Home Blog Page 2092

स्टोरीटेलवर, संजय सोनवणी लिखित ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’!

0

चिकित्सक मराठी माणूस’ या लेखमालिकेत प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी विविध ऐतिहासिक घटनांचा चिकित्सक आढावा घेणारे लेख लिहूनकरून आणि विविध मान्यवरांच्या आवाजात दर आठवड्याला ते स्टोरीटेलवर सादर केले आहेत . यापैकी ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’ हे प्रकरण आज प्रकाशित झाले आहे असून संदीप कर्णिक यांनी त्याला आवाज दिला आहे.

संभाजी महाराज आणि शाहजादा अकबर- स्वराज्यावर चारी बाजूंनी संकटे कोसळत असतांना शंभूराजांनी शाहजादा अकबराला आश्रय देऊन औरंगजेबाला डिवचले हा अविचार होता असे मानण्याचा प्रघात आहे. पण त्यामागे कोणती नीती होती? शिवरायांनी ठरवलेल्या दीर्घकालीन धोरणाचीच तर ती परिणती नव्हती ना? या इतिहासावर एक आगळा प्रकाश टाकू पाहणारे हे विलक्षण प्रकरण!

ऐतिहासिक घटनांचा चिकित्सक आढावा घेत ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’ यांच्यावर अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे प्रख्यात लेखक संजय सोनवणी हे मराठी साहित्यविश्वातील आधुनिक काळातले महत्वाचे साहित्यिक, तत्वज्ञ, कवी आणि संशोधक आहेत. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकाराद्वारे हात घालत विपुल साहित्य रचना केली आहे. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं लेखन नैतिक समस्यांबद्दलचे तसेच आधुनिक परिप्रेक्षात वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले चिंतनपर असून त्यांच्या बौद्धिक आणि तात्विक उंचीचा परिचय करून देते. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला नवी परिमाणे मिळवून दिली आहेत. असा दावा करत स्टोरीटेलवर साहित्यप्रेमींसाठी त्यांची असंख्य ऑडीओ बुक्स उपलब्ध अरुण देण्यात आली आहेत.

आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ‘संभाजी महाराज आणि मुघल सम्राट शहजादा अकबर’ यांच्याबद्दलचं कमालीच कुतूहल जाणून घेण्यासाठी आपल्याला हे ऑडीओबुक ऐकवच लागेल. आणि ते ऐकण्यासाठी स्टोरीटेलची फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

विलक्षण कुतूहल निर्माण करणारं ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’ ऑडिओबुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/sambhaji-dilerkhan-praakaran-ek-phaslela-kat-1539974

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन

0

मुंबई, दि. 9 : राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते  शुक्रवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता होणार आहे.

कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच  निवडक निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.

दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या दरबार हॉलचे उद्घाटन निश्चित झाले होते. परंतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उद्घाटन सोहळा त्यावेळी स्थगित करण्यात आला होता.

राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच  बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन  क्षमता २२५ इतकी होती.

जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस पदकदान समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी  तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरला जायचा .

इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ मध्ये झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता.  त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तु रचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.  शंभर वर्षांहून अधिक काळ लाटा  व वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे २०१६ नंतर त्याचा वापर थांबविण्यात आला व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला.

नव्या दरबार हॉलचे बांधकाम २०१९ मध्ये सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे  बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुन:श्च सुरु झाले व डिसेंबर २०२१ मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.

एक हजार कोटी रुपयांच्या हॉस्पिटल उभारणीचा प्रस्ताव संमत – हेमंत रासने

0

पुणे-बाणेर येथे ७०० कोटी रुपयांचे कर्करोग रुग्णालय आणि वारजे येथे ३५० कोटी रुपयांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, महापालिकेच्या अंदाजपत्रकात कॅन्सर रुग्णालय आणि मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. खासगी संस्थांच्या सहकार्यातून ही दोन रुग्णालये डिझाइन-बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्वावर उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार आज स्थायी समितीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.रासने म्हणाले, वारजे येथे सध्याच्या प्रभाग क्रमांक ३० मध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी आर सेव्हन अंतर्गत जागा आरक्षित करण्यात आली आहे. या ठिकाणी १० हजार ५६४ चौरस मीटर इतकी जागा उपलब्ध आहे. डीबीएफओटी तत्वावर हे रुग्णालय संबंधित संस्थेला तीस वर्षांसाठी चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. संबंधित संस्था रुग्णालय उभारणे आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी निधी पुरविणार आहे. या ठिकाणचे काही बेड मोफत, काही बेड सीजीएचएस दराने आणि काही बेड खासगी दराने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यातून महापालिका उत्पन्नही मिळणार आहे. प्रकल्पासाठी निविदाधारकाला कर्ज घेता येणार आहे. या कर्जाची परतफेड करण्याची हमी महापालिका संबंधित वित्त संस्थेला देणार आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.रासने पुढे म्हणाले, मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर कर्करोग या आजारावर उपचार करणारे एकही स्वतंत्र रुग्णालय पुणे शहर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये नाही. कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अशाप्रकारचे रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. सध्या देशात एक लाख लोकसंख्येमागे ९० कर्करोगाचे रुग्ण आहेत. या आजारावरील उपचार खूपच खर्चिक आणि दीर्घकालीन असतात. सर्वसामान्य गरीब नागरिकांना हा खर्च परवडत नाही. महापालिकेतर्फे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभे केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. प्लॅन, डिझाइन, बिल्ट, इक्विप, फायनान्स (पीडीबीआईएफ) या तत्वावर खासगी संस्थेमार्फत या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. संबंधित संस्था कर्ज घेऊ शकते. महापालिका या कर्जफेडीची हमी घेणार आहे. कर्करोग रुग्णालयासाठी बाणेर परिसरात जागा उपलब्ध आहे. या प्रकल्पासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.

पुढील आर्थिक वर्षात करवाढ नाही

मिळकत कर आणि करमणूक करात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले मिळकत कर आणि करमणूक करांचे दर पुढील आर्थिक वर्षात ही कायम ठेवणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, उपलब्ध आर्थिक स्त्रोतांचा विचार करून अत्यावश्यक खर्च, प्रकल्पीय किंवा भांडवली खर्च यांचे आगामी वर्षासाठी नियोजन करावे लागते. त्यानुसार कराचे दर निश्चित करावे लागतात. महापालिका अधिनियमानुसार या दरांना दरवर्षी २० फेब्रुवारी पूर्वी मुख्य सभेची मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार आज करांचे दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रासने पुढे म्हणाले, १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मिळकतीचा पूर्ण कर भरणार्या मिळकतकरांना देण्यात येणार्या पाच किंवा दहा टक्के सवलती, गांडूळ खत प्रकल्प, सौरउर्जा प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग या योजना राबविण्यार्या मिळकतकरधारकांना देण्यात येणार्या सवलती पुढील आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी किंवा माता, राष्ट्रपती पदक विजेते, माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी किंवा वीरपत्नींना राज्य शासनाच्या नियमांनुसार विविध प्रकारच्या करसवलती देण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेतील सध्याच्या मिळकती आणि नव्याने समाविष्ट गावांतील मिळकतीतून पुढील वर्षी दोन हजार ३३२ कोटी रुपयांचा अपेक्षित अंदाज करण्यात आला आहे.

भांबुर्डा वनविहारात पाण्याच्या टाकीसाठी जागा

चतु:शृंगी पाणीपुरवठा अंतर्गत भांबुर्डा वनविहारात बांधण्यात येणार्या टाकीसाठी सुमारे ०.४३२ हेक्टर वन जमीन ताब्यात घेण्याच्या उद्देशाने ११ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम खात्यास देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या ठिकाणी बांधण्यात येणार्या टाकीसाठी वन विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे. या भागातील वृक्षांची लागवड आणि देखभाल वन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यांच्या मागणीनुसार जागा वापर बदलासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. टाकी उभारल्यामुळे गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, बहिरटवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी, चतु:शृंगी मंदिर परिसर, सेनापती बापट रस्ता परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी खराडीत जागा

पुणे महापालिकेच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (जायका) मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पामध्ये खराडी येथे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी आवश्यक असणारी १.२५ हेक्टर वन विभागाची जमीन ताब्यात घेण्याच्या बदल्यात महापालिकेच्या ताब्यातील तुळापूर येथील १.२५ हेक्टर जमीन वन विभागाला देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या प्रकल्पाअंतर्गत ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. खराडी येथील ३.६६ हेक्टर क्षेत्रावर एका केंद्रासाठी विकास आराखड्यात आरक्षण आहे. त्यापैकी १.२५ हेक्टर जागेवर वन विभागाचा ताबा आहे. महापालिका आवश्यक असणार्या जागेच्या बदल्यात तेवढीच जागा वन विभागास देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी २७ कोटी ६८ लाख रुपयांचे वर्गीकरण

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू असलेल्या गृह प्रकल्पांच्या बांधकामासाठी २७ कोटी ६८ लाख रुपयांचे वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या योजनेअंतर्गत खराडी, वडगाव खुर्द येथे प्रत्येकी एक आणि हडपसर येथे तीन असे पाच गृह प्रकल्पांमध्ये २९१८ सदनिकांचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्यापैकी ६ जानेवारी अखेर सुमारे ६२ कोटी ८१ लाख रुपये रक्कम खर्ची पडली आहे. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी या आर्थिक वर्षात आणखी ३२ कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे. या बाबीचा विचार करून नदी सुधारणा प्रकल्पातील २० कोटी रुपये आणि शहर अभियंता कार्यालयाकडे उपलब्ध असणाऱ्या १० कोटी ९३ लाख रुपयांच्या तरतुदीपैकी ७ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पीएमपीएमएल’ला संचलन तुटीपोटी उचल

पुणे महानगर परिवहन महामंडळाला चालू आर्थिक वर्षातील संचलन तुट अपवादात्मक बाब म्हणून उचल स्वरूपात देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, पीएमपीएमएल संस्थेला संचलन तुटीमुळे होणारा खर्च सन २०१३-१४ पासून महापालिकेच्या स्वामीत्व हिश्शानुसार (६० टक्के) दिला जातो. त्यानुसार गेल्या आर्थिक वर्षातील संचलन तूट या वर्षात दरमहा २० कोटी रुपये या प्रमाणे पीएएमपीएमएलला दिली जात आहे. कोरोना काळामुळे पीएमपीएमएलचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महामंडळाचे संचलन विस्कळीत होऊ नये म्हणून पुणे महापालिकेकडून ८८ कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती.

रासने म्हणाले, पीएमपीएमएलला चालू आर्थिक वर्षातील संचलन तूट म्हणून ८८ कोटी रुपये आणि कोविड कालावधी आणि लवाद दाव्यानुसार देय असणारी १०७ कोटी रुपये अशा एकूण १९५ कोटी रुपयांपैकी चालू वर्षात १०० कोटी रुपयांची तूट उचल स्वरूपात अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पुढील आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात यावर्षी जमा करण्यात आलेली संचलन तूट परत जमा करण्यात येणार आहे.

रासने पुढे म्हणाले, पीएमपीएमएलची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन देणे अवघड होणार आहे. कर्मचार्यांना हे वेतन देता यावे यासाठी दरमहा सहा कोटी रुपये पुढील वर्षी देण्यात येणार्या संचलन तुटीमधून अग्रीम स्वरुपात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणेची थकबाकी देण्यासाठी महापालिकेच्या हिश्याची रक्कम २६१ कोटी ७६ लाख रुपये होते. ही थकबाकी पाच हप्तात देण्यासाठी पुढील पाच वर्षांच्या अंदाजपत्रकात दरवर्षी ५२ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा वाढदिवस विशेष मुलांसोबत केला साजरा

0

ठाणे, दि. ९ : आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक केक कापले गेले, इथे येता येता गाडीत बसूनही कापले पण याठिकाणी येऊन या मुलांसोबत कापलेल्या केकची गोडी वेगळीच आहे, अशी कबुली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. निमित्त होत ते त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजऱ्या केलेल्या वाढदिवसाचे.. ठाणे शहरात बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र असलेल्या ‘स्वयम’ या संस्थेत जाऊन विशेष मुलांसोबत त्यांनी हा दिवस साजरा केला. यावेळी या संस्थेतील विशेष मुलांसोबत केक कापून त्यांनी भरवलाच पण त्यासोबतच त्यांना खायला खाऊ आणि भेटवस्तूही दिल्या.

स्वयम ही संस्था गेली 16 वर्षे शहरात विशेष बहुविकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालवते. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वाढदिवस याच शाळेत जाऊन अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

संस्थेतील ही बहूविकलांग मुलांच्या चेहऱ्यावर खास पाहुणा भेटीला आल्याचे कळल्यावर विशेष आंनद झळकत होता. या मुलांसोबत साहेबांनी केक कापून करून त्यानंतर त्याच्याशी संवाद साधला. तसेच या निमित्ताने आपल्यासोबत आणलेल्या खाऊ आणि खास भेटवस्तूंचे वाटपही केले.

आजच्या या विशेष दिनी स्वयम  संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या ‘भरारी आत्मविश्वासाची’.. या विशेष पुस्तिकेचे अनावरण मंत्री शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच या पुस्तिकेसोबतच मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि योगाचार्य अण्णा व्यवहारे यासारख्या मान्यवर तज्ज्ञांनी या मुलांचं पालकत्व कसं निभावून न्यावं याबाबतचे मार्गदर्शन करणाऱ्या पाच सीडींच्या संचाचे प्रकाशन देखील त्यांच्याच हस्ते करण्यात आले. ही पुस्तिका आणि सिडीच्या माध्यमातून जी मुले आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे कोणत्याही संस्थेत अथवा शाळेत दाखल होऊ शकत नाहीत त्यांना कशारीतीने सांभाळावे, त्यांना कसे हाताळावे त्यांच्याशी वागाताना बोलताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी विशेष मुलांची काळजी घेणे, त्यांना सांभाळणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे हे काम सोपे नाही. या कामासाठी अत्यंत चिकाटी आणि समर्पणाची भावना लागते. या मुलांना निसर्गाने काही गोष्टी दिल्या नाहीत मात्र त्यांच्यात काही कलागुण नक्की असतात हे कलागुण शोधून त्याना वाव देणे हे  आशा संस्थांचे काम असते. ते काम स्वयम गेली 16 वर्षांपासून अव्याहतपणे करत आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. या मुलांना हाताळण्याचे प्रशिक्षण देणेही गरजेचे असते. या संस्थेच्या माध्यमातून हे काम होत असल्याचे विशेष समाधान वाटत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. समजात विशेष मुलांची संख्या मोठी असून त्यांना सांभाळणाऱ्या आशा संस्थांची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आशा संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, स्वयम संस्थेचे संचालक नीता आणि राजीव देवळाणकर आणि या शाळेतील मुलांचे पालक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार

0

मुंबई, दि. 9 : बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे. परंतू राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना यामुळे ही निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याने प्रशासक नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील.

मंत्री उदय सामंत यांनी घेतला सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण कार्यक्रम तयारीचा आढावा

0

पुणे,दि. 9: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे  14 फेब्रुवारी रोजी अनावरण होणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच अधिसभा सदस्य आणि पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन तर कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ऐतिहासिक असा कार्यक्रम होणार होणार असल्याने नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे, अशा सूचना श्री.सामंत यांनी दिल्या. बैठकीनंतर श्री. सामंत यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराची पाहणी केली.

शंभरावी टेक्सटाईल एक्सप्रेस रवाना

0

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022 

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने, चलथान (सुरत विभाग) ते संक्रेल (खरगपूर विभाग, एसईआर ) 100 वी टेक्सटाईल रेल्वेगाडी भरून रवाना करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश, यांनी पहिल्या गाडीला उधना येथून हिरवा झेंडा दाखवून‌‌ ती 1 सप्टेंबर रोजी रवाना केली होती.

पाच महिन्यांच्या कालावधीत हा टप्पा गाठल्याने सुरत वस्त्रोद्योग क्षेत्राचा रेल्वेवरील वाढता विश्वास दिसून येतो.  दक्षिण पूर्व रेल्वेमधील शंकरेल, शालीमार आणि पूर्व मध्य रेल्वेमधील दानापूर आणि नारायणपूर ही प्रमुख गंतव्य स्थाने होती.

चलथान येथून 67 आणि उधना येथून 33 एन एम जी रेक्स भरले  गेले. या वस्त्रोद्योग एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांनी 10.2 कोटी रुपयांचा एकूण महसूल  रेल्वेला मिळवून दिला आहे.

पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

0

मुंबई, दि. 9 – पाणी, शेती, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आपत्ती, महिला आणि हवामान बदल आदी विविध क्षेत्रांवर वातावरणीय बदलांचे परिणाम दिसून येत आहेत. यावरील उपाययोजनांबाबत पर्यावरणपूरक विचारांची ‘पेरणी’ करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

डॉ.गोऱ्हे यांच्या पुढाकाराने संपर्क आणि स्त्री आधार केंद्र संस्थांमार्फत आयोजित दोन दिवसीय ‘मंथन’ परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. या परिषदेत हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये यांची सांगड घालून कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाहतूक, कचऱ्याचे विलगीकरण, हरित क्षेत्र वाढविणे, प्रदूषण कमी करणे या शहरी भागातील समस्यांबरोबर पाणी, शेती आदी ग्रामीण भागातील समस्यांवर वातावरणीय बदलांचा परिणाम दिसून येत आहे. जल, जंगल, जमीन या क्षेत्रातील हवामान बदलांबाबत प्रत्यक्ष कृती करणाऱ्या संस्थांनी या मंथन परिषदेत सहभागी होऊन विचारांची पेरणी केली आहे. या चर्चेतून निघालेल्या मुद्यांच्या आधारे शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या परिषदेत उपस्थित सर्वांमार्फत ई-शपथ घेऊन पर्यावरणपूरक सवय अंगिकारली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या सादरीकरणामध्ये पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी विभागामार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज च्या अहवालानंतर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. वातावरणीय बदल ही वास्तविकता असून ती आपल्या दाराशी आली आहे आणि त्यावर आजच कृती करणे गरजेचे आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, कार्बन शोषून घेणे, रिड्यूस, रिफ्यूज, रियुज, रिसायकल आणि रिकव्हर या पाच मुद्यांचा अवलंब करून जीवनशैलीत बदल करणे, हरित क्षेत्र वाढविणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ऊर्जा, परिवहन, उद्योग, कृषी, नगरविकास आदी संबंधित विभागांच्या साहाय्याने २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन ‘कॉप-२६’ परिषदेत राज्याला ‘प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार’ मिळाल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी शेती आणि वातावरणीय बदलाबाबत माहिती देताना तापमान वाढले तर उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. वातावरणीय बदल आणि लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन संशोधन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

या परिषदेत सहभागी झालेल्या विविध क्षेत्रातील संस्थांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींनी शाश्वस्त विकासाच्या १७ उद्दिष्टांवर आधारित जमीन, पोषण आणि शेती, पाणी, ऊर्जा आणि हवेची गुणवत्ता, शिक्षण, आरोग्य, नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती, महिला आणि हवामान बदल या विषयांच्या गटचर्चांच्या माध्यमातून विचारांचे आदान प्रदान केले. आजच्या सत्राचे सूत्रसंचालन स्त्री आधार केंद्राच्या वैशाली वाढे यांनी केले तर संपर्क मेधा कुळकर्णी आणि मृणालिनी जोग, स्त्री आधार केंद्राच्या आश्लेषा खंडागळे यांनी आभार मानले.

राष्ट्रपती 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र आणि तेलंगणा दौऱ्यावर

0

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 10 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्र आणि तेलंगणाचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

11 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई येथील राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

12 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रपती राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देणार आहेत.

13 फेब्रुवारी 2022 रोजी, राष्ट्रपती हैदराबादमध्ये श्री रामानुज सहस्राब्दी समारोहाला उपस्थित राहणार आहेत आणि श्री रामानुजाचार्यजींच्या सुवर्ण पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.

‘दोष धातू मल विज्ञान’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

0

मुंबई, दि. 9 : प्रसिद्ध स्त्रीरोग तसेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ हणमंतराव पालेप यांनी लिहिलेले ‘दोष धातू मल विज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला नागालॅन्डचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य व पॉप्युलर  प्रकाशनचे रामदास भटकळ उपस्थित होते.

भारतीय आरोग्य चिकित्सा पद्धती तसेच तत्वज्ञानात प्रत्येक गोष्टीचा समग्र आणि साकल्याने विचार केला आहे. देशातील ऋषीमुनींनी गहन संशोधनानंतर काढलेले सार आयुर्वेदाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आयुर्वेद सर्व दृष्टीने सुरक्षित चिकित्सा पद्धती आहे. आज ॲलोपॅथीला पर्याय नाही.  मात्र रुग्णाला सेवा देताना ॲलोपॅथीसोबत आयुर्वेदाचा देखील विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.  

आयुर्वेद जीवन पद्धतीमध्ये आहाराला देखील विशेष महत्व आहे, असे सांगून ‘रीत भूक, मित भूक आणि हित भूक’ हा समन्वय पाळल्यास अनेक आजारांपासून रक्षण करता येते असे राज्यपालांनी सांगितले.

आयुर्वेद हे एक परिपूर्ण विज्ञान आहे. परंतु आयुर्वेद समजण्याकरिता संस्कृत भाषा व भारतीय तत्वज्ञान समजणे गरजेचे आहे. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमज आहेत. ‘दोष धातू मल विज्ञान’ या पुस्तकाच्या माध्यमातून आयुर्वेद व आधुनिक चिकित्सा पद्धतीमधील दरी कमी करण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे लेखक डॉ पालेप यांनी सांगितले. 

चित्ररथातून झळकते महाराष्ट्राची अस्मिता

0

यावर्षी प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील पथसंचलनात ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राचा चित्ररथ होता. राज्याच्यावतीने  दरवर्षी असे चित्ररथ उभारले जातात ज्यामधून महाराष्ट्राची अस्मिता ठळकपणे दिसावी. सन 1971 ते 2022 या 51 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 38 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे आणि 12 वेळा ऊत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारही पटकाविला आहे.

यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीद्वारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाईन मत  नोंदणी सुरू झाली होती. यामध्ये  महाराष्ट्राच्या चित्ररथाला “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला असून महाराष्ट्राने चित्ररथाच्या सादरीकरणाच्या इतिहासातही सुवर्ण अक्षराने आपली अमिट छाप सोडली आहे.

असा होता महाराष्ट्राचा‘जैव विविधता व राज्य मानके’चित्ररथ

चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंच आणि 6 फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोट्या आकर्षक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या. चित्ररथावर मोठ्या आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारी विविध जैव विविधता दर्शविण्यात आली. ‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती, चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरले. माळढोक पक्षी, खेकडा तसेच मासा, वाघ, आंबोली  झरा, फ्लेमिंगो,  गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांचे मन जिंकली होती.

‘मावज’ची ऑनलाईन मोहीम

राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखील या चित्ररथाला ऑनलाईन मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी सर्व समाजमाध्यमांद्वारे विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक 23 टक्के मते मिळाली होती.

आतार्पंयत महाराष्ट्राच्या 12 चित्ररथांना पुरस्कार

महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक-सामाजिक, पर्यटन, संत-वारी  परंपरा आदि विषयांवर चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली आहे. यात राज्याने 12 वेळा पुरस्कार पटकावले. वर्ष 1993 ते 1995 पर्यंत सलग तीन वेळा प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम निर्माण केला. आतापर्यंत महाराष्ट्राला 7 वेळा प्रथम पुरस्कार, तीन वेळा द्वितीय पुरस्कार तर दोन वेळा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

वर्ष 1981 आणि 2018 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका’वर आधारित चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. याआधी महाराष्ट्रात ‘पोळा’ या सणाला विशेष महत्त्व आहे. ‘बैलपोळा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच विषयावर आधारित वर्ष  1983 च्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार देण्यात आला. वर्ष 1993 मध्ये ‘लोकमान्य  टिळाकांनी सुरू केलेल्या ‘गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ या चित्ररथाला तर वर्ष 1974 ला फळांचा राजा ‘हापूस आंबा’ या चित्ररथाला आणि वर्ष 1995 मध्ये ‘बापू स्मृती’ या चित्ररथाला असे सलग तीनदा प्रथम पुरस्कार मिळाला. ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाला वर्ष 2015 मध्ये प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराष्ट्राचा स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग यावर आधारित वर्ष 1986 च्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले होते. वर्ष 1988 मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले वर्ष 2009 मध्ये राज्यातील ‘धनगर’ समाजाची संस्कृती दर्शविणाऱ्‍या चित्ररथाने दुसरे पारितोषिक मिळाविले. तर वर्ष 2007 मध्ये ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तिसरे पारितोषिक मिळाले. वर्ष 2017 मध्ये लोकमान्य टिळाकांच्या योगदानावर आधारित ‘बाळगंगाधर टिळक’ या चित्ररथाला तीसरा क्रमांक मिळाला होता.

राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन चित्ररथातून दिसते

महाराष्ट्राने सर्वात प्रथम सन 1971 मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता.  त्यानंतर दोन वर्षांनी 1973 साली ‘ भारत छोडो आंदोलन ’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते.

राज्य निर्मितीपासून अवघ्या 14 वर्षात राज्यांमध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापित झाले 1974 च्या चित्ररथामध्ये याच उद्योगधंद्यांचे प्रतिबिंब राजपथावर दिसले. पुढे 1978 मध्ये ‘विविधतेत समानता’ असा चित्ररथ राजपथावर झळकला. तर वर्ष 1979 मध्ये ‘बाल विकास ’ या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून बालविकासाचे धोरण दर्शविले.

महाराष्ट्रामधील भौगोलिक भागानुरूप विविध सण साजरे केले जातात, असाच विषय धरून 1980 मध्ये ‘ महाराष्ट्रातील सण’ या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला.  सन 1982 मध्ये राज्यातील समृद्ध  ‘लोककला’ विषयावरील चित्ररथाने राजपथावरील प्रेक्षकांची मने जिंकली.

लोकमान्य टिळकांवर आधारित विविध विषयांवर 4 वेळा चित्ररथ

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांवर आधारित चित्ररथ राजपथावर वेगवेगळ्या विषयाला धरून उभारण्यात आले. प्रथम सन 1984 आणि नंतर सन 2017 मध्ये लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना  ‘स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ’ या घोषणेवर आधारित  चित्ररथ उभारण्यात आला. या चित्ररथाला दोन्ही वेळा द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष 1988 मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ तर वर्ष 1993 मध्ये ‘लोकमान्य  टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ विषयावर चित्ररथ  होता.

वर्ष 1986 मध्ये स्वातंत्र्याची  चाळीशी निमित्ताने ‘स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ असा चित्ररथ राजपथावर सादर करण्यात आला. सन 1990 मध्ये  पुन्हा एकदा ‘लोककला’ या विषयावर चित्ररथ राजपथावर दर्शविण्यात आला. वर्ष  1991  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शताब्दी वर्ष निमित्ताने चित्ररथ उभारण्यात आला. ‘वारली तारपा नृत्य’ असा चित्ररथ सण 1992 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात दिसला.

हापूस’आंबा

आंब्यांचा राजा ‘हापूस आंबा’ या संकल्पनेवर सण 1994 मध्ये चित्ररथ  साकारण्यात आला. महात्मा गांधीजीच्या 125 व्या जयंती वर्षामध्ये राज्याने वर्ष 1996 ला ‘बापू स्मृती’ असा चित्ररथ दर्शविण्यात आला. वर्ष 1997 ला चित्रपट सृष्टीने शंभरी पूर्ण केली होती. याची आठवण म्हणून ‘चित्रपट सृष्टीचे शंभर वर्ष’ या संकल्पनेवर चित्ररथ साकारण्यात आला.

वर्ष  1996 मध्ये  ‘महिला बालविकास ’ अशा महत्त्वपूर्ण विषयावर चित्ररथ तयार करण्यात आला. वर्ष 1999 ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी ’ दर्शविणारा चित्ररथ राजपथावर झळकला. राज्याची ओळख ठळकपणे दर्शविणारे ‘साखर कारखाने’ यावर आधारित 2001 मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. गोकुळ अष्टमीला दही हंडी फोडणारे गोविंदा यांच्यावर ‘गोविंदा आला’ अशी संकल्पना घेऊन 2002 ला चित्ररथ तर 2003 मध्ये  ‘आदिवासी वारली  चित्रकला’ असा आदिवासी जीवनावर आधारित चित्ररथ साकारण्यात आला.

‘मुंबईचा डबेवाला’

महाराष्ट्राचा स्थापत्य ठेवा असलेल्या अंजता लेणी यावर आधारित 2004 मध्ये ‘अजिंठा लेणीं’मधील काही भीत्तीचित्रे  चित्ररथात दर्शविण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या  ‘ग्रामस्वच्छता अभियान’ योजनेवर आधारित चित्ररथ 2006 मध्ये साकारण्यात आला.  राज्यामध्ये भरणारी महत्त्वाची धार्मिक जत्रा ‘जेजुरीचा खंडेराया ’ या संकल्पनेचा चित्ररथ वर्ष 2007 मध्ये चित्ररथ दर्शविण्यात आला. पुढे 2009 ला  ‘धनगर’ असा विषय घेऊन चित्ररथ उभारण्यात आला. वर्ष 2010 ला जगाचे लक्ष वेधणारा ‘मुंबईचा डबेवाला’ या संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्यात आला.

‘पंढरीची वारी’

महाराष्ट्राचे नृत्य ‘लावणी ’ यावर आधारित चित्ररथ 2011 मध्ये दर्शविण्यात आला, या चित्ररथाला  प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. वर्ष 2012 मध्ये वेरूळ लेणीमधील ‘कैलास मंदिर’ या विषयावरील चित्ररथ उभारण्यात आला होता. सण 2014 मध्ये कोकणातील मच्छिमारी समुहाचा सण ‘ नारळी पौर्णिमा’ या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला. वर्ष 2015 मध्ये राज्याची शतकांची परंपरा ‘पंढरीची वारी’ या विषयावर आधारित चित्ररथाने राजपथावर भक्तीमय वातावरण निर्माण केले. सण 2019 महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त  ‘भारत छोडो ’ आंदोलनवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला. वर्ष 2021 मध्ये ‘वारकरी संत परंपरेवर’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ होता.

महाराष्ट्राचा भूभाग प्राचिन तसेच आधुनिक इतिहासाचा महत्त्वाचा प्रदेश आहे.  राज्याच्या निर्मितीपूर्वीही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या भूभागातून येणाऱ्‍या विचारवंत नेतृत्वाने देशाला दिशा दिलेली होती. राज्य निर्मितीनंतरही आ‍धुनिक महाराष्ट्र, शिक्ष‍ित महाराष्ट्र, स्त्री-पुरूष समानता पाळणारा महाराष्ट्र, राज्यातील लोकांचे जीवनमान उंचावेल अशी धोरणे राबविणे असा राज्याचा मानस सदैव असतो आणि त्याचे प्रतिबिंब चित्ररथात दिसून येते.

– अंजु निमसरकर

माहिती अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

नगराध्यक्ष निवडणुकीत लातूर जिल्ह्यात भाजपाची विजयी सलामी-प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन

0

लातूर -भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात चाकूर नगरपंचायतीत पक्षाचे बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले. तसेच शिरूर अनंतपाळ येथे भाजपाचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले, त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पक्षांना मिळून आठ जागा मिळाल्या आहेत तर भाजपाला तीन जागा मिळाल्या आहेत. तथापि, भाजपाने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे जुळवून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविण्यापासून रोखले. या नगरपंचायतीत बुधवारी नगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक कपिल माकने निवडून आले तर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक अरविंद बिराजदार यांची निवड झाली. नगरपंचायत निवडणुकीत जेथे भाजपाला बहुमत मिळाले नाही तेथेही पक्ष राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडीवर मात करेल, असा इशारा आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दिला होता. त्यानुसार पक्ष कार्यकर्त्यांनी चाकूरमध्ये यश मिळविले.

लातूर जिल्ह्यातच शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत भाजपाने ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. तेथे मंगळवारी नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका मायाताई धुमाळे यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी भाजपाच्याच नगरसेविका सुषमा मठपती यांची निवड झाली.
आ.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी चाकूर व शिरूर अनंतपाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे तसेच या यशाबद्दल माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह सर्व नेते कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. राज्यात नुकत्याच झालेल्या १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकून पहिला क्रमांक मिळविला आहे तसेच स्पष्ट बहुमत मिळालेल्या नगरपंचायतींच्या बाबतीतही भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे.

बालकांचे नियमित लसीकरण करुन त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण करु या!

0

बालकांचे विविध आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून सन 1978 मध्ये विस्तारीत लसीकरण कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आला. पुढे या कार्यक्रमाचा विस्तार शहरी भागाच्या पलीकडे झाला तेंव्हा 1985 मध्ये त्याचे नाव बदलून सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रम असे संबोधण्यात आले. सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रम हा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपैकी एक आहे जो वार्षिक 2.67 करोड नवजात बालकांचे आणि 2.9 कोटी गर्भवती महिलांचे सेवा देण्याचे लक्ष आहे. या आरोग्याच्या निर्देशांकामुळे 5 वर्षा खालील लहान बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास अधिक परिणामकारक ठरले आहे.

सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रमांतर्गत 12 प्रतिबंधात्मक लसी देण्यात येतात. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलीओ, गोवर, रुबेला, क्षय रोग, काविळ, मेंदूज्वर, अतिसार, श्वसनदाह, जे.ई.

राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे वरील प्रमाणे सर्व लसी एक वर्षात घेणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाची यशस्वीता म्हणजे दोन महत्वाचे टप्पे आहेत ज्यामुळे 2014 मध्ये पोलीओ आणि 2015 मध्ये माता आणि नवजात बालकांच्या धनुर्वाताच्या आजाराचे निर्मुलन करण्यात आले.

मिशन इंद्रधनुष्य

मिशन इंद्रधनुष्य हे भारत सरकारचे आरोग्य अभियान आहे. हे 25 डिसेंबर 2014 मध्ये सुरु करण्यात आले. हेतू असा की, या अंतर्गत बालकांचे संपूर्ण लसीकरण 90 टक्के पर्यंत वाढविता येईल आणि ते सन 2022 पर्यंत कायम करता येईल. मिशन इंद्रधनुष्यच्या पहिल्या टप्प्यात 201 जिल्हे घेण्यात आले. यापैकी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आणि मध्य प्रदेश यातील 82 जिल्हे अंतर्भुत आहेत. आणि जवळपास 50 टक्के लसीकरण न झालेले 201 जिल्हयांची निवड करण्यात आली.

मिशन इंद्रधनुष्य ही भारतातील केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक योजना म्हणून ओळखली जाते.

गतिमान मिशन इंद्रधनुष्य

या कार्यक्रमात जिथे लसीकरणाचे काम कमी आहे आणि ज्या भागात कर्मचाऱ्यांना पोहोचणे ‍कठीण आहे, ज्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा ज्यांचे अंशत: लसीकरण झालेले आहे. अशा ठिकाणी लसीकरण कार्यक्रम अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने 8 आक्टोबर 2017 रोजी गतिमान मिशन इंद्रधनुष्य सुरु केले. याव्दारे 2 वर्षापर्यंतच्या प्रत्येक बालकांपर्यत आणि सर्व गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे ज्या नियमित लसीरकरण कार्यक्रमांतर्गत परावृत्त राहिल्या आहेत.

यामध्ये 2020 एैवजी डिसेंबर 2018 पर्यंत 90 टक्के पेक्षा पूर्ण लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी निवडक जिल्हे आणि शहरांमध्ये लसीकरण कव्हरेज सुधारण्यासाठी विषेश मोहिम राबविण्यावर भर देण्यात आला. 2030 पर्यंत टाळता येणारे बालमृत्यू टाळण्याचे हे निरंतर विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्याचे हे धोरण आहे. हे 27 राज्यांमधील 272 जिल्हयांमध्ये आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ब्लॉक स्तरावर लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे, कारण जेथे पोहोचणे कठीण आहे आणि आदिवासी लोकसंख्या आहे.

देशातील 554 जिल्हयांमध्ये सहा टप्पयांमध्ये हे मिशन पुर्ण करण्यात येत आहे. ग्राम स्वराज अभियान आणि विस्तारीत ग्राम स्वराज अभियान अंतर्गत महत्वाकांक्षी जिल्हयांमध्ये प्रमुख योजनांपैकी एक म्हणूनही ती ओळखली गेली.

राष्ट्रीय कुटुंब पाहणी सर्व्हेक्षण-4 च्या तुलनेत मिशन इंद्रधनुष्यच्या प्रथम दोन टप्पयांमध्ये 6.7 टक्के पूर्ण लसीकरणाचे प्रमाण वाढलेले होते. तर अलिकडे 190 जिल्हयात केलेल्या सर्व्हेक्षणात पाचव्या टप्प्यात 18.5 टक्के पुर्ण लसीकरण कव्हरेजमध्ये वाढ झालेली दिसून आली .

राष्ट्रीय कुटुंब पाहणी सर्व्हेक्षण-4 (सन 2015-16) प्रमाणे पाहू जाता महाराष्ट्रातील बालकांचे एक वर्ष वयोगटात केलेले पूर्ण लसीकरण कव्हरेज 60.7 टक्के होते तर राष्ट्रीय कुटुंब पाहणी सर्व्हेक्षण-5 (सन 2019-21) प्रमाणे 83.8 टक्के आहे. गतिमान मिशन इंद्रधनुष्यच्या उद्दीष्टांप्रमाणे सन 2018 पर्यंत 90 टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. सध्या आपण 2022 या वर्षात पदार्पन केलेले आहे. मात्र 90 टक्के हे उद्दीष्ट साध्य केलेले नाही.

आधी पाहिल्याप्रमाणे 1978 पासून बालकांच्या आजाराचे संरक्षण व्हावे म्हणून लसीकरण कार्यक्रम भारतात सर्वत्र राबविण्यात येत आहे.

बालकांना होणारे 12 आजार आणि त्याचे लक्षणे

क्षय रोग- हा मायकोबॅक्टेरिया टयुबरकुलोसीस मुळे होणारा आजार आहे. हा फुप्फुसात होणारा आणि हाडे, सांधे, सांधे, आणि मेंदू या अवयवांमध्ये होत असतो. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला खोकताना, शिंकताना तुषार बिंदूव्दारे याचा संसर्ग होत असतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी बी.सी.जी. ही लस बाळाला एक वर्षाच्या आत दिली जाते.

कावीळ- ब- हा आजार विषाणूमुळे होतो. यात बालकांच्या यकृतावर परिणाम होतो. याचा संसर्ग बाळाच्या जन्माच्या वेळेस किंवा एक वर्षापर्यंत होतो. या आजारामुळे कावीळ, यकृताचा कॅन्सर आणि यकृताचा सिरासीस हे आजार होतात. दुषित रक्त किंवा शारीरिक स्त्राव यामुळे हा आजार होतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी हिपॅटायटीस-ब ही लस बालकांना जन्मत: आणि एक वर्षाच्या आत 3 मात्रांमध्ये दिली जाते.

बालपक्षाघात (Poliomyelitis)- हा तीव्र सांसर्गिक आजार आहे. हा पोलीओ विषाणूंच्या संसर्गामुळे होतो. हा आजार मुख्यत: 5 वर्षाखालील बालकांमध्ये आढळून येतो. या आजाराचे विषाणू मज्जारज्जू तंत्रिकाच्या स्नायु व नियंत्रण करणाऱ्या तंत्रिकेला इजा करतात. या आजाराचे प्रतिबंध पोलीओ प्रतिबंधक लस (OPV,IPV) देऊन केला जातो.

घटसर्प- हा आजार कॉरिनेबॅक्टरियम डिप्थीरिया या जिवाणूच्या संसर्गामुळे होतो. या संसर्गात मुख्यत: घसा आणि टॉन्सीलवर परिणाम होतो. यामुळे घशात एक पडदा तयार होऊन श्वसनास अडथळा निर्माण होतो. वेळीच आरोग्य संवा न मिळाल्यास मृत्यू सुध्दा होऊ शकतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी पेंन्टावेलेन्ट लसीमध्ये घटसर्प (DPT/TD) 3 मात्रा आणि बुस्टर डोस दिला जातो.

डांग्या खेाकला- बोरडेटेला परटयुसीस या जिवाणूच्या संक्रमणाने हा आजार होत असून हा श्वसन संस्थेचा आजार आहे. हे जंतू नाक व घसा यामध्ये संक्रमीत होतात. हा तीव्र स्वरुपाचा सांसर्गिक आजार आहे. वारंवार येणाऱ्या खोकल्यामुळे बालकांना श्वसनदाह होतो. यामुळे इतर गुंतागुंत होऊन बालकांना मृत्यू सुध्दा येऊ शकतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी पेंन्टावेलेन्ट लसीमध्ये घटसर्प (DPT/TD) 3 मात्रा आणि बुस्टर डोस दिला जातो.

धनुर्वात- हा आजार क्लॉस्ट्रिडियम टेटानी या जिवाणू पासून होतो. हा जिवाणू माती मध्ये आढळतो. जखम किंवा कापलेल्या ठिकाणी माती लागल्यास या जिवाणूचा संसर्ग होतो. हे जिवाणू विष बाहेर सोडतात, त्यामुळे स्नायुंना तीव्र आकडी येते आणि ते दुखतात तसेच मृत्यू देखील येऊ शकतो. नवजात बालकातील धनुर्वात आणि प्रसूती दरम्यान होणारा धनुर्वात ही जेंव्हा कोणत्याही स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करता प्रसूती केली जाते त्या क्षेत्रासाठी गंभीर समस्या आहे. बाळाच्या जन्मानंतर 3 ते 28 दिवसांच्या दरम्यान बाळ स्वाभाविक स्तनपान करित नाही , शरीर ताठ होते, झटके येतात, स्नायू आकुंचित होतात. हा संसर्गजन्य आजार नाही. हा आजार टाळण्यास गर्भवती महिलांना टी.टी/टी.डी. तसेच बालकांना डी.पी.टी. व पेंटाव्हायलेंट लस वेळापत्रकाप्रमाणे सर्व वयोगटात देऊन प्रतिबंध घालता येतो.

हेमोफिलस इन्पऱ्ल्युएन्झा टाइप बी आजार- हे जिवाणू साधारणत: बालकांच्या नाकात आणि घशात आढळतात. याचे सहा प्रकार असून हेमोफिलस इन्पऱ्ल्यूएन्झा टाइप बी किंवा Hib मुळे 90 टक्के गंभीर संसर्ग होतो. पाच वर्षाखालील मुलांमध्ये गंभीर श्वसनदाह आणि मेंदुदाह होतो. यामध्ये ताप येणे, थंडी वाटणे,खोकला येणे, श्वासोश्वास जलद होणे, छाती आत ओढली जाणे, मेंदुदाह असलेल्या मुलांत ताप, डोके दुखणे, प्रकाशाची तीव्रता, मान ताठ होणे, कधी कधी गोंधळलेल्या अवस्थेत असणे, किंवा बदललेली चेतना अशी लक्षणे दिसून येतात.

रोटा विषाणूमुळे होणारा अतिसार- हा तीव्र सांसर्गिक आजार आहे. यामुळे बालकांच्या लहान आतडयांना संसर्ग होतो. त्यामुळे बालकांना गंभीर अतिसार होतो. 3 ते 12 महिने वय असलेल्या बालकांमध्ये गंभीर शुष्कतेमुळे मृत्यू होतो. सौम्य आणि पातळ पाण्यासारखी शौच आणि उलटी होणे ही लक्षणे दिसून येतात. यामुळे जलशुष्कता होते. दु‍षित अन्न, पाणी आणि वस्तू यामुळे रोटा विषाणूचा प्रसार होतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी रोटा व्हायरस ही लस मुखावाटे दिली जाते.

न्युमोकोकल आजार- हा आजारांचा एक समुह आहे. हा आजार बॅक्टेरियम स्ट्रॅप्टोकोकस निमोनिया या जिवाणू मुळे होतो. या आजारात मोठया प्रमाणात श्वसनदाह (निमोनिया), मेंदुदाह, रक्तप्रवाहात होणारा संसर्ग, 5 वर्षाखालील बालकांमध्ये स्ट्रॅप्टोकोकस निमोनयिामुळे होणाऱ्या श्वसनदाहाचे मुख्य कारण आहे. न्युमोकोकल या आजाराची लहान बालके आणि वयस्क्‍ व्यक्तींमध्ये जोखिम अधिक असते. 5 वर्षाखालील बालकांमध्ये ज्यांचे वय 2 वर्षापेक्षा कमी आहे,ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, गरीबी, दुर्लक्षित लोकसंख्या यामध्ये प्रसाराचे प्रमाणे अधिक दिसून येते. या आजाराला प्रतिबंध करण्यास Pneumococal Conjugate Vaccine (PCV) या लसीच्या तीन मात्रा 6,14 आठवडे आणि 9 व्या महिण्यात देऊन प्रतिबंध केला जातो.

गोवर/रुबेला- हा गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. तीव्र संसर्गिक आहे. कुपोषित आणि दाटीवाटीने राहणाऱ्या मुलांमध्ये मोठया प्रमाणावर होतो. या आजारात गंभीर अतिसारामुळे होणारी जलशुष्कता, कुपोषण आणि मध्य कर्णाला सुज येणे, श्वसनदाह होणे, आंधळेपणा आणि मेंदुचा संसर्ग होऊ शकतो.

रुबेला हा मुलांमध्ये सौम्य आजार आहे. गरोदरपणाच्या सुरुवातीला जर याचा संसर्ग झाल्यास आपोआप गर्भपात हेातो. उपजत मृत्यू होतो आणि बाळाला जन्मजात व्यंग असू शकतो. या आजारात अंगावर बारीक बारीक पुरळ दिसतात, खोकला, नाक वाहने आणि डोळे लाल दिसणे. गोवर/रुबेला ही लस एक वर्षाआतील बालकांना देऊन या आजाराचा प्रतिबंध करता येतो.

जपानिस मेंदूज्वर- हा विषाणूमुळे होणारा आजार असून याचा मेंदूला संसर्ग होतो. राज्यातील काही विशिष्ट भागात या आजाराचा प्रसार आढळतो. हा आजारा 10 वर्षाखालील बालकांमध्ये मोठया प्रमाणावर आढळून येतो त्यामुळे हा आजार गंभीर स्वरुपाचा असून मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. अचानक येणारा तीव्र ताप, मानसिक स्थितीत बदल होणे , बेशुध्दावस्था आणि झटके येणे ही लक्षणे दिसून येतात. या विषाणूचा प्रसार डासामार्फत होतो. पक्षी , पाळीव प्राणी खास करुन डुकरांमध्ये हे विषाणू राहतात. सांसर्गिक प्राण्याला डास चावल्यास, तोच डास मनुष्याला चावल्यास हा आजार होतो. अति जोखमीच्या जिल्हयात 1 ते 15 वयोगटातील मुलांना जे.ई. ही लस दिली जाते. 9 महिणे ते 2 वर्षे या कालावधीत दोन मात्रा देऊन या आजाराचा प्रतिबंध केला जातो.

या सर्व आजारांचे गांभीर्य लक्षात घेता आजची बालक ही उद्याच्या भारताची आधारस्तंभ आहेत. अगदी लहानपणापासूनच ते मानसिक आणि शारीरिक दृष्टया सबल असणे आवश्यक आहे. याकरिता शासकीय स्तरावरुन विविध प्रयत्न केले जात आहेत. समाजाच्या सहभागाशिवाय शासनाचे कोणतेही कार्यक्रम योग्यरित्या राबविता येणार नाहीत म्हणून समाजाने योग्य सहकार्य करण्याची अपेक्षा आहे.

डॉ. श्रीराम गोगुलवार

प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर

समीर कुमार बिस्वास महाराष्ट्र सदनाचे नवे निवासी आयुक्त

0

नवी दिल्ली, दि. 9:महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून समीर कुमार बिस्वास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. निरुपमा डांगे यांच्याकडून त्यांनी  निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.

समीर कुमार बिस्वास हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९० च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून केंद्रीय रसायने व खते मंत्रालयात ते अपर सचिव पदावर कार्यरत होते. श्री. बिस्वास गेल्या सात वर्षांपासून प्रतिनियुक्ती तत्त्वावर केंद्र  शासनाच्या सेवेत कार्यरत होते. मागील ३१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे.

श्री.बिस्वास यांनी वर्ष २००० ते २०१२ पर्यंत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे तसेच राज्य आर्थिक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक, जनगणनना प्रकल्पाचे संचालक आदी पदांवर कार्य केले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळात कार्यरत असतांना त्यांनी  ‘मुंबई ट्रान्‍स हार्बर लिंक’ सह अनेक महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत उल्लेखनीय जबाबदारी  पार पाडली आहे.

वर्ष २०१२ ते २०१४ या कालावधीत त्यांनी मुंबई येथील  धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

दरम्यान, श्री.बिस्वास यांनी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी श्री.बिस्वास यांची सदिच्छा भेट घेतली.

मेसर्स अल मारवाह ट्रेडर्सच्या मालकाला अटक

0

मुंबई, 9 फेब्रुवारी 2022 -नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाने 10.26 कोटी रुपयांचे बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सचे जाळे उद्ध्वस्त केले. या प्रकरणी मेसर्स अल मारवाह ट्रेडर्सच्या मालकाला मंगळवारी 8 फेब्रुवारी 2022 रोजी अटक करण्यात आली. या कंपनीने 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या बनावट पावत्या तयार केल्या होत्या आणि त्या आधारे बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट्सचा लाभ घेत होती, त्याचा वापर करत होती आणि इतरांना देत होती आणि या गैरव्यवहारांच्या माध्यमातून सरकारची आर्थिक फसवणूक करत होती.

नवी मुंबई येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाच्या गैरव्यवहार प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीची चौकशी केली. ही कंपनी लोखंड, ऍल्युमिनिअम, तांबे आणि इतर धातूंच्या भंगाराच्या व्यापारात कार्यरत आहे, असे या कंपनीच्या मालकाने जबाबात म्हटले आहे. तपासांतर्गत या करदात्याने वेगवेगळ्या अस्तित्वात नसलेल्या/खोट्या कंपन्यांकडून बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट्स मिळवून त्या मंजूर करून घेतल्याचे आढळून आले. आरोपीला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा-2017 च्या कलम 69 (1) अंतर्गत अटक करण्यात आली आणि त्याच्यावर सदर कायद्याच्या कलम 132 (1) (b) & (c) अन्वये गुन्हा दाखल करुन वाशी, बेलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे 09.02.2022 रोजी हजर करण्यात आल्यावर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर व केंद्रीय अबकारी कर कार्यालय, नवी मुंबईचे आयुक्त प्रभात कुमार यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालय, मुंबई यांनी फसवणूक करणाऱ्या आणि करचोरांविरूध्द चालवलेल्या गैरव्यवहार प्रतिबंधक मोहिमेचा हा एक भाग होता.  अशा व्यक्ती सरकारी तिजोरीचे नुकसान करत प्रामाणिक करदात्यांसाठी अप्रामाणिक स्पर्धा निर्माण करतात. या मोहिमेचा भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने नुकतीच 450 कोटीं रुपयांची करचोरी उघडकीला आणली, 20 कोटी रुपयांची वसुली केली आणि 12 जणांना अटक केली आहे.

करचुकव्यांचा छडा लावण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग माहिती विश्लेषणाचा उपयोग करतो. ही माहिती विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण याआधारे मुंबई विभागाच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकाऱ्यांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये 625 करचोरी प्रकरणांचा शोध लावला आणि 5500 कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे आणि 630 कोटी रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणात सुमारे 50 जणांना अटक केली आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग फसवेगिरी आणि करचोरांविरुद्धची मोहीम तीव्र करणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रामाणिक करदात्यांना अयोग्य स्पर्धेला सामोरे जावे लागणार नाही तसेच सरकारला आपल्या हक्काच्या महसुलापासून वंचित रहावे लागणार नाही.