Home Blog Page 328

पवन ऊर्जा क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ पुरस्कार

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२५: केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांशी सुसंगत राहून महावितरणकडून अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. सन २०३० पर्यंतच्या दीर्घकालीन वीज खरेदी करारात पवन-सौर संकरित ऊर्जेचाही समावेश करण्यात आला आहे. त्याची दखल घेऊन भारतातील पवन ऊर्जा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन विंड टर्बाइन मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या (IWTMA) चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत गुरुवारी (दि. ३०) केंद्रीय नवीन व नवीकरणीय मंत्री मा. श्री. प्रल्हाद जोशी यांच्याहस्ते महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात अपर मुख्य सचिव (ऊर्जा) सौ. आभा शुक्ला यांनी राज्याच्या वीज क्षेत्रासाठी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. या नियोजनाद्वारे प्रामुख्याने सौर ऊर्जेसह पवन-सौर हायब्रिड, पवन, बगॅस, बायोमास व लघु जलविद्युत अशा विविध अक्षय स्रोतांपासून वीज निर्मितीला प्रोत्साहन मिळाले आहे. तर अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांमध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने प्राधान्य दरांवर दीर्घकालीन वीज खरेदी करार (पीपीए) केले आहेत. यात ४ हजार ३४४ मेगावॅट पवन-सौर संकरीत विजेसाठी दीर्घकालीन खरेदी करार करण्यात आले आहेत.

चेन्नई ट्रेड सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत गुरुवारी (दि. ३०) केंद्रीय नवीन व नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याहस्ते महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महावितरणच्या वतीने मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी (नवीकरणीय ऊर्जा, मुंबई) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ऊर्जामंत्री एस. एस. शिवशंकर (तामिळनाडू) व के. जे. जॉर्ज (केरळ), केंद्रीय सचिव संतोषकुमार सारंगी व सहसचिव राजेश कुलहारी (नवीन व नवीकरणीय ऊर्जा), जोहान साथॉफ (संसदीय राज्य सचिव, जर्मनी), आयोजन समिती व असोसिएशनचे अध्यक्ष  गिरीश तांती यांची उपस्थिती होती.

ऊर्जा विभागाच्या रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅननुसार सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेची सह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. महाराष्ट्रातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. यामध्ये सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होईल व त्यायोगे सर्व वर्गवारीचे वीज दर कमी होत जाणार आहे.

पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा पुण्यात उत्साहात पार पडली

पुणे – पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पुण्यातील बी.एम.सी.सी. कॉलेज येथील टाटा हॉलमध्ये यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही स्पर्धा  बाकलीवाल ट्युटोरियल्स आणि किंग्स इंडियन चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रभरातील तरुण खेळाडूंनी बुद्धिमत्ता, रणनीती उत्साह आणि ऊर्जेचा सुंदर संगम या स्पर्धेत दिसून आला आहे.

एकूण ३१० खेळाडूंनी तीन गटांमध्ये १६, १४ आणि १२ वर्षे वयोगटाखालील असणाऱ्या खेळाडूंनी आपले कौशल्य आणि स्पर्धात्मकता प्रदर्शित केली. सात फेऱ्यांच्या या रॅपिड फॉरमॅटमध्ये प्रत्येक खेळाडूस १५ मिनिटे + प्रत्येक चालीनंतर १० सेकंदांची वाढ असा वेळ दिला गेला होता, जेणेकरून खेळाडूंनी झपाट्याने विचार करून आपली रणनीतीक कौशल्याची मांडणी करून आपले कौशल्य दाखविले पाहिजे.
या स्पर्धेचे उद्घाटन फिडे मास्टर गौरव बाकलीवाल यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले कि, खेळाडूवृत्ती, चिकाटी आणि निश्चय या तीन महत्वाच्या भूमिका चेस खेळताना खेळाडूंनी आत्मसात करायला पाहिजे तरच ते खेळाडू  बुद्धिबळ सारख्या स्पर्धेत आपला ठसा उमटवू शकतात.

यानंतर बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संस्थापक वैभव बाकलीवाल यांनी आंतरराष्ट्रीय चेस मास्टर अक्षय बोरगावकर (सध्या बी. टी. चा  इयत्ता ११ वी चा विद्यार्थी) याच्याशी रोचक संवाद साधला. या चर्चेत त्यांनी बुद्धिबळ आणि शैक्षणिक क्षेत्रातील परस्पर संबंध मांडले आणि बुद्धिबळामुळे विकसित होणारी विश्लेषणात्मक विचारसरणी, संयम व समस्यासोपीकरण कौशल्ये ही शैक्षणिक उत्कृष्टता तसेच २१व्या शतकातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील यशासाठी कशी उपयुक्त ठरतात, हे अधोरेखित केले.

तसेच, त्यांनी सहभागी खेळाडूंना काही आकर्षक बुद्धिबळ आणि तर्कशास्त्रावर आधारित कोडी व प्रश्न विचारले, ज्यांचा प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला पालक, प्रशिक्षक आणि बुद्धिबळप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा उपक्रम पुण्यातील तरुण बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. आयोजकांनी सर्व खेळाडू, पालक, स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि ही स्पर्धा दरवर्षी साजरी करून येणाऱ्या नवीन तरुण पिढीच्या बुद्धिमत्ता आणि रणनीतिक उत्कृष्टतेची परंपरा म्हणून पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

विजेते खालील प्रमाणे

16 वर्षाखालील गट (या गटातील सर्व विजेते बाकलीवाल टिटोरिअलचे विद्यार्थी आहेत)
1. विहान दावडा (FIDE रेटिंग – 1871, गुण 6.5/7)
2. ओजस देवशतवार (FIDE रेटिंग – 1778, गुण 6/7)
3. CM अर्णव कदम (FIDE रेटिंग – 1867, गुण 6/7)

14 वर्षाखालील गट

1. लाथिक राम (FIDE रेटिंग – 1896, गुण 6/7)
2. भुवन कोंनूर (FIDE रेटिंग – 1545, गुण 6/7)
3. AFM इशान कदम (FIDE रेटिंग – 1520, गुण 6/7)

12 वर्षाखालील गट

1. अविरत चौहान (FIDE रेटिंग – 2071, गुण 7/7)
2. शितिज प्रसाद (FIDE रेटिंग – 1783, गुण 6/7)
3. कविन मथियाझगन (FIDE रेटिंग – 1533, गुण 6/7)

रोहित आर्यवरील आर्थिक अन्यायाच्या कहाणीचा अंत… एन्काऊंटर ?

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा कल्पना रोहितची….

मुंबई- पवई परिसरात आर.ए. स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर करत खात्मा केला. पण या घटनेनंतर समोर आलेली पार्श्वभूमी अधिकच धक्कादायक आहे. पोलिसांच्या तपासात आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उघड झालेल्या माहितीनुसार, रोहित आर्य हा काही गुन्हेगार नव्हता, तर शासकीय यंत्रणेच्या अन्यायाला बळी पडलेला एक उद्योजक होता. शिंदे सरकारच्या काळात त्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला होता. पण त्या कामाचे दोन कोटी रुपयांचे मानधन सरकारने थकवल्याने तो नैराश्यात गेला आणि अखेर या टोकाच्या पावलाकडे वळला.

रोहित आर्य या घटनेपूर्वी वर्षभरापूर्वीच आंदोलनाच्या मार्गावर उतरला होता. त्याने राज्य सरकारकडून थकलेले पैसे मिळावेत म्हणून 16 ते 17 दिवस आमरण उपोषण केलं होतं. पुण्यातील एका सामाजी कार्यकर्त्याने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी आम्ही पत्रकार भवनाबाहेर आलो असताना एक व्यक्ती रस्त्यावर बेशुद्ध पडलेला दिसला. त्याच्याशी संवाद साधल्यावर आम्हाला समजलं की तो रोहित आर्य आहे आणि तो सरकारी अन्यायाविरोधात उपोषण करत होता. लोखंडे यांनी पुढे सांगितले की, रोहित आर्यने आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची पर्वा न करता स्वच्छता मॉनिटर उपक्रमासाठी घर आणि दागिने विकले होते. पण सरकारकडून त्याला ना पारितोषिक मिळालं ना मानधन.

या आर्थिक फसवणुकीमुळे रोहित आर्य मानसिकदृष्ट्या कोसळला. त्याने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात दोन वेळा उपोषण केलं, पण प्रत्येकवेळी केवळ आश्वासनांवरच त्याची बोळवण करण्यात आली. यामुळे त्याचं आयुष्य नैराश्याच्या गर्तेत गेलं. जवळपास वर्षभर तो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे आपल्या पैशासाठी चकरा मारत होता. अखेर त्याचा समाज आणि शासन या दोन्ही यंत्रणांवर विश्वास उठला. गुरुवारी जेव्हा त्याने 17 जणांना ओलीस ठेवले, तेव्हा त्याच्या मागे कोणताही दहशतवादी हेतू नव्हता, तर स्वतःचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता, असं पोलिस सूत्रांनी सांगितलं. पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी छातीत गोळी झाडून त्याचा खात्मा केला.

रोहित आर्यचा भूतकाळ पाहता तो शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्राशी निगडित होता. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, योजनेअंतर्गत त्याने शाळांमध्ये स्वच्छतेचा मॉडेल उभारण्याचं काम केलं होतं. राज्यातील अनेक शाळांमध्ये त्याचा उपक्रम यशस्वी झाला. या योजनेचा उद्देश शाळांचं आधुनिकीकरण आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण करणं हा होता. पण शिंदे सरकार गेल्यानंतर आणि फडणवीस यांनी सत्तेची सूत्रं हातात घेतल्यानंतर या योजनेला कात्री लावण्यात आली. निधीअभावी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, ही योजना बंद करण्यात आली आणि त्या सोबत रोहित आर्यासारख्या ठेकेदारांचे पैसेही अडकले.

दरम्यान, रोहित आर्यच्या एन्काऊंटरनंतर ही योजना पुन्हा चर्चेत आली आहे. शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य, एक गणवेश आणि पुस्तकाला वह्यांची पान, असे अनेक उपक्रम याच काळात थांबवण्यात आले होते. या योजनांच्या माध्यमातून राज्यभरातील शाळांमध्ये स्पर्धा, पारितोषिक वितरण आणि सौंदर्यीकरणाचे कार्यक्रम घेण्यात येत होते. पण सरकारने निधी रोखल्याने हजारो शाळा आणि शिक्षणाशी संबंधित कामगार अडचणीत आले. रोहित आर्य हा त्याच व्यवस्थेचा बळी ठरला. त्याच्या मृत्यूनंतर या योजनेच्या पारदर्शकतेबाबत आणि थकीत देयकांच्या चौकशीची मागणी होत आहे.

या घटनेने शासनव्यवस्थेच्या संवेदनशून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. एका माणसाने सरकारी कामासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं आणि शेवटी त्याला निराशेच्या भरात प्राण द्यावे लागले. पवईतील एन्काऊंटरने जरी ओलीस प्रकरणाचा शेवट केला असला, तरी रोहित आर्यच्या कथेनं समाजाला विचार करायला भाग पाडलं आहे. शासनाच्या विलंबित निर्णयांमुळे आणि नोकरशाहीच्या दिरंगाईमुळे किती आयुष्यं उद्ध्वस्त होतात, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं आहे. आता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, योजनेतील आर्थिक व्यवहार आणि थकीत देयके याबाबत सविस्तर चौकशी करून अशा शोकांतिका पुन्हा होऊ नयेत, यासाठी पावलं उचलावीत, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

रोहित आर्यला खिशातून पैसे देण्याची गोष्ट शंकास्पद:RTI कार्यकर्त्याचे केसरकर, IAS सुरज मांढरेंकडे बोट

पुणे-एखाद्या वेबसीरिज किंवा चित्रपटाला शोभेल असे थरारनाट्य गुरूवारी मुंबईच्या पवई भागात घडले. रोहित आर्य नामक व्यक्तीने ऑडिशनच्या नावाखाली 17 लहान मुलांचे अपहरण केले. हे अपहरणनाट्य रोहितला यमसदनी पाठवल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच संपुष्टात आले. त्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःहून पुढे येत आपण रोहित आर्यला आपल्या खिशातून पैसे दिल्याचा दावा केला. पण आता त्यांच्या याच दाव्यावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दीपक केसरकर यांनी रोहित आर्यला त्यांच्या खिशातून पैसे दिल्याची गोष्ट शंका निर्माण करणारी आहे, असे ते म्हणालेत.

विजय कुंभार शुक्रवारी आपल्या एका पोस्टद्वारे रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात दीपक केसरकर व आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दीपक केसरकर यांनी रोहित आर्यला त्यांच्या खिशातून पैसे दिल्याची गोष्ट शंका निर्माण करणारी आहे . कोणताही मंत्री कंत्राटदाराला अशा प्रकारे पैसे देणार नाही. त्यामुळे या कृतीमागील हेतू आणि प्रशासनाची, विशेषतः आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. केसरकरांनी स्वतः चेकद्वारे मदत केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे या व्यवहाराचा सखोल तपास आवश्यक आहे कारण सामान्य व्यवहारात अशी वैयक्तिक मदत संशयास्पद ठरते, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.


दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. शासनाकडं थकीत असलेल्या बिलासाठी रोहित आर्याने मुलांना ओलीस धरण्याचं अघोरी आणि गुन्हेगारी कृत्य केलं यात काही शंका नाही, पण त्याच्या थकीत बिलाच्या विषयाकडं मात्र दुर्लक्ष करता येणार नाही. ठेकेदारांची तब्बल ८० हजार कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत.

बिलं मिळत नसल्याने यापूर्वी नागपूर तसंच सांगली येथील तरुण ठेकेदाराने आत्महत्या केली आहे. तरीही सरकारला याचं गांभीर्य कळत नाही. थकीत बिलांची मागणी करणाऱ्या ठेकेदारांनी चुकीचं पाऊल उचलावं आणि यात त्याचा एन्काऊंटर करावा किंवा त्याने स्वतःहून तरी आत्महत्या करावी, याची तर सरकार वाट बघत नाही ना? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अन्य एक नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी सरकारला काही प्रश्न विचारलेत. कंत्राटदारांना आपले पैसे मिळवण्यासाठी आता अपहरण करावे लागत आहे. ही पोस्ट CMO महाराष्ट्र ची आहे. यात काल एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्य याचा उल्लेख आहे. रोहित आर्यचे सरकारकडे काही कोटी रुपये थकीत होते. ते मिळत नसल्याने त्याने लहान मुलांचे अपहरण करण्याचा कट रचला. अर्थात याच समर्थन मी मुळीच करणार नाही, पण आर्यवर ही वेळ का आली..? याच उत्तर सरकार देणार आहे का..? असे ते म्हणालेत.

रोहित आर्यचे एन्काऊंटर फेक:वकील नितीन सातपुते यांचा आरोप; API ला हिरो व्हायचे म्हणून छातीत गोळी घातल्याचा दावा

रोहित आर्यवर ‘ती’हि’ परिस्थिती सरकारनेच आणली. हा प्रसंग टाळता आला असता.

मुंबई-आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचे मुंबई पोलिसांनी केलेले एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी केला आहे. पोलिसांना रोहित आर्य यांच्या हात किंवा पायावर गोळी मारता आली असती. पण डीसीपी अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचे असल्यामुळे त्यांनी थेट त्याच्या छातीत गोळी घालून त्याला यमसदनी पाठवले, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील ‘रा’ स्टुडिओत गुरूवारी घडलेल्या अपहरणनाट्यामुळे अवघा देश हादरला. पोलिसांनी अपहरकर्त्या रोहित आर्य नामक व्यक्तीला गोळ्या घालून ठार केले. पण आता या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी या प्रकरणी पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हायकोर्टात दाद मागण्याचे संकेत दिलेत. रोहित आर्य याला गोळी घालून ठार मारण्याऐवजी दुसरा काही उपाय नव्हता का? असा प्रश्न त्यांनी या संबंधी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले, बचाव मोहीम सुरू असताना रोहित आर्य डीसीपी दत्ता नलावडे यांच्याशी संवाद साधत होता. पोलिसांना रोहित आर्य याची प्राश्वभूमी माहिती झाल्यानंतर त्यांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क का साधला नाही? तो दीपक केसरकर यांच्या संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांनी केसरकरांना त्याच्याशी का बोलू दिले नाही? मुंबई पोलिसांनी या प्रकरणी टोकाचे पाऊल का उचलले? रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवले, पण त्याच्यावर ती परिस्थिती सरकारनेच आणली. हा प्रसंग टाळता आला असता.

रोहित आर्य अतिरेकी नव्हता. सरकारची कामे करत होता. त्याने त्याच्या सरकारी कामाचे पैसे मिळवण्यासाठी उपोषणही केले होते. पण सरकारने त्याला ते पैसे दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर असे कृत्य करण्याची वेळ आली. सरकारने त्याला का वाचवले नाही?

नितीन सातपुते पुढे म्हणाले, रोहित आर्यकडे पिस्तुल होते की नाही हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही. डीसीपी दत्ता नलावडे यांनी या प्रकरणी तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच्याकडे छऱ्यांची बंदूक होती. त्या बंदुकीने कुणाचीही हत्या करता येत नाही. पोलिसांना रोहित आर्यच्या हात किंवा पायावर गोळी मारता आली असती. पोलिस म्हणतात, आम्ही पायावरच गोळी मारली. पण पायातून काहीतरी काढायला तो खाली वाकला आणि गोळी छातीत घुसली. पोलिसांचे हे स्पष्टीकरण खोटे असल्याचे एखादा लहान मुलगाही सांगेल.

एपीआय अमोल वाघमारे या अधिकाऱ्याला हिरो व्हायचे होते. त्यामुळे त्याने हे एन्काऊंटर केले. पोलिसांनी मुलांची सुटका केली ही कौतुकाची गोष्ट आहे, पण ज्याला एन्काऊंटरमध्ये मारले तो सराईत गुन्हेगार नव्हता. त्याचा फेक एन्काऊंटरमध्ये खून करण्यात आला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असेही नितीन सातपुते यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (MOA) निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्‍या पॅनेलची घोषणा

मुंबई – महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेच्‍या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या ऑलिम्‍पिक पॅनेलचे पारडे जड असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे. येत्‍या रविवारी होणाऱ्या एमओएच्‍या निवडणुकीत अजित पवार गटाचे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्‍यापैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

मुंबईत दिनांक २ नोव्‍हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑलिम्‍पिक पॅनलची घोषणा अर्जुन पदक विजेते अशोक पंडित आणि ध्यानचंद पदक विजेते प्रदीप गंधे यांनी केली आहे. ३० मतदार संघटनांपैकी २२ पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे…
अध्यक्ष – अजित पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष – अशोक पंडित, उपाध्यक्ष – आदिल सुमारीवाला- (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष- प्रदिप गंधे, (बिनविरोध निवड) उपाध्यक्ष – प्रशांत देशपांडे, (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष – दयानंद कुमार , (बिनशर्त पाठिंबा) सचिव – नामदेव शिरगांवकर, सहसचिव – निलेश जगताप, उदय डोंगरे, मनोज भोरे, चंद्रजीत जाधव, खजिनदार – स्‍मिता शिरोळे, कार्यकारिणी सदस्य – संदिप चौधरी,संदिप ओंबासे,राजेंद्र निम्‍बाते, गिरीश फडणीस,रणधीरसिंग,किरण चौगुले,समीर मुणगेकर,संजय वळवी, सोपान कटके आदी.

बहुमत असल्‍याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या गटाचा विजय निश्चित आहे. यापूर्वीच उपाध्यक्ष पदासाठी आदिल सुमारीवाला, प्रदिप गंधे व प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजयी उमेदवार आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदिप गंधे म्‍हणाले की, गेल्‍या पाच वर्षांत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धेत देशात अव्‍वल स्‍थान पटकावले आहे. याचे श्रेय क्रीडा क्षेत्राला सर्वतोपरी मदत करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,क्रीडामंत्री, क्रीडा प्रशासन यांना देखील आहे. पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेने राज्यातील सर्व क्रीडा संघटनांना सोबत घेऊन काम केले आहे. राज्यातील खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेऊन मागील तीन वर्षांमध्ये तीनही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. हे यश राज्यातील सर्व क्रीडा संघटना आणि खेळाडूंच्या प्रयत्नांचेच आहे. अजित पवार यांच्‍या कार्यकुशल नेतृत्‍वामुळे एमओएच्‍या संकल्‍पनेतून राज्यात महाराष्ट्र ऑलिम्‍पिक भवनासह देशातील पहिले क्रीडा संग्रहालय साकार होत आहे. यामुळेच निवडणुकीत बहुसंख्य संघटनांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. खेळामध्ये कुठलेही राजकारण न आणता क्रीडा क्षेत्रासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा अजित पवार गटाचा मानस आहे.

चौकट
महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेतील २२ पेक्षा अधिक संघटनांनी पुण्यातील बैठकीत उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. ही कुठलीही राजकीय निवडणूक नाही. त्यामुळे मी स्वतःही कोणतेही राजकीय विधान केलेले नाही.कोणी राजकीय रंग देत असतील तर ती महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली पाहिजे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

फडणवीस गुंडाच्या टोळ्यांना पाठीशी घालत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप: महिला अत्याचारावरून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची केली मागणी

पुणे-भाजपाच्या राजवटीत महिलांवर होणारे अन्याय व अत्याचारांची तीव्रता वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने सत्तेत असणाऱ्या भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांतील नेत्यांकडून वारंवार महिलांवर अत्याचार झाल्याचे दिसून येते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडाच्या टोळीला पाठीशी घालत डॉ. संपदा मुंडे यांच्यासारख्या पिडीतेला न्याय मिळू नये यासाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते. संबंधित आरोपींना लवकरात लवकर कठोर दंड देण्यात यावा असे सांगत रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉक्टर सेल व महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून लाल महल येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आपल्या भाषणात शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘बंगालमध्ये एका डॉक्टरची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशातील भाजप नेते रस्त्यावर उतरले होते, परंतु महाराष्ट्रातील डॉ. संपदा मुंडे प्रकरणामध्ये एकही भाजपा नेता साधा निषेध करताना दिसत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस हे गुंडाचा मोहरक्या म्हणून कार्य करतात का? भाजपचे माजी आमदार रणजीत निंबाळकर व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना कोणतीही चौकशी न करता क्लिन चिट देण्याचे पाप फडवणीसांनी केले आहे. या घटनेचा आम्ही या आंदोलनाद्वारे निषेध करतो व स्व. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत राहू.’’

यानंतर डॉक्टर सेलचे डॉ. राहुल सावंत म्हणाले की, ‘‘डॉ. संपदा मुंडे या आपले कार्य प्रामाणिकपणे करीत असताना त्यांच्यावरती शासकीय पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दबाव आणून वारंवार त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम केले. या प्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा व्‍हावी असे न झाल्यास कोणत्याही डॉक्टरी पेशातील व्‍यक्तीला या देशामध्ये आपले कार्य मुक्तपणे  करता येणार नाही.’’

महिला आघाडीच्या प्राची दुधाणे यावेळी म्हणाल्या की, ‘‘महाराष्ट्रातील सरकार आपल्या नेत्यांना पाठिशी घालण्याचे कार्य खुबीने करीत आहे. रणजीत निंबाळकरांना वाचविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संगनमताने विषय भरकटविण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्र्यानी गुन्हेगारांना कोणत्याही तपासाविना क्लिन चिटच देऊन टाकली आहे. रूपाली चाकणकर या स्वत: महिला असून डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे चारित्र्य हनन करून तिच गुन्हेगार असल्याचे निर्लज्जपणे जाहिर केले. या गंभीर प्रकरणात महिलांच्या प्रती असंवेदनशिल व निष्क्रीय असणाऱ्या रूपाली चाकणकर यांना त्वरीत पदमुक्त करावे.

तसेच SIT व CBI  यंत्रणेच्या हातात तपास देवून फास्टट्रॅक कोर्टामध्ये डॉ. संपदा मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.’’

यावेळी डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळाच पाही, ‘‘रूपाली चाकणकर आहे कोण? तिला पायताण हाणा दोन’’, ‘‘भाजप सरकारचा धिक्कार असो’’, ‘‘सत्तेच्या खुर्च्या खाली करा खाली करा’’, ‘‘धिक्कार असो धिक्कार असो फडणवीषचा धिक्कार असो’’, ‘‘धिक्कार असो धिक्कार असो रक्तरंजीत धिक्कार असो’’ अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवतेत महाराष्ट्र प्रदेश काँगेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, नगरसेविका लता राजगुरू, अजित दरेकर, महिला आघाडीच्या प्राची दुधाने, मेहबुब नदाफ,  डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. सुलक्षणा जगताप, डॉ. राहुल सावंत, डॉ. स्नेहल पाडळे, डॉ. नीरज जाधव, डॉ. ऐश्वर्या वाघ कुलकर्णी, अर्चना शहा, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, अनुसया गायकवाड, अनिता धिमधिमे, सिमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओव्‍हाळ, सुविधा त्रिभुवन, रेखा जैन, ॲड. राजश्री अडसूळ, अंजली सोलापूरे, रोहिणी मल्लाव, सोशल मिडिया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, अनिल पवार, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, अविनाश अडसूळ, फिरोज शेख, सचिन भोसले, श्री. काकडे, राज जाधव, सुरेश नांगरे, देवीदास लोणकर, भगवान कडू, संजय अगरवाल आदि उपस्थित होते. 

वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय एकता दौड

पुणे-लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने आंबेगाव पोलीस स्टेशन तर्फे राष्ट्रीय एकता दौड अंतर्गत अभिनव कॉलेज आंबेगाव बुद्रुक ते गायमुख चौक अशी मॅरेथॉनचे आयोजन केले होते.या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उपस्थित स्पर्धक, विद्यार्थी, नागरिक तसेच पोलीस स्टेशन कडे अधिकारी अंमलदार यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले . हि मॅरेथॉन अभिनव कॉलेज आंबेगाव बुद्रुक ते फिरंगाई देवी ते भेंडी चौक ते राम मंदिर ते गायमुख चौक ते परत अभिनव कॉलेज आंबेगाव बुद्रुक पुणे अशा मार्गावर संपन्न झाली

पोलीसठाण्यातील 08 अधिकारी व 50 अंमलदार तसेच 200 ते 250 विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शांतता समिती, पोलीस मित्र, पत्रकार, मॉलला कमिटी अल्पसंख्याक कमिटीचे सदस्य असे अनेक मान्यवर आणि नागरिक या मॅरेथॉन म्ध्त्ये सहभागी झाले होते तसेच भारती विद्यापीठ वाहतूक शाखेकडे योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.

..हे वागणे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही… अजित पवारांचा मुरलीधर मोहोळांना टोला

निवडणुकीत कोणी राजकारण आणू नये, खिलाडूवृत्ती हवीमहाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनची कामगिरी देशात अव्वलखेळाडूंवर क्रीडा मंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मुंबई दि.३१ : – महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

सन २०१३ पासून आपण महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.या कालावधीत खेळाचा दर्जा सुधारावा, खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात,म्हणून सर्वांना सोबत घेऊन आपण काम केले. आम्ही कार्यभार घेण्याआधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या/ आठव्या स्थानावर होते.पण सलग मागील तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आता प्रथम क्रमांकावर आहे. या यशाबद्दल महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या पथकाचे आणि पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सत्कारही झाले आहेत. प्रदीप गंधे,संजय शेटे, स्मिता शिरोळे, नामदेव शिरगावकर, धनंजय भोसले आधी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे हे सगळं शक्य झालं.

अस असताना केवळ निवडणुकांवर डोळा ठेऊन काही राजकीय व्यक्ती,संघटनेच्या एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी विविध आरोप राजकीय हेतूने करत आहेत, हे वागणे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही. खेळाडूंची अशी कोणतीही तक्रार नसून,असे आरोप कोणत्याही खेळाडूने अद्याप केलेले नाहीत,असे अजित पवार स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की,१३ कोटीच्या भ्रष्टाचाराचा राजकीय आरोप ज्या पदाधिकाऱ्यावर केला आहे, तो पदाधिकारी खजिनदारही नाही.संघटनेकडे जो निधी येतो तो कोणा एका पदाधिकाऱ्याच्या हातामध्ये नसतो. संपूर्ण एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल त्याच्यावर देखरेख करत असते. तिच्या मान्यतेने तो खर्च होतो.या खर्चाचा हिशेब खजिनदार ठेवतात.संघटनेचे खजिनदार म्हणून धनंजय भोसले यांच्या अखत्यारीमध्ये त्याचे हिशोब होते. प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विविध खेळांसाठी महाराष्ट्राचे साधारणतः ८०० ते १००० खेळाडू सहभागी होतात. या सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्या- येण्यासाठी विमान प्रवासाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली होती. महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेच्या रचनेनुसार संलग्न विविध खेळांच्या ३० संघटनांकडून देखील शासनाकडून आलेल्या निधीतील बराचसा निधी वापरला जातो आणि त्याचा हिशोब त्यांच्याकडून आल्यानंतर तो एकत्रित करून क्रीडा विभागाला तो सादर करण्यात येतो. त्या संघटनांनी हिशेब दिल्याशिवाय ऑलिंपिक असोसिएशनला शासनाला एकत्रित हिशेब देणे शक्य होत नाही. तेव्हा खऱ्या दोषी या हिशेब न देणाऱ्या संघटना असतात. अशा दोषी संघटनांमध्ये मोहोळ यांची संघटना व त्यांना पाठिंबा देणाऱ्या ५/६ संघटना आहेत. त्यांनी त्वरित हिशेब द्यावेत. त्यांनी हिशेब न दिल्याने असोसिएशनला हिशेब देणे शक्य झाले नाही,हे विचारात घेऊनच शासनाने हिशेब सादर करण्यास दोन महिने मुदतवाढ दिली आहे.

प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शासन चार ते पाच कोटी रुपयांचे अनुदान देते.हे अनुदान महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन त्यांच्या संलग्न ३० संघटनांच्या माध्यमातून खर्च करत असते.या सर्व हौशी,विश्वस्त संस्था असल्यामुळे त्यांच्याकडे शासकीय यंत्रणेप्रमाणे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे हिशोब येण्यास उशीर होतो. ही एक फार महत्त्वाची बाब आहे,याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.३६ व्या आणि ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा हिशोब क्रीडा विभागाला असोसिएशनकडून याआधीच सादर झालेला आहे. ३८ व्या स्पर्धेचा हिशोब मात्र वेगवेगळ्या टप्प्यावर प्रक्रियेमध्ये असून सदस्य संघटनांकडून तो अद्याप प्राप्त झालेला नाही. मोहळांच्या संघटनेकडून आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पाच सहा संघटनांकडून देखील अद्याप हिशोब सादर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर अन्य दहा-बारा संघटनांचा देखील हिशोब आलेला नाही. तो एकत्रित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रक्रिया सुरू असताना केवळ हिशेब सादर झाला नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार केला, असे म्हणणे योग्य नाही.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन ही धर्मादाय संस्था आहे. तेव्हा या संस्थेविरुद्धच्या तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडे होणे आवश्यक होते.असे न करता,केवळ हिशेब सादर केले नाही म्हणून राजकीय दबावापोटी पहाटे तीन वाजता ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो.यात पोलिसांवर कोणी दबाव टाकला, हे संदीप जोशींनी सांगावं, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

ही निवडणुक पुढे ढकलण्याचेही प्रयत्न. झाले. ती पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयात एकूण सहा प्रकरणे दाखल झाली होती .पण न्यायालयाने ती सर्व फेटाळून लावली. जी प्रकरणे न्यायालयात फेटाळून लावली,त्यात ज्या गोष्टी,कारणे नमूद होती,ती सर्व कारणे न्यायालयाने फेटाळली असताना,त्याच गोष्टींसाठी पुन्हा तक्रारी,गुन्हे दाखल झाले. पोलीसांना तक्रारी घेण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसांमध्ये तक्रारी करून संबंधित पदाधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.निवडणुकीसाठी नेमलेल्या निवडणूक अधिकारी ,जे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत,त्यांना पोलिसांनी राजकीय तक्रारीवरून पोलिस स्टेशनमध्ये चौकशी साठी बोलावले.हे सर्व कोणाच्या दबावाने झाले, हे संदीप जोशींनी सांगावे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

क्रीडा संघटनाच्या निवडणुकांमध्ये राजकारण नको म्हणून आपण हे सर्व सहन केलं. कुठलेही राजकीय भाष्य अद्याप पर्यंत केल नाही. पण आता तेच जर पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असतील,तर त्याला उत्तर देणे आवश्यक आहे,म्हणून आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दबाव टाकण्याची भाषा करतात,असे ते म्हणतात. त्यांच्यासाठीही अनेक मंत्र्यांपासून केंद्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे फोन मतदारांना येत आहेत. याला काय दबाव म्हणायचं ?मुख्यमंत्र्यांनीही बऱ्याच क्रीडा संघटनांना वर्षा बंगल्यावर अलीकडेच बोलावले होते. म्हणजे त्यांनी दबाव आणला असे आम्ही म्हणणार नाही. केवळ ऑलिंपिक असोसिएशन नाही,तर अनेक संघटनांनी अद्याप निधीच्या खर्चाचे हिशेब दिलेले नाहीत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संस्थेला राज्यस्तर कुस्ती स्पर्धेसाठी शासनाने अनुदान म्हणून सन २०२३- २०२४ साठी दिलेल्या १ कोटी एवढ्या रकमेचा हिशेब अद्याप शासनास सादर केलेला नाही.अजूनही बऱ्याच संघटनांना हिशेब सादर करणे शक्य झालेले नाही.म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला असे होत नाही.हिशेब सादर केले नाही, म्हणून या सर्वांवर पोलीस केस दाखल करावी का ? वा भ्रष्टाचार केल्याचे आरोप करावेत का ? … असे करणे मला योग्य वाटत नाही. खेळात खिलाडूपणा पाहिजे.सुडाची भावना नको,या मताचे आम्ही आहोत. मोहोळांच्या संघटनेसह प्रत्येक संघटनेने आपापले हिशोब वेळेत द्यावेत,म्हणजे आमच्या असोसिएशनला वेळेत हिशेब सादर करता येतील,अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे राजकीय आरोप क्रीडा संघटनांच्या निवडणूक प्रक्रियेत होणं हे काहीस अस्वस्थ करणार आहे.
क्रीडा क्षेत्रामध्ये आपण गेली अनेक वर्षे कार्यरत आहोत. आमचे काम संघटनांना आवडत असेल तर संघटना आम्हाला निवडून देतील. आतापर्यंत माझ्यासह, माझ्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य पाहून पुन्हा आमच्या हातात पुन्हा ही सूत्र दिली जातील,असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
00000

‘CA टाॅपर’टाईप..पुण्यात ‘प्रेग्नेंट जॉब’ जाहिरातीने गंडविले 11 लाखाला

असा पुरूष हवाय जो मला आई बनवेल…!सोशल मीडियावरील जाहिरात करून लाखोंची फसवणूक, वाचा नेमकं प्रकरण…

नेट फ्लिक्स वर आर्थिक अडचणीत सापडलेला एक प्रामाणिक सरकारी नौकर कसा पुरुष वेश्या बनतो याची कहाणी दाखविणारी ‘CA टाॅपर’ हि मालिका ज्यांनी पाहिली असेल त्यांना या प्रकारचा तातडीने उलगडा होईल बहुधा याच पद्धतीचा पण वेगळ्या स्वरूपाची गुन्हेगारी पुण्यात सुरु झालीय कि काय असे वाटावे अशी हि बातमी आहे. असा पुरूष हवाय जो मला आई बनवेल…! अशा आशयाची जाहिरात करून तब्बल २५ लाख रुपयांचे त्यासाठी आमिष दाखवून एका कंत्राटदाराला ११ लाखाला कसा गंडा घालण्यात आला याबाबतची माहिती आता बाणेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याने चव्हाट्यावर आणली आहे.

एका सायबर सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून देशाच्या विविध भागात “गर्भधारणेच्या नोकरी सेवा” च्या बनावट जाहिराती येत आहेत. २०२२ च्या अखेरीपासून अशा फसवणुकीत झपाट्याने वाढ झाली आहे. व्हिडिओंमध्ये महिला गर्भवती होण्यासाठी पुरुषाला मोठी रक्कम देण्यास तयार असल्याचा दावा करताना दिसतात. या जाहिरातींमुळे प्रभावित होऊन, पुरुषांकडून प्रथम नोंदणी शुल्क आकारले जाते आणि नंतर वैद्यकीय चाचण्या, कायदेशीर औपचारिकता किंवा सुरक्षा ठेवींसाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जातात. पैसे मिळाल्यावर, फसवणूक करणारे गायब होतात.”बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधील पोलिसांनी अशा अनेक प्रकरणांमध्ये अटक केली आहे. तपासात असे दिसून आले आहे की, हे सायबर गुन्हेगार देशभरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी सोशल मीडिया आणि बनावट व्हिडिओ जाहिरातींचा वापर करत आहेत. पुणे पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या आणि आक्षेपार्ह जाहिरातींना बळी पडू नका. कोणत्याही संशयास्पद लिंक्स, कॉल्स किंवा ऑफरची तक्रार सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा www.cybercrime.gov.in वर त्वरित करावी

पुणे-सोशल मीडियाच्या या झगमगाटीच्या जगात आजकाल विविध नोकऱ्यांचे घोटाळे फोफावत आहेत. पुण्यातील एका ४४ वर्षीय कंत्राटदाराची कहाणी खरोखरच भयावह आहे. बनावट जाहिरातीला बळी पडून त्याने लाखोंचे नुकसान केले.सोशल मीडियावरील जाहिरातीत एका महिलेने लिहिले होते, “मला असा पुरूष हवा आहे जो मला आई बनवू शकेल.” महिलेने गर्भधारणा केल्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आश्वासन होते. पण प्रत्यक्षात तो एक सापळा होता. ज्यामुळे कंत्राटदाराचे ११ लाख रुपये गमवावे लागले. ही घटना वाचून तुम्हालाही हादरा बसेल.

तक्रारदाराला जेव्हा कळले की, तो सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा बळी पडला आहे तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना केवळ वैयक्तिक कटाचे उदाहरण नाही तर सायबर गुन्हेगारांच्या नवीन धूर्ततेवरही प्रकाश टाकते. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या या कंत्राटदाराला फेसबुकवर एक जाहिरात दिसली.जाहिरातीत एका आकर्षक महिलेचा फोटो होता जी गर्भवती राहू शकत नसल्याचा आरोप होता. जाहिरातीत ती म्हणाली, “मला मूल हवे आहे, पण नवरा नको. जो पुरुष मला तीन महिन्यांत गर्भवती करेल त्याला २५ लाख रुपये, गाडी आणि घरात वाटा मिळेल. मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवू शकेल. मला मातृत्वाचा आनंद देऊ शकेल. तो शिक्षित आहे की नाही, तो कोणत्या जातीचा आहे, तो गोरा आहे की काळा आहे याची मला पर्वा नाही, असं लिहिलं होतं.

आर्थिक अडचणीत असलेल्या कंत्राटदाराला वाटले की, पैसे कमविण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. त्याने जाहिरातीच्या शेवटी दिलेल्या नंबरवर कॉल केला. कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख “प्रेग्नंट जॉब्स” नावाच्या कंपनीत सहाय्यक म्हणून करून दिली. त्याने सांगितले की, तो त्या महिलेसोबत राहून काम सुरू करण्यापूर्वी तिला कंपनीत नोंदणी करावी लागेल आणि ओळखपत्र द्यावे लागेल. त्यानंतर कंत्राटदाराकडून नोंदणी शुल्क, ओळखपत्र शुल्क, पडताळणी शुल्क, जीएसटी, टीडीएस, प्रक्रिया शुल्क इत्यादी विविध सबबीखाली पैसे मागितले गेले.

याबाबत तपास अधिकाऱ्याने सांगितले की, “तक्रारदाराची इतकी फसवणूक झाली की त्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते २३ ऑक्टोबर दरम्यान १०० हून अधिक छोटे व्यवहार केले. एकूण रक्कम ११ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. ही सर्व देयके यूपीआय आणि आयएमपीएस ट्रान्सफरद्वारे करण्यात आली.” तक्रारदाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्याला ब्लॉक केले. त्यानंतरच त्याला समजले की तो सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. तक्रारीनंतर, बाणेर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

निवडणूक आयोग मतदार याद्या दुरुस्त का करत नाही? जाब विचारण्यासाठी १ नोव्हेंबरला मोर्चा: हर्षवर्धन सपकाळ

महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी झाली पाहिजे.

मुंबई, दि. ३० ऑक्टोबर २०२५

मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबईत आज १ नोव्हेंबरच्या मोर्चाचा अनुषंगाने बैठक आयोजित केलेली होती पण काही वैयक्तीक व घरगुती कामामुळे मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही पण काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. १ तारखेच्या मोर्चातही काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार आहे. या बैठकीला वा मोर्चात कोण सहभागी होणार हे गौण असून मुद्दा महत्वाचा आहे असेही सपकाळ म्हणाले.

बच्चु कडू यांच्या आंदोलनावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकार कधी पोलिसांना तर कधी कोर्टाला पुढे करून मुख्य मुद्द्यापासून पळ काढत आहे. कोर्टाला पुढे करून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारमध्ये हिम्मत असेल तर पुढे येऊन चर्चा केली पाहिजे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले व आता कर्जमाफी करण्यास वेळकाढूपणा का केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असेल तर हा त्यांचा नाकर्तेपणा आहे, त्यांची पत असेल तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जावून महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

खासगी कोचिंग क्लास तपासणीसाठी समिती गठित करावी – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. 30 : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबईमधील खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून 15 दिवसात अहवाल सादर करावा असे, निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता खासगी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाणे, मुंबईत ॲलन क्लासेसच्या अनेक शाखा कार्यरत असणे, यासंदर्भात पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये विधानपरिषद सदस्य राजेश राठोड यांच्या लक्षवेधीबाबत सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात नुकतीच बैठक झाली.या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे, आमदार श्री. राजेश राठोड, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात तसेच राज्यात अनेक खासगी कोचिंग क्लास सुरू आहेत. क्लास सुरू असलेली जागा, क्लासच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, पार्किंग याबाबतची व्यवस्था, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क आकारुन कमी रक्कम दाखविणे आणि यात कर चोरी करणे, निवासी संकुल परवानगी असलेल्या इमारतीत खासगी क्लास सुरु करणे आणि अनधिकृत बांधकाम याबाबतची सर्व तपासणी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही संबधित विभागाने तपासणी करावी, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

राज्यातील खासगी कोचिंग क्लास संदर्भात विधेयकाचे प्रारूप तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या बैठकीत सांगितले. हे विधेयक व संबंधित कायदा परिपूर्ण व्हावा या दृष्टीने जनतेकडूनही सूचना मागविण्यात याव्यात, असे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. खासगी क्लास संदर्भात सर्व समावेश असे विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत रासे (ता. खेड) येथे भूमिहीन व बेघर कुटुंबांसाठी ५२ घरकुल गृहसंकुलाचे भूमिपूजन

पुणे, दि. २९:
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामपंचायत रासे येथे भूमिहीन व बेघर कुटुंबांसाठी उभारण्यात येणाऱ्या ५२ घरकुलांच्या गृहसंकुलाचे भूमिपूजन गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते Habitat for Humanity India Trust (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आज मोठ्या उत्साहात पार पडले.

जिल्हा परिषद पुणे मार्फत या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलांची मंजुरी देण्यात आली होती. लाभार्थ्यांना गायरान शासकीय जागेचे विनामूल्य वाटप करून जून २०१९ मध्ये ऑनलाइन मंजुरी देण्यात आली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये पहिल्या हप्त्याचे अनुदानही वितरित करण्यात आले होते. तथापि, स्थानिक पातळीवरील काही अडचणींमुळे बांधकाम सुरू होऊ शकले नव्हते. ग्रामपंचायत रासे, पंचायत समिती खेड आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद पुणे यांच्या पाठपुराव्यामुळे Habitat for Humanity India Trust संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या गृहसंकुलामध्ये प्रत्येक घरात पिण्याचे पाणी, वीज (सौरऊर्जा संच), स्वच्छता सुविधा, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या सर्व मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संस्था शासनाच्या निकषांनुसार आधुनिक व टिकाऊ बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून घरे उभारणार आहे. या उपक्रमामुळे ठाकर समाजासह वंचित व गरजू कुटुंबांना पक्क्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे.

या कार्यक्रमास श्रीमती शालिनी कडू, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा; भूषण जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत); विशाल शिदे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती खेड; तसेच Habitat for Humanity India Trust संस्थेचे वरिष्ठ अधिकारी राजीव रमण, बुरहानुद्दीन बोहरा, सतीश जाधव आणि ग्रामपंचायत रासेचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे शासन व सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून ग्रामीण भागात टिकाऊ व सशक्त विकासाचा पाया रचला जात असून, जिल्हा परिषदेच्यावतीने हे पुणे जिल्ह्यातील पहिलेच सामूहिक घरकुल गृहसंकुल ठरणार आहे.

ऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे तात्काळ मदतीचा प्रस्ताव सादर करावा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२५

राज्यात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असून, अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे तात्काळ आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाने सादर करावा, अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

विधानभवनात उसतोड कामगारांच्या कल्याणार्थ प्रस्तावित चर्चा व पुढील दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अपर विभागीय आयुक्त कोकण सिद्धराम सालीमठ, उपसचिव अंकुश शिंगाडे, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र गोरणे, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुण्याचे उपसंचालक डॉ. आशिष भारती आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य व बीड, धाराशिव, जालना जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संगीता चव्हाण उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगार हे राज्याच्या साखर उद्योगाचे कणा आहेत. अवकाळी पावसामुळे त्यांच्या नुकसान होत असून, त्यांच्या अडचणींचा विचार करून शासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे गमबुट, इलेक्ट्रिक कोयता, सॅनिटरी नॅपकिन, ग्ल्वोहज या आवश्यक गोष्टी वेळेत मिळण्यासाठी डीबीटी द्वारे मदत देणे सुलभ होईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.त्याचसोबत फिरती स्वच्छता गृहांची व्यवस्था ग्रामिण विकास विभागामार्फत व संबंधित विभागामार्फत करण्याची न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी गरजेची आहे याबाबत नीलम गोर्हेंनी लक्ष वेधले.

ऊसतोड कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आठवड्यातून फिरता दवाखाना व महिला कामगारांसाठी स्त्री रोग तज्ञाची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच महिला महिला ऊसतोड कामगारांसाठी प्रसूती रजा मातृत्व योजनेचा लाभ देण्याबाबतही विचार करण्यात यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

पुढील बैठकीत ऊसतोड कामगारांच्या कल्याणार्थ चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर,सोलापूर , पुणे ,कोल्हापूर, धाराशिव,अमरावती, अहिल्यानगर,नाशिक, सातारा, बुलढाणा नांदेड ,लातूर, जळगाव, सातारा, सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठकीचे नियोजन करण्यात येईल , असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

ताम्हिणी घाटात डोंगरावरून घरंगळत आलेला दगड सनरूफद्वारे थेट कारमध्ये पडला; पुण्याची महिला ठार

पुणे-
ताम्हिणी घाट परिसरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे डोंगरकड्यावरून छोटे-मोठे दगड कोसळत आहेत. याच दरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून माणगावकडे जाणाऱ्या कारवर डोंगरावरून कोसळलेला दगड थेट कारच्या सनरूफमधून आत घुसला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती असे असून, त्यांचे पती आणि मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत.
आज सकाळी स्नेहल गुजराती आपल्या कुटुंबासह पुणे-रायगड जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून प्रवास करत होत्या. घाटात सतत जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगरावरून सतत दगड कोसळत होते. अचानक एक मोठा दगड त्यांच्या कारच्या टपावर आदळला आणि सनरूफची काच फोडून आतमध्ये घुसला. दगड थेट स्नेहल गुजराती यांच्या डोक्यात लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पती आणि मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. स्नेहल यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अवकाळी पावसामुळे ताम्हिणी घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून भूस्खलन आणि दगड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटातून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रशासनाने रस्त्यांची पाहणी आणि सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे आदेश दिले आहेत

या घटनेनंतर पुन्हा एकदा सनरूफच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतात कार विक्रीसाठी सनरूफ हे एक आकर्षक फीचर म्हणून दाखवले जाते, मात्र ते प्रत्यक्षात सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. परदेशात थंड वातावरणामुळे सूर्यकिरणे अंगावर घेण्यासाठी सनरूफचा वापर केला जातो, परंतु भारतात तो बहुतेकदा बाहेर डोकावण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे अपघाताच्या वेळी काच फुटून जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडतात.