Home Blog Page 1933

बीएमसीसीत ‘बीकॉम फिनटेक’ माहिती-तंत्रज्ञानासह वाणिज्य- व्यवस्थापन अभ्यासक्रम

0

पुणे, ता. १० – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी)’बीकॉम फिनटेक’ (फायनान्शिअल टेक्निकल) हा माहिती-तंत्रज्ञानासह वाणिज्य-व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार असल्याची माहिती बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी कळविली आहे.

पुरोहित म्हणाल्या, ‘बाजारपेठेच्या बदलत्या गरजा लक्षात घेता वाणिज्य, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा एकत्रित विचार करून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमात व्यवस्थापन आणि अकौंटिंगचे मूलभूत विषयांसह डेटा अनॅलिसिस, फायनान्शिअल क्वान्टेटिटिव्ह अप्टिट्यूट, फायनान्शिअल मोडेलिंग, बिग डेटा अनॅलिसिस, अ‍ॅडव्हान्स बॅकिंग सर्व्हिसेस, सायबर सिक्युरिटी आदी तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याधारित विषयांचा समावेश आहे.

प्रवेशासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची बारावीची परीक्षा गणित या विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम १६० क्रेडिट गुणांचा असणार आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पदवी दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी https://www.bmcc.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोपा विमानतळ 1 सप्टेंबर 2022 पासून संचलनासाठी सज्ज असल्याची जीएमआर ग्रूपची माहिती

0

आगामी 3-4 महिन्यांत आयुष रुग्णालयाचे उद्घाटन शक्य- श्रीपाद नाईक

पणजी, 10 जून 2022

केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल आणि केंद्रीय पर्यटन तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पेडणे येथील आयुष रुग्णालय आणि मोपा विमानतळाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. केंद्र सरकारला सत्तेत 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध विकासकामांची माहिती घेण्यासाठी केंद्रीय मंत्र बघेल गोवा दौऱ्यावर आहेत.

एस पी सिंह बघेल यांनी आयुष रुग्णालयाची गोव्यात उभारणी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. गोव्यासाठी एवढा अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त आयुष रुग्णालयाचा प्रकल्प आणण्यासाठी श्रीपाद नाईक यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे बघेल म्हणाले.

श्रीपाद नाईक यांनी 2014 मध्ये नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या आयुष मंत्रालयाचे काम करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. या आयुष रुग्णालयामुळे गोव्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे नाईक म्हणाले. आयुष रुग्णालयाचे आगामी 3-4 महिन्यात उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

250 खाटांचे रुग्णालय आणि दरवर्षी 500 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी शिक्षण यातून देण्यात येईल. तसेच या रुग्णालयात 100 खाटा निसर्गोपचारासाठी असतील. योग रुग्णालयात मधुमहे, ह्रदयरोग तपासणी विभाग असणार आहे. तसेच आयुर्वेद, निसर्गोपचार आणि योग रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुविधा असणार आहे. यात डॉक्टरांसाठी 67 खोल्या आणि विद्यार्थ्यांसाठी 91 खोल्यांची सोय करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचा खर्च 301 कोटी रुपये असून याच्या उद्घाटनानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

दोन्ही मंत्र्यांनी मोपा विमानतळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी जीएमआर ग्रूपकडून तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. विमानतळ संचलनासाठी 1 सप्टेंबर 2022 पासून तयार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. आग्रा-गोवा हवाईमार्गाने जोडल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळेल, असे बघेल यांनी यावेळी सांगितले.

“दुहेरी इंजिनचे सरकार गुजरातमधील गतिमान आणि सर्वसमावेशक विकासाची गौरवशाली परंपरा प्रामाणिकपणे पुढे नेत आहे”

0

नवसारी -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘गुजरात गौरव अभियान’ या कार्यक्रमात सहभागी झाले.त्यांनी आज नवसारी येथील आदिवासी भाग असलेल्या खुडवेल येथे ‘गुजरात गौरव अभियान’ दरम्यान अनेक विकास उपक्रमांचे लोकार्पण  आणि पायाभरणी केली.यामध्ये 7 प्रकल्पांचे लोकार्पण, 12 प्रकल्पांची पायाभरणी आणि 14 प्रकल्पांचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.हे प्रकल्प या भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी मदत करतील, तसेच संपर्क सुविधा वाढवण्यासाठी आणि जीवनमान  सुलभ करण्यासाठी सहाय्य  करतील. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र रजनीकांत पटेल, केंद्रीय आणि राज्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या जाहीर कार्यक्रमाला संबोधित  करताना,  कार्यक्रम स्थळी  मोठ्या प्रमाणात जमलेल्या आदिवासी लोकांबाबत पंतप्रधानांनी नमूद केले. अशा कार्यक्रमांचे आयोजन आदिवासी बंधू-भगिनींमधील निरंतर स्नेह दर्शवते, हे त्यांनी अभिमानाने नमूद केले. आदिवासींच्या कर्तृत्वाचा आणि करारीपणाचा  गौरव करत पंतप्रधान नवसारीच्या भूमीसमोर  नतमस्तक झाले.

गेल्या दोन दशकांत झालेला वेगवान आणि सर्वसमावेशक विकास आणि या विकासातून जन्माला आलेली नवी आकांक्षा हा  गुजरातचा अभिमान आहे. दुहेरी  इंजिनचे  सरकार ही गौरवशाली परंपरा प्रामाणिकपणे पुढे नेत आहे असे सांगत आजच्या प्रकल्पांमुळे दक्षिण गुजरातमधील सूरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यांमधील नागरिकांच्या जीवनमानात सुलभता येईल असे ते म्हणाले.

8 वर्षांपूर्वी गुजरातच्या जनतेने त्यांना दिल्लीत कशाप्रकारे  पाठवले होते, याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. गेल्या 8 वर्षात अनेक नव्या घटकांमधील  लोकांना आणि प्रदेशांना विकास प्रक्रियेशी आणि आकांक्षांशी  जोडण्यात सरकारला यश आले आहे, असे ते म्हणाले. एक काळ असा होता की, गरीब, वंचित, दलित, आदिवासी, महिला आणि अन्य  असुरक्षित घटक केवळ मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी  आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करावे लागायचे, याची त्यांनी आठवण करून दिली. यापूर्वीच्या सरकारांनी विकासाला प्राधान्य दिले नाही.बहुसंख्य गरजू घटक आणि प्रदेश सुविधांपासून वंचित होते.  गेल्या 8 वर्षात सबका साथ, सबका विकास या मंत्राला अनुसरून त्यांच्या सरकारने गरिबांच्या कल्याणावर, गरिबांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर सर्वाधिक भर दिला आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेद्वारे  गरीबांचे 100 टक्के सक्षमीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

कार्यक्रमासाठी मुख्य मंचावर पोहोचण्यापूर्वी, पंतप्रधानांनी आदिवासी समाजातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. जनता आणि लाभार्थी यांच्याशी असलेल्या संपर्कामुळे विकासाच्या पाठबळाला नवीन गती मिळते, असे ते म्हणाले.

गुजराती भाषेत बोलताना पंतप्रधानांनी स्थानिक लोकांसोबतच्या त्यांच्या दीर्घ सहवासाच्या आठवणी सांगितल्या.या प्रदेशात काम करत असताना लोकांचे  आदरातिथ्य आणि आपुलकी याचे त्यांनी स्मरण केले. “तुमची आपुलकी आणि आशीर्वाद हेच माझे सामर्थ्य आहे”, असे पंतप्रधानांनी  तो सगळा काळ डोळ्यासमोर आणत सांगितले.   आदिवासी समाजातील मुलांना शक्य त्या सर्व संधी मिळाव्यात असे सांगत  त्यांच्यातील स्वच्छता, ज्ञान , संघटन आणि शिस्त या गुणांची  त्यांनी नोंद घेतली. त्यांनी आदिवासी लोकांमधील समाज  जीवन आणि पर्यावरण संरक्षणाच्या मूल्यांबद्दलही सांगितले.आदिवासी भागात पाणी मिळणे सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला. पूर्वी जेव्हा पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासारखी छोटीशी गोष्ट  ठळकपणे प्रसिद्ध व्हायची त्या काळा पेक्षा आजचे  3  हजार कोटींहून अधिक खर्चाचे  प्रकल्प अगदी विरुद्ध आहेत, असे ते म्हणाले. निरंतर कल्याण  आणि विकासाचे प्रकल्प दीर्घकाळापासून त्यांच्या शासन शैलीचा भाग आहेत आणि हे प्रकल्प लोकांच्या कल्याणासाठी आणि गरीब कल्याणासाठी असून ते कोणत्याही निवडणूक विचाराच्या पलीकडे आहेत, असे ते म्हणाले.  शुद्ध पाणी मिळावे हा कितीही दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक गरीबाचा , प्रत्येक आदिवासीचा  हक्क आहे,म्हणूनच असे मोठे प्रकल्प हाती घेतले जातात, प्रकल्प वेळेवर सुरु करण्यासाठीच्या  कार्यसंस्कृतीत मोठा बदल झाल्यामुळे प्रकल्पांची  पायाभरणी आणि लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झाले,ही पंतप्रधानांच्या  उत्कृष्टतेची छाप असल्याचे त्यांनी सांगितले. ” सरकारमध्ये राहणे ही आम्ही सेवा करण्याची संधी मानतो”, यावर त्यांनी भर दिला.  जुन्या पिढीला भेडसावणाऱ्या समस्या आमच्या नवीन पिढीला भेडसावू नयेत यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.त्यामुळेच या योजना सर्वांसाठी शुद्ध पाणी, दर्जेदार शिक्षण या मूलभूत सुविधा सुनिश्चित करत आहेत, असे ते म्हणाले.त्यांनी त्या काळची आठवण करून दिली जेव्हा या प्रदेशात एकही विज्ञान शाळा नव्हती तर आता इथे वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठे येत आहेत.दुर्गम  भागात पायाभूत सुविधा, शिक्षण, व्यवसाय, कनेक्टिव्हिटी संबंधित योजनांद्वारे जीवनमानात परिवर्तन होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.नैसर्गिक शेतीचा अवलंब करणारा  डांग जिल्हा आणि दक्षिण गुजरातचीही त्यांनी यावेळी प्रशंसा केली. मातृभाषेतून शिक्षण, अगदी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी सारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांसाठीही इतर मागासवर्गीय, आदिवासी मुलांसाठी संधी खुल्या  होतील, असे ते म्हणाले.वनबंधू योजनेचा नवीन टप्पा राबविल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारची प्रशंसा केली. आम्ही सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि न्याय्य विकासासाठी कार्यरत आहोत, असे पंतप्रधांनीं आपल्या भाषणाचा समारोप करता सांगितले.

तापी, नवसारी आणि सूरतजिल्ह्यातील रहिवाशांसाठी 961 कोटी रुपये खर्चाच्या  13 पाणीपुरवठा प्रकल्पांचे  भूमिपूजन पंतप्रधानांनी केले.नवसारी जिल्ह्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन त्यांनी केले,हे महाविद्यालय सुमारे  542 कोटी रुपये  खर्चून बांधण्यात येणार असून  या प्रदेशातील लोकांना स्वस्त आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात मदत करेल.

सुमारे  586 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या   मधुबन धरणावर आधारित  अस्टोल प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.पाणी पुरवठा अभियांत्रिकी कौशल्याचा हा एक चमत्कार आहे.तसेच, 163 कोटी रुपये खर्चाच्या  ‘नल से जल’ प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

हे प्रकल्प सुरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यातील रहिवाशांना सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देतील.

तापी जिल्ह्यातील रहिवाशांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी 85 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वीरपूर व्यारा उपकेंद्राचे  पंतप्रधानांनी उद्घाटन केले.सांडपाणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वलसाड जिल्ह्यातील वापी शहरासाठी  20 कोटी रुपये मुळ्याच्या  14 एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले.पंतप्रधानांनी नवसारी येथे 21 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधलेल्या सरकारी निवास्थानांचे उद्घाटन केले. त्यांनी पिपळदेवी – जुनेर – चिचविहीर – पिपळदहाड या रस्त्यांचे आणि  डांगमध्ये प्रत्येकी 12 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या शाळांच्या इमारतींचे उद्घाटनही त्यांनी केले.

सुरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यातील रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी  549 कोटी रुपये खर्चाच्या  8 पाणीपुरवठा प्रकल्पांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली.नवसारी जिल्ह्यात 33 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या खेरगाम आणि पिपळखेड यांना जोडणाऱ्या रुंद रस्त्याची पायाभरणीही करण्यात आली. नवसारी ते बारडोली मार्गे सुपा दरम्यान सुमारे 27 कोटी रुपये खर्चून आणखी एक चौपदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. डांग येथे 28 कोटी खर्चाच्या जिल्हा पंचायत भवनाची आणि 10 कोटी खर्चाच्या रोलर क्रॅश बॅरियर लावण्याच्या कामाचे भूमिपूजनाही पंतप्रधानांनी केले.

भारताच्या मद्य निर्यातीला चालना देण्यासाठी  लंडन मद्य मेळाव्यात अपेडाचा  सहभाग

दहा भारतीय मद्य निर्यातदार या मेळाव्यात  सहभागी

2020-21 मध्ये भारताने 322.12 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीची अल्कोहोलिक उत्पादने निर्यात केली

भारताच्या मद्य  निर्यातीला चालना देण्यासाठी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील  कृषी आणि प्रक्रियायुक्त  अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणने  (अपेडा)  लंडन इथल्या मद्य मेळाव्यात दहा निर्यातदारांना सहभागी केले आहे.

7-9 जून दरम्यान लंडन इथे मद्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा  जगातील सर्वात महत्त्वाच्या मद्य व्यापार कार्यक्रमांपैकी एक मानला जातो.

लंडन इथे मद्य मेळाव्यात सहभागी झालेल्या भारतीय निर्यातदारांमध्ये रेझवेरा वाईन, सुला वाईनयार्ड्स, गुड ड्रॉप वाईन सेलर्स, हिल झिल वाईन्स, केएलसी वाईन्स, सोमा वाईन  व्हिलेज, ग्रोव्हर झाम्पा वाईनयार्ड, प्लॅटॉक्स विंटनर्स, ASAV वाईनयार्ड्स आणि फ्रॅटेली वाईनयार्ड्स यांचा समावेश आहे.

भारत ही  अल्कोहोलिक पेयांसाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ असून , धान्य-आधारित अल्कोहोलिक पेये बनवण्यासाठी  वार्षिक 33,919 किलो-लिटर  परवानाधारक क्षमता असलेल्या 12 संयुक्त उपक्रम कंपन्या आहेत. भारत सरकारच्या परवान्याअंतर्गत सुमारे 56 कंपन्या बिअरचे उत्पादन घेत  आहेत.

भारताने 2020-21 मध्ये 322.12 दशलक्ष डॉलर्स किमतीची 2.47 लाख मेट्रिक टन अल्कोहोलिक उत्पादने जगभरात निर्यात केली आहेत. 2020-21 मध्ये भारतीय अल्कोहोलिक उत्पादने संयुक्त अरब अमिराती, घाना, सिंगापूर, काँगो आणि कॅमेरून आदी देशांना निर्यात करण्यात आली.

महाराष्ट्रात  35 हून अधिक वाईनरीज असल्यामुळे  महाराष्ट्र हे मद्य उत्पादनासाठी महत्त्वाचे राज्य बनले आहे. महाराष्ट्रात मद्य निर्मितीसाठी  सुमारे 1,500 एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीसाठी वापरले जाते. मद्य निर्मितीला चालना देण्यासाठी, राज्य सरकारने मद्य  निर्मिती व्यवसायाला लघु उद्योग म्हणून घोषित केले आहे आणि अबकारी दरात  सवलत देखील दिली आहे.

माल्टपासून बनवलेली बिअर , वाईन, व्हाईट वाईन, ब्रँडी, व्हिस्की, रम, जिन सारख्या भारतातील अल्कोहोलिक पेयांची  मागणी जागतिक बाजारपेठेत अनेक पटींनी वाढली आहे.

अपेडाने भारतीय मद्याच्या क्षमतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यांमध्ये  अनेक कार्यशाळा आणि वाइन टेस्टिंग कार्यक्रम  आयोजित केले आहेत.

भारतीय मद्य निर्मिती  उद्योगाची  2010 ते 2017 या कालावधीत 14 टक्क्यांच्या चक्रवाढ वार्षिक वृद्धी  दराने वाढ झाली  असून हा देशातील अल्कोहोलिक पेये अंतर्गत सर्वात वेगाने वाढणारा उद्योग बनला आहे.

फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल केंद्राने उचलली कठोर पावले , मार्गदर्शक तत्वे जाहीर

0

नवी दिल्ली – ग्राहक व्यवहार विभागांतर्गत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच जाहिरातींमुळे  शोषण झालेल्या किंवा प्रभावित झालेल्या ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना प्रतिबंध आणि दिशाभूल करणार्‍या जाहिरातींचे  समर्थन याबाबत  मार्गदर्शक तत्त्वे 2022’ अधिसूचित केली  आहेत.

मार्गदर्शक तत्त्वांमुळे हे सुनिश्चित होईल की  तथ्यहीन  दावे, अतिशयोक्तीपूर्ण आश्वासने, चुकीची माहिती आणि खोटे दावे यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार  नाही. अशा जाहिराती माहिती मिळण्याचा अधिकार, निवडण्याचा अधिकार आणि संभाव्य असुरक्षित उत्पादने आणि सेवांपासून संरक्षण मिळण्याचा  अधिकार यासारख्या ग्राहकांच्या विविध हक्कांचे उल्लंघन करतात.

ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन, अनुचित व्यापार पद्धती आणि सार्वजनिक आणि ग्राहकांच्या हितासाठी प्रतिकूल अशा  खोट्या किंवा दिशाभूल करणार्‍या जाहिरातींचे नियमन करण्यासाठी आणि एक वर्ग म्हणून ग्राहकांच्या हक्कांचा प्रचार , संरक्षण  आणि अंमलबजावणी  करण्यासाठी  ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 10 अंतर्गत सीसीपीएची स्थापना करण्यात आली आहे.

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 18 द्वारे सीसीपीएला बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करून मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित करण्यात आली आहेत.

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2(28) अंतर्गत दिशाभूल करणारी जाहिरात याआधीच परिभाषित केली  आहे.

सध्याची मार्गदर्शक तत्त्वे “प्रलोभन  जाहिरात”, “प्रचार  जाहिरात” परिभाषित करतात आणि “मुक्त दावा जाहिराती” म्हणजे काय ते स्पष्ट  करतात.

लहान मुलांची संवेदनशीलता आणि असुरक्षितता तसेच  जाहिरातींचे लहान मुलांच्या  मनावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन, लहान मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात याआधीच अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वे जाहिरातींना अशा प्रकारे एखाद्या उत्पादनाची   किंवा सेवेची वैशिष्ट्ये याबाबत अतिशयोक्ती करण्यापासून प्रतिबंधित करतात , ज्यामुळे मुलांच्या अशा उत्पादन किंवा सेवेबाबत अवास्तव अपेक्षा असतात आणि मान्यताप्राप्त संस्थेकडून   वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध न करता  आरोग्य किंवा पोषण विषयक दावे केले जातात.  कोणत्याही कायद्यानुसार अशा जाहिरातींसाठी आरोग्यविषयक इशारा  आवश्यक आहे किंवा मुले खरेदी करू शकत नाहीत अशा उत्पादनांना  मुलांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात येणाऱ्या  जाहिरातींमध्ये  क्रीडा, संगीत किंवा चित्रपट  क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला दाखवता येणार नाही, असे मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जाहिरातींमधील अस्वीकरण (डिस्क्लेमर )ग्राहकांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची भूमिका बजावते ,एक प्रकारे ते कंपनीची जबाबदारी मर्यादित करते.त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की, अस्वीकरणअशा जाहिरातीत केलेल्या कोणत्याही दाव्याच्या संदर्भात भौतिक माहिती लपवण्याचा प्रयत्न करणार नाही,ज्याच्या वगळण्यामुळे  किंवा न दिल्यामुळे  जाहिरात फसवी होण्याचाही किंवा व्यावसायिक हेतू लपविण्याची शक्यता आहे आणि जाहिरातीमध्ये केलेला  दिशाभूल करणारा दावा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार नाही.  अस्वीकरण हे जाहिरातीत केलेल्या दाव्याच्या भाषेत  असेल आणि अस्वीकरणामध्ये वापरलेलेलया अक्षरांची रचनादेखील(फॉन्ट)  दाव्यामध्ये वापरल्याप्रमाणेच असेल, असे या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, निर्माता, सेवा प्रदाता , जाहिरातदार आणि जाहिरात संस्थांसाठी  कर्तव्य पूर्ततेच्या अनुषंगाने, मान्यता देण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे आणि इतर    स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. जाहिराती ज्या प्रकारे प्रकाशित केल्या जात आहेत त्यामध्ये अधिक पारदर्शकता आणि स्पष्टता आणून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट आहे,जेणेकरून खोट्या कथा आणि अतिशयोक्ती ऐवजी ग्राहक तथ्यांवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम होतील.

मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास  दंड देखील स्पष्टपणे दर्शवण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण कोणत्याही दिशाभूल करणार्‍या जाहिरातींसाठी उत्पादक, जाहिरातदार आणि अनुमोदकांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावू  शकते.त्यानंतरच्या उल्लंघनांसाठी, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण 50 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते.प्राधिकरण दिशाभूल करणार्‍या जाहिरातीचे समर्थन करणार्‍याला 1 वर्षापर्यंत कोणतेही अनुमोदन  करण्यास प्रतिबंध करू शकते आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी, प्रतिबंध 3 वर्षांपर्यंत वाढू शकतो.

मार्गदर्शक तत्त्वे येथे पाहता येतील 

https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/file-uploads/latestnews/CCPA%20Notification.pdf

पैशांइतकेच श्रम, वेळ व गुणवत्ता महत्वाचे-अब्राहम स्टेफनोस

0

सारस डायलेसिस सेंटरला टाटा स्टीलकडून मदत
पुणे : “जसे आपण समाजाकडून घेतो, तसे आपण समाजाचे देणेही लागतो, याची जाण असणे आवश्यक असते.  अलीकडे समाजासाठी काही करायचे म्हणजे पैसे द्यायचे, हा सोपा मार्ग अवलंबला जातो. पण त्याच सामाजिक कार्यासाठी पैशाबरोबर स्वतःचे श्रम, वेळ आणि गुणवत्ता देणेही तितकेच महत्वाचे आहे. हे महत्वाचे काम सारस डायलिसिस सेंटरमध्ये होताना दिसत आहे,” असे प्रतिपादन टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक अब्राहम स्टेफनोस यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरीटेबल ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या सारस डायलिसिस सेंटरला टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्सच्या वतीने साधारण दोन लाख ७५ हजार रुपयांचे डायलिसिस साहित्य भेट देण्यात आले. यात २७५ डायलझर व ४३३ डायलझर ट्युबिंगचा समावेश आहे. येथील व्यवस्था, स्वच्छता व दर्जेदार सुविधा केवळ २०० रुपयात दिली जाते, हे पाहून सर्वजण भारावून गेले.

यावेळी टाटा स्टील डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्सचे सरव्यवस्थापक वेंकट पामपटवार, लायन्स क्लब ऑफ पुना चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन फतेचंद रांका, उपाध्यक्ष तुषार मेहता, आशा ओसवाल, सचिव प्रशांत कोठाडिया, लायन्स क्लबच्या अध्यक्षा दीपाली गांधी, खजिनदार पूनम अष्टेकर, डिस्ट्रिक्ट झोन अध्यक्ष दीपक सेठिया आदी सदस्य उपस्थित होते.

अब्राहम स्टेफनोस म्हणाले, “काम उत्तम असेल तर देणगी आपसूक मिळते. तुम्हाला देणगीदार शोधण्याची फारशी गरज पडत नाही. प्रत्यक्ष कार्य करणारे सारस डायलेसिसचे सर्व कार्यकर्ते आमचे हिरो आहेत. अशा सामाजिक कार्यातच ईश्वर सापडतो, असे मला वाटते. या कार्याचा मला भाग होता आले याचा आनंद आहे.” वेंकट पामपटवार यांनी डायलेसिस सेंटरतर्फे देण्यात येणाऱ्या सेवेचे कौतुक केले. तसेच टाटा समुहाच्या विविध सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. या क्लबसोबत आता कायमचे नाते जोडले गेल्याच्या भावना ही त्यांनी व्यक्त केल्या.

“देणगीतून मिळालेल्या या साहित्याचा उपयोग गरजू रुग्णांसाठी मोफत उपचारासाठी केला जाईल. या सहकार्याबद्दल टाटा समूहाचे आभार मानतो. गेली १४ वर्षे हे डायलेसिस सेंटर सुरु आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना येथे प्राधान्य दिले जाते. कोरोना काळातही हे एकमेव सेंटर चालू होते. या काळात रुग्णांकडून कुठलेही शुल्क घेतले नाही,” असे फतेचंद रांका यांनी नमूद केले.

क्लबमार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येतात. अजूनही काही सामाजिक प्रकल्प हाती घेण्यात येत असून, त्यांना साकार करण्यासाठी टाटा स्टीलने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही रांका यांनी केले. यावेळी टाटा ग्रुपच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. संस्थेचे उपाध्यक्ष तुषार मेहता यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव प्रशांत कोठाडिया यांनी आभार मानले.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

0

पुणे, दि. 10: राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही त्यांनी तात्काळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागेवर प्रवेश घ्यायचा असल्यास त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः ३ महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते.

वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

कुलसचिवांवर कारवाई होणार-आपचे ठिय्या आंदोलन मागे

0

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेसमोर दोन्ही विषय मांडणार असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचे लेखी आश्वासन

पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत बंदिस्त करण्याचे काम तातडीने थांबवावे व भ्रष्ट कुलसचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, विद्यापीठ अपहार निधीची वसुली करावी या मागण्यांसाठी काल विद्यापीठामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दीपक जाधव, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे, आपचे रोहन रोकडे, ॲड दत्तात्रय भांगे, निलेश वांजळे, अक्षय शिंदे, ॲड आशिष ताम्हाणे तसेच आजी-माजी विद्यार्थी अभ्यास गटाचे सतीश पवार, श्रीकांत मिश्रा, सुरेश देवढे, महावीर साबळे, अनिल गायकवाड, कमलाकर शेटे आदी उपस्थित होते.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी सांगितले कि,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इमारत आवारात विद्यार्थी व नागरीकांनी येऊ नये म्हणून हा परिसर बंदिस्त करण्याचे काम काल अचानक सुरु केले होते. हे काम पूर्ण बेकायदेशीर व विद्यार्थी विरोधी आहे. तसेच पुणे महापालिकेने देखील यापूर्वीच या कामाला स्थगिती दिली असून देखील काल संध्याकाळी अचानक पुणे विद्यापीठ कूलसचिवांकडून विद्यापीठाची मुख्य इमारत बंदिस्त करण्याचे काम सुरु केले. ही बातमी समजताच आम आदमी पक्ष आणि आजी-माजी विद्यार्थी अभ्यास गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सदर बांधकाम तात्काळ थांबवावे यासाठी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

यापूर्वीही असे बांधकामाचे प्रयत्न झाले होते आणि त्यावेळी विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाच्या दबावानंतर हे काम रद्द केल्याचे तत्कालीन कुलगुरू डॉ करमळकर यांनी विद्यार्थी संघटनांना सांगितले होते. तरीदेखील काल अचानक पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. पण ठिय्या आंदोलनानंतर प्र- कुलगुरु डॉ सोनवणे यांच्या आदेशानंतर हे काम थांबवण्यात आले.

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी बेकायदेशीरपणे दरमहा 50 हजार रूपयांची वेतनवाढ तीन वर्षे घेतल्याचे पत्र उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला पाठवले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ फंडाचा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे कुलसचिवांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवावे. अपहाराची सर्व रक्कम त्यांच्याकडून वसूल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ सोनवणे यांच्या सोबत आंदोलकांची सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर विद्यापीठाची मुख्य इमारत बेकायदेशीररीत्या बंदिस्त करणाऱ्या व विद्यापीठ निधीचा वैयक्तिक वेतनवाढीसाठी अपहार करणाऱ्या भ्रष्ट कुल सचिवांवर कारवाई करणार आणि पुढील व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत निर्णय घेणार असे लेखी उत्तर डॉ सोनवणे यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

आम आदमी पार्टी पुणे शहराच्या बाराव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वानवडी येथे संपन्न.

0

पुणे- आम आदमी पार्टी (आप) चे राज्य संघटक व पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या शुभहस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वानवडी येथील माने नगर येथे संपन्न झाले.सदर कार्यक्रमाचे आयोजन आप चे संभाव्य उमेदवार ऍड. मनोज माने आणि आपचे दिनेश जाधव यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे वानवडी-कौसरबाग (प्रभाग ४३) चे समन्वयक विद्यानंद नायक यांनी केले.

उद्घाटनपर मनोगतात कुंभार म्हणाले कि, पुणे शहराच्या अठ्ठावन्न प्रभागांमध्ये सर्वच्या सर्व १७३ जागा आम आदमी पार्टी जिंकण्यासाठी लढवणार असून त्याचा भाग म्हणून आजचे हे बारावे कार्यालयाचे उद्घाटन होते आहे. लोक निव्वळ पाठिंबा देत नसून आता स्वतःची साधनसंपत्ती सुध्दा पक्षासाठी देत आहेत, हि बाब पक्षाची लोकप्रियता सिध्द करत आहे.कराच्या पैशाचे सुयोग्य व्यवस्थापन करून पुणेकर नागरीकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे आम आदमी पक्षाचे धोरण आहे.

आपल्या मुलाला उच्च विद्याविभूषित करणाऱ्या मनोज माने यांच्या आईचा आप पक्षात पक्षप्रवेश कुंभार जींच्या हस्ते या सोहळ्यात करण्यात आलेला हि उल्लेखनिय बाब घडली.ह्या जनसंपर्क कार्यालयाच्या कार्यक्रमाला संपूर्ण पुणे शहरातील आप आदमी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमास सुदर्शन जगदाळे, अभिजीत परदेशी, घनशाम मारणे, असगर बेग, उमेश बागडे, आनंद अंकुश, माधुरीताई गायकवाड, किरण कांबळे, अभिजीत गायकवाड, फेबियन आण्णा सॅमसन, दत्ता जाधव, अनिल कोंढाळकर, पियुष हिंगणे, राहुल अग्रवाल, मैथिली मनकवाड, रविराज डोंगरे, रेणुका सुर्यवंशी, केदार ढमाले, रोहित आंधळे, आर्चबिशप सिन्हा, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, राजेंद्र नेने, अजय पैटणकर व इतर आप कार्यकर्ते आणि वानवडीतील स्थानिक नागरिक उपस्थितीत होते.

५०७ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ‘मरणोत्तर नेत्रदान संकल्प ‘

0

पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक दृष्टीदान  दिवसाचे औचित्य साधून मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रम पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात  झाला. ५०७ कार्यकर्त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचे फॉर्म भरुन संकल्प केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्षा डॉ.सुनिता मोरे व कै. खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने या नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार वंदनाताई चव्हाण, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप , माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी स्वतःचे मरणोत्तर नेत्रदानाचे फॅार्म भरुन या उपक्रमाचा शुभारंभ केला.या कार्यक्रमालाअंकुश काकडे,प्रदीप देशमुख, अॅड. भगवानराव साळुंखे हे मान्यवर उपस्थित होते..या उपक्रमास पक्षाचे पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

 पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दक्षिण गुजरातेत हॉस्पिटल कॉम्प्लेक्स आणि शिक्षण व कौशल-निर्माण कॅम्पसचे उद्घाटन

0
दक्षिण गुजरातमधील नवसारीमध्ये ५०० खाटांची क्षमता असलेलेअत्याधुनिकमल्टीस्पेशालिटी व कॅन्सर हॉस्पिटल कॉम्प्लेक्सखरेलमध्ये सुरु करण्यात आलेल्या उत्कृष्टता केंद्रामध्ये कौशल-निर्माण केंद्र तसेच प्राथमिकमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. 

 नवसारी, १० जून, २०२२:  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवसारीमध्ये ५०० खाटांची क्षमता असलेल्या, मल्टीस्पेशालिटी व कॅन्सर रुग्णालयांच्या कॉम्प्लेक्सचे तसेच दक्षिण गुजरातमधील खरेल गावामध्ये उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन पार पडले, या उत्कृष्टता केंद्रामध्ये एक कौशल-निर्माण केंद्र, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे.  मल्टीस्पेशालिटी आणि कॅन्सर रुग्णालये ही ८ एकर जागेमध्ये वसवण्यात आलेल्या ए एम नाईक हेल्थकेयर कॉम्प्लेक्सचा एक भाग आहेत, यामध्ये कंसल्टंट्स, स्पेशलिस्ट्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधांचा देखील समावेश आहे.  शाळांच्या जवळ विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे व शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी राहण्याच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्षपरोपकारासाठी सदैव झटणारेपद्म विभूषणाने सन्मानित करण्यात आलेले ए एम नाईक म्हणाले की, त्यांची स्वतःची परोपकार मूल्ये माननीय पंतप्रधानांच्या जनतेला परवडेल आणि सहज उपलब्ध होतील अशा आरोग्यसेवा, शिक्षण व कौशल प्रशिक्षण उपलब्ध करवून देण्याच्या उद्दिष्टांशी मिळतीजुळतीअनुरूप आहेत.

नाईक यांनी सांगितले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आज याठिकाणी आले याचा मला खूप आनंद होत आहे.  भारत आणि भारतातील लोकांच्या सेवेप्रती त्यांची अतीव निष्ठा खरोखरीच प्रेरणादायी आहे.  त्यांची ही दृढ निष्ठा इतरांनाही त्याचप्रकारे कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करते.” 

ते पुढे म्हणाले, “गरजू लोकांना मदत पुरवण्याचे काम माझ्या विश्वस्त संस्था यापुढे देखील सुरु ठेवतील आणि लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणत राहतील. या कार्यासाठी मी वचनबद्ध आहे. माझ्या विश्वस्त संस्थांकडून समाजाची सर्वतोपरी सेवा केली जावी यासाठी मी अथक मेहनत करत राहीन.”

नाईक यांनी २००९ मध्ये मध्ये स्थापन केलेल्या दोन विश्वस्त संस्थांनी रुग्णालये, शाळा व कौशल-निर्माण केंद्र सुरु केले आहे. गरजू व्यक्तींना आधुनिक आरोग्यसेवांचा लाभ घेता यावा यावर ‘निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट’चा भर असतो. ‘नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’मार्फत शिक्षण व कौशल-निर्माण सुविधा पुरवण्याचे कार्य केले जाते.

अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करवून देणारी ही रुग्णालये दक्षिण गुजरातसाठी मोठे वरदान ठरणार आहेत. अनेक वेगवेगळ्या, अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी ही रुग्णालये सर्वोत्तम आरोग्यसेवासुविधांच्या तोडीस तोड ठरतील.

निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये सर्वसाधारण वैद्यकीय सेवा, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, कार्डिओलॉजी आणि कार्डिओथोरॅसिक सर्जरी, नवजात बाळे तसेच लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार, ऑब्स्टट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी, ऑर्थोपेडिक उपचार, अतिगंभीर व आघात स्थितीमधील देखभाल सेवा यांच्यासह विविध वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात.

हेल्थकेयर कॉम्प्लेक्सचा एक भाग असलेल्या निराली कॅन्सर हॉस्पिटलचे भूमिपूजन २०१९ साली माननीय पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते.  २०२१ मध्ये गुजरातच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते.  या रुग्णालयात थ्रीडी मॅमोग्राफी, एक्सरे सुविधा तसेच न्यूक्लियर औषधांचा वापर करण्याच्या सुविधा यांच्यासह अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट

वैद्यकीय सेवा क्षेत्रात परोपकारी कार्य करण्यासाठी श्री. ए एम नाईक यांनी आपल्या व्यक्तिगत क्षमतेच्या बळावर निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची स्थापना केली. श्री. नाईक यांच्या नातीचे ‘निराली’ हे नाव ट्रस्टला देण्यात आले आहे जिचे कर्करोगामुळे वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी दुःखद निधन झाले. श्री. नाईक यांनी गुजरातमधील खरेल येथील सर्वसाधारण रुग्णालयात एक अतिरिक्त विंग उभारून तेथील वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात देखील मदत केली आहे. ए एम नाईक चॅरिटेबल हेल्थकेयर सेंटर या नावाने मुंबईतील पवई येथे एक नवी सुविधा देखील या ट्रस्टने स्थापन केली आहे. मुंबईतील जनतेला परवडण्याजोग्या किमतींमध्ये सर्वोत्तम दर्जाच्या वैद्यकीय देखभाल सेवा पुरवण्याचे कार्य याठिकाणी केले जाते.

नाईक चॅरिटेबल ट्रस्टसमाजातील वंचित समुदायांना उत्तम दर्जेदार शिक्षण सेवासुविधा पुरवण्याचे कार्य नाईक चॅरिटेबल ट्रस्टमार्फत (एनसीटी) केले जाते.

मल्लखांबमध्ये मुलांना सांघिक विजेतेपद ज्युदोमध्ये मिथिला भोसलेचा सुवर्णपंच

0

खेलो इंडिया युथ गेम्स

पंचकुला, (हरियाना) १० –
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लखांबच्या खेळाडूंनी केलेल्या चित्तथराक कसरती संघाला सुवर्णपदक देऊन गेल्या. दोन दिवसांपूर्वी मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. प्रारंभीपासून महाराष्ट्राची मदार मल्लखांबच्या संघावर होती. परंतु मुलींच्या संघाला रौप्यपदक मिळाल्याने महाराष्ट्र तालिकेत एक पदकाने हरियानाच्या मागे आहे. आज दुसरे सुवर्ण पदक ज्युदोमध्ये मिळाले. ४० किलो वजन गटात मिथिला भोसले हिने ही सुवर्ण कामगिरी केली. ती मूळ ठाण्याची असून सध्या बालेवाडी येथे ज्युदो अकादमीत सराव करते. तिने गुजरातच्या अर्चना नागेरा हिच्यावर विजय मिळवला.
प्रशिक्षक मधुश्री देसाई-काशीद, मंगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मिथलाचा सराव सुरू असतो. मंगेश भोसले हे तिचे वडील आहेत.
मुलांच्या मुल्लखांबच्या संघाला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या संघांकडून कडवे आव्हान मिळाले. ०.५ गुणांनी महाराष्ट्राचा संघ विजेता ठरला. महाराष्ट्राच्या विजेत्या संघाला १२६.४५ गुण मिळाले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मध्य प्रदेशने १२६.४० गुणांपर्यंत कडवी झुंज दिली. तिसऱ्या स्थानावर राहिलेला छत्तीसगडचेही १२४. ५० गुण होते.
महाराष्ट्राच्या संघाने रोप, पोल आणि हँगिंग या प्रकारात कसरती केल्या.
या संघामध्ये अवधूत पिंगळे (मुंबई), ऋषभ गुगळे (मुंबई), अथर्व कोंडविलकर (मुंबई), चेतन मानकर (नाशिक), मुग्रान पाठारे (मुंबई), अमेय सूर्ववंशी (पुणे) यांचा समावेश होता. रात्री आणि उद्या (शनिवारी) मल्लखांबचे वैयक्तिक क्रीडा प्रकार होणार आहेत, अशी माहिती प्रशिक्षक अनिल नागपुरे यांनी दिली. त्या प्रकारातही महाराष्ट्राला सुवर्णपदकांची आशा आहे.
मुलींच्या संघाने सांघिक उपविजेतेपद पटकावले होते. त्या संघात आरूषी शिंगवी, तमन्ना संघवी, प्रणाली मोरे, भक्ती मोरे, हार्दिका शिंदे, पलक सुरी यांचा समावेश होता. मुलींच्या संघाच्या काजल काळे या प्रशिक्षक आहेत.

तंबाखू सेवनाला आळा घालण्याची जबाबदारी सर्वांची: कार्यशाळेतील सूर

0

पुणे, दि. 10: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे कोणत्याही स्वरुपातील सेवन ही कर्करोगासह अनेक घातक आजारांना आमंत्रण देणारी बाब असून त्याला आळा घालणे ही सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे असा सूर जिल्हा रुग्णालय आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेतील चर्चेप्रसंगी निघाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हास्तरीय तंबाखू समन्वय नियंत्रण कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा सल्लागार आणि मनोवैज्ञानिक हनुमान हाडे, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेच्या राज्य प्रकल्प अधिकारी झिया शेख, विभागीय व्यवस्थापक अभिजित संघई आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 (कोट्पा ॲक्ट) मधील तरतुदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी डॉ. घाणेकर म्हणाल्या, तंबाखू सेवन करणाऱ्यांपैकी किमान 50 टक्के व्यक्तींचे मृत्यू तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे होतात. हृदय बंद पडणे (आयएसडी किंवा हर्ट स्ट्रोक), विविध प्रकारचे कर्करोग, गंभीर श्वसनविकार अशा तीन मुख्य परिणामांसह अन्य आजारांनाही तंबाखू, सिगारेट कारणीभूत ठरते.

तंबाखू सेवनामुळे होणारे परिणाम अत्यंत दूरगामी असल्यामुळे कोट्पा ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करणे सर्व विभागांची जबाबदारी आहे. शालेय शिक्षण, आरोग्य विभाग, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर विभाग, परिवहन विभाग आदी विभाग तसेच स्वयंसेवी संस्था यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. घाणेकर यांनी जिल्हास्तरीय तंबाखू समन्वय नियंत्रण कक्षाकडून करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली.

यावेळी श्रीमती झिया शेख यांनी कोट्पा अधिनियमातील कलम 4 व कलम 6अ आणि 6ब मधील तरतुदींची माहिती दिली. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तसेच शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी याबाबतच्या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली.

तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात, प्रदर्शित करणे, स्पॉन्सरशिप करणे या बाबींना असलेली बंदी, तंबाखूजन्य पदार्थांचे वेष्टन करणे व त्यावरील लेबलींग याबाबतची नियमने, त्यावर छापायची धोक्याची चित्रे आणि सूचना, कार्यालयांबाहेर लावायचे सूचना फलक आदींबाबत माहिती श्री. संघई यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य दंतरोगतज्ञ डॉ. साहना हेगडे- शेटिया यांनी तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती दिली.

यावेळी उपस्थितांनी तंबाखू विरोधी शपथ घेतली. कार्यक्रमास आरोग्य, पोलीस, परिवहन, महानगरपालिका, शिक्षण, कृषी, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय मंत्राचे सामुहिक पठन

0

माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले आयोजन

पुणे -भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी महामृत्युंजय मंत्राचे सामुहिक पठन करण्यात आले. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा १० जूनला वाढदिवस असल्याने शहरातील विविध भागात भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुसाठी आणि राजकीय कारकीर्दीसाठी माजी सभागृह नेते बिडकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. सोमवार पेठेतील श्री नागेश्वर मंदीर येथे महामृत्युंजय मंत्राचे सामूहिक पठनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये बिडकर हे सपत्नीक, सहभागी झाले होते.

मंत्रोच्चाराच्या स्वरांनी मंदिरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. सोमवार पेठेतील नागरिकांनी हजेरी लावली होती. तेजस सप्तर्षी गुरुजी आणि त्यांचे २७ सहकाऱ्यांनी हे पठन केले. यावेळी सागर अफूवाले, उद्धव मराठे, मंदार पवार, सुजित पुजारी, राहुल शर्मा, माऊली शिवले, सोमनाथ शेळके, सुमीत रांबाडे, प्रताप सावंत, दिलीप मामा बहीरट, निलेश अल्हाट, बाला शेख, सुनील बारणे, सुरेखा शिंदे, कल्पना बहीरट, किरण गोसावी, शिल्पा शेळके, बाळासाहेब घोडके, लक्ष्मी घोडके, वैशाली सोनवणे, अनुराधा तळेगावकर यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी इतर कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…अखेर तो आला , पुण्यात बरसल्या जलधारा

0

पुणे- हवामान खात्यासह पुणेकरांना गेली काही दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस आज अखेर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बरसला ….

आज दुपारपासूनच आकाशात ढग जमण्यास सुरुवात झाली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास आंधारून आले. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह टपोऱ्या थेंबांनी पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही वेळातच वातावरणात गारवा निर्माण झाला होता.वाढत्या तापमानात उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोसमी पावसाची चाहूल देणाऱ्या पूर्वमोसमीच्या दमदार सरींची अनुभूती मिळाली. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. पावसामुळे काही वेळातच शहरातील रस्ते जलमय झाले. अनेक दिवसांच्या खंडानंतर झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने अनेकांची तारांबळ उडविली असली, तरी काहींनी त्यात भिजण्याचाही आनंद घेतला.पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, शनिवारीही विजांच्या कडकडाटात शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच ते सहा दिवस शहर आणि परिसरात आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे प्रमाण आणि वाऱ्यांचा वेग कमी असल्याने तब्बल दहा दिवस मोसमी पाऊस कर्नाटकच्या कारवारपर्यंत रखडला होता. मात्र, गुरुवारपासून पोषक वातावरण तयार झाल्याने शुक्रवारी पहाटेपासूनच मोसमी पावसाने वेगवान प्रवास करून दक्षिण कोकणात धडक मारली. त्याचबरोबरीने राज्याच्या इतर भागात पूर्वमोसमी पावसाने जोर धरला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील काही भागामध्येही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. शहरात यंदा पूर्वमोसमीच्या हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही. जून महिना सुरू होऊनही पावसाच्या दमदार सरी बरसल्या नव्हत्या. त्यातच शहरातील तापमानाचा पारा वाढला असल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर आकाश ढगाळ होत असले, तरी पावसाचा केवळ हलका शिडकावा झाला होता. १२ ते १६ जून या कालावधीत शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे

पहिल्याच पावसात शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये झाडपडीच्या 30 घटना घडल्या.

कर्वे रस्त्यावरील एका रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुला असलेली भिंत पडल्याने 11 वाहने तर पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातील झाड कोसळल्यामुळे 25 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठल्याच्याही घटना घडली.

जोराचा वारा व पावसाच्या मोठ्या सरींमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठमोठी झाडे उन्मळुन, तर काही ठिकाणी तुटून पडली. पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात मोठे झाड कोसळून रस्त्यावर पडले. त्यामुळे संपुर्ण रस्ता काही वेळ बंद राहीला. तर रस्त्याच्याकडेला पार्कींग केलेल्या 20 ते 25 दुचाकींवर झाड पडल्याने त्यांचे नुकसान झाले. याबरोबरच कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुला असलेली भिंत पडल्याने तेथेही दहा दुचाकी व एक चारचाकी वाहन अडकल्याने त्याचे नुकसान झाले.

दरम्यान, पावसामुळे शहरातील पर्वती शाहू कॉलनी, जीपीओ, पर्वती येथील स्टेट बॅंक कॉलनी, स्वारगेट एसटी कॉलनी, पोलिस आयुक्तालय, भवानी पेठ येथील बीएसएनएलचे कार्यालय, प्रभात रस्ता, औंध येथील आंबेडकर चौक, राजभवन परिसर, गुरुवार पेठेतील पंचहौद, कोंढवा येथील शिवनेरी नगर, एनआयबीएम रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, नवी पेठेतील पत्रकार भवन, राजेंद्र नगर, कोंढवा येथील आनंदपुरा रुग्णालय, कर्वे सह्याद्री हॉस्पिटलच्या मागे सीमा भिंत पडली असून दहा दुचाकी व एक चारचाकी गाडी अडकल्याची माहिती अग्निशामक दलाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, झाडपडीच्या घटना घडलेल्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या पथकाने तत्काळ पोहचून रस्ता मोकळा करण्यास प्राधान्य दिले. जोरदार पावसामुळे शहराच्या काही भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. त्यातुन दुचाकी काढताना नागरीकांची तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या घटनाही काही प्रमाणात घडल्या.