Home Blog Page 330

 बढेकर आणि गोखले बिल्डरांनी, बुलढाणा बँकेच्या अधिकाऱ्याने पुण्यात घातलाय धुमाकूळ: धंगेकर

जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी धंगेकर यांची पोलिसात तक्रार दाखल

पुणे-

वाहनकोंडी पार्किंग समस्या: पोलीस होमगार्ड देणार पण त्यांचा खर्च व्यापाऱ्यांना उचलावा लागणार

२४ तास आस्थापना सुरू ठेवणेबाबत शासनाचे परिपत्रकाबाबत चर्चा

पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, कार्यक्षेत्रातील व्यापारी संघटनांच्या बैठकीतील माहिती

वाढत्या बांधकामाचे सुसाट पेव ,रीडेव्हलपमेंट म्हणजे इमारतींचा पुनर्विकास आणि TDR च्या नावाखाली १०० कुटुंब राहत होते तिथे ३०० /४०० कुटुंबे राहायला येऊ लागली , त्या प्रमाणात रस्ते मात्र मोठे झाले नाहीत,दुकानांचे हि तसेच ज्या दुकानात १०० ग्राहक उभे राहून खरेदीची क्षमता होती तिथे पोटमाळे अंतर्गत बांधकामे वाढवून ३००/ ४०० ग्राहक येऊ शकतील अशी क्षमता केली रस्ते मात्र वर्षानुवर्षे होते तेवढ्याच रुंदीचे , गर्दी वाढली त्या तुलनेत रस्त्यांच्या रुंदी, पार्किंग स्पेस वाढविण्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत तर शहरात , उपनगरात वाहतूक कोंडी हि होणारच होती वाहतूक समस्या हि भेडसावणारच होती ..पण या मुळ कारणाकडे दुर्लक्ष करून वर वर मलमपट्टी करण्याचे काम कायम पुण्यात करण्यात आले आहे. कोणत्याही रस्त्याची , जागेची क्षमता असते.. त्याकडे दुलाक्ष करून बांधकामांचे, गर्दीचे केलेले नियोजन हेच वाहतूक कोंडी आणि समस्यांचे मुळ कारण होय, ज्याकडे महापालिका आणि पोलीस या दोहोंनी दुर्लक्ष तर केलेच पण शासनाच्या नगरविकास खात्याने देल्खील जाणून बुजून मूळ कारणाकडे पाहणे टाळले त्यामुळे येथील हि समस्या काहीही केले तरी सुटू शकणार नाही, इमारतींची उंची किती हे रस्त्यांच्या रुंदी पाहूनच ठरवायला हवी शरद लोणकर


पुणे- पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ पुणे अंकित खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर, विश्रामबाग व डेक्कन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील विविध व्यापारी संघटना, अधिकृत पथारी संघटना, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांची काल अॅम्पी थिएटर, फर्ग्युसन कॉलेज कपांउंड, पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीस व्यापारी, किराणा-भुसार व्यापारी, टिंबर मार्केट व्यापारी, ज्वेलर्स व्यापारी, पथारी संघटनेचे ४० ते ४५ सदस्य हजर होते.
यावेळी सर्व व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी यांनी त्यांना व्यवसाय करताना येत असताना येणाऱ्या अडी-अडचणी सांगितल्या. त्यांच्या अडी-अडचणी जाणुन घेवून पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, कृषिकेश रावले, यांनी उपस्थित असलेल्या व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी यांना येत असलेल्या अडी-अडचणींबाबत मार्गदर्शन करून त्यामध्ये अनाधिकृत पथारी यांचेवर कारवाई करणे, २४ तास आस्थापना सुरू ठेवणेबाबत शासनाचे परिपत्रकाबाबत माहिती दिली, भिडे ब्रिज हा बंद असल्यामुळे झेड ब्रिजवर पार्किंग होणा-या वाहनांवर वाहतुक विभागाकडुन कारवाई करण्यात येईल, अवजड वाहनांना शहरात बंदी असल्यामुळे व्यापारी यांनी मागिवलेला माल हा छोट्या वाहनांतुन आस्थापनांच्या ठिकाणी घेवून जावे, गल्ली-बोळात चुकीच्या पध्दतीने पार्किंग होणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल अनाधिकृत रिक्षा स्टॅन्डवर कारवाई करण्यात येईल त्या अनुषंगाने रिक्षा असोसिएशन बैठक घेण्यात येईल. पुणे मनपाच्या कामाच्या अनुषंगाने मनपा अतिरीक्त आयुक्त व मनपा आयुक्त यांची भेट घ्यावी. तसेच आस्थापनांमध्ये काम करीत असलेल्या सर्व कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे, तुळशीबागच्या परिसरातील व्यापारी यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व लाऊडस्पीकरच्या वायर ह्या कापल्या जातात याबाबत विश्रामबाग व फरासखाना पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्याबाबत अभ्यास करावा शनिवार व रविवार या गर्दीच्या दिवशी तुळशीबाग परिसरामध्ये महिलांकडुन चोरीचे प्रमाण जास्त असल्याने परिसरामध्ये महिला पोलीस अंमलदार यांची गस्त वाढविण्यात येईल. फर्ग्युसन कॉलेज रोडवरील फुटपाथवर अनाधिकृतपणे पथारी व्यवसाय करणारे परप्रांतीय व्यवसायिकांवर कारवाई करून फुटपाथ मोकळा ठेवण्यात येईल तसेच सर्व व्यापा-यांनी आप-आपल्या आस्थापनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत, त्यामधील काही सीसीटीव्ही कॅमेरे हे रोडच्या दिशेने बसवुन पुढील बाजुचे छायाचित्रीकरण होईल यापध्दतीने बसवावे, सोने-हिरे व्यापा-यांनी मोठया प्रमाणावर सोने वाहतुक करताना पोलीसांना माहिती देवून पोलीस संरक्षणाची मागणी करावी. पोलीस विभागाकडुन दरमहा व्यापारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल व सदर बैठकीकरीता वाहतुक शाखा, पुणे मनपा यांचे प्रतिनिधी यांनाही हजर राहणेबाबत कळविण्यात येईल तसेच व्यापारी संघटनांनी मांडलेल्या अडचणींबाबत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ कृषिकेश रावले यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.बाजारपेठांमध्ये प्रामुख्याने वाहनकोंडी व वाहन पार्किंगची समस्या असून वाहन पार्किंग करताना नागरिक वेडया-वाकडया पध्दतीने पार्किंग करीत असतात त्याकरीता बाजारपेठांमधील सर्व व्यावसायिकानी सिक्युरीटीकरीता होमगार्डची मागणी केल्यास पोलीस विभागाकडुन मागणी प्रमाणे होमगार्ड पुरविणेकरीता कार्यवाही करण्यात येईल परंतु नेमण्यात आलेले होमगार्ड यांचे वेतन हे व्यापारी वर्गानी एकत्रित जमा करून त्यांना अदा करावे. मागणीप्रमाणे पुरविण्यात आलेले होमगार्ड हे सर्व काम करतील त्याकरीता आपण आपले व्यापारी वर्गाची बैठक घेवून आपणांस किती होमगार्डची आवश्यकता आहे याबाबतचे पत्र स्थानिक पोलीस ठाणे यांचेकडे देण्यात यावे.
उपस्थित असलेले छोटे व्यापारी संघटना तुळशीबागचे पदाधिकारी अरविंद तांदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावर्षीच्या गणेश उत्सव कालावधीमध्ये पोलीसांनी केलेल्या उत्तम गर्दीच्या नियोजनामुळे व छत्रपती शिवाजी महाराज रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड व मंडई परिसरामधील सार्वजनिक रोडवर गर्दी व्यवसाय करणारे, पथारी व्यवसायीक यांचेवर प्रभावी कारवाई केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही त्याबाबत सर्व व्यापारी संघटनांचे वतीने पोलीस विभागाचे अभिनंदन केले. वरील प्रमाणे उपस्थित व्यापारी संघटनांचे पदाधिकारी यांना सुचना दिल्या.
सदर कार्यक्रम हा पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला असून, सदर कार्यक्रमाकरीता सहा. पोलीस आयुक्त फरासखाना/विश्रामबाग विभाग, पुणे शहर, साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन, . शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन, प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) डेक्कन पोलीस स्टेशन, प्रसाद राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजीनगर पोलीस स्टेशन, धनंजय पिंगळे हे उपस्थित होते. उपस्थित असलेल्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन, उमेश गित्ते यांनी आभार मानुन कार्यक्रमाचा समारोप केला.

म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडेच पालटले

पुणे- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडे पालटले आहे. कोथरुडकरांना मंगल कार्यासाठी अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त बँक्वेट हॉल उपलब्ध झाला असून, चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेनंतर सदर सभागृह अतिशय अल्पदरात मिळणार आहे.कोथरुड हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले उपनगर म्हणून सर्वत्र परिचित आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना इथल्या सोईसुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी चंद्रकांतदादा पाटील हे नेहमीच आग्रही असतात.

कोथरुडमधील कष्टकरी कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी सातत्याने ‘अल्पदरात दिवाळी फराळ’ उपलब्ध करुन देणे, वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी ‘मानसी’ उपक्रम, विवाह इच्छुक मुलींची सन्माने पाठवणी व्हावी यासाठी ‘झाल’, त्याशिवाय गरिब कुटुंबातील गरोदर महिलांचे बाळंतपण सुरक्षितपणे व्हावे यासाठी ‘सुखदा’, असे एक ना अनेक उपक्रम सातत्याने राबवित असतात.

कोथरुडमधील प्रत्येक मुलीचे लग्न अतिशय थाटामाटात व्हावे. तसेच, त्यांनाही लग्न सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटता यावा; यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढकारातून कोथरुड देवस्थानच्या जागेतील गंगाराम सभागृहाच्या टेरेसचा लोकसहभागातून विकास करण्यात आला असून, अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असा बँक्वेट हॉल उभारण्यात आला आहे.

या मध्ये मंगल कार्यासाठी सहा हजार सक्वेअर फुटाचा प्रशस्त बँक्वेट हॉल, ५०० नागरिक एकाचवेळी जेवण करतील असा डॉयनिंग हॉल, वधू-वरांसाठी अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त स्वतंत्र कक्ष, प्रशस्त लॉबी, अशा एक ना अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, गरिब कुटुंबातील मुलींची लग्ने या सभागृहात व्हावीत, अन् सर्वांनाच मंगल कार्याचा अभिमान वाटले, यासाठी अतिशय नाममात्र दरात हे सभागृह उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती ना. पाटील यांनी सर्व विश्वस्त मंडळांना केली होती. त्यांनीही ना. पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, नाममात्र दरात सभागृह उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अभिमान वाटेल, असा हा बँक्वेट हॉल उपलब्ध झाला आहे.

दरम्यान, या नव्या बँक्वेट हॉलचे लोकार्पण दिनांक ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि म्हातोबा देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि कोथरुडकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायं. ०५.०० वा. होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन म्हातोबा देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संस्थांनी दिलेला निधी वापरा, नाही तर परत द्या:राज्य शासनाने दिला 28 फेब्रुवारपर्यंत अल्टिमेटम


मुंबई: राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, व विविध प्राधिकरणांना वितरित करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबत शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन २०२३-२४ मध्ये वितरित केलेल्या आणि अद्याप खर्च न झालेल्या निधीचा उपयोग करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा अंतिम मुदतवाढ कालावधी देण्यात आला आहे. तारखेपर्यंत खर्च न झालेला निधी २० मार्च २०२६ पर्यंत शासनाकडे जमा करणे बंधनकारक राहील, असा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला.या मुदतीनंतर निधी शासनाकडे परत न केल्यास संबंधित विभागाचे अधिकारी शिस्तभंगात्मक कारवाईस पात्र ठरतील, असा इशाराही शासनाने दिला आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका प्राधिकरणे वगळून इतर अंमलबजावणी यंत्रणांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत खर्च न झालेला निधी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शासनाकडे जमा करावा. शासन निर्णयानुसार काटेकोर पालन करण्यात यावे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी विलंब न करता विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीचा उपयोग करण्यास गती द्यावी, असा अप्रत्यक्ष संदेश शासनाने दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच:कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण


पुणे:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’ वापरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. व्हीव्हीपॅटचा वापर करण्यासाठी सध्याच्या कायद्यांमध्ये कोणतीही तरतूदच नाही आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे तांत्रिक यंत्रणाही तयार नाही, असे आयोगाने ठणकावून सांगितले आहे. निवडणुका तातडीने घेण्याची मागणी करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांनाही आयोगाने एक प्रकारे कायदेशीर आणि तांत्रिक आव्हान स्पष्ट करून, व्हीव्हीपॅट वापरणे ‘सद्य:स्थितीत शक्य नाही’ असा संदेश दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच:कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

‘पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब’ आराखडा लवकरात लवकरात तयार करावा – बी. व्ही. आर. सुब्रमण्यम

पुणे, : पुणे महानगर क्षेत्रात आर्थिक विकासाची प्रचंड क्षमता असून ‘पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब’च्या माध्यमातून तयार होणारा आर्थिक विकास आराखडा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी प्रारूप आर्थिक बृहत् आराखडा लवकरात लवकर तयार करून सादर करावा, अशा सूचना नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी दिल्या.

‘पुणे महानगर ग्रोथ हब’ बाबत विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, कृषी आयुक्त सूरज मांढरे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश खडके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, केपीआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पंडित आदी उपस्थित होते. आयएसईजीचे संचालक तथा मॅकेन्झी अँड कंपनीचे सहयोगी शिरीष संखे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्री. सुब्रमण्यम यांनी नीति आयोगाने यापूर्वी देशभरातील पहिल्या टप्प्यातील ४ शहर – मुंबई महानगर, सुरत, वाराणसी, विशाखापट्टणम या शहरांसाठी तयार केलेल्या आर्थिक आराखड्यातील प्रमुख बाबींच्या अनुषंगाने सादरीकरण केले. ते यावेळी म्हणाले, पुणे हे पूर्वीपासूनच वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग तसेच औद्योगिक उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असल्याने या परिसरात आर्थिक विकासाला मोठा वाव आहे. त्यामुळेच या शहराची ‘ग्रोथ हब’ साठी निवड केली आहे. या ठिकाणी योग्य नियोजन केल्यास आर्थिक विकास आणि सकल उत्पादनात वाढ करणे व त्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण करणे खऱ्या अर्थाने शक्य आहे. त्यासाठी येथील संसाधने, विविध क्षेत्रातील सर्व विभागांची माहिती व आर्थिक नियोजना विषयी माहिती घ्यावी आदी सूचना त्यांनी दिल्या.

डॉ. करीर यांनी यावेळी विविध सूचना केल्या. मुंबई महानगर आणि पुणे महानगर ग्रोथ हबमुळे राज्याच्या आर्थिक विकासात मोठी भर पडणार असल्याचे ते म्हणाले.

पुणे ग्रोथ हबच्या अनुषंगाने विविध विभागांशी समन्वय साधण्याचे काम करण्यात येत असून लवकरात लवकर आराखडा त्यात करण्यात येईल असे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

आर्थिक आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत आयएसईजी व मॅकेन्झी अँड कंपनीच्यावतीने श्री. संखे यांनी सविस्तर माहिती दिली. सदर या उपक्रमांतर्गत भारतातील ८- १० महानगर क्षेत्रांच्या विविध क्षेत्रातील विकासासह सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) मध्ये वाढ करणे व रोजगाराकरिता मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय निश्चित केलेले आहे. आता पुढील टप्प्यात पुणे महानगर क्षेत्रासाठी आर्थिक आराखडा तयार करायचा असल्याने पुणे शहराविषयी सर्व माहितीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी प्राधिकरणाच्या क्षेत्राची व्याप्ती, विविध विकास केंद्रांच्या आर्थिक उद्योग व त्याला चालना देण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने हाती घेतलेले रिंगरोड, रस्ते, मूळ पायाभूत सुविधा, नदी प्रदूषण रोखणे, नगर रचना योजना, सांडपाणी व्यवस्था, परवडणारी घरे आदींच्या अनुषंगाने सादरीकरण केले. त्याअनुषंगाने पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेने या विकास कामांची नोंद घेऊन पुढील आर्थिक वाढीच्या नियोजन करण्याबाबत सूचित केले.

पुणे महानगर प्रदेशाचा आर्थिक विकास आराखडा येत्या चार महिन्यात अंतिम करावयाचा असल्याने संस्थेने तयार केलेल्या नमुन्यात विविध क्षेत्रातील सर्व विभागांची माहिती व आर्थिक नियोजना विषयी माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आर्थिक आराखड्याविषयी भागधारकांच्या व नागरिकांच्या सूचना, प्रतिक्रिया बाबत नोंद घेण्यासाठी विविध आर्थिक क्षेत्रातील उद्योजक तसेच नागरिकांच्या वर्गीकरणानुसार प्रश्नावली तयार करून त्यांच्या बैठका घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आर्थिक आराखड्याचे पुढील कामकाजाकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला शासन निर्णय अन्वये अंमलबजावणी प्राधिकरण नियुक्त केलेले असून प्राधिकरणाच्या कार्यालयात समन्वयाने पुणे आंतरराष्ट्रीय सेंटर संस्था सर्व क्षेत्रातील विभागांची माहिती संकलित करून पुढील नियोजन करण्यात येईल.

‘पुणे ग्रोथ हब’ प्रकल्पाचा शुभारंभ १ ऑगस्ट, २०२५ रोजी यशदा, पुणे येथे करण्यात आलेला असून यावेळी पुणे महानगर क्षेत्राचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्यासाठी नीति आयोग, महाराष्ट्र शासनाचा नियोजन विभाग व पुणे आंतरराष्ट्रीय सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.

बैठकीस या हबच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापित केलेल्या कार्यकारी समितीतील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000

जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

मुंबई,जालना, दि. २९ ऑक्टोबर..

काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ इच्छणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्षातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

राहुल गांधी यांचा संघर्ष व काँग्रेसच्या विचारधारेवर तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, राशिद पैलवान, प्रतापराव महाते पाटील, सय्यद लतीफ भाई,माजेद खान दाऊद खान, अर्शद भाई (चंदनझिरा फ्रेंड्स), इम्रान खान, फमिम खान (समाजसेवक), सलमान खान, आकाश श्रीरामवार (शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), भाऊसाहेब गोविंद अवघड (भाजप),अकबर खान बने खान (२५ वर्षे नगरसेवक व नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरद पवार गट) तसेच अनेक ज्येष्ठ व प्रतिष्ठित नेत्यांनी शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून या पक्ष प्रवेशाने जालना जिल्ह्याची सत्तासमीकरणे बदलणार असून काँग्रेस पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे.

प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, राजेंद्र राख, कल्याण दळे, आतिक खान, जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहराध्यक्ष युसूफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना येथे अभूतपूर्व उत्साहात भव्य पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा पार पडला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला येथे राफेल विमानातून केले उड्डाण


शक्तिशाली राफेल विमानातील पहिल्या उड्डाणाने माझ्या मनात देशाच्या संरक्षण क्षमतांबद्दल अधिकच अभिमान दाटून आला: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली 29 ऑक्टोबर 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (29 ऑक्टोबर 2025) अंबाला (हरियाणा) येथील भारतीय हवाई दलाच्या  तळावरून राफेल विमानातून उड्डाण केले. भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांमधून उड्डाण घेणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. यापूर्वी, त्यांनी 2023 मध्ये सुखोई 30 MKI मधून उड्डाण केले होते.

अंबाला येथील हवाई दलाचा तळ हा भारतीय हवाई दलाचा पहिला तळ आहे, जिथे फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन फॅसिलिटी येथून राफेल विमाने आली.

भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांनी सुमारे 30 मिनिटे उड्डाण केले आणि सुमारे 200 किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर त्या हवाई दलाच्या तळावर परतल्या. 17 स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अमित गेहानी यांनी हे विमान उडवले. या विमानाने समुद्रसपाटीपासून सुमारे 15000 फूट उंचीवर, ताशी सुमारे 700 किलोमीटर वेगाने उड्डाण केले.

त्यानंतर राष्ट्रपतींनी अभ्यागत पुस्तकात एक संक्षिप्त संदेश लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांनी म्हटले आहे, “भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानातील माझ्या पहिल्या उड्डाणासाठी अंबाला येथील हवाई दलाच्या तळाला भेट देताना मला आनंद वाटत आहे. राफेल विमानातील उड्डाण हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. शक्तिशाली राफेल विमानातील या पहिल्या उड्डाणाने माझ्या मनात देशाच्या संरक्षण क्षमतांबद्दल अधिकच अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. या उड्डाणाचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचे आणि अंबाला येथील हवाई दलाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करते.”

यावेळी राष्ट्रपतींना राफेल आणि भारतीय हवाई दलाच्या परिचालन  क्षमतांबद्दल देखील माहिती देण्यात आली.

लोकमान्यनगर पुनर्विकास स्थगिती: हे सरकार नेमकं कोणाचं आहे — जनतेचं की बिल्डर्सचं?”आदित्य ठाकरेही आक्रमक

८०० घरांचे होणार १६०० घरे -जागा तेवढीच,रस्त्यांची रुंदी हि तेवढीच .. अन वाहने आणि माणसांची गर्दी मात्र वाढणार हे पर्यावरण प्रेमी ठाकरेंच्या लक्षात कसे येत नाही ?

पुणे : राज्यातील सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. “निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेलं हे सरकार आता जनतेचं न राहता ‘बिल्डर-कंत्राटदारांचं सरकार’ बनलं आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. पुण्यातील लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पाला थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिलेल्या स्थगितीचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्स वर (ट्वीटर) एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “लोकमान्य नगरमधील रहिवाशांनी स्वतःच पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता. तो विकास त्यांनाच हवा होता. मात्र, अचानक स्थानिक आमदाराच्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाने या पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती दिली. असा निर्णय झटक्यात घेण्यामागे कारण काय आहे?”
ते पुढे म्हणाले की, “क्लस्टर विकासाच्या नावाखाली हीच जागा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या बिल्डरकडे देण्याचा प्रयत्न सुरु आहे का? जर स्थानिक नागरिकांचं मत न ऐकता मुख्यमंत्री असा निर्णय घेत असतील, तर हे सरकार नेमकं कोणाचं आहे — जनतेचं की बिल्डर्सचं?”

याच पोस्टमध्ये त्यांनी पुण्यातील रस्त्यांवरील खोदकामावरूनही सरकारवर टीका केली आहे. “पुण्यातील बहुतांश रस्ते आता ऑप्टिक फायबर टाकण्यासाठी पुन्हा खोदले जाणार असल्याचं समोर आलं आहे. पण, या खोदकामासाठी मनपाकडून जो मोबदला आकारला जातो, तो सरकारचा लाडका कंत्राटदार असल्यामुळे माफ केला जाणार आहे का?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

निवडणुकीशी संबंधित सर्व शंका/तक्रारींच्या निराकरणासाठी “1950” हेल्पलाइन देशभरामध्‍ये

जिल्हास्तरावर मतदारांच्या मदतीसाठी ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा

नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2025

  1. नागरिकांच्या सर्व शंका/तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार हेल्पलाइन आणि सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जिल्हास्तरीय ‘हेल्पलाइन’ सक्रिय केल्या आहेत.
  2. राष्ट्रीय संपर्क केंद्र (एनसीसी) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाइन म्हणून सेवा देईल. दररोज सकाळी 8:00 ते रात्री 8:00 पर्यंत 1800-11-1950 या टोल-फ्री क्रमांकाच्या माध्यमातून ती उपलब्ध असेल. नागरिकांना आणि इतर भागधारकांना निवडणूक सेवा आणि प्रश्नांमध्ये सहाय्य करणाऱ्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांद्वारे दूरध्वनीला उत्तर दिले जाईल.  
  3. वेळेवर आणि स्थानिक पातळीवर प्रतिसाद मिळावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्याला अनुक्रमे स्वतःचे राज्य संपर्क केंद्र (एससीसी) आणि जिल्हा संपर्क केंद्र (डीसीसी) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही केंद्रे वर्षभर सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत कार्यरत राहून राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या प्रादेशिक भाषांमध्ये मदत पुरवतात.
  4. सर्व तक्रारी आणि शंका राष्ट्रीय तक्रार सेवा पोर्टल (NGSP 2.0) द्वारे नोंदवल्या जातात आणि त्यांचा मागोवा घेतला जातो.
  5. याव्यतिरिक्त केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा सुरू केली असून याद्वारे ‘ईसीआयनेट- प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्याद्वारे, नागरिक आपापल्या बूथस्तरीय अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधू शकतात. 
  6. नागरिक ईसीआयनेट अॅप वापरून निवडणूक अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधू शकतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ), मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांना  नियमितपणे प्रगतीचे निरीक्षण करण्याचे आणि वापरकर्त्यांच्या विनंतीचे 48 तासांच्या आत  निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत.
  7. निवडणुकीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विद्यमान यंत्रणेव्यतिरिक्त या सुविधा आहेत. नागरिक complaints@eci.gov.in वर ईमेल देखील पाठवू शकतात.
  8. निवडणूक आयोग सर्व मतदारांना त्यांच्या समस्यांचे त्वरित आणि पारदर्शक निराकरण करण्यासाठी निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती, अभिप्राय, सूचना आणि तक्रारींसाठी ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ आणि समर्पित मतदार हेल्पलाइन क्रमांक – 1950 सुविधांचा वापर करण्यास प्रोत्साहित करत आहे.

माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार:31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

हैदराबाद-माजी क्रिकेटपटू आणि एमएलसी मोहम्मद अझरुद्दीन यांना तेलंगणा सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्त केले जाईल. ते शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे शपथ घेतील. ११ नोव्हेंबर रोजी जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत असल्याने हे घडले आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ३०% आहे. अझरुद्दीन यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाचा काँग्रेस पक्षाला फायदा होईल असे मानले जाते.

२०२३ मध्ये ते याच जागेवरून निवडणूक हरले. दरम्यान, तेलंगणा काँग्रेस सरकारमध्ये सध्या एकही मुस्लिम मंत्री नाही. यामुळे मंत्रिमंडळात मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व कमी असल्याचा आरोप होत आहे. अझरुद्दीन यांची मंत्री म्हणून नियुक्ती आता ही पोकळी भरून काढेल. त्यांच्या समावेशामुळे रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या १६ होईल, तर राज्यातील मंत्र्यांची कमाल संख्या १८ आहे.
जुबली हिल्स मतदारसंघातील प्रत्येक तिसरा मतदार मुस्लिम आहे: जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघात एकूण अंदाजे ३.९० लाख मतदार आहेत. त्यापैकी अंदाजे १.२० ते १.४० लाख मतदार मुस्लिम समुदायाचे आहेत. याचा अर्थ असा की येथील अंदाजे ३०% मते मुस्लिम आहेत. म्हणूनच या भागातील मुस्लिम मतदार निवडणूक निकाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मुस्लिम मते मिळवणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या विजयाची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. म्हणूनच, अझरुद्दीनला मंत्री बनवून काँग्रेसने या समुदायावरील आपला विश्वास मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
पण पोटनिवडणुकीत मुस्लिम उमेदवार नाही – आमदार गोपीनाथ यांच्या निधनानंतर, ज्युबिली हिल्स जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. मागंती सुनीता गोपीनाथ बीआरएसकडून, वल्लाला नवीन यादव काँग्रेसकडून आणि लंकाला दीपक रेड्डी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. यावेळी, तीन प्रमुख पक्षांपैकी कोणत्याही पक्षाकडून मुस्लिम उमेदवार नाहीत.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत अझरुद्दीनचा पराभव – २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत अझरुद्दीन यांनी जुबली हिल्स मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु बीआरएस उमेदवार मागंती गोपीनाथ यांच्याकडून १६,३३७ मतांनी त्यांचा पराभव झाला. बीआरएस उमेदवाराला ८०,५४९ मते मिळाली, तर अझरुद्दीनला ६४,२१२ मते मिळाली.
२०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने ११९ पैकी ६४ जागा जिंकल्या, तर सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) ने ३९ जागा जिंकल्या. भाजपने आठ, AIMIM ने सात आणि CPI ने एक जागा जिंकली.अझरुद्दीन यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर मुरादाबाद येथून लोकसभा निवडणूक जिंकली. नंतर त्यांनी २०१४ मध्ये राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला. २०१८ मध्ये त्यांना तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.

भारतासाठी ९९ कसोटी सामने खेळले

मोहम्मद अझरुद्दीन यांनी ९९ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तो त्याचा १०० वा कसोटी सामना खेळणार होता तेव्हा त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला. २००० मध्ये, बीसीसीआयने चौकशीनंतर अझरवर आजीवन बंदी घातली. तथापि, २०१२ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी रद्द केली.

मानवतेचा धर्म पाळणे महत्वाचे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या वतीने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दोन कंटेनर मदत रवाना

पुणे :  महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर हालाकीची परिस्थिती ओढावली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी सारखा सण साजरा करताना त्यांच्या दु:खाची जाणीव आपण ठेवणे गरजेचे आहे. यालाचा मानवतेचा धर्म म्हणतात आणि तो पाळणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.

पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर यांच्या वतीने सोलापू आणि मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत म्हणून अन्नधान्य, शालेय साहित्य याचे दोन कंटेनर आमदार शिरोळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी शिरोळे बोलत होते. 

याप्रसंगी सुनिता वाडेकर, परशुराम वाडेकर, शिक्षण मंडळ माजी सदस्य अमित मुरकुटे , रिपब्लिकन पक्षाचे  शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, माजी नगरसेवक आनंद छा जेड सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन काजी, जुबेर पिरजादे, रमेश नाईक आदींसह रिपाइं चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर या पदावर असताना ज्या प्रमाणे काम करत होत्या त्याच प्रमाणे त्या आजही काम करत आहेत. दरवर्षी रिक्षाचालक आणि कष्टकरी सफाई कर्मचारी यांच्या समवेत वाडेकर दाम्पत्य दिवाळी साजरी करत आहेत. यंदा त्यांनी सामाजिक भान ठेवत मानवतेचा धर्म जपत मराठवाडा आणि सोलापूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना अन्न धान्य व शिक्षण साहित्याचे मदतीचे किट पाठवले आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे.

परशुराम वाडेकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी नुकसान झालेल्या मराठवाडा आणि सोलापूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत किट पाठवत आहोत. दोन कंटेनर भरून पाठवलेली ही मदत त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल अशी आशा आहे. सण साजरा करताना त्यांच्या सोबत आपली संवेदना आहेत, हेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने रिक्षाचालक, आरोग्य कर्मचारी आणि  सफाई कर्मचारी यांच्यासाठी दिपावली स्नेह समारंभ आयोजित करण्यात आला होता.

लाईट्स, कॅमेरा, ॲक्रिडीशन!


56व्या इफ्फीकरिता माध्यम अधिस्वीकृतीसाठी अंतिम तारीख 5 नोव्हेंबर – त्वरित अर्ज करा!

माध्यमांसाठी वैशिष्ट्यपूर्ण संधी: इफ्फी 2025 मध्ये एफटीआयआयचा चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम

मुंबई, 29 ऑक्टोबर 2025

माध्यम प्रतिनिधी म्हणून 56 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) सहभागी होण्याची संधी तुम्ही शोधत आहात काय?

या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधी म्हणून लगेच नोंदणी करा:

https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

गोव्यात पणजी येथे दिनांक 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 56 व्या इफ्फीचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिस्वीकृत  माध्यम व्यावसायिकांना या महोत्सवातील चित्रपट सादरीकरणे, गट चर्चा, मास्टर क्लासेस तसेच जगभरातील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी आयोजित नेटवर्किंग सत्रे अशा विविध कार्यक्रमांमध्ये विशेषत्वाने प्रवेश दिला जाईल.

यामध्ये आणखी भर घालत, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतर्फे (एफटीआयआय) 18 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये केवळ अधिस्वीकृतीप्राप्त  माध्यम प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी अशा अभ्यासक्रमात सहभागी होऊ न शकलेल्या पत्रकारांना यावर्षीच्या प्रवेशाच्या वेळी प्राधान्य दिले जाईल.

माध्यम प्रतिनिधींनी हे लक्षात घ्यावे की माध्यम अधिस्वीकृतीसाठीचे पोर्टल 05 नोव्हेंबर 2025 पर्यंतच खुले  असेल.

अर्जदारांनी पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे आणि वैध ओळखपत्र तसेच व्यावसायिक अधिकारपत्रांसह सर्व आवश्यक दस्तावेज अपलोड करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तपशीलवार पात्रता निकष आणि दस्तावेजीकरणविषयक मार्गदर्शक सूचना संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

यासंबंधी कोणतीही मदत किंवा चौकशी साठी कृपया iffi.mediadesk@pib.gov.in येथे पीआयबी इफ्फी माध्यम सहाय्य  डेस्कशी संपर्क साधावा.

पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा म्हणाले,

“इफ्फी हा जगभरातील वैविध्यपूर्ण चित्रपटीय आवाजांना एकत्र आणणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अधिस्वीकृती मिळवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणे सुनिश्चित करून घेण्याप्रती तसेच या प्रतिष्ठित सोहोळ्याची समग्र  माहिती मिळवण्यासाठी पत्रकारांना मदत करण्याप्रती पत्रसूचना कार्यालय कटिबद्ध आहे.” 

गोव्यात पणजीच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर प्रदर्शनासाठी सज्ज झालेला इफ्फी सोहोळा जागतिक सहयोग आणि सर्जकतेची जोपासना करतानाच, भारताच्या चित्रपटीय वारशाचा उत्सव साजरा करतो. दर वर्षी 45,000 पेक्षा जास्त चित्रपट रसिक आणि व्यावसायिक या नऊ दिवसांच्या चित्रपटीय महोत्सवासाठी एकत्र येतात आणि जगभरातील प्रेक्षकांना प्रेरित करणाऱ्या, आव्हान देणाऱ्या आणि एकमेकांशी जोडणाऱ्या कथांचा रसास्वाद घेतात. आशियातील या प्रमुख चित्रपट उत्सवाचा भाग होण्याची संधी चुकवू  नका. आजच अर्ज करा आणि चित्रपटांच्या भव्य रंगमंचाकडे म्हणजेच इफ्फी 2025 कडे नेणारा तुमचा मार्ग निश्चिंत  करा!

महत्त्वाची माहिती:

👉🏻 माध्यमांना अधिस्वीकृतीसाठीचे पोर्टल:  accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

👉🏻 माध्यम अधिस्वीकृती पोर्टल 15 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर 2025 या काळात सक्रीय असेल.

👉🏻 महोत्सवाच्या तारखा : 20 ते 28 नोव्हेंबर 2025

👉🏻 स्थळ: पणजी, गोवा.

👉🏻 चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाची तारीख : 18 नोव्हेंबर 2025

👉🏻 मदतीसाठी ईमेल: iffi.mediadesk@pib.gov.in

कोर्टाने दिलेली वेळ संपली पण ..बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच; म्हणाले- आम्ही आंदोलन स्थळ सोडू, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा

साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता : बच्चू कडू
बच्चू कडू यांनी आम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही, असं म्हटलं. मात्र, जर आंदोलन करायला आलेले सोबतचे लोक आंदोलन सुरू ठेवायचे आहे असे म्हणत असेल तर आम्ही आंदोलन सुरू ठेवू, असं बच्चू कडू म्हणाले. आता लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यांच्यातला हा संघर्ष आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान करणार नाही. मात्र, लोक न्यायालयाचे ऐकणे सोडणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.कोर्टाचा आदेश घेऊन पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी बच्चू कडू यांना भेटले. यामध्ये पोलिसांच्या स्पेशल ब्रॅचचे डीसीपी सातव यांचा समावेश होता.
बच्चू कडू यांनी साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दांची औलाद आहे. असं म्हटलं जेल कमी पडेल, अटक करा,आता रामगिरी ताब्यात घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. तर, पोलिस अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशाची प्रत बच्चू कडू यांना दाखविली.

नागपूर- प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ सोडावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. नागपूर खंडपीठाचे आदेश आल्यानंतरही बच्चू कडू यांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले आहे. तसेच आम्ही आंदोलन स्थळावरून हटायला तयार, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा, असा निर्धार केला आहे. त्यामुळे या आंदोलनाला आणखी आक्रमक वळण मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, न्यायव्यवस्थेनेही जबाबदारीने वागले पाहिजे.

शेतकऱ्यांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग (एनएच-44) काल जवळजवळ सात तास रोखला होता. त्यानंतर आजही आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. काही आंदोलकांनी रेल्वे रोको आंदोलन केले. तर काही आंदोलकांनी समृद्धी महामार्गही रोखला होता.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता सरकार सक्रिय झाले आहे. मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जयस्वाल हे आज, बुधवार, दुपारी चार वाजता बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. या आंदोलनाची तीव्रता वाढू नये आणि सकारात्मक चर्चा होऊन विषयावर मार्ग निघावा, यासाठी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांच्या भेटीनंतर बच्चू कडू हे आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेतात आणि सरकारकडून नेमके कोणते आश्वासन मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आंदोलनाबाबत बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले की, सरकारने निवडणुकीदरम्यान कर्जमाफी आणि पीक बोनसचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कोणालाही कोणतीही मदत मिळालेली नाही. निदर्शकांनी “सात बारा कोरा” सारख्या घोषणा दिल्या. कडू यांनी इशारा दिला की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते बुधवारी दुपारी 12 नंतर रेल्वे गाड्या थांबवतील. बच्चू कडू यांनी दावा केला की बुधवारी आणखी 1,00,000 शेतकरी, ज्यात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश आहे, आंदोलनात सामील होतील.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफी आणि बोनस देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. बच्चू कडू म्हणाले, “सरकारने प्रत्येक पिकावर 20% बोनस आणि सोयाबीनवर 6,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीही मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांना भेटण्यासाठीही वेळ नाही.”

गेल्या वर्षभरात दुष्काळ आणि गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त झाली आहेत, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. तरीही, सरकारने भरपाई प्रक्रियेत हलगर्जीपणा दाखवला आहे. “कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत,” कडू म्हणाले. “संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आम्ही गाव सोडणार नाही.”

स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांनीही सरकारवर निशाणा साधला आणि म्हणाले, “सरकारकडे महामार्ग आणि मेट्रो प्रकल्पांसाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी नसल्याचे म्हटले आहे.
माजी राज्यमंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी आणि सार्वजनिक चळवळींसाठी ओळखले जातात. ते शेतकरी, तरुण आणि अपंगांशी संबंधित मुद्दे मांडतात.

या आंदोलनाचे मुख्य ठिकाण जामठा उड्डाणपूल होते, जो समृद्धी एक्सप्रेस वेचा प्रवेशद्वार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह जिल्हा आहे. आंदोलकांनी सांगितले की सरकारने आता शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले, ज्यामध्ये पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना १०,००० रुपयांची रोख मदत समाविष्ट होती. राज्य सरकारच्या मते, ही मदत २९ जिल्ह्यांमधील ६८ लाख हेक्टर पीक नुकसान आणि शेतकऱ्यांना दिली जाईल.

सप्टेंबरमध्ये, फडणवीस यांनी ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’च्या सातव्या हप्त्याअंतर्गत ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १,८९२.६१ कोटी रुपये हस्तांतरित केले होते. तथापि, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ही मदत अपुरी आहे आणि केवळ कर्जमाफी हाच कायमचा उपाय आहे.

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेश सुपूर्त

पुणे, ता. २९ : मागील महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पिके वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आणि ‘सनीज फूड्स’ यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश सोमेश्वर फाउंडेशनचे विश्वस्त व माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सुपूर्त केला.

‘सोमेश्वर फाउंडेशन’ आणि ‘सनीज फूड्स’ यांच्या वतीने दरवर्षी सर्वसामान्यांना दर्जेदार फराळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. हजारो नागरिक हा फराळ विकत घेतात आणि “ना नफा, ना तोटा” या तत्वावर जनसामान्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करण्याचे भाग्य निम्हण परिवाराला लाभते.

या फराळ विक्रीतून जमा झालेल्या रकमेतील काही हिस्सा मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा संकल्प निम्हण परिवाराने केला होता. या आवाहनाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो संकल्प प्रत्यक्षात उतरला.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सनी विनायक निम्हण यांनी धनादेश सुपूर्त केला. या उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनापासून कौतुक केले आणि ‘सोमेश्वर फाउंडेशन’च्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या, अशी माहिती सनी विनायक निम्हण यांनी दिली.