Home Blog Page 1931

टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक

0

पंचकुला, ११ – टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-६ अशी तीन सेटमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.

पहिल्या सेटपासूनच दिया आणि स्वस्तिका आक्रमक खेळ करीत होते. त्यांचे फोरहॅड टॉपस्पिन फटके खेळताना हरियानाच्या खेळाडूंची त्रेधा उडाली. पहिल्या सेटमध्ये महाराष्ट्र १४ तर हरियाना १२वर होता. दुसरा सेट दिया आणि स्वस्तिकाने ११-०९ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये हरियानाच्या खेळाडूंनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामन्यात काही काळ रंगत वाढली. सुरूवातीचे चार गुण घेत हरियानाने आघाडी घेतली. परंतु दिया आणि स्वस्तिकाने त्यांचे संरक्षण भेदून काढले. आणि तिसरा सेट ११-०६ असा जिंकला.

दियाची जर्मनीत प्रॅक्टीस, कॉमनवेल्थसाठी निवड

दियाची कॉमनवेल्थ गेमसाठी निवड झाली आहे. तिला जर्मनीचे प्रशिक्षक आहेत. वर्षातून काही महिने ती जर्मनीत सराव करते. दिया आणि स्वस्तिका या गेल्या सात वर्षांपासून एकत्र सराव करतात. त्यामुळे दोघींमध्ये चांगला ताळमेळ आहे. दोघीही आक्रमक आहेत. त्यांचा संरक्षणावर कमी भर असतो. फोरहँड टॉप स्पीन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

लॉन टेनिसमध्ये दुहेरीत रौप्यपदक

लॉन टेनिसमध्ये वैष्णवी आडकर आणि सुदिप्ता कुमार यांच्या संघाला रौप्यपदक मिळाले. त्यांना तामीळनाडूच्या लक्ष्मीप्रभा आमि जननी रमेश यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पहिला सेट (७-५) महाराष्ट्राने जिंकून आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा सेट कर्नाटकच्या खेळाडूंनी ६-२ असा जिंकला. त्यामुळे सामना टायब्रेकरवर गेला. यात कर्नाटकच्या लक्ष्मीप्रभा व जननी रमेशने आक्रमक सुरूवात केली. त्यांचे सात गुण होईपर्यंच महाराष्ट्र ० गुणावर होता. नंतर दोघींनी आक्रमण सुरू केले, त्यामुळे स्कोर ५-९वर गेला. मात्र, कर्नाटकने एक गुण घेत सामन्यासह सुवर्णपदक जिंकले.

‘ कलरलेस ‘ मधून नृत्य, अभिनय, कलेचे प्रभावी सादरीकरण

0

पुणे ः

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘डिफरंट स्ट्रोक्स ‘  प्रस्तुत   ‘ कलरलेस ‘ कार्यक्रमातून भरतनाट्यम,अभिनय आणि कलेचा एकत्रित आविष्कार  रसिकांना अनुभवायला मिळाला.
  शनीवार, ११ जून  २०२२ रोजी सायंकाळी ६  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.
संकल्पना सुचेता जोशी यांची होती. प्रकाश योजना सचिन लेले यांची होती. या सादरीकरणाला  आनंद चाबुकस्वार यांनी आवाज ( व्हॉईस ओव्हर ) दिला. १३ युवती यात सहभागी झाल्या. 
कलरलेस हा या पूर्वग्रहांनी त्रासलेल्या मनाचा व पूर्वग्रहांमधील संवाद होता. मन ज्यावेळा तटस्थपणे आपल्या चुकांकडे बघते, आपण असे  का वागतो याचा मागोवा घेते, तेव्हा त्याला काय दिसते त्याचे प्रतिबिंब कलरलेस मध्ये  दिसले.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १२४ वा कार्यक्रम  होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. प्रारंभी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

लॉन टेनिसमध्ये सुवर्णाची ‘आकांक्षा’पूर्ती

0

निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत

पंचकुला, ११ –
चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियानात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी काट्याची लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. आकांक्षाने तीन सेटमध्ये (६-७, ७-६ व ६-४) हा सामना जिंकला.
पंचकुलातील जिमखाना मैदानावर ही चुरशीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये कर्नाटकच्या मुयरीने आघाडी घेतली होती. पहिले चार गुण मिळवल्यानंतर तिने सामन्यावर पकड बनवली. परंतु आकांक्षाने ४-४ आणि ५-५, ६-६ अशी बरोबरी साधली. परंतु ऐनवेळी मुयरीने गुण घेत पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येही पहिले पाच गुण घेऊन मयुरी पुढे होती. परंतु आकांक्षाने नंतर गिअर बदलला. फोरहँड, बॅकहॅडचे फटके मारून तिने गुण घेण्यास सुरूवात केली. सहा-सहा गुण बरोबरी झाली. नंतर आकांक्षाने एक गुण घेत दुसरा सेट (७-६) जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली.

नेहमीप्रमाणे तिसऱ्या सेटमध्ये मयुरी आघाडीवर राहिली. पहिले चार गुण घेत तिने आकांक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आकांक्षा दोन गुणांवर होती. तेव्हापासून खेळाचा नूर पालटला. दोघीही एकेका गुणांसाठी झगडत होत्या. त्यांना प्रत्येकी तीन अॅडव्हान्टेज मिळाले. परंतु तिसरा महत्त्वाच पाॅईंट ही आकांक्षानेच घेतला. चौथाही गुण सहज घेतला. चार-चार अशी बरोबरी झाल्याने मयुरी बॅकफूट गेल्याचे दिसून आले. पाचवा गुणही आकांक्षानेच घेतला. दबावात आलेल्या मयुरीवर तिने पुन्हा एक महत्त्वपूर्ण गुण घेत सामना तिसऱ्या सेटमध्ये (६-४) जिंकला.

एकेरीत सहज कांस्य

मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राला कांस्यपदक सहजपणे पदक मिळाले. पुण्याच्या वैष्णवी आडकर आणि हरियानाच्या श्रृती अहलावत यांच्यात कांस्य पदकासाठी सामना होता. परंतु या सामन्यात श्रृती गैरहजर राहिली. त्यामुळे वैष्णवी कांस्यपदकाची मानकरी ठरली.

मानसिक पाठबळ

एकेरीत सुवर्णपदक पटकावणारी आकांक्षा ही नवी मुंबईतील एएसए अकादमीत सराव करते. प्रशिक्षक अरूण भोसले यांच्यासोबत महाराष्ट्राचे क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, ओएसडी व्यंकेश्वर, खो-खोचे प्रशिक्षक उदय पवार यांनी सामन्यास उपस्थित राहून आकांक्षाला प्रोत्साहन दिले. ती पिछाडीवर असतानाही मानसिक बळ देण्याचे काम केले. क्रीडा मंत्री सुनील केदार व आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही शुभेच्छा देत उत्साह वाढवला.

सायकलिंगमध्ये रौप्य, टेटेमध्ये मुली फायनलमध्ये
रोड सायकलिंगमध्ये मास स्टार्ट प्रकारात सिद्धेश पाटीलने रौप्यपदक पटकावले. तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे. टेबल टेनिसमध्येही मुलींनी महाराष्ट्राचा हरियानात डंका वाजवला आहे. त्यांचा अंतिम सामना सायंकाळी सहा वाजता हरियानासोबत होणार आहे. दिया चितळे व स्वस्तिका घोष (दोघीही मंबई) या हरियानाच्या सुहाना सैनी व चक्रवर्ती यांच्यासोबत लढतील. या सामन्यात आपले रौप्यपदक पक्के झाले आहे.

ये तो बस्स झॉंकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा नारा

कोथरूडमध्ये भाजपाचा विजयी जल्लोष

पुणे-राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर सर्वच कार्यकर्त्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे ‘ये तो बस्स झॉंकी हैं पुणे महापालिका बाकी हैं!’ चा नारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

भाजपा कोथरूड मंडलच्या वतीने विजयी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा. आ. पाटील यांनी सहभागी होऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर आ. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी आ. माधुरीताई मिसाळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर सरचिटणीस दीपक पोटे, राजेश येनपूरे, दत्ताभाऊ खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्रबापू मानकर, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाने कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या निवडणुकीत माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी जो डाव टाकला, त्यामुळे संजय राऊतांनाही चितपट व्हावे लागले.

ते पुढे म्हणाले की, “विजयानंतर काल माध्यमांशी बोलताना ‘ये तो बस्स झॉंकी हैं २० तारीख बाकी हैं,’ म्हटलं होतं. पण आज ‘ये तो बस्स झॉंकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ हे आपल्याला दाखवायचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षच पुन्हा विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत रुजू होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला‌.

दरम्यान, या विजयी जल्लोष कार्यक्रमात आ. पाटील यांनी भाजपचा ध्वज खांद्यावर घेऊन सर्व कार्यकर्त्यांसह गाण्यांच्या तालावर ठेका धरला; आणि त्यांच्या उत्साहात सहभाग घेतला. तसेच यानंतर आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष गार्डन येथे कार्यकर्त्यांकडून दादांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

 पुण्याच्या वृक्षसंपदेवर बदलांचा परिणाम : डॉ. विनया घाटे

0

‘जीविधा’ च्या  हिरवाई तपपूर्ती महोत्सवात व्याख्यान

 पुणे :
पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत ‘जीविधा’संस्थेच्या ‘हिरवाई तपपूर्ती  महोत्सव’ मध्ये  शनीवार, ११ जून रोजी वनस्पतीशास्त्र अभ्यासक  डॉ विनया घाटे यांनी  ‘ पुण्याची बदलती हिरवाई’ या विषयावर व्याख्यान दिले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
डॉ. विनया घाटे म्हणाल्या, ‘ पुण्यात मुख्यवस्ती बाहेर शेती, वाडया आणि जंगल होते. सारसबागेत आतापेक्षा मोठे तळे होते.पर्वतीवर देवचाफा, तुळशीबागेत मुचकुंद, खुन्या मुरलीधर मंदिरात बकुळ, मधुकामिनी   या वनस्पति पाहायला   होत्या , काही अजुनही आहेत.
ब्रिटिशांनी शिस्तबद्ध अभ्यासाची सवय लावली. वनस्पतीशास्त्राला त्याचा लाभ झाला. त्यांच्या उपयोगाच्या का होईना, अनेक वनस्पती ब्रिटिशांनी लावल्या.
ब्रिटिशांच्या काळात पुढे एम्प्रेस गार्डन, दापोडी बाग, विद्यापीठ, अशा हिरवाईच्या जागा तयार झाल्या. पेशवे पार्क, संभाजी पार्क त्यानंतर हिरवाईची ठिकाणं तयार झाली. कृषी महाविद्यालय, पुणे विद्यापीठ येथे रस्त्याकडेला मोठी झाडे लावून अॅव्हेन्यू तयार करण्यात आले.
पुण्यात सपुष्प वनस्पतींच्या सोळाशेहून अधिक प्रजाती आहेत. पुण्यातील टेकड्या या आधी गायराने होती.३० हून गवताचे प्रकार आहेत.टेकडयावर ५०० हून अधिक वनस्पति वैविध्य पाहावयास मिळतात.१९६० नंतर टेकड्यांवर ग्लीरिसिडिया लागवड झाली. त्यामुळे हिरवाई वाढली पण गवती रानाची मूळची परिसंस्था बदलली आहे.पुण्याच्या नद्यांमध्ये ५०० हून वनस्पती प्रजाती आढळतात.
शुद्ध पाण्यात येणाऱ्या वनस्पति आता आढळत नाहीत. शहरीकरणात १५०  उद्यानांमुळे, टेकडयांमुळे, हौशी पुणेकरांच्या बागांमुळे हिरवाई टिकून आहे. निराश होण्यासारखे चित्र नसले तरी,अजून जागरूकता वाढवली पाहिजे.
या व्याख्यानानंतर रमा कुकनुर व सहकारी भरतनाट्यम नृत्यातून वनस्पती विश्व साकार केले.
९ ते ११ जून दरम्यान  इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून वनस्पती,प्राणी,हिरवाई आणि पर्यावरण रक्षणाची चर्चा करणारी व्याख्याने,बिया वाटप आणि देशी वनस्पतींच्या लागवडीसाठी जनजागृती असे या महोत्सवाचे स्वरूप होते.
‘जीविधा’संस्थेचे संस्थापक राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले.वृंदा पंडित यांनी आभार मानले.
 ९ ते ११ जून पासून सायंकाळी ६.३०  ते ८ दरम्यान व्याख्याने झाली.      या महोत्सवात दिनांक 9 ते 11 जून दरम्यान सायंकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान निसर्गसेवक ‘संस्थेचे  ‘रानभाज्या’ विषयक भित्तीपत्रकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. महोत्सवातील  सगळे कार्यक्रम सर्वासाठी मोफत खुले होते.

पुण्यात भाजपच्या प्रदेश अध्यक्षांसह शहर अध्यक्ष आणि सारेच पदाधिकाऱ्यांनी नाचत केला आनंद व्यक्त

0

पुणे -राज्यसभा निवडणुकीच्या विजयाचा भाजपकडून शनिवारी पुण्यात विविध ठिकाणी जोरदार जल्लोष करण्यात आला. विशेषतःशरद पवारांच्या राजनीतीला शह दिल्याचा आनंद भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या गगनी मावेनासा झाला होता तर कोल्हापूरचे भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विजयाने कार्यकर्ते आनंदी झालेत.भाजपचे खासदार गिरीश बापट आणि त्यांचे सहकारी या आनंदोत्सवात सहभागी होत कुठे पेढे वाट होते तर कुठे गुलाबाची फुले वाटत होती . भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील येताच कोथरूड मध्ये एकच लहर उठली , माजी महापौर मुरलीधर मोहोळ , शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी अगोदरच विविध गाण्यांवर ठेका धरत जोरदार डान्स केला होता चंद्रकात पाटील येताच ते स्वतः आणि संदीप खर्डेकर, दीपक पोटे आदी मांडली या डान्स महोत्सवात सहभागी झाली.

फुगडी खेळून आनंदोत्सव

पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,गणेश बिडकर ,राजेश येनपुरे यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. यावेळी एकमेकांना पेढे भरविण्यात आले. तर महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. मुळीक म्हणाले, भाजपच्या या विजयाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेले आहे. फडणवीस यांनी योग्यप्रकारे मतांची बेरीज करत तिसऱ्या पदासाठी उमेदवार कोटा नसतानाही निवडून आणण्यात यश मिळवले. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष असतानाही, शिवसेनेने त्याला बाजूला केले त्याला राज्यसभा निवडणूकीच्या माध्यमातून प्रत्युत्तर मिळाले आहे. आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही या विजयाचा आम्हाला फायदा होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध पदांच्या निवडणुकीत भाजपचा हाच झंजावात आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दिसून येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

0

मुंबई, दि. 11- मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 15 जून रोजी तर विदर्भात 27 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंबंधीच्या परिपत्रकाद्वारे शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.

इयत्ता पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करावे. फूल देऊन किंवा शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहील असे व्यवस्थापन करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांच्या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत असल्याचे स्पष्ट दिसून येत नाही. तसेच शाळांतील शैक्षणिक सोयीसुविधा अस्ताव्यस्त झालेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी आणि दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित असल्याने हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मागील काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

संजय राऊत काठावर वाचले नाही तर उलटच झाले असते, ते निवडून आले हे नशीब!

0

मुंबई-राज्यसभेच्या चार जागा जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भात महाविकास आघाडीतीलच मंत्री छगन भुजबळ यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. संजय राऊत काठावर वाचले नाही तर उलटच झाले असते संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहीले असते ते निवडून आले हे आमचे नशीब अशा शब्दात त्यांनी चौथ्या जागेसंदर्भात पराभवाचे विश्लेषण केले.

राज्यसभा निवडणूकीचा बिगूल वाजल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका निभावली. त्यांच्या आत्मविश्वासामुळे आता महाविकास आघाडीचा चौैथा उमेदवार निवडून येणारच असे काहीसे वातावरण निर्माण झाले होते पण भाजपच्या धुरंदरासमोर महाविकास आघाडीला एक पाऊल मागे घ्यावे लागले. एका जागेवर पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आता स्पष्टपणे कबुली देण्यास सुरुवात केली असून छगन भूजबळांनीही आता यावर वक्तव्यही केले आहे.

काय म्हणाले भुजबळ?

​​​​​​भुजबळ म्हणाले की, ​संजय राऊत काठावर वाचले! नाही तर.. उलटच झाले असते; संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहीले असते..पण राऊत निवडून आले हे आमचे नशीब.

चूक कुठे झाली हे नेतेच ठरवतील

सर्व आमदारांची स्वतंत्र मिटींग झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण आणि सल्ला दिल्यानंतरही मतदानावेळी काही आमदारांनी गडबड केली या प्रश्नावर भूजबळ म्हणाले, आम्ही आमच्या लोकांना सर्व गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. मी स्वतः मिटींगमध्ये अहमद पटेल यांचे उदाहरण त्यावेळी दिले होते. आपल्या प्रतिनिधीला आपले मत दाखवायचे पण दुसऱ्यांना दिसता कामा नये. अपक्षांनी कुठलेही मत दुसऱ्यांना दाखवायचे नाही. कागदावर कुठल्याही प्रकारचे टींब, रेष असे काहीही असता कामा नये हे आम्ही सर्व आमदारांना समजावून सांगितले होते. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी या गोष्टी आमदारांना सांगितल्या होत्या पण या चूका कशा झाल्या कुठे झाल्या हे त्यांचे नेते ठरवतील असेही भूजबळ म्हणाले.

रतन टाटा विनम्रता, मानवता, नीतिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई दि : नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षान्त समारंभात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे श्री. टाटा यांना ही पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताचे प्रमुखच नाहीत तर ते त्याहीपेक्षा विनम्रता, मानवता व नीतिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती असून नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहेत. रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठांनी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी : रतन टाटा

एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी  नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी अशी अपेक्षा रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केली.

दीक्षान्त समारंभाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश, माजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.

राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत सहावा उमेदवार निवडणूक आणल्याने फडणविसांचे पक्षात कौतुक

0

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्य’नीतीला सलाम! आनंद रेखी

पुणे-अत्यंत अभ्यासू, विरोधकांच्या राजकीय डावपेचांना धुव्वा उडवणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्यांच्या बुद्धीचार्तुयाने महाविकास आघाडीला ‘चित’ केले आहे. अत्यंत अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीत संघटन तसेच नेतृत्व कौशल्याच्या बळावर ‘गणितशास्त्रा’चा चपखल बुद्धीकौशल्याने वापर करीत फडणवीस यांनी भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आणला, यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, अशा शब्दात भाजप नेते आनंद रेखी यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे देखील त्यांनी विशेष आभार मानले आहे.

राज्यसभेतील विजय म्हणजे ​भाजपच्या नेतृत्वातील सरकारवर जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा असलेल्या अतुट विश्वासाचे प्रतिक आहे.जनमताचा अनादर करणार्या महाविकास आघाडी सरकारला हा अप्रत्यक्षरित्या जनतेनेच शिकवलेला धडा असल्याचे रेखी म्हणाले. मा.फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींकडे निवडणुकीत सहावा उमेदवार उभा करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना परवागनी दिली.

पक्षाने दाखवलेल्या विश्वासाचे सोनं करीत फडणवीस यांनी निवडणूक कौशल्याच्या बळावर ‘चाणक्य’नितीनूसार सहावे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांना निवडून आणले. या निवडणुकीत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्यावर दाखवलेला विश्वास पक्षातील नेत्यांनी मेहनत आणि संघटनात्मक कार्यानी सार्थकी ठरला.पंतप्रधान आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी देखील महाराष्ट्राच्या नेतृत्वात विश्वास ठेवून त्यांना बळ दिल्याने त्यांचे आभार यानिमित्ताने रेखी यांनी व्यक्त केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील अशाचप्रकारे फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप महाविकास आघाडी सरकारचा घुव्वा उडवेल, असा दावा देखील यानिमित्ताने रेखी यांनी केला.

तांदूळ व डाळ महोत्सवात4 लाख रुपयांची उलाढाल

0

महिला स्वयंसहाय्यता समूहांकडून खरेदीला पुणेकरांची पसंती

पुणे, दि. 11: पुणे जिल्हा परिषद व उस्मानाबाद जिल्हा परिषद तसेच पुणे आणि उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवात एकूण 4 लाख 3 हजार 200 रुपयांची विक्रीची उलाढाल झाली. पुणेकरांनी महोत्सवात खरेदीला पसंती दिली, अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषद येथे 9 व 10 जून असे दोन दिवस तांदूळ व डाळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतीअभियान’मार्फत महिला स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता.

महोत्सवामध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित इंद्रायणी तांदूळ, आंबेमोहोर, कोलम, काळा तांदूळ, काळा गहू आणि उडीद, मटकी, मूग, हरभरा, तूर डाळ व  राजमा विक्रीस ठेवण्यात आला होती. पुणे जिल्ह्यातील एकूण 10 महिला स्वयंसहायताकडून दोन दिवसांमध्ये 1 लाख 67 हजार 700 रुपये एवढी उलाढाल झालेली आहे. तसेच 250 किलोग्रॅम तांदळाची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 5  महिला स्वयंसहायता समूहांची 2 लाख 35 हजार 500 रुपयांची डाळीची विक्री झाली आहे.

या महोत्सवास भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाचे संचालक राघवेंद्र सिंग, ‘उमेद’, नवी मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उस्मानाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (विकास) विजय कुमार मुळीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबादच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी महोत्सवास भेट देऊन खरेदी केली.

या महोत्सवाचे यशस्वी आयोजनामागे उमेद पुणेचे अधिकारी व कर्मचारी व उमेद उस्मानाबादचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

“देहविक्रीला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या”, अमृता फडणवीसांची पुण्यात मागणी

0

पुणे-माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली. तसेच इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या पुण्यात शनिवारी (११ जून) दुपारी १ वाजता बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी देहविक्री व्यवसायातील महिलांसमोर त्या बोलत होत्या.अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी सरकारला असंच सांगेन की जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याप्रमाणे देहविक्री व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्विकारलं पाहिजे. जर्मनीसारख्या देशांमध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचं आदरणीय स्थान आहे. देहविक्री व्यवसाय करणारे या देशांमध्ये कर देखील भरतात. तेच स्थान आपण सर्वजण एकत्र आलो तर भारतात देखील मिळू शकतं. मी या निर्णयाच्या पाठीशी आहे.”

“तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे कितीही घाई असेल तर देहविक्री व्यवसायातील महिलांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी. तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यात काही आजार होण्याचा धोका असतो, तो धोका ओळखा. तसेच नियमितपणे आपली तपासणी करून घ्या. त्यासाठी तुमच्यामागे भारतीय जनता पक्ष उभा आहे,” असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, “आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलांसाठी बचत करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची गरज असते. त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मात्र, तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका.”

“योगा करणं सर्वांनी गरजेचं आहे. तुम्ही सर्वजण तयार असाल तर मी तुमच्यासाठी चांगले प्रशिक्षक आणून तुमचे योगा सेशन घेईन. तुम्ही हा योगा घरी केला तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तंदुरुस्त राहाल. आम्ही बुधवार पेठेतील तुमच्या भागात हवं तिथं योगा क्लासेस उपलब्ध करून देऊ,” असंही अमृता फडणवीसांनी नमूद केलं.

दिल्ली भाजपचे माजी आयटी सेल प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

0

पुणे -प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नवीनकुमार जिंदाल यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी झाकीर इलियास शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जिंदाल यांच्याविरोधात राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचविणे, धार्मिक भावना दुखावणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंदाल यांनी एक जून रोजी हे वादग्रस्त ट्वीट करत विशिष्ट धर्मियांच्या भावना दुखावल्या, असे फिर्यादीत नमूद आहे. भाजपचे दिल्लीतील माध्यम प्रभारी असताना जिंदाल यांनी केलेल्या या ट्वीटनंतर देशातून, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे पक्षाच्या धोरणाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भाजपने जिंदाल यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे

शेख यांनी तक्रारीत सांगितले आहे की, जिंदाल यांनी 1 जून रोजी आक्षेपार्ह ट्वीट करत मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहे. मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात आम्ही अर्ज दाखल केला असून यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आहे.

पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

0

पुणे-स्पा तसेच मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश सामाजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी संध्याकाळी केला. याप्रकरणी सहा जणांना अटक करताना तब्बल अकरा जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी चार मणीपुरी तरुणींचीही सुटका करण्यात आली.

मालकाचा शोध सुरू

स्पा सेंटरचे सहायक व्यवस्थापक जूनेल हुसेन इलास अली (वय 32), राय सोलोमन (वय 26), विजय सुनील पवार (वय 22), स्टिफन खांगबा रांग (वय 25), महमद फुजेल अहमद सीराजिल हक (वय 22) आणि काबूल हुसेन अमीर अली चौधरी (वय 26) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत. तसेच अमोल दिलीप रामगडे (मॅनेजर), स्पा सेंटरचे मालक नौशाद शेख, सुधीर पाटील, अमित प्रताप डोमले, राजू बाळकृष्ण शेडगे यांचा पोलिस शोध घेत आहेत.

एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली…

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांनी सांगितले, गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीतील नॉर्थमेन रोडवर लिबर्टी सोसायटीतील फेज 2 मध्ये गोल्डन ओक स्पा, मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बनावट गिर्‍हाईक पाठवून सापळा रचण्यात आला. या ठिकाणी पीडित मुलींकडून मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसचे नावाखाली वेश्या व्यावसाय चालत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सहा जणांना अटक करण्यात आली. तर चार तरुणींची सुटका करण्यात आली.

गोल्डन ओक स्पामध्ये मालीश व स्पा बरोबरच लोकांना एक्स्ट्रा सर्व्हिसेस नावाखाली महाविद्यालयीन तरुणींमार्फत खुल्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करीत असल्याचे समजले होते. यासाठी त्यांनी वेबसाईटवर एक उत्तेजक लेख लिहून वेबपेजवर अपलोड केले होते. या छाप्यात कारवाई करण्यात आलेला गोल्डन ओक स्पाचा व्यवस्थापक अमोल दिलीप रामगडे हा झिरो पोलिसिंगचे देखील काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

स्वयंचलित ई-रथ वाहनाची निर्मिती

0

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे यश

पुणे,दि.११: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंचलित ई-रथ वाहनाची निर्मिती केली आहे. रिमोट ड्रायव्हेबिलिटी आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग क्षमता असलेली चार चाकी ई-रथ इलेक्ट्रिक वाहन यशस्वीरित्या डिझाइन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, इंजिनिअरींग विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ. भरत चौधरी, डॉ. अनिल हिवाळे, डॉ. विनया गोहोकर, डॉ. अनुराधा फडके, डॉ. सुनिल सोमाणी व डॉ. जी.एन.मुळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या वाहनाची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मिरज इनामदार, प्रज्वल वेर्णेकर, साईबाबा नरगुंद, प्रथमेश वाणी सहित मेकॅनिकल विभागाचे विद्यार्थी अद्वैत उटगीकर, सौमित्र महाजन व पूर्वा अपराज यांनी केली आहे. यांना डॉ अल्का एस. बारहत्ते आणि प्रा. पी.एस. महाजनी यांनी मार्गदर्शन केले.
ई-रथ मॅन्यूअल ड्राइव्ह तसेच संगणक आणि रेडिओ नियंत्रणाद्वारे रिमोट ड्राइव्ह करण्यास सक्षम आहे. यात ओपन डिफरेंशियल एक्सल असलेली इलेक्ट्रिक मोटर असून जी ड्रम ब्रेक सह येते. याची ऑनबोर्ड लोड क्षमता २०० किलोग्रॅम आणि टोइंग क्षमता ३०० किलोग्रॅम आहे. ३० किमी प्रतितास वेगमर्यादा असून यात डयुअल अ‍ॅप्लिकेशन मेकॅनिझममुळे अद्वितीय ब्रेक असेब्ली आहे. त्यामुळे मॅन्युुअल आणि रिमोट दोन्ही मोडमध्ये बोल्ट ऑफ प्रक्रियेसह हे वाहन वापरले जाऊ शकते.
ओसीएम इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टीयरिंग सिस्टम याची विशेषता आहे. दिशा नियंत्रित करण्यासाठी रिमोट मोडमध्ये अखंडपणे वापरली जाऊ शकते. थ्रॉटल यंत्रणा दुहेरी चॅनल प्रणालीमध्ये देखील सुधारणा केली गेली आहे. यात भौतिक पेडल्स व ऑनबोर्ड संगणकावरून इनपूट प्राप्त होते. यामुळे वाहनाचे लोकोमोशन सोपे व अधिक कार्यक्षम बनते.
विद्यार्थी प्रज्वल वेर्णेकर म्हणाला,“ विद्युत वाहन निर्मितीमध्ये अनेक नावीन्यपूर्ण संशोधन होत आहे. तोच प्रयत्न आम्ही केला आहे. माझ्यातील ऑटोमोटिव्ह संदर्भातील ज्या कल्पना आहेत त्याला सत्यात उतरविण्यास आकार दिला गेला आहे.”
मिराज इनामदार म्हणाला,“ ही माझ्यासाठी एक उत्तम संधी होती. वाहनांमधील बदल पाहताना मॅन्युअल ते स्वायत्ता असा बदल ही आता दूर नाही. कमी कालावधीत, मार्यादित निधी आणि प्रत्येक पायरीवरील गुंतागुंत लक्षात घेतली आहे. मला मिळालेल्या संधी बद्दल आभारी आहे.”
साईबाबा निरगुड म्हणाला,“ या प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये आमूलाग्र बदल करूनही, विविध यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि सॉफ्टवेअर प्रणालीच्या एकत्रिकरण आणि अंमलबजावणी करणे एक मोठे आव्हान आहे. ”