Home Blog Page 1530

रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावा,अतिक्रमणे काढा -विक्रम कुमारांचे आदेश

पुणे-रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावा,अतिक्रमणे काढा असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी येथे दिले आहेत. पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणे व स्वच्छता विषयक कामे यांना गती द्या असेही त्यांनी म्हटले आहे.

यंदाचे वर्षी श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात सोमवार, दिनांक १२ जून २०२३ रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालखी मार्गांची पाहणी केली .यावेळी त्यांच्यासमवेत अति महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे,उपायुक्त (दक्षता विभाग) महेश पाटील,उपायुक्त (घनकचरा विभाग)आशा राऊत, अधिक्षक अभियंता(पाणी पुरवठा विभाग) अनिरुध्द पावसकर, , मुख्य उदयान अधिक्षक अशोक घोरपडे, किशोरी शिंदे, उपायुक्त (परिमंडळ क्र. १), कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी, चंद्रसेन नागटिळक, महापालिका सहाय्यक आयुक्त (येरवडा कळस – धानोरी क्षेत्रिय – कार्यालय), संतोष वारुळे, उपायुक्त, संदिप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त ( औंध – बाणेर क्षेत्रिय कार्यालय), रवि खंदारे, महापालिका सहाय्यक आयुक्त (शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रिय कार्यालय) आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांच्या पाहणीमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन संबंधितांना पालखीचे आगमनप्रसंगी करावयाच्या नियोजनाबाबत आदेश देण्यात आले.
येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध – बाणेर क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रस्ते दुरूस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणेबाबत व स्वच्छता विषयक कामे करणेसंबंधी प्रशासक तथा आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याबाबत तसेच पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.पालखी पुणे मुक्कामी असताना विद्युत व्यवस्था खंडीत होणार नाही याबाबत संबंधितांना सुचना करण्यात आलेल्या आहेत.वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी या परिसराची २४ तास स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. घनकचरा विभागास स्वच्छतेसंबंधी सर्व सुविधा पुरविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

उन्हाची तीव्रता लक्षात घेवून आपतकालीन कक्षांची संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा/आराम कक्षदेखील उभारण्याची व्यवस्था करण्याबाबत आदेशित केलेले आहे. सदर कक्षांमध्ये वारकऱ्यांसाठी ओ. आर. एसची पाकिटे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिट इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होणेकामी फिरते दवाखान्यांची आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी सुचना केलेली आहे.

वाहतूक पोलीसांमार्फत वाहतूक सुरळीत रहावी तसेच पालखी दिंडी सोहळ्यास वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. सुरक्षेच्या कारणास्तव भवानी पेठेतील मंडपांमध्ये विसाव्याच्या ठिकाणीं सी. सी. टि. व्ही. लावण्याबाबत आयुक्त यांनी सुचित केलेले आहे.

पथ विभागाच्या माध्यमातून पदपथ व रस्ते यांची डागडुजी करून घेणेस सांगितले आहे. त्याच बरोबर रस्त्यालगतच्या सिमाभिंती रंगविण्यात येणार आहे.पालखी मार्गात अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे.

विसाव्याचा ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी आणि गेरसोय होऊ नये याकरिता पालखी दर्शन व्यवस्था व बॅरिकेडस बाबत संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर विसाव्याच्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करताना आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये याकरिता अग्निशमनविषयक सुविधा देण्यास सांगितले आहे.

पालखी मार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढणेचे आदेश अतिक्रमण विभागास दिले आहेत.

पालखी सोहळ्यानिमित्त पाणीपुरवठा विभागाकडून पालखी मार्ग व पालखी तसेच दिंड्यांच्या मुक्कामांची ठिकाणे विचारात घेऊन पालखी मार्गावर व सर्व पेठांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यात येणार असून, देखभाल दुरुस्तीकामी २४ तास दुरूस्ती यंत्रणा ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी मंडळामार्फत वारकऱ्यांना जेवण / नाश्ता देण्यात येतो त्या ठिकाणीही स्वच्छता राहावी यासाठी पुरेसे कचरा वेचक सेवक उपस्थित ठेवण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पालखी मुक्कामाच्या परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती करण्यात येत असून विविध ठिकाणी मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ज्या दिंड्या मनपाच्या शाळांमध्ये दिंड्या मुक्कामी असतात त्या ठिकाणी पाणीपुरवठा तसेच पुरेशी शौचालये उपलब्ध करुन देण्या बाबत आदेशित केलेले आहे. आरोग्य विभागाकडून पालखी मार्गावर तसेच सर्व शाळांमध्ये औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येत आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता करण्यात येणार असून फिरती शौचालये ठेवणेत येणार आहेत. तसेच सार्वजनिक स्वच्छता गृहे स्वच्छ व दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

बाणेर – औंध लिंक रोडवर बांधकाम आणि अतिक्रमणची पुन्हा धडक कारवाई

पुणे- बाणेर येथील बाणेर – औंध लिंक रोड ( मेडि पॉइंट चौक ते बाणेर ज्युपिटर हॉस्पिटल चौक ) व मुळा नदीचे निळया पूर रेषेतील येथे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर धडक कारवाई बांधकाम विकास विभाग झोन ३ व औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आली . या अगोदर देखील येथे कारवाई करण्यात आली होती तथापि नागरिकांनी पुन्हा निळया पूर रेषेतील यापुर्वी पाडलेली बांधकामे व नव्याने बांधकामे केल्याचे निदर्शनास आल्याने या रोडवर पुन:श्च कारवाई करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई मधे सुमारे ६७,०००चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता – श्री. युवराज देशमुख,सह महापालिका आयुक्त – श्री. खलाटे,बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता – मा. श्रीकांत वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली,उप अभियंता – श्री. निवृत्ती उतळे,,कनिष्ठ अभियंता – श्री. संदेश कुवळमोडे, श्री. अजित सणस, श्री. विश्वनाथ बोटे, श्री. डी. एन. जगताप,आरेखक – श्री. नविन महेत्रे,टूलीप इंजिनियर-सुरज शिंदे, प्राची सर्वगोड
दोन अतिक्रमण निरक्षक व स्टाफ,पोलीस निरीक्षक – श्री. राजू अडागळे , श्री. राजकुमार केंद्रे
व स्टाफ यांच्या पथकाने पाच जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर, एक अग्निशमन व्हॅन, एक क्रेन, १० अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.

पुण्यातील आयपीएल सामन्यांचे बेटिंगचे धागेदोरे नागपूर, मुंबईसह दुबईपर्यंत

पुणे- कोंढवा परिसरात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या सट्टेबाजांवर कारवाई करून त्यांना अटक केली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये पुणे शहरातील एका पबच्या मालकासह मोठ्या सट्टेबाजाचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी आरोपींच्या केलेल्या चौकशीत आयपीएल सामन्यांवरील बेटींगचे धागेदोरे नागपूर, मुंबई या शहरांसह दुबई पर्यंत असल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.तसेच आरोपींनी सट्टेबाजासाठी वेगवेगळ्या इमेल आयडीचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

खंडणी विरोधी पथकाने शनिवारी रात्री कोंढव्यातील एका सदनिकेत छापा टाकून इक्राम मकसुद मुल्ला (वय २६, रा. मदने सोसायटी, घोरपडे पेठ,पुणे), वसिम हनीफ शेख (वय -३९, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द,पुणे) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, रा. सोमवार पेठ,पुणे) या आरोपींना अटक केली. याप्रकरणी जितेश मेहता (रा. पुणे) आणि अक्षय तिवारी (रा. इंदूर, मध्यप्रदेश) यांच्या विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़. आरोपी जितेश मेहता हा पबमालक असून इंदूरमधील सट्टेबाज अक्षय तिवारी याच्यासोबत मेहताचे व्यवहारिक संबंध आहेत. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, शंकर संपते आणि पथकाने ही कारवाई केली आहे.

संबंधित प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी शेख, मुल्ला, बाशाइब यांची पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, पोलिस तपासासाठी तिघांच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

अडीच हजार जणांना दिले दहावीचे बनावट प्रमाणपत्र …

पुणे-दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीतील आणखी एकास स्वारगेट पोलिसांनी मुंबईतून अटक केली. या टोळीने अडीच हजार जणांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

संदीपकुमार शामलशंकर गुप्ता (वय 33, रा.साईकृपा चाळ, कुर्ला, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बनावट प्रमाणपत्र प्रकरणात यापूर्वी संदीप ज्ञानदेव कांबळे (वय 35, रा. सांगली), कृष्णा सोनाजी गिरी (वय 34, रा. बिडकीन, जि. धाराशिव ), अल्ताफ महंमद शेख (वय 38, रा. परांडा, जि . धाराशिव ), सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (वय 38, रा. संभाजीनगर ) यांना अटक केली आहे.

या टोळीचा मुख्य सूत्रधार कांबळे आहे. आरोपी गुप्ता याने बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला परीक्षा केंद्र आणि शाळांची माहिती पुरवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तांत्रिक तपासात गुप्ता याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबईतील कुर्ला भागातून अटक केली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, शिवदत्त गायकवाड, रमेश चव्हाण, फिरोज शेख आदींनी ही कारवाई केली.

862 कोटीत झाले बांधकाम,नवीन इमारत का बांधली,नवीन संसदेचे वैशिष्ट्य..पहा

नवी दिल्ली -तब्बल 862 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन संसद भवनाचे काम पूर्ण झाले आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधानांनी त्याची पायाभरणी केली. 15 जानेवारी 2021 रोजी नवीन संसद भवनाचे बांधकाम सुरू झाले. ही इमारत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार होती. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधलेली ही इमारत पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ते 28 महिन्यांत बांधले गेले.

4 मजली इमारत, भूकंपाचा देखील परिणाम होणार नाही
संसदेची जुनी इमारत ४७ हजार ५०० चौरस मीटरमध्ये, तर नवीन इमारत ६४ हजार ५०० चौरस मीटरमध्ये बांधण्यात आली आहे. म्हणजेच नवीन इमारत जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस मीटर मोठी आहे. नवीन संसद भवन चार मजली आहे. त्याला 3 दरवाजे आहेत, त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे आहेत. खासदार आणि व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रवेश आहे. त्यावर भूकंपाचा परिणाम होणार नाही. त्याची रचना एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली आहे. त्याचे शिल्पकार बिमल पटेल आहेत.

नवीन संसदेचे वैशिष्ट्य

  • सध्या लोकसभेची आसनक्षमता ५९० आहे. नवीन लोकसभेत 888 जागा आहेत आणि अभ्यागतांच्या गॅलरीत 336 पेक्षा जास्त लोक बसू शकतात.
  • सध्या राज्यसभेची आसनक्षमता 280 आहे. नवीन राज्यसभेत 384 जागा आहेत आणि अभ्यागत गॅलरीत 336 पेक्षा जास्त लोक बसू शकतील.
  • लोकसभेत एवढी जागा असेल की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनादरम्यान लोकसभेतच १२७२ हून अधिक खासदार एकत्र बसू शकतील.
  • संसदेच्या प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी स्वतंत्र कार्यालये आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हायटेक कार्यालयीन सुविधाही उपलब्ध आहेत.
  • कॅफे आणि जेवणाचे क्षेत्र देखील हायटेक आहे. समितीच्या बैठकीच्या विविध दालनांमध्ये हायटेक उपकरणे बसविण्यात आली आहेत.
  • कॉमन रूम, लेडीज लाउंज आणि व्हीआयपी लाउंज देखील आहेत.

नवीन इमारत का बांधली
सध्याचे संसद भवन 96 वर्षांपूर्वी 1927 मध्ये बांधण्यात आले होते. मार्च 2020 मध्ये, सरकारने संसदेत सांगितले की जुनी इमारत जास्त वापरण्यात आली होती आणि ती खराब होत आहे. यासोबतच लोकसभेच्या नव्या परिसीमनानंतर वाढणाऱ्या खासदारांना बसण्यासाठी जुन्या इमारतीत पुरेशी जागा नाही. यासाठी नवीन इमारत बांधण्यात येत आहे.

जानेवारी 2021 मध्ये सुरू झाले होते बांधकाम
15 जानेवारी 2021 रोजी नवीन त्रिकोणी आकाराच्या संसद भवनाचे बांधकाम सुरू झाले. ही इमारत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाची पायाभरणी केली. तेव्हा ते म्हणाले होते की, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करेल तेव्हा संसदेच्या नवीन इमारतीपेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही.

संसद भवन उद्घाटन: राहुल गांधी म्हणाले ,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पूर्णपणे बाजूला करणे हा महामहिमांचा अपमान तर आहेच पण लोकशाहीवरही थेट हल्ला

0

नवी दिल्ली – 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. एकूण 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन केले जावे, अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे.

या पक्षांचा आहे, विरोध-:

काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप), तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), जनता दल-युनायटेड (जेडीयू), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) , समाजवादी पक्ष, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, करेला काँग्रेस मणी, विदुथलाई चिरुथाईगल कच्छी, राष्ट्रीय लोक दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष यासह इतर मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्रग (MDK) कार्यक्रमात सहभागी होणार नाही.

कोण काय म्हणाले, क्रमाने वाचा…

राहुल म्हणाले – नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नाही
21 मे रोजी राहुल गांधींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करावे, पंतप्रधानांनी नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने म्हटले आहे की, 28 मे हा हिंदुत्वाचे विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणे हा राष्ट्रनिर्मात्यांचा अपमान आहे.

खरगे म्हणाले- राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक त्यांनीच उद्घाटन करावे

22 मे रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेच्या नवीन सभागृहाच्या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले- मोदी सरकार केवळ निवडणुकीतील फायद्यासाठी दलित आणि आदिवासी समाजातील राष्ट्रपती नियुक्त करत असल्याचे दिसते. ती देशाची पहिली नागरिक आहे.

संजय राऊत म्हणाले – सर्व काही मोदींसाठी, हा राजकीय ही राजकीय घटना
संजय राऊत बुधवारी म्हणाले – आमची संसद ऐतिहासिक आहे. ती आता शंभर वर्षे चालू शकते. हे करण्यात आरएसएस आणि भाजपचा हात नाही. आता नवीन इमारत बांधली जाणार असून त्याची पायाभरणी होणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले आहे. यासाठी एवढा खर्च केला जात आहे. चला, तेही ठीक आहे. पण या देशाचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत. संसदेचा संरक्ष तुम्ही त्यांना फोन करत नाही. त्यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणे हा एक प्रोटोकॉल आहे. पण तुम्ही तो नाकारला आहे. कारण पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून तुम्ही राजकीय कार्यक्रम करू पाहत आहात. त्यामुळे सर्व विरोधकांचा त्याला विरोध आहे.

टीएमसी खासदार डेरेक बोलतात – हा राष्ट्रपतींचा अपमान आहे
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन न केल्याबद्दल राष्ट्रपतींचा अनादर केला. ब्रायन म्हणाले, हा भारतातील दलित आदिवासी आणि वंचित समाजाचा अपमान आहे. ते पुढे म्हणाले, संसद ही केवळ नवीन इमारत नाही, तर ती प्राचीन परंपरा, मूल्ये, आदर्श आणि नियम आणि भारतीय लोकशाहीचा पाया आहे. पीएम मोदी यांच्यासाठी इमारतीचे उद्घाटन केवळ त्यांच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही.

AAP आणि CPI म्हणाले- राष्ट्रपतींना निमंत्रण नाही, हे दुर्देव
‘आप’चे नेते संजय सिंह म्हणाले, ‘आप उद्घाटनावर बहिष्कार टाकणार आहे. कारण पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले नव्हते. सीपीआय नेते डी राजा यांनीही आपला पक्ष उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. सीपीआय(एम)नेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक’हे’ उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

(25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडे पाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265) दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (495) दीपक यादव, (517) रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552)  लोकेश पाटील, (558)  ऋत्विक कोट्टे, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687) सुमेध जाधव, (691)  सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा, (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762) अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922)  निहाल कोरे.

एक नजर निकालावर

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी-मे 2023 दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 933  उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये खुला (ओपन) गटातून –345, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 72  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 41  दिव्यांग उमेदवारांचा (14 ऑर्थोपेडिकली अपंग, 07 दृष्टीहीन, 12 श्रवणदोष आणि 08 एकाधिक अपंग) समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 89, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 28,  इतर मागास वर्ग -52, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती-04  उमेदवारांचा समावेश आहे.

                        या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 75, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –45, अनुसूचित जाती (एस.सी.) – 29, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 38 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 04,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20,  इतर मागास प्रवर्गातून – 53, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 31, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 473 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 201, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  45 , इतर मागास प्रवर्गातून – 122, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 69 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –36  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 131   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  12 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 33, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 19   तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण  933 उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिलांची विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर 101 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  असेल.

निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अनिल देशमुख, जयंत पाटील यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव होता; माझ्याकडे सर्व पुरावे- संजय राऊत

मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव होता. त्यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारल्यानंतरच त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

मी भाजपचा प्रस्ताव स्वीकारला असता तर महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्षांपूर्वीच कोसळले असते, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. यावर भाष्य करताना आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अनिल देशमुख यांनी काही आमदारांसह भाजपमध्ये यावे, असा प्रस्ताव होता. त्यासाठी देशमुखांवर दबाव टाकण्यात आला. देशमुख यांनी हा प्रस्ताव नाकारल्यामुळेच त्यांना नंतर तुरुंगात टाकण्यात आले.

संजय राऊत म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव टाकला, याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. यााबतचे व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे आहे. हे सर्व पुरावे अनिल देशमुखांनी स्वत: शरद पवारांनाही दाखवले होते. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांच्यावरही भाजप प्रवेशासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांनी तो नाकारताच त्यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यावर अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे.

केजरीवाल आज उद्धव ठाकरेंना भेटणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या मुंबईत आहेत. केजरीवाल आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सकाळी 11 वाजता भेट घेणार आहेत, अशी मााहिती संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत म्हणाले, सनदी अधिकार्यांच्या नियुक्त्या व बदल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सर्व अधिकार दिल्ली सरकारला दिले होते. मात्र, केंद्र सरकारने एका अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच रद्द केला. राज्यसभेत या अध्यादेशाला विरोधक मंजूर होऊ देणार नाही. राज्यसभेत या अध्यादेशाला नामंजूर कसे करायचे, याबाबत सर्व विरोधक चर्चा करणार.

लोकसभेच्या 19 जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यावर टोला लगावताना शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे की, या 19 पैकी 13 जणांनी आत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कोणत्या 19 जागा आहेत? याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 13 खासदार पडतील. त्या सर्वांचा आम्ही पराभव करू व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या जागांवर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार निवडून येतील.

जी-२० परिषदेसाठी आलेल्या सहभागी मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई; जी -२० परिषदेसाठी आलेल्या सहभागी सदस्यांनी ढोल ताशे आणि लेझीमच्या संगीतावर ताल धरत आनंद घेतला. गेट वे ऑफ इंडिया येथे जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या विविध देशातील मान्यवर प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार उपस्थित होत्या.

जी-२० देशांच्या गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. त्याचा एक भाग म्हणून देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर जी-२० देशांच्या कार्यगटांच्या बैठका होत आहेत. त्यातील ‘आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत आजपासून सुरू झाली आहे. सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत.

या प्रतिनिधींसाठी आज सायंकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी  लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

कठपुतली, लाईव्ह पेंटींग यासह राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे वर्णन करणारा भव्य असा लाईट ॲन्ड साउंड शो सादर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते स्वातंत्र्य चळवळीतील राज्याचे योगदान आणि आतापर्यंत झालेला राज्याचा देदिप्यमान प्रवास असे विविध टप्पे असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित प्रतिनिधींनी उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली.

हा कार्यक्रम राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि केंद्राच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सादर केला गेला.

डिजिटल इंडिया कायदा स्टार्ट अप्स /नवोन्मेषाला चालना देणारा, आम्ही नवोन्मेषाच्या अवकाशात कशालाही बंदी घालणार नाही : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

मुंबई, 23 मे 2023

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज डिजिटल इंडिया कायद्याच्या तत्वावर आधारित डिजिटल इंडिया संवाद ह्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. या भविष्यासाठी सज्ज अशा कायद्याचा उद्देश, सध्याच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याची जागा घेणे आणि डिजिटल नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एक भक्कम कायदेशीर आराखडा उपलब्ध करून देणे, मात्र त्याचवेळी, नवोन्मेष आणि विकासाला पोषक असे वातावरण तयार करणे असा आहे.

डिजिटल इंडिया कायद्यामागची मूलभूत तत्वे विशद करतांना, राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले, की हा कायदा, आज तंत्रज्ञानाच्या अवकाशात सुरु असलेल्या घडामोडी सुसंगत करण्यासाठी आहे. सुरक्षितता आणि विश्वासार्हता, या दोन तत्वाविषयी बोलतांना ते म्हणाले, “सुरक्षितता आणि विश्वासार्हता हा डिजिटल इंडिया कायद्याचा गाभा असून त्याला ह्या कायद्यात व्यापक स्थान दिले जाईल. ऑनलाईन फसवणुकीबाबत, जागतिक स्तरावरील नियामकांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. भारतात लवकरच, इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या, 1.3 अब्जापर्यंत पोहोचणार आहे आणि ह्या डिजिटल नागरिकांना कुठलीही भीती न बाळगता, विश्वासाने आणि  सुरक्षितपणे इंटरनेटचा वापर करता यावा, विशेषतः अनेक सरकारी सेवाही इंटरनेट वर उपलब्ध होत असतांना, त्याचा सुरक्षित वापर सुनिश्चित होणे आवश्यक आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेट सेवा ही सर्वांसाठीच सोयीची व्यवस्था असेल. अफवा, दिशाभूल करणारी माहिती, खोटी माहिती अशा शस्त्रांचाही सामना करण्याची गरज आहे. विशेषतः अशावेळी जेव्हा कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून, अत्यंत सफाईदारपणे खोटी माहिती पसरवली जात आहे.

क्षेत्रनिहाय नियमनांविषयी, संबधितांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी याच्याशी संबंधित इतर अनेक मुद्देही स्पष्ट केलेत. ते खालीलप्रमाणे:

  1. विविध क्षेत्रातील नियामकांनी घातलेल्या नियमांमुळे परस्परांना छेद देणारे नियमन असण्याच्या शक्यतेबद्दल : डिजिटल इंडिया कायद्याअंतर्गत क्षेत्रनिहाय नियमने, जसे की आरबीआय किंवा सेबी तसेच इतर मंत्रालयांची स्वतःची नियमने असण्याला परवानगी दिली जाईल, जेणेकरून व्यवस्था अधिक सुरक्षित होऊ शकेल. मात्र डिजिटल इंडिया कायद्यामुळे विविध कायदे आणि क्षेत्रनिहाय नियमने यांच्यात सुसंगती निर्माण होईल आणि त्यासाठी सर्व नियामकांमध्ये परस्पर संवाद घडवला जाईल.
  2. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे नियमन : कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करताना वापरकर्त्याचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल. डिजिटल नागरिकांना अशा उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे कोणतीही हानी पोहचणार  नाही याची खातरजमा करणे हा यामागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे, ब्लॉकचेन आणि वेब 3.0 साठी उद्योग क्षेत्र उपाय सुचवू शकतो. जोपर्यंत वापरकर्त्याला कुठलीही बाधा पोहचणार नाही तोपर्यंत नवोन्मेषाच्या मार्गातील कोणत्याही गोष्टीवर आम्ही बंदी घालणार नाही.  आम्‍हाला परिभाषित संरक्षणासह वेब 3.0 आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे  नेतृत्व करायचे आहे . मला स्वतःला  नियामक ही संकल्पना फारशी आवडत नाही , त्यामुळे नियामकाच्या माध्यमातून  अनुपालनाचा आणखी भार निर्माण होऊ नये. 
  3. स्टार्टअप्सच्या अनुपालनाबाबत : अलिकडच्या सर्व कायद्यांमध्ये, म्हणजे  एप्रिल 2022 मध्ये जारी करण्यात आलेले सीईआरटी-इन निर्देश असो किंवा आगामी डिजिटल वैयक्तिक विदा  संरक्षण विधेयक, 2023 असो , स्टार्टअप्सना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत किंवा अनुपालनासाठी वाढीव कालावधी दिला आहे.

प्रस्तावित कायदा हा जागतिक दर्जाच्या सायबर कायद्याच्या चौकटीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असेल जो भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांना उत्प्रेरित करण्यासाठी सरकार तयार करत आहे. डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण विधेयक  , राष्ट्रीय डेटा गव्हर्नन्स आराखडा धोरण, आयटी नियमांमध्ये अलिकडे करण्यात आलेल्या सुधारणा, सीईआरटी-इन मार्गदर्शक तत्त्वे या आराखड्याचे  इतर घटक असतील.

या सत्रात उद्योग संघटना, स्टार्टअप्स, आयटी व्यावसायिक,विचारवंत  आणि वकील यांच्यासह तंत्रज्ञान परिसंस्थेशी निगडित विविध हितधारक सहभागी झाले होते.  सुमारे 300 हितधारक  या सल्लामसलतीत सहभागी झाले होते, ज्यामध्ये 125 लोक प्रत्यक्ष  उपस्थित होते तर 175 जण दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या वर्षी मार्चमध्ये बंगळुरूमध्ये अशाच प्रकारचा संवाद आयोजित करण्यात आला होता.

ही सल्लामसलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कायदा आणि धोरण निर्मितीच्या  सल्लामसलतीशी संबंधित  दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. प्रथमच  विधेयकाच्या तत्त्वांवर चर्चा होत आहे.

‘महाप्रीत’चा कर्करोगाच्या उपचारासाठी ‘समीर’ संस्थेसोबत सामंजस्य करार

मुंबई, दि. २३ : भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई येथे आयोजिलेल्या रेडिओलॉजी व रेडिओथेरपी प्रगती-२०२३ या परिषदेत ‘महाप्रीत’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व ‘समीर’ (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) यांच्यासोबत रेडिओलॉजी आणि रेडिओ थेरपी तंत्रज्ञानावर आधारित कर्करोगावर उपचार करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य कराराच्या वेळी ‘महाप्रीत’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व समीर संस्थेच्या सुनीता वर्मा तसेच ‘महाप्रीत’ कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. श्रीमाळी म्हणाले की, “रेडिओथेरपी व रेडिओलॉजीच्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल. हे तंत्रज्ञान सर्वसामान्य जनतेला कमी खर्चात उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्रामध्ये या तंत्रज्ञानावर आधारित मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होऊन उद्योग निर्मितीला चालना मिळेल व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात रोजगारनिर्मिती होईल.

श्रीमती वर्मा म्हणाल्या की, “या करारामुळे समीर (SAMEER) संस्थेमार्फत रेडिओलॉजी व रेडिओथेरपी संशोधन व तंत्रज्ञानाची कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मदत होईल. ‘महाप्रीत’तर्फे हे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यात येईल. या संशोधनामुळे महाराष्ट्रामध्ये अद्ययावत उपचार सुविधा निर्माण होतील.

याप्रसंगी समीर संस्थेचे अधिकारी, महाप्रीत तसेच भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबईचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजीटल मॅपींग करावे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील राज्य शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर मंदिर विकास, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

पंढरपूर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरविकास विभागाकडून १० कोटी रुपयांचा निधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. २३: राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजीटल मॅपींग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरीत करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यावेळी उपस्थित होते.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक झाली. खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, आमदार सर्वश्री सचिन कल्याण शेट्टी, सुभाष देशमुख, समाधान अवताडे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, रणजीत सिंह मोहिते पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, वारकरी केंद्रबिंदू ठेऊन पंढरपूर मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करा. मंदिराचे प्राचीन वैभव कायम ठेवत भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा यांची सांगड घालण्याचे काम करा. यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरात येत असतात अशावेळी घाट सुशोभिकरण, रस्ते दुरूस्ती तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी यात्रा अनुदान ५ कोटीवरून १० कोटी रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवतानाच त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. नगरविकास विभागाने रस्त्यांच्या डागडुजीसाठी पंढरपूर नगरपरिषदेला तातडीने १० कोटी रुपयांचा निधी वितरित करावा. पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पंढरपूर मंदिर विकास आराखड्यात ७३ कोटी ८० लाख रुपयांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचे सादरीकरण पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. या आराखड्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे. जतन आणि संवर्धन कामांमध्ये अनियोजित अनावश्यक जोडण्या काढणे, पाणी गळती रोखणे, दगडी बांधकाम आवश्यकतेनुसार दुरूस्त करणे, मंदीर परिसरातील दीपमाळांची पुनर्बांधणी करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने काही शिफारशी केल्या असून त्यामध्ये नविन बांधकाम करताना मुख्य मंदिराशी सुसंगत काळे किंवा लाल पाषाणांचा वापर करणे, मंदिर संवर्धनातील कामात बदल वा सुधारणा, नव्याने बाधकाम करणे यासाठी संनियंत्रण करण्याकरिता समिती गठीत करण्याच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून उच्चाधिकार समितीच्या संमतीशिवाय कोणतेही काम हाती घेण्यात येणार नाही, असे सादरीकरणा दरम्य़ान सांगण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भाविकांसाठी ऑनलाईन आणि डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, यावेळी अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत चर्चा झाली. यावेळी ३६८ कोटी ७१ लाख रुपयांच्या आराखड्यामध्ये करण्यात येणाऱ्या कामांबाबत चर्चा झाली. वाहनतळ, रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक त्या भुसंपादनाला मंजुरी यावेळी देण्यात आली. प्रस्तावित आराखड्यमध्ये वाहनतळ, वॉटर एटीएम, रस्ते विकास, शौचालय निर्मिती, हत्ती तलाव उद्यानांचा विकास, व्यापारी केंद्र, भक्त निवास, चौक सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे.

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि.२३: पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी (पी.एच.डी.) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी २० जून २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी क्यूएस जागतिक रँकिंग ३०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावा.

या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

देशांतर्गत विमानसेवेद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये 42.85% ची वाढ

देशांतर्गत विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी सादर केलेल्या प्रवास विषयक आकडेवारीनुसार, प्रवाशांची संख्या, विक्रमी 503.92 लाखांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 352.75 लाख होती. त्यामुळे यात 42.85% ची लक्षणीय वार्षिक  वाढ दिसून येते.

प्रवासी संख्येतील ही उल्लेखनीय वाढ भारताच्या विमान वाहतूक उद्योगाची मजबूती आणि लवचिकता प्रतिबिंबित करते. संपर्क व्यवस्था वाढवण्यासाठी आणि आपल्या देशातील नागरिकांना सोयीचे प्रवास पर्याय देण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचे हे निदर्शक आहे.

या शिवाय, एप्रिल 2022 आणि एप्रिल 2023 दरम्यान MoM वाढीचा दर 22.18% ने वाढला आहे. तो देशांतर्गत विमान उद्योगाची सातत्यपूर्ण गती अधोरेखित करतो.

प्रवासी संख्येतील लक्षणीय वाढीव्यतिरिक्त, एप्रिल 2023 महिन्यासाठी नियोजित देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा एकूण दर 0.47% इतका उल्लेखनीयरित्या कमी राहिला आहे. तसेच,  10,000 प्रवाशांमागे मोजली जाणारी तक्रारींची संख्या एप्रिल 2023 मध्ये जवळपास 0.28 इतकी कमी आहे. नागरी विमान वाहतुक मंत्रालय आणि विमान कंपन्यांच्या सूक्ष्म नियोजन, कार्यक्षमता आणि सक्रिय उपाययोजनांमुळे हे यश मिळाले आहे. प्रवाशांना सुविहित  प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी दोन वर्षांच्या कोविड-19 मंदीच्या काळातही त्यांनी केलेल्या कामाचेच हे फलित आहे.

“विमान वाहतुक क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करण्यासाठी सर्व सहभागींचे एकत्रित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत. मंत्रालय अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. या उद्योगाच्या भरभराटीसाठी वातावरण आणि शाश्वत विकास सुलभ करण्यासाठी तसेच सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या समाधानाची सर्वोच्च मानके सुनिश्चित करण्यासाठी संबंधितांसोबत मंत्रालय सहयोग सुरू ठेवेल” असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती बिघडली, हिंदुजा रुग्णालयात दाखल; रश्मी व उद्धव ठाकरेंनी केली विचारपूस

मुंबई-माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन मनोहर जोशींच्या तब्येतीची विचारपूस केली.सोमवारी रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉ चारुलता सांकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी शिवसेनेचे नेते आहेत.बाळासाहेब ठाकरेंचे अगदी जवळचे ,बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना राज्यभर पसरविण्यासाठी,सरपोतदार ,साबीर भाई शेख ,दत्ताजी साळवी यांच्यासमवेत काम केलेले नेते आहेत. काल संध्याकाळी मनोहर जोशींना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली.