Home Blog Page 1557

 कुमठेकर रस्त्यावर दुचाकी लावण्यावरून वाद; टोळक्याकडून वस्त्रदालनात तोडफोड

दुकानासमोरील रस्त्यावर दुकानदारांनी टाकलेल्या जाळ्यांवर अतिक्रमण खाते कारवाई का करत नाही ?

पुणे-कुमठेकर रस्त्यावरील एका वस्त्रदालनासमाेर दुचाकी लावण्याच्या वादातून टोळक्याने दुकानदाराला बेदम मारहाण करुन दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने दुकानातील आरशाची तोडफोड केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकास अटक केली असून साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमित राजेंद्र कंधारे (वय २५, रा. ६५७, सदाशिव पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कंधारे याच्याबरोबर असलेल्या चार ते पाच साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद सुरेश त्रिमल (वय ३७, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुमठेकर रस्त्यावरील तेजस्विनी सिल्क सेंटर या वस्त्रदालनासमोर कंधारेने दुचाकी लावली होती. दुचाकी लावण्यावरुन वाद झाला. त्यानंतर कंधारे आणि साथीदारांनी त्रिमल यांना बॅट; तसेच स्टीलच्या पाईपने मारहाण केली. टोळक्याने त्रिमल यांच्या भावाला मारहाण केली. पोलिसाकडे तक्रार केल्यास बघतो, अशी धमकी देऊन कंधारे आणि साथीदारांनी दुकानातील आरसा आणि कठड्याची तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ तपास करत आहेत.

दुकांदारांच्या जाळ्यांमुळे अडविली जाते पार्किंगची जागा

दरम्यान या घटनेमुळे अनेक दुकानदारांनी पदपथाच्या पुढे दुकानाच्या दारासमोर टाकून ठेवलेल्या जाळ्या दुचाकी पार्किंग ची जागा अडवून टाकत असल्याचे वर्षानुवर्षे निदर्शनास आलेले आहे. मात्र यावर कारवाई महापालिकेचे अतिक्रमण खाते करत नाही .दुकानदारांचे दरवाजे आणि अन्य साहित्य देखील पदपथावर अतिक्रमण करून पुढे सरकलेले असतात यामुळे पदपथावरून पायी चालणे देखील कठीण होते , एकीकडे पायी चालणे कठीण होते तर दुसरीकडे दुचाकी लावणे मुश्कील होते अशा समस्यात अडकलेला ग्राहक किंवा नागरिक येथे हवालदिल होतो.त्यात आता बरेचसे मॉल बंद पडल्याने लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी पुन्हा वाढली आहे. याचा फायदा घेऊन काही व्यापारी देखील गैर वागत असल्याच्या तक्रारी आहेत . याकडे महापालिका आणि पोलीस दोघेही लक्ष देत नसल्याने सामान्य ग्राहकाच्या अथवा नागरिकाच्या पाठीशी कोणी उभे नसल्याचे देखील वारंवार दिसून येते आहे.

कोर्टाचे कामकाज सुरू असताना महिला वकिलांनी डोक्याचे केस …. नोटीस अखेर न्यायालयाकडून मागे

पुणे-न्यायालयाचे कामकाज सुरू असताना महिला वकिलांनी केस व्यवस्थित करू नये, अशी नोटीस पुणे जिल्हा न्यायालयाकडून काढण्यात आली होती. या नोटीसनंतर अनेकांनी टीका केली. त्यामुळे अखेर ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.दरम्यान, नोटीस मागे घेतली असली तरी याची चर्चा आता सुरू झाली आहे.वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी शनिवारी ट्विटरवरून या नोटीसचा फोटो शेअर केला होता. तसेच त्यांनी म्हटलं होते की, “व्वा, पाहा आता, महिला वकिलांकडून कोण आणि का विचलित होत आहे.” नोटीस मागे घेतली गेली असल्याचंही इंदिरा जयसिंग यांनी ट्विटरवर सांगितले आहे.

नोटीमध्ये लिहिण्यात आले होते की, न्यायालयात हे सातत्याने निदर्शनास आले आहे की महिला वकील या अनेकदा न्यायालयातच आपले केस व्यवस्थित करत असतात. हे कृत्य न्यायालयाच्या कामकाजात हे अडथळा आणणारे किंवा विचलित करणारे आहे. त्यामुळे महिली वकिलांनी अशी कृत्ये करू नयेत. ही नोटीस बोर्डावरही लावण्यात आली होती. पुणे जिल्हा न्यायालयाच्या नोटीसीचा फोटो व्हायरल होत असून त्यात २० ऑक्टोबर रोजी ही नोटीस देण्यात आल्याचे दिसते.

दरम्यान, ही नोटीस व्हायरल झाल्यानंतर चहुबाजूंनी जोरदार टीका झाली आणि नोटीस मागे घ्यावी लागली. मात्र सूत्रांनी सांगितले की, न्यायालयीन कामकाजाचा डेकोरम राखणे इतकाच या नोटीसीचा हेतू होता. भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता असं न्यायालयाने सांगण्यात आले.

पुण्यात फटाक्यांमुळे 17 लागली आग:एका मोठ्या फ्लॅटसह 7 दुचाकी भस्मसात

पुणे-पुण्यात लक्ष्मीपूजन वेळी रात्री सात ते बारा वाजण्याच्या दरम्यान आगीच्या एकूण 17 घटना घडल्याची माहिती अग्निशामक दलाच्या मार्फत देण्यात आली आहे.यात जनता वसाहत येथे झाडाला आग, गल्ली क्रमांक 47 , कात्रज, आंबेगाव पठार येथे गॅलरीत आग, बी टी कवडे रस्ता, बीटाटेल इनक्लेव्ह येथे सोसायटीत आग (7 दुचाकी पेटल्या),नऱ्हे , मनाजी नगर, ज्ञानदेव शाळेच्या छतावर आग, विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ झाडाला आग, वारजे माळवाडी, चैतन्य चौक, युनिवर्सल सोसायटीत बंद घरामधे आग, सिहंगड रस्ता, शारदा मठाजवळ, श्वेता सोसायटीत नारळाच्या झाडाला आग, गुरुवार पेठ, शितळादेवी चौक जुन्या वाड्यामधे आग, लोहगाव, अंबानगरी, लटेरिया सोसायटीत आग, वडगाव शेरी, टेम्पो चौक झाडाला आग लागल्याच्या घटनांचा समावेश आहे. तर औंध परिसरातील एका सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरील चार बीएचके फ्लॅट आगीत जळून भस्मसात झाला. हि दुर्देवी घटना सोमवारी रात्री घडली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सदर आग आटोक्यात आणल्याची माहिती दिली आहे.

अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांनी सांगितले की, संबंधित घटना औंध डी पी रस्त्यावर टेरेजा सोसायटीत घडली आहे. ही इमारत पार्कींगसह 12 मजली आहे. या इमारतीत पहिल्या मजल्यावरील चार बीएचके फ्लॅटमध्ये आग लागली होती. याबाबत माहिती मिळाल्यावर अग्निशामक दलाच्या कसबा, कोथरूड व पीएमआरडीएच्या फायर गाड्या व एक वाॅटर टँकरच्या साह्याने आग पूर्णपणे अल्पावधीत विझवली. मात्र, धुराचे प्रमाण जास्त असल्याने वर राहणाऱ्या स्थानिक नागरिक अंदाजे 30 ते 35 (लहान मुले, महिला, वृध्द नागरिक) नागरिकांना टेरेसवर सुखरूप नेण्यात आले होते. आग विझवित असताना जवानांनी अग्निशामक बी ए सेट परिधान करून, दोन टीम करून प्रत्येक फ्लॅटचा दरवाजा वाजवून पुन्हा पुन्हा सर्च केला.आग कंट्रोल झाल्यावर, पोलिसांसमवेत पुन्हा एकदा सर्च करण्यात आले. सदर इमारतीत सर्व साधारण 40, फ्लॅट धारक रहातात. इमारतीच्या खाली उपस्थित असलेल्या सोसायटीतील रहिवासी व टेरेसवरील रहिवासी यांच्याकडे सर्व जण सुखरूप असल्याची पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या अधिकारी यांनी एकत्रित विचारणा केली. आगीमध्ये सदर फ्लॅट पूर्णपणे जळाला आहे. आग फटाक्यांच्यामुळे लागली असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते, सदर घटना स्थळी सहाय्यक विभागीय अधिकारी व चार स्टेशन ऑफीसर आणि 30 ते 35 जवान उपस्थित होते.

‘मी गातो माझे गाणे’ : सांगीतिक दिवाळी पहाट बुधवारी 

आरव पुणे निर्मित युवा संगीतकार निखील महामुनी यांच्या सांगीतिक मैफलीचे आयोजन
पुणे : शब्दांमधल्या तरल भावनांची सुरेल पायवाट दाखविणा-या आरव पुणे निर्मित युवा संगीतकार निखील महामुनी यांचा मी गातो माझे गाणे ही दिवाळी पहाट स्वरमैफल पुण्यामध्ये होत आहे. बुधवार, दिनांक २६ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. सुनील काळे, स्वाती शुक्ल, निशिकांत देशपांडे, डॉ.माधुरी चव्हाण-जोशी, संतोष वाटपाडे, तुषार जोशी, डॉ.अरुणा ढेरे आणि आरती प्रभू अशा नव्या-जुन्या कवी-कवयत्रींच्या दर्जेदार कवितांना निखील महामुनी यांनी आपल्या स्वरसाजाने केवळ नटवलेच नाही तर अधिक बोलते केले आहे. त्यामुळे अनेक नवी गीते या कार्यक्रमात रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.
निखील महामुनी हे सादरीकरण करणार असून अमिता घुगरी, ॠचा महामुनी, श्रीया महामुनी यांची सहगायनाची आणि अभय गोखले यांच्या प्रवाही सूत्रसंचालनाची साथ कार्यक्रमाला लाभणार आहे. चांगले काव्य, उत्तम विचार आणि नवनिमीर्तीचा आनंद देणारं संगीत या कार्यक्रमातून रसिकांपर्यंत पोहोचणार असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘आपुलकीच्या दिवाळी’ ने भारावली श्रीवत्समधील विशेष मुले 

पुण्यातील विविध सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळांचा पुढाकार ; तब्बल ५ लाख रुपयांची वस्तुरुपी व आर्थिक मदत
पुणे : एखाद्या तरी अनाथ आणि विशेष मुलाला, तू मला आवडतोस असे म्हणून आपुलकीच्या भावनेने जवळ घ्यावे, असे मनापासून वाटणा-या आणि ते प्रत्यक्षात आणणा-या पुणेकरांनी एकत्र येत श्रीवत्स संस्थेत अनोखा उपक्रम राबविला. अशा मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल, तर त्यांना भरघोस प्रेम द्यायला हवे, या भावनेने राबविण्यात आलेल्या आपुलकीच्या दिवाळीने श्रीवत्समधील विशेष मुले भारावून गेली. 
निमित्त होते, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्थांतर्फे दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, याकरीता आयोजित आपुलकीची दिवाळी या कार्यक्रमाचे. संस्थेचे अरविंद हेर्लेकर, सचिन अभ्यंकर, निवेदिता गोगटे, निर्मला लाहोटी, शर्मिला सय्यद, मेहुणपुरा मंडळाचे उपाध्यक्ष आनंद कावणकर, पराग ठाकूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यंदा ३० वे वर्ष आहे.  
विविध गाण्यावर नृत्य सादर करीत आपल्या मनातील भावना या चिमुकल्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या. श्रीवत्स संस्था आणि सोलापूर येथील श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिक विद्यालय या संस्थांना यांना आवश्यक असणारी ५ लाख रुपयांची आर्थिक व वस्तुरुपी भेट देण्यात आली. देश्ना नहार या मुलीने केलेल्या गिनीज बुक रेकॉर्डबद्दल तिचा सन्मान करण्यात आला. 
पराग ठाकूर म्हणाले, तब्बल २९ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा उपक्रम ५०० रुपये मदतीपासून सुरु झाला होता. आजमितीस या उपक्रमाला समाजातील विविध गणेशोत्सव मंडळे आणि दानशूरांकडून मोठया प्रमाणात सहाय्य मिळत आहे. समाजातील वंचित घटकांना गरजेच्या वस्तू देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होत आहे, असेही त्यांनी सांगितले.  
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह एलआयसी परिवार, इमर्सन कंपनी, सेवानिवृत्त एसटी अधिकारी, नूमवि मराठी शाळा, नवा विष्णू चौक नवरात्र उत्सव मंडळ, चिमण्या गणपती मंडळ, शनिपार मित्र मंडळ, कुंभोजकर मित्रपरिवार, जनता बँक मित्रपरिवार, आफळे अकादमी, सैनिक मित्र परिवार, हिंदू महिला सभा, मंदार ठाकूरदेसाई मित्र परिवार, अभेद्य वाद्य पथक, नहार परिवार आदी संस्थांनी उपक्रमात सहभाग घेतला होता. आर्या ठाकूर हिने सूत्रसंचालन केले.

सामाजिक कार्यामध्ये महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण-सामाजिक कार्यकर्त्या अंजली तापडिया

पुणे : आज माझा होणारा सन्मान हा मी माझ्यासोबत काम करणाऱ्या महिलांना अर्पण करत आहे. त्यांनी जर मला सहकार्य केले नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. समाजसेवेमध्ये महिला कायमच अग्रेसर राहिल्या आहेत. समाजसेवेचे बाळकडू मला लहानपणापासून मिळाले. लग्नानंतरही कुटुंबीयांनी माझ्या समाजसेवेच्या कार्यामध्ये प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मला समाजकार्य अधिक प्रभावीपणे करता आले अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली तापडिया यांनी व्यक्त केली. 
एकल परिवारातर्फे अंजली तापडिया यांचा महेश गौरव सन्मान मिळाल्याबद्दल एकल परिवाराच्या वेस्ट झोन अध्यक्षा सरिता मानसिंगका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकल परिवारचे पुणे चॅप्टर अध्यक्ष वसंत राठी, अर्चना बेहेडे, पुरुषोत्तम लोहिया, अशोक नवल, अशोक लढा, दिनेश मुंडे, मनोज बेहडे आधी यावेळी उपस्थित होते. 


अंजली तापडिया म्हणाल्या, सामाजिक कार्यामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सरिता मानसिंगका या वनवासी मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी गेल्या ३० वर्षांपासून अविरत काम करत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये महिला अधिक प्रभावीपणे योगदान देऊ शकतात याचे त्या मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महिलांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहनही यावेळी अंजली तापडिया यांनी केले. 
सरिता मानसिंगका म्हणाल्या, समाजामध्ये आजही विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक काम करण्याची गरज आहे. या क्षेत्रामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन काम केले तर देशांमध्ये सामाजिक सुधारणा अधिक वेगाने घडू शकते. एकल परिवार सामाजिक क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. 
यावेळी दिनेश मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली एकल परिवाराच्या युवा संघटनेची स्थापना करण्यात आली. भाग्यश्री घारपुरे यांच्या नादश्री पुणे या संस्थेचा यावेळी संगीतमय दीपावली स्नेह संमेलन कार्यक्रम झाला. पद्मा तोगडिया यांनी सूत्रसंचालन केले. वसंत राठी यांनी प्रास्ताविक केले. डॉ अशोक लढ्ढा यांनी आभार मानले.

केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चव सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

पुणे : केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. याद्वारे संशोधन, तज्ज्ञ मार्गदर्शन व तांत्रिक उपक्रमात भागीदारी वाढविण्यात येणार आहे. 
सीओईपी टेक येथे पार पडलेल्या कार्यक्रमात केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव व सीओईपीचे कुलगुरू डॉ. एम. एस. सुतावणे यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी केजे शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला, प्राचार्य डॉ. सुहास खोत यांच्यासह सर्व विभागप्रमुख डॉ. एस. के. पाटील, डॉ. संजय खोंडे, डॉ. प्रमोद चव्हाण, डॉ. प्राजक्ता देशमुख, डॉ. निकिता कुलकर्णी, प्रा. गायत्री पाटील, सीओईपी टेकच्या वतीने कॉर्पोरेट रिलेशन ऑफिसर डॉ. संदीप मेश्राम उपस्थित होते.

कल्याण जाधव म्हणाले, “हा सामंजस्य करार विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूप मदत करेल. गेल्या तीन वर्षात एफडीपी, अतिथी व्याख्यान, तज्ञांची व्याख्याने, विद्यार्थ्यांना द्वारे आभासी प्रयोगशाळांचा वापर, सीओईपी टेक येथील प्रयोगशाळांना विद्यार्थ्यांच्या भेटी यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले.”

सामंजस्य कराराचे फायदे- विविध शैक्षणिक, व्यावसायिक उपक्रम, नवकल्पना राबवणे- प्रयोगशाळा, संशोधन केंद्रसक्षम होईल- तज्ज्ञ मार्गदर्शक, उद्योग प्रायोजित सल्लागारांची उपलब्धता- विद्यार्थी-प्राध्यापकांच्या सर्वांगीण विकासास मदत- पायाभूत सुविधांचा वापर, सकारात्मक वातावरण व सहयोगी संशोधन प्रकल्प- सहयोगी कार्यातून निर्माण होणारी प्रकाशने संयुक्तपणे प्रकाशित होतील- एनईपी २०२० व सीबीसीएस प्रणालीची यशस्वी अंमलबजाणी

परमेश्वराला निर्मळ अंत:करणाने केलेला नमस्कार पुरेसा

कीर्तनकार ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर ; श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे रमा एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : आज परमेश्वरासाठी जपली न जाता आपल्या मतलबासाठी जपताना दिसून येत आहे .परमेश्वराचा वापर करून आपले साधून घेणारी प्रजा जन्मास आली आहे. परमेश्वराला अपेक्षित असणारी निरागसता, निष्पापता, निष्कपटता, निर्मळता कोठेतरी परमेश्वरभक्तीत लोप पावताना दिसत आहे. परमेश्वराला निर्मळ अंत:करणाने केलेला एक नमस्कार व सर्व करता करविता तूच आहेस हे उमजून त्याचे चरणी झुकलेले मस्तकच त्याला अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर यांनी व्यक्त केले.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात पुत्रदा एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. 
हर्षदबुवा जोगळेकर म्हणाले, आज समस्त प्राणीमात्र जर कशासाठी प्रयत्नशील असतील, तर ती आपली भूक भागविण्यासाठी . त्यासाठी हर त-हेचे प्रयत्न ते करीत असतात. मग ते तत्वात, धर्मात, शास्त्रात बसोत अगर नसोत, त्याला आपली भूक भागली म्हणजे बास.  या भुकेपाई  अनंत व्याधीं जडल्या तरी, तो ती भूक भागवण्याचे प्रयत्न सोडत नाही. शेवटी त्याचा त्यात बळी जातो .
ते पुढे म्हणाले, मानवांचे तीन स्तर विचारात घेतले जातात, सामान्य माणूस, संत आणि भगवंत. भुकेने कोणालाच नाही सोडले, परिणामी भूक न भागल्यास या व्याधींना सर्वांनाच सामोर जावे लागते. सामान्य माणसास खाण्याची व वासनांच्या तृप्ततेची भूक, तर संतांना देव भेटीची भूक, तशी देवाला भावनांच्या पुर्ततेची भूक असते. त्यामुळे देवाला तुम्ही काय देता, किती देता, केव्हा देता, कुठे देता यापेक्षा कसे देता व कोणत्या भावनेने याला खूप महत्व आहे, असेही त्यांनी सांगितले.  

‘नाम रंगी रंगुनी’ भक्तीसंगीतांचा  कार्यक्रम गुरुवारी 

आरव पुणे निर्मित आणि हटके म्युझिक ग्रुप यांच्या वतीने आयोजन
पुणे : आरव पुणे निर्मित आणि हटके म्युझिक ग्रुप यांच्या वतीने ‘नाम रंगी रंगुनी’ या भक्तीसंगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे.

संगीतकार सुधीर फडके, लक्ष्मीकांत प्यारेलाल, पांडुरंग दिक्षीत,अनिल-अरुण, संत पुरंदरदास यांच्या रचानांसोबत गायक संगीतकार निखिल महामुनी यांच्या रचना कार्यक्रमात सादर होणार आहेत. डॉ. अनुराधा गोगटे, अपर्णा काळे, अश्विनी आगाशे, डॉ.विजया पुराणीक, ऋचा महामुनी श्रीया महामुनी या सहगायन करणार आहेत. शिरीष कुलकर्णी हे निवेदन करणार आहेत.

सैनिकांच्या वीरमातांंना पुष्पवृष्टी व भारतमातेच्या जयघोषात मानवंदना 

सैनिक मित्र परिवार तर्फे आयोजन ; अभिनेते सुनील गोडबोले यांची उपस्थिती
पुणे : देशासाठी प्राणांची बाजी लावून लढणा-या आणि वेळप्रसंगी देशासाठी प्राण अर्पण करणा-या सैनिकांच्या कुटुंबियांना भारत माता की जय… च्या जयघोषात व सनई- चौघडयाच्या निनादात कसबा गणपती मंदिराच्या परिसरात मानवंदना देण्यात आली. रांगोळी आणि फुलांच्या पायघडयांनी केलेले स्वागत, सुवासिनींनी केलेले औक्षण आणि थरथरत्या हातांनी ज्येष्ठांसह चिमुकल्यांनी केलेला पुष्पवृष्टीद्वारे सलाम असे देशप्रेमाने भारलेले वातावरण पाहताना वीरमातांना देखील अश्रू अनावर झाले. 
सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे भाऊबीजेनिमित्त देशासाठी लढताना शहीद झालेल्या व बेपत्ता सैनिकांच्या वीरमातांच्या सन्मान कसबा गणपती मंदिरामध्ये करण्यात आला. यावेळी अभिनेते सुनील गोडबोले, डॉ.विश्वास मेहेंदळे, संपदा सहकारी बँकेच्या संचालिका प्रा. संगीता मावळे, बँक आॅफ इंडिया कर्मचारी संघटनेचे शिरीष राणे, शाहीर हेमंतराजे मावळे, गुणवंत कामगार संघटनेचे सुभाष चव्हाण, कसबा संस्कार केंद्राचे अनिल दिवाणजी, आनंद सराफ आदी उपस्थित होते. 
सुनील गोडबोले म्हणाले, सैनिकांमुळे आपल्याला सर्वत्र मनमोकळेपणाने फिरण्याकरिता धीर मिळतो. त्यामुळे सैनिकांचा सन्मान केवळ उत्सवापुरते नव्हे, तर दररोज करणे हे आपले कर्तव्य आहे. सैनिकांसारखी शिस्त आपण पाळणे, हीच शहीद सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल, असेही त्यांनी सांगितले. 
वीरमाता गीता गोडबोले, कुसुम ताथवडे, छाया पळसकर, लता नायर यांचा सन्मान यावेळी सन्मान करण्यात आला. पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळे आणि संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला. गिरीश पोटफोडे, संगीता ठकार, अमोल काळे, भोला वांजळे, कल्याणी सराफ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले.

दक्षिण पुण्यातील राष्ट्रवादीच्या ‘गब्बरांकडे’ राष्ट्रीय तपासयंत्रणांच्या नजरा….? 

पुणे-दक्षिण पुण्यातील बोकाळलेल्या गुन्हेगारी विरोधात पुणे पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केलेली असताना आता यापुढे राष्ट्रीय तपास यंत्रणेतील चौकशीच्या फेऱ्याचे ग्रहण आता दक्षिण पुण्यातील राष्ट्रवादीच्या १/२ नेत्याना लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. दिवाळीपूर्वीच या कारवाईला सुरुवात होणार होती मात्र एका मंत्री असलेल्या महोदयांनी  सबूरीचा सल्ला दिल्याची  बातमी देखील सूत्रांकडून समजली आहे.  पदाधिकारी राहिलेले दोघे आणि दक्षिण पुण्यात अनधिकृत बांधकामांचे जाळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पद्धतीने

उभारून राष्ट्रवादीचे काम करत राहिलेल्या बिल्डरचा यात नंबर लागण्याची शक्यता आहे. एक तर दक्षिण पुण्यात अनधिकृत बांधकामेच नाहीत तर बळकाविलेल्या शासकीय ,खाजगी जमिनी ,शासकीय कर्मचार्यांच्या वतीने केलेले फेरफार  अशा बाबतीत संबंध असलेल्या १/२ जनांच्या चौकशीची तयारी करण्याचा प्रस्ताव तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त आहे . मात्र यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे कदाचित राजकीय दृष्टीने याबाबत चाचणी होते की काय अशी शंका ही घेण्यात येते आहे .    

एका मंत्र्याने मात्र अशा कारवाई पेक्षा  हि मंडळी आपल्याकडे वळविण्यासाठी  जोर दिल्याचे समजते .एक तर यांनाच पक्ष बदल करायला लाऊ अन्यथा त्यांच्या घरातील कोणी पक्ष बदल करेल अन्यथा त्यांच्याच पक्षात राहून ते आपल्याला मदत करतील अशा तीन शक्यतावर या मंत्र्यांचा प्रस्ताव असल्याच्चे समजते . राष्ट्रवादीचे नवे कार्यकर्ते अगर माजी नगरसेवक देखील आपल्याच पक्षातील या ‘टारगेटेड’ नेत्यांवर  नाराज असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे . यातील दोघा नवीन नगरसेवकांना त्यांच्याच पक्षातून उमेदवारी पुन्हा देण्यात येणार नाही याबाबतची दक्षता ‘ ‘टारगेटेड’ नेते घेत असल्याचे समजते. दरम्यान खडकवासला,हडपसर असे दोन विधान सभा मतदार संघ येत असलेल्या या परिसरात येत्या महापालिका निवडणुकीपूर्वी  बऱ्याच महत्वपूर्ण नसल्या तरी  लक्षणीय घडामोडी घडू शकतील असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

निर्मिती डेव्हलपर्सचे पंढरीनाथ सुभाष म्हस्के व संतोष सुभाष म्हस्के या दोघांवरही गंभीर गुन्हा दाखल

पुणे -बांधकामासाठी सिमेंटचा पुरवठा केल्यानंतर त्याचे ३६ लाख रुपयांचे बिल मागणाऱ्या व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत पैसे देण्यास नकार दिला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात निर्मिती डेव्हलपर चे पंढरीनाथ सुभाष म्हस्के व संतोष सुभाष म्हस्के (दोघेही रा. नऱ्हे) या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रकाश शिवनारायण भुतडा (वय ४२, रा. प्राईड कुमार सिनेट, सेनापती बापट रस्ता) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० जुलै २०१७ ते ३० मे २०१८ कालावधीत घडला होता. पंढरीनाथ म्हस्के व संतोष म्हस्के यांची निर्मिती डेव्हलपर्स नावाची बांधकाम व्यावसायिक कंपनी आहे. तर फिर्यादी हे बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंटचा पुरवठा करतात. संबंधित कंपनीने फिर्यादीकडे सिमेंटची मागणी केली होती. त्यानुसार, फिर्यादींनी सिमेंट दिले, मात्र, त्यांनी सिमेंटचे झालेले ३६ लाख ४७ हजार ८०५ रुपयांचे बिल दिले फिर्यादीस दिले नाही. रक्कम मोठी असल्याने फिर्यादी हे त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी संतोष मस्के यांनी फिर्यादीना पिस्तूल दाखवीत ‘तू जर परत पैसे मागण्यासाठी आला तर तुला ठोकून टाकीन,’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर फिर्यादींनी या प्रकरणामध्ये न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयाने १५६ (३) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हा दाखल केला आहे, असेवरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी सांगितले

सूर्यग्रहण:अंधश्रध्दा बाळगू नका …

मुंबई – एक खगोलीय घटना आज मंगळवारी (ता. २५) संध्याकाळी सर्वांनाच पाहता येणार आहे. संध्याकाळी चार वाजून ५० मिनिटांनंतर पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्यग्रहाणाचे दृश्य आपल्या सर्वांना पाहता येणार आहे.या ग्रहण संदर्भात कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नये.सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सूर्यग्रहण थेट पाहू नये.

‘सोलर इक्‍लिप्स गॉगल’ आणि दुर्बिणीच्या साह्याने नागरिक हे सूर्यग्रहण पाहू शकतात. याशिवाय, शहरात जागोजागी विविध खगोलप्रेमी संस्था आणि महाविद्यालयांनी ग्रहण पाहण्यासाठी व्यवस्था केली आहे. मॉन्सून वेळेत परतल्याने आकाश आता निरभ्र असून, सर्वांनाच आता सूर्यग्रहण स्पष्ट पाहता येणार आहे.

सूर्यग्रहण कसे लागते?
चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्राची गोलाकार गडद सावली पृथ्वीवर पडते. यालाच आपण सूर्याला ग्रहण लागले, असे म्हणतो. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही सावली वेगाने जमिनीवरून प्रवास करते. पृथ्वीच्या ज्या भागांवरून ही सावली प्रवास करते, त्या भागांमध्ये खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते.

असे पाहा सूर्यग्रहण…
– बाजारात मिळणारे सोलर गॉगल्स वापरून
– घरी पिनहोल कॅमेरा बनवा
– सूर्याचे प्रतिबिंब थेट डोळ्यावर न पडणारी अशा कोणत्याही पद्धतीने
– सूर्यग्रहण संध्याकाळी असल्याने सूर्याचे तेज थोडे कमी

असेल, तरीही आवश्यक ती काळजी घेऊन ग्रहण पाहावे

असा बनवा ‘पिनहोल कॅमेरा’
काळा कार्डशीट पेपर, फॉईल पेपर, ट्रेसिंग पेपर आणि फेविकॉल इतक्‍याच साधनांची ‘पिनहोल कॅमेरा’ बनविण्यासाठी आवश्‍यकता असते. काळ्या कार्डशीट पेपरच्या नळीच्या एका बाजूला फॉईल पेपर, तर दुसऱ्या बाजूला ट्रेसिंग पेपर लावला जातो. फॉईल पेपरला पाडलेल्या छोट्याशा छिद्रातून सूर्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूकडील ट्रेसिंग पेपरवर पडतो. ट्रेसिंग पेपरवर पडलेली सूर्याची प्रतिमा उलटी असते. याद्वारे सूर्यग्रहण पाहता येते.

सूर्यग्रहण थोडक्यात
तारीख व वेळ : मंगळवारी (ता.२५) संध्याकाळी चार वाजून ५० मिनिटे
सर्वाधिक सूर्य व्यापला जाईल : ५ वा.४३ मिनिटे
ग्रहण सुटेल : ६ वा.०५ मिनिटे

प्रत्येक बालक सशक्त आणि सक्षम करण्यासाठी  प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, :- प्रत्येक बालक सशक्त असण्याबरोबरच या मुलांना सक्षम व कौशल्यपूर्ण  शिक्षण देण्यासाठी  महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो अशी मनोकामना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. माटुंगा येथील   बालगृहातील मुलांसमवेत दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते.

दिवाळीनिमित्त महिला बालविकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  माटुंगा येथील   द बेहेरामजी जीजीभॉय होम फॉर चिल्ड्रेन व श्रद्धानंद बालगृह या संस्थांना भेट दिली. यावेळी महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  शोभा शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी, बालगृहातील मुलांना  दिवाळीनिमित्त  शुभेच्छा दिल्या. ही दिवाळी या मुलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी भरभराट घेऊन येवो, अशी  मनोकामना व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक बालकाला निरामय आरोग्य लाभावं, यासाठी  महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून  विविध योजना राबविण्यात येत आहेत. बालकांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून शासन यापुढे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणार असल्याचेही  मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास आयुक्त आर.विमला प्रास्ताविक करताना म्हणाल्या, या संस्थेत एकूण 102, श्रद्धानंद महिला वसतिगृह येथे १२८ मुली आहेत. या मुलांच्या प्रवेश प्रक्रिया, मोफत शालेय शिक्षण, मुलांसाठी विशेष शिक्षणाची व्यवस्था, विविध शिवण वर्ग,वाचनालय, उद्यान कला, मैदानी खेळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध सण साजरे करणे, शैक्षणिक व मनोरंजनात्मक सहलीचे आयोजन यांसारख्या संस्थेच्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक

  • ब्रिटनचे नवे पंतप्रधान 28 ऑक्टोबरला शपथ घेणार आहेत.
  • 29 ऑक्टोबर रोजी नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर होतं.ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी शंभर खासदारांचं बहुमत आवश्यक असतं. त्यांना आव्हान देणाऱ्या पेनी मॉर्डन्ट यांनी माघार घेतली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही आपले नाव मागे घेतले होते.सुनक यांना सुमारे 200 खासदारांचा पाठिंबा मिळाला. पेनी यांना केवळ 26 खासदारांचेच समर्थन होते. सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची घोषणा होणार आहे.

संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान सुनक यांच्या नावाची घोषणा झाली.ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री देखील होते.. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी 45 दिवसांच्या कार्यकाळानंतर गुरुवारी अचानक राजीनामा दिला. लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.