देशांतर्गत विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी सादर केलेल्या प्रवास विषयक आकडेवारीनुसार, प्रवाशांची संख्या, विक्रमी 503.92 लाखांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 352.75 लाख होती. त्यामुळे यात 42.85% ची लक्षणीय वार्षिक वाढ दिसून येते.
प्रवासी संख्येतील ही उल्लेखनीय वाढ भारताच्या विमान वाहतूक उद्योगाची मजबूती आणि लवचिकता प्रतिबिंबित करते. संपर्क व्यवस्था वाढवण्यासाठी आणि आपल्या देशातील नागरिकांना सोयीचे प्रवास पर्याय देण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचे हे निदर्शक आहे.
या शिवाय, एप्रिल 2022 आणि एप्रिल 2023 दरम्यान MoM वाढीचा दर 22.18% ने वाढला आहे. तो देशांतर्गत विमान उद्योगाची सातत्यपूर्ण गती अधोरेखित करतो.
प्रवासी संख्येतील लक्षणीय वाढीव्यतिरिक्त, एप्रिल 2023 महिन्यासाठी नियोजित देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा एकूण दर 0.47% इतका उल्लेखनीयरित्या कमी राहिला आहे. तसेच, 10,000 प्रवाशांमागे मोजली जाणारी तक्रारींची संख्या एप्रिल 2023 मध्ये जवळपास 0.28 इतकी कमी आहे. नागरी विमान वाहतुक मंत्रालय आणि विमान कंपन्यांच्या सूक्ष्म नियोजन, कार्यक्षमता आणि सक्रिय उपाययोजनांमुळे हे यश मिळाले आहे. प्रवाशांना सुविहित प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी दोन वर्षांच्या कोविड-19 मंदीच्या काळातही त्यांनी केलेल्या कामाचेच हे फलित आहे.
“विमान वाहतुक क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करण्यासाठी सर्व सहभागींचे एकत्रित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत. मंत्रालय अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. या उद्योगाच्या भरभराटीसाठी वातावरण आणि शाश्वत विकास सुलभ करण्यासाठी तसेच सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या समाधानाची सर्वोच्च मानके सुनिश्चित करण्यासाठी संबंधितांसोबत मंत्रालय सहयोग सुरू ठेवेल” असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी म्हटले आहे.