Home Blog Page 2093

मोदींच्या रुपात देशात उभी फूट पडणारा पंतप्रधान -प्रशांत जगताप

0

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला’ असे विधान केले होते.त्यांच्या या विधानाचे पडसाद पुण्यात उमटले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

या वेळी बोलताना जगताप म्हणाले कि ज्यांनी आयुष्यभर केवळ द्वेषाचं राजकारण केलं ते आजही दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये, दोन राज्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात उभी फूट पडणारा पंतप्रधान या देशाने कधीच बघितला नव्हता जो आज आपण नरेंद्र मोदींच्या रुपात बघत आहोत. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे, महाराष्ट्राचा अवमान करून नरेंद्र मोदींनी त्यांच्या बलिदानाचाही अवमान केला आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही नरेंद्र मोदींच्या गुलामगिरीत गुंग असल्याने त्यांनाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील, देशातील जनता येत्या काळात भाजपला धडा नक्की शिकवणार अशी संतप्त भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
यावेळी महानगपालिकेतील विरोधीपक्षनेत्या महानगरपालिकेतील सौ. दिपाली धुमाळ, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख,महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, माजी नगरसेविका शशिकला कुंभार, शहर समन्वयक महेश हांडे, कार्तिक शिंदे, पूनम पाटील , सुवर्णा सावर्डे, किरण कद्रे, श्वेता मिस्त्री, प्रीती धोत्रे, राखी श्रीराव, सानिया झुंजारराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार

0

मुंबई, दि. ९ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्याने करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळेल जनतेने संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

मंत्री महोदय यांचे निवासस्थान सिंहगड येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, सहसचिव देवाप्पा गावडे, उपसचिव कैलास साळुंखे, सिद्धार्थ झाल्टे, कक्ष अधिकारी किशोर फुलझुले, संकेतस्थळ निर्मितीचे वरिष्ठ सल्लागार देविदास सुसे, विजयसिंह राजपूत, प्रल्हाद अनलम, साक्षी गोराड, सिल्वर टेक्नॉलॉजीचे शुभम राणे यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en हे संकेतस्थळ मराठी  व इंग्रजी दोन्ही भाषेतून उपलब्ध असून यामुळे जनतेला घरबसल्या सर्व माहिती मिळण्यास मदत होणार आहे. विभागानेही नव्याने होणाऱ्या निर्णयांची तसेच उपक्रमांची माहिती या संकेतस्थळावर अद्ययावत ठेवावी जेणेकरून जनतेला याचा लाभ घेता येईल.

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत विशाल क्रिकेट क्लब, अमर इलेव्हन संघात विजेतेपदासाठी लढत

0

पुणे, दि.9 फेब्रुवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत विशाल क्रिकेट क्लब संघाने प्राधिकरण जिमखाना संघाचा तर अमर इलेव्हन संघाने रायझिंग चॅम्पियन संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत शुभम पडवळच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर विशाल क्रिकेट क्लब संघाने प्राधिकरण जिमखाणा संघाचा 130 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना विशाल क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात 3 गडी गमावत 189 धावा केल्या. शुभमने 62 चेंडीत 11 चौकार व 7 षटकारांसह 103 धावांची दमदार खेळी करत संघाचा डाव मजबूत केला. खालिद कुरेशीने 36 धावा करत शुभमला सुरेख साथ दिली. 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्वरूप गोडसे व अभिषेक भाटकरच्या अचूक गोलंदाजीपुढे प्राधिकरण जिमखाणा संघ केवळ 14.2 षटकात सर्वबाद 59 धावांत गारद झाला. स्वरूपने 13 धावात 4 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. शुभम पडवळ सामनावीर ठरला.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत ओमकार कोतळकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर अमर इलेव्हन संघाने रायझिंग चॅम्पियन संघाचा 20 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना अमर  इलेव्हन संघाने 20 षटकात 8 बाद 161 धावा केल्या. यात रिशव सहायने 26 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह 48 तर शुभम थावरेने 27 धावा करून संघाचा डाव बळकट केला. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमकार व मनिष सुपालच्या अचूक गोलंदाजीने रायझिंग चॅम्पियन संघाचा डाव 19.2 षटकात सर्वबाद 141 धावांत रोखला. 19 धावा व 33 धावात 3 गडी बाद करणारा ओमकार कोतळकर सामनावीर ठरला.


स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरीविशाल क्रिकेट क्लब – 20 षटकात 3 बाद 189 धावा(शुभम पडवळ 103(62, 11×4, 7×6), खालिद कुरेशी 36(29, 3×4, 2×6), फैयाज लांडगे 1-19, धिरज परमबथ 1-28) वि.वि प्राधिकरण जिमखाणा- 14.2 षटकात सर्वबाद 59 धावा(प्रतिक फाळके 15(16, 3×4), स्वरूप गोडसे 4-13, अभिषेक भाटकर 2-12, वैभव नारडे 1-8) सामनावीर- शुभम पडवळविशाल क्रिकेट क्लब संघाने 130 धावांनी सामना जिंकला.
अमर इलेव्हन- 20 षटकात 8 बाद 161 धावा
(रिशव सहाय 48(26, 5×4, 2×6), शुभम थावरे 27(22, 1×4, 2×6), ओमकार कोतळकर 19(27, 1×4, 1×6), फरझान शेख 2-18, राहूल राठोड 2-41) वि.वि रायझिंग चॅम्पियन – 19.2 षटकात सर्वबाद 141 धावा(दत्तराज पाटील 36(22, 4×4, 2×6), राम धायगुडे 35(21, 3×4, 2×6), ओमकार 3-33, मनिष सुपाल 2-17) सामनावीर- ओमकार कोतळकरअमर इलेव्हन संघाने 20 धावांनी सामना जिंकला. 

आता रेल्वेबोगींवर राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी पुण्यामार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेससह पाच एक्सप्रेसवरुन मोहीम सुरू

0

पुणे, दि. 9: गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नाविन्यपूर्ण माध्यमांचा पुरेपूर वापर करत आहे. आतापर्यंत केवळ खासगी आणि केंद्र शासनाच्या उपक्रमांद्वारे वापरल्या जाणाऱ्या रेल्वे डब्यांवर जाहिराती ‘रॅप’ करण्याची संकल्पना राज्य शासनानेही अवलंबली असून पाच एक्सप्रेस रेल्वेगाड्यांवर शासनाच्या कल्याणकारी कामाच्या जाहिराती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

पुण्यामार्गे धावणाऱ्या लातूर एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस तसेच महाराष्ट्र एक्सप्रेसचा यात समावेश आहे. याशिवाय दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आणि मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्सप्रेसवरही या जाहिरात संकल्पना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडी शासनाकडून राज्यात विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यांची माहिती राज्यातील सर्व जनतेपर्यंत पोहोचवून अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ या मोहिमेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात करण्यात आलेल्या विविध कामांचा उल्लेख करण्यात आला आहे.

शेती, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, पायाभूत सुविधा उभारणी, पर्यटन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक, सांस्कृतिक वारसा जतन आदी क्षेत्रात राज्य शासनाचे विविध उपक्रम सुरू आहेत. दोन वर्षात राज्य सरकारने अनेकविध विकासकामे केली आहेत. त्यांची माहिती या एक्स्प्रेसवर प्रदर्शित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी 7 फेब्रुवारीपासून या अभियानाला सुरुवात झाली असून एक महिना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

पीएमपीएल कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी ६ कोटी मंजूर -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनास यश

0

पुणे : पुणे महानगर परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पी.एम.पी.एल कामगार युनियनच्या वतीने पुणे महानगरपालिकेस घेराव घालून व आंदोलन करण्यात आले होते .आंदोलनानंतर येत्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात मोठा रोष निर्माण होऊ शकतो असे दिसताच सत्ताधाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला. यासाठीचा ठराव नगरसेवक प्रदीप गायकवाड यांनी दिला होता तर त्यास अनुमोदन नगरसेविका नंदा लोणकर यांनी दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाला आज यश आले आहे. स्थायी समितीच्या वतीने पीएमपीएल कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी ६ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ म्हणाल्या, पुणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या प्रमाणे पीएमपीएल कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा, ही ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीमधील सदस्यांनी ठराव दिला. त्यानुसार स्थायी समितीने कामगारांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी ६ कोटी रुपये दिले आहेत.

जीवनविद्या मिशनच्या सहभागाने आता होईल ग्रामसमृद्धी – ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ

0

मुंबई, दि. 9 : महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगिण विकास करण्याचे तसेच राज्यातील गावे सर्वच बाबतीत आदर्श बनविण्याचे माझे स्वप्न आहे. प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी, समृद्ध व सक्षम करण्यासाठी तसेच दत्तक घेतलेली गावे ही आदर्श गावे बनविण्यासाठी जीवनविद्या मिशन, मुंबई आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियान राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सांगितले.

थोर समाजसेवक श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन ही समाजातील सर्व स्तरातील अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, स्त्री सन्मान, विद्यार्थी याबाबत संस्कार अभियान, कार्यशाळा असे विविध प्रकारची कार्य करत आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी जीवनविद्या मिशनने 60 गावे दत्तक घेतली असून त्यापैकी 20 गावांमध्ये जीवनविद्या मिशनने कार्य सुरू केले आहे. यातील 4-5 गावांमध्ये अतिशय परिणामकारक बदल दिसून आला असल्याने ग्रामविकास विभागाकडे जीवनविद्या मिशनने सादर केलेल्या ग्रामसमृद्धी अभियानाच्या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याचे मंत्री महोदय श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले की, गावातील भौतिक विकासासाठी सरकारी, निमसरकारी तसेच खासगी संस्था, उद्योग समुहाचे आर्थिक सहकार्य मिळवून जीवनविद्या मिशनचे प्रशिक्षित कार्यकर्ते हे विकासकामे करणार आहेत. ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत घरोघरी करण्यात आलेल्या सर्व्हेचा अभ्यास करून तसेच ग्रामपंचायतीसोबत सभा घेऊन गावांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी भर देण्यात येणार आहे. यात हागणदारी मुक्त गाव, प्लास्टिक बंदी, शून्य कचरा मोहीम, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्त्री सन्मान, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, नोकरी किंवा व्यवसाय मागदर्शन, स्वयंरोजगार व रोजगार संधी, शेतकरी वर्गाला संघटित करणे, सरकारी योजना सर्वदूर पोहचविणे व राबविणे, शासकीय लाभ घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, नैसगिक साधनसंपत्तीचा मोजका वापर करण्यास शिकवणे, गाव व्यसनमुक्त करणे, राष्ट्रहित भावना वृद्धींगत करून उत्कृष्ठ नागरिक घडवणे अशा विविध उद्दिष्टांवर भर देण्यात येणार आहे.

ग्रामसमृद्धीचे कार्य करण्यासाठी जीवनविद्या मिशन संस्थेला शासनाची सहयोगी मागदर्शक संस्था म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. मात्र जीवनविद्या मिशन, मुंबई या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रामसमृद्धी अभियानासाठी येणारा खर्च सरकारी योजनेतून करण्यात येणार नसून संस्थेमार्फत किंवा लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. या अभियानामुळे गावातील प्रत्येकाचा मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि शारिरीक स्तर उंचावणार असल्याची आशा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.

टीईटी परीक्षेत ७८००अपात्र विद्यार्थ्यांना केलं पात्र – अमिताभ गुप्ता

0

पुणे: टीईटी घोटाळा प्रकरणात टीईटी परीक्षेत गौरमार्गाचा अवलंब करीत लाखो रुपये देऊन तब्बल 7 हजार ८00 जणांनी पात्र झाल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे.पुणे सायबर पोलिसांनी या 7८00 जणांची पत्यासह यादी तयार केली आहे.अपात्र उमेद्वारांविरुद्ध कारवाईसाठी पुणे सायबर पोलीस तयार असून लवकरच या 7८00 अपात्र उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषद पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

अमिताभ गुप्ता म्हणाले ,टीईटी घोटाळा प्रकरणाचे जाळे हे दिवसंदिवस वाढतच चालले आहे.टीईटी परीक्षेत तब्बल 7८00 अपात्र उमेदवारांनी पैसे देऊन पात्रता मिळविली आहे.या उमेदवारांना ओएमआर शीट मध्ये 28 मार्क असताना चक्क अंतिम निकालात 82 मार्क दिल्याचे उघडकीस आले आहे.तसेच या उमेदवारांना पात्र करण्यासाठी परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविताना कोडवर्ड देण्यात आला होता.आणि विशेष म्हणजे एजंटला पैसे देणाऱ्यांच उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर काहीच प्रश्नांची उत्तरे सोडवायची ठरले होते.

अश्या अनेक धक्कादायक बाब सायबर पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पुणे सायबर पोलिसांनी जी 7८00 अपात्र उमेदवारांची पत्यासह यादी तयार केली आहे.ती यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे.शिक्षण विभागाकडून खातरजमा केल्यानंतर अपात्र उमेद्वारांविरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. असे अमिताभ गुप्ता म्हणाले.

पुणे कृषि भवनाच्या कामाला गती द्यावी – कृषिमंत्री दादाजी भुसे

0

मुंबई, दि. 9 :  शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध कृषि योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना कृषि सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कृषि विभागाचे कामकाज एका छताखाली आणण्यासाठी पुणे येथे कृषि भवन उभारण्यात येत आहे. कृषि भवनाच्या कामाला गती देवून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

मंत्रालयात कृषि मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील कृषि भवनाच्या बांधकाम आराखडासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्यशासनाच्या कृषि योजनांची सेवा आणि माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी आणि प्रशासकीय कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी आणल्यास कामाला गती प्राप्त होईल. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कृषि भवनाचे काम कालमार्यादेत पूर्ण करावे, असेही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

पुणे,पिंपरी चिंचवड, चाकण परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत

0

पुणे : महापारेषण कंपनीच्या लोणीकंद व चाकण या दोन अतिउच्च दाबाच्या ४०० केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३० च्या सुमारास पाच ठिकाणी ट्रिपींग आले होते. या तांत्रिक बिघाडामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच चाकण, वाघोली, लोणीकंद आदी ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यातील ८० टक्के भागात सकाळी ८.३० ते १२ वाजेपर्यंत व ऊर्वरित २० टक्के भागात दुपारी ३.१५ वाजेपर्यंत वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३० च्या सुमारास महापारेषणच्या लोणीकंद ते चाकण आणि चाकण ते तळेगाव या दोन्ही टॉवर लाईनच्या एकूण ५ सर्कीटमध्ये घटदाट धुकं व दवं यांचा परिणाम झाल्याने तांत्रिक बिघाड झाला. परिणामी महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या ४०० केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. या उपकेंद्रांतून महावितरणच्या तब्बल १८९ उपकेंद्रांना होणार वीजपुरवठा देखील ठप्प झाला. त्यामुळे पुणे शहरातील सुमारे १५ लाख १३ हजार, पिंपरी चिंचवड शहरातील ७ लाख २५ हजार तसेच लोणीकंद, वाघोली, चाकण या ग्रामीण परिसरातील सुमारे १ लाख ८० हजार अशा एकूण २४ लाख १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

दरम्यान वीजपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर महावितरण व महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपात्कालीन नियोजन केले. यामध्ये कोयनेमधील वीजनिर्मिती वाढविण्यात आली व त्याचा महापारेषणच्या जेजूरी ४०० केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात आला. जेजूरी उपकेंद्रातून महावितरणच्या विविध उपकेंद्रांना पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध झाल्यानंतर सकाळी ८.३० पासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास महावितरणकडून तांत्रिक उपाययोजना करण्यास वेगाने सुरवात झाली. यामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण परिसराच्या ८० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्वप्रथम रुग्णालये, पाणीपुरवठा योजना, घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तसेच महापारेषणच्या युद्धपातळीवरील दुरूस्ती कामामुळे टॉवर लाईनच्या पाच पैकी दोन सर्कीटच्या दुरूस्तीचे काम दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण झाले. त्यामुळे या दोन्ही सर्कीटवरून महावितरणच्या काही उपकेंद्रांना वीजपुरवठा सुरू झाला व उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास आणखी वेग देण्यात आला.  

पुणे शहर अंतर्गत रास्तापेठ, बंडगार्डन, पर्वती, कोथरूड, नगररोड, शिवाजीनगर विभागामध्ये पर्यायी व्यवस्थेतून सकाळी ११.३० वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरु करण्यात आला तर पद्मावती विभागामध्ये १ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला. पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत पिंपरी विभागामध्ये १२ वाजेपर्यंत संपूर्ण भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला. भोसरी विभागामध्ये सकाळी १०.१५ वाजेपर्यंत एमआयडीसी व घरगुती ग्राहकांसह सुमारे ५५ टक्के भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला तर उर्वरित ४५ टक्के भागात दुपारी ३.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. यासोबतच ग्रामीण भागामध्ये लोणीकंद व वाघोली परिसरातील वीजपुरवठा सकाळी ९.४५ च्या सुमारास सुरळीत करण्यात आला. तर महत्वाच्या चाकण एमआयडीसीमधील वीजपुरवठा देखील दुपारी १२.१५ वाजता सुरु करण्यात आला.

विजेचा प्रवास- वीजनिर्मिती कंपन्यांकडून निर्माण केलेली वीज ही महापारेषण कंपनीच्या अति उच्चदाबाच्या टॉवर लाइनद्वारे त्याच कंपनीच्या ४०० केव्ही, २२० केव्ही व १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांपर्यंत आणली जाते. या अतिउच्चदाब उपकेंद्रांमधून महावितरण कंपनीच्या ३३ केव्ही, २२ केव्ही व ११ केव्ही उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जातो व या उपकेंद्रांमधून निघणाऱ्या वीजवाहिन्या व रोहित्रांद्वारे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, शेती आदी सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.

सुमेधा चिथडे, विनायक रानडे, टी.एन.परदेशी यांना पुरस्कार प्रदान

0

पुणे नगर वाचन मंदिराचा १७४ वा वर्धापन दिन
पुणे :  पुण्यामध्ये अशा कितीतरी संस्था अशा आहेत, ज्या वाङ्मयमयीन संस्कृतीसाठी आणि वाचकांसाठी काम करतात.  त्यांची साखळी निर्माण व्हायला हवी. ज्ञानवृद्धीसाठी हे गरजेचे आहे. ग्रंथालये ही वाङमय संस्कृतीची केंद्र झाली पाहिजेत. सृजनशीलतेची गजबज हे आपल्या संस्कृतीच्या समृद्धीचे लक्षण आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिराच्या १७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सिटी पोस्ट चौकातील संस्थेच्या इमारतीत  करण्यात आले होते.  कार्यक्रमात अरुणा ढेरे यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.  यावेळी पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहंदळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर, सहकार्यवाह प्रसाद जोशी, चिंतामणी तावरे, अनघा फडणीस, गायत्री सावंत,केदार पटवर्धन, अरविंद रानडे, गुरुदास नूलकर, अनिल देऊरकर, गौरी कुलकर्णी, रवींद्र चौधरी, विनायक माने, हर्षदा ठाकर, प्रशांत कुलकर्णी, रोहित जोगळेकर, राजीव मराठे, केतनकुमार पाटील, संगीता पुराणिक, स्वाती ताडफळे उपस्थित होते.
अरुणा ढेरे यांच्या हस्ते सुमेधा चिथडे यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, विनायक रानडे यांना वाचन चळवळ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आणि टी.एन.परदेशी यांना संत  वाङमय लेखन पुरस्कार देण्यात आला.
अरुणा ढेरे म्हणाल्या, पूर्वी समाजाच्या विकासामध्ये धर्मसंस्था ही पायाभूत होती. मंदिर हे समाज विकासाचे साधन होते. नृत्य, संगीत, वादन अशा अनेक कलांचा विकास मंदिरातूनच झाला. बदलत्या काळानुसार वाचनालये ही समाज विकासाची मंदिरे झाली पाहिजेत. वाचनालयाचा विकास झाला पाहिजे. पुणे नगर वाचन मंदिर हे प्रबोधनपर्वाच्या इतिहासातील महत्त्वाचा दस्तावेज आहे. समाजाच्या हिताला पोषक असे नव्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचविणारी जाणती मंडळी वाचन मंदिरात आहेत, असेही त्यांनी सांगितले.   
सुमेधा चिथडे म्हणाल्या, पुरस्कार व्यक्तीला नाही तर सेवाकार्याला आहे. हा पुरस्कार प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या त्यागाला मी अर्पण करते. थोर पुरुष केवळ वाचायचे नसतात, तर आपापल्या परीने कृतीमध्ये उतरवायचे असतात. सैन्यदल हे केवळ एकच असे क्षेत्र आहे, जिथे मागणी नसते, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संप नसतो. स्वातंत्र्य मिळवण्यात आपले काही योगदान नव्हते, परंतु स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काय करू शकतो याचा विचार करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
टी.एन.परदेशी म्हणाले, दुसऱ्याने काहीतरी करायला पाहिजे यापेक्षा स्वतः काहीतरी करायला पाहिजे, या विचरातूनच वाचन चळवळ सुरु झाली. विनायक रानडे यांनी पुरस्काराची ५ हजार रुपये रक्कम सैनिकांसाठी काम करणाऱ्या सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेला दिली.
विनायक रानडे म्हणाले, आज मिळालेला पुरस्कार ही माझ्या ग्रंथाला मिळालेला पुरस्कार आहे. हा पुरस्कार गोरक्षनाथांचा कृपाशिर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 
मधुमिलिंद मेहेंदळे यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. विनायक माने यांनी आभार मानले.

महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी संजय राऊतांना धमकी; “मदत करा, अन्यथा तुरुंगात टाकू..

0

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिलं पत्र

मुंबई-विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असाही गौप्यस्फोट केला आहे.दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावलं जात आहे 

शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेच्या खासदाराने पत्रात म्हटले आहे – ठाकरे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे.एवढेच नाही तर त्यांनी अंमलबजावणी संचालनालयावरही (ईडी) गंभीर आरोप केले आहेत. ईडीच्या माध्यमातून मला गोवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. 17 वर्षांपूर्वी मी जमीन खरेदी केली होती, त्या प्रकरणी ईडीने तपास सुरू केला आहे.

उपराष्ट्रपतींसोबतच राऊत यांनी या पत्राची प्रत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मलिकार्जुन खर्गे, आप नेते संजय सिंह, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांच्यासह अनेक नेत्यांनाही पाठवली आहे. सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही राऊत यांनी केले.

सरकार पाडण्यास नकार दिल्याने किंमत मोजावी लागेल अशी धमकी दिली
संजय राऊत यांनी असेही नमूद केले आहे की, काही काळापूर्वी काही लोकांनी महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला होता. जेणेकरून महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, ज्यावर संजय राऊत यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मदत न केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकीही या लोकांनी दिल्याचे राऊतांनी सांगितले.. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याशिवाय महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांनाही पीएमएलए कायद्यांतर्गत तुरुंगात पाठवल्याचे सांगण्यात आले. या सगळ्यासाठी आपण भीक मागितली नसल्याचं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

17 वर्षे जुन्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न
संजय राऊतांनी खूप गंभीर केला की, भाजप विविध डावपेचांचा वापर करुन शिवसेना सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पत्रात म्हटले की, ‘मी आणि माझ्या कुटुंबाने अलिबागमध्ये काही जमीन खरेदी केली आहे. ही जमीन 17 वर्षांपूर्वी आम्ही खरेदी केली होती. ही जमीन सुमारे एक एकर आहे. आता मी ज्यांच्याकडून जमिनी घेतल्या आहेत त्यांनाही धमकावले जात आहे. ईडीच्या कारवाईच्या भीतीने त्यांना माझ्याविरोधात बोलण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांना काही पैसे देखील देण्यात आले आहे.’

भाजप ईडीसारख्या एजन्सीचा गैरवापर करत आहे
राऊत यांनी पत्रात पुढे लिहिले की, ‘मी माझ्या राजकीय कारकिर्दीला तीन दशकांपूर्वी सुरुवात केली होती. मी अगदी सुरुवातीपासून शिवसेनेत आहे. सध्या महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. तसेच शिवसेनेची भाजपसोबत 25 पेक्षा अधीत वर्षांपासून युती होती. 25 वर्षांत दोन वेळा शिवसेना-भाजप युतीचे सरकार देखील आले आहे. काही वैचारिक मतभेदांमुळे आम्ही वेगळे झालो. मात्र, आम्ही भाजपपासून फारकत घेतल्यानंतर समोर आले की, भाजप शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी ईडी सारख्या एजेंसीचा गैरवापर करत आहे. शिवेसना नेत्यांना निशाणा बनवला जात आहे. केवळ खासदार नाही तर शिवसेनेच्या आमदारांना देखील निशाणा बनवले जात आहे. कारण ते शिवसेनेत आहे यामुळे त्यांची ईडीद्वारे चौकशी केली जात आहे.

“मुलीच्या लग्नाच्या खर्चाची चौकशी”

तसंच मुलीच्या लग्नाच्या खर्चासंबंधी चौकशी केली जात असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. “माझ्या मुलीचं २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न झालं. ईडी आणि इतर तपास यंत्रणा डेकोरेटर तसंच इतर कंत्राटांना समन्स बजावत असून धमकावत आहेत. माझ्याकडून ५० लाख रोख मिळाले असा जबाब देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांचा छळ केला जात आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

“ईडीने बेकायदेशीरपणे २८ जणांना घेतलं ताब्यात”

“ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी आतापर्यंत बेकायदेशीरपणे २८ जणांना ताब्यात घेतलं आहे. यांनी ईडीच्या कार्यालयात बोलावून धमकावलं जात आहे. या सर्वांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं असून तासनतास बसवलं जात आहे. जर माझ्याविरोधात जबाब दिला नाही तर घऱी जाऊ देणार नाही आणि अटक करु इथपर्यंत धमकावलं जात आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी तर काही जणांकडे त्यांच्या वरिष्ठांनी माझ्याविरोधात रचलेला कट असल्याचं मान्य केल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी यापुढेही आपण सभागृहात आणि सभागृहाबाहेर बोलत राहणार असल्याचं म्हटलं आहे.

अण्णा हजारेंचे १४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण

0

किराणा दुकानात वाईन विक्री निर्णया विरोधात २ वेळा दिला होता इशारा :मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र वाचा जसेच्या तसे ..

दिनांक- 09.02.2022

जा.क्र.भ्रविज- 37/2021-22

स्मरणपत्र- 2

प्रति,

मा. उद्धवजी ठाकरे साहेब,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

मुंबई- 32

विषय- राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात 14.2.2022 पासून आमरण उपोषण करणेबाबत स्मरणपत्र…

महोदय,

            काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटते. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक आहे.

            गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत. चर्चा करीत आहेत. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही.

            यापूर्वी आपणास या विषयावर दोन पत्रे पाठविली आहेत.  तसेच लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्यासंबंधीही काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. आपणाकडून एकाही पत्राचे उत्तर आलेले नाही. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे आमच्या एकाही पत्राला कधीच उत्तर देत नाहीत. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्याकडूनही तसेच घडताना दिसत आहे. मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना कधीही वैयक्तिक विषयावर पत्र लिहिलेले नाही. व्यापक हिताच्या सामाजिक प्रश्नांवरच मी पत्र लिहित असतो. तरीही त्याचे उत्तर देणे टाळले जात असेल तर सरकारला जनतेच्या हिताशी काही देणेघेणे आहे की नाही? असा प्रश्न उभा राहतो.

            राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना पाहता वाईन विक्रीचा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर आंदोलन करावेच लागेल या निर्णयावर आम्ही आलो आहोत. लवकरच राज्यातील विविध सामाजिक संघटनांच्या समविचारी कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे घेण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा मला 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल.

            लहान बालक ही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. या बालकांमध्ये उद्याचे महापुरूष आहेत. सुपरमार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन ठेवली तर ही बालकेसुद्धा व्यसनाधीन होतील आणि ते अधोगतीकडे जातील. आमच्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधू संतानी, राष्ट्रीय महापुरूषांनी अतोनात प्रयत्न करून संस्कृती जतन करून वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानामध्ये वाईन आली तर ही आमची संस्कृती धुळीला मिळेल. आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही. ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून 14 फेब्रुवारी 2022 रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात उपोषण करीत आहे.

धन्यवाद.

आपला,

कि. बा. तथा अण्णा हजारे

पुणे शहराचा वीजपुरवठा खंडित

0
  • महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड
  • पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित

पुणे – महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३०च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

याचा फटका प्रामुख्याने शहराच्या पाणी पुरवठ्यास बसला.सकाळी वीज पुरवठा खंडीत झाल्याने महापालिकेची पंपिग स्टेशन तसेच जलशुध्दीकरण केंद्राचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे.

अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.

महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांना अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. ८ : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेकरीता तसेच डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेमधून अनुदानाकरीता पात्र संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आयटीआय व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळांनी १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी या योजनेमधून अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांनी ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासन परिपत्रकानुसार २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव पाठविण्याबाबची कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता निधी मंजूर – मंत्री विजय वडेट्टीवार

0

मुंबई, दि. ८ : जुलै २०२१ मधील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे,   अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, दिनांक २२ व २३ जुलै, २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौद्धवाडी,मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी)  ही गावे बाधित झाली होती तसेच मनुष्यहानी देखील झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन तसेच नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याअंतर्गत महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौद्धवाडीमध्ये भूसंपादन करण्यासाठी २ कोटी ९२ लाख १७ हजार ७६१ रूपये, मौजे केवनाळे मध्ये भूसंपादन करण्यासाठी ६४ लाख २६ हजार १४८ रूपये, पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) साठी ३८ लाख ४१ हजार ७८६ रूपये असे एकूण भूसंपादनासाठी ३ कोटी ९४ लाख ८५ हजार ६९५ रूपये तर महाड तालुक्यातील मौजे तळीये तर  कोंडाळकरवाडी व बौद्धवाडी मध्ये  नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता ९ कोटी ३० लाख १६ हजार ५५२ रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे असे एकूण १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  याबाबतचा शासन निर्णयही आज निर्गमित करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता २५ लाख ७९ हजार १९२ रूपये निधीची तरतूद

२२ व २३ जुलै, २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौद्धवाडी, मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाच्या प्रस्तावासही शासनाने  मान्यता दिली असल्याने जिल्हाधिकारी, रायगड यांनी प्रस्तावित केल्यानुसार कंटेनर चौथरा तयार करणे, नळ पाणी पुरवठा योजना करणे तसेच रस्ते व ड्रेनेज लाईन तयार करणे इत्यादी कामांसाठी आवश्यक एकूण रु. ५५ लाख ५८ हजार ३८४ रूपये इतक्या निधीपैकी ५०% म्हणजे एकूण रु. २५ लाख ७९ हजार १९२/- इतका निधी या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात  आला आहे. याबाबतचाही शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने निर्गमित केलेला आहे.