिनदारपदही मोहोळ गटाकडेच राहणार असल्याची माहिती आहे.मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या तोडग्यानुसार, अजित पवार हेच असोसिएशनचे अध्यक्ष राहतील. तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कारभार पाहतील. अजित पवार गटाला 10 जागा तर मोहोळ गटाला 11 जागा देण्यात येतील.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या दोन गटात थेट लढत होणार हे निश्चित झालं होतं. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये सामोपचाराने तोडगा काढल्याची माहिती आहे.

पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा येथे ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर यांच्याशी संवादात्मक कार्यक्रम

पुणे : आपल्या देशाला जमिनीचा तुकडा असे न मानता ती आपली मातृभूमी आहे असे समजून तिच्या रक्षणाचे परमकर्तव्य प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. तिच्यासाठी प्रेम, आदर आणि भावनात्मकता असली पाहिजे. आज सैन्यदलाला फक्त योद्ध्यांची गरज नसून विद्वान योद्ध्यांची आवश्यकता आहे, कारण तंत्रज्ञानाचे क्षेत्र रुंदावल्यामुळे आजच्या काळात होणारी युद्धे ही अनेकविध पातळ्यांवर लढावी लागत आहेत, असे प्रतिपादन ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर (निवृत्त) यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने आपटे रोडवरील सेंट्रल पार्क येथे 23व्या पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा आयोजित करण्यात आला आहे. यात आज (दि. 1) अभिजित खेडकर यांच्याशी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेखक,, कवी स्वप्नील पोरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांनी संवाद साधला.

मातृभूमीविषयी आदर नसणाऱ्या नागरिकांच्या विचारांना कधीच प्रोत्साहन देऊ नका, असे सांगून अभिजित खेडकर म्हणाले, आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर विचार, बोलणे आणि कर्म याला प्रथम प्राधान्य द्या, उत्तम नियोजन करा तरच यश नक्की मिळेल. सैन्यदलात प्रवेश घ्यायचा असेल तर जीवाची जोखीम घेण्याची मानसिकता असणे आवश्यक आहे. मी तिसरीत असल्यापासून पायलट व्हायचे स्वप्न पाहिले. या ध्येयाने प्रेरित होऊन ध्यासपूर्णतेने अतिशय अवघड शारीरिक, मानसिक, बौद्धिक परिक्षा पार करत माझे स्वप्न पूर्ण केले.

ते पुढे म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात युद्धनिती पूर्णत: बदलली आहे. आजचे युद्ध हे संघर्षमय असून विविध पातळ्यांवर लढले जात आहे. त्याकरिता सुयोग्य शिक्षण घेणे आवश्यक आहे.

कुपवाडा सेक्टर येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा अनुभव सांगताना अभिजित खेडकर म्हणाले, त्या वेळी झालेल्या हल्ल्यात जवळपास 18 मृतदेह फक्त दोघांनी उचलून हेलिकॉप्टरमधून तत्परतेने सैनिकी रुग्णालयात रवाना करणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते. जीवंत माणूस उचलून नेणे सोपे; परंतु मृतदेह उचलून नेताना मी व बेस कॅम्पवरील पंडित या दोघांचीही मोठी परीक्षा झाली. या वेळी सैनिकाचे मन किती पक्के, घट्ट असावे लागते, बळाची निर्मिती किती प्रमाणात करावी लागते, निर्णय क्षमता किती तत्परतेने वापरावी लागते यांचा पुरेपूर कस लागला.

प्रत्येक सैनिकाच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबियांचा मोठा वाटा असतो, असे सांगून पुढच्या पिढीला संदेश काय द्याल या प्रश्नाला उत्तर देताना खेडकर म्हणाले, आजच्या शिक्षणपद्धतीत प्रामुख्याने नितीशास्त्र आणि सामुदायिक जीवनशास्त्र शिकविले जाणे आवश्यक असून पदवी पर्यंतच्या शिक्षणात या विषयी प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने फक्त वैयक्तिक गरजांचा विचार न करता समाजाचा, मातृभूमीचा, तिच्या सुरक्षिततेचा एक योद्धा म्हणून विचार करत समाजात वावरावे. काहीही झाले तरी देश प्रथम हे तत्त्व स्वीकारल्यास देश सुरक्षित राहिल.

प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले तर स्वागत पी. एन. आर. राजन यांनी केले.

२० हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

पुणे: दरवर्षीप्रमाणे सदगुरू शंकर महाराज प्रकटदिनानिमित्त, राघवेंद्र बाप्पू मानकर मित्र परिवार आयोजित ‘मुक्तद्वार महाप्रसाद’ चे आयोजन यंदा सलग चौथ्या वर्षी मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ तब्बल वीस हजारांहून अधिक भाविकांनी घेतला.

नुतन मराठी विद्यालय (नुमावि) प्रशालेच्या प्रांगणात सद्गुरू शंकर बाबांचे मंगलमय दर्शन, भाविकांचा ‘जय शंकर’चा जयघोष आणि रुचकर महाप्रसाद अशा भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. राघवेंद्र बाप्पू मानकर व मित्र परिवाराच्या माध्यमातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सद्गुरू शंकर महाराज पादुका पूजन राजेश शेवानी, दीपक फेरवानी, पप्पू फेरवाणी, राहूल बोरा, संजय मुनोत, चेतन शहा, दिनेश शहा, किशोर लोढा, नयन ठाकूर, अमर शाह यांच्या उपस्थितीत पार पडले.
महाप्रसादास प्रमुख उपस्थिती आमदार हेमंत रासने, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, रविंद्र साळेगावकर, कसबा मंडलाध्यक्ष अमित कंक यांच्यासह हजारो भाविकांची लाभली.

भक्तीभाव, समाजबंध आणि सद्गुरूंच्या कृपाशिर्वादाने नटलेला हा ‘मुक्तद्वार महाप्रसाद’ सोहळा भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरला.

टेम्पोत कुल्फी आईस्क्रीम विक्री करणाराला महापालिकेने केला १५ हजाराचा दंड

पुणे-महापालिकेने अतिक्रमण कारवाई करताना रस्त्यावर टेम्पो लाऊन कुल्फी आईस्क्रीम विक्री करणाराला १५ हजाराचा दंड करून पुन्हा व्यवसाय न करण्याचा आदेश दिला आहे . याबाबतची माहिती आशिकी,’ उपायुक्त डॉक्टर रमेश शेलार यांनी नगर रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत विमान नगर परिसरात पाहणी करताना अनाधिकृत टेम्पो व्यवसायिकावर कारवाई करून रक्कम रुपये १५०००/- दंड करण्यात आला.सदर वाहन वॉर्ड ऑफिस मध्ये जमा करण्यात आले आहे. तसेच पुणे शहरामध्ये आठवडे बाजारामध्ये रस्त्यांवर उभे करून अश्या वाहनांचा वापर केला जातो अश्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व विभागीय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्या साठी जागा पाहणी

पुणे- आज अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी विश्रांतवाडी चौक,आळंदी रस्ता येथे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांचे समवेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्या बाबतची जागा पाहणी केली.या जागा पाहणीत त्यांनी अधिकारी यांना सूचना केल्या. या प्रसंगी माधीक्षक अभियंता गव्हाणे , कार्यकारी अभियंता धारव, राजेश गुर्रम महापालिका सहाय्यक आयुक्त येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय, संदीप पाटील, इतर अधिकारी वर्ग तसेच वॉर्ड ऑफिस मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बेकऱ्या, रेस्टॉरंट, ढाबा इत्यादीमध्ये हरित इंधनाचा वापर सुरू करा :महापालिकेचे आदेश

पुणे महानगरपालिकेत हरित इंधनाच्या वापरासाठी बेकरी असोसिएशनची बैठक संपन्न

पुणे- महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत उपआयुक्त (पर्यावरण) रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बेकरी असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत स्वच्छ इंधनाचा वापर करून पुणे शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
शहरी भागांमध्ये हवा प्रदूषणाचे वाढते गंभीर परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत हवा प्रदूषण कमी करणे करिता याबाबतची मार्गदर्शक तत्वे यापूर्वी जारी करण्यात आलेले असून स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबत त्यांच्या हद्दीतील बेकऱ्या, रेस्टॉरंट, ढाबा इत्यादीमध्ये हरित इंधनाचा वापर सुरू करण्यात यावा असे आदेश दिलेले आहेत

या बैठकीत बेकरी असोसिएशनतर्फे माहिती देण्यात आली की, पुणे शहरात जवळपास 750 बेकऱ्या कार्यरत असून उपनगरात जवळपास 200 ते 250 बेकऱ्या आहेत, त्यांपैकी बहुतेक बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनाचा वापर सुरू केला आहे. तथापि, काही बेकऱ्या अद्याप रूपांतरणाच्या प्रक्रियेत आहेत. बैठकीदरम्यान बेकरी असोसिएशने स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी येणाऱ्या अडचणी उप आयुक्तांसमोर मांडल्या तसेच यासाठी पुणे महापालिकेमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
हवा (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या कलम ३१(अ) अंतर्गत हवा प्रदूषण कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बेकरी/हॉटेल्स/रेस्टोरंट/खाद्यपदार्थ स्टॉल/ ढाबा यांमध्ये लाकूड, कोळसा आणि तंदूर इत्यादीच्या वापराऐवजी एलपीजी, पीएनजी, वीज आणि हरित उर्जेच्या इतर स्रोतांचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
ज्या बेकरी/हॉटेल/रेस्टोरंट/ खाद्यपदार्थ स्टॉल/ ढाबा यांनी अद्याप एलपीजी, पीएनजी, वीज आणि हरित उर्जेच्या इतर आधारित प्रणाली स्वीकारली नाही, त्यांनी तात्काळ रूपांतरण करणे आवश्यक आहे. अन्यथा या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

बोगस मतदार याद्या दुरुस्त करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्या : बाळासाहेब थोरात.

भारतीय जनता पक्षाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे की काय ?

निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा

मुंबई, दि. १ नोव्हेंबर.

सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष ॲड. अभय छाजेड, आमदार भाई जगताप, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे डॉ. अजित नवले यांच्यासह सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, देशातील निवडणुकीत मतचोरी झालेली आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गाधी यांनी पुराव्यासह उघड करून दाखवले पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर थातूर मातूर उत्तर दिले. निवडणूक आयोगाचे उत्तर हे इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी न करता त्यांनी उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारयाद्या वापरण्यात आल्या, त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष व मविआतील सर्व घटक पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारणा केली व या बोगस मतदार याद्या वापरू नका असे सांगितले पण विधान सभेच्या बोगस याद्यांवर व त्यांवर घेतलेल्या हरकरतीवर कोणताही निर्णय घेतला नाही आणि आता तीच बोगस यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरली जात आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष त्या बोगस मतदार याद्यांच्या विरोधात आहोत आणि लोकशाही माननाऱ्यांनी त्याला विरोध करून मतदारयाद्या दुरुस्त करण्याचा आग्रह धरला आहे पण राज्य निवडणूक आयोग समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माझ्या संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात साडे नऊ हजार बोगस मतदार आहेत, आम्ही त्यावर हरकत घेऊन त्या दुरुस्त करण्यास सांगितले पण तहसीलदार म्हणतात, दुरुस्ती करण्याचा आम्हाला काहाही अधिकारी नाही म्हणजे तीच बोगस मतदार यादी आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीला वापणार, म्हणून ती यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण निवडणूक आयोग ऐकूणच घेत नाही.

सत्ताधारी भाजपाने काढलेल्या मूक मोर्चावर टीका करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपला सत्याचा मोर्चा निघत असताना सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे का ? अशी शंका येते.. ज्येठ नेते शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही मोर्चाला संबोधित करून भाजपा महायुती सरकार व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.

ॲनाकोंडाला आता कोंडावंच लागेल – उद्धव ठाकरे

0

मुंबई- ‘सत्याच्या मोर्चा’त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर घणाघाती प्रहार केला. ॲनाकोंडाला आता कोंडावंच लागेल, नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला चढवला. मतदार याद्यांमधील गोंधळ आणि दुबार नोंदींचा मुद्दा उचलत त्यांनी राज्यकर्त्यांवर आणि निवडणूक आयोगावर निष्क्रियतेचा आरोप केला. रोज कुठून तरी पुरावे समोर येत आहेत, तरीही सरकार आणि आयोग गप्प आहेत, अशी टीका त्यांनी केली.

आपला पक्ष, नाव आणि निशाणी चोरली गेली, आता मतचोरी सुरू आहे, असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, माझे वडीलही चोरायचा प्रयत्न झाला, पण ते पुरलं नाही म्हणून आता मतचोरीकडे वळले आहेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांचा पर्दाफाश करू. मी देवेंद्र फडणवीस यांना खुलेआम आव्हान देतो की, करा ना पर्दाफाश! आम्ही कसे फायद्यात आहोत, ते दाखवा.

मुख्यमंत्री जेव्हा असं बोलतात, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांनी मतचोरी मान्य केली आहे, असा दावा करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचंही सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं. ही केवळ निवडणुकीची लढाई नाही, तर लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, असं सांगत त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून सरकारला तीव्र इशारा दिला.

सत्याचा मोर्चा हा जागृतीचा आणि जबाबदारीचा आवाज- शरद पवार

मुंबई- आज मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी आणि दुबार नावे या गंभीर मुद्द्यांवरून उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सत्याचा मोर्चा निघाला. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन छेडले. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत रॅली काढली. मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आणि पारदर्शक निवडणुकीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या ऐतिहासिक मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि मनसेचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संदेश गेला आहे.

मोर्चातील मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा पुढे करत कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिला. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही सर्व बंधू-भगिनी, तुमचा हा संघर्ष मला इतिहासाची आठवण करून देतो, असं सांगत त्यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक संदर्भ जोडला. पवार म्हणाले की, आजचा मोर्चा मला 1978-89 च्या काळात घेऊन जातो. त्या काळात मी महाविद्यालयात शिकत होतो. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी काळा घोडा परिसरात असेच मोर्चे निघाले होते. त्या काळातील एकजूट आणि विचारांचा समन्वय आज तुमच्यात दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आजचा मोर्चा हा कोणत्याही पक्षासाठी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न नसून लोकशाही रचनेच्या रक्षणासाठीचा सामूहिक आवाज आहे. आपण स्वतःसाठी काही मागत नाही, सत्ता किंवा पदासाठीही नाही. आपण फक्त एवढंच म्हणतोय की संविधानाने दिलेले मतदानाचे अधिकार सुरक्षित राहिले पाहिजेत, असं ते म्हणाले. निवडणूक आयोगावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, संविधानात सांगितलेले नियम सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे वाकवले गेले तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे, जनतेने सावध राहून निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.

मोर्चाच्या अखेरीस शरद पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देण्याचं आवाहन केलं. ही लढाई कुणा एका पक्षाची नाही, ही लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची आहे, असा ठाम संदेश त्यांनी दिला. सत्याचा मोर्चा हा फक्त विरोधाचा नव्हे, तर जागृतीचा आणि जबाबदारीचा आवाज असल्याचं ते म्हणाले. या मोर्चातून राज्यभरात लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला असून, निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्यात महाविकास आघाडी आणि मनसेला यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

खोटेपणा सिद्ध करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल
शरद पवार म्हणाले की, काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या. काही ठिकाणी सांगण्यात आलं की इथे बनावट आधार कार्ड मिळते. सिद्ध करून द्या हे आव्हान आले. डेमो दाखवला आणि हा आरोप ज्याने केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटारडे आहेत हे सांगण्याचा, सिद्ध करण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ हे शासन सगळ्याला संरक्षण देते. त्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी आहे, काही करा पण मतदानाची चोरी आम्ही थांबवणार. आपण स्वत:साठी काही मागत नाही. आपण ऐवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये सविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचे जतन करा. त्याची आज वेळ आली आहे. आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषत: विधानसभेच्या निवडणुकीत जे प्रकार झाले. त्यामध्ये सामान्य माणसाचा संसदीय लोकशाही यावरचा विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत.
लोकशाही टिकवण्यासाठी काय पडेल ती किंमत मोजू पण…
याठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूरचे आमदार आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव तुमच्यासमोर सांगितला. त्यातून स्पष्ट होतं की सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो. यांना तोंड द्यावे लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकीत संघर्ष असू शकतो. पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल. आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी निर्धार केला पाहिजे. देशाची लोकशाही टिकवायची असेल. मताचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो. आज व्यासपीठावर असलेले सर्व नेते, सहकारी सगळ्यांच्या वतीने निर्णय घेतला काय पडेल ती किंमत मोजू पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ.

राज ठाकरे म्हटले’अरे काढ रे ते कापड’ अन मतदारसंघनिहाय बोगस मतदारांची दिली आकडेवारी

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील दुबार मतदारांच्या नावांचा ढिग दाखवून बोगस मतदार याद्यांचे पुरावे दिले. महाराष्ट्रात निवडणुकीच्या नावाखाली प्रचंड गोंधळ सुरू आहे. कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली जानेवारीत निवडणूक घेण्याचा हट्ट सुरू आहे. या लोकांनी मागील 5 वर्षांत निवडणुका घेतल्या नाही. पण आत्ता घाई करत आहेत. अजून 1 वर्षे घेतली नाही, तर काय फरक पडतो? या लोकांचा जुन्याच मतदार यादीवर निवडणूक घेऊन यश पदरात पाडून घेण्याचा डाव आहे, असे राज ठाकरे म्हणालेत. यावेळी त्यांनी दुबार मतदारांना ठोकून काढण्याचाही इशारा दिला.

महाविकास आघाडी व मनसेने आज मुंबईत मतदार याद्यांतील घोळ व मतचोरीच्या मुद्यावरून ‘सत्याचा मोर्चा’ काढला. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, आजचा मोर्चा हा राग व ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा व समजावून सांगण्याचा मोर्चा आहे. या प्रकरणी माझ्यासकट सर्वांनीच भाष्य केले आहे. खरे तर मतदार यादीत दुबार मतदार आहेत हा फार छोटा विषय आहे. या प्रकरणी आम्ही सर्वजण बोलत आहोत. उद्धव ठाकरे बोलत आहेत. शरद पवार बोलत आहेत. शेकाप, डावे व काँग्रेसही बोलत आहे. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेंचे लोकही दुबार मतदार असल्याचे बोलत आहेत.

अरे मग अडवलंय कुणी? हे लोक निवडणूक घेण्याची घाई का करत आहेत? साधी गोष्ट आहे. मतदार याद्या साफ करा. त्या पूर्ण पारदर्शक केल्यानंतर निवडणूक घ्या. त्यानंतर यश – अपयश कुणाचे ही गोष्ट मान्य. पण सध्या जे लपून – छपून चालू आहे ते कशासाठी?

राज ठाकरे यावेळी मतदार यादी दाखवत म्हणाले, मी दोन-तीन गोष्टी दाखवण्यासाठी येथे आणल्या आहेत. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड व भिवंडी येथील 4,500 मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केले आहे. असे लाखो लोक महाराष्ट्रभर आहेत. या लोकांचा बोगस मतदानासाठी वापर करण्यात आला. पण त्यानंतरही सत्ताधारी लोक या प्रकरणी पुरावे दाखवण्याची मागणी करत आहेत.

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात 17 लाख 29 हजार 456 मतदार आहेत. त्यापैकी 62 हजार 370 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघात 16 लाख 74 हजार 861 मतदार आहेत. त्यापैकी 60 हजार 231 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघात 15 लाख 90 हजार 710 मतदार आहेत. त्यापैकी 92,983 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात 16 लाख 81 हजार 48 मतदार आहेत. त्यापैकी 63 हजार 740 दुबार मतदार आहेत, असे राज ठाकरे यावेळी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदारांची आकडेवारी सादर करताना म्हणाले.

यावेळी त्यांनी या बोगस मतदारांचा पुरावा देण्यासाठी मतदार याद्यांच्या ढिगाचा पुरावाही दाखवला. ते ‘अरे काढ रे ते कापड’ म्हणताच, तिथे दुबार मतदारांच्या नावांच्या कागदपत्रांचा ढिगारा दिसला. हे सर्व दुबार मतदार आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. ते बोगस मतदार याद्यांच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाले, हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे फक्त मी सांगितलेल्या मतदार संघातील दुबार मतदार आहेत. यावरून महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा गोंधळ सुरू आहे दिसून येईल.

एवढे पुरावे देऊनही कोर्टाने सांगितले म्हणून जानेवारीत निवडणूक घेण्याचा हट्ट सुरू आहे. कशा घ्या? का घ्या? कुणाला आहे घाई? या लोकांनी मागील 5 वर्षांत निवडणुका घेतल्या नाहीत. अजून 1 वर्ष गेले तर काय फरक पडतो? पण जी माणसे आतमध्ये भरली आहेत त्याचे काय करायचे? मग जुन्याच मतदार यादीवर निवडणुका घ्यायच्या आणि यश पदरात पाडून घ्यायचे असा यांचा डाव आहे. याला काय निवडणुका म्हणतात? याने लोकशाही टिकेल का? पैठणच्या आमदाराचा मुलगा सांगतो की, मी 20 हजार मतदार बाहेरून आणली. यांची हिंमत बघा. सत्तेचा माज बघा, असे राज ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेलेत. कुणीतरी सुलभ शौचालयात नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसला की नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट देशभर सुरू आहे. मी 2017 पासून ओरडून सांगतो की यात (ईव्हीएम) गडबड आहे. गोंधळ आहे. अहो, 232 आमदार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात ‘मातम’ असेल, सन्नाटा असेल, काहीच नसेल, मतदार गोंधळलेले असतील, सर्वांना आश्चर्य वाटत असेल तर हा गोंधळच आहे. निवडून आलेले लोक स्वतःचा चिमटा काढून पाहत होते. मी निवडून आलो, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.

कारण, निवडून येण्याची सोय अगोदरच झाली होती. त्यामुळे त्याला मी निवडून येणार हे माहिती नव्हते. ही सगळी कारस्थाने, या सर्व गोष्टी निवडणूक आयोगाच्या मार्फत सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या? मला जरा सांगा. मतदार उन्हातान्हात रांगेत उभा राहून मतदान करणाऱ्या मतदारांच्या मतांचा हा अपमान नाही का? मतदारांनी मतदान करायचे, पण मॅच अगोदरच फिक्स आहे. मग त्याच्या मताला काय किंमत आहे?

मी एकच गोष्ट सांगेन की, जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा तुम्ही घरोघरी जा. मतदार याद्यांवर जोरदार काम करा. प्रत्येक मतदाराची ओळख पटवा. त्यानंतर मतदानाच्या ठिकाणी बसून मतदान करणारा तोच मतदार आहे का यावर लक्ष द्या. त्यात हे दुबार, तिबारवाले तिकडे आले तर त्यांना तिथेच फोडून काढा. बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. त्याशिवाय या महाराष्ट्रात सुरू असलेला कारभार वठणीवर येणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा ‘मविआ’ चा कट उधळून लावा – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन

गिरगाव चौपाटी-आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण करण्याचे डाव हाणून पाडण्यासाठी,मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी शनिवारी गिरगाव चौपाटी येथे करण्यात आलेल्या मूक आंदोलनावेळी श्री. चव्हाण बोलत होते. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, कौशल्य विकास आणि उद्योजकता व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, आ. योगेश सागर, आ. विद्या ठाकूर, आ. संजय उपाध्याय यांच्यासह अनेक आमदार, युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी या मूक आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुती सरकार झोकून काम करत असताना महाविकास आघाडी राज्यात अराजक माजवून पिछाडीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. परदेशी शक्ती आणि फंडिंगच्या मदतीने पोसणा-या सामाजिक संस्थांना हाताशी घेऊन विकास रोखण्याचे आणि दिशाभूल करून अस्थिरता निर्माण करण्याचे काम ही मंडळी करत आहेत. या आंदोलन करणा-यांमध्ये एखादा सचिन वाझे देखील असू शकतो, असा सावधानतेचा इशारा देत जनतेने डोळसपणे यांचा कुटिल उद्देश, डाव समजावा असे आवाहन त्यांनी केले.
ठाकरे बंधूंवर निशाणा साधत श्री. चव्हाण म्हणाले की हे बंधू वक्त्तृत्वशैलीच्या बळावर जनतेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरून भावनिक आवाहनांमध्ये अडकवून त्यांची दिशाभूल करत आले आहेत. महाराष्ट्राला सर्वात वाईट दिवस ठाकरे बंधूंनी दाखवले. राज्यात महायुती सरकारच्या काळात राज्याला पुढे नेण्यासाठी होत असलेले प्रकल्प, योजना याकडे डोळे उघडे ठेवून पहा असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. प्रत्येक गरीबाला हक्काचे घर मिळायला हवे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून साकार होत आहे. श्री. फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्राची वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत आहे असेही श्री. चव्हाण म्हणाले .
मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम यावेळी म्हणाले की मतदार आपल्याला का नाकारत आहेत याचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी मविआ नेत्यांनी मोर्चाच्या माध्यमातून असत्याचा तमाशा लावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी मविआला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी म्हणजे हा मोर्चा आहे अशी खिल्ली श्री. साटम यांनी उडवली. समाजात तेढ निर्माण करण्याचे गलिच्छ राजकारण आघाडीकडून खेळले जात आहे. मतदारांचा अवमान करत मविआ रडीचा डाव खेळत आहे, असेही ते म्हणाले.
कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी हे मूक आंदोलन आहे. विरोधक निवडणूक जिंकले की लोकशाही शाबूत असते मात्र ते हरले की ईव्हीएमवर आरोप करत रान उठवतात. यापुढे विरोधकांची नौटंकी चालणार नाही. लोकांना सत्य सांगण्यासाठी, त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी हे आंदोलन आहे. ‘मविआ’ चा हा मोर्चा म्हणजे अस्तित्व दाखवण्याचा शेवटचा प्रयत्न आहे. सत्तेपासून दूर झालेल्या पक्षांचा राजकीय अंत नजिक आला आहे. जनता महायुती सरकारसोबत ठामपणे उभी आहे, असेही श्री. लोढा म्हणाले.

महावितरणमधील विद्युत सहायक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर; दि. ६ व ७ ला कागदपत्रांची तपासणी

मुंबई, दि. ०१ नोव्हेंबर २०२५: महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी नियमानुसार ५० टक्के मर्यादेत १८४७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी (दि. ३१) जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये दि. ६ व ७ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.

महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये ५ हजार ३८१ विद्युत सहायक पदासाठी दि. २० ते २२ मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. त्यानंतर उमेदवारांची निवड यादी व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली. या सर्व उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २० ते २२ ऑगस्ट व दि. ९ व १० सप्टेंबर दरम्यान पाच दिवसांत करण्यात आली.

निवड यादीतील उमेदवारांच्या प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय अपात्रता, गैरहजर व इतर कारणांचा विचार करून कंपनी नियमानुसार जाहिरात केलेल्या पदाच्या ५० टक्के मर्यादेपर्यंत दि. ३१ ऑक्टोबरला प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. तथापि दिव्यांग प्रवर्गाची निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत ‘परिस्थिती जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दि. १०/९/२०२५ ला दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी दिला आहे. त्यानुसार या प्रतीक्षा यादीमध्ये दिव्यांग प्रवर्ग वगळण्यात आला आहे.  

विद्युत सहायक पदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये येत्या दि. ६ व ७ नोव्हेंबरला होणार आहे. या दोन्ही दिवशी संबंधित परिमंडलांमध्ये सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांची पडताळणी सुरू होईल. नमूद दिवशी काही कारणास्तव पडताळणी पूर्ण झाली नाहीतर दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. तथापि, सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह संबंधित उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.

जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणार नाही त्यांची निवड रद्द समजली जाईल व भविष्यात त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रांच्या छाननी व पडताळणीमध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित परिमंडलांमध्ये पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची संपूर्ण माहिती व प्रतीक्षा यादी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 9 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील कासीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी एकादशीनिमित्त झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. सुरुवातीच्या अहवालानुसार गर्दीमुळे रेलिंग कोसळल्याचे दिसून आले आहे. जखमी भाविकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे.आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री अनिता म्हणाल्या की, दर आठवड्याला अंदाजे १,५०० ते २,००० भाविक मंदिरात येतात. आज एकादशी ही भाविकांच्या मोठ्या संख्येचे एक महत्त्वाचे कारण होती. त्यांनी स्पष्ट केले की मंदिर पहिल्या मजल्यावर आहे आणि त्यावर जाण्यासाठी २० पायऱ्या आहेत. यादरम्यान धक्का-बुक्की झाली आणि रेलिंग तुटली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.