Home Blog Page 3172

मराठी विद्यापीठ रिध्दपूर येथे व्हावे!

0

पुणे : मराठी भाषेचे उगमस्थान, महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामींचे गुरु परमेश्वर अवतार श्री गोविंदप्रभूचे कार्यस्थान, मराठीचा पहिला आद्यग्रंथ लीळाचरित्राचे निर्माण स्थळ असलेले रिध्दपूर हे सर्वार्थाने मराठी राजभाषा विद्यापीठासाठी योग्य ठिकाण ठरेल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केले.

अमरावती येथील हॉटेल ग्रॅंड मैफील येथे श्री रामनवमीनिमित्त आयोजित गीत रामायण रविवारी पहाटे संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या अमरावती शाखेच्यावतीने हा कार्यक्रम गेल्या १२ वर्षांपासून साजरा केला जातो. यावेळी गीत रामायणाचा बहारदार कार्यक्रम ऐकण्यासाठी भक्तगण व श्रोतेमंडळी पहाटे पाच वाजल्यापासून राम जन्माचा सोहळा व सुमधूर गीतांच्या कार्यक्रमाचा आनंद घेतात.

महाकवी कालिदास यांचे रामटेक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता ग्रथांच्या निर्मितीचे ठिकाण गुरुकुंज मोझरी तसेच रुख्मिणी मातेचे माहेर कौंडण्यपूर ही सर्व ठिकाणे मराठी भाषा निर्मितीत योगदान देतात. महानुभाव पंथीयांचे श्रध्दास्थान यांच्या केंद्रस्थानी रिध्दपूर हे आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन याच परिसरामध्ये झाले आहे. तसेच प्राचीन मराठीत हस्त लिखित ग्रथांचे रिध्दपूरला समृद्ध ग्रंथालयही आहे.

रिध्दपूर येथे आजही अनेक विद्वान महंत वास्तव्यास आहेत. देशभरातून महानुभाव पंथीय अनुयायी रिध्दपूरला येतात. महानुभाव पंथांचे सर्व वाड्मग मराठी भाषेतच आहे आणि अनुयायी मात्र हिंदी, पंजाबी, तेलगू, कन्ऩड तसेच परदेशी भाषिक सुद्धा आहेत. जगभरातून ही मंडळी रिध्दपूरला येत असतात व या निमित्ताने मराठी भाषा जगभर पोहचविण्याचे काम तेराव्या शतकापासून अव्याहतपणे सुरु आहे. हा सर्व इतिहास व वर्तमान पाहता मराठी विद्यापीठ रिध्दपूरलाच व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीजबिलांचे 3 कोटी थकीत

0

थकबाकीचा भरणा करण्याबाबत राज्य शासनाचे पत्र

पुणे : पुणे परिमंडलातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी 2 कोटी 99 लाख 95 हजार रुपयांची थकबाकी असून या थकबाकीचा भरणा करण्याबाबत राज्य शासनाने जिल्हा परिषदेला पत्र दिलेले आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणकडून वीजजोडणी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था स्वनिधी किंवा 14 वा वित्त आयोग किंवा इतर निधीतून पथदिव्यांच्या थकबाकीचा भरणा करण्यासंबंधी राज्यातील जिल्हा परिषदांना निर्देश देण्यात आले आहेत. थकबाकीचा भरणा केल्याबाबतची माहितीही राज्य शासनास पाठविण्यात यावी असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव व मुळशी तालुक्यांतील ग्रामपंचायतीच्या हद्दीत पथदिव्यांच्या 1088 वीजजोडण्यांकडे 2 कोटी 99 लाख 95 हजार रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा आग्रह धरावा :विवेक गाडगीळ

0
पुणे ;‘बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे ,मात्र ही बांधकामे  पर्यावरणपूरक होण्यासाठी ‘पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे ‘ असे प्रतिपादन हैद्राबाद मेट्रो रेल प्रकल्पाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गाडगीळ यांनी केले .
‘जयसन्स कंस्ट्रक्शन सोल्युशन्स ‘ आयोजित ‘ग्रीन बिल्डिंग सोल्युशन्स ‘ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते . ज्येष्ठ उद्योजक उमेश जोशी ,अच्युत वाटवे,   ‘जयसन्स कंस्ट्रक्शन सोल्युशन्स ‘  चे संस्थापक जयंत देवगावकर ,मंदार देवगावकर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला . विवेक गाडगीळ यांनी पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले .
हे चर्चासत्र शनिवारी सायंकाळी हॉटेल रामी ग्रँड येथे झाले .
पर्यावरणपूरक बांधकाम क्षेत्रातील   ‘जयसन्स कंस्ट्रक्शन सोल्युशन्स ‘च्या त्रि  -दशकपूर्ती योगदानाबद्दल  संस्थापक जयंत देवगावकर यांचा यावेळी विवेक गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
परव्हिअस सिमेंट पेव्हिंग,सर्फेसिंग  (पाण्याला झिरपू देणारा  आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणारा  पृष्ठभाग )उष्णतारोधक  हिट रेझिस्टंट रिफ्लेक्टिव्ह  कोटिंग  (न तापणाऱ्या टेरेस साठी ),लाईट वेट इन्सुलेटिंग  रेडी मिक्स  काँक्रीट (यात थर्माकोल सारखे वेस्ट मटेरियल वापरता येते ) अशा अत्याधुनिक  पर्यावरण पूरक बांधकाम साहित्याचा परिचय यावेळी मंदार देवगावकर यांनी करून दिला .
विवेक गाडगीळ म्हणाले ,’ बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे मात्र ही बांधकामे  पर्यावरण पूरक होण्यासाठी ‘पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे. त्यासाठी कल्पक आणि अभिनव कामे करणाऱ्या नियोजनकर्त्यांची बांधकाम क्षेत्रात गरज आहे .बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला पर्यावरणपूरक आणि कल्पक बांधकाम करण्याची मोठी संधी उपलब्ध असून त्यांनी सतत नव्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अभ्यास करत राहिले पाहिजे . ‘
जयंत देवगावकर म्हणाले ,’१९९० पासून बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि आव्हाने बदलली आहेत . तंत्रकुशल कर्मचारी असतील तर ग्राहकांचे समाधान करण्यात यश येते.  ‘
मंदार देवगावकर म्हणाले ,’अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या बांधकाम साहित्याची स्थानिक पातळीवर निर्मिती साठी आम्ही कार्यरत राहणार असून त्यासाठी संशोधन विकास विभाग पिरंगुट येथे सुरु करण्यात आला आहे . ‘
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश  गोगावले ,’सिनर्जी हॉलिडे व्हिलेज ‘चे संचालक राजेंद्र आवटे ,’रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चे अध्यक्ष गणेश जाधव तसेच बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर या चर्चासत्राला उपस्थित होते . अमृता देवगावकर यांनी सूत्रसंचालन केले .

रामजन्मसोहळा आणि सामुदायिक रामरक्षा पठण सोहळा संपन्न

0
​पुणे :मोडक राममंदिर ( शिवतीर्थनगर, कोथरुड ) येथे रामनवमी निमित्त रामजन्मसोहळा ​साजरा करण्यात आला . महिलां​च्या ​सामुदायिक रामरक्षा पठण सोहळ्याची समाप्ती ​झाली . गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामरक्षा पठण करण्यात येत होते . या पठणाची समाप्ती आज करण्यात आली .  कीर्तन सोहळा
​ आयोजित करण्यात आला होता . या सोहळ्याचे हे १५ वे वर्ष होते . ​केशव मोडक
​,रेवती मोडक ,अमित मोडक ,अमेय मोडक ​परिवाराने स्वागत केले . ​

सध्याची व्यवस्था हि कष्टकऱ्यांचे शोषण करणारी-माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

0

पुणे-आम्ही आज आरक्षणासाठी भांडत बसलो आहोत , तर दुसरीकडे नोकरभरती न करता कंत्राटी पध्दतीने कामे करून घेतली जात आहेत . सध्याची व्यवस्था हि कष्टकऱ्यांचे शोषण करणारी असून त्याविरोधात मजबूत संघटन उभे करण्याची गरज आहे , असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी व्यक्त केले .

दलित महासंघातर्फे समता भूमीमधील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात आयोजित सावधान परिषदेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील  बोलत होते . या परिषदेचे अध्यक्षस्थानी   दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मछिंद्र सकटे हे होते . यावेळी   युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर , प्रा. श्रावण देवरे , समतावादी महिला मंचाच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे , डॉ. गेल अम्रवेट , पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट , पुणे शहर महिला अध्यक्षा  लक्ष्मी पवार आदी मान्यवर उपस्थित होते .

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील म्हणाले कि , जातीयता इतकी विषारी आहे कि , ती आपल्या डोक्यातून कधीच जात नाही . त्यामुळे डोक्यातून जातीला बाहेर काढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे .

या परिषदेचे अध्यक्ष  दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मछिंद्र सकटे यांनी सांगितले कि भिमाकोरेगावचे रणसंग्राममध्ये पेशवाई विरुद्ध लढताना मातंग समाजानेही शौर्य गाजविले आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील मातंग समाज हा शूरवीरांच्या समाज आहे . फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचा विचार स्वीकार करून अन्यायी ब्राम्हण्यवाद उध्वस्त करण्यासाठी समतेच्या चळवळी मध्ये सक्रिय व्हावे . व  त्यांनी सावधान परिषदेमागील उद्देश आणि हेतू स्पष्ट केला . ब्राम्हणी संस्कृतीने  हजारो वर्ष भारतामध्ये सामाजिक ऐक्य टिकू दिले नाही , जातीवादी विषमतावादी व्यवस्थेचे  ब्राम्हणवादाला जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले जात आहे . त्यामुळे भारतातील  ब्राम्हणवाद संपविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघमुक्त भारत झाला पाहिजे , अशा प्रकारचा ठराव दलित महासंघाचे आयोजित केलेल्या सावधान परिषदेमध्ये करण्यात आला .

यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले कि , जेथे अक्कल असते तिथे ज्ञान कमी असते . जो जात मानतो तो मर्यादित बुध्दिचा असतो , त्याला इतर जातीचा आंनद घेता येत  नाहीं  जातिमुक्त होऊन माणूस होण्याचा आनंद घेतला पाहिजे .

यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले कि , भिमा कोरेगाव दंगलीत जबाबदार असणाऱ्या मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यापैकी मिलिंद एकबोटेला अटक झाली परंतु , भिडेला अटक झालेली नाही . त्यामुळे एकबोटेला एक न्याय व भिडेला  वेगळा न्याय कशासाठी त्यामुळे संभाजी भिडेला त्वरित अटक झालीच पाहिजे .

यावेळी  प्रा. पुष्पलता सकटे यांनी सांगितले कि , भिमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर झालेल्या दंगलीत मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे जबाबदार असूनही न्यायालयाच्या आदेशानंतर एकबोटेला अटक झाली असली तरी मनोहर भिडे अजूनही मोकाट आहे . भिमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर सरकार आणि पुरोगामी नेत्यांची दुटप्पी भूमिका सर्वासमोर आली आहे . संसदेमध्ये स्त्रियाविषयी अनादर व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध केला पाहिजे .

या परिषदेमध्ये आनंद वैराट व सुहास नाईक यांनी संपादित केलेले ” भीमा कोरेगाव विजय स्तंभ व्दिशताब्दी गौरव ग्रंथाचे”  प्रकाशन करण्यात आले .

या परिषदेमध्ये उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक दलित महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले तर आभार सहदेव खंडागळे यांनी मानले .

हि सावधान परिषद करण्यासाठी खंडू पवार , चिंतामण वैराट , बाबा भिसे , पंकज शेलार , योगेश भिसे , मंगेश पोकळे , जयवंत जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले .

सहकारनगर मधील पालिकेची मिळकत मोफत देण्याचा प्रस्ताव महिनाभर पुढे ढकलला

0

पुणे- सहकारनगर नंबर २ मधील महापालिकेच्या मालकीची ८१.३० चौरस मीटर एवढ्या बांधकाम क्षेत्राची मिळकत श्री योगी अरविंद सांकृतिक मंच या संस्थेला ५ वर्षासाठी विनामोबदला देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी मुख्यसभेत कॉंग्रस गटनेते अरविंद शिंदे आणि विपक्ष नेते चेतन तुपे पा. यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे महिनाभर पुढे ढकलण्यात आला .
प्रभाग क्रमांक ३५ मधील सर्वे नंबर ८५/८६ सि.स. नं. १७८२ सहकारनगर नंबर २,पर्वती येथील महापालिकेची मिळकत या समाजिक संस्थेला १३ जुलै २०१७ ते १२ जुलै २०२२ या ५ वर्षासाठी देखभाल व व्यवस्थापनासाठी मिळकत वाटप नियमावली २००८ च्या तरतुदीस आधीन राहून विनामोबदला देण्यास मान्यता द्यावी असा प्रस्ताव  धनकवडी-सहकारनगर समिती तून स्थायी समिती मार्फत मुख्य सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता . यावेळी हे कायदेशीर आहे काय ?हि नियमावली आहे त्यातील तरतुदी वाचून दाखवा , अशाप्रकारे आपल्याला पालिकेची मिळकत मोफत देता येत नाही. हि एकच सामाजिक संस्था चांगले काम करते आहे काय ? असे मुद्दे अरविंद शिंदे आणि चेतन तुपे पाटील यांनी उपस्थित केले .
यावेळी सुनील केसरी यांनी आपण आता नियमावली बरोबर आणलेली नाही असे सांगितल्याने ,संपूर्ण माहिती घेवून कागदपत्रे घेवून या असे या दोघांनी सांगितले . त्यानंतर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांशी चर्चा केली , आणि हा विषय एप्रिल महिन्याच्या कार्यपत्रिकेवर घ्यावा अशी उपसूचना दिली. त्यास कोणी विरोध केला नाही . त्यामुळे हा प्रस्ताव आता एप्रिल महिन्याच्या मुख्य सभेपुढे पुन्हा चर्चेसाठी येणार आहे .

अध्यक्षांचा विरोध असताना पार्किंग प्रस्ताव सभागृहात –

0

पुणे- मॉल,मल्टीप्लेक्स ,हॉस्पिटल येथील पार्किंग शुल्कावर नियंत्रण न ठेवता, चुकीच्या संशोधनावर आलेला पार्किंग प्रस्ताव खुद्द अध्यक्षांचा विरोध असताना सभागृहात आला .. त्यामुळे ‘त्या ‘ अध्यक्षांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे . अशी टीका पार्किंग प्रस्तावाला विरोध करताना कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पालिकेच्या मुख्य सभेत केली .. पहा आणि ऐका अरविंद शिंदे नेमके काय म्हणाले त्यांच्याच शब्दात …

पार्किंग प्रस्ताव म्हणजे राष्ट्रवादीने गाडलेलं अन भाजपने उकरलेलं भूत -सुभाष जगताप

0

पुणे- राष्ट्रवादीने २०१२ साली आलेला पार्किंग प्रस्ताव गाडून दफन  केल्यानंतर भाजपने हे भूत उकरून काढण्याची काय आवश्यकता होती ? असा सवाल करत भाजप म्हणजे एक
होकायंत्र नसलेले आणि भरकटलेल जहाज आहे  अशी टीका करत याप्र्स्तावाद्वारे वर्षाला पुणेकरांच्या खिशातून ३६०० कोटी रुअप्ये हिसकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला . नेमके जगताप काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका…

वरळी कोळीवाडा समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेसाठी सचिन आणि संगीता अहिर यांबरोबर रूबल नागीचा सहभाग

0

मुंबई-वरळी कोळीवाडा समुद्रकिनार्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. वरळी गावात भारतीय तट रक्षकांच्या अगदी समोर स्थित कोस्टलाईन, व्यापक कचरा डंपिंगच्या मुद्द्यांवर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता होती. कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ती रुबल नागी यांनी तिच्या मिसाल मुंबई उपक्रमाचा एक भाग म्हणून मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिन अहिर आणि संगीता अहिर यांच्या सहकार्याने या क्षेत्रातील कोळी मच्छिमारांच्या जीवनात बदल आणि सुशोभिकता आणण्यासाठी प्रयत्न केले.

मिसाल मुंबई उपक्रमासाठी रूबल नागी धारावी, बॅन्डस्टँड, कफ परेड आणि कुलाबा झोपडपट्टीत रंगकाम आणि पुनर्रचना प्रकल्पांमध्येही कार्यरत आहेत. यावेळी या उपक्रमा अंतर्गत वरळी कोळीवाडा येथील झोपडपट्यांना नवीन रंग देऊन त्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे, ज्यामुळे पावसाच्या पाण्याने घरांमध्ये पाणी गळती होणार नाही, याची खात्री करून घेण्यात आलेली आहे. नुकतेच मुंबईच्या अभिमानी कफ परेडमधील धोबी घाटाला सुंदर बनण्यासाठीचे शिवधनुष्य  रूबल नेगी आर्ट फाऊंडेशनने हाती उचलले आहे.

वरळी कोळीवाडा समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेसंदर्भात रुबल नागी यांना विचारले असता त्या म्हणतात की, “मिसाल मुंबई उपक्रमाद्वारे आम्ही मच्छिमारांना स्वच्छ आणि आरोग्यदायी किनारपट्टीची हमी देऊ इच्छितो आणि त्याच बरोबर त्यांच्या आजूबाजूचा परिसर सुंदर  आणि प्रसन्न बनविण्यासाठी त्यांना मदत करतो आहोत. वरळी कोळीवाडा परिसरातील नागरिकांसाठी आम्ही उचललेलं हे एक छोटंसं पाऊल आहे. वरळी  कोळीवाड्यातील रहिवाशांसाठी पुढे सरसावलेला हा मदतीचा हात मुंबईकर म्हणून, आपल्यापैकी प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

“रूबल नेगी एक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मिसाल मुंबई या उपक्रमाद्वारे  पुढाकार घेत आहेत. वरळी कोळीवाडा झोपडपट्टीचे नूतनीकरण आणि पेंटिंग याद्वारे मुंबई शहराला रुबलने दिलेली एक नवीन छटा आपल्याला पुन्हा नव्याने मुंबईच्या प्रेमात पाडते. रूबलने या प्रकल्पाला जणू एक रिक्त कॅन्व्हास म्हणून बघितले आणि त्यामध्ये सर्जनशील रंगाचे श्वास फुंकले आहेत. या उपक्रमात रुबल आणि माझी पत्नी संगीता अहिर यांनी नागरिक चळवळीचा पुढाकार घेतला आहे. पुढे जाऊन बीएमसी, नौदलातील कामगार, पोद्दार शाळेतील विद्यार्थी, डॉक्टर आणि वकीलही या उपक्रमासाठी हात पुढे करतील.” असे सचिन अहिर म्हणाले.

पार्किंग पाॅलीसी म्हणजे शहर गुन्हेगारांच्या तावडीत देण्याचा प्रयत्न

0

पुणे- पार्किंग पाॅलीसी मुळे गुन्हेगारांना प्राधान्य दिले जाणार असून अशा वसुलीचे ठेके अप्रत्यक्षपणे का होईनात गुन्हेगारांकडे असतात . सामान्य लोकांच्या खिशातून पैसे गोळा करणाऱ्या या पार्किंग पाॅलीसी  ला आपला स्पष्ट विरोध आहे असे सांगत माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी शहरातील मल्टीप्लेक्स, हॉस्पिटल , मॉल आदी बड्या बड्या वास्तूत पार्किंग ची सोय मोफत दिलेली असताना तिथे अशाच प्रकरे वसुली केली जात असल्याने लोकांची वाहने रस्त्यावर येत आहेत या कडे लक्ष्य वेधले . पहा आणि ऐका ..महापालिकेच्या मुख्य सभेत पार्किंग पाॅलीसी ला विरोध करताना नेमके मानकर यांनी काय म्हटले आहे ….

औद्योगिक परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कामगार मंत्र्यांना एनआयपीएम तर्फे निवेदन सादर.

0

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड  औद्योगिक परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी  राज्याचे कामगार मंत्री संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर यांना  नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ  पर्सोनेल  मॅनेजमेंट (एनआयपीएम) संस्थेच्या पुणे  विभागाचे अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी  यांनी  निवेदन सादर केले.

पुणे जिल्ह्यातील झेड  एफ स्टिअरिंग गिअर्स इंडिया लि  या कंपनीत  प्रॉडक्शन  मॅनेजर म्हणून कार्यरत  असलेले अस्लम  कोठाळी  यांना  दिनांक २१ मार्च २०१८ रोजी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास  ते  कामावरून घराकडे परतत असताना ५ – ६ जणांच्या जमावाने बेदम  मारहाण  केली. या  घटनेनंतर रुग्णालयात  उपचार घेत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण  पुणे जिल्ह्यातील  औद्योगिक परिसरात  घबराटीचे वातावरण पसरले आहे. सातत्याने अशाप्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने कंपन्यांतून काम करणाऱ्यांच्या कुटुंबियांनाही काळजी वाटू लागली आहे. अशा  घटनांना  आळा बसावा  यासाठी कामगार मंत्र्याना  हे निवेदन सादर करण्यात आले.

तसेच पुण्याच्या  पोलिस  आयुक्त  रश्मी  शुक्ला  यांनाही  एनआयपीएम तर्फे या घटनेशी
संबंधित  दोषींवर त्वरित कारवाई करावी यासाठीचे निवेदन सादर करण्यात आले.

याशिवाय  येत्या बुधवारी  २८ मार्च रोजी एनआयपीएम व  मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए) तर्फे एमसीसीआयएच्या सभागृहात  संध्याकाळी  ६ वाजता  निषेध  सभा व अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना  करता येऊ शकतील  याविषयी बैठक आयोजित करण्यात  आली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे  मनुष्यबळ  पदाधिकारी या बैठकीला  उपस्थित  राहणार  आहेत.

कर्करोग तपासणी शिबिर संपन्न

0

– महिलांनी कुटुंबियांसह स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर….
पुणे महापालिका आस्था ब्रेस्ट कँसर सपोर्ट ग्रुप व अमेनोरा येस फाउंडेशन च्या वतीने कै बिंदुमाधव ठाकरे रुग्णालयात महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ” या वेळी बोलताना मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या कि महिला ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाची काळजी घेतात त्याच प्रमाणे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे,विशेषतः महिलांमध्ये स्तन कँसर चे प्रमाण वाढत असून याबाबत महिलांनी सजग राहणे व संकोच न बाळगता नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे असे ही त्या म्हणाल्या.यावेळी डा.शेखर कुलकर्णी, डा अंजली टिळेकर,सौ मीनाक्षी भुजबळ,सिस्टर अंजली चोरघे यांच्या टीम ने तब्बल ११० महिलांची तपासणी केली.
या उपक्रमाचे संयोजन मंजुश्री खर्डेकर यांनी केले तर कविता सदाशिव यांनी गोसावी वस्तीतील महिलांना शिबिराची माहिती देऊन त्यांना तपासणी करून घेण्यास प्रेरित केले.

सई आणि तिची बॅगवती…

0

सिनेसृष्टीतील धाडसी आणि ग्लॅमरस अभिनेत्री, सई ताम्हणकर, हिने  काही दिवसांपुरी तिचा एक फोटो  सोशल मीडिया वर टाकला होता, ज्यावर तिने “#बॅगवती” असं लिहिलं होतं.

चाहत्यांमध्ये त्या फोटोला घेऊन खूप चर्चा सुरु झाली, की “#बॅगवती” नेमकं काय असेल.

चाहत्यांच्या उत्सुकतेला ‘द एन्ड’ करत, एकदाचं सईने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सई ‘सॅन कल्प’ या नावाच्या हॅन्डक्राफटेड  बॅग्सचं समर्थन करत आहे.

ब्रँड साठी केलेल्या फोटोशूट मध्ये सईने दिलेल्या पोझेस ची विशेष चर्चा होते आहे

‘फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एस्क्पिडिशन 2018’ मोहिमेचा शुभारंभ

0

पुणे : फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एक्स्पिडिशन 2018’ या गिर्यारोहण मोहिमेचा काल कंपनीच्या आकुर्डी प्रकल्पात ध्वज फडकावून शुभारंभ झाला. फोर्स मोटर्स कंपनीने पाठबळ दिलेल्या या मोहिमेत समुद्रसपाटीपासून ८८४८ मीटरवरील व पृथ्वीवरील सर्वाधिक उंच असलेले एव्हरेस्ट शिखर सर केले जाणार असून त्यात पुण्यातील समीर पाथम व सौराज झिंगन हे गिर्यारोहक सहभागी झाले आहेत.

ही मोहीम एकूण ७० दिवसांची असून त्यासाठी समीर व सौराज ही जोडगोळी येत्या रविवारी (२५ मार्च) पुण्यातून रवाना होणार आहे. पुण्यातून काठमांडूला पोचल्यावर त्यांना ५४३७ मीटर उंचावर असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोचण्यास सुमारे दोन आठवडे लागतील आणि तेथून डोंगरात उंच तळ ठोकण्यासाठी तीन आठवडे लागतील. मे महिन्याच्या अखेरीस ते शिखरावर चढाईचा अंतिम प्रयत्न हाती घेतील.

ध्वज फडकावून या मोहिमेचा शुभारंभ करताना या गिर्यारोहकांना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न फिरोदिया यांच्या हस्ते बर्फात वापरण्याची कुऱ्हाड (आइस-क्स) भेट देण्यात आली. याप्रसंगी श्री. फिरोदिया म्हणाले, “समीर व सौराजला या मोहिमेसाठी पाठबळ देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. समुद्रसपाटीपासून २९०५० फुटांवर, उणे ४० अंश सेल्शियस तापमानात, ताशी २०० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि वातावरणात केवळ ३३ टक्के प्राणवायू अशा आव्हानात्मक स्थितीत एव्हरेस्ट शिखरावर चढाई करणे, ही टिकून राहण्याची आणि जिद्दीची खरी कसोटी असते. आयुष्यभराचा ठेवा ठरेल अशा या कष्टसाध्य प्रयत्नासाठी फोर्स मोटर्समधील आम्हा सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा.”

समीर पाथमने युरोप, आफ्रिका, भारत व नेपाळमधील गिरीशिखरांवर चढाईचा ध्यास घेऊन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी सोडली आहे, तर सौराज झिंगन हा मानवी साधनसंपत्ती व्यावसायिक (एचआर प्रोफेशनल) व प्रमाणित स्काय डायव्हर असून त्याला सात देशांमधील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याची इच्छा आहे. “प्रत्येक व्यक्ती आपल्यातील स्वतःचे एव्हरेस्ट जिंकण्याची आकांक्षा बाळगते आणि हेच स्वप्न त्यांची ओळख पुनर्स्थापित करते. आमच्यासाठी खरेखुरे एव्हरेस्ट सर करणे हीच आकांक्षा आहे. आम्ही याआधी सन २०१५ व सन २०१७ मध्ये तसा प्रयत्न कसोशीने केला होता, परंतु शिखर गाठण्याच्या अगदी जवळ पोचलो असताना आम्हाला आकस्मिक अडथळ्यांमुळे चढाई मधूनच सोडून द्यावी लागली. आता मात्र हा अंतिम टप्पा साध्य करण्याचा निर्धार पूर्ण करण्याची संधी आम्हाला फोर्स मोटर्सने मिळवून दिली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत”, अशी प्रतिक्रिया या दोघांनी व्यक्त केली आहे.

सन २०१५ मध्ये ही जोडगोळी अशाच एव्हरेस्ट मोहिमेवर असताना नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला आणि त्यामुळे माऊंट एव्हरेस्टवर हिमकडे कोसळू लागले. या स्थितीत समीर व सौराज यांनी माणुसकीच्या कर्तव्याला महत्त्व देत स्वतःची मोहिम स्थगित केली आणि भूकंपाचे धक्के आणि हिमकडे कोसळण्यातून अन्य गिर्यारोहकांची धाडसाने सुटका करण्याच्या मदत कार्यात ते सक्रिय राहिले.

सन २०१७ मधील प्रयत्नात ते दोघे ८००० मीटर उंचीवर पोचले, परंतु खराब हवामानामुळे त्यांना परत फिरावे लागले. या खेपेसही सर्व संघाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी स्वतःची आकांक्षा बाजूला ठेवली आणि पुढील वर्षी चढाईचा पुन्हा प्रयत्न करण्याची आशा बाळगून सर्व सदस्यांसह सुरक्षित परत आले.

सौराज व समीरला शुभेच्छा, तसेच प्रोत्साहन देण्यासाठी आणि या मोहिमेच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी फेसबुकवरील फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एक्स्पिडिशन 2018 या पानाशी जोडून घेण्याचे आवाहन यानिमित्त करण्यात आले आहे.

‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चा ​ ‘क्विक हिल टेक्नॉलॉजीज’ बरोबर परस्पर सहकार्य करार

0
पुणे :
 
‘सायबर सिक्युरिटी’या विषयावर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ ने ‘क्विक हिल टेक्नॉलॉजी कंपनी’बरोबर परस्पर सहकार्य करार केला आहे.
 
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार आणि ‘क्विक हिल टेक्नॉलॉजीज’चे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर यांनी या सामंजस्य करारावर सह्या केल्या.
 
‘सायबर सिक्युरिटी’ हा अभ्यासक्रम शालेय पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
यावेळी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, तसेच ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे संचालक डॉ. आर. गणेसन उपस्थित होते.