नागपूर,दि. 8 : राज्य शासनाने दोन वर्षात केलेली विविध विकासकामे आणि योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी पाच विशेष गाड्यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर–गोंदिया ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ वरही आकर्षक पद्धतीने योजनांची माहिती देण्यात आली आहे. या गाडीचे आज दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन झाले.
‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’, ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या घोषवाक्यांसह योजनांची माहिती देण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात आला असून, त्यामध्ये गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि डाटा सेंटर सुरु केल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उजळणार आहे. पर्यावरणपूरक प्रवासाला राज्य शासन प्राधान्य देत असून, विद्युत बस सेवेत वाढ होणार आहे. परिणामी राज्यातील प्रदूषणाला आळा बसणार आहे. राज्य शासनाने मुंबईतील ‘आरे’ जंगलामध्ये वृक्षांसाठी 808 एकर क्षेत्र आरक्षित झाले असून वनसंपदेचे रक्षण झाल्याची माहिती राज्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे.
समृद्ध शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्य शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे असून, गतवर्षी चक्रीवादळबाधित फळबागांसाठी पुनर्लागवड व पुनरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखाची मुदत ठेव योजना सुरु करण्यात आली असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा आता दारी येणार, ई-पीक पाहणी या योजनांनाही येथे प्राधान्य देण्यात आले आहे.
सोबतच युवकांमध्ये कौशल्य निर्मिती व्हावी, त्यांच्या हाताला काम मिळावे, त्यासाठी जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य, वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण आदींची माहिती देण्यासोबतच ‘माझी वसुंधरा’ आणि संयुक्त राष्ट्र हवामानबदल परिषदेत पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्यामुळे आश्वासक नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच कोकणातील समुद्रकिनारे, येथील पर्यटन वाढीस राज्य शासन चालना देत असून, येथे देश – विदेशातून पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमानसेवेचा प्रारंभ झाल्याचाही उल्लेख आहे.
राज्यात शेती, क्रीडा, सामाजिक इत्यादी क्षेत्रात राज्य शासनाचे विविध उपक्रम सुरू केले आहेत. दोन वर्षांत राज्य सरकारने अनेक विविध विकासकामे केली आहेत. राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी दि. 1. फेब्रुवारी ते दि. 2 मार्चदरम्यान एक महिना हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. अजनी, नागपूर मुख्य रेल्वेस्थानकावर आणि पुढे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ही विशेष रेल्वेगाडी संदेश पोहचविणार आहे. कोल्हापूर ते नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेवर दिलेल्या विविध योजना, विकासकामांच्या आदीं संदेशाचे कौतुक केले.
पुणे-महानगरपालिका भारतीय जनता पार्टीकडून ताब्यात घेण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पाहत असली तरी त्या पक्षाच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल आणि भाजपा पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवेल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्याजवळ मांजरी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा वापर करून महानगरपालिकेत नव्याने काही गावांचा समावेश केला. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ झालेले मतदार गावांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे भाजपालाच मते मिळतील. तसेच पुण्यात प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणात मोडतोड केली असली तरी भाजपाचा मतदार सर्वत्र कायमच आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक भाजपा पूर्ण बहुमताने जिंकेल आणि पुणे महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल.
ते म्हणाले की, भाजपाने पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात पुणे महानगरपालिका क्षेत्रात भरघोस कामगिरी केली आहे. मेट्रो, रुग्णालय, रस्ते, बस वाहतूक अशा विविध क्षेत्रात भाजपाने प्रभावी काम केले आहे. आगामी काळात पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालयही होईल. भाजपा आपल्या कामांची यादी घेऊन मतदारांसमोर जाईल आणि त्यापूर्वी पन्नास वर्षांच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराशी तुलना करण्याचे आवाहन करेल.
पुणे-महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आणि ‘ध्यास पंथे चालता…’ या संस्थेच्या इतिहास ग्रंथाचा प्रकाशन समारंभ उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते (मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी) राजधानी दिल्ली येथे उपराष्ट्रपती निवासात संपन्न झाला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे तसेच ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपती निवासात उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे पुण्यातून सहभागी झाले होते. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित संख्येने निमंत्रित पुण्यातील मएसो ऑडिटोरीअममध्ये उपस्थित होते. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या इतिहास लेखनामागील प्रेरणा, भूमिका आणि लेखनासाठी केलेले संशोधन कार्य याबद्दल माहिती दिली. संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पुणे, दि. 8: राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन क्रीडाप्रबोधिनींच्या अंतर्गत खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडासुविधा देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडाप्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे,
क्रीडाप्रबोधिनीमध्ये आर्चरी, ज्युदो, हॅन्डबॉल, ॲथलेटीक्स, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनीस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स हे खेळप्रकार समाविष्ट आहेत. सरळ प्रवेश प्रक्रियेंतर्गत क्रीडाप्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेल्या 19 वर्षाच्या आतील वयाच्या खेळाडूला संबधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. खेळनिहाय कौशल्यचाचणीअंतर्गत क्रीडाप्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर सहभागी व 19 वर्षाच्या आतील वयाच्या खेळाडूंची खेळनिहाय कौशल्यचाचणी आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश दिला जाईल.
अनिवासी क्रीडाप्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वित्तीय, तृत्तीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.
प्रवेशासाठीच्या चाचण्यांसाठी पात्र खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, आधार कार्ड, क्रीडाप्रमाणपत्रे जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे येथे १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे ०२०-२६६१०१९४ क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते – ९९२३९०२७७७, क्रीडा मार्गदर्शक महेश चावले- ९३७०३२४९५०, श्रीमती शिल्पा चाबुकस्वार – ९५५२९३१११९ यांना कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
पुणे- आज पुणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेऊन आप चे डॉ.अभिजित मोरेम्हणाले, एक आठवड्यात नियुक्ती देण्याची प्रक्रिया भ्रष्टाचार, वशिलेबाजीमुळे तब्बल दीड वर्ष रखडवली गेलीआहे. पुणे महानगरपालिकेची डॉक्टर भरती भ्रष्ट कारभाराच्या जंजाळामध्ये अडकली आहे. डॉक्टर भरती करून आरोग्य व्यवस्था सुधारणे ऐवजी वशिल्याचे लोक या भरतीमध्ये कसे घुसवता येतील आणि त्यासाठी चालू असलेली भरती प्रक्रिया प्रचंड काळ लांबवत ठेवून योग्य उमेदवारांना कसे डावलता येईल याचं कुटील राजकारण पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये चालू आहे. अपुऱ्या डॉक्टर भरतीचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसत आहे. महानगरपालिकेत बोगस अभियंते राजरोसपणे काम करत पुणे मनपाची, पुणेकरांची फसवणूक करत असताना उच्च विद्याविभूषित डॉक्टरांना मात्र पात्र ठरवून देखील नेमणूक पत्र देण्यात येत नाही. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यासाठी ही शोकांतिका आहे.एका बाजूला पुणे महानगरपालिका दावा करते की आम्हाला हवे असलेले पात्र डॉक्टर भेटत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला पात्र डॉक्टरांनी अर्ज करून देखील त्यांची भरती दीड ते दोन वर्षे केली जात नाही. त्याचवेळी आरोग्य विभाग प्रमुख डॉ आशिष भारती यांच्या पत्नी डॉ योगिता रामचंद्र गोसावी यांची नेमणूक मात्र प्राधान्याने पार पाडली जाते. शासकीय आदेशानुसार एकाच विभागात एक वरिष्ठ व एक कनिष्ठ पदावर पती – पत्नी असू शकत नाही. तो आदेश डावलून त्यांची नियुक्ती करण्यात आली पण जे नियमात आहे त्यांना मात्र नियुक्ती देण्यात आली नाही.या सर्व प्रकारची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा आम्ही राज्य सरकर व अन्य प्राधिकृत स्तरावर दाद मागू असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे-पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाच्या कामाचा अंतिम आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला.
येत्या १५ दिवसांत उड्डाणपूल पूर्णत्वास जात असून २३ फेब्रुवारीपर्यंत उड्डाणपुलाचा ताबा महापालिकेकडे येऊ शकणार आहे. त्यानंतर हा उड्डाणपूल पुणेकरांसाठी खुला होऊन कर्वे रस्ता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे.असे महापौर मोहोळ यांनी येथे स्पष्ट केले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असताना महापालिकेच्या २०१७-१८ अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी महापौर मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती.
दुमजली उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर महापौर मोहोळ म्हणाले, ‘नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला ३५ ते ४० हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला. आता हा प्रकल्प सिद्धीस जात असल्याचे मनस्वी समाधान आहे. मेट्रोकडून पुणे महापालिकेच्या ताब्यात हा उड्डाणपूल आल्यावर कोणत्याही विलंबाशिवाय वाहतुकीसाठी खुला केला जात आहे.
‘नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असल्याने याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कल होता आणि त्या दृष्टीने यशदेखील आले आहे. कोरोनाचे संकट असतानाही मेट्रोने हे काम वेगाने पूर्ण केले त्याबद्दल मेट्रोचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.
याबाबत महामेट्रो संचालक अतुल गाडगीळ म्हणाले, ‘उड्डाणपूल जवळपास तयार झाला असून ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता केवळ किरकोळ स्वरूपाची कामे झाले असून त्यात एक्सपांशन ज्वाइंट, पथदिवे, रंगकाम आणि इतर कामे शिल्लक आहेत. ही कामे येत्या १५ दिवसात पूर्ण केली जात आहेत. त्यानंतर उड्डाणपुलाचे हस्तांतरण महापालिकेकडे केले जात आहे’.
बीड :- राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीत आलेल्या कोरोना संकटामध्ये देखील राज्याचा विकासाचा गाडा थांबला नाही आणि थांबणार नाही याची काळजी घेतली गेली. निधीची चणचण असूनही आरोग्य, रुग्णालय आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. विकास कामांसाठी येणारा पैसा हा जनतेचा असून यामधून होणारी कामे दर्जेदारच असली पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बारकाईने काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.
बीड येथे १०० कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते बीड येथे संपन्न झाले. उपमुख्यमंत्री श्री. पवार हे मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले.
दोन वर्षाच्या काळात कोरोना संकटाच्या काळात देखील राज्याने दिला जिल्ह्यात मोठा विकास निधी
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आग्रही मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजना, विकासाच्या अन्य योजना, आमदार निधी आदींमध्ये कोणतीही कपात केली नाही. बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार करता, डीपीडीसी मधून ३६० कोटी रुपयास नुकतीच मंजुरी दिली, ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ व त्यास २० कोटी भागभांडवल साठी तरतूद, वसतीग्रहासाठी निधीची तरतूद, नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा हिश्शाचा निम्मा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांत साठी विकास निधी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोदक मोठ्या प्रमाणात तरतूद असा विविध योजनातून विकास निधी दिला गेला आहे.
केंद्र सरकार सारखे राज्यांना नोटा छापायला अधिकार नसल्याने राज्याच्या उत्पन्नातून हा निधी दिला जातो. बीड शहरासाठी अमृत योजनेतून दोन पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यास पाण्याचे प्रश्न सुटू शकेल परंतु नगरपरिषदेचे वीज बिल थकीत आहे. आर्थिक शिस्त देखील लागण्याची गरज आहे यावर उपाय काढण्यासाठी प्रशासक आणि बीडचे आमदार यांना सूचना केली आहे.
कोरोना बरोबरच नैसर्गिक आपत्ती साठी निधी दिला गेला आहे. जगात काही ठिकाणी कोरोना साथीची चौथी लाट देखील आली आहे . त्यामुळे आपण गाफील न राहता लसीकरण केले जावे बूस्टर डोस व विद्यार्थ्यांचे लसीकरणा मध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणा व उपस्थितांना केले.
बीड जिल्हा हा मागासलेला म्हणून ओळखला जातो, हे मागासलेपण दूर करण्यासाठी रखडलेल्या नगर बीड परळी रेल्वे मार्गासह, ऊसतोड कामगारांची आर्थिक उन्नती, शेतीला मुबलक पाणी, ग्रामीण भागातील दळण वळण अशी अनेक विधायक कामे पूर्ण करण्याचा राज्य सरकारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. कोविड काळात राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा व विकासाला पूरक निधी उपलब्ध करुन दिला. आता जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात येत असलेल्या निधीतून दर्जेदार व राजकारण विरहित कामे करून दाखवू असे यावेळी बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
बीड जिल्हा पुणे जिल्ह्या प्रमाणे विकसित व्हावा हे आपले स्वप्न असून, यासाठी अर्थमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याला निधी देताना ओंजळ मोठी करावी व जिल्ह्याला झुकते माप द्यावे, अशी विनंती पुढे बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली.यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मागील दोन वर्षात बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील कामकाज, कोविड व्यवस्थापन व जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकासकामांची संक्षिप्त माहिती दिली.
पंचायत समिती सारख्या वास्तूंना आवश्यक निधी देऊ, तिथे लोकाभिमुख कामे व्हावीत – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
बीड पंचायत समितीचे लोकार्पण हे कोरोना काळात केलेल्या पाठपुराव्याचा परिणाम आहे; या निमित्ताने बीडमध्ये विकास पर्व सुरू होत आहे. या वास्तूचा सामान्य लोकांच्या कामांसाठी पुरेपूर उपयोग केला जावा अशी अपेक्षा यावेळी बोलताना श्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी इमारतींच्या पूर्णत्वास आवश्यकतेप्रमाणे निधी देण्याचे आश्वासन यावेळी मंत्री श्री मुश्रीफ यांनी दिले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, नवीन मंजुरी दिलेल्या 200 खाटांच्या रुग्णालयामध्ये 170 आय सी यू बेड व तीस पेडियाट्रिक आयसीयू बेड मंजूर करण्यात आले आहेत. तसेच यासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफ च्या 125 पदांना देखील मंजुरी देण्यात येत आहे. कोरोना परिस्थितीत राज्याच्या आरोग्य विभागाने मोठे काम केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात एक हजार ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यापैकी 65 ऍम्ब्युलन्स बीड जिल्ह्यात देण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आता ऍम्ब्युलन्स उपलब्ध आहे.
भंडारा येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून फायर ऑडिट करण्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात लसीकरणाची आकडेवारी वाढावी तसेच दिव्यांग अस्मिता – नोंदणी व युडीआयडी कार्ड अभियानास सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहनही श्री टोपे यांनी केले.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील सार्वजनिक वास्तूंचे पुनरुज्जीवन – राज्यमंत्री दत्तामामा भरणे
राज्यमंत्री दत्तामामा भरणे म्हणाले बीड जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे, यामध्ये अनेक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत असल्याचा मला आनंद होत आहे. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात अनेक सार्वजनिक वास्तूंचे पुनरुज्जीवन होत असल्याचेही श्री भरणे म्हणाले.
अमृत पेय जल योजनेचे 100% काम पूर्ण व्हावे – आ. संदीप क्षीरसागर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. संदीप क्षीरसागर यांनी केले; बीड मधील आजच्या विकासकामांची माहिती देत त्यांनी बीड शहर व भागातील विविध मागण्या सर्व मंत्री महोदयांसमोर मांडल्या तसेच आज भूमिपूजन झालेली कामे पूर्ण झाल्यानंतर मा. अजितदादा पवार यांनी या कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रत्यक्ष बीडला यावे अशी विनंती केली.
बीड शहरात सुरू असलेलता अमृत पेय जल योजनेतून 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी प्रशासक व प्रशासनाने सहकार्य करून समन्वय साधावा असे साकडे आ. संदीप क्षीरसागर यांनी अजितदादा पवार यांना घातले. यास सकारात्मक प्रतिसाद देत अजितदादा पवार यांनी प्रशासक नामदेव टिळेकर यांना नगर परिषदेचे थकीत वीजबिल वसुली, दंड आकारणी यात सुवर्णमध्य साधून उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
या कार्यक्रमासाठी मुंबई मंत्रालयातून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , आरोग्यमंत्री राजेश टोपे , सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आ. विक्रम काळे हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.
तसेच बीड येथे जिल्हा रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड , जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, मा. आ. अमरसिंह पंडित, मा. आ. सुनील धांडे, मा. आ. सय्यद सलीम, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर .राजा , पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सारिका गवते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध यंत्रणातील अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच सर्व विकासकामांचे एकाच ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात औपचारिक भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय गिरी यांनी केले तर माजी आमदार सुनील दादा धांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पुणे : सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांना सन्मानित करण्याचा जनकल्याण समितीचा उपक्रम खूप आनंददायी आहे. या प्रयोगशीलतेमुळे अनेक कार्यकर्ते आणि यांची सामाजिक कामे समाजापुढे येतील, असा विश्वास डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी व्यक्त केला . रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त समाजसेवेचे कार्य करत असलेल्या पन्नास व्यक्ती आणि संस्थांना या वर्षात कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ डॉ. वाचासुंदर यांना पुरस्कार प्रदान करून करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात स्व- रूपवर्धिनी संस्थेच्या जेष्ठ कार्यकर्त्या पुष्पाताई नडे यांनाही सन्मानित करण्यात आले. समितीचे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांच्या हस्ते डॉ. वाचासुंदर आणि नडे यांचा सन्मान करण्यात आला. समितीचे कार्यवाह तुकाराम नाईक, सहकार्यवाह विनायक डंबिर, सदस्य राजन गोऱ्हे आणि संघटनमंत्री शरद खाडिलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वाचासुंदर गेली अनेक वर्षे कर्णबधिरांसाठी काम करत असून त्यांनी स्थापन केलेल्या कॉक्लिया, पुणे या संस्थेतर्फे जन्मजात कर्णबधिर मुलांना बोलते करण्याचे काम केले जाते. पुष्पाताई नडे गेली अनेक वर्षे स्व- रूपवर्धिनी संस्थेचे काम करत आहेत. संस्थेतर्फे सुरु करण्यात येणार असलेल्या नर्सिंग कॉलेज संबंधीची माहिती त्यांनी यावेळी दिली. महिलांच्या स्वयंरोजगारासाठीही त्या काम करत आहेत. समितीतर्फे हितचिंतकांच्या स्नेहमेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते, रा.स्व. संघाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोकराव कुकडे , श्री. सुहासराव हिरेमठ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
मुंबई, दि. 8 : वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधन मंजूर करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
सन 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात या संचालनालयामार्फत राबविली जाते. दरवर्षी 100 च्या इष्टांकानुसार कलावंतांची निवड समिती करते. मानधन मंजूर झालेल्या कलावंतांना श्रेणी निहाय (अ श्रेणी रु.3150, ब श्रेणी रु.2700, क श्रेणी रु.2250) मानधन दरमहा सांस्कृतिक कार्य संचालालयामार्फत अदा करण्यात येते.
ज्या व्यक्तींनी साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घातली आहे, ज्यांचे वय 50 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ज्या कलावंत/साहित्यिक यांचे उत्पन्न रु.48 हजार पेक्षा जास्त नाही, जे कलावंत / साहित्यिक अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नाही अशा साहित्यिक व कलावंतांना मानधन मिळण्यासाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमूना www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, महाराष्ट्र शासन, विस्तारभवन, म.गांधी मार्ग, मंत्रालय मुंबई 400032 या कार्यालयातही उपलब्ध असून भरलेले अर्ज याच कार्यालयात स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी ०२२-२२८४२६३४/७० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
पुणे-कोरोना जागतिक महामारीच्या संकटातून आता आपण बाहेर पडत आहोत. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणं ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोथरुडसाठी लोकसहभागातून आ. पाटील यांनी मोफत फिरता दवाखाना उपक्रम सुरू केला असून, त्याचे लोकार्पण मोरे विद्यालय येथील केळेवाडी येथे झाले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका छायाताई मारणे, वासंती जाधव, डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, माधुरी सहस्रबुद्धे, वृषाली चौधरी, अल्पना वर्पे, स्विकृत सदस्या अॅड मिताली सावळेकर, भाजपा कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा ऐडके, अजय मारणे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले की, कोविडमुळे आपल्याला सर्वांना आरोग्य व्यवस्थेची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे आगामी काळात उत्तम आरोग्य व्यवस्था ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असेल. कोविडनंतरच्या काळात कोथरूड मतदारसंघातील संघातील नागरिकांसाठी डॉक्टर आपल्या घरी सारखा उपक्रम राबविला. ज्यातून सोसायटी भागातील नागरिकांना एका फोन कॉलवर मोफत वैद्यकीय सुविधा पुरविल्या. त्याचप्रमाणे वस्ती भागातील नागरिकांसाठी मोफत फिरता दवाखाना उपक्रम ही संकल्पना पुढे आली.
ते पुढे म्हणाले की, हा मोफत फिरता दवाखाना दैनंदिन वेळापत्रकानुसार वस्ती भागात जाऊन, वस्ती भागातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करुन, आवश्यकतेनुसार औषधोपचार पुरविले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी वस्ती भागातील या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप बुटाला यांनी केले. ते म्हणाले की, “माननीय चंद्रकांतदादांचा प्रत्येक उपक्रम हा दूरदर्शी असतो. डॉक्टर आपल्या घरी हा उपक्रम असाच होता, ज्याचा लाभ सोसायटी भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आता वस्ती भागातील नागरिकांना ही उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी माननीय दादा प्रयत्नशील असून, त्यासाठी मोफत फिरता दवाखाना हा उपक्रम सुरू केला आहे.” यावेळी स्थानिक नगरसेविका छाया मारणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पुणे : किरीट सोमय्या हल्ल्या प्रकरणात आज अटक करण्यात आलेले शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह १० शिवसैनिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला असून, 3000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.या प्रकरणात मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सनी गवते (वय ३२, रा. नाना पेठ) याला अटक केली.
धक्काबुक्की झाल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. तसेच ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा पोलिस शोध घेत होते. त्यामुळे आज सकाळी शहर प्रमुखांसह अनेक शिवसैनिक स्वतःहून पोलिसांत हजर झाले होते.त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयापुढे उपस्थित केले .
नवी दिल्ली- देशभरात कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडले, त्यासाठी त्यांना मोफत तिकीटे देण्यात आली असल्याचा आरोप देखील नरेंद्र मोदींनी केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या विषयावर भाष्य केले आहे. पंतप्रधान असे बोलल्याने मला स्वतःला वैयक्तिकपणे खूप दुःख वाटले असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
वैयक्तिकपणे दुखः वाटले सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण कोरोनाच्या महामारीमधून आपण आता बाहेर पडतोय. राज्य हे अडचणीमध्ये आहेत, कोरोनाची तिसरी लाट ओरसत आहे. नोकऱ्यांचा प्रश्न आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण अपेक्षित होते. मात्र पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राविषयी जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याचे मला वाईट वाटले. राज्याने भाजपला 18 खासदार निवडून दिले आहेत. मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे सर्व धक्कादायक आहे.’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
थोडाही शास्त्रीय आरोप केला असता, तर मी मान्य केले असते
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘ कोरोना काळात लोक एकमेकांना धावून मदत करत होते. मला कोरोना काळात एक फोटो कुणी तरी पाठवला होता. या फोटोमध्ये एक महिला होती. आणि बॅग देखील होती त्यावर मूल झोपलं होतं, वडील बॅग ओढत होते. खाली एक टॅग लाईन होती. तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मै. मला आता पंतप्रधान मोदींना हाच प्रश्न विचारयाचा आहे. माननीय पंतप्रधानजी तुमसे नाराज नही हूँ. हैरान हूँ मै आपसे. आम्ही सुपर सप्रेड आहोत, असे कसं काय बोलला? असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला आहे. तसेच त्यांनी थोडाही शास्त्रीय आरोप केला असता, तर मी मान्य केले असते. मी केवळ टीका करायची म्हणून टीका करत नाही. मी महाराष्ट्राची कन्या म्हणून त्यांच्याकडे न्याय मागत आहे. तुम्ही असा आरोप का केला? तुम्ही राज्या-राज्यात द्वेष पसरवत आहात?’ असा सवाल सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांना केला आहे.
मुंबई-देशभरात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसने केल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसेभत केले होते. त्यानंतर देशभरात राजकारण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सांगत उद्यापासून काँग्रेसतर्फे भाजपच्या प्रत्येक कार्यालयासमोर ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही उद्यापासून महाराष्ट्राची माफी मागावी असे फलक घेऊन उभे राहणार आहोत, असे पटोले म्हणाले.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देश टाळेबंदीचे पालन करत होते. दरम्यान महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. काँग्रेसनेच लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन कोरोना पसरवण्याचे काम करा, असाच संदेश त्या नेत्यांनी दिला. काँग्रेसने लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही गोंधळाची परिस्थिती निर्माण केली. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि देशभरात कोरोना पसरला.’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारवर केला होता.
पुणे, 8 फेब्रुवारी 2022: लायन्स क्लब ऑफ रहाटणी आणि लिओ क्लब ऑफ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन्स क्लब ऑफ रहाटणी करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने एम.जी स्पोर्टस् क्लब संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हजारे मैदान, मोशी येथे झालेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत निलय गुरवच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने एम.जी स्पोर्टस् क्लब संघाचा 9 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना निलय गुरव, आर्यन यादव व यश सुर्यवंशी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एम.जी स्पोर्टस् क्लब संघ 24.2 षटकात सर्वबाद 84 धावात गारद झाला. 84 धावांचे लक्ष प्रथमेश वाघमारेच्या नाबाद 36 व आयुष म्हाळसकरच्या नाबाद 27 धावांसह परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 15.3 षटकात 1 गडी गमावत 85 धावांसह सहज पुर्ण करत विजेतेपद पटकावले. 19 धावात 3 गडी बाद करणारा निलय गुरव सामनावीर ठरला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रांतपाल एमजेएफ लायन हेमंत नाईक, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन (स्पोर्ट्स) लायन संतोष गायकवाड, झोन चेअरपर्सन एमजेएफ लायन धनराज मंघनानी, लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीचे अध्यक्ष लायन प्रमोद भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष लायन धिरज कदम , लिओ क्लबचे अध्यक्ष लायन श्रेयस चव्हाण, क्लबचे संस्थापक एमजेएफ लायन वसंत कोकणे, सचिव लायन अमोल दापूरकर, खजिनदार लायन प्रशांत तेलंगे, कॅबिनेट ऑफिसर लायन समीरज अगरवाल, लायन अभिषेक मोहिते, फय्याज लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल-अंतिम फेरीएम.जी स्पोर्टस् क्लब- 24.2 षटकात सर्वबाद 84 धावा(अरोन गायकवाड 25(37, 2×4), आरोश बन्सल 18(24, 3×4), निलय गुरव 3-19, आर्यन यादव 2-9, यश सुर्यवंशी 2-7, वेदांत जाधव 1-10) पराभूत वि परंडवाल क्रिकेट अकादमी- 15.3 षटकात 1 बाद 85 धावा(प्रथमेश वाघमारे नाबाद 36(26, 7×4), आयुष म्हाळसकर नाबाद 27(49, 2×4), हर्षिल सावंत 1-28) सामनावीर- निलय गुरवपरंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.इतर पारितोषिके- मालिकावीर- हर्षिल सावंत(एम्.जी स्पोर्टस् क्लब- 5 सामने, 60 धावा, 11 गडी बाद)सर्वोत्कृष्ट फलंदाज- प्रय़मेश वाघमारे(परंडवाल क्रिकेट अकादमी- 6 सामने, 222 धावा)सर्वोत्कृष्ट गोलंदाज- पार्थ सोनवणे(चंद्रोज क्रिकेट अकादमी- 5 सामने 10 गडी बाद)सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक- सम्यक फिरोदिया(एम्.जी स्पोर्टस् क्लब)सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- शुभम सुपे(परंडवाल क्रिकेट अकादमी)
मुंबई-संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. देशात महाराष्ट्र सरकारमुळे कोरोना पसरला असे विधान मोदी यांनी केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारमधील नेते मोदी सरकारवर टीकास्त्र करताना पाहायला मिळत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील मोदींवर हल्लाबोल केला आहे. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकार मजूर, गरीब आणि परप्रांतियांच्या पाठिशी उभे राहिले. मात्र केंद्र सरकारने कोणताही विचार न करता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामुळे देशात कोरोनाचा पसरला. असे म्हणत मलिकांनी केंद्र सरकारवर टीका केली.
सोमवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदींनी कोरोनावर भाष्य करत काँग्रेस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले की, ‘देशात लॉकडाऊन सुरू असताना सर्व तज्ज्ञ सांगत होते की, जिथे आहात तिथेच राहा, मात्र तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर मजुरांना मोफत तिकीट दिले, आणि लोकांना सांगितले की, तुम्ही यूपी आणि बिहारचे आहात, तिथे जाऊन कोरोना पसरवा. असे करुन काँग्रेसने मोठे पाप केले आहे.’ असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राज्य सरकारवर केला होता. त्यानंतर आता मलिकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मलिक म्हणाले की, कोरोना काळामध्ये महाराष्ट्र सरकार मजूर आणि गरिबांच्या पाठिशी उभे राहिले. मात्र, तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लागू केला, अशी टीका मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. नमस्ते ट्रम्पच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोनाचा प्रादूर्भाव आणि प्रसार वाढला, ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. असे म्हणत नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केली.
पुढे मलिक म्हणाले की, जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोरोना देशात पसरणार नाही, असे सांगितले होते. ‘नमस्ते ट्रम्प’च्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले. ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात कोरोना पसरला, असा आरोप मलिकांनी मोदींवर लावला आहे.
मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना, त्यांची सर्व व्यवस्था केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बस सुरू केल्या, परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळ्या वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोक भोगत आहेत. असे म्हणत मलिकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.