Home Blog Page 329

रोहित आर्यचे तर PM मोदींनी केले होते कौतुक?:माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर केले होते उपोषण

सरकारने थकविले होते २ कोटी रुपये -मुलांना ओलिस ठेवणारा रोहित आर्य पुण्याचा रहिवासी असल्याचेही समोर आले आहे. दीपक केसरकर मंत्री असताना शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामासाठी त्याला टेंडर मिळाले होते. पण त्या कामाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत असा आरोप रोहित आर्यने केला. केसरकर मंत्री असताना रोहित आर्यने अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते, अशीही माहिती समोर येत आहे.

मुंबई- माझी शाळा सुंदर शाळा योजनेत रोहित आर्य सहभागी होते. तसेच रोहित आर्यला मी शिक्षणमंत्री असताना स्वतः चेकने पैसे दिले असल्याची माहिती शिवसेना नेते व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे. इतकेच नव्हे तर पीएलएस प्रकल्पासाठी रोहित आर्यचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथे आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्यने काही मुलांना बंधक बनवून ठेवले होते. त्यानंतर पवई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर रोहित आर्यच्या बद्दल दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.

रोहित आर्यने दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण देखील केले होते. तसेच सरकारने पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे 2 कोटी रुपये थकवल्याचा आरोप रोहित आर्यने केला होता. दीपक केसरकर या संदर्भात बोलताना ते म्हणाले, रोहित आर्य माझी शाळा सुंदर शाळा योजना चालवत होते. त्यांनी काही मुलांकडून वसुली देखील केली असल्याची माहिती डिपार्टमेंटकडून समजले होते. त्यांचे म्हणणे होते की आपण असे काही फी वसूल केलेली नाही. पण अशा पद्धतीने मुलांना ओलिस ठेवणे चुकीचे आहे.

पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, मी जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा मी स्वतः त्यांना चेकने पैसे दिले होते. सरकारचे जे पेमेंट असते त्यासाठी सगळ्या प्रोसेस पूर्ण कराव्याच लागतात. त्यामुळे त्यांचा जो आरोप आहे की 2 कोटी रुपये मला मिळाले नाही हे योग्य वाटत नाही. यासाठी त्यांनी विभागाशी संपर्क साधावा आणि यासाठीचे डॉक्युमेंट सादर करावे. तसेच रोहित आर्य विक्षिप्त वाटत होता का? असा प्रश्न विचारला असता केसरकर म्हणाले, ते कोणाचे ऐकत नव्हते, असे मी म्हणेल. बाकी कोणावर पर्सनल कमेन्ट करणे योग्य नाही.

पीएलसी प्रकल्पांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रोहित आर्यचे कौतुक केल्याची माहिती आहे. त्यानंतरच हा प्रकल्प राज्यात चालू झाला अशी माहिती देखील समोर आली आहे. पण या प्रकल्पाच्या फक्त कन्सेप्ट साठी सरकार पैसे देत नसते, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच रोहित आर्यचा असा देखील आरोप होता की चुकीच्या शाळांना चांगले गुण देण्यात आले होते. याविषयी बोलताना केसरकर म्हणाले, त्यांनी उपोषण केले होते आणि मी यापूर्वी देखील सांगितले होते की व्यक्तिगत सहानुभूती म्हणून मी त्यांना पैसे दिले होते. पण नियमाचे पालन करावेच लागते. अशा पद्धतीने मुलांना डांबून ठेऊन असे काही करणे योग्य नाही, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

स्वातंत्र्यलढ्यात आणि देश उभारणीत नेहरु-गांधी घराण्याचे मोठे योगदान

नेहरु-गांधींचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज — विश्‍वंभर चौधरी

पुणे : देशातील साडेपाच हजार धरणांपैकी निम्मी धरणे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या कार्यकाळात उभारली गेली आहेत. स्वातंत्र्यलढ्यात नेहरु-गांधी घराण्याचे मोठे योगदान असून, सध्याचे सत्ताधारी त्यांचा इतिहास पुसण्याचे काम करीत आहेत, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत विश्‍वंभर चौधरी यांनी व्यक्त केली. देशासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याची मोडतोड होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत विश्‍वंभर चौधरी यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार,, पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे  खजिनदार व ज्येष्ठ नेते  अ‍ॅड. अभय छाजेड, अजित दरेकर, यासीन शेख, सचिन आडेकर, आबा जगताप, विठ्ठल गायकवाड, भारत सुराणा, सीमा महाडिक, हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, अनुसया गायकवाड, सुंदरा ओव्हाळ सुनिल शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

विश्‍वंभर चौधरी म्हणाले, “नेहरुंनी बांधलेली धरणे आज जीर्णावस्थेत असून, त्यांची देखभाल सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून होत नाही, ही खंतजनक बाब आहे. २०१४ पासून ‘नवीन देशभक्तांची’ एक तुकडी निर्माण झाली असून, त्यांचे काम फक्त देशासाठी कार्य करणाऱ्या नेत्यांची बदनामी करणे आहे. अशा विकृतींना विचारांच्या बळाने प्रत्युत्तर द्यावे लागेल. पं. नेहरु, इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.”

उल्हासदादा पवार म्हणाले, “इंदिरा गांधी या खऱ्या अर्थाने ‘आयरन लेडी’ होत्या. पाकिस्तानला शरणागती पत्करायला भाग पाडण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली. सिक्किमला भारतात विलीन करून त्यांनी देशाचे सार्वभौमत्व दृढ केले. त्यांचे नेतृत्व आणि धैर्य जागतिक पातळीवर भारताला सन्मान मिळवून देणारे ठरले.”

प्रास्ताविक अ‍ॅड. अभय छाजेड यांनी केले. ते म्हणाले, “आज इतिहासाची मोडतोड करून राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा अवमान केला जात आहे. इंदिरा गांधी यांनी देशाचे प्रभावी नेतृत्व करत जगाच्या राजकारणात भारताला बळकट स्थान मिळवून दिले. मुंबई महाराष्ट्रात आणण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाद्वारे त्यांचे विचार आणि कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”  अक्षय जैन यांनी आभार मानले.

डॉ. शर्वरी इनामदार यांची जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी

साऊथ आफ्रिका केप टाऊन  येथे  क्लासिक व इक्विप्ड जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा 

४  सुवर्णपदक आणि मानाचा बेस्ट लिफ्टर वर्ल्ड चा तिसऱ्या क्रमांकाचा किताब पटकावला

पुणे: साऊथ आफ्रिका केप टाऊन  येथे  क्लासिक व इक्विप्ड जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. जगभरातील सुमारे 480 खेळाडूंनी त्यात आपले शक्ती प्रदर्शन केले. पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी ५७  किलो वजनी गटात क्लासिक प्रकारात ३७२.५  किलो तर इक्विप्ड प्रकारात ४०७.५  किलो वजन उचलत स्क्वॉट, बेंचप्रेस, डेडलिफ्ट व टोटल यामध्ये ३ कांस्यपदके, ४  सुवर्णपदके याबरोबरच मानाचा बेस्ट लिफ्टर वर्ल्ड चा तिसऱ्या क्रमांकाचा किताबही पटकावला. 

फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, अमेरिका, बेल्जियम, स्पेन, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, साऊथ आफ्रिका, जपान या देशाच्या खेळाडूंशी अत्यंत चुरशीची लढत देत त्यांनी भारतासाठी ही विजयश्री खेचून आणली. मंगोलिया येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या जागतिक स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत तीन एशियन चॅम्पियनशिप्स, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकत ओपन, क्लासिक, इक्विप्ड, मास्टर्स, बेंचप्रेस या सर्व प्रकारात मिळून तब्बल 17 वेळा स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र,  8 वेळा बेस्ट लिफ्टर इंडिया , ३ वेळा बेस्ट लिफ्टर एशिया, बेस्ट लिफ्टर कॉमनवेल्थ किताबही पटकावले आहेत.

कोझिकोड येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतून त्यांची या जागतिक चॅम्पियनशिपसाठी निवड झाली होती. डॉ .शर्वरी पुण्याच्या ‘कोडब्रेकर’ जिम मध्ये डॉ .वैभव इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. सदाशिव पेठेत ‘आहार आयुर्वेद’ क्लिनिकमध्ये त्या खेळाडूंसाठी व विविध मेटाबोलिक डिसऑर्डर साठी जीवनशैली मार्गदर्शनाचे प्रशिक्षण देतात.
आई-वडील, कुटुंबीय, मित्रपरिवार, पुणे -महाराष्ट्र व पॉवरलिफ्टिंग इंडिया यांच्या पाठिंबामुळेच सर्व अडचणींवर मात करत सातत्याने उच्च पातळीवरचे यश मिळवणे शक्य होते असे त्यांनी सांगितले. जागतिक स्पर्धेत भारतासाठी अत्यंत चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काउंटर

मुंबईतील पवई परिसरातील रा स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी १:४५ वाजता युट्यूबर रोहित आर्यने १७ मुले, एका ज्येष्ठ नागरिक आणि एका नागरिकाला ओलीस ठेवले होते. पोलिस आणि विशेष कमांडोंनी त्याला गोळ्या घालून सर्व ओलीसांना सुरक्षितपणे वाचवले. या गोळीबारात आरोपी जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.पोलिसांची ही कारवाई एक तास चालली. घटनास्थळावरून एअर गन आणि रसायने जप्त करण्यात आली. तथापि, आरोपी रोहित आर्यचा हेतू अद्याप अज्ञात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने १०० हून अधिक मुलांना ऑडिशन्ससाठी बोलावले होते.


मुंबई: पवईतील एआर स्टुडिओमध्ये रोहित आर्यनं १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं.या ओलीसनाट्य प्रकरणातील आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले. त्यावेळी रोहितनं पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीदेखील गोळीबार केला. त्यात रोहितच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. त्यामुळे रोहित जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल झालं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रोहितनं एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्यानं आग लावण्याची धमकी दिली होती. मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचं समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीनं हालचाली सुरु केल्या. इमारतीच्या मागील बाजूनं पोलिसांनी आत प्रवेश केला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आर्यनं मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानं पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार सुरु केला. या गोळीबारात रोहित जखमी झाला. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण त्याचा मृत्यू झाला. पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला होता.

सध्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या कोर्सेसला किंवा इतर अॅक्टीव्हीसाठी गुंतवून ठेवत आहेत. त्यातच, मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओत काही शाळकरी मुले गेल्या 4-5 दिवसांपासून प्रशिक्षणसाठी येत होती. मात्र, ऑडिशनच्या नावाखाली येथील स्टुडिओत किडनॅपरने शाळकरी मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेनं मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना दुपारी 2 वाजताच्या सुमारास जेवणासाठी सोडण्यात आल्यानंतर रोहित आर्य या व्यक्तीने मुलांना एका खोलीत कोंडून ओलीस ठेवले.

रोहित आर्य असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव असून माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे.

मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेकवेळा भेटून झाले. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज/उद्या असेच होत आहे. त्यामुळे, आजपासून मी तीव्र उपोषण सुरु केले. आता, पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल, नाही समजले तर जय श्री राम असं रोहित आर्यने म्हटलं. मी एकटा नाही, अनेक लोकांना हा प्रश्न आहे, त्याच सोल्युशनसाठी मला संवाद साधायचा आहे, असंही ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यने म्हटलं. दरम्यान, एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळे रोहितने संबंधित विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. आर्य हा मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, त्याचे पैसे सरकारकडे आहेत. शिक्षण विभागासाठी त्याने स्वच्छता मॉनिटरचा एक प्रोजेक्ट लोन काढून केला होता, त्याचे पैसे त्याला मिळाले नाहीत आणि कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्याचं म्हणणं आहे.

पावणे दोन वाजताच्या सुमारास पोलिसांना कॉल आला, ज्यामध्ये माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे तिथे लहान मुलांना बंधक बनवून ठेवलं आहे. पोलिसांनी तात्काळ कॉलला प्रतिसाद देऊन इथे स्पेशल युनिट्स आणि क्विक अॅक्शन फोर्स बोलवली. ज्या व्यक्तीने बंधक बनवलं होतं, त्याच्याशी संवाद आणि वाटाघाटी पोलिसांनी केल्या. त्यानंतर आमच्या पवई पोलिस अधिकाऱ्यांनी बाथरुममधून एन्ट्री करुन आतील एका व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांची सुखरुप सुटका केली. एकूण 17 मुलं, एक वयस्कर आणि एक स्थानिक असे 19 लोक आतमध्ये होते. रोहित आर्य असं आरोपीचं नाव आहे. रोहितकडे एक बंदूक होती, पण अधिक तपास सुरु आहे. आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या याचा तपास सुरु आहे. एका वेब सीरिज ऑडिशन घ्यायचं म्हणून या मुलांना बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी या सोसायटीचा हॉल घेतला होता. जी मुलं ऑडिशनसाठी आली होती, त्यांनाच त्याने बंधक बनवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पवई पोलीस आणि डीसीपींनी तात्काळ ऑपरेशन राबवत सर्वांना रेस्क्यू केला आहे. सकाळी शूटिंग करण्यासाठी 25 ते 30 मुलं वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी आले होते. शूटिंग झाली यानंतर दुपारी या सर्व मुलांना बंदूकचा धाक दाखवून किडनॅप केला गेला. किडनॅपर मुलांना किडनॅप करून मागणी करत होता. पोलिसांनी वेळेत सर्व मुलांना रेस्क्यू केला आहे. किडनॅपर बंदूक घेऊन आतमध्ये बसला होता. बंदूक घेऊन कसा आतमध्ये पोहोचला, यामध्ये सुरक्षा मोठी चूक झाली आहे. त्यामुळे कठोर कारवाई करावी असे मागणी प्रत्यक्षदर्शी यांनी केली आहे.
दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आरोपी माथेफिरू रोहित आर्यला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सूरू आहे. मात्र, या घटनेनं मुंबईत चांगलीच खळबळ उडाली होती. सुदैवाने सर्व मुले सुखरुप आहेत, पण ते घाबरलेले आहेत असे पालकांकडून सांगण्यात येत आहे. रोहितने ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केल्यानंतर मुलांना आणि त्यांच्या पालकांना स्कूल बसमधून पवई पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये मुलांसह पालकांचे स्टेटमेंट घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यांना सोडतील, अशी माहिती आहे.पवई स्टुडिओमध्ये 17 मुलांना किडनॅप प्रकरणात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक सिनिअर सिटीझन महिला आणि लहान मुलगी जखमी झाली आहे. जखमीना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी महिलेला सुखरूप वाचवल्याची माहिती संबंधित महिलेकडून देण्यात आली.

पवई स्टुडिओ ऑडिशन किडनॅपिंग केस प्रकरणातील आरोपी रोहित आर्य याने छर्ऱ्याच्या बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस फायरिंग करत एक राउंडही फायर केला होता. या गोळीबारात आरोपी रोहित आर्या जखमी झाला, उपचारादरम्यान आरोपी रोहितचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 ‘OLC : आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ २८ नोव्हेंबरला सिनेमागृहात!

गेल्या काही काळापासून ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून येत्या २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके अभिनीत ‘ऑपरेशन लंडन कॅफे’ हा चित्रपट आहे. हा सिनेमा संपूर्ण भारतात  मराठी, कन्नड, आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं पोस्टर पाहून हा सिनेमा एक्शन पॅक्ड असल्याचं दिसतय. आणि हेच पोस्टर चित्रपटाची उंची, भव्यता दर्शवत आहे.

हा चित्रपट कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह चित्रपटात प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार ही मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. एक्शन पॅक्ड अशा या चित्रपटाला रोमँटिक झालर आहे ती कशी ते मात्र तुम्हाला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा एक अनोखा पैलू म्हणजे कन्नड कलाकारांनी या चित्रपटासाठी मराठी भाषा शिकली आणि मराठी कलाकारांनी चित्रपटातील भूमिकांसाठी कन्नड भाषा शिकली. चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टरने अर्थात सिनेमाप्रती उत्सुकता वाढविली आहे. पोस्टरवरील कलाकार तर पॉवर पॅक्ड अभिनय देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. कवीश शेट्टी आणि मेघा शेट्टी यांनी त्यांच्या अभिनयाने साऊथ सिनेसृष्टी गाजवली आहे तर शिवानी सुर्वेच्या अभिनयाचा आणि ग्लॅमरसचा केवळ महाराष्ट्रातच नाहीतर महाराष्ट्राबाहेरही मोठा चाहतावर्ग आहे. तर विराट मडकेच्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाची भर पडणार आहे. अश्विनी चवरे हिच्याही अभिनयाची जादू या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्मस’ बॅनर आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण आर.डी. नागार्जुन यांनी केले आहे. येत्या २८ नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे

पुणे शहरात पुन्हा खोदकामाने नागरिक त्रस्त:भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची तातडीच्या कार्यवाहीची मागणी

पुणे : शहरात सध्या महाप्रीत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामांमुळे नागरिकांना खड्डे, धूळ, आणि वाहतुकीतील अडथळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र लिहून समन्वय, सुरक्षितता आणि योग्य पुनर्डांबरीकरणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

५०० किमी खोदकाम, १२५ किमी भागात दुप्पट कामे

शहरातील विविध भागांमध्ये महाप्रीत आणि सीसीटीव्ही या दोन स्वतंत्र योजनांसाठी सुमारे ५०० किलोमीटर खोदकाम सुरू आहे. यातील सुमारे १२५ किलोमीटरचा भाग समान क्षेत्रात असून, दोन्ही कामे एकत्रितपणे करण्याबाबत पालिकेत बैठक होऊन निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात सीसीटीव्ही कामाचा ठेकेदार आधी खोदकाम करून नंतर महाप्रीत कंपनीकडून त्याच भागात पुन्हा खोदकाम होत असल्याने नागरिकांना दुहेरी त्रास होत आहे, असे घाटे यांनी नमूद केले आहे.

पुनर्डांबरीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

पालिकेने “रस्त्यांना कमीत कमी छेद घेऊन खोदकाम करावे” अशा सूचना दिल्या होत्या, तरी मोठ्या आकाराचे खड्डे घेतले जात आहेत. त्यानंतर फक्त खडी टाकून काम अपूर्ण ठेवले जाते, त्यामुळे रस्त्यावर खडी पसरून वाहनघसर अपघात वाढत आहेत, असे घाटे यांनी निदर्शनास आणले.
शिवदर्शन चौक, ई-लर्निंग स्कूलसमोर आणि इतर ठिकाणची कामे पाहिल्यास या समस्येचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.

ठेकेदारांवर कारवाईची मागणी

घाटे यांनी ठेकेदारांकडून रस्त्यावर खडी न पसरण्याची, पुनर्डांबरीकरण नीट करण्याची आणि योग्य बॅरिकेडिंग व सूचना फलक लावण्याची हमी घेण्याची मागणी केली आहे. नियमभंग झाल्यास संबंधित ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी त्यांनी आयुक्तांना विनंती केली आहे.

जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता

जानेवारी २०२६ मध्ये पुण्यात होणाऱ्या जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांवर मिलिंगचे काम सुरू आहे. मात्र, त्यानंतर तातडीने डांबरीकरण होत नसल्याने वाहने घसरत आहेत. त्यामुळे मिलिंगनंतर २४ ते ४८ तासांच्या आत पुनर्डांबरीकरण करणे बंधनकारक करावे, अशी मागणी घाटे यांनी केली आहे.
तसेच या कामांदरम्यान सुरक्षा निकषांचे पालन, दिशादर्शक फलक व चेतावणी चिन्हे लावणे अनिवार्य करावे, असेही त्यांनी सुचवले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीचे निर्देश अपेक्षित

शहराच्या सौंदर्याचे जतन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेने दोन्ही कंपन्यांमध्ये समन्वय साधून कामे व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, अशी विनंती घाटे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित‘हक्क’७ नोव्हेंबर रोजी

नवी दिल्ली,— अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री यामी गौतम यांनी त्यांच्या आगामी चित्रपट हक्कच्या दिल्लीत सुरू झालेल्या प्रमोशनदरम्यान सिनेमातील एक संस्मरणीय क्षण पुन्हा जिवंत केला. त्यांनी भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्यांवर जाऊन त्यांच्या चित्रपटाच्या पोस्टरची पुनर्रचना केली.

माननीय सर्वोच्च न्यायालयाला या चित्रपटात विशेष स्थान आहे, कारण चित्रपटाची मध्यवर्ती लढत ही वैयक्तिक कायदा आणि धर्मनिरपेक्ष कायदा यांच्या संघर्षावर आधारित आहे. हक्क हा चित्रपट १९८० च्या दशकातील एका ऐतिहासिक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रेरित आहे.

या पुनर्रचित पोस्टरद्वारे चित्रपटाच्या प्रभावी कथानकाला आदरांजली अर्पण करण्यात आली आहे — ज्यात हक्क या चित्रपटाचा नाट्यमय आणि नैतिक गुंतागुंतीचा सारांश प्रतिबिंबित होतो. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या हक्कच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा ठरणार आहे.

हक्क हा चित्रपट जंगलि पिक्चर्स यांनी निर्मित केला असून दिग्दर्शन सुपर्ण वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट आधुनिक भारतातील श्रद्धा, न्याय आणि ओळख यांच्या संगमावर प्रकाश टाकतो.

यामी गौतम म्हणाल्या, “न्याय कधी कधी उशिरा मिळतो, पण तो आपल्याला कधीच सोडत नाही. हक्क ही त्या सुधारणेचा आवाज आहे, ज्याने समाजात परिवर्तनाला चालना दिली होती. या चित्रपटाद्वारे आम्ही त्या एका ऐतिहासिक निकालाची आठवण पुन्हा जागवली आहे.”

इमरान हाश्मी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयासमोर हक्क पोस्टरची पुनर्रचना करणे ही फक्त एक दृश्यात्मक घटना नव्हती, ती प्रतीकात्मक होती. हा चित्रपट अशा एका ऐतिहासिक खटल्यावर आधारित आहे ज्याने भारतातील न्यायव्यवस्थेची दिशा बदलली, आणि तिथे उभं राहणं म्हणजे त्या खरी कहाणींची आठवण होती ज्यांनी आम्हाला प्रेरित केलं.”

हक्क चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नवीन एसटी बसेस मध्ये ‘ब्रेथ ॲनलायझर’मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही…

मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, (दि. ३० ऑक्टोबर २०२५) – एसटी ही महाराष्ट्राची ‘ लोकवाहिनी ‘ आहे . दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात. त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याला तातडीने मोहीम राबवून अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यभरात एकाच वेळी कोणतीही पूर्वकल्पांना न देता कडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी मोहिमेत सापडलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी केले.
. मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता खात्याने दिनांक २८/१०/२०२५ रोजी राज्यभरातील सर्व विभागांमध्ये कार्यरत असलेले चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची एक मोठी आणि अचानक मोहीम राबविली.
या अचानक केलेल्या तपासणी मोहिमेमुळे महामंडळात एकच खळबळ उडाली. या कारवाईत संशयास्पद एकूण ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक कर्मचारी अशा सुमारे १७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. अर्थात, ही तपासणी मोहीम प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामंडळ किती गंभीर आहे, हे दर्शवते. या कारवाईत दोषी आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित कर्मचारी या व्यापक तपासणी मोहिमेदरम्यान, कर्तव्य बजावत असताना मद्यपान केल्याचे आढळून आले . त्यामध्ये १ चालक आणि ४ यांत्रिक कर्मचाऱ्यांसह एकूण ७ कर्मचारी निलंबित झाले आहेत.

तपासणीचा तपशिल:

धुळे विभागाच्या तपासणीत एक यांत्रिक कर्मचारी, एक स्वच्छक आणि एक चालक मद्यपान करताना आढळले.

नाशिक येथे तपासणी केलेल्यांमध्ये एक चालक दोषी आढळला.

परभणी आणि भंडारा विभागांत प्रत्येकी एक यांत्रिक कर्मचारी मद्याच्या अमलाखाली काम करताना आढळला.

नांदेड विभागामध्ये तपासणीत एक वाहक मद्यपान केलेला आढळला.

कर्तव्यावर असताना मद्यपान करणे हा एक गंभीर गुन्हा असून, प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. महामंडळाने या सात कर्मचाऱ्यांवर पुढील कार्यवाही सुरू केली असून, या मोहिमेचा अहवाल तातडीने मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात सादर केला जाईल.

भविष्यात देखील कठोर कारवाईचा इशारा

या घटनेनंतर सुरक्षा आणि दक्षता खात्याने भविष्यात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यापुढे देखील अशा प्रकारची अचानक आणि वारंवार तपासणी मोहीम संपूर्ण महामंडळात राबविण्यात येणार आहे.

“जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्याच्या अमलाखाली आढळतील, त्यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करण्यात येईल,” असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

नवीन एसटी बसेस मध्ये ‘ब्रेथ ॲनलायझर’

मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षा ही एसटी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भविष्यात नवीन येणाऱ्या बसेस मध्ये चालकाच्या समोर ब्रेथ ॲनालिसिस यंत्र (अल्कोहोल तपासणीसाठी) बसविण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या मद्यपी चालकांना अटकाव होईल. अर्थात, या कारवाईमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गैरव्यवहारांना आळा बसेल, अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. जनतेने देखील या मोहिमेचे स्वागत केले असून, या कारवाईमुळे प्रवासादरम्यान अधिक सुरक्षितता अनुभवता येईल. अशी आशा व्यक्त केली आहे.

१ तारखेच्या आतच जैन बोर्डिंग विषय संपवला,दोन्ही बाजूनं व्यवहार रद्द: जैन समाजाच्या मनात जे होतं, तेच आज घडलं- मुरलीधर मोहोळ

होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद, देवेंद्रजी !

पुणे- धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश आज दिल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ यावर आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद, देवेंद्रजी ! असे म्हणत १ तारखेच्या आतच हा विषय संपवला,दोन्ही बाजूनं रद्द केल्यानं जैन समाजाच्या मनात जे होतं, तेच आज घडलं असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’ ‘जैन समाजाच्या मनात जे आहे, तेच होईल’ हा भगवान महावीर यांच्यासमोर दिलेला शब्द आज धर्मादाय आयुक्तांच्या HND बोर्डिंगच्या निकालाने पूर्णत्वास गेला आहे. या सर्व प्रतिक्रियेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. बोर्डिंगचा हा व्यवहार दोन्ही बाजूनं रद्द केल्यानं जैन समाजाच्या मनात जे होतं, तेच आज घडलं, तेसुद्धा आपण शब्द दिलेल्या १ तारखेच्या आधीच !

आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांनी या प्रकरणी बोर्डिंगला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर प्रतिसाद देत मी स्वतः बोर्डिंगला भेट देत भगवान महावीर आणि आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांचं मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्याचवेळी समाज बांधवांशी संवाद साधताना माझी भूमिका स्पष्ट करत समाजाच्या मनात जे आहे, तसाच निर्णय घेतला जाईल, हा शब्द महाराजजींसमोर दिला होता. शिवाय महाराजजींनी १ नोव्हेंबर, २०२५ पासून आमरण उपोषणाची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर १ तारखेच्या आतच हा विषय संपवला जाईल, असं समाजाला सांगितलं होतं ! या पार्श्वभूमीवर मा. देवेंद्रजी आणि या संबंधित विविध घटकांशी हा व्यवहार रद्द व्हावा, यासाठी मी सातत्याने संवाद साधत प्रामाणिक प्रयत्न केले, ज्याला आजच निकालाने यश आले.

‘मी जैन समाजासोबत आहे आणि जैन समाज माझ्यासोबत’, असं मी सुरुवातीपासून सांगत होतो. कारण माझं समाजासोबत असलेलं नातं, हे आजचं नाही, तर गेल्या ३० वर्षांचं आहे. या विषयात पुण्यातील जैन समाजातील कोणत्याही व्यक्तिने माझ्यावर अविश्वास दाखवत वैयक्तिक आरोप केला नाही. परंतु काही राजकारण्यांनी स्वार्थासाठी हेतुपुरस्कर माझ्यावर खोटेनाटे आरोप करत बदमानी करण्याचा प्रयत्न केला. तरीही माझ्या आणि समाजातील नात्याला तडा जाण्याची अजिबातच शक्यता नव्हती. अशा प्रकारे जैन समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल समाजाचा मी सदैव ऋणी राहील ! असे मोहोळ यांनी म्हटले आहे.

पुणे जैन बोर्डिंगजमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश, ट्रस्टला दिलेले 230 कोटी कोर्टाच्या आदेशाने मिळणार

पुणे- जैन बोर्डिंग ट्रस्ट आणि बिल्डर गोखले यांच्यातील हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणिा धर्मादाय आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते. आज या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांसमोर झाली. या सुनावीणीनंतर धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेत. मात्र, बिल्डर गोखलेने बोर्डिंग ट्रस्टला दिलेले २३० कोटी रुपये हे कोर्टाच्या आदेशाने मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे

पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ‘जैन बोर्डिंग होस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालेले असताना, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी नऊ दिवसांपूर्वी पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले होते. धर्मादाय आयुक्तांच्या स्थगितीच्या आदेशानंतर या व्यवहारातून आपण आपण माघार घेत असल्याची घोषणा गोखले बिल्डर्स यांनी केली. यासंदर्भात बिल्डर विशाल गोखले यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला ई-मेलद्वारे ही माहिती दिली. या ई-मेलमध्ये त्यांनी आपले जमा केलेले 230 कोटी रुपये परत मिळावेत, अशी मागणी केली.

आज या प्रकरणाची धर्मादाय आयुक्तांसमोर पुन्हा सुनावणी झाली. धर्मादाय आयुक्त यांनी 4 एप्रिल 2025 रोजी स्वत: या व्यवहाराला मान्यता देणारे आदेश आता रद्द केला आहे. या व्यवहारात गोखले बिल्डरने ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये परत मिळवण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा केली होती. मात्र, हा निर्णय आपल्या हातात नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी भरलेली रक्कम परत मिळविण्यासाठी गोखले बिल्डरला न्यायालयात कायदेशीर लढा लढावा लागणार आहे.

जैन बोर्डिंग हॉस्टेलची स्थापना 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी केली होती. अलीकडे या जागेच्या पुनर्विकासाचा विषय चर्चेत आला होता, मात्र विक्री प्रक्रियेत अनियमितता आणि परस्पर व्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी विश्वस्तांनी जागेचा नवीन विकास करण्याचा निर्णय घेतला, पण जैन समाजातील काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर ही जागा परस्पर विकण्यात आल्याचा आरोप जैन समाजाने केला. या जागेच्या विक्रीला धर्मादाय आयुक्तांनी मंजुरी देताना नियम पायदळी तुडवल्याचा आणि गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

या व्यवहारावरून जैन समाज देखील आक्रमक झाला होता. हा व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी जैन मुनींकडून बुधवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले. मात्र आता धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिल्याने हा वाद मिटल्याचे दिसत आहे.

भाजपने पुण्याची “स्मार्ट सिटी” ऐवजी “स्क्रॅप सिटी” केली – जयेश मुरकुटे

बालेवाडी येथील भाजी मार्केट सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आंदोलन
बाणेर -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष व कोथरूड मतदार संघ कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत बांधलेला, साई चौक, बालेवाडी येथील भाजी मार्केट सुरू करण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघ कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर, ज्योती चांदेरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख संतोष तोंडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जीवन चाकणकर, महेश सुतार, मधुसूदन पाडाळे, संजय मुरकुटे, नितीन चांदेरे, रितेश पाडाळे, तुषार हगवणे, सारंग कोळेकर, राजेश बालवडकर, पंकज खताने, महेश शिवशरण, आनंद पदीले, रामानंद, विलास पाटील,क्षीरसागर, नितीन वैराल, कृष्णा थिटे, गवाटे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी अंतर्गत बालेवाडी येथील साई चौक येथे बांधण्यात आलेली भाजी मंडई नागरिकांना वापरासाठी अद्याप खुली करण्यात आलेली नाही. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून भाजी मंडई अद्याप बंदच आहे. भाजी मंडईच्या जागेचा दारू पिण्यासाठी मद्यपींकडून वापर केला जातो. नागरिकांना भाजी मंडईची आवश्यकता असताना देखील बांधलेली भाजी मंडई सुरू का केली जात नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला?
सत्ताधारी महायुतीने पुणे शहराची स्मार्ट सिटी करण्याऐवजी ‘स्क्रॅप सिटी’ केली असल्याचे टीका यावेळी जयेश मुरकुटे यांनी केली.या आंदोलनात दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच भाजी मंडई मध्ये प्रतिकात्मक भाजी विक्री सुरू करण्यात आली. तसेच परिसरातील पथारी विक्रेते व लायसनधारक भाजी विक्रेत्यांना भाजी मंडईतील गाळे त्वरित वाटप करण्यात यावे तसेच भाजी मंडई सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अजितदादा व एकनाथ शिंदे यांची गरज आता भाजपला राहिलेली नाही

व्होट चोरीचा,आणि खोट्या आधारकार्डचा पर्दाफाश केला म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल-रोहित पवार

पुणे-ज्यांना राजकारण कळते, त्यांना हे माहिती आहे, की भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात भाजपला कुणाच्या कुबड्याची गरज नाही, असे म्हणतात.याचा अर्थ अजितदादा व एकनाथ शिंदे यांची गरज आता भाजपला राहिलेली नाही. त्यामुळे २०२९ पूर्वी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्वगृही परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही, ते स्वगृही परततील, असे भाकीत आमदार रोहित पवार यांनी केले.

बनावट आधार कार्ड तयार केल्याच्या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरून आ. पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी गुरुवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कार्यालय परिसरात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकारण ज्या लोकांना समजते त्यांना ऑपरेशन लोटस जेव्हा झाले, तेव्हा तीन वर्षापूर्वीच कळाले आहे. की, भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा फक्त वापर करणार आहे. वापर करून झाल्यावर त्यांना फेकून देणार आहे. अमित शहा म्हणाले कुबड्यांची गरज नाही. दुसरीकडे अजित दादांचे व एकनाथ शिंदे यांचे नेते भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे दोघांनाही २०२९ पर्यंत स्वगृही परतण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी मी पॅन कार्ड तयार केल्याचे वक्तव्य केले. बहुतेक त्यांना आधार कार्ड म्हणायचे असेल. मुख्यमंत्री बोलल्यानंतर दोन तासात भाजपच्या कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला. मत चोरी कशी केली जाते, त्यावर मी प्रत्यक्षिक दाखवले, म्हणून कसा काय गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा होऊ शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले असेल, त्यामुळे गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये माझे नाव स्पष्टपणे घेतले नाही. मात्र, एकंदरीत परिस्थिती पाहता, माझ्यावर थेट गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दाखल गुन्ह्यात पंधरा दिवस चौकशी होणार आहे. यामध्ये खोट्या कागदपत्राचा गौरवापर करणे, मानहानी करणे, धार्मिक जातीय वाद निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, चिथावणी देणे, अशी कलमे लावली आहेत. त्यांनी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करू देत, आम्ही घाबरणार नाही, त्यांच्या धमक्यांना भीक टाकणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही प्रतिष्ठीत संस्था आहे. मागील वर्षाचा लेखाजोखा दिल्याशिवाय पुढील वर्षाचे अनुदान मिळत नाही. असे असताना संस्थेच्या चौकशीची आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात आदेश दिले नाही. या माध्यमातून संस्थेला बदनाम करण्याचा डाव रचल्याचा आरोपही पवार यांनी केला.

निवडणूक आयोग भाजपचा एक विभाग झाला आहे, मतचोरी होत आहे. जोपर्यंत व्हीव्हीपॅड येत नाही. मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत सर्व विरोधी पक्षांनी येणाऱ्या प्रत्यक निवडणुकीवर बहिष्कार टाकायला हवा, असेही पवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी प्रश्न सुटेपर्यंत ‘बांधकाम बंदी’ करा: आम आदमी पार्टीची महापालिकेकडे मागणी!

पुणे, दि. 30 ऑक्टोबर २०२५

महाराष्ट्रातील एक प्रगत शहर असूनही, पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना आजही ‘दिवसाआड पाणी’ या मूलभूत समस्येशी लढावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या प्रशासनाच्या अक्षमतेमुळे वाढली असून, सध्या शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा कमी दाबाचा आणि अनियमित होत असल्यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीचे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

रविराज काळे यांनी स्पष्ट केले आहे की, एका बाजूला सध्याच्या नागरिकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी मिळत नाहीये, तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिका कोणतीही दूरदृष्टी न ठेवता असंख्य नवीन बांधकामांना भरमसाट परवाने देत आहे. हे धोरण पूर्णपणे जनता विरोधी असून, आहे त्या तुटपुंज्या पाणी व्यवस्थेवर अतिरिक्त आणि अनावश्यक भार टाकला जात आहे.

या पार्श्वभूमीवर, ‘आप’ने महानगरपालिका प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे की, जोपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला दिवसातून दोनवेळेस पुरेसा आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत शहरात नवीन बांधकामांना कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये आणि सध्या चालू असलेल्या बांधकामांना त्वरित ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात यावी. तसेच, भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी, पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र धरण उभारण्याच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही योग्य ती कार्यवाही न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे.निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका सह आयुक्त मनोज लोणकर यांचेकडे सादर केले त्यावेळी उपस्थित नवनाथ मस्के,शुभम यादव,विकी पासोटे, राहुल मदने, अॅड सुप्रिया गायकवाड,शिवकुमार बनसोडे,यल्लापा वालदोर,लक्ष्मण माने, अभिजित कदम उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारांसाठी निवडणुकीच्या खर्च मर्यादेत दीडपट वाढ, प्रचाराला आर्थिक मोकळीक

मुंबई –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे. बदलत्या आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई आणि प्रचार खर्चातील प्रचंड वाढ लक्षात घेता आयोगाने ही मर्यादा दीडपटपर्यंत वाढवली आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अधिक आर्थिक मोकळीक मिळणार असून, कायदेशीर चौकटीत राहून प्रभावी प्रचार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही वर्षांत डिजिटल माध्यमांवरील प्रचार खर्च, वाहनभाडे, बॅनर्स, सभा आयोजन यांसारख्या बाबींचा खर्च वाढल्याने आयोगाकडे या मर्यादेत बदल करण्याची मागणी होत होती. अखेर आयोगाने ती मान्य केली आहे.

महापालिका निवडणुकांसाठी आतापर्यंत सदस्यसंख्येच्या आधारे खर्च मर्यादा ठरवली जात होती, मात्र आता आयोगाने ती वर्गवारीनुसार निश्चित केली आहे. नव्या नियमानुसार मुंबई, पुणे आणि नागपूर या अ वर्गातील महापालिकांतील नगरसेवक उमेदवारांना 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी मिळणार आहे. पिंपरी चिंचवड, ठाणे आणि नाशिकसाठी ही मर्यादा 13 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि वसई-विरार या ब वर्गातील महापालिकांतील उमेदवारांना 11 लाखांपर्यंत खर्चाची मुभा देण्यात आली आहे. तर ड वर्गातील इतर 19 महापालिकांमध्ये उमेदवारांना 9 लाख रुपयांचा खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सुधारित मर्यादा महागाई आणि आर्थिक वास्तव लक्षात घेऊन निश्चित करण्यात आल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीही खर्च मर्यादा तदनुसार बदलण्यात आल्या आहेत. अ वर्ग नगरपरिषदांसाठी नगरसेवकांना 5 लाख आणि थेट निवडणूक लढवणाऱ्या नगराध्यक्षांना 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. ब वर्गात नगरसेवकांसाठी 3.5 लाख आणि नगराध्यक्षांसाठी 11.25 लाख, तर क वर्गातील नगरपरिषदांमध्ये नगरसेवकांसाठी 2.5 लाख आणि नगराध्यक्षांसाठी 7.5 लाख रुपये खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. नगरपंचायतींमध्ये मात्र नगरसेवकांसाठी 2.25 लाख आणि नगराध्यक्षांसाठी 6 लाख रुपये अशी मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्तरावरील उमेदवारांना प्रचाराचे नियोजन वास्तवाशी सुसंगत ठेवता येणार असून, अपारदर्शक खर्च कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत अनेक राजकीय पक्षांनी केलं आहे. राज्यातील बहुतांश नेत्यांचे म्हणणे आहे की, वाढत्या खर्चाच्या काळात जुन्या मर्यादा अप्रासंगिक झाल्या होत्या. मागील काही निवडणुकांमध्ये डिजिटल माध्यमांवरील प्रचार, सोशल मीडिया जाहिराती, कार्यकर्त्यांचे मानधन आणि वाहनभाडे यांवर उमेदवारांना मोठा खर्च करावा लागत होता. त्यामुळे वाढीव मर्यादेमुळे निवडणूक लढवणे सुलभ होईल, अशी भावना उमेदवारांमध्ये आहे. मात्र, काही राजकीय निरीक्षकांनी सावधगिरीचा इशारा देत म्हटलं आहे की, अधिक खर्चाच्या मुभेमुळे पैशाचा प्रभाव वाढू शकतो आणि निवडणुकीत समता व पारदर्शकता राखणे प्रशासनासाठी आव्हान ठरू शकते.

गेल्या पाच वर्षांपासून राज्यात कोणत्याही स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या काळात अनेक महापालिका, नगरपरिषदा आणि पंचायत संस्था प्रशासकांच्या अखत्यारीत चालवल्या जात आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुका अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपापल्या उमेदवारांच्या निवडीसाठी कंबर कसली आहे. मागील काही महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क सुरू केला असून, विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती वाढवली आहे. निवडणुकांची चाहूल लागल्याने अनेकांनी गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात मंडळांना आर्थिक मदतही केली होती. त्यामुळे या निवडणुका टोकार्ची ईर्ष्या निर्माण करणाऱ्या ठरण्याची चिन्हे आहेत.

कात्रजच्या तळ्यानजीकचे नॅन्सी होम प्रकल्पाचे बांधकाम बेकायदेशीर

:विभागीय आयुक्तांनी स्थळभेट देऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

मुंबई/पुणे- पुणे येथील नॅन्सी लेक होम प्रकल्पाला सन-2004 नंतर आतापर्यंत जवळपास 10 वेळा सुधारित मान्यता देण्यात आली असून गाव नकाशा आणि मोजणी नकाशा मध्ये सर्व्हे क्र.08 आणि 09 च्या स्थानांमध्ये फेरबदल केले गेल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, पुणे यांनी भूमी अभिलेख विभागासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्थळभेट द्यावी आणि सखोल चौकशी करुन 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. काल दिनांक 29 ऑक्टोबर, 2025 रोजी विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली नॅन्सी लेक होम सर्व्हे नं.08, कात्रज, पुणे येथे विकासकाने बेकायदेशीर बांधकाम प्रकल्प केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी हे निर्देश देण्यात आले.



या प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी, पुणे यांनी बिगरशेती आदेशामध्ये 37,973.20 चौ.मी. क्षेत्रफळासाठी बांधकाम परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात 60,630.59 चौ.मी. क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले आहे किंवा कसे, वारंवार नकाशात बदल करण्याची कारणे काय आहेत, असे प्रश्न या बैठकीप्रसंगी उपस्थित करण्यात आले. याबाबत संबंधित अधिकारी यांचेकडून समाधानकारक खुलासा होऊ न शकल्याने महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना यासंदर्भात स्थळभेट देऊन चौकशी करणे आणि 15 दिवसांच्या आत अहवाल देण्याबाबतचे निर्देश दिले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (4) श्री.शिवदर्शन साठ्ये, उप सचिव मोहन काकड, नगरविकास विभागाच्या सह सचिव श्रीमती प्रियांका छापवाले, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका रमेश काकडे, उप अभियंता श्रीमती रुपाली ढगे, सहाय्यक विधि अधिकारी .निलेश बडगुजर, नगर भूमापन अधिकारी, पुणे बाळासाहेब भोसले बैठकीस उपस्थित होते.