Home Blog Page 1932

“यांना पहाटेची पापकृत्य करण्याची फार सवय आहे”, संजय राऊतांचा टोला ! आयोगाने आघाडीच्या आक्षेपांचे काय केले,हा प्रश्न अनुत्तरीतच

0

मुंबई -शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या निकालावरून राज्यात भाजपने घोडेबाजार भरवल्याची टीका केली आहे.सुहास कांदेंचं मत बाद का झालं, हा संशोधनाचा विषय असल्याचं संजय राऊत म्हणाले. “नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मतांचा विचारच करत नाही. सुहास कांदेंचं मत का बाद केलं? हा संशोधनाचा विषय आहे. आम्ही त्याच कारणासाठी मुनगंटीवारांच्या मताला आक्षेप घेतला होता. मतदानावेळी धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं हे माहिती असूनही अमरावतीचे एक शहाणे जे उद्योग करत होते, ते आक्षेपार्ह होतं. त्यांचंही मत घटनेनुसार बाद व्हायला हवं. पण फक्त आमचं मत बाद करून रात्री उशीरा आणि पहाटे काही गोष्टी करण्यात आल्या. यांना पापकृत्य करण्याची पहाटेची फार सवय आहे. पहाटेपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरू होता. त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच उपक्रम करत राहा. महाराष्ट्राचा एकदा कायमचा घोडेबाजार करून टाका”, असं राऊत म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना पुढे ते म्हणाले की, राज्यसभेची निवडणुकीची प्रक्रिया ही फारच किचकट आहे. ज्या कारणासाठी आमचं म्हणजे शिवसेनेचं एक मत बाद केलं, त्याच प्रकारची चूक समोरच्यांनी (भाजप) केली होती, पण त्यांचं मत बाद नाही झालं. कुणाला पडलेलं मत बाद झालं हे शोधायला सात तास लागले. या देशातील केंद्रीय यंत्रणा या सत्ताधारी पक्षासाठी कशा प्रकारे काम करतात हे आम्ही काल डोळ्याने पाहत होतो.

राऊत पुढे म्हणाले की, कुठे ईडी, कुठे सीबीआय वापरली जाते, आणि कुठे अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा वापरली जाते का, अशा प्रकारची शंका आता येऊ लागली आहे. त्यांनी फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला असं नाही. 33 मते पहिल्या पसंतीची मते आम्हाला, तर 27 पहिल्या पसंतीची मते महाडिकांना मिळाली. तसं म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. पण निवडणूक प्रक्रियेत पहिल्या-दुसऱ्या पसंतीच्या मतांवरून गणित ठरत असते. काही घोडे बाजारात असतात, जास्त बोली लागली किंवा इतर काही कारणे असतील, त्यामुळे 6 मते आम्हाला मिळाली नाहीत. असे लोकं कुणाचेही नसतात. पण महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना असेल, बच्चू कडू असतील, गडाख असतील आमचे एकही मत फुटले नाही.

ज्यांनी आम्हाला मत दिलं नाही, त्यांची नावं आमच्याकडे

आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलो नाही, आम्ही व्यापार केला नाही, तरीही आम्हाला 33 मते मिळाली यातच आमचा विजय आहे. अर्थात ज्यांनी आम्हाला मतं दिली नाहीत, त्यांची आमच्याकडे नावं आहेत, एवढंच मी सांगेन, असा इशाराही राऊतांनी दिला. हितेंद्र ठाकूरांची 3 मते, संजय मामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार यांनी मविआला मते दिली नसल्याचे संजय राऊत यांनी पत्रकारांसमोर सांगितले.

समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करा – माहिती व जनसंपर्क संचालक गणेश रामदासी

0

मुंबई : शासनाच्या सर्व प्रसिध्दी आणि जनसंपर्क यंत्रणांनी आपत्तीच्या कालावधीत समन्वयाने काम करावे. माहितीचे प्रसारण आणि संदेश देवाण घेवाण जलदगतीने होण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गणेश रामदासी यांनी केले.

मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित शासनाच्या विविध जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक गोविंद अहंकारी, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिका, म्हाडा, एम.टी.एन.एल., बेस्ट, अदानी एनर्जी, एस.टी.महामंडळ, पीआयबी, दूरदर्शन, आकाशवाणी, संरक्षण, सिडको, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया, पश्चिम रेल्वे या यंत्रणांचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

श्री.रामदासी म्हणाले, जुलै 2021 मध्ये आपत्तीच्या कालावधीत राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्रालय नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पूर परिस्थीतीचा आढावा घेवून तत्काळ मदतीसाठी सर्व यंत्रणांना निर्देशही दिले होते. यावेळी  मंत्रालय नियंत्रण कक्षातून सर्व माध्यमांना देण्यात येणाऱ्या माहितीचे समन्वय देखील माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून सुयोग्यरित्या होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आपत्ती कालावधीतही माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी समाज माध्यमे ही अत्यंत प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणारी माहिती परस्परांशी संवाद साधून देण्याबरोबरच आपल्या  विभागाच्या समाज माध्यमांवर अद्ययावत करावी, जेणेकरून सर्व यंत्रणांनाही माहिती कमी वेळेत मिळेल. कम्युनिटी रेडिओ हे देखील सध्याच्या काळात प्रसिध्दीसाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यासाठी सागर तटीय क्षेत्रात शासनातर्फे शासकीय, निमशासकीय संस्था, विद्यापीठ इत्यादींना प्रोत्साहित केले जात आहे त्याचा लाभ संबधितांनी घ्यावा, असे श्री. रामदासी म्हणाले.

यावेळी सर्व जनसंपर्क अधिकारी यांनी त्यांच्या विभागातंर्गत जनसंपर्कासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीया तसेच इतर माध्यमातून केली जाणारी प्रसिद्धी, विभागाचे अद्यावत नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन नंबर, तसेच जनतेच्या हितासाठी तत्काळ  दिली जाणारी माहिती याबाबत सादरीकरण केले तसेच सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाने आपत्ती कालावधीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची खात्रीशीर व अद्यावत माहिती समाज माध्यमांवर प्रसिद्ध करावी, याबाबतही सर्वांनी आपले मत व्यक्त केले. आपत्ती कालावधीत  प्रत्येक यंत्रणांचा वेगळा क्रमांक असल्यामुळे जनतेला मदत मागताना होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व यंत्रणांचा मिळून एकच हेल्पलाईन क्रमांक असावा, अशी सूचना यावेळी सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यावेळी केली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक श्री.अहंकारी यांनी प्रास्ताविक केले व  आभार मानले.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवक-युवतींना आयटीआयमधून मिळणार व्यवसाय प्रशिक्षण – कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

0

मुंबई : नक्षलग्रस्त जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात २ नवीन आयटीआय सुरु करण्यात येत असून यामध्ये नक्षलग्रस्त शरणार्थी किंवा त्यांच्या पाल्यांना राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्षलवादातून शरण आलेल्या व आत्मसमर्पण केलेल्या युवक-युवतींसाठी या आयटीआयमध्ये प्रवेशाकरिता गुणांकनाची कोणतीही अट असणार नाही, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली.

मंत्री श्री. टोपे म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात पालांदूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि गडचिरोली जिल्ह्यात जिमलगट्टा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या दोन नवीन आयटीआय यासाठी सुरु करण्यात येत आहेत. प्रवेश सत्र 2022 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सूट देण्यात आली असून त्यांना संस्थास्तरावर प्रवेशाची संधी मिळणार आहे. नक्षली चळवळीतून शरण आलेल्या युवक-युवतींना कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण देणे आणि त्याद्वारे त्यांना मूळ प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. टोपे म्हणाले की, या दोन्ही आयटीआयमध्ये मिळून एकूण ३६० विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. दोन्ही आयटीआयमध्ये जोडारी, विजतंत्री (इलेक्ट्रिशीयन), तारतंत्री (वायरमन), यांत्रिक मोटारगाडी आणि सुइंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल. पालांदूर येथील आयटीआय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर जिमलगट्टा (जि. गडचिरोली) आयटीआयच्या कार्यशाळा इमारत बांधकामासाठी १३ कोटी १८ लाख रुपयांच्या मान्यतेचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रक्रियेत आहे. सध्या हे आयटीआय अलापल्ली (जि. गडचिरोली) येथे तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात येत असून जिमलगट्टा येथील कार्यशाळा इमारत बांधकामास लवकरच मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नक्षलग्रस्त भागातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास ते अतिरेकी कारवायांकडे जाण्यापासून परावृत्त होतील. त्याचबरोबर यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री श्री. टोपे यांनी व्यक्त केला.

राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उद्घाटन

0

मुंबई : गोवा मुक्ती लढा तसेच सन 1971 च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे शुक्रवारी श्यामाप्रसाद मुखर्जी चौक,  कुलाबा मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व नौदलाचे अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.

विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतला  दिनांक ३ नोव्हेंबर १९६१ रोजी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले. छत्तीस वर्षे सर्वोत्तम सेवा दिल्यानंतर विक्रांत युद्धनौकेला जानेवारी १९९७ मध्ये निवृत्त करण्यात आले व त्यानंतर सन २०१२ पर्यंत ते तरंगते संग्रहालय म्हणून सेवेत होते.

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका म्हणून नव्या रूपाने कोचीन शिपयार्ड येथे पुनश्च तयार होत आहे. लवकरच ही युद्धनौका आयएनएस विक्रांत याच नावाने नौदलात समाविष्ट केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 “स्वत:लाच महाराष्ट्र, मुंबई समजणाऱ्यांना…”, निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला!

0

मुंबई-राज्यसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या उमदेवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली, हे देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दामून जोर देऊन सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर विधानभवनाबाहेर उपस्थित असलेल्या भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना काल दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज पहाटे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील जनतेने २०१९ साली भाजपला जनमत दिले होते. मात्र, आमच्या पाठीत सुरा खुपसून महाविकास आघाडीने ते काढून घेतले. मात्र, अशाप्रकारे स्थापन झालेले सरकार किती अंतर्विरोधाने भरलेले असू शकते, हे आजच्या विजयाने स्पष्ट झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले.जे स्वत:लाच महाराष्ट्र समजतात, जे स्वत:लाच मुंबई समजतात, जे स्वत:लाच मराठी समजतात, त्या सगळ्यांना या विजयाने लक्षात आणू दिले आहे की, ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, ते म्हणजे मुंबई नाहीत. महाराष्ट्र म्हणजे राज्यातील १२ कोटी जनता आहे. भाजपला मिळालेला आजचा विजय हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. मी हा विजय आमचे लढवय्ये नेते मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो. आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली होती. हा विजय म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट आहे. आम्ही त्यांना भेट म्हणून कोल्हापूरचा पैलवान दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

उद्या काय काय मुजोरी होणार आहे ते माहिती आहे. शिवसेनेचं जे मत बाद झालं, ते ग्राह्य झालं असतं तरी आमचा विजय झाला असता. नवाब मलिकांना जरी न्यायालयानं परवानगी दिली असती, तरी आमचा विजय झाला असता. हा कुठल्या जोडतोडीचा विजय नाही, तर पूर्ण कोटा पूर्ण करून मिळवलेला विजय आहे, असं देखील फडणवीसांनी नमूद केलं.

“भाजपाच्या अपक्ष आमदारांचं आणि जे आमच्यासोबत नव्हते, तरीही आम्हाला मतदान केलं असा सगळ्या आमदारांचे मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा जे स्वत:ला महाराष्ट्र, मुंबई समजतात, मराठी समजतात, त्यांना या विजयाने हे लक्षात आणून दिलं की महाराष्ट्र म्हणजे ते नाही, मुंबई म्हणजे ते नाही, इथली जनता आहे. मराठी म्हणजे जगभरातले मराठी आहेत. ही विजयाची मालिका सुरू झाली आहे. आता ही मालिका अशीच पुढे सुरू राहील”, असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला.“चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढलो. त्यांच्या वाढदिवशी त्यांना भेट देऊ असं ठरवलं होतं. प्रत्यक्ष कोल्हापूरचा पैलवानच भेट स्वरूपात चंद्रकांत पाटलांना दिला आहे. अश्विनी वैष्णव ठाण मांडून इथे बसले, आम्हाला मदत केली. म्हणून त्यांचे आभार मानतो”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे-म्हणाले शरद पवार

0

पुणे राज्यसभा निवडणुकीचा निकाल पहाटे चार वाजता जाहीर झाला. मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालाबाबत भाष्य केले आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झाले आहे. यामध्ये वेगळे काही नाही. मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे,” असेही शरद पवार म्हणाले.राज्यसभा निवडणुकीच्या निकालामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर होईल, हा दावा शरद पवार यांनी फेटाळून लावला. महाविकास आघाडीचे एकही मत फुटलेले नाही. त्यामुळे सरकार चालवण्यात कुठलाही धोक नाही. एक-दोन मतं इकडे-तिकडे झाली. भाजपला दोन नंबरची जादा मतं मिळाली. जी काही गंमत झाली ती सगळी अपक्षांच्या लॉटमध्ये झाली, असे शरद पवार यांनी सांगितले.

शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरक वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. यामध्ये अपक्षांची संख्या भाजपाकडे अधिक होती पण दोघांनाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपाला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. 

“मला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. पण एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले आहे.ते मला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचे नाही,” असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी म्हटले की, अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही. महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत, ती अपक्षांची आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.

10 आमदारांचे क्रॉस व्होटिंग, सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का; शिवसेनेचे संजय पवार पराभूत

0

दुपारी दीड वाजता मविआच्या 3 नेत्यांच्या मतांवर भाजपने घेतला आक्षेप, रात्री 1 च्या सुमारास आयोगाचा निर्णय जाहीर

 महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजप पोहोचले. यानंतर तब्बल ११ तासांपेक्षा अधिक काळ लोटून गेल्यावरही निवडणूक आयोग मतमोजणीचा निर्णय जाहीर करू शकला नाही. रात्री १ च्या सुमारास आयोगाने अखेर निर्णय जाहीर केला. त्यानुसार शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले, तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या दोघांची मते वैध ठरवली. याशिवाय विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या भाजपचे सुधीर मुनगंटीवर व अपक्ष आमदार रवी राणा यांची मते वैध ठरवण्यात आली. कांदे यांची मतपत्रिका बाजूला ठेवून मतमोजणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने या वेळी दिले. अखेर रात्री १.४० वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.

नाट्यमय वळणे घेत रंगलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीवर कुरघोडी करत आपला तिसरा उमेदवार अर्थात धनंजय महाडिक निवडून आणला. महाआघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित शक्तीच्या जिवावर मैदानात उतरलेले शिवसेनेचे संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला.

शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांनी मतांच्या कोट्याचा विचार करता अपेक्षित विजय मिळवला. परंतु सहावा उमेदवार देऊन भाजपने निवडणुकीत वाढवलेली उत्सुकता शुक्रवारी पहाटे मतमोजणी संपेपर्यंत ताणलेली राहिली. या मतदानासाठी पोलिस कोठडीत असलेले आघाडी सरकारचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारल्याने २८५ आमदारांनी मतदान केले. शिवाय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले.

विधान परिषद निवडणुकीवर परिणाम
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराचा झालेला विजय व शिवसेनेचा पराभव पाहता २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सुहास कांदे यांचे काय आहे म्हणणे

मत बाद होण्‍याविषयी सुहास कांदे यांना विचारणा केली असता, कांदे असे म्‍हणाले की, माझे मत बाद झाले याविषयीचा आतापर्यंत तरी माझ्याकडे पुरावा आला नाही. परंतु हे जर खरे ठरले तर मी कोर्टात जाणार असल्‍याची प्रतिक्रिया त्‍यांनी दिली आहे.शिवसेनेच्‍या सुहास कांदे यांचे मत ग्राह्य न धरता बाकी मतांची मोजणी सुरु करण्‍याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेजची पाहणी केल्‍यानंतर सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले आहे. कांदे यांनी मतपत्रिकेची घडी केली नसल्‍याचे व्हिडिओमध्‍ये स्‍पष्‍टपणे दिसते. म्‍हणून आयोगाने कांदे यांचे मत ग्राह्य न धरता इतर मतांची मोजणी करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी

0

मुंबई -राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.

मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत.भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना ४१.६ मतं मिळाली.

शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 32 मते मिळाली .

त्यानंतर संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात आता चुरशीची लढत निर्माण झाली होती. पण, दुसऱ्या पसंतीची मतं महाडिक यांना जास्त मिळाल्यानं त्यांचा विजय झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली आहे.

तसंच आम्हाला या पराभवाची समीक्षा करावी लागेल, असंही ते म्हणाले.

या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं की, “आमचे दोन आमदार मतदान करू शकले नाहीत. तर सुहास कांदे यांचं मत बाद झालं. याचा फटका महाविकास आघाडीला बसला. नाहीतर संजय पवारांना पहिल्या पसंतीत जास्त मतं मिळाली असती.

तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय की, “निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही. तर जिंकण्यासाठी लढविली होती. जय महाराष्ट्र !”

याआधी काय घडलं?

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. याआधी निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती एएनआयने दिली.

एएनआयनं ट्विट करत म्हटलं की, “निवडणूक आयोगाने आरओ/निरीक्षक/विशेष निरीक्षकांच्या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर आणि व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर तपशीलवार आदेश पारित केला आहे. आमदार सुहास कांदे यांनी दिलेले मत नाकारण्याचे आदेश आरओला दिले असून मतमोजणी सुरू करण्यास परवानगी दिली आहे.”

यावर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना एबीपी माझा या वृत्तवाहिनीला सांगितलं, “शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील याचा मला विश्वास आहे. मला अद्याप कोणतीही माहिती नाही. पण निकाल आल्यानंतर त्यावर कोर्टात जायचं का नाही ते ठरवू.”

सुहास कांदे यांचं मत बाद ठरल्यानंतर 284 मतं वैध ठरली होती.

सुहास कांदे यांचं मत बाद होण्याची कारणं

शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यानंतर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला गेला. सुहास कांदे नांदगावाचे आमदार आहेत.

निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात सुहास कांदे यांचं मत बाद का झालं याची माहिती दिलीये.

  • सुहास कांदे यांनी बॅलेट पेपर फोल्ड न करता पोलिंग एजेंटकडे नेला.
  • सुहास कांदे यांनी पकडलेला बॅलेट पेपर बाजूच्या क्युबिकलमधून दिसत होता. त्याचसोबत कॅमेरा ॲंगलमध्ये येत होता.
  • त्यांनी बॅलेट पेपर आपल्या नेमून दिलेल्या एजंटला नेमून दिलेल्या जागेच्या बाहेर येऊन दाखवला.
  • निवडणूक अधिकाऱ्यांनी वारंवार बाजावूनसुद्धा ते खुला बॅलेट पेपर घेऊन हिंडत होते.
  • ते लोकांशी बोलत होते आणि खुला पेपर घेवून दुसऱ्या क्युबिकलकडे जात होते.

याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.

“या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करायला हवी होती. पण त्यांनी कारवाई केली नाही,” असं आयोगानं म्हटलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना सुहास कांदे यांचा बॅलेट पेपर मतमोजणी सुरू करण्याआधी बाजूला काढण्याचे आदेश दिले.

मतमोजणी 8 तास उशीरानं कारण…

महाराष्ट्र राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 10 जून रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झालं. 5 वाजता मतमोजणी सुरू होणं अपेक्षित होतं. पण, तब्बल 8 तासांनंतर मतमोजणीला सुरुवात झाली.

कारण, महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी मागणी करत भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावं, अशी मागणी भाजपनं केली होती.

या तक्रारीनंतर त्याचा अहवाल दिल्लीच्या निरीक्षकांनी मागवला होता. हा अहवाल येईपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.

त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. या संपूर्ण गोंधळात आठ तासांपासून निकाल रखडला होता. रात्री 1 च्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली.

विधीमंडळात नेते दाखल

राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नेतेमंडळींनी विधीमंडळात दाखल व्हायला सुरुवात केली आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानभवनात प्रवेश करताना म्हटलं, “भाजप रडीचा डाव खेळत आहे. विजय महाविकास आघाडीचाच होणार. एक मत कमी झालं तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार.”

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं की, “मत बाद करताना निवडणूक आयोगानं काय कारणं दिलीत ते माहिती नाहीये. आमच्या मते हा निर्णय चुकीचा आहे. 4 वाजता मतदान संपल्यानंतर 8 तासांनी मतमोजणीचा निर्णय घेण्यात आला असेल, तर तो कशापद्धतीनं घेतला असेल हे सगळ्या जगाला कळलंय.”

राज्यसभेची निवडणूक कशी होते?

संसदेची दोन सभागृहं आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेत 543 निवडलेले आणि 2 नेमणूक केलेले असे एकूण 545 खासदार असतात. या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात.

राज्यसभेत 238 निवडलेले आणि 12 नेमलेले असे एकूण 250 खासदार असतात, या निवडणुका दर 2 वर्षांनी होतात. लोकसभेच्या सगळ्या खासदारांची टर्म एकाच वेळी संपते, राज्यसभेचे एक तृतीयांश खासदार दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्यामुळेच या सभागृहाला स्थायी सभागृह किंवा कधीच विसर्जित न होणारं सभागृह म्हणतात.लोकसभेसाठी सर्वसामान्य लोक मतदान करतात, राज्यसभेचे खासदार आमदारांच्या मतांवर निवडून येतात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार त्यांच्या राज्यसभेतल्या जागा ठरतात.

जितेंद्र आव्हाड म्हणाले,’माझी कसलीही चूक झालेली नाही

0

मुंबई : राष्ट्रवादी चे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते ऐकूण मी मतदानासाठी गेलो. मतदान केल्यानंतर मी ते माझ्या पक्षांच्या एजंटना दाखवले. तेव्हा कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. त्यावेळी मी थोडा हसलो. त्याला वेगळे कारण होते. यानंतर मतपत्रिका बंद करून मी बाहेर आलो, मतदान पेटीकडे गोलो, मतदान टाकले आणि बाहेर निघून गेलो.

यानंतर मी गेटवर आलो. तोवर माझ्यावर कसल्याही प्रकारचे ऑब्जेक्शन घेण्यात आलेले नव्हते. यानंतर मला माध्यमांकडून समजले, की माझ्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आले आहे. मात्र, यासंपूर्ण प्रक्रियेत माझ्याकडून काही चूक झाल्याचे मला तरी वाटत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

…तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते –
उगाच महाराष्ट्रासमोर असे जायला नको, की आम्ही काही वेगळे केले आहे, काही चुका केल्या आहेत, अजिबात नाही. काही कारण नसताना काहीतरी रडीचे डाव टाकत आहेत. माझ्या मते, माझ्याकडून कसलीही चूक झालेली नाही. माझे मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचे असते, नियमाने त्यांना मतदान दाखवले. ते न दाखवल्यास माझा पक्ष मला सहा वर्षांसाठी निंलंबित करू शकतो. माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते. मी माझी क्रिया केली. माझ्या माणसाला माझे मतदान दाखवले. पण आता हा संभ्रम निर्माण केला जात आहे. गैरसमज पसरत असतील, तर त्याचा खुलासा करायला मी आलो आहे, असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

भाजपाने न्यायव्यवस्था,तपासयंत्रणा आणि निवडणूक आयोगालाही पकडीत घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप

0

मुंबई – भाजपाने लोकशाही, न्यायव्यवस्था,केंद्रीय तपासयंत्रणा आणि निवडणूक आयोगालाही पकडीत घेतल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करून केला आहे.विशेष म्हणजे आयोगाची रात्री बैठक संपल्यावर त्यांनी हे ट्वीट केले आहे.6 तास मतमोजनी रखडल्यावर त्यांनी हे ट्वीट केले आहे.महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? जिंकणार तर महा विकास आघाडीच! जय महाराष्ट्र!!

जर्मनीसोबतचे मैत्रिपूर्ण संबंध कायम राहतील – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. 10 : भारतातील जर्मनीचे महावाणिज्यदूत जर्गन मोऱ्हार्ड यांचा सेवा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला. यानिमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका छोटेखानी कौटुंबिक सोहळ्याद्वारे महाराष्ट्रीय पद्धतीने मोऱ्हार्ड यांचा सपत्निक सत्कार केला. या सोहळ्याला पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध देशांतील वाणिज्यदूत, उद्योजक तसेच उद्योग विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जर्गन मो-हार्ड २०१६ पासून भारतात सेवेत होते. मुंबई कार्यालयात सेवा बजावत असताना त्यांचे राज्य शासन आणि उद्योग मंत्री कार्यालयासोबत मैत्रिपूर्ण संबंध राहिले. इंडो-जर्मन संकल्पना पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जर्मनीतील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. राज्याच्या उद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या कंपन्यांचा मोठा वाटा आहे. दोन्ही देशांतील राजकीय, आर्थिक संबध वृद्धींगत करण्याकामी वाणिज्यदूतांनी महत्वाची भूमिका बजावली. राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी जर्मनीतील कंपन्यांसह महावाणिज्यदूत मो-हार्ड यांनी वेळोवेळी सहकार्य केले. त्यांची मैत्री कायम स्मरणात राहील, अशा भावना श्री. देसाई यांनी व्यक्त केल्या.

कोविड काळात जर्मनीतील कंपन्यांनी राज्य शासनाला सर्व सहकार्य दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. मो-हार्ड यांचे महाराष्ट्र आणि मुंबईसोबत कौटुंबिक नाते जुळले आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईतच स्थायिक व्हावे, असा सल्ला दिला.

महावाणिज्यदूत जर्गन मोऱ्हार्ड यांचा श्री, देसाई यांनी हिमरू शाल देऊन सत्कार केला तर त्यांच्या पत्नी पेट्रो यांचा श्रीमती सुषमा सुभाष देसाई यांच्या हस्ते भारतीय परंपरेची ओळख सांगणारी पैठणी साडी दिली.

भारतात आणि मुंबईत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. जर्मन आणि भारताचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. यापुढेही ते कायम राहतील. मी सेवेतून निवृत्त होत असलो तरी इंडो जर्मन नात्यातून कधीही निवृत्त होणार नाही. उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना येथील शासन भविष्यात देखील पूर्वीप्रमाणे सहकार्य करेल. भारतातील विशेषतः महाराष्ट्र शासनाने केलेले सहकार्य नेहमीच स्मरणात राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कृष्णा मोहन (बीएएसएफ), विस्टन पेरेरा, मोहित रैना, अनुपम चतुर्वेदी, डीएचएलचे संचालक सुब्रमण्यम्, सिमेन्सचे सुनील माथूर, मायकल ब्राऊन( ऑस्ट्रेलियाचे सह वाणिज्यदूत), साऊथ कोरियाचे यांग ओग किम, सिंगापूरचे चेंग मिंग फुंग आदी उपस्थित होते. उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंह, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

राजस्थान राज्यसभा: काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी, भाजपला 1 जागा, अपक्ष उमेदवार पराभूत

0

राजस्थानातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल प्राप्त झालेत. त्यात काँग्रेसने 3 जागा जिंकल्यात, तर भाजपला 1 जागा मिळाली आहे. अपक्ष उमेदवार सुभाषचंद्र यांचा पराभव झाला आहे.राजस्थानात काँग्रेसच्या मुकूल वासनिक, रणदिप सिंह सुरजेवाला व प्रमोद तिवारी या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. सुरजेवालांना 43, वासनिक यांना 42 तर तिवारी यांना 41 मते पडली. राज्यातील भाजप आमदार शोभाराणी यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केले.

राजस्थानमधील विजयानंतर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी ट्विट करून पक्षाच्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. ट्विटमध्ये म्हटलंय की, राज्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी विजयी झाले असून त्यांना हार्दिक शुभेच्छा. राजस्थानात भाजपा उमेदवार घनश्याम तिवारी यांना ४३ मते पडली तर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना ३० मते पडली. काँग्रेसच्या रणदीप सुरजेवाला यांना ४३, मुकुल वासनिक ४२ तर प्रमोद तिवारी यांना ४१ मते पडली.राजस्थानच्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सुभाष चंद्रा उभे होते. परंतु त्यांचा पराभव झाला आहे. राजस्थानात भाजपाच्या एका आमदाराने पक्षाच्याविरोधात जात काँग्रेस उमेदवाराला मत दिले. आमदार शोभारानी कुशवाह यांनी काँग्रेसच्या प्रमोद तिवारी यांना मत दिले. आता दिल्ली पार्टी हायकमांडने राजस्थान भाजपा आमदारांच्या क्रॉस वोटिंगवर प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्याकडे रिपोर्ट मागितला आहे. वासनिक यांच्या विजया मुळे बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढा वाटत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

भाजे लेणी येथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकांचे आयोजन

0

पुणे दि.१०- भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील ७५ महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातर्फे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मावळ तालुक्यातील भाजे येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विभागांची समन्वय बैठक घेऊन हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. असिस्टंट कमांडन्ट सारंग कुरवे यांच्या उपस्थितीत सीबीआरएन आपत्ती अर्थात रासायनिक, जैविक, किरणोत्सर्ग आणि आण्विक विषयावर आधारीत आणि पुरातत्व विभागाच्या नियमानुसार प्रात्यक्षिके घेण्यात आली. पथक प्रमुख प्रमोद राय यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिकासाठी सहाय्यक संवर्धन अधिकारी पुरातत्व विभाग, श्वान व बॉम्ब शोधक पथक पुणे ग्रामीण पोलिस, स्टेशन अग्निशमन अधिकारी म्हाळूंगे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग नगरपरिषद लोणावळा, १०८ रुग्णवाहिका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजे गावातील ग्रामस्थ, महसूल आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी , वन्यजीव सामाजिक संस्था, शिवदुर्ग संस्था, व इतर स्वयंसेवक उपस्थित होते. अशा स्वरुपाच्या आपत्तीच्यावेळी घेण्याच्या खबरदारीबाबत चांगली माहिती मिळाल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी या प्रात्यक्षिकांचे समन्वय केले

‘ईडीचा डाव फसला, रडीचा डाव सुरु’; मतमोजणी थांबवताच संजय राऊत संतापले

0

मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील, अशी साधी अपेक्षा होती. मात्र, भाजपने ऐनवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीच थांबली आहे. संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, आता आठ वाजून गेल्यानंतरही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतिक्षा करायची झाल्यास राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु व्हायला आणखी दोन-तीन तासांचा अवधी लागू शकतो. आणखी काही राज्यांमध्येही भाजपच्या भूमिकेमुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी खोळंबली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. शिवसेना आमदार सुहास कांदेंनी देखील तीच चूक केली. त्यामुळे मविआच्या तीनही आमदारांचं मत बाद केलं जावं, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत.

 संजय राऊत यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. राऊत यांनी अजय माकन यांनी हरियाणातील राज्यसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. भाजपने खालच्या दर्जाचे राजकारण करत राज्यसभेची मतमोजणी रोखून धरल्याचे माकन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत यांनी यावर रिप्लाय देत म्हटले आहे की, महाराष्ट्रातही हाच खेळ सुरु आहे. खालच्या दर्जाचे राजकारण, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!, असे आणखी एक ट्विटही संजय राऊत यांनी केले आहे.

राज्यसभा निवडणूक : भाजपच्या आक्षेपांनी मतमोजणी …तीन तासाहून अधिक वेळ रखडली

0

मुंबई-भाजपा आणि मविआने राज्यसभा निवडणुकील काही आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा मतमोजणी लांबली आहे.भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, सुहास कांदे, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका दुसऱ्या च्या हातात दिली असा आक्षेप घेत त्यांचे मत रद्द करण्याची मागणी भाजपने केली होती. यामुळे . राज्यसभेच्या निवडणूकीची मतमोजणी लांबली आहे, मतदानावर एकमेकांकडून आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी लांबली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरकतींवर निर्णय आला नसल्याने प्रक्रियेला उशीर होत आहे. निवडणूक आयोगाला यासंबंधी ईमेल पाठवण्यात आला आहे, त्याचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे.सहा जागांसाठीचे मतदान झाले असून, २८५ आमदारांनी मतदान केले आहे. दरम्यान यानंतर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होणार सुरू होणार होती ती आता रात्रीचे ७.५५ वाजले तरी अजूनही सुरु झाली नव्हती .

मतदान करत असताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी पोलिंग बुथवर बसलेल्या पोलिंग एजंटच्या हातात मतदान पत्रिका दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामध्ये काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नाना पटोले, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जयंत पाटील तर सुहास कांदे यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या हातात मतदान केलेली पत्रिका दिल्याचा आरोप करत भाजपने आक्षेप घेतला आहे.