Home Blog Page 1994

नागपूरमधील विकास आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार यावर किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर प्रसारमध्यमांसमोर बोलण्याची तयारी – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. १६ मे – माझी किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर प्रसारमाध्यमांसमोर चर्चा करण्याची तयारी आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नागपूरचा सर्वांगीण विकास झाला, त्याउलट अनेक ठिकाणी मुंबई महापालिकेत विकासाच्या नावावर जो भ्रष्टाचार झाला, यावर चर्चा करण्याची तयारी आहे, असे खुले आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माजी महापौर किशोरी पेडणकेर यांना दिले.
मुंबईची काळजी करू नका, नागपूर आणि पुण्यात भ्रष्टाचार जास्त आहे, तिथे जरा लक्ष द्या, असे वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नागपूरमद्धे मागाहून सुरू झालेली मेट्रो चालू झाली. आणि मुंबईत देवेंद्रजींनी अंतिम टप्प्यात आणलेली मेट्रो तुम्ही सुरू करू शकला नाहीत. कारशेडचे आपण राजकारण केले. अहंकारातून भांडुपला नेले. पण कारशेड होऊ शकली नाही. अशा प्रकारच्या शेकडो गोष्टी आहेत, ज्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत आपल्याला करता आल्या नाहीत. म्हणून देवेंद्रजींनी मुंबईच्या विकासासाठी आपण जे भकास केलेय ते दुरुस्त करण्याची आणि लक्ष घालण्याची वेळ आली आहे. पाच वर्षाच्या कालावधीत मुंबईला प्रकल्पांचा विकास जो देवेंद्रजींनी दाखवला तो मुंबईकरांना माहीत आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

” महागाई ची राणी, स्मृती इराणी” घोषणांनी JW मेरियट दणाणले…

पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना वाढत्या महागाईचा जाब विचारायला जबरदस्त आंदोलने शहरात केली . पहिलेच आंदोल जिथे स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरु होता त्या जे डब्ल्यू हॉटेल च्या प्रवेश दारातच झाला राष्ट्रवादीचे सारेच आक्रमक चेहरे येथे पोहोचल्याने कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली पण दरवाजात या सर्वांना पोलिसांनी अडवून ताब्यात घ्यायला सुरुवात केली. यावेळी पोलीसानाचा निषेध नेत्यांनी केला .हे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जेष्ठनेंते अंकुश काकडे,वैशाली नागवडे,प्रदीप देशमुख,बाळासाहेब बोडके,निलेश निकम, किशोर कांबळे,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,उदय महाले,गणेश नलावडे,विक्रम जाधव,मानली भिलारे,राजू साने, कार्तिक थोटे , अनिता पवार,वैशाली थोपटे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले कि,’२०१४ साली अवघ्या ५ रुपयांनी गॅस सिलेंडरची किंमत वाढून ३६५ रुपये झाल्याने रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या परंतु आज भाजप सरकारच्या काळात तब्बल १००२ रुपये गॅस सिलेंडर होऊन देखील चकार शब्द देखील न काढणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सेनापती बापट रोड येथे आंदोलन घेण्यात आले.
स्मृती इराणी आज एका पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे शहरात आल्या असता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गावर काळे झेंडे दाखवत , घोषणा देत स्मृती इराणी यांचा निषेध केला. याप्रसंगी ” महागाई ची राणी, स्मृती इराणी” , ” स्मृती भाभी जवाब दो” , ” बहुत हुई महागाई की मार,चले जाओ मोदी सरकार” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी बोलतांना शहराध्यक्ष .प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील प्रत्येक कुटुंब महागाईच्या झळा सोसत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र याची दखल घेत दिलासा देण्यास तयार नाही.अश्या परिस्थितीमध्ये ज्या अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या महागाई विरोधी अभिनयावर विश्वास ठेवत ज्या सर्वसामान्य नागरिकांनी २०१४ मध्ये भाजपला मतदान केले त्या नागरिकांना स्मृती इराणी यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु गेल्या ७ वर्षात गॅस सिलेंडरची किंमत ३६५ वरून तब्बल १००२ वर गेल्याने नागरिकांचा मोदी सरकार वर रोष असल्याचे आजच्या आंदोलनात पाहायला मिळत आहे.२०१४ साली याच भाजपने तत्कालीन पंतप्रधानांना महागाई साठी दोषी ठरवत बांगड्या पाठवल्या होत्या आज मात्र तत्कलिन परिस्थिती पेक्षा कितीतरी जास्त महागाई झाल्याने आजच्या पंतप्रधानांना देखील तीच भेट देण्याची वेळ आली आहे.”

नदी सुधार प्रकल्प एक फसवा अन पर्यावरणाचा जीवघेणा प्रकल्प

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या वतीने आयोजित नदी सुधार योजना विषयावरील चर्चासत्राला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पालिकेचे अधिकारी, सल्लागार,पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्थांनी या चर्चासत्रात मते मांडली. शहराला प्रदूषणामुळे नदीकडे पाठ फिरवावी लागू नये,नदी सुधार म्हणजे पोरखेळ होऊ नये , असा सूर चर्चासत्रात उमटला.
पुणे पालिकेतर्फे  प्रकल्प अधीक्षक अभियंता युवराज जगताप यांनी नदी सुधार योजनेचे सादरीकरण केले.  प्रकल्पाचे सल्लागार गणेश आहिरे ( अहमदाबाद ) , पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी सादरीकरणे केली.
तज्ज्ञांची मते लक्षात घ्या : खा. वंदना चव्हाण

संयोजक खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘ पुण्याची नदी जीवित राहिली पाहिजे. प्रदूषित होता कामा नये.मल: निस्सारण योजना शंभर टक्के क्षमतेने चालू नाहीत. नागरिक म्हणून आपल्या पालिकेकडे अपेक्षा आहेत. नागरिक म्हणून आम्ही पालिकेला सहकार्य करायला तयार आहोत. स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञांची मते पालिकेने विचारात घेतले पाहिजे. लोकसहभाग आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था विरुद्ध पालिका असे चित्र उभे राहता कामा नये.
जायका योजनेतून पाणी स्वच्छ झाले पाहिजे. पण, धरणांच्या कडेच्या गावातून प्रदूषित पाणी मिसळले जात आहे. नदीकडे पाठ करावी लागता कामा नये. नदी सुधार योजनेनंतर पुराची स्थिती येता कामा नये.पूररेषा वाढलेली आहे, पण नकाशात ती रेषा आत आलेली दिसते.नीलेश नवलखा यांना सूत्रसंचालन केले.नितीन कदम यांनी तुळशीची रोपे देऊन  स्वागत केले.गोपाळ तिवारी यांनी आभार मानले
सभागृहात प्रशांत जगताप,  राजलक्ष्मी भोसले, अभय छाजेड,उज्ज्वल केसकर,गोपाळ तिवारी, आमदार सुनील टिंगरे,दीपाली धुमाळ, नीता परदेशी, प्रशांत बधे,विवेक वेलणकर, नरेंद्र चुघ, शिवा मंत्री, डॉ. सतीश देसाई, डॉ. सुनील जगताप, अश्वीनी कदम, मीनल सरवदे , नंदा लोणकर, शिवसेनेचे डॉ. अमोल देवळेकर, मनसेचे योगेश खैरे, संतोष पाटील, पालिकेचे अधिकारी मंगेश दिघे   उपस्थित होते.
पुणे पालिकेचे प्रकल्प अधीक्षक अभियंता युवराज देशमुख म्हणाले,नदी सुधार योजना आणि जायकाचा नदी शुध्दीकरण प्रकल्प एकाच वेळी सुरू होत आहे.
नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत. मलः निस्सारण प्रकल्प तपासावे लागणार आहेत. नदी सुधार योजनेत वेगवेगळे शास्त्रीय सर्वेक्षणे करताना नागरिकांची मतेही नोंदवली आहेत. या प्रकल्पाला पर्यावरण खात्याची परवानगी आहे.
पालिका स्वयंसेवी संस्थांना उत्तरदायी राहण्याचा प्रयत्न करीत आले आहे.
नदी सुधार प्रकल्प हा पुनरुज्जीवनाचा प्रकल्प : सल्लागार गणेश अहिरे

नदी सुधार योजनेचे सल्लागार गणेश अहिरे  (अहमदाबाद )म्हणाले, ‘ शहरीकरणामुळे नदीवर परिणाम होत आहे. प्रदूषित नदी पूर्ववत करायला खूप प्रयत्न करावे लागणार आहे. शहरात ४४ किलोमीटरची नदी आहे.कचरा, प्रदूषित पाण्यापासून नदी वाचवण्याचा प्रयत्न  सुधार योजनेत केला जाणार आहे. पुराचा धोका कमी केला जाणार आहे. नागरिकांना फिरता येईल अशा जागा असणार आहेत.व्यावसायिक बांधकामे नसतील.
परिसंस्था, जैवविविधता  जपण्याचा प्रयत्न होणार आहे. हा सर्वंकष, परिपूर्ण असा नदी पुनरूज्जीवनाचा प्रकल्प ७६८ हेक्टरवर असणार आहे. जुने घाट, मंदिरे, वारसा स्थळे जपले जाणार आहेत
आपल्या अस्तित्वासाठी नदी जपा   : सारंग यादवाडकर

सारंग यादवाडकर म्हणाले, ‘ गुजरातचे दौरे गुप्तपणे झालेत ,प्रकल्पाचे टेंडर निघाले आहे. तरी पालिकेचे अधिकारी सल्लागाराच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काम करत आहे. पुणे हे पूरप्रवण शहर आहे. एक दोन तासात पुराचा फटका बसून जातो. प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे. नदी प्रदूषणाचा दुष्परिणाम उजनीकाठच्या लोकांना, जनावरांना भोगावे लागत आहेत. नदी सुधार योजनेनंतरही प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी नदीत मोठया प्रमाणात येणार आहेत. आताचे चार पूल पाडल्यावर दैनंदिन जीवन नीट चालेल का?७ पूल उंचावण्याचे तंत्र आपल्याकडे आहे का ?
ढगफूटी, अतीवृष्टीच्या वाढणाऱ्या पुराचा विचार या नदी सुधार प्रकल्पात करण्यात आलेला नाही. या प्रकल्पानंतरही पूर पातळी ५  ते १७ फुटाने वाढणार आहे. या प्रकल्प आरेखनात गंभीर चुका आहेत. कृत्रिम भरावामुळे वहनक्षमता धोक्यात येणार आहे, ज्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.
हायड्रोलिक स्टडी चुकीचा आहे.पर्यावरण परवानगी मिळणे धक्कादायक आहे. नदीत काँक्रिटायझेशन व्हायला  नको.नद्या कशा  हव्यात, हे नागरिकांनी ठरवायला हवे, ते शास्त्रीय पध्दतीने व्हायला हवे.

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडलेल्या ‘पोटरा’ चित्रपटातील छकुली देवकरला एक लाखाची मदत

0

मुंबई, दि. १६- यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली देवकर हिच्या घरच्या बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीची माहिती कळताच तिला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार छकुलीला तात्काळ एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी आज केली.

मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या हेतूने दरवर्षी राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फ्रान्स येथे पाठविले जातात. यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली प्रल्हाद देवकर (वय १५ वर्षे) हिचा ‘पोटरा’ हा पहिला चित्रपट असून यापूर्वी तिने कोणत्याही चित्रपट अथवा नाटकात भूमिका केलेली नाही. तिला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ मध्ये उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावची रहिवासी असलेल्या कु. छकुलीच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आणि हलाखीची आहे. तिच्या कुटुंबियांना राहण्यास स्वतःचे घर नसून गावातील एका फाटक्या झोपडीत छकुली आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. तिचे वडील आजारी असून ते अंथरुणावर पडून असतात आणि आई मोलमजुरी करते, ही माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना कळताच त्यांनी छकुलीला आर्थिक मदत देऊन तिच्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी पुढील शिक्षणाचे नियोजन करण्याचे निर्देश चित्रनगरी प्रशासनाला दिले होते. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चित्रनगरी प्रशासनाने तात्काळ पावले उचलत छकुलीला एक लाख रुपयांचा धनादेश आणि अभिनय क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी तिच्या कुटुंबियांच्या सल्ल्याने महामंडळाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी आज जाहीर केले.

शेतकऱ्यांच्या डाळिंबबागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.१६- डाळिंब फळावरील खोड भुंगेरा नियंत्रणासाठी कृषि विभागाने विशेष प्रयत्न करावे. यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे याकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

विधान भवन येथे आयोजित पुणे विभागीय खरीप हंगाम-2022 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले,ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. या कार्यक्रमाला गती देण्यासाठी सहकार विभागानेही पुढाकार घ्यावा. ‘विकेल ते पिकेल’ योजनेअंतर्गत मागणी असलेल्या पिकांना प्रोत्साहन द्यावे. बीडच्या धर्तीवर पीक विमा योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात आली आहे. पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना फायद्याचा निर्णय घेण्यात येईल, यासाठी याच आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येईल.

केंद्र सरकारच्या फलोत्पादन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा पुर्ण उपयोग करावा. शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे खते, बियाणे मिळतील, याची दक्षता घ्यावी, यासाठी गुणनियंत्रण पथकाने दक्ष रहावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

जिल्हा परिषदेमार्फत उपयुक्त योजना राबवा

जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना राबविताना शासनाच्या निधीचा विनियोग योग्य कारणासाठी होईल याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक सुधारांच्या कामांवर आणि उपक्रमांवर विशेष लक्ष द्यावे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याविषयीचा आढावा घ्यावा. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा मागील वर्षीचा अखर्चित निधी वापरण्याच्या अनुमतीबाबत विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

श्री. भुसे म्हणाले, बाजारात कुळीथसारख्या पिकांना चांगली मागणी आहे. अशा पिकांना ‘विकेल ते पिकेल’ अभियान अंतर्गत प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना या पिकांमुळे  चांगले उत्पन्न मिळू शकेल. डाळिंबावरील कीड नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. विभागात साडे तेरा लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रासाठी खत आणि बियाणांचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. ऊसाचे जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करावा. गुणवत्ता नियंत्रण पथकाने विशेष दक्षता बाळगावी अशा सूचना त्यांनी केल्या.

केंद्रालाही खत वेळेवर उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. कृषि आयुक्त पातळीवर याबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कृषि अधिकाऱ्यांनी डोंगराळ भागात प्राधान्याने खत व बियाणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांना ७-८ बियाणांचे किट देण्याचा प्रयत्न आहे. जिल्हास्तरावर ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. कृषि विभागाने ५० टक्के महिला शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असल्याने महसूल विभागाने अधिकाधिक महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावले जाईल यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावे,असे आवाहन श्री.भुसे यांनी केले.

बैठकीला पुणे विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्यातील कृषि संचालक आणि विभागातील कृषि विभागातील  अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सिंगल सुपर फॉस्फेट खतविषयक जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी सदारीकरणाद्वारे खरीप हंगाम २०२२-२३ साठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली. पुणे विभागात ३१ हजार ३७० मे.टन खतांचे नियोजन करण्यात आले असून १४ हजार ३६६ मे.टन साठा संरक्षित करण्यात आला आहे. ४९ हजार ४२७ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. यावर्षी ६४ भरारी पथके स्थापन करण्यात आले असून ६९ तक्रार नियंत्रण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली असून ११७७ शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. विभागात खरीप पीक कर्जासाठी १० हजार २०२ कोटींचा लक्षांक ठेवण्यात आला  असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते; जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्याचे उद्घाटन

पुणे दि.१६: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिरूर तालुक्यात करंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. शिरूर तालुक्यातील गावातील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही श्री. वळसे पाटील यांनी यावेळी दिली.

श्री.वळसे पाटील यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील विविध गावांत विकासकामांची उद्घाटने करण्यात आली. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबन ढोकले आदी उपस्थित होते.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील गावांमध्ये बंधाऱ्याची कामे गतीने हाती घेण्यात येतील. नवीन बंधाऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. धामारी गावातील सभामंडपासाठीही आर्थिक तरतूद करण्यात आली असून विविध विकास कामांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवत शासनाचे काम सुरू  आहे. आपल्या गावचा सर्वांगिण विकास झाला पाहीजे, यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. गावातील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही ते म्हणाले.

पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे आरओ प्रकल्प व थेट दर्शनसेवेचा शुभारंभ

पुणे दि. १६: पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान  पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आरओ प्रकल्पयुक्त पाणपोई व जगद्गुरु तुकोबारायांच्या थेट डिजिटल दर्शन सेवेचा शुभारंभ  करण्यात आला.

  यावेळी आमदार सुनील  शेळके, उद्योगपती दिना धारिवाल, प्रकाश धारिवाल, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितिन महाराज मोरे, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, विश्वस्त संदीप राक्षे, स्मिता चव्हाण व देहूचे ग्रामस्थ उपस्थित होते.

         राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, एलईडी पटलाच्या माध्यमातून भाविकांना  जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे  दर्शन घेता येईल.  कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षात आषाढी पालखी सोहळा  झाला नव्हता. यंदा मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरीच्या वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे सर्वच भाविकांना दर्शन घेता येत नाही. त्यामुळे नवी सुविधा उपयुक्त ठरेल. पाणपोईच्या माध्यमातून भाविकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात मिळू शकेल. अशी सेवा देणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

         संत तुकाराम महाराजांचे शिल्प इंद्रायणी नदीत उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी  आवश्यक  प्रस्ताव सादर करण्यात यावा. भाविकांची वाढती संख्या पाहून भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

             आमदार शेळके  यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेली असते रणरागिणीदिलीप देशमुख यांचे मत; वंचित विकास संस्थेतर्फे अभया सन्मान सोहळा

पुणे : “अहिल्याबाई होळकरांनी राज्य राखले, राणी लक्ष्मीबाई स्वबळावर लढल्या. या सन्मानित महिला या आपल्या आयुष्यात अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाईचेच रूप आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये एक रणरागिणी दडलेली असतेच,” असे मत निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप देशमुख यांनी व्यक्त केले.
परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या तेजस्विनीना वंचित विकास संचालित अभया मैत्रिगटाच्या वतीने अभया सन्मानाने गौरविण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या स्वाती दुधाले, वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले, माया भांगे उपस्थित होते.
अर्चना धडे, दिपा पांडे, मनीषा पांढरे, सुनीता शहा, शोभा चितळे, वनमाला भिसे, प्रभा शिवणेकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळात लढवय्या वृत्तीने परिस्थितीशी सामना करत उद्योजकता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 
दिलीप देशमुख म्हणाले, “पुणे संकल्पनांचे शहर आहे. इथे नवनवीन संकल्पना घेऊन लोक पुढे येतात आणि त्या तडीस नेतात. अशा लढवय्या महिलांवर पुस्तक काढायला हवे. प्रत्येक महिलेचा प्रवास प्रेरणादायी आहे. वंचित विकास संस्थेचा हा उपक्रम महिलांना सन्मानाने जगण्याची दिशा दाखवणारा आहे.”

स्वाती दुधाले म्हणाल्या, “पुणे आणि परिसरातील महिलांसाठी उद्योजिका प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे. महिला सक्षमीकरणात ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे महत्वाचे असते. महिलांनी आर्थिक व्यवस्थापन व खंबीर मानसिकतेच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.”

पुरस्काराला उत्तर देताना शोभा चितळे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासारख्या पीडित बंधू-भगिनींना समर्पित करते. समाजमनात प्रबोधन करण्याची खूप गरज आहे.” देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

महागाई विरोधातील लोकक्षोभ दडपता येणार नाही ;रमेश बागवे आणि मोहन जोशींचा इशारा

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम स्थळा समोर लोकशाही मार्गाने निदर्शने

पुणे- बालगंधर्व रंग मंदिरात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आल्या असताना याच चौकात कॉंग्रेसचे रमेश बागवे आणि मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पण लोकशाही मार्गाने निदर्शने करण्यात आली . तिरडी आंदोलन प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, “ज्या पद्धतीने आमच्या महिला कार्यकर्त्यांना अटक केले आहे ते निषेधार्ह आहे. लोकांच्या भावना व प्रश्न ऐकून न घेता मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने दडपून टाकू पाहत आहे. पण जन भावना अशी दडपली जाणार नाही तर ती आणखी भडकेल तेव्हा सरकारने वेळीच शहाणे व्हावे आणि महागाई विरोधात तातडीने पावले उचलावीत “

महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व कार्यकर्त्यांना पोलिसांनी केल्याच्या अटकेचा निषेध करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, “केंद्र सरकारची ही दडपशाही निषेधार्ह असून याविरोधात काँग्रेस पक्ष गल्ली ते दिल्लीपर्यंत आवाज उठवेल. यापुढे लोकांचे प्रश्न घेऊन काँग्रेस लोकांची आवाज बनून मोदी सरकारला धडा शिकवेल. मोदी सरकार जनतेचा आवाज दाबून राज्य करु पाहत आहे.”यावेळी पुणे शहर महिला काँग्रेस, पुणे शहर जिल्हा काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज सकाळी १२.०० वाजता JW मेरियट हॉटेल येथे पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी चूल व देश चालविण्यासाठी पंतप्रधान मोदी अयशस्वी असल्याने स्मृती ईराणी यांच्या मार्फत त्यांना बांगड्या भेट म्हणून देण्यासाठी गेलेल्या पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. पूजा आनंद यांच्यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले.

जवळपास ५ तास डिटेन केल्यानंतर पोलिसांकडून पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. पूजा मनिष आनंद व कार्यकर्त्यांना सोडून दिले. त्यानंतर पुणे शहर महिला काँग्रेस व पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय जोमाने सायंकाळी ४.३० वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत बालगंधर्व रंगमंदिरासमोर तिरडीवर गॅस बांधून गॅसची तिरडी यात्रा काढली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व घोषणा दिल्या. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात ‘हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी,स्मृती जी याद हैं ना?, हम सब एक है नरेंद्र मोदी फेक है अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.

यावेळी बोलतांना पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ.पूजा आनंद म्हणाल्या, “देशातील महागाईच्या विरोधात लढताना व जनतेचे प्रश्नांवर काम करतांना पोलिसांनी अशा प्रकारे ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या धोरणानुसार आम्ही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही जनतेच्या प्रश्नांवर लढत राहू. यासाठी पोलिसांनी आम्हाला शंभरवेळा जरी अटक केले तरी आम्ही तयार आहोत. लोकशाहीमार्गाने व गांधीजींच्या सत्याग्रहाद्वारे, जनतेला सोबत घेवून मोदी सरकारची हुकूमशाही आम्ही मोडून काढू.”

ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे ही देशाच्या प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी – केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी

0

मुंबई, 16 मे 2022

आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यामध्ये स्वारस्य दाखवणे आणि जबाबदारी घेणे ही देशाच्या प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे असे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज सांगितले. केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकासमंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते मुंबईत कान्हेरी गुंफा परिसरात विविध सोयीसुविधांचे उद्‌घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते.

सार्वजनिक खाजगी भागीदारी, कॉर्पोरेट्स, स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाज आपल्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण, जतन करण्यात आणि तो पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे जेणकरून भावी पिढ्यांना हा खजिना उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. आपण सर्वांनी एकत्रितपणे आणि या क्षेत्रातील तज्ञ आणि विद्वानांसोबत मिळून काम केले पाहिजे जिथे ऐतिहासिक वारसा विकासाला चालना देणारा घटक बनू शकेल असेही त्यांनी नमूद केले. कान्हेरी गुंफा उत्क्रांतीचा आणि आपल्या इतिहासाचा दाखला देत असल्याने त्या आपल्या प्राचीन संस्कृतीचा भाग आहेत. या ठिकाणी विविध कामांचे उद्‌घाटन बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करणे म्हणजे मोठा बहुमान आहे, अशी भावना जी. किशन रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्रात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित सुरू असलेली कामे अधिक गतीने करण्यात येतील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वनक्षेत्र, भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्याशी संबंधित विविध कार्यालय तसेच राज्य आणि केंद्र सरकारने मिळून एकत्रितपणे काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कान्हेरी गुंफा ययेथील उत्कृष्ट रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या व्यवस्थेचे कौतुक करत जनतेला पाण्याचं महत्त्व विशद करत पाणी सुरक्षिततेसाठी आवाहन केलं. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातल्या 286 वारसा स्थळांचा सांभाळ केला जात असून या ठिकाणच्या कार्याचा आढावा, राज्य सरकार, पुरातत्त्व विभाग, सांस्कृतिक विभाग आणि संबंधितांशी घेतला जात असल्याचं ते म्हणाले.

कान्हेरी गुंफा येथील सुविधा विषयी

  • सध्या अस्तित्वात असलेल्या व्हिजिटर पॅव्हिलियन, कस्टोडियन क्वार्टर, बुकिंग ऑफिस यांसारख्या इमारतींची डागडुजी करण्यात आली आणि नव्या सुविधा निर्माण करण्यात आल्या. बुकिंग काउंटर ते कस्टोडियन क्वार्टरपर्यंतच्या भागात विविध झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले.
  • या गुंफा वनक्षेत्राच्या अंतर्गत भागात असल्याने वीज आणि पाणीपुरवठा उपलब्ध नाही, मात्र सौरविद्युत प्रणाली आणि जनरेटरच्या पर्यायाच्या माध्यमातून वीज तर कूपनलिका बांधून तिच्या मदतीने पाणी उपलब्ध करण्यात आले.
  • इथे सुंदर मोकळी जागा आहे  आणि खडकापासून बनलेले बाक आहेत ज्यावर बसून तुम्ही निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
  • इंडियन ऑईल फाउंडेशन आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार इंडियन ऑईल फाउंडेशन कान्हेरी गुंफांच्या परिसरात राष्ट्रीय संस्कृती निधीच्या माध्यमातून पर्यटन सुविधा उपलब्ध करत आहे.

जग भारताकडे अफाट संधींचा देश म्हणून पाहत आहे – केंद्रीय मंत्री पियुष गोयल

पुणे-

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष  गोयल यांनी तरुणांना भारताच्या समस्यांवर उपाय शोधून अभिनव संशोधन करण्याचे आणि चिरस्थायी वारसा मागे ठेवण्याचे आवाहन केले.

आज पुण्यातील भारती विद्यापीठात दीक्षांत समारंभात भाषण देताना गोयल म्हणाले की, जग भारताकडे अफाट संधींचा देश म्हणून पाहत आहे तसेच कुशल मनुष्यबळ, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रात भारत करत असलेल्या नेतृत्वाची दखल घेत आहे.  “आपल्यापैकी प्रत्येकासाठी अनेक  बाबतीत इथे रहायला मिळणे ही सौभाग्याची गोष्ट आहे.  आता आपण जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडू ,” असे ते म्हणाले.

आपल्या भाषणात त्यांनी  विद्यार्थ्यांना नवीन संधींचा  शोध घेण्यासाठी आणि नवीन कल्पना राबवण्यासाठी  प्रोत्साहित केले. “चाकोरीबाहेरचा विचार करा! आज नवीन कल्पनांसाठी, उद्योजकतेसाठी दरवाजे खुले आहेत,” असे त्यांनी  विद्यार्थ्यांना सांगितले.

वाहनांमधील हाय-बीम हेडलाइट्समुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्याची कल्पना  घेऊन आलेल्या तरुणांच्या गटाशी झालेल्या संवादाचा अनुभवही त्यांनी सामायिक  केला.  ही कल्पना वरकरणी साधी वाटू शकते परंतु त्या उपायामुळे  अपघात टाळता येऊ  शकतात किंवा जीव वाचवता येऊ  शकतात.

अनेक स्टार्टअप्स  सोप्या आव्हानांवर उपाय शोधत असल्याची  आणि युनिकॉर्न्स म्हणून यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे देखील गोयल यांनी सांगितली “एक साधी कल्पना किंवा उपाय स्टार्ट-अपचे  बीज रोवू  शकतो” असे  ते पुढे म्हणाले.

या धर्तीवर नवीन शैक्षणिक धोरण कसे आखले आहे , जे विद्यार्थ्यांना वेगळा विचार करण्यासाठी  प्रवृत्त करते याबद्दलही त्यांनी  सांगितले. “नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येकाला प्रयोग करण्यास आणि नवीन कल्पना शोधण्यास  प्रोत्साहन देते,” असे ते म्हणाले.

गोयल यांनी भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांना आदरांजली वाहिली. डॉ.कदम यांचा चैतन्यशील  स्वभाव आणि नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची इच्छा याबाबत आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

“मी तुम्हा सर्वांना देशाचे भविष्य घडवण्यात  सहभागी होण्याचे आवाहन करतो. मी तुम्हाला आवाहन  करतो की कठीण पर्याय निवडा, सोपे निवडू नका.   डॉ. कदम यांच्यासारखा चिरस्थायी वारसा मागे सोडा,” असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले.

कोविड-19 महामारीच्या काळात संस्थेने दिलेल्या योगदानाची गोयल यांनी  प्रशंसा केली.  “तुमच्या डॉक्टरांनी आणि संस्थांनी केलेल्या कार्याबद्दल आणि भारतातील पहिली डीएनए लस विकसित करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल भारतीय लष्कर आणि आरोग्य मंत्रालयाने केलेल्या अभिनंदनाबद्दल  मी तुमची प्रशंसा करतो.

पोलिसांनी पकडून चालविलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीला भाजपच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

महागाई पेटली : राजकीय स्तरावर तरी वादंग …: बालगंधर्व रंगमंदिरातील घटना

पुणे- महागाई विरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या समोर निदर्शने करायला गेलेल्या राष्ट्रवादीच्या आंदोलक महिलांना ताब्यात घेऊन जात असताना एका आंदोलक महिलेला भगवी टोपी घालून आलेल्या एका कार्यकर्त्याने पोलिसांचे कडे भेदून जोरदार फटका लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ यावेळी होत असलेल्या व्हिडीओ शुटींग मुळे हा प्रकार उघड झाला आहे .

राष्ट्रवादीच्या या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे असल्याचे समजते आहे. महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या वैशाली नागवडे आणि राष्ट्रवादीच्या इतर महिला कार्यकर्त्याां बालगंधर्व मंदिरात घुसून घोषणाबाजी करत होत्या. यावेळी भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. पण त्याचवेळी वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली.वैशाली नागवडे यांना कानशिलात लगावण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपच्या एका भगवी टोपी घातलेल्या कार्यकर्त्यांनी वैशाली नागवडे यांच्यावर हात उचलल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

त्याआधी स्मृती इराणी यांचा ताफा बालगंधर्वच्या बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. 

JW मेरीयटच्या दारातच आक्रमक कार्यकर्त्यांच्या फौजेला रोखले : पुणे पोलिसांची चोख कामगिरी

पुणे- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे दौऱ्यात सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मेरीयट येथे उतरल्याचे समजताच येथे महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या आक्रमक कार्यकर्त्यांनी धडक तर दिली मात्र त्यांना हॉटेल मध्ये घुसू न देता पुणे पोलिसांनी चोख कामगिरी बजावली .यातील अनेकांना पोलीस गाडीत बसवून ताब्यात घेऊन नेण्यात आले तर अनेक जणानां आपापले माघारी जावे लागले . या दरम्यान पोलीस दडपशाही करतात असा आरोप करत या कार्यकर्त्यांनी पोलिसांचाही निषेध चालविला होता. अंकुश काकडे , प्रदीप देशमुख, प्रशांत जगताप ,रुपाली पाटील आणि राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज येथे धडकली . महागाईच्या विरोधात प्रचंड नारेबाजी झाली , राष्ट्रवादीचे झेंडे फडकविण्यात येत होते, घरगुती गैस सिलेंडर च्या प्रतीमा हाथी होत्या पण हि सारी नारेबाजी होत असताना पोलिसांनी अगदी सूत्रबद्ध पणे थोडा वेळ यांना नारेबाजी करत येथे रोखून धरले आणि नंतर ताब्यात घेऊन गाडीत बसवून घेऊन गेले.

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

सातारा दि.१६: प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे.  प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही,  त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारा  वितरणाचे वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सत्यजित पाटणकर आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी, घरे दिल्यामुळे कोयना धरणाची निर्मिती झाली आहे.  या निर्मितीमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण, व स्व.बाळासाहेब देसाई यांचेही मोलाचे योगदान आहे. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र प्रकाशमय झाला.  प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील.

मागील जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील काही गावे बाधित झाली आहेत.  या बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा लवकरात लवकर शोधण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.   कोरोना संकटाच्या काळात शासनाने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला होता. राज्याच्या विकासाला गती देण्यात आली असून  विकास कामे करीत असताना त्याचा दर्जा उत्तम राखावा, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोयना धरण दरवर्षी शंभर टक्के भरते.  यातून २  हजार मेगावॉट, वीज निर्मिती केली जाते.  याबरोबर सातारा व सांगली भागातील शेतीसाठी पाणी वापरले जाते, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून धरणाची निर्मिती झाली आहे.  त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची भूमिका  सकारात्मक असल्याचे त्यांनी  सांगितले.

गृहराज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या.  कोयनानगर परिसरात पर्यटन वाढीसाठी विविध विकासकामे करण्यात येत आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौका विहार सुरु करण्याबाबत प्रयत्न आहे.

यावेळी खासदार पाटील, माजी आमदार पाटणकर, डॉ. भारत पाटणकर यांनीही  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव गुप्ता यांनी केले.  या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी  कोयनानगर (चेमरी) येथील कोयनाप्रकल्प नूतनीकृत विश्रामगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते झाले.

एमक्युअर एफओजीएसआयच्या सहकार्याने रक्तक्षय, अशक्तपणा, स्तनपान आणि मासिक पाळीशी संबंधित समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणार

हा उपक्रम भारतातील ८००० क्लिनिक्समधे ९ भाषांत उपलब्ध करत १ कोटी स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय

पुणे, १० मे २०२२– स्त्रियांच्या रक्तक्षयस्तनपान आणि मासिकपाळी यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी औषध उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपनी एमक्युअर फार्मास्युटिकल्सने एमवोकल हा उपक्रम लाँच केला आहे. हा उपक्रम फेडरेशन ऑफ ओबेस्टेस्ट्रिक्स अँड गायनॅकॉलिजिस्ट ऑफ इंडिया (एफओजीएसआय) यांच्या सहकार्याने लाँच करण्यात आला आहे. ऑग्युमेंटेड रिअलिटी (एआर) आणि वैयक्तिक डिजिटल असिस्टंट यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या उपक्रमाने भारतातील १ कोटी स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे. एमवोकल कॅम्पेन नऊ भारतीय भाषांमध्ये (हिंदीइंग्रजीओरियामराठीतमिळतेलुगुकन्नडमल्याळम आणि बंगाली) उपलब्ध केले जाईल.

एमवोकल कॅम्पेनअंतर्गत विविध हॉस्पिटल्स व दवाखान्यांतील वेटिंग एरियामध्ये क्यूआर कोड दर्शवणारे स्मार्ट किऑस्क बसवले जातील. यामुळे डॉक्टरांना भेटण्यापूर्वीच्या दीर्घ प्रतीक्षा काळाचा वापर रुग्णांना माहिती मिळवण्यासाठी करता येईल. हा क्यूआर कोड स्कॅन करणाऱ्या स्त्रियांना ऑग्युमेंटेड रिअलिटी (एआर) व्हिडिओज पाहायला मिळतील. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि वैयक्तिक डिजिटल असिस्टंटचाही त्यात समावेश असेल. रुग्णांना त्यांचे मूलभूत आरोग्य व जीवनशैलीशी संबंधित डिजिटल संवादात भाग घेण्याची विचारणाही केली जाईल. एआर जर्नीदरम्यान वैयक्तिक आरोग्य असिस्टंटतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनामुळे रुग्णांना त्यांच्या समस्या डॉक्टरांना सांगण्यास मदत होईल तसेच डॉक्टरांनी योग्य माहिती असलेले रुग्ण मिळतील.

भारताच्या पाचव्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार (२०१९-२०२१) १५ ते १९ वर्ष वयोगटातील स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण तब्बल ५९.१ टक्के असून ४९ वर्ष वयापर्यंतच्या गर्भवती स्त्रियांमध्ये हेच प्रमाण ५२.२ टक्के आहे. डिजिटल पातळीवर उपलब्ध असलेली माहिती आणि माहितीपर व्हिडिओज यांच्या मदतीने एमवोकल कॅम्पेन रक्तक्षयाबद्दल जागरूकता निर्माण करेल आणि स्त्रियांना त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहन देईल. स्तनपानांच्या फायद्यांविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जात असली, तरी एमवोकल कॅम्पेन स्त्रियांच्या आरोग्यासाठी त्याचे महत्त्व आणि लाभ समजून घेण्यास त्यांना मदत करेल. एमवोकलतर्फे जागरूकता निर्माण केल्या जात असलेल्या विषयांमध्ये मासिक पाळीचे आरोग्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजही भारतात मासिक पाळी हा विषय निषिद्ध मानला जातो आणि त्याविषयी असलेले विविध गैरसमज बदलणं गरजेचं आहे.

एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या भारतातील व्यवसायाचे अध्यक्ष प्रतीन वेते म्हणाले, ‘स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर बोलणे आजही निषिद्ध मानले जाते. यामुळे जागरूकतेचा अभाव तयार होतो आणि पर्यायाने बहुतांश स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. एमवोकलसारखा अत्यावश्यक उपक्रम लाँच करत स्त्रियांना आपल्या आरोग्याच्या समस्या हाताळण्यासाठी सहजपणे व वैद्यकीयदृष्ट्या तपासण्यात आलेली माहिती उपलब्ध करून देताना समाधान वाटत आहे. या उपक्रमाची सर्वात चांगली बाजू म्हणजे, ही माहिती स्त्रियांच्या वैयक्तिक गरजेशी संबंधित असते आणि त्यांना डॉक्टरांशी महत्त्वाच्या मुदद्यावर चर्चा करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. ’

एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालक श्रीमती नमिता थापर स्त्रियांचे आरोग्य व त्याच्याशी संबंधित शिक्षण क्षेत्रात हिरीरीने काम करत असून त्यांनी एमक्युअरच्या यासंदर्भातील प्रयत्नांना दिशा दिली आहे. स्त्रियांच्या आरोग्यवर आधारित त्यांनी युट्यूबवर सुरू केलेल्या ‘अनकंडिशन युअरसेल्फ विथ नमिता’ या अशाप्रकारच्या पहिल्याच टॉक शो ला इंटरनेटवर चांगला प्रतिसाद मिळाला. या शोमध्ये त्या रुग्ण, डॉक्टर्स आणि तज्ज्ञांशी स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल संवाद साधतात.

स्त्रियांच्या आरोग्याविषयीचा संवाद सुरू ठेवत एमक्युअरने तयार केलेल्या इंडियन वुमन्स हेल्थ रिपोर्ट २०२१ नुसार ८४ टक्के नोकरदार स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान रूढी- परंपरांचा सामना करावा लागला असून त्यांना पवित्र ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ६७ टक्के स्त्रियांनी आजही भारतीय समाजात त्यांच्या आरोग्याविषयी बोलणे निषिद्ध असल्याचे सांगितले.

एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या वितरण आणि पोर्टफोलिओ धोरण विभागाचे वरिष्ठ संचालक सौरभ गंभीर म्हणाले, स्त्रियांना त्यांच्या आरोग्याच्या अडचणींबद्दल बोलताना अवघडल्यासारखे वाटत असल्यामुळे आम्ही त्यांना सक्षम करण्यासाठी एमवोकल चळवळ सुरू केली. याद्वारे त्यांना आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आवश्यक माहिती व प्रोत्साहन दिले जाणार आहे. विकसनशील अर्थव्यवस्था या नात्याने आपण स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांना प्राधान्य देणे आणि त्याविषयीचा संवाद मुख्य प्रवाहात घडवून आणणे आवश्यक आहे.