पुणे- छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाईत शत्रूला पराजीत केलं. स्वराज्याच्या क्रांतीची ज्योत छत्रपती संभाजी महाराजांनी पेटत ठेवली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराज्य जगभर पोहचले. प्रकांडपंडीत व चारित्र्यसंपन्न शंभूराजे उत्तम साहित्यिक होते. त्यांचे आठ भाषांवर प्रभुत्व होते म्हणून त्यांनी… बुधभुषण, नायीकाभेद, सातसतक व नखशीख हे उत्तम ग्रंथ लिहिले. परंतु हा इतिहास काही साहित्यिकांनी दडपून ठेवला. म्हणून छत्रपती संभाजी राजेंचा संपुर्ण खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे… यासाठी इतिहासाचे पुर्नलेखन झाले पाहिजे. तसेच मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे.. अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी येथे केली.
संभाजी ब्रिगेड च्या वतीने संभाजी महाराजांच्या 361 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल उत्सवाच्या रूपाने डेक्कन जिमखाना येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कैलास वडघुले यांच्या वतीने संभाजी महाराज लिखित बुधभूषण ग्रंथाचे वाटप करण्यात आले. तसेच या प्रसंगी मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे असा ठराव संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. या ठरावा ची प्रत माननीय मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे पाठविण्यात आली आहे. सदर कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहर अध्यक्ष प्रशांत धुमाळ, मराठा सेवा संघाचे कैलास वडघुले, जयकर कदम, अजय पवार, मयूर शिरोळे, पुजा झोळे, सुजय कदम, दत्तात्रय खुटवड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सौरभ भिलारे व सचिन जोशी यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास दडवून ठेवला गेला – संतोष शिंदे
पुण्यातील शिवानी नाईक शहा प्रतिष्ठित मिसेस इंडिया “क्वीन ऑफ सब्स्टन्स 2018″ची विजेती
पिंपळ बौद्ध विहाराचे उदघाट्न
पुणे-हडपसर औदयोगिक वसाहतीमध्ये पिंपळ बौद्ध विहाराचे उदघाट्न भारतीय बौद्ध महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यनगरीचे उपमहापौर डॉ . सिध्दार्थ धेंडे ,सागताध्यक्ष पिंपळ बौद्ध विहाराचे संस्थापक सुभाष सरोदे , सामाजिक कार्यकर्त्या ज्योती सरोदे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्याचे उपाध्यक्ष विजय आल्हाट ,नवनाथ खांडेकर , पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत कांबळे , संपर्कप्रमुख सदाशिव कांबळे , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भिसे , रवी दांडेली , दीपक भडके , सुरेश सरोदे , सुखदेव रिकीबे , सूरज मांदळे , महेंद्र शेवाळे , भागवत आवटे , शिवाजी आदमाने , अमोल भुबे , रामभाऊ सोनवणे , दलित स्वयंसेवक संघाच्या पुणे शहर महिला अध्यक्षा मीना शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते .
समाजामधून धम्म दान गोळा करून पिंपळ बौद्ध विहाराची उभारणी करण्यात आली आहे . या विहारांमधून समाज परिवर्तनाचे काम चालणार आहे . भारत बौद्धमय करेन हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे सुभाष सरोदे यांनी सांगितले .
यावेळी भारतीय बौद्ध महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले कि , समाजाच्या आर्थिक मदतीमधून उभारण्यात आलेले पिंपळ बौद्ध विहार समाज परिवर्तनाचे केंद्र ठरणार असून आपण सर्व जण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र येऊ या . असे त्यांनी आवाहन केले .
पुण्यनगरीचे उपमहापौर डॉ . सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले कि हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये सुभाषनगर झोपडपट्टी उभारणीसाठी सुभाष सरोदे अकरा दिवसांचे उपोषण करून झोपडपट्टी वसविली आहे . त्यामुळे समाजबांधवांना एकत्रित आणण्याचे काम सुभाष सरोदे यांनी केले .अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत .
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत पिंपळ बौद्ध विहाराचे संस्थापक सुभाष सरोदे यांनी केले तर सूत्रसंचालन सदाशिव कांबळे यांनी केले तर आभार गौतम भूबे यांनी मानले
लोकमान्यांचा अवमान कदापी सहन करणार नाही – राजस्थान सरकारचा निषेध
लोकमान्य टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये करण्यात आला आहे. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ या धड्यात टिळकांचा उल्लेख आहे. देशाला टिळकांनी चळवळीचा मार्ग दाखवल्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात.असे या पुस्तकात नमूद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारचा निषेध करण्यासाठी केसरी वाडा येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून निदर्शने करून राजस्थान सरकारचा निषेध करण्यात आला, यावेळी काँग्रेस नेते रोहित टिळक , पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल , जयकुमार ठोंबरे , द. स. पोळेकर , विश्वास दिघे ,सुरेश कांबळे, सतीश कांबळे, विनय ढेरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अमित बागुल म्हणाले ,फादर ऑफ टेररिझमअशा शब्दाचा वापर एखाद्या महान व्यक्तींविषयी कसा काय केला जाऊ शकतो? भाजपच्या सरकारकडून असे कारस्थान जाणीवपूर्वक रचले जात आहे, मात्र ते कधीच यशस्वी होणार नाही. या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असे ते म्हणाले.
नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्काराने कलाकारांचा सन्मान
गुन्हा सिद्ध होण्याआधीच तुरुंगवास एक शोकांतिका …जमानत (पहा हिंदी लघुपट- व्हिडीओ )
पुणे- पुरेसे न्यायाधिश नसल्याने कोट्यावधी केसेस वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. घटनेने नागरिकांच्या स्वातंत्र्याची ग्वाही दिलेली असतांनाही आरोपींना गुन्हा सिद्ध होण्याआधीच वर्षानुवर्ष तुरुंगवास भोगावा लागतो. ही एक मोठी समस्या असुन त्याकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ‘जमानत ‘ या लघुपटाच्या माध्यमातुन केला आहे असे प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी येथे सांगितले. सर्वच पोलीस सारखे नसतात , चांगली माणसे , चांगले पोलीस हि समाजात आहेत, पण काही दुष्प्रवृत्ती जशा सर्व क्षेत्रात असतात तशा येथे हि असू शकतात .आणि त्यांच्यामुळे कित्येक कुटुंबे उध्वस्त होतात . अशावेळी कायद्याचा आधार त्यांना तातडीने मिळाला तर…कदाचित अशी कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचू शकतील ; दबाव असला आणि तरीही आरोपी मिळत नसले तर पोलिस सामान्यांना न केलेल्या गुन्ह्यात बळीचा बकरा बनवून आत टाकू शकतात. किंवा वर्षानुवर्ष लाखो कैदी जामीनाच्या प्रतीक्षेत तुरुंगात सडत राहतात. त्यांच्यासाठी संघर्ष करायला क्वचित कोणी येतो आणि आला तरी तोही व्यवस्थेसमोर हतबल होऊन जातो. “जमानत” या हिंदी लघुपटात न्यायव्यवस्था आणि आपल्या समाज व्यवस्थेची शोकांतिका चितारण्यात आली आहे. संजय सोनवणी यांनी या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असुन निर्माते पत्रकार शरद लोणकर हे आहेत. या लघुपटात मयुर लोणकर, निकिता ओंबासे, आनंद कोकरे, अभिषेक लोणकर, सुशांत जावीर, सोमनाथ मातेरे यांनी भुमिका केल्या आहेत.
जमानत (पहा हिंदी लघुपट- व्हिडीओ )
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव उत्साहात साजरा होणार -जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे
पुणे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दरवर्षी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती श्री क्षेत्र चोंडी, ता. जामखेड येथे साजरी करण्यात येते. यावर्षी देखील हा जयंती महोत्सव 31 मे रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार असून तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमीत्त होणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मधील सर्व पक्षीय सदस्य देखील उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, जयंती उत्सवासाठी लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन, ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, माजी मंत्री गणपतराव देशमुख, राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . श्रीक्षेत्र चोंडी एक पर्यटन स्थळ होत असून येथील सर्व अंतर्गत रस्ते तसेच इतर रस्त्यांसाठी आठ ते दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच या क्षेत्रासाठीचा पर्यटन विकास आराखडा देखील मंजुर झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
परिचारिकांचा सन्मान सोहळा संपन्न
पुणे-जागतिक परिचारिका दिनानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गोळीबार मैदानसमोरील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील परिचारिकांच्या सन्मान सोहळा संपन्न झाला . वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रुग्णालयातील परिचारिका वंदना संजय पाडळे व नम्रता बैजामीन डेव्हिड आदींचा सन्मान सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी विद्याधर गायकवाड यांच्याहस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व पुष्पगुछ देउन सन्मानित करण्यात आले .यावेळी सर्व परिचारिकांनी सामूहिक शपथ घेतली .
यावेळी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे अधिसेविका निशिगंधा नवगिरे , सहाय्यक अधिसेविका भारती शिर्के आदी मान्यवर व रुग्णालयातील परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी फ्लोरिन्स नाईटीगॆल यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती पल्लवी भालेकर यांनी दिली .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक निशिगंधा महामुनी यांनी केले तर सूत्रसंचालन मीना स्मॉल यांनी केले तर आभार सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे अधिसेविका निशिगंधा नवगिरे यांनी मानले .
चित्रपट धडपड्या तरुणांना “साधन” ची साथ!!
सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम
सदाशिव अमरापूरकर – एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक मराठी कला रसिकाच्या मनात स्वतःचं एक अबाधित स्थान निर्माण केलं. सिने सृष्टीला ग्रामीण भागातल्या टॅलेंटच्या ताकदीची जाणीव करून देणारा या सृष्टीतला एक प्रमुख शिलेदार. चित्रपटसृष्टीची काहीही माहिती नसताना, कोणाचीही मदत नसताना, स्वतःचा मार्ग काढणं हे किती कठीण असतं याची जाणीव स्वतः प्रस्थापित झाल्यानंतर सुद्धा अमरापुरकरांना होती.
अमरापूरकर गेल्यानंतर त्यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कलाकारांबद्दलच्या कळवळ्याला पुढे नेत, एक मूर्त स्वरूप देण्याचं काम सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्ट सातत्याने करत आहे. यातलंच एक पाऊल म्हणजे “साधन” हा उपक्रम. “साधन” मधून चांगली कथानके घेऊन चित्रपट निर्मिती करू इच्छीणाऱ्या प्रोजेक्टना लागणाऱ्या equipments ची स्कॉलरशीप देण्यात येणार आहे.
विनोद तावडे यांनी सांगितले – ” ग्रामीण भागात अभिजात कलेची कमतरता नाही.. पूर्वी कथा कविता यातून आपली सर्जनशीलता जगासमोर मांडली जायची… पण आता डिजिटल जगाबरोबर चालताना दृक्श्राव्य माध्यम वापरून जगासमोर आपल्या मनातली गोष्ट सांगायचं प्रमाण वाढलं आहे… पण जागतिक स्पर्धेत तांत्रिक बाबींमुळे हे कलाकार मागे पडतात. कारण चांगली साधन सामुग्री या कलाकारांकडे नसते.. किंवा व्यावसायिक साधन सामुग्री वापरण्यासाठी लागणारे पैसे यांच्या कडे नसतात. तर अश्या चांगल्या आणि अभिजात कथानकांना आम्ही ही मदत देणार आहोत.”
या वेळी माहिती देताना रिमा अमरापूरकर यांनी सांगितलं – ” ज्यांना ही स्कॉलरशीप हवी आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क साधून, त्यांच्या प्रोजेक्टची सर्व माहिती आम्हाला कळवायची आहे. ग्रामीण भागातले ग्रुप, चित्रपट शास्त्राचे विद्यार्थी, सामाजिक संस्था यांना या मध्ये प्राधान्य दिले जाईल. ट्रस्ट तर्फे एक कमिटी नेमण्यात येईल, जी स्कॉलरशीपसाठी पात्र प्रोजेक्ट ठरवेल. प्रोजेक्ट पात्र ठरल्यानंतर, त्यांनी त्यांची पूर्ण केलेली स्क्रिप्ट रजिस्टर करून, त्याची झेरॉक्स आणि इतर काही माहिती पाठवायची आहे. या आधारे स्कॉलरशीपसाठी योग्य प्रोजेक्ट निवडले जातील, व त्यांना पूर्ण किंवा आंशिक स्कॉलरशीप दिली जाईल. या मध्ये शोर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी तसंच फीचर फिल्मचा ही समावेश असेल.”
सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट गेली तीन वर्ष, अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागांमधील शाळा व कॉलेज या मधून चित्रपट रसग्रहण कार्यशाळा तसेच चित्रपट बनविण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा मोफत घेत आहे.
श्री. विनोद तावडे, श्रीमती सुनंदा अमरापूरकर, श्री. राजाभाऊ अमरापूरकर, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ.उमा कुलकर्णी, श्री. विनोद शिरसाठ आणि श्रीमती रिमा अमरापूरकर हे या ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. ११ मे २०१८ – अमरापुरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणारं असून, ज्यांना या उपक्रमाचा भाग व्हायचे आहे किंवा त्याचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना connect@sadashivamarapurkar.org या इमेलशी संपर्क साधून सर्व माहिती मिळेल.
बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी जेएनपीटी च्या सीएसआरमधून ५ कोटी रुपये प्रदान
पुणे- आंबेगाव बुद्रुक येथे साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट तर्फे सीएसआर अंर्तगत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार जगदीश मुळीक, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्टचे विश्वस्त जगदीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, शिवसृष्टीनजीक वडगाव ते कात्रज चौक या उड्डाण पुल उभारणीसाठी १३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच कात्रज येथील शिवसृष्टी मार्गे जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी रुंदीकरण करण्यात येणार असून या रस्त्यासाठी ११६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी सेवारस्ते व पादचारी मार्गही बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येणारा हा प्रकल्प २१ एकर जमिनीवर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट तर्फे साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ३०२ कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून यासाठी आतापर्यंत ४२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सरकार वाड्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील भवानी माता स्मारक, राजसभा, रंगमंडळ व तटबंदी चे काम सुरु आहे. तिसऱ्या टप्यात माची, बाजारपेठ, आकर्षण केंद्र, कोकण, प्रेक्षागृह, अश्वशाळा याचे काम करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ व शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे विश्वस्त श्री. कदम यांनी केले.
प्रारंभी साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीची चित्रफित दाखविण्यात आली.
पुणे महापालिकेमुळे माझी बदनामी-नितीन गडकरी
पुणे-चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी केंद्राकडून निधी दिला आहे, उड्डाण पुलाचा आराखडा तयार आहे, कामासाठी ठेकेदार तयार आहे, मात्र महापालिकेने भूसंपादन केले नसल्याने काम अद्यापही सुरू झालेले नाही. उड्डाण पुलाचे उद्घाटन होऊनही काम सुरू न झाल्याबाबत माध्यमांमधून मला विचारणा होत असून, पुणे महापालिकेमुळे माझी बदनामी होत आहे, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महापालिकेच्या कारभारावर कठोर टीका केली. चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी तातडीने भूसंपादन करण्याचे आदेशही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
जिल्ह्यतील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत गडकरी बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, अमर साबळे, वंदना चव्हाण, शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशिषकुमार सिंह, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त सौरव राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गीते आदींसह विधीमंडळ सदस्य, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
चांदणी चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्?न सोडवण्यासाठी पालिकेकडून उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर पर्यायी रस्त्यासाठी अडथळा ठरणा?ऱ्या जागा ताब्यात घेण्याचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. उड्डाण पुलाच्या कामासाठी पंधरा हेक्टर जागेची आवश्यकता असून त्यातील सात हेक्टर जागा बीडीपीतील आहे. इतर जागांवर ८८ घरे, दोन इमारती आणि एक बंगला अशी सुमारे शंभर रहिवासी घरे आहेत. भूसंपादनापोटी रोख मोबदला देण्यासाठी दीडशे कोटींची आवश्यकता असल्याचा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ही जागा रस्त्यासाठी घेतली जाणार असल्याने जागेपोटी टीडीआर देण्याची तरतूद आहे. मात्र, घरांचा आकार लहान असल्याने आणि नागरिक टीडीआर घेऊ न काय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच बाजारात मंदी असल्याने टीडीआरसाठी प्रकल्पबाधित पुढाकार घेत नसल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. परिणामी, प्रकल्पबाधितांना जागेचा मोबदला चालू बाजार मूल्य तक्त्यानुसार (रेडीरेकनर) दुप्पट दराने रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बीडीपीच्या जागांसाठी मोबदला कसा द्यायचा, अशी समस्या आहे. ‘उड्डाण पुलासाठी निधीचे वर्गीकरण झाले आहे. तसेच प्रकल्पबाधित नागरिक स्थलांतर करण्यास तयार असूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच अनेक वेळा मुदतवाढ देऊनही महापालिकेच्या वतीने जागा संपादन करण्यास विलंब होत आहे. उड्डाण पुलाच्या कामाला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष असून नकारात्मक चर्चा सुरू झाली आहे,’ असे आमदार मेधा कुलकर्णी यांनी बैठकीत सांगितले.
उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन २७ ऑगस्ट २०१७ रोजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. पुलाचे काम सहा महिन्यांत सुरू केले जाईल, असे आश्वासन त्या वेळी गडकरी यांनी दिले होते, मात्र अद्यापही काम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, पालिकेने भूसंपादन केले नसल्याने पुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे तातडीने भूसंपादन करावे.
फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणामार्फत विविध ठिकाणी महामार्गांचे काम गतीने सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही भूसंपादनाच्या अडचणीमुळे ही प्रक्रिया संथ झाली आहे. त्यामुळे विविध यंत्रणांनी यासंदर्भात एकत्रितपणे काम करावे आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग द्यावा. त्या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश राज्य शासनाने यापूर्वीच जारी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
जयडी आणणार का शीतली आणि अज्याच्या लग्नात अडथळा?
‘लाखात एक माझा फौजी’ असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील ;लगीरं झालं जी; या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे ही मालिका हे यश आणिटीआरपीचे उच्चांक गाठू शकली. शीतली आणि अज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावात आहे तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे.अज्या आणि शीतलीचं प्रेम पुष्पा मामी, भैय्यासाहेब म्हणजेच हर्षवर्धन आणि जयडीच्या डोळ्यात खुपतंय. शीतलआणि अजिंक्यच्या लग्नाला दोन्ही घरातून होकार मिळाल्यामुळे त्यांची अस्वस्थता अजूनच वाढली आहे. रिवाजानुसार
मुलगी बघण्याचा कार्यक्रम देखील पार पडतो. अजिंक्य गावात आल्यानंतर जाणूनबुजून त्याच्याशी गोड मामी, शीतलआणि तिच्या घरच्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. शीतल आणि अजिंक्यच्या लग्नाची घरात
चाललेली तयारी बघून जयश्री अस्वस्थ होते.आपल्या हातून सगळं सुटतंय या विचाराने ती बिथरते आणि अजिंक्यच्याआधी माझं लग्न करा असं घरी सांगते. जयश्रीच्या या मागणीने सगळ्यांनाच धक्का बसतो. शीतल आणि अजिंक्यच्या
लग्नात अडथळा निर्माण करण्याचा जयडीचा हा डाव यशस्वी होईल का? जयडी शीतल आणि अज्याला एकमेकांपासूनतोडेल का? हे प्रेक्षक लवकरच पाहू शकतील.
राणा आणि अंजलीकडे एक नवा पाहुणा
टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या ;तुझ्यात जीव रंगला; या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणा आणि अंजली तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्र मग ती अगदी
नकारात्मक व्यक्तीरेखा असलेली नंदिता वहिनी असो, ते सर्व महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनले आहेत. नुकतंच आपण मालिकेत पाहिलं कि गायकवाडांना त्यांचा वाडा परत मिळतो. हा
आनंद साजरा करण्यासाठी वाड्यात मोठा समारंभ आयोजित केला जातो. गावकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आबा गावातल्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचे आभार मानतात आणि त्यांचे पैसे देखील परत करतात. सगळीकडे
आनंदीआनंद वातावरण आहे. वाडा तर परत मिळाला पण आता जमीन परत मिळवण्याचे अतोनात प्रयत्न घरातील सदस्य करत आहेत.
सगळं सुरळीत पार पडतातआहेत, गोष्टी आधीसारख्या रुळावर येतात आहे त्यामुळे आबा आता राणा अंजलीला मुलाचा विचार करा असं सुचवतात. आबांनी अचानकपणे मुलाचा विषय काढल्याने राणा अंजली बावरतात. आपण या
नव्या जबाबदारीसाठी तयार आहोत का हे दोघांनाही आत्ता कळत नाहीये. पण त्यांच्याकडे लवकरच एका नव्यापाहुण्याचे आगमन होणार आहे. अंबानी सांगितल्याप्रमाणे राणा आणि अंजली खरंच बाळाचा विचार करणार आहेत
का? हा नवा पाहुणा कोण असणार आहे? त्याच्या आगमनाने राणा आणि अंजलीच आयुष्य कशाप्रकारे बदलणार आहे?हे पाहणे रंजक ठरेल.
” स्मार्ट कम्युनिटी मार्केट डिझाईनच्या खुल्या कल्पना ” या स्पर्धेमध्ये लोहगाव येथील डी. वाय. पाटील वास्तूविद्या महाविद्यालय सन्मानित
पुणे- स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने आयोजित केलेल्या ” स्मार्ट कम्युनिटी मार्केट डिझाईनच्या खुल्या कल्पना ” या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ म्हणून लोहगाव येथील डी. वाय. पाटील वास्तूविद्या महाविद्यालयाचे रोहन पाबळे , अश्विनी शितोळे व अक्षय शिवरकर या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दहा हजार रुपये रोख रक्कम देउन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते गौरविण्यात आले .विजेत्यांना स्मार्ट सिटीशी संलग्न असणाऱ्या स्मार्ट कम्युनिटी मार्केटच्या वास्तुरचनाकरासोबत ( आर्किटेक्ट )प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे .
यावेळी पुणे महापालिका आयुक्त सौरव राव , पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप , संचालक सुब्रमणियन पदमनाभन, पुणे महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , पुणे महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे , वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे आदी मान्यवर उपस्थित होते .
स्मार्ट कम्युनिटी मार्केट्स उभारण्यास आवश्यक असणाऱ्या डिझाईनच्या खुल्या कल्पना मांडण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती . त्याला पुण्यातील १५ वास्तुविद्या ( आर्किटेक्ट ) महाविद्यालयांना निमंत्रित करण्यात आले होते .त्यापैकी सात महाविद्यालयांनी त्यांचे डिझाईन सादर केले होते .
विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे -खासदार आढळराव पाटील
पुणे – केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष तथा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक विधानभवन सभागृहात श्री. आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी खासदार अमर साबळे, खासदार अनिल शिरोळे, सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, समिती सदस्य्, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
श्री. आढळराव-पाटील म्हणाले, जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरुन प्राप्त निधी वेळेत खर्च होईल. तसेच काही विकास कामे तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणीमुळे प्रलंबित असल्यास त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करावा. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
खासदार अमर साबळे म्हणाले, बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांची माहिती पुढील बैठकीत सादर करावी.
खासदार अनिल शिरोळे म्हणाले, विविध विभागप्रमुख व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. या बैठकीचे महत्व लक्षात घेवून संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीस नियमित उपस्थित रहाणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देवून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, जिल्ह्यात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व केंद्र पुरस्कृत योजना राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करावीत.
यावेळी समिती सदस्यांनी वीज पुरवठा, रस्त्यांची कामे, शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह, आरोग्य, शिक्षण पोषण आहार आदी विषयां बाबत केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेतली.
या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, भूमी अभिलेख्यांचे संगणकीकरण, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री उज्वला योजना, अटल मिशन फॉर रिजुव्हीनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत ), स्मार्ट सिटी मिशन, राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन मिशन-नॅशनल रुरबन मिशन आदी योजनांचा खासदार आढळराव-पाटील यांनी आढावा घेतला.



