Home Blog Page 1993

राष्ट्रवादीच्या महिलेला मारहाण :पुण्यातील कारवाई बाबत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, मोहित कंबोज, रवी राणा,किरीट सोमय्यांसह पोलिसांच्या ताब्यातील केतकी चितळेवर ही हल्ला झाला..

राज्य सरकारने पक्षपातीपणे कारवाई करणे योग्य नाही – केतकी चितळेची भूमिका निषेधार्ह परंतु पोलिसांच्या उपस्थितीत तिला नेत असताना मारहाण करणे, धक्काबुक्की करणे, शाई फेकणे हे काय ?


मुंबई, दि. १७ मे – कोणी काही गैर केले की कारवाई व्हायलाच पाहिजे. पण सरकार पुरस्कृत आणि पोलिसांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काहीही करा, अशा प्रकारचा संदेश सरकार देतेय. विरोधी पक्ष भाजपने काहीही केले तर त्याल आम्ही ठेचून काढू अशी भूमिका सरकारची दिसतेय. भाजपच्या आंदोलनावर लगेच कारवाई केली जाते. सरकारने अशा प्रकारे पक्षपातीपणे कारवाई करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काल पुणे दौऱ्यावर असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महिला विभागाच्या अध्यक्ष वैशाली नागवडे यांना मारहाण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. या संदर्भात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हे सरकार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते खुलेआम भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करताना दिसतात. स्मृती इराणींचा कार्यक्रम असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या घुसल्या त्यांच्यावर कारवाई केली नाही. शिवसेनेच्या वतीने मोहित कंबोजच्या गाडीवर, रवी राणांच्या घरावर हल्ले झाले, किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ले झाले, त्यांच्यावर कारवाई नाही. सरकार पुरस्कृत राष्ट्रवादी, शिवसेना हल्ले करतात. मात्र गृहमंत्री महोदय यावर काही कारवाई करत नाहीत, काही बोलत नाहीत. केतकी चितळेची भूमिका निषेधार्ह आहे. याचा आम्हीही निषेध करतो. असे लिहिणे चुकीचे आहे, परंतु पोलिसांच्या उपस्थितीत तिला नेत असताना मारहाण करणे, धक्काबुक्की करणे, शाई फेकणे याला कायद्याने संरक्षण दिले गेले नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

महागाईच्या भस्मासुराचा विक्रम ग्रीनीज बुकात नोंद होण्यासारखा ..नोंदवीत का नाही ?

0

पुणे- केंद्र सरकार कि राज्य सरकार ? जबाबदार कोण याच्याशी घेणेदेणे नाही, पण महागाईच्या भस्मासुराने आता गोरगरिबांना गिळायला सुरुवात केली आहे. वाढत्या महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. ज्या महागाईने कॉंग्रेसचे सरकार कोसळले होते ,त्यापेक्षा कितीतरी पटीने आता या भस्मासुराने आ वासला आहे. दुर्दैवाने अण्णा हजारे कोणी होत नाही आणि त्यांना साथ देणारा केजरीवाल देखील कोणी पुढे येत नाही. आता पूर्वीसारखे राहिले मात्र नाही सत्तेवर आल्यावर इंधनाचे दर नाही सांगता आले तरी त्यावरील कर किती राहील याबाबतचे करार आता यापुढे जनतेने राजकीय पक्षांशी करवूनच घेतले पाहिजे अशी स्थिती आहे.

खाद्यान्न, इंधन आणि विजेच्या किमतीत वाढ झाल्यामुळे घाऊक महागाई सलग 13व्या महिन्यात दुहेरी अंकात नोंदवण्यात आली. घाऊक किंमत निर्देशांक आधारित (WPI) महागाई दर एप्रिलमध्ये 15.08% वर पोहोचला. डिसेंबर 1998 नंतर घाऊक महागाई दर प्रथमच 15% च्या वर पोहोचला आहे.

या आधी महागाई दर मार्च 2022 मध्ये 14.55% होता, तर फेब्रुवारीमध्ये 13.11% होता. एप्रिल 2021 पासून घाऊक महागाईचा दर दुहेरी अंकात राहिला आहे. तज्ज्ञांच्या मते अन्न आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढत आहे.

महागाईचा विक्रम

महिनामहागाई दर
एप्रिल10.74%
मे13.11%
जून12.07%
जुलै11.16%
ऑगस्ट11.64%
सप्टेंबर10.66%
ऑक्टोबर13.83%
नोव्हेंबर14.87%
डिसेंबर14.27%
जानेवारी13,68%
फेब्रुवारी13.11%
मार्च14.55%
एप्रिल15.08%

इंधन आणि ऊर्जेमुळे महागाईत वाढ

एप्रिल महिन्यात खाद्यपदार्थांचा महागाई दर 8.35% होता, जो मार्च 2022 मध्ये 8.06% होता. मार्च 2022 मध्ये इंधन आणि उर्जा क्षेत्रातील महागाई दर 34.52% वरून 38.66% वर पोहोचला आहे. एप्रिल 2022 मध्ये उत्पादित उत्पादनातील महागाई दर 10.85% होता, जो मार्च 2022 मध्ये 10.71% होता.

किरकोळ महागाई 8 वर्षांच्या उच्चांकावर

याआधी खाद्यपदार्थांपासून तेलाच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाईने 8 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 7.79% पर्यंत वाढली आहे. मे 2014 मध्ये महागाई 8.32% होती.

महागाई कशी मोजली जाते?

भारतात दोन प्रकारची महागाई आहे. एक म्हणजे रिटेल, म्हणजेच किरकोळ आणि दुसरी घाऊक महागाई. किरकोळ चलनवाढीचा दर सामान्य ग्राहकांनीवर आधारित असतो. त्याला ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) असेही म्हणतात. तर, घाऊक किंमत निर्देशांक (WPI) हा घाऊक बाजारातील एक व्यापारी दुसर्‍या व्यापाऱ्याकडून आकारलेल्या किमतीावर अवलंबून असतो. या किमती मोठ्या प्रमाणात केलेल्या सौद्यांशी जोडलेल्या आहेत.

दोन्ही प्रकारची महागाई मोजण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ, घाऊक महागाईत उत्पादित उत्पादनांचा वाटा 63.75%, खाद्यान्न सारख्या प्राथमिक वस्तूंचा 20.02% आणि इंधन आणि उर्जा 14.23% आहे. त्याच वेळी, किरकोळ महागाईमध्ये अन्न आणि उत्पादनांचा वाटा 45.86%, गृहनिर्माण 10.07%, कपडे 6.53% आणि इंधनासह इतर वस्तूंचाही वाटा आहे.

जिल्ह्यातील गृहरक्षक दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

पुणे दि.१७ : जिल्ह्यातील गृहरक्षक दलाला (होमगार्ड) आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित शिबिराचे उद्घाटन होमगार्ड जिल्हा समोदशक तथा पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, उपनियंत्रक नागरी संरक्षण नितीन आवारे उपस्थित होते. गृहरक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून २० मेपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध पैलूचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबिरात २०० होमगार्ड सहभागी झाले आहेत.

यावेळी श्री. घट्टे यांनी होमगार्डना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे आयोजनामागील हेतू तसेच प्रशिक्षणाचे महत्व सांगितले. होमगार्डनी त्यांच्या तालुक्यातील प्रत्येकी १० होमगार्डना त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाबाबतची माहिती देऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त होमगार्डपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती पोहोचविण्याच्या आणि त्यांना प्रशिक्षित करण्याच्या सुचना श्री.घट्टे यांनी दिल्या. नैसर्गिक आपत्ती किंवा कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त, पालखी बंदोबस्त अशा वेळी अशा प्रशिक्षित होमगार्डच्या प्रशिक्षणाचा योग्य वापर केल्यास प्रशिक्षणाचा उद्देश फलद्रूप होईल, असेही ते म्हणाले.

आजच्या होमगार्डमधून चांगल्या प्रशिक्षित ५० पुरुष व महिला होमगार्डचे एक पथक तयार करुन त्यांची यादी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात असणार आहे. आवश्यकता पडेल त्यावेळी त्यांचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनासाठी केला जाईल, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. बनोटे यांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक श्री. सोनटक्के व त्यांच्या पथकाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण साहित्याची माहिती दिली.

पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता !

सिंधुरत्न कलावंत मंच’ आयोजित पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभ आणि पारितोषिक वितरण सोहळा मालवण येथील मामा वरेरकर सभागृहात नुकताच दिमाखात संपन्न झाला. या चित्रपट महोत्सवात विवेक दुबे दिग्दर्शित ‘फनरल’ चित्रपट सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मानकरी ठरला. तर याच चित्रपटासाठी अभिनेता आरोह वेलणकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा व दिग्दर्शक विवेक दुबे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. अक्षया गुरवला ‘रिवणावायली’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटासाठी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करुन पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. ‘झी टॉकीज’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते.

पहिला कोकण चित्रपट महोत्सव ९ ते १४ मे या कालावधीत पार पडला. मराठीतील ३८ चित्रपटांनी यात सहभाग घेतला होता. त्यातील १४ चित्रपटांची परिक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवड केली होती. त्यातून विजेत्यांची घोषणा यावेळी करण्यात आली. या महोत्सवाचा समारोप समारंभ शनिवारी सायंकाळी मालवण येथील मामा वरेरकर सभागृहात पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, ज्येष्ठ अभिनेत्री आणि संस्थेच्या उपाध्यक्षा अलका कुबल आठल्ये यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेता दिगंबर नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘कोकण चित्रपट महोत्सव कोकणातील स्थानिक कलाकारांना संधी देणारा उत्तम मंच ठरावा’, अशी अपेक्षा सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेता विजय पाटकर यांनी व्यक्त केली. ‘गुणी आणि उमेदीचे कलाकार प्रत्येक भागात असतात. केवळ पुणे-मुंबई इथेच सांस्कृतिक घडामोडी केंद्रीत होऊन चालणार नाही, या उद्देशाने आम्ही या कोकण चित्रपट महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली असून या माध्यमातून इथल्या कलाकारांना वाव मिळेल व कोकणातील सांस्कृतिक वैभव ते जगभरात दाखवतील’ अशी आशा विजय पाटकर यांनी यावेळी व्यक्त केली. ‘कोकण चित्रपट महोत्सव कोकणातील कलासंस्कृतीला वेगळं वळण देणारा ठरेल’, असा विश्वास झी च्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर श्री. बवेश जानवलेकर यांनी व्यक्त केला.

अतिशय कमी वेळात विजय राणे, प्रमोद मोहिते, यश सुर्वे, प्रकाश जाधव, उमेश ठाकूर, नूतन जयंत, शीतल कलापुरे तसेच मालवण येथील अवि सामंत, गणेश पाटील, हार्दिक शिगले आदिंनी पहिला कोकण चित्रपट महोत्सव यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

पुरस्कार विजेत्यांची नामावली पुढीलप्रमाणे

१)       कथा –  फनरल – रमेश दिघे

२)       पटकथा –  फनरल- रमेश दिघे

३)       संवाद –  रिवणावायली – संजय पवार

४)       गीतकार – फिरस्त्या (नवा सूर्य)- गुरू ठाकूर

५)       ध्वनीमुद्रक– प्रवास – अरविंद विजयकुमार

६)       ध्वनिसंयोजन – जीवनसंध्या – परेश शेलार आणि समीर शेलार

७)       वेशभूषा – कानभट्ट – अपर्णा होसिंग

८)       रंगभूषा – कानभट्ट -संजय सिंग

९)       कलादिग्दर्शक – कानभट्ट- सतीश चीपकर

१०)   पार्श्वसंगीत – चोरीचा मामला – चिनार -महेश

११)   संगीत – जीवन संध्या – अतुल भालचंद्र जोशी

१२)   पुरुष गायक – फिरस्त्या -आदर्श शिंदे

१३)   स्त्री गायक– रिवणावायली -अंजली मराठे

१४)   संकलक– फनरल- निलेश गावंड

१५)   छायाचित्र – हिरकणी- संजय मेमाणे

१६)   नृत्यदिग्दर्शक– पांडू -विठ्ठल पाटील

१७)   सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – फनरल- विवेक दुबे

१८)   सर्वोत्कृष्ट अभिनेता–  फनरल – आरोह वेलणकर

१९)   सर्वोत्कृष्ट अभिनेत्री– रिवणावायली – अक्षया गुरव

२०)   सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – फनरल- विजय केंकरे

२१)   सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – 8 दोन 75 फक्त इच्छाशक्ती हवी – शर्वाणी पिल्लई

२२)   सर्वोत्कृष्ट खलनायक– मी पण सचिन-अभिजित खांडकेकर

२३)   सर्वोत्कृष्ट विनोदी पुरुष कलाकार– चोरीचा मामला – जितेंद्र जोशी

२४)   सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री– चोरीचा मामला- क्षिती जोग

२५)   विशेष प्रोत्साहन चित्रपट – रिवणावायली -(प्रणाली मुव्हीज),  फिरस्त्या – (झुंजार मोशन पिक्चर्स), शहीद भाई कोतवाल (स्वरजाई आर्ट् मीडिया प्रोडक्शन)

२६) सर्वोत्कृष्ट चित्रपट– प्रथम क्रमाक- फनरल (बिफोर आफ्टर एंटरटेनमेंट), द्वितीय क्रमांक – प्रवास (ओम छंगानी फिल्म), तृतीय क्रमांक- जीवन संध्या- (ड्रीम लाईन प्रोडक्शन एल.एल.पी)

२७) सर्वोत्कृष्ट बालकलाकार – राजवीरसिंग राजे गायकवाड (भारत माझा देश आहे), देवाशी सावंत (भारत माझा देश आहे), रूचीत निनावे –(पल्याड), मृगवेद मुले (कानभट्ट), मृणाल जाधव (मी पण सचिन)

२८) विशेष पारितोषिक – अशोक सराफ – (प्रवास), किशोरी शहाणे – (जीवन संध्या), मोहन जोशी – (सीनियर सिटीजन), पद्मिनी कोल्हापुरे (प्रवास)

२९)सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट– पांडू (झी एंटरटेनमेंट एन्टर्प्राइजेज. लि.)

राज्यात लोकायुक्त कायदा:मला वयाच्या ८५ व्या वर्षी उपोषण करायला लाऊ नका -अण्णा हजारेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र (वाचा जसेच्या तसे )

0

  दिनांक- 17/05/2022

   जा.क्र. भ्रविज-04/2022-23

प्रति,

मा. उद्धवजी ठाकरे साहेब,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

मंत्रालय, मुंबई – 32

विषय- महाराष्ट्र राज्यामध्ये लोकायुक्त कायद्याचा मसुदा करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या दिनांक 11 जून 2019 ते 8 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण सात (7) बैठका झाल्या आहेत. आता फक्त एक किंवा दोन बैठका होतील आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्या बैठका घेण्यास मुख्य सचिवांना सांगण्यात यावे.

महोदय,

            केंद्रामध्ये लोकपाल आणि देशातील प्रत्येक राज्यामध्ये लोकायुक्त कायदा कसा असावा यासाठी संसदेमध्ये दिनांक 27 ऑगस्ट 2011 रोजी सर्व संमतीने कायदा करण्यात आला आहे. सदर कायदा व्हावा यासाठी 1966 पासून 45 वर्षात आठ वेळेला संसदेत बिल आले होते मात्र पास झाले नव्हते. म्हणून 16 ऑगस्ट 2011 रोजी दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपोषण सुरू केले होते. देशातील लाखो लोक आंदोलनात सहभागी होण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. उपोषणाच्या बाराव्या दिवशी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आणि संसदेत सर्व संमतीने केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यामध्ये लोकायुक्त (लोकपाल-लोकायुक्त) कायदा करण्यात आला आहे. सदर कायदा करताना कसा असावा या संबंधाने कायद्यामध्ये संसदेने मार्गदर्शन तत्वे घातली आहेत.

            त्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे केंद्र सरकारने लोकपाल कायदा करून त्या कायद्याचे कार्यालय दिल्लीमध्ये सुरू करण्यात आले आहे. संसदेत झालेल्या लोकपाल-लोकायुक्त कायद्याप्रमाणे केंद्रात लोकपाल कायदा झाला. राज्यामध्ये लोकायुक्त कायदा करणे आवश्यक आहे. देशातील काही राज्यांनी संसदेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे लोकायुक्त कायदे केले आहे.

            संसदेत झालेल्या कायद्यामधील मार्गदर्शक तत्वांप्रमाणे महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर असताना मी राळेगणसिद्धीमध्ये दिनांक 30 जानेवारी 2019 ते 05 फेब्रुवारी 2019 या काळात उपोषण केले होते त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त कायदा करण्यासाठी आम्ही केंद्रातील झालेल्या कायद्याप्रमाणे राज्यात लोकायुक्त कायदा करण्यासाठी लवकरात लवकर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे पाच सदस्य जे प्रधान सचिव दर्जाचे असतील आणि सिव्हिल सर्व्हीस मधील पाच सदस्य घेऊन मसुदा समिती करण्यास तयार आहोत असे लेखी आश्वासन दिल्यामुळे मी माझे उपोषण सात दिवसानंतर मागे घेतले होते.

            महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सरकार तर्फे प्रधान सचिव दर्जाचे पाच आणि सिव्हिल सोसायटीचे पाच लोक घेऊन राज्यात लोकायुक्त कायदा करण्यासाठी मसुदा समिती नेमली होती. अनेक बैठका होऊन मसुदा समितीचा काही भाग तयार झाला होता. अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवरून जाऊन उद्धवजी ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकायुक्त कायद्या संबंधाने झालेल्या बैठका संबंधाने देवेद्र फडणवीस सरकार कडून आपणास माहिती देण्यात आली होती. मी सुद्धा आपणास माहिती दिली होती. आपण मला पत्र पाठवून आश्वासन दिले होते की आपल्या राज्यात सदर लोकायुक्त कायदा आम्ही करू. मुख्य सचिव श्री. अजोय मेहता यांची नियुक्ती आपल्या सरकारने कायम करून लोकायुक्त कायद्याचा संसदेत झालेल्या कायद्याप्रमाणे मसुदा तयार करण्याची जबाबदारी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर सोपविली होती. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केंद्रातील कायद्याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे बैठका घेण्यास सुरूवात केली होती. देवेंद्रजी फडणवीस सरकार आणि आपल्या सरकाने यशदा पुणे आणि मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर एकूण सहा बैठका झाल्या. पण करोना महामारी वाढल्यामुळे लोकायुक्त कायद्याचा मसुदा पुर्ण होण्यास थोडा विलंब होईल असे आपण मला दिनांक 19 मार्च 2020 रोजी पत्राने कळविले होते. त्यामुळे सहा महिन्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर मी पुन्हा आपणाशी पत्रव्यवहार केला नाही. (आपण मला दिनांक 19 मार्च 2020 दिलेले पत्र सोबत जोडले आहे )

            राज्याच्या कोरोना महामारीमध्ये सुधारणा झाल्यामुळे आपल्या सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना नियमावलीमध्ये शिथीलता आणली आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे की लोकायुक्त कायदा मसुद्याच्या राहिलेल्या एक किंवा दोन बैठका होऊ शकतील त्या बैठका घेण्यात याव्यात. पहिल्या सरकारमध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि आपल्या सरकार मध्येही मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीच्या ज्या एकुण सहा बैठका झाल्यात त्यामुळे मसुदा पुर्ण होत आला असल्याने आता आपण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली खाली नेमलेल्या समितीची एक किंवा दोन बैठका होऊ शकतील. मुख्य सचिवांना सांगून त्या बैठका घेऊन मसुदा पुर्ण करण्यात यावा अशी विनंती आहे.

            लोकपाल लोकायुक्त कायदा राज्य आणि केंद्रासाठी महत्वाचा असल्याने मी तीन वेळेला दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये प्राणांतिक उपोषण केले आहे. माझी खात्री झाली आहे की संसदेत झालेल्या कायद्याप्रमाणे ज्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे लोकायुक्त कायदा झाला तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी महत्वाचे कार्य होईल. त्यासाठी मी महाराष्ट्रात दौरे करून लोक शिक्षण लोक जागृती करण्यास तयार आहे. या पुर्वी लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी तीन वेळा प्राणांतिक उपोषणे झाली आहे. जनहितासाठी लोकायुक्त कायद्यासाठी आता चौथे उपोषण होण्याची वेळ येवू नये अशी विनंती आहे.

            मी माझे संपूर्ण आयुष्य समाज सेवेसाठीच अर्पण केलेले असल्याने मला उपोषण करण्यास काहीच संकोच वाटत नाही. मी गेल्या वीस वर्षात 20 वेळा उपोषणे केल्यामुळेच माहितीचा अधिकार कायदा देशाला मिळाला. पण सरकारचे कर्तव्य असल्याने जनतेवर उपोषणे, आंदोलने करण्याची वेळ येऊ नये असे आमचे मत आहे. पण जनहितासाठी उपोषण करण्याची वेळ आलीच तर राज्यातील जनतेच्या हितासाठी मी तशी तयारी ठेवली आहे.

            कोणत्याही पक्ष आणि पार्टीचा विचार न करता फक्त जनहिताचा विचार करून आता पर्यंत 20 वेळा माझी उपोषणे झाली आहेत. 15 ते 16 दिवसाचे उपोषण करणे एवढ सोपे नसते पण जनतेच्या हितासाठी ते करणे मला आवश्यक वाटले म्हणून केले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माहितीचा अधिकार, जनतेची सनद, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, दारूबंदी, ग्रामसभेला जादा अधिकार यासारखे जनहिताचे दहा कायदे  कायदे झाले.

            हे कायदे झाल्यामुळे भ्रष्टाचार संपला नसला तरी काही प्रमाणात आळा बसला हे नाकारता येणार नाही.आमची घटना ही सर्वोच्च स्थानावर असून घटनेच्या आधाराने कायदे होतात आणि कायद्यांच्या आधाराने देश आणि राज्ये चालतात. आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लोकायुक्त कायदा करून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र निर्माण कराल अशी अपेक्षा करतो. 85 वर्षाच्या वयामध्ये उपोषण होणार नाही हिच इच्छा.

धन्यवाद.

आपला,

कि. बा. तथा अण्णा हजारे

शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

0

1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी २०० रू प्रतिटन अनुदान

मुंबई, दि. १७ :- राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री महोदय यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, कृषी सचिव एकनाथ डवले, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार असून राज्यात १ मे २०२२ नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे ५२ लाख टन गाळप अपेक्षित आहे. यापैकी आजअखेर ३२ लाख टन गाळप झाले आहे. तसेच १ मे २०२२ नंतर गाळप होणाऱ्या व ५० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या साखर आयुक्तांनी अनिवार्य ऊस आदेश काढलेल्या ऊसास प्रतीटन पाच रुपये प्रती किलोमीटर वाहतूक अनुदान देण्यात येईल, असेही सहकार मंत्री पत्रकार परिषदेत माहिती दिली.

गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये राज्यात एकूण १३.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. सन २०२०-२१ मध्ये ११.४२ लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. तसेच १६ मे २०२२ अखेर १०० सहकारी व ९९ खासगी असे १९९ साखर कारखान्यांकडून १३००.६२ लाख टन ऊस गाळप झालेले आहे. मागील वर्षापेक्षा सुमारे ५५,९२० टन प्रतीदिन जास्त गाळप क्षमतेने गाळप होत आहे. मागील वर्षी याच दिनांकास १०१३.३१ लाख टन गाळप झालेले होते. चालू वर्षी २८७.३१ लाख टन गाळप जास्त झालेले आहे. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

महिलेवर पुरुषांनी हात उचलला तर हात तोडून हातात देईल- खासदार सुप्रिया सुळे ही भडकल्या

जळगाव-राज्यातील महिलांवर यानंतर हात उचचला तर हात तोडून हातात देईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने पाहायला मिळाले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या प्रकरणी सुप्रिया सुळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ​​​​​​

जळगावमध्ये वाढत्या महागाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. राज्यातील प्रत्येक महिलेचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला मिळाली आहे. मात्र यापुढे राज्यात कुठल्या पुरुषाने जर महिलांच्या अंगावर हात उचलला तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याविरोधात कोर्टात जाईल. त्याचा हात तोडून त्यांच्या हातात देईल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला आहे.


केंद्र सरकार महागाई कमी करण्याच्या नावावर सत्तेत आले आहे. मात्र गेली 8 वर्षे महागाईंचा आलेख वाढता दिसत आहे. आम्ही केंद्रात सत्तेत असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रुपये इतका होता. तेव्हा मोदीजी म्हणायचे “बहुत हो गयी महगाई की मार, अबकी बार मोदी सरकार”. आता गॅस सिलिंडरचे दर १००० रुपये झाले आहेत. त्यामुळे “बहुत हो गयी महगाई की मार, अबकी बार किसकी सरकार?” असा सवाल सुप्रियाताईंनी केला.धरगुती गॅस असो की, इंधर दरवाढ या मुळे देशातील सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मात्र त्यावर सरकार काही करणार नाही असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.देशात महागाईऐवजी जानेवारी महिन्यात हिजाबचा मुद्दा उचलला गेला, फेब्रुवारीत काश्मीर फाईल्सचा प्रचार केला गेला, मार्च महिन्यात भोंगे, लाऊडस्पीकर आले, एप्रिल महिन्यात हनुमान चालिसा गायली गेली आणि आता मे महिन्यात ज्ञानवापी मंदिराचा मुद्दा उचलला जात असल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या.केंद्र सरकारने एक लक्षात ठेवावं की, कोरोना काळात कोणताही माणूस उपाशीपोटी मृत्यू पावलेला नाही. याचं सर्वात जास्त श्रेय हे शेतकऱ्याला जातं. कोरोना काळात लोक शहरांऐवजी गावाकडे पळत होते. पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे.

नेमके प्रकरण काय?
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात सोमवारी (काल) स्मृती इराणींचा कार्यक्रम होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनासाठी स्मृती इराणी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पोहोचल्या. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार व स्मृती इराणी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले. आणि आक्रमक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी भाजपच्या 3 जणांविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाऊस कमी पडतो, तिथे निवडणुका घेण्यास काय अडचण?, जिल्हानिहाय आढावा घेण्याचे निवडणूक आयोगाला आदेश

0

आधी कोविड व नंतर ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. राज्यात लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबरदरम्यान निवडणूका घेणे अडचणीचे ठरु शकते, असे राज्य निवडणूक आयोगातर्फे सुनावणीदरम्यान सांगण्यात आले. त्यावर जिथे पाऊस कमी पडतो, तिथे निवडणूक घेण्यास काय अडचण आहे, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र, आज सुनावणीदरम्यान पावसाळ्याचे कारण देत राज्य निवडणूक आयोगाने संपुर्ण राज्यासाठी तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे अडचणीचे ठरु शकते, असे सांगितले. विशेषत: कोकण व मुंबईमध्ये पावसामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होते. त्यामुळे या भागांत निवडणुका घेणे अडचणीचे ठरु शकते, असे निवडणूक आयोग म्हणाले. त्यावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. निवडणुका अधिक काळ प्रलंबित ठेवणे योग्य नाही. राज्यात किमान ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, तेथे निवडणुका घेण्यास काय अडचण आहे, असा सवाल कोर्टाने केला. तसेच पावसाबाबत जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

राज्यात निवडणूका टप्प्या-टप्प्याने निवडणूका होणार?
सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्देशांमुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता टप्प्या टप्प्याने होण्याची शक्यता बळावली आहे. निर्देशानुसार, राज्यात पावसाळ्यात काही ठिकाणी व उर्वरित ठिकाणी पावसाळ्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीनेच निवडणूकांचे नियोजन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. त्यानुसार आता मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, वसई-विरार या महत्त्वाच्या पालिका निवडणूकांसह सर्व कोकणतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. तर कमी पाऊस असणाऱ्या मराठवाडा व विदर्भातील जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, पालिका निवडणूका पावसाळ्यात होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही
यापुर्वीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यावर आज मतदार याद्या तयार करण्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ लागेल. जून अखेरपर्यंत प्रभाग रचना व प्राथमिक प्रक्रिया पुर्ण होतील, असे निवडणूक आयोगाने सांगितले. त्यावर या प्रक्रियांना लागणाऱ्या वेळेबाबत आपले काही म्हण्णे नाही. मात्र या प्रक्रियेत खंड पडू देऊ नका. तसेच निवडणूका जाहीर करण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. तसेच, तुमची पावसाळ्याची अडचण आम्ही समजू शकतो. त्यामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार तुम्ही निवडणूक आराखडा तयार करा. प्रक्रिया कुठेही थांबवू नका, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

….तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावु’म्हणाल्या दिपाली सय्यद

पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या महिलांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मारहाण केल्याने अलीकडे राजकारणात खूपच सक्रीय होऊ पाहणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी मोठ्ठच मोठ्ठ् वक्तव्य केलं आहे . त्यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महिलांवर हात उचलाल तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावु , केंद्रातल्या जर्शी म्हशीला गोबर गॅसची आठवण करून देऊ. जसे पेराल तसे ऊगवुन देऊ. असे त्यांनी म्हटले आहे . आता हे कोणाला कसे लागेल हे सर्वानांच ठाऊक आहे.

तसे पाहायला गेले तर टीव्ही आणि भाषिक सिनेमात आता तसं काही उरलेलं नाही ,भाषिकच काय पण बॉलीवूड ची देखील वाईट अवस्था आहे . अनेकांनी फसवणुकीचे ,लुटारूपणाचे धोरण ठवल्याने आणि त्यांनाच ‘लॉबी’ ने मुगुटमनी बनविल्याने अशा गोलमाल लोकांनी तर ‘माल कमविला पण सिनेसृष्टीची मोठी हानी करून ठेवली . त्यात मोबाईल वर करमणूक, कोरोनाची २ वर्षे अशा संकटाने सिनेमा आता लयास जातो कि काय अशी स्थिती निर्माण झाली ? पूर्वी असे म्हणतात सिनेमात दाऊद चा पैसा यायचा पण पूर्वीच्या काळात सिनेमाला मोठे महत्व होते त्यामुळे तो दस पट होऊन माघारी यायचा .आता राजकारण आणि बिल्डर लॉबी तून सिनेमाला पैसा येऊ लागलाय पण तथाकथित ‘मुगुटमनी’ च्या कारभाराने आलेला निर्माता पुन्हा या सृष्टीत यायला नकोच म्हणतो , त्यामुळे आता रिटायर व्हायच्या आधीच कलाकार राजकारणात घुसू लागले आहेत .पण हि घुसखोरी करताना अनेकांना कठीण कठीण डॉयलॉग फेकावे लागत आहेत .नवनीत राणा ,केतकी चितळे ,अशी यादी आहे ज्यांच्यावर जरी त्यांची ट्विटर वरील डॉयलॉगबाजी वाढली असली तरीही … दिपाली सय्यद त्यातल्या नाहीत,त्यांनी यापूर्वी निवडणुकाही लढविल्या आहेत .कित्येक वर्षे त्या राजकारणात आहेत ,आणि राजकारणात त्यांनी आपली वेगळी वाटचालही ठेवली आहे. पण आता त्यांच्या या डॉयलॉगबाजीने हि वाटचाल आणखी वेगळे रूप घेऊ पाहणार काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“सभा करायच्याच असतील तर अयोध्यामध्ये करुन दाखवा, पुण्यामध्ये तर…”; दिपाली सय्यद यांचा टोला

अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. यावरुनही आता मनसेवर टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेसह राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.दीपाली सय्यद या राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेल्या पाहायला मिळत आहेत. याआधीही सय्यद यांनी राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेनंतर ट्विट करत टीका केली होती. आता पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेवरुन भाष्य केले आहे. दीपाली सय्यद यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.“सभा करायच्याच असतील तर अयोध्या मध्ये करून दाखवा पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात तेही जास्त गर्दी करून,” असा टोला दीपाली सय्यद यांनी मनसेला लगावला आहे.

राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येत श्रीराम यांच्या दर्शनाला जाणार आहे. त्यांच्यासोबत राज्यातील विविध भागातील मनसैनिक जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजपासून अयोध्येत जाण्यासाठी नोंदणी सुरू केली आहे. या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास ८ ते १० हजार नागरिकांची नोंदणी होण्याची शक्यता असल्याचे, मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले.

“आज आणि उद्या राज ठाकरे पुणे दौर्‍यावर आहेत. त्या दरम्यान शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करणार आहेत. तर औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी सांगितल्यानुसार राज्यातील अनेक भागात येणार्‍या काळात सभा घेतल्या जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही २१ ते २७ मे दरम्यान पुण्यात सभेच नियोजन केले आहे. त्या दृष्टीने शहरातील २० ठिकाणे पोलिसांना सांगितली आहेत. पुण्यात सभा केव्हा घेतली जाईल,याबाबत उद्या राज ठाकरेच जाहीर करतील,” असेही वागसकर यांनी सांगितले.

अमेठी जिंकली, आता बारामती ही काबीज करू – स्मृती इराणी यांचे स्पष्ट संकेत (व्हिडीओ)

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत काल झालेल्या कार्यक्रमात पर्त्येक वक्त्याने राष्ट्रवादी च्या निदर्शनाची दाखल आपल्या वक्तव्यातून घेतली, स्मृती इराणी म्हणाल्या ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला अमेठीतून लढण्याची संधी दिली आणि मी राहुल गांधींचा पराभव करू शकले. आता ‘ए’ फॉर अमेठी आणि ‘बी’ फॉर बारामती होते, हे शहा जाणतात,’ असे सांगून केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पुढचा मोर्चा बारामतीकडे वळवणार असल्याचे संकेत देऊन अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले.शिवानंद द्विवेदी लिखित व ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर यांनी अनुवादित केलेल्या ‘अमित शहा आणि भाजपची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन इराणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात पुण्याचे खासदार गिरीश बापट,भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय,माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश बिडकर ,राजेश पांडे सिद्धार्थ शिरोळे ,संदीप खर्डेकर ,मुरलीधर मोहोळ यांच्यासह पक्षाचे आमदार, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.’अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप मशिन नाही, तर एक मिशन आहे. हेच मिशन हाती घेऊन आम्ही राहुल गांधींच्या अमेठीच्या घरात घुसलो. लोकशाहीद्वारे लढलो आणि त्यांचा पराभव केला. आणि पुन्हा पुन्हा हेच करीत राहू. अमित शहा यांनी आदेश दिला, तर जे अमेठीत घडले ते बारामतीतही होईल. त्यांचा आदेश शिरसावंद्य,’ असे म्हणत स्मृती इराणींनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबीयांना आव्हान दिले. ‘अमित शहा यांना मिळत असलेले यश पाहण्याआधी त्यांनी केलेला संघर्ष लक्षात घ्या. ९० दिवस तुरुंगात राहणारा, दोन वर्षे घरापासून लांब राहणाऱ्या व्यक्तीने आपली विचारधारा आणि संघटनेबद्दलची आस्था कधी सोडली नाही. त्यांच्या यशस्वी होण्यामागे हाच संघर्ष कारणीभूत आहे. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला लक्षात ठेवून निवडणुकांचे सूक्ष्म नियोजन केल्याने हे यश पाहायला मिळत आहे,’ असेही इराणी म्हणाल्या.’शहराची संस्कृती बिघडवू नका, अन्यथा…’स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान निदर्शने करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी थेट आव्हान दिले. ‘उठसूठ आमच्या नेत्यांच्या दौऱ्यांच्या वेळी आंदोलने करू नका, हे वेळीच थांबवा; अन्यथा आम्हीही गप्प बसणार नाही,’ असा इशारा पाटील यांनी दिला. ‘आंदोलने करायचीच असतील, तर ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करा. नाही तर मग काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’चे नेतेही सारखे पुण्यात येतच असतात. मग जे होईल त्याला आम्ही जबाबदार नसू,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाना भानगिरे मिळविणार विकास कामांसाठी १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी

पुणे-शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी – कौसरबाग व नवीन प्रभाग क्रमांक ४६ महंमदवाडी -उरुळी देवाची मधील विविध विकास कामांसाठी सुमारे १६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.ठाणे येथे मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी निधीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

माजी नगरसेवक नाना भानगिरे म्हणाले की केवळ निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक लोकोपयोगी विकास कामे रखडलेली आहेत. या रखडलेल्या विकास कामांना गती मिळावी यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे. सर्वे नंबर ५५ मधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान, सर्वे नंबर ७३ मधील महात्मा ज्योतीराव फुले जलतरण तलाव ,डॉ. दादा गुजर शाळेजवळील पाझर तलाव येथील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तसेच प्रभाग २६ मधील रस्ते आणि नवीन प्रभाग क्रमांक ४६ मधील हांडेवाडी, होळकरवाडी,औताडेवाडी ,शेवाळेवाडी ,
पिसोळी,वडाचीवाडी, उरुळी देवाची येथील विविध प्रकारच्या विकास कामांसाठी या निधींची मागणी केली असून मंत्री एकनाथ शिंदे यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत प्रधान सचिव यांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

“महंमदवाडी येथील न्याती गार्डनच्या शेजारील अमेनिटी स्पेसवर महानगरपालिकेने हॉस्पिटल चे आरक्षण टाकले होते सदर आरक्षण रद्द करून त्याठिकाणी गार्डनचे आरक्षण टाकून गार्डन व्हावे तसेच ससाणेनगर वरून हांडेवाडीकडे जाताना बंद असलेले रेल्वे गेट क्रमांक ७ व भुयारी मार्ग करत असताना जागा मालक,शेतकरी,घर मालक,दुकान मालक यांना त्यांचा योग्य तो मोबदला मिळाला नाही. तो योग्य मिळावा यासाठीही मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले आहे. या सर्व मागण्यांसाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.”
– प्रमोदनाना भानगिरे (माजी नगरसेवक, शिवसेना)

पुरोगामी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने भाजप-शिवसेना युतीची गरज! भाजप नेते आनंद रेखी यांचे प्रतिपादन

पुणे -हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीबा फुले,राजर्षी छत्रपती शाहु महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला विकासाची गती देण्यासाठी खऱ्या अर्थाने भाजप-शिवसेना युतीची नितांत गरज आहे.गेल्या दोन दशकांहून अधिक काळ एकमेकांसोबत असलेल्या या हिंदुत्ववादी पक्षांनी आपआपली जबाबदारी ओळखून राज्य हितासाठी एकत्रित येणे आवश्यक आहे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमधून अधोरेखित होत आहे, असे प्रतिपादन भाजप नेते आनंद रेखी यांनी मंगळवारी केले.

हिंदुह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कणखर नेतृत्वामुळेच २५ वर्ष युती टिकली,रुजली. या नेत्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे युतीला जपले, जोपासले. पंरतु, काळालाही विकासासाठी भाग पाडणाऱ्या या समविचारी पक्षांची युती तुटल्यापासून राज्याची प्रगती मंदावला आहे. महाविकास आघाडी सारखा प्रयोगात्मक युतीतून सर्वसामान्यांची फसगत झाल्याचे चित्र उभे झाले आहे. अशात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रवासियांच्या मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन रेखी यांनी यानिमित्ताने केले.

गेल्या दोन दशकांपर्यंत सोबत असलेल्या पक्षांच्या नेत्यांनी आता एकमेकांवर चिखलफेक करीत इतरांची करमणूक करणे बंद करावी.या पक्षांनी आता एकत्रित येवून विकास कामांचा धडाका लावला पाहिजे. अनेक कामे खोळंबली आहे.महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला आयती सत्ता मिळाली आहे. अशात ठाकरे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी पुन्हा गळाभेट घेवून नव्याने राज्यकारभार सुरू करावा. राज्याच्या विकासाला वेग द्यावा आणि जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांपासून त्यांना मुक्त करण्याचे आवाहन रेखी यांच्यावतीने करण्यात आले आहे. हे दोन्ही समविचारी पक्ष एकत्रित राहील्यास राज्याचा कसा विकास होतो, हे भाजप-शिवसेना युतीच्या कारभारावरुन दिसून येते.त्यामुळे या दोन्ही पक्षांनी झाले-गेले विसरुन जात एकत्रित यावे,अशीच मतदारराजांची इच्छा आहे, असे रेखी म्हणाले. 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांना मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शाह आणि भाजपाची वाटचाल” या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार असताना या कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात आलेल्या प्रमुख पाहुण्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली तेव्हा या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भस्मराज तिकोणे (रा. कसबा पेठ, पुणे), प्रमोद कोंढरे ( रा. नातूबाग, पुणे) आणि मयूर गांधी (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी महिला पोलिसांना देखील धक्काबुकी झाली होती .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन सुरु होते. यावेळी स्मृती इराणी यांना वाढत्या महागाई आणि घरगुती गॅसच्या किमतीबाबत राष्ट्रवादीच्या महिला निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या या तीन कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच साडीचा पदर ओढून अश्लील हातवारे केले. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे दिसत होते. “मोदी सरकार हाय…मोदी सरकार मुर्दाबाद” अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या होत्या.

‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ने दुमदुमला आसमंत

पुणे : सप्तसूरातून उमटलेल्या ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’च्या नादाने अवघा आसमंत दुमदुमला. भन्तेनी केलेली धम्म वंदना, गायनातून सादर झालेला बुद्ध-भीमाचा महिमा यामुळे सोमवारची रम्य पहाट उजळून निघाली. प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या सुरेल गायनाने गौतम बुद्धांना स्वरांतून मानवंदना देण्यात आली. मिलिंद यांच्यासह मयूर शिंदे व सहकाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणाने बुद्ध उपासकांना मंत्रमुग्ध केले. भन्ते नागघोष यांनी धम्म वंदना करत ‘बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि’चा जयघोष केला.
बुद्ध जयंतीच्या (बौद्ध पौर्णिमा) निमित्ताने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ‘धम्म पहाट’ महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी संयोजक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) संचालक धम्मज्योती गजभिये, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ अंकल सोनवणे, किरण सुरवसे, विठ्ठल गायकवाड, बंडगार्डनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आदी उपस्थित होते.
‘प्रथम नमो गौतमा चला हो’ या गीताने धम्म पहाटची सुरवात झाली. ‘वैशाखी पौर्णिमेला बुद्ध आले जन्मास’, ‘विश्व तारण्या महामानव बुद्ध आले जन्मा’, ‘महाकारुनी तथागताला त्रिवार हि वंदना’, ‘नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा’, ‘माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का’, दोनच राजे इथे गाजले, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर’, ‘कालच्या महार वाड्याच भिमनगर झालंय गं’ अशी एकापेक्षा एक भारी गीते सादर केली. दीपक म्हस्के यांच्या समर्पक व ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. अमोल जाधव, गणेश मोरे, राधिका अत्रे आदींनी साथसंगत केली. दिप किरण यांनी संगीत दिले.
परशुराम वाडेकर म्हणाले, “गेली १६ वर्षे हा धम्म पहाट कार्यक्रम घेतला जातो. कोरोनामुळे दोन वर्षे हा कार्यक्रम प्रत्यक्ष होऊ शकला नाही. यंदा मोठ्या उत्साहात ही धम्म पहाट होत आहे. जगाला बुद्धांनी दिलेली प्रज्ञा, शील, करुणा व शांततेची शिकवण आणि आंबेडकरांनी दाखवलेला प्रगतीचा मार्ग यावर आपण वाटचाल केली पाहिजे.” शेकडो बुद्ध उपासकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून बुद्ध पूजा व त्रिसरण पंचशील घेत बुद्धांच्या विचारांना वंदन केले.