Home Blog Page 327

सिकंदर शेखला हिंद केसरी स्पर्धेतून दूर ठेवण्यासाठी डाव असावा ?:सिकंदरचे वडील ज्येष्ठ पैलवान रशीद शेख

त्याला अवैध कृत्य करण्याची गरजच नव्हती

मुंबई-आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेला महाराष्ट्र केसरी ,कोल्हापूरचा प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्र आणि कुस्तीप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पंजाब पोलिसांच्या सीआयए पथकाने चालवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, या टोळीतील चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक म्हणून सिकंदर शेखचं नाव समोर आलं आहे.या घटनेवर सिकंदरचे वडील, ज्येष्ठ पैलवान रशीद शेख यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या मुलाने स्वतःच्या कष्टाने नाव कमावलं आहे. कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात ओढलं आहे. मी आयुष्यभर हमाली करून कमावतो आहोत, माझ्या कुटुंबाने कधीही हरामच्या पैशाला हात लावला नाही. मग माझा मुलगा तसा मार्ग का धरावा? असा सवाल त्यांनी केला. रशीद शेख पुढे म्हणाले की, सिकंदरला देशभरातून मान-सन्मान मिळाला, त्याला गाड्या, घरं, सैन्यातील नोकरीसारख्या अनेक ऑफर्स आल्या. त्याला अवैध कृत्य करण्याची गरजच नव्हती. तो हिंद केसरी स्पर्धेसाठी तयारी करत होता. कदाचित त्याला स्पर्धेतून दूर ठेवण्यासाठी हा काही डाव असावा का, हेच आता कळत नाही.

सिकंदरच्या अटकेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आणि गंगावेश तालीममधील सहकारी कुस्तीपटूंमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अनेकांना विश्वास बसत नाही की मेहनती आणि शिस्तप्रिय पैलवान असा आरोपी ठरू शकतो. तालीममधील प्रशिक्षक आणि माजी खेळाडूंनी पोलिसांकडे सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. सिकंदर शेख हा कुस्तीच्या माध्यमातून गावागावातून तरुणांना प्रेरणा देणारा खेळाडू आहे. त्याने कधीच चुकीचा मार्ग धरला नाही. जर त्याच्यावर अन्याय होत असेल, तर सत्य लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी स्थानिक क्रीडा संघटनांकडून करण्यात आली आहे.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पपला गुर्जर गँगला अवैध शस्त्रं पुरवणाऱ्या रॅकेटचा तपास करत असताना सिकंदर शेखच्या संपर्कात काही आरोपी आले होते. प्राथमिक चौकशीत पोलिसांना त्याच्याविरोधात काही ठोस पुरावे मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून 5 पिस्तुलं, काही काडतुसे, 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम आणि स्कॉर्पिओ-एन तसेच एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी कोल्हापूरला जाऊन गंगावेश तालीम येथून सिकंदर शेखला अटक केली. एकेकाळी राष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या पैलवानावर अचानक आलेल्या या आरोपांमुळे क्रीडा क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संजय राऊतांची तब्येत बिघडली:PM मोदींकडून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा

मुंबई-खासदार संजय राऊत यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समोर आले आहे. संजय राऊत यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. संजय राऊत यांच्या तब्येतीत गंभीर बिघाड झाल्याने 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत याची माहिती दिल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी एका पोस्टद्वारे कामना केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी कामना केली आहे. यावर संजय राऊत यांनी देखील उत्तर देत म्हटले, आदरणीय प्रधानमंत्री जी धन्यवाद! माझे कुटुंब आपले आभारी आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र! असे राऊतांनी ट्विट केले आहे.

मुलूखमैदानी तोफ खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांनी 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. पण ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यामुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

संजय राऊत दररोज सकाळी पत्रकारांशी संवाद साधतात. पण आज त्यांची पत्रकार परिषद झाली नाही. 15 दिवसांपूर्वीच त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आज त्यांची पत्रकार परिषद झाली नसल्याचे पाहून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी शंका उपस्थित केली होती. झालेही तसेच. संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्राद्वारे आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील किमान 2 महिने आपण सार्वजनीक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गट चिंतेत सापडला आहे.

संजय राऊत आपल्या पत्रात म्हणाले की, सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती. आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या.
उल्लेखनीय बाब म्हणजे 2020 मध्ये संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 स्टेन टाकण्यात आले होते. तत्पूर्वी, त्यांच्या हृदयात 2 ब्लॉकेज आढळले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी अँजिओप्लास्टी केली होती. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या सल्लानुसार सातत्याने तपासणी करत आहेत. या स्थितीतही ते आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे जनतेपुढे मांडतात. या प्रकरणी मध्यंतरी त्यांच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली. पण ते मागे हटले नाही. उलट त्यांच्या टीकेची धार अधिकच वाढली. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामागेही संजय राऊतच असल्याची चर्चा आहे.

संजय राऊत हे शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून संजय राऊत ठाकरे गटाची बाजू अत्यंत दमदारपणे मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडून सत्ताधाऱ्यांना पळताभूई थोडी करण्याचे काम ते नित्यनियमाने करत असतात.

आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे सांगून एक नवा बॉम्बगोळा फोडला. यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील हा मुद्दा निकाली निघाला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.

पोलिसांच्या राष्ट्रीय एकता दौड अर्थात वॉक / रन फॉर युनिटीला प्रचंड प्रतिसाद

पुणे-सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती अनुषंगाने पोलीस आयुक्त यांचे वतीने पोलीस मुख्यालय येथे काल सकाळी ०६/३० वा. राष्ट्रीय एकता दौड म्हणजे ५ कि.मी. पायी चालण्याचे (Walk) वॉक/रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते.यास उत्तुंग प्रतिसाद मिळाला .
या कार्यक्रमा दरम्यान प्रथम पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार तसेच महाविदयालयीन मुले/गुली व नागरिक यांनी देशाची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चीत करण्याकरीता स्वतःचे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत असल्याची शपथ पोलीस आयुक्त यांचे समवेत घेतली.


कार्यक्रमाची सुरुवात पोलीस मुख्यालय शिवाजीनगर, परेड ग्राऊंड येथुन करुन मॉडर्न कॉलेज जंगली महाराज रोड बालगंधर्व चौक डेक्कन जिमखाना नंतर एफ.सी. रोड मुख्यालय मेन गेट मधुन पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे पूर्ण करण्यात आली.
या वेळी पोलीस बॅण्डच्या वतीने देशभक्तीपर गीतांचे व झुंबा डान्स सादरीकरण देखील करण्यात आले. तसेच पुणे शहरातील अलका टॉकीज चौक, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, सारसबाग, संभाजी उदयान या ठिकाणी देखील पोलीस बॅण्डच्या वतीने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले..
१५० पोलीस अधिकारी, ६१६ पोलीस अंमलदार, ५७० विदयार्थी, १५० नागरिक, ५० लहान मुले असे एकूण १५३६ जण सहभागी झाले होते. सहभागी होणा-यांचे १२ वर्षाखालील सर्व, १२ ते ६० वर्षापर्यंत पुरुष, १२ ते ६० वर्षापर्यत महिला व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीक असे चार गट तयार करण्यात आले होते. तसेच पुणे पोलीस आयुक्तालयातील झोन ०२ मध्ये एकुण २१४० व झोन ०३ मध्ये १३०० लोकांचा सहभाग होता. वॉक फॉर युनिटीचे आयोजनामध्ये फोटोग्राफर, व्हिडीओ शुटींग, वैद्यकीय अधिकारी, अॅम्ब्युलन्स व्यवस्था, निर्जलीकरण औषध साठा, सीपीआर तज्ञ इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती.
या रन/वॉक फॉर युनिटी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले विदयार्थी, नागरिक व पोलीस यांचे हातामध्ये १) एकतेचा जयघोष, भारताचा नवा जोश २) हातात हात, मनात एकसात ३) एकतेचा रंग, देशात उमंग ४) चला मिळून चालू या, भारताला उभ करु या ५) भेद नको रे भावा, एकतेचा लाव दिवा ६) एकतेचा ध्यास, भारताचा विकास ७) सर्व धर्म सर्व जाती, एकतेतच खरी शक्ती ८) Walk together, stronger forever 9) One goal,one soul-Unity makes whole 10) Miles we go, for unity to grow 11) Together we stand, hand in hand 12) Join the race, for unite place असे घोषवाक्य असलेले फलक देण्यात येऊन ते प्रदर्शित करण्यात आले होते.

राष्ट्रीय एकता दौड निमित्त वॉक फॉर युनिटी कार्यक्रम हा पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात देखील स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आला होता. पोलीस स्टेशनच्या परिसरात पायी रॅलींचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त मुख्यालय श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक. हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा संदीप भाजीभाकरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, आर्थिक गुन्हे, विवेक मासाळ, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १, ऋषीकेश रावळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, मिलींद मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५राजकुमार शिदे तसेच सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उप-निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलीस नियंत्रण कक्ष, वायरलेस, एमटी सेक्शन, विशेष शाखा, गुन्हे शाखा, क्यूआरटी सायबर पो.स्टे. व मुख्यालयाकडील सर्व विभागांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

MOA अध्यक्षपद:अजित पवार आणि मोहोळ यांनी प्रत्येकी दोन वर्षे सांभाळावं-नवा प्रस्ताव

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) रविवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमनेसामने येणार आहेत. मात्र, शुक्रवारी रात्री मोठी घडामोड घडली. दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक होऊन यात अजित पवार आणि मोहोळ प्रत्येकी दोन वर्षांसाठी हे पद वाटून घ्यावे असा प्रस्ताव सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्याचे वृत्त आहे.

राज्यातील युतीच्या सत्तेत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे भागीदार आहेत. मात्र, कोणीही माघार घेतली नसल्याने या ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.यानंतर रात्रीतून घडामोडी घडल्या. आता अध्यक्षपदाबाबतचा निर्णय आज, शनिवारी होण्याची शक्यता आहे. मोहोळ याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते मुंबईला रवाना झाल्याचे कळले. कदाचित अजित पवार आणि मोहोळ प्रत्येकी दोन वर्षांसाठी हे पद वाटून घेतील असे सांगण्यात येते .दरम्यान, धर्मादाय आयुक्तांनी २०१७ ते २०२१ आणि २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी सादर करण्यात आलेला बदल अहवाल फेटाळला आहे. यानंतरही ही निवडणूक घेतली जात आहे. त्यानंतर नेमके काय होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.खरं तर, याआधी ‘भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेनुसार आणि नव्या स्पोर्ट्स कोडनुसार तीन टर्म अध्यक्षपद भूषवल्यानंतर चौथ्यांदा अध्यक्ष होता येत नाही, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमानुसार हे कृत्य बेकायदा ठरण्याची शक्यता आहे, असं मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि भारतीय जनता पक्ष क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी मांडलं होतं. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचा मार्ग सुकर मानला जात होता.‘एमओए’चे विद्यमान सचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आर्थिक अपहार केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना या प्रकरणात शुक्रवारी जामीन मंजूर झाला. शिरगावकर यांच्यामुळे प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप, त्यांच्याच गटातील काहींनी केला आहे.

खोदाईची घेतली दखल:३ नोव्हेंबरपासून खड्डेमुक्त रस्ते विशेष अभियान

पुणे :-शहरातील रस्ते खोदाई आणि खड्डे याबाबत येणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने ३ नोव्हेंबरपासून खड्डेमुक्त रस्ते विशेष अभियान राबविणाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचा पथ विभाग आणि १५ क्षेत्रिय कार्यालयांची मिळून १५ टीम्सद्वारे हे काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी येथे दिली.ते म्हणाले,’ सोमवार अर्थात ३ नोव्हेंबरपासून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी पथ विभाग आणि पंधरा क्षेत्रिय कार्यालयांच्या मिळून १५ टीम्स तयार करण्यात येणार आहेत. खड्डेमुक्त रस्ते अभियानासाठी रस्त्यांचे काम करणार्‍या ठेकेदारांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. महिन्याभरात विशेष मोहीम राबवून सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न राहातील.

शहरात मेट्रोचे काम, गृह विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनासाठी सुरू असलेल्या फायबर केबल टाकण्यासाठीच्या खोदाईमुळे आणि पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असून वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीतही भर पडत आहे. पावसाळा संपत आल्याने तसेच शहरात जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार असल्याने त्यापुर्वीच महापालिका प्रशासनाने शहरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत.

महापालिकेकडून शहरात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांना सशुल्क परवानगी दिली जाते. पथ विभागाकडून १ ऑक्टोबर ते ३१ एप्रिलपर्यंत खोदाईला परवानगी दिली जाते. त्यानंतर एक मे ला खोदाई बंद करून ३१ मे पर्यंत रस्ते दुरुस्त करणे बंधनकारक असते. तसेच पथ विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्ती केले जातात. मात्र, खोदाईनंतर दुरुस्तीची कामे योग्य प्रकारे केली जात नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. पावसाचे पाणी आणि खड्डे यामुळे वाहतुक मंदावते.

महापालिकेच्या विविध प्रकल्पांना, कामांना भेट देण्यासह आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरी प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. पाहणी दौऱ्याच्या दरम्यान त्यांना शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व अशास्त्रीय दुरुस्तीमुळे मोठी समस्या निर्माण झाल्याचे लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शहरात खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान ३ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहे. यासाठी १५ पथके तयार करण्यात येणार आहे. या पथकांना प्रत्येकी १० – १० किलो मीटरची जबाबदारी दिली जाणार आहे. यासाठी ७ ठेकेदारांना काम दिले जाणार आहे. या कामात ठेकेदारांना एक रुपये सुध्दा फायदा होणार नाही, असेही आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

महाराष्ट्र केसरी सिकंदरला शस्त्र तस्करीप्रकरणी पंजाबमध्ये अटक-महाराष्ट्रात खळबळ

0

मोहाली – सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखसह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात मोहाली (पंजाब) येथे अटक केली आहे. हरियाणातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीत दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. ती शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी मोहालीच्या एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर २६ ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार ऊर्फ हॅप्पी यालाही अटक केली. त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुले जप्त केली. या कारवाईची पोलिसांनी एकत्रित माहिती दिली.पुण्यात २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या माती गटातील अंतिम फेरीत पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे सिकंदर वादग्रस्त ठरला होता. यानंतर २०२४ मध्ये त्याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात भरतीही करून घेतले होते. मात्र नंतर त्याने ही नोकरी सोडली. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तो पंजाबमध्येच राहत होता.

दरम्यान चारही आरोपींकडून पोलिसांनी १.९९ लाख रोख, पाच पिस्तुले, काडतुसे, दोन एसयूव्ही गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड (पंजाब) पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अटकेतील आरोपी हरियाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम ऊर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहेत. उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ती पंजाब आणि परिसरात ते पुरवत होते. आरोपींपैकी तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तर सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती हंस यांनी दिली.

मुख्य आरोपी दानवीर याच्यावर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात खून, दरोडा, एटीएम फोडणे, आर्म्स अॅक्ट अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तो पपला गुर्जर टोळीचा सदस्य असून यूपी आणि मध्य प्रदेशातून शस्त्रांची तस्करी करण्याचे काम करतो.

सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२५ :फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील दोन वर्षांचा विशाखा समितीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणातील चार्जशीट वेळेत दाखल करावे असे आदेशही दिले.

या प्रकरणातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीला डॉ. कादंबरी बलकवडे आयुक्त आरोग्य सेवा, डॉ. नितीन अंबाडेकर संचालक आरोग्य सेवा हे समक्ष उपस्थित होते. तर दुरदृश्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक सातारा श्री. तुषार दोषी , जिल्हा चिकित्सक सातारा डॉ. युवराज कर्पे , धुमाळ वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय फलटण डॉ. अंशुमन धुमाळ, डॉ. आर. बी पवार उपसंचालक पुणे, सहभागी झाले होते. तसेच, राज्य महिला आयोग माजी सदस्या व शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी संगीता चव्हाणही यावेळी उपस्थित होत्या.

फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्री. धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी होत्या आणि रुग्णालयातील सर्व सहकाऱ्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. कोणतीही तक्रार त्यांच्याविरुद्ध नव्हती. पोस्टमार्टम विभागात त्यांच्यासोबत दोन महिला डॉक्टर कार्यरत असून कामकाजात कोणताही दबाव नसल्याचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. रुग्णालयात सुमारे ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस विभागाने काही अहवाल रुग्णालयाला सादर केला होता, ज्यावर समितीने चौकशी केली. तथापि, कोणतीही विभागीय चौकशी करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले की, सातारा जिल्हा रुग्णालयाने आपल्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांचा दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल तयार करून सादर करावा. तसेच तपासात कोणतीही ढिलाई होऊ नये आणि संबंधितांना न्याय मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, निराधार माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी पोलीस विभागाने अधिकृत बुलेटिनच्या माध्यमातूनच माहिती प्रसिद्ध करावी, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी विशाखा समितीच्या कार्यपद्धतीसाठी सुस्पष्ट एसओपी (SOP) तयार करण्याचे आणि समितीचा तिमाही अहवाल विधी व न्याय विभागाला सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच पोस्टमार्टम व प्रसूती विभागातील डॉक्टरांवर ताण निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्या मार्गदर्शनार्थ मदत कक्ष (Help Desk) स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

पोक्सोच्या प्रकरणात रुग्णालयात दाखल पीडिते सोबत असणाऱ्या एका नातेवाईकाची देखील जेवणाची सोय करावी. तसेंच गर्भवती महिलेच्या सोबत तिच्या पतीचे ही मार्गदर्शन करण्यात यावे. आरोग्य सेवा विभागाने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील सकारात्मक चर्चा करून शहानिशा करावी, असेही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

२७ ऊसतोड कामगारांना बंधमुक्त करून मूळ गावी रवाना

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पुणे, दि. 31ऑक्टोबर: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी (ता. कोपरगाव) येथील श्री. नाना जाधव यांनी जिल्हा विधी सेवा समिती, पुणे व जिल्हाधिकारी (स.यो.) पुणे यांचेकडे अर्ज देऊन आपले तसेच इतर नऊ कुटुंबांतील ऊसतोडणीस गेलेले कामगार मौजे राहु (माधवनगर), ता. दौंड, जि. पुणे येथील जमीनमालक हिरामण गणपत गाढवे यांनी बंधक ठेवले असल्याची तक्रार केली होती. संबंधित मालकाने कामगारांना मूळ गावी न जाण्यास सक्ती केली होती तसेच मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व महिलांचा अनादर करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा विधी सेवा समिती, पुणे यांच्या वतीने अॅड. देवभक्त महापुरे, अॅड. सुनिल म्हस्के आणि दीपक पवार यांची समिती गठीत करण्यात आली. समितीतील सदस्य, स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, कामगार आयुक्तालयाचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी जयंत भोसले, ग्राम महसूल अधिकारी राहु, कामगार विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून कारवाई केली. या संयुक्त मोहिमेत एकूण २७ ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना बंधमुक्त करण्यात येऊन संबंधित जमीनमालक हिरामण गणपत गाढवे यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात “The Bonded Labour System (Abolition) Act, 1976” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व कामगारांना आवश्यक प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वाहतुकीची सोय करून देण्यात आली. ही कारवाई दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्ण करण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५:जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

पुणे, दि. 31ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (पुणे ग्रामीण), सर्व उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना दिल्या. सर्व तडीपार प्रकरणांचा गुणवत्तेवर निपटारा करणे, दारूबंदी आदेश निर्गत करणे, शवबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच यापूर्वीच्या निवडणुकीतील गुन्ह्यांचा पाठपुरावा करणे यासंबंधी स्पष्ट निर्देश देण्यात आले.

ईव्हीएम व्यवस्थापनासंदर्भात पोलीस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, तसेच ईव्हीएम स्ट्राँग रूमला पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी अशा सूचना देण्यात आल्या. याशिवाय ईव्हीएमची योग्य हाताळणी, सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक माहिती भरणे, मतदार यादी अद्ययावत ठेवणे, मतदान वाढीसाठी मतदार जागृती अभियान राबवणे आणि सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीत निवडणुकीसंबंधित सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे काटेकोरपणे पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी केल्या.

पसंतीचा वाहन क्रमांक एमएच-12 वाय व्ही आरक्षणासाठी फेसलेस सेवा 1 नोव्हेंबरपासून सुरू

पुणे, दि. 31ऑक्टोबर: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची फेसलेस (ऑनलाईन) सेवा 1 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात कार्यान्वित असून, कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी ही सेवा घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून वापर करता येईल.

सदर फेसलेस सेवा २५ नोव्हेंबर २०२४ पासून कार्यान्वित असून, अर्जदार आधार लिंक मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपी घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नव्याने सुरू होणाऱ्या एमएच 12 वाय व्ही मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक अर्जदारांना आरक्षित करता येतील. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

“वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सामूहिक गान करा आयोजन आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहा :आदेश

पुणे, दि. 31ऑक्टोबर: शासनाच्या निर्देशानुसार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी “वंदे मातरम” या गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गानचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी “वंदे मातरम” गीताच्या सामूहिक गान प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार सर्वसाधारण, पुणे यांनी केले आहे.

या उपक्रमाचा उद्देश देशभक्तीची भावना दृढ करणे आणि “वंदे मातरम” या राष्ट्रगीतास १५० व्या वर्षानिमित्त अभिवादन करणे हा असून, जिल्ह्यात हा कार्यक्रम उत्साहात पार पाडावा असे आवाहनही तहसिलदार यांनी केले आहे.

‘महसूल न्यायालयीन खटले व्यवस्थापन प्रणालींचे आधुनिकीकरण’ या विषयावर राष्ट्रीय चिंतन शिबिराचे आयोजन

योग्य भूमी अभिलेखांसाठी सुलभ बदल नोंद प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची – मनोज जोशी

पुणे दि. 31 भारत सरकारच्या भूमी संसाधन विभाग (DoLR), मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) आणि पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) यांच्या सहकार्याने, ‘महसूल न्यायालयीन खटले व्यवस्थापन प्रणालींचे आधुनिकीकरण’ (RCCMS) या विषयावर 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 दरम्यान पुणे येथील यशदा येथे दोन दिवसीय राष्ट्रीय चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिराचे उद्घाटन आज (31 ऑक्टोबर) रोजी भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागाचे सचिव मनोज जोशी; महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव तसेच मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम; पुण्यातील यशदा’चे महासंचालक निरंजन के. सुधांसू; भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागाचे सहसचिव कुणाल सत्यार्थी; कर्नाटक राज्याच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव राजेंद्र कटारिया; आणि तेलंगणाचे अतिरिक्त मुख्य सचिव विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. देशभरातील इतर सर्व राज्यांचे प्रतिनिधी देखील या कार्यशाळेत सहभागी होत आहेत.

मनोज जोशी यांनी आपल्या प्रमुख भाषणात आधुनिक, पारदर्शक, कार्यक्षम आणि तंत्रज्ञान आधारित भूमी प्रशासनाचे आपले दृष्टिकोन मांडले. त्यांनी सुधारणा, नवोन्मेष आणि नागरिक-केंद्रित महसूल प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरात जरी समान भूमी अभिलेख प्रणाली कार्यरत असली तरीही दुरुस्ती आणि बदल प्रक्रिया प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, ज्यामुळे ती वेळखाऊ आणि गुंतागुंतीची बनते, असे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारने या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आधीच काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि या चिंतन शिबिराचे उद्दिष्ट या उपक्रमांवर संवाद सुलभ करण्यासाठी उच्च-स्तरीय व्यासपीठ म्हणून काम करणे, हे असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जोशी यांनी महसूल न्यायालयीन प्रक्रिया सुलभ करणे, हक्कांच्या नोंदींचे मानकीकरण (RoR) करणे तसेच महसूल विषयक संज्ञांचा एकसंध शब्दकोश तयार करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले. “मालमत्ता बाजारातील व्यवहार सुलभ असणे हे भूमीच्या मूल्यात वाढ होण्यासाठी आवश्यक आहे. तसेच बदल नोंद प्रक्रिया सुरळीत असणे हे योग्य भूमी अभिलेखन साठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. जोशी यांनी सर्व सहभागी प्रतिनिधींना देशभरातील भूमी प्रशासन प्रणालींची कार्यक्षमता सुधारण्यासाठी सूचना आणि कल्पना मांडण्याचे आवाहन केले.

कुणाल सत्यार्थी यांनी आधुनिक महसूल न्यायालयीन खटले व्यवस्थापन प्रणालीच्या उद्दिष्टांवर सविस्तर सादरीकरण केले, तसेच महसूल न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काही उपाययोजनांची शिफारस केली. कुणाल सत्यार्थी यांनी विद्यमान प्रक्रिया मजबूत करण्यासाठी अनेक अंतर्दृष्टीपूर्ण उपाय देखील सुचवले.

पुणे जिल्ह्यात कृत्रिम वाळू युनिट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 31 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातील सर्व इच्छुक व्यक्ती व संस्था ज्यांना एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिट स्थापन करायचे आहे, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

राज्यातील कृत्रिम वाळू धोरण जाहीर झाले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ही माहिती https://pune.gov.in या संकेतस्थळावरही अवलोकनासाठी उपलब्ध आहे.

एम-सॅण्ड युनिट स्थापनेसाठी इच्छुकांनी कागदपत्रांसह पूर्ण अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेत सादर करणे आवश्यक आहे.

अर्जासोबत मिळकतीचा चालू ७/१२ उतारा, वैयक्तिक अर्जदारासाठी – आधारकार्ड व पॅनकार्ड, संस्थेच्या नावाने अर्ज असल्यास – संस्थेची कागदपत्रे, उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र, अर्ज शुल्क रु. ५००/-, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या CTE परवान्याची प्रत, शंभर टक्के एम-सॅण्ड उत्पादनाबाबतचे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र व दगडाच्या पुरवठा स्रोताचा तपशील जोडणे आवश्यक आहे.

यापूर्वी महाखनिज सॉफ्टवेअर प्रणालीवर एम-सॅण्डसाठी अर्ज केलेल्या युनिटधारकांनाही पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

NSG कमांडो असताना पोलिसांनी गोळी का झाडली?; मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक गंभीर प्रश्न

राज्यातील गुन्हेगारीला फडणवीसांचे पाठबळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी?

अकोला व हिंगोलीतील शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश.

निवडणूक आयोगाविरोधातील सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस नेते व कार्यकर्ते सहभागी होणार.

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२५

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.यावेळी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सकाळी एक पोलीस थेट बेडरूमध्ये घुसून टेहळणी करत होता, तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहात का? पत्रकार आले आहेत का ?, यासह अनेक प्रश्न विचारले. तुम्ही बेडरुममध्ये प्रवेश का केला, कोणाचे आदेश आहेत, असे विचारले असता, वरिष्ठांचे आदेश आहेत असे म्हणत वरिष्ठांना फोनवर बोला असे सांगितले. अशा पद्धतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांवर पाळत ठेवण्याची भाजपाची प्रवृत्ती आहे, आधी पेगॅसेस नंतर फोन टॅपिंग केले. आता थेट बेडरुमपर्यंत ते पोहचले आहेत परंतु अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक प्रश्न…
पवईत काल पोलिसांनी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीचे एन्काऊंटर केले. या व्यक्तीने लहान मुलांना ओलीस ठेवले होते हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, मुलांची सुटका महत्वाची होती पण हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या वेळी एनएसजीचे पथक उपस्थित असताना पोलिसांनी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचे कारण काय. तो व्यक्ती मनोरुग्ण आहे असे सांगतिले जात आहे पण याच व्यक्तीने सुंदर माझी शाळा सारखे सरकारी उपक्रम राबिवले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर तो उपस्थित होता. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

गुन्हेगारांचा आका देवेंद्र फडणवीस…
डॉक्टर संपदा मुंडे यांना दबावामुळे आत्महत्या करावी लागली, ही आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेतले जात आहे. निंबाळकर यांना अनेकांना त्रास दिला आहे, त्यांचा अपहरण, खंडणी, मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यात हात असूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना क्लिन चिट देऊन टाकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्याच्या एका फुल व्रिकेत्यानेही भाजपाच्या पाच पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवून आपल्याला आत्महत्या का करावी लागत आहे हे सांगितले आहे. पोलिस सामान्य जनतेच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत.सत्ताधारीच गुंडगिरी करत असल्याने कारवाई होत नाही. फडणवीस यांच्या काळात राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली असून यात भाजपाचे नेते पदाधिकारी यांची गुंडगिरी वाढली आहे. या सर्वांना फडणविसच जबाबदार असून फडणवीस गुन्हेगारांचे आका आहेत असे सपकाळ म्हणाले.

शिवसेना, भाजपाच्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश…

अकोला जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली असून शासनाच्या विविध समित्यांवरही काम केले आहे. यासोबतच शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्क प्रमुख व हिंगोली जिल्ह्यातील नेते डॉ. रमेश शिंदे पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, युवासेना, भाजपा, शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच मोठा पक्ष प्रवेश झाला. त्यांनतर जालना जिल्ह्यात व नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे विविध पक्षातून नेते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात आणखी महत्वाचे नेते लवकरच प्रवेश करणार आहेत.

निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात काँग्रेस…
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या विरोधात १ नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केला आहे. मतदार याद्यामधील घोटाळे हा गंभीर व चिंतेचा विषय असून राहुल गांधी यांनी या प्रश्नाला सर्वाच आधी वाचा फोडली व पुराव्यासह गडबड घोटाळे उघड केले. निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शकपद्धतीने झाल्या पाहिजेत ही सर्वांची मागणी आहे. या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून मोर्चात काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल अर्जांना आता स्वयंचलित मंजूरी

डिजिटल ग्राहकसेवेत महावितरणचे आणखी एक पाऊल पुढे

मुंबई,: दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवेसाठी महावितरणने वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल (Change of Name) करण्याच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यास सुरवात केली आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ तीन ते सात दिवसांमध्ये वीजबिलावरील ग्राहक नावामध्ये बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यापूर्वी या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता.

राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना तत्पर व घरबसल्या सेवा देण्यासाठी महावितरणच्या डिजिटल सेवेत ग्राहकाभिमुख बदल करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बिलावरील ग्राहक नावात बदल (Change of Name) करण्याच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नुकतीच ऑनलाइन प्रणाली विकसित व कार्यान्वित करण्यात आली आहे.

खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलाच्या ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो. या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाईल अॅप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीजग्राहकांना ‘लॉग-इन’द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व प्रक्रिया शुल्क (Processing Fee)भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांचे अर्ज, छाननी व मंजूरी या प्रक्रियेसाठी मा. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या कृती मानकांप्रमाणे एक महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आता महावितरणकडून या अर्जांना स्वयंचलित मंजूरी मिळत असल्याने नावात बदल करण्याची कार्यवाही केवळ तीन ते सात दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.

ग्राहक नावात बदल करण्याचा ऑनलाइन अर्ज व अपलोड केलेल्या कागदपत्रांची संबधित उपविभाग कार्यालयाकडून तपासणी होईल. त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित ग्राहकांना लगेचच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल. सोबतच ग्राहक नावात बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेशही ग्राहकांना पाठविण्यात येईल. ग्राहक नावात बदल करण्याच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी मिळणार असल्याने प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह इतर ग्राहकांना महावितरणच्या डिजिटल सेवेचा तत्पर लाभ होणार आहे.

महावितरणने याआधी लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा वीजग्राहकांना मोठा लाभ झाला आहे. गेल्या महिन्याभरात २४६० औद्योगिकसह ४ हजार १६४ वीजग्राहकांनी एका क्लिकवर वीज भारामध्ये तब्बल २२ हजार किलोवॅटने वाढ केली आहे. त्यानंतर आता वीजबिलांवरील ग्राहक नावात बदल करण्याची मंजूरी स्वयंचलित केल्याने डिजिटल ग्राहकसेवेत महावितरणने मोठी आघाडी घेतली आहे.