Home Blog Page 1527

‘महाराजांनी माफी मागितली’असं सुधांशु त्रिवेदींनी म्हटलेलं नाही-फडणवीस

पुणे-प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींच्या विधानावर आज येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सुधांशु त्रिवेदींचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही.”पत्रकारपरिषदेत यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “एक गोष्ट स्पष्ट आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे, देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहणार आहेत. आमचे हिरोदेखील छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही. त्यामुळे मी असं मानतो की यावर काही वाद होण्याचं कारण नाही. मला वाटत नाही की राज्यपालांच्या मनातही काही शंका आहे.”

याशिवाय, “राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्याही मनात असा कुठलाही भाव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही. असही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.”

पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.२०: पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वानवडी येथे एसआरपीएफ गट-२ परिसरात आयोजित ७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर-२०२२ समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, महेश लांडगे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग, राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, २०१९ मध्ये झालेल्या पोलीस स्पर्धेदरम्यान असे क्रीडा संकुल निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु कोविडमुळे ते शक्य झाले नाही. आता लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. या क्रीडा संकुलात ॲथलेटीक ट्रॅक, सिंथेटीक टर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टर्फ फुटबॉल मैदान, बहुउद्देशिय सभागृह, जलतरण तलाव, वसतीगृह आदी सर्व सुविधा असतील. यामुळे राज्यातील खेळाडूंना फायदा होण्यासोबत राज्याला मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळेल.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, आपल्या मन आणि बुद्धीला निकोप आणि सक्षम ठेवण्याचे कार्य खेळामुळे होते. खेळात खिलाडूवृत्तीला महत्व आहे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आव्हानांचा सामना करण्याची क्षमता खेळामुळे निर्माण होते. खेळामुळे जिंकण्याची सवय लागण्यासोबत पराभव पचवण्याची क्षमताही निर्माण होते. खेळाडू हार न मानता प्रत्येक पराभवानंतर नव्या यशासाठी प्रयत्न करतो. त्यामुळेच सुरक्षा दलात खेळाचे विशेष महत्व आहे आणि खेळाडूंना विशेष महत्व दिले जाते. महाराष्ट्रही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचा नावलौकीक उंचावणाऱ्या खेळाडूंना पोलीस उपअधीक्षक पदावर थेट नियुक्ती दिली जाते, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे विशेष स्थान आहे. राज्याला देशाचे ‘इकॉनॉमिक पॉवर हाऊस’, मुंबईला आर्थिक राजधानी, तर पुण्याला उत्पादन, शिक्षण आणि इनोव्हेशनची राजधानी म्हणून ओळखले जाते, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

ज्याप्रमाणे सैन्यदले देशांच्या सीमांचे रक्षण करतात त्याप्रमाणे पोलीस दल आणि हे खेळाडू देशातील अंतर्गत सुरक्षेचे कार्य करतात. सैन्य आणि पोलीस दलामुळे देशातील जनता सुरक्षित आहे असे सांगून स्पर्धेत पुरुषांसोबत महिलांचा वाढता सहभाग हे बदलत्या भारताचे दृश्य असून देशासाठी अभिमानाची बाब असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

पोलीस महासंचालक श्री. सेठ म्हणाले, स्पर्धेत ७ क्रीडाप्रकारांचा समावेश होता. कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांबरोबर या स्पर्धेत प्रथमच आर्म रेसलींग, पॉवरलिफ्टींग आणि बॉडी बिल्डींगचा सहभाग करण्यात आला. स्पर्धेत नामांकीत खेळाडूंनी सहभाग घेतला. यापूर्वी २०१० आणि २०१७ मध्ये महाराष्ट्राने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २५ राज्याचे आणि ५ केद्र शासीत प्रदेश आणि ६ निमलष्करी दल, रेल्वे पोलीस अशा ३७ संघानी सहभाग घेतला. स्पर्धेत २ हजार पुरुष आणि ६०० महिला खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्र पोलीस दलाला खेळाची गौरवशाली परंपरा आहे. राज्य पोलीस दलाने अनेक नामांकीत खेळाडूंना नोकरीत घेऊन चांगली संधी दिली आहे.

अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियामक मंडळाचे प्रतिनिधी व आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर यांनी प्रास्ताविक केले.

विजेत्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रारंभी सर्व सहभागी संघांनी आकर्षक संचलन करून मानवंदना दिली.

पंजाब पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
स्पर्धेत पंजाब पोलीस दल १७ सुवर्ण, ९ रजत, १५ कांस्य पदकासह ४१ पदके मिळवून सर्वसाधारण विजेते ठरले. दुसऱ्या क्रमांकावरील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाने १५ सुवर्ण १० रजत व १६ कांस्य पदकासह एकूण ४१ पदके मिळवली. महाराष्ट्र पोलीस दलाने १२ सुवर्ण ७ रजत व ११ कांस्य पदकासह एकूण ३० पदके मिळवत सर्वसाधारण तिसरा क्रमांक मिळविला.

पुण्यातून अमोल पालेकर, संध्या गोखले ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींसमवेत सहभागी

0

जळगाव – आज कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत प्रसिद्ध बॉलीवूडचे जुने अभिनेते अमोल पालेकर तसेच दिग्दर्शिका आणि लेखिका संध्या गोखले सहभागी झाल्या. त्यांच्या सहभागाने अनेकांचे कुतूहल आणखी वाढले आहे.

इथे बदला घ्या बदला ! शिवरायांच्या अपमानानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प का ? संजय राऊतांची टीका

मुंबई-राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून 72 तास उलटले आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस गप्प का?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.तसेच, राज्यपालांचा राजीनामा घेऊन इथे बदला घ्या बदला, असा जोरदार टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला.

आज पत्रकार परिषदेत राज्यपाल भगितसिंह कोश्यारी यांनी काल औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, राज्यपालांचे वक्तव्य हे दळभद्री आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे वक्तव्य एका नॅशनल चॅनेलवर केले.

भाजपची हीच भूमिका आहे का?

पुढे संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत भाजपने शिवसेना फोडली व एक मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजमहाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? भाजपचीदेखील हीच भूमिका आहे का? संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय.

राज्यपालांना जोडे मारणार का?

संजय राऊत म्हणाले, राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे. हीच आपली अधिकृत भूमिका आहे का?, हे आता भाजपला सांगावेच लागेल. वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त बोलल्यास भाजप पेटून उठतो. जोडे मारो आंदोलन करतो. त्याचे स्वागत आहे. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल हे जोडे आता कोणाला मारणार. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना मारणार की राज्यपालांना मारणार?

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्यांविषयी असे वक्तव्य आम्ही सहन करू शकत नाही. मोठमोठ्या स्वाभिमानाच्या गप्पा मारत मिंधे गट मविआतून बाजूला झाला. आता या 40 आमदारांचा स्वाभिमान कुठे गेला? एकानेही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकृतपणे राज्यपालांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा शिवसैनिक जोडे मारो आंदोलन करणार. शिवसैनिकांचे जोडे कसे असतात, हे तेव्हा तुम्हाला कळेल.

संजय राऊत म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असेल तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेतात? नौदलाला शिवरायांचे बोधचिन्ह का देण्यात आले आहे? शिवरायांचा अपमान सहन करता तर अफझल खान, औरंगजेबाची कबर पाडण्याचे नाटक का करता? वीर सावरकर हे शिवरायांची आरती करत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे वीर सावरकरांचे प्रेरणास्त्रोत होते. केवळ सत्तेला चिकटून बसण्यासाठी मिंधे गट आता शांत आहे. महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय, अशा शब्दांत राऊतांनी आज टीका केली.

भारताने खुल्या जागेत हागणदारी मुक्तीचं लक्ष्य 2019 मध्ये म्हणजेच संयुक्त राष्ट्रद्वारा निर्धारित कालावधीच्या 11 वर्ष आधीच साध्य केले – केंद्रीय जलशक्ती मंत्री

0

मुंबई-केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नेटवर्क 18 द्वारा आयोजित मिशन स्वच्छता और पानी टेलिथॉन कार्यक्रमात शनिवारी सहभाग घेतला. भारतानं खुल्या जागेत हागणदारी मुक्तीचे लक्ष्य 2019 मध्ये, संयुक्त राष्ट्रद्वारा निर्धारित कालावधीच्या 11 वर्ष आधीच साध्य केले  आहे, असे या कार्यक्रमात  शेखावत यांनी सांगितले. या कामगिरीमुळे भारत इतर विकसनशील राष्ट्रांसमोर रोल मॉडेल ठरला आहे असे ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीही महासागराचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केलं. आपले महासागर ही आपली अर्थव्यवस्था आहे आणि बालकांच्या आरोग्याचं जतन करणं देशाच्या हिताचे आहे असं ते म्हणाले.

जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित मिशन स्वच्छता और पानी टेलिथॉन कार्यक्रमात  केंद्रीय जलशक्ती मंत्री सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान,जितेंद्र आव्हाड , अमोल कोल्हे संतापले ..

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळेस पत्र लिहिले, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वृत्तवाहिनीवर केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजप प्रवक्त्याच्या या वक्तव्याने यात भर घातली आहे.

जितेंद्र आव्हाड ,अमोल कोल्हे या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत सोशल मिडिया वर प्रतिक्रिया नोंदविली आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य करताच भाजपने त्यांना टिकेचे लक्ष्य केले आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी सहभागी झाले होते. मात्र, सावरकरांच्या माफीनाम्यावर बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, सावरकरांच्या काळात अशी निवेदने देऊन माफी मागणे सामान्य होते. सावरकरच नव्हे तर, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबास पाच पत्र लिहिले होते.

सुधांशु त्रिवेदी यांचे वक्तव्य समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्यावर टीका केली आहे.

राज्यपाल कोश्यारींचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला वाटते शिवरायांबद्दल वक्तव्य करून जाणून बुजून महाराष्ट्राच्या भावना दुखवण्याचे काम केले जात आहे. राज्यपालांना वरच्यांचा (दिल्ली) आशिर्वाद आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्र घडवणारे, महिलांना शिक्षण देणारे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल त्यांनी वक्तव्य केली होती. काल शिवाजी महाराजांबद्दलही वक्तव्य केले. महाराष्ट्राच्या मातीचा अपमान केला, ते संदेश देत आहेत की, महाराष्ट्राचे लोक माझे काहीही बिघडवू शकत नाही. आता महाराष्ट्राच्या जनतेने जागे व्हावे, लक्षात घ्यावे. आम्ही तर छत्रपती शिवरायांसाठी खोट्या केसेस अंगावर घेऊन लढत आहोत.जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपला स्वाभीमान लाथाडला जातो. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत शिवरायांचे नाव या भुतलावावरून कुणीही मिटवू शकत नाही.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित इतिहासाची मोडतोड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राची माती तुडवली जात आहे. लाथाडली जात आहे. असे असताना येथे बोलायला माणसं नसतील तर कठीण आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले, हर हर महादेव या चित्रपटात खोटा इतिहास सांगण्यात आला. या चित्रपटात खोटा इतिहास आहे, असे बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज म्हणाले आहेत. तो चित्रपट पाहायला कोणीही जात नाहीये. मात्र अजूनही महाराष्ट्र शासन झोपले आहे. महाराष्ट्रात आता सर्वकाही चालत आहे.

अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटलं की, डॉ. सुधांशू त्रिवेदीजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने औरंग्याला फरफट करून या महाराष्ट्रात गाडलं. हाच खरा इतिहास आहे. तुमच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध! छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये, अशा शब्दात कोल्हे यांनी भाजपला खडसावलं.

आमदार प्रताप सरनाईक यांचे काम चांगले व प्रभावी आहे ; त्यांनी लवकरच मंत्री व्हावे… रामदास आठवले

मीरारोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे झाले भूमिपूजन 

मुंबई दि. 20 –  पहाटे पासून रात्रीपर्यंत १८-१८ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. समाजाच्या उध्दारासाठी, कल्याणासाठी आयुष्यभर त्यांनी ऐतिहासिक असे काम केले. त्यांच्या नावाने २७ कोटी रुपये खर्च करून मीरा भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभे राहत आहे ही अत्यंत मोठी व महत्वाची , आनंद देणारी अशी गोष्ट आहे. सर्व सुविधांनी सज्ज असे हे भवन येणाऱ्या पिढींना प्रेरणा देईल. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबरोबरच बँकिंग बाबतचे व स्वयं रोजगाराचेही प्रशिक्षण दिले जावे , असे प्रतिपादन  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी मीरारोड येथे केले. 

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नांनी साकार होत असलेल्या मीरा भाईंदर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन आज ना.रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडले. जवळपास ६० ते ६५ कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या हटकेश परिसरातील जवळपास १ एकर मोक्याच्या जागेवर हे भवन होणार असून तीन मजली सांस्कृतिक भवन इमारतीमध्ये  कार्य होण्यासाठी मोठा हॉल , विपश्यना हॉल , प्रदर्शन हॉल , ग्रंथालय , मिनी थिएटर , कॉन्फरन्स रूम , कॅफे एरिया , लिफ्ट अशा सर्व सुविधा असतील. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते-कार्यकर्ते जर मीरा भाईंदर शहरात आले तर त्यांच्या विश्रामाची व्यवस्थाही भवनात केली जाईल. त्यासाठी ४ चांगल्या रूम भवनात असतील.  त्याचप्रमाणे या आंबेडकर भवनाच्या प्रांगणात १५ ते २० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची नागरिकांची मागणीही आमदार प्रताप सरनाईक यांनी मान्य करत आपण त्यासाठी परवानगी आणू पण हा पुतळा तेथे उभारला गेला पाहिजे , असे कार्यक्रमात घोषित केले. याच सांस्कृतिक भवनात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी केंद्रही सुरु केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये शिकण्यासाठी गेले होते व लंडन मधील ज्या घरात बाबासाहेब राहिले होते, त्या लंडनच्या घराप्रमाणेच मीरा भाईंदरच्या या सांस्कृतिक भवनाची इमारत उभारली जाणार आहे. लंडनमध्ये बाबासाहेब १९२२ मध्ये शिकण्यासाठी गेले होते. २०२२ मध्ये त्याला १०० वर्षे होत असताना त्या लंडनच्या घराप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इमारत उभारली जाईल. लंडनच्या घराप्रमाणे ही मीरा भाईंदरमध्ये उभी राहणारी  भवन इमारत आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अफाट ज्ञान , त्यांनी केलेले कार्य , त्यांची शिकवण आपल्याला आठवण करून देत राहील  , हे भवन राज्यात पहिल्यांदा उभे राहत आहे असे आमदार सरनाईक म्हणाले. 

यावेळी मंत्री रामदास आठवले म्हणाले की , २७ कोटी रुपये खर्च करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भवन उभे राहत आहे ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. २७ कोटी इमारतीवरील खर्च व ६० कोटींची जमीन त्यामुळे हा प्रकल्प १०० कोटींचा भव्य झाला आहे. या सांस्कृतिक भवनात ग्रंथालय, मंगल कार्यालय , विपश्यना केंद्र याबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र होत आहे. त्याचबरोबरीने बँकेत नोकरी मिळविण्यासाठी काय करायचे त्याचेही प्रशिक्षण द्या. आपले तरुण बँक तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये कामाला लागले पाहिजेत , असे ते म्हणाले. 

मै आया हू जीस शहर के अंदर उसका नाम है मीरा भयंदर अशी कविता सादर करीत ना.रामदास आठवले यांनी आपल्या खुमासदार शैलीत केलेल्या भाषणाने कार्यक्रमात उपस्थित मीरा भाईंदर मधील नागरिकांमध्ये  उत्साह संचारला होता. 

प्रताप सरनाईक यांचे नेतृत्व डॅशिंग आहे. त्यांचे काम चांगले आहे व काम पाहून मला आनंद वाटला. त्यांच्या प्रयत्नातून जवळपास ४० ते ४२ हजार फूट बांधकाम असलेले इतके चांगले भवन इथे होत आहे.  ते पुन्हा आमदार होतील. आणि लवकरच सरनाईक यांना मंत्री पद मिळावे अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील स्ट्रॉंग असे आमदार प्रताप सरनाईक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की तुमचा मंत्रिपदासाठी विचार करतील असे सांगत आठवले यांनी सरनाईक यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वात आधी शिवसेना पक्षप्रमुखाना पत्र लिहून महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडून भाजपसोबत जाण्याचा आग्रह पत्रातून धरला होता. त्या आमदार सरनाईक यांच्या पत्राचा उल्लेख आठवले यांनी प्रारंभी भाषणात केला. आज जे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे ते सरकार आणण्यात सर्वात मोठा वाटा सरनाईक यांचा आहे असे रामदास आठवले म्हणाले व त्यांनी शिवशक्ती – भीमशक्ती युती कशी झाली त्याची आठवणही सांगितली. यावेळी प्रताप सरनाईक व रामदास आठवले या दोघांनीही आपल्या चारोळ्या , कविता सादर करून टाळ्या मिळवल्या. मीरा भाईंदर मधील शेकडो नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. 

यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त दिलीप ढोले , आमदार गीता जैन , रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शेलेकर; माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे; निर्मला सावळे; नीला सोंस;रिपाइं मुंबई युवक अध्यक्ष रमेश गायकवाड; चंद्रमानी मनवर; अनंत शिर्के;  नगरसेवक , पालिका अधिकारी उपस्थित होते. 

गायक नंदेश उमप यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम यावेळी झाला. नंदेश उमप यांच्या एका गाण्यावर तर उपस्थित लोक अक्षरशः ५ मिनिटे नाचत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अशी भव्य वास्तू शहरात उभी राहत आहे याचा आनंद उपस्थित शेकडो नागरिकांनी व्यक्त केला.

भारत जोडो यात्रा घराघरात पोहोचली ; लहान – थोरांच्या तोंडीही ” नफरत छोडो, भारत जोडो’!

0

वडशिंगी ( ता बुलढाणा) दि. 20 नोव्हेंबर :
“नफरत छोडो, भारत जोडो”चा नारा लहान-थोरांमध्ये आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गावामध्ये दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीला भारत यात्री साद घालताच त्याचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यावरुन ही यात्रा घराघरात पोहचल्याचे दिसत होते. वडशिंगी (जिल्हा बुलढाणा ) मध्येही हे चित्र पाहायला मिळाले.

हजारो आदिवासी आपल्या मागण्या घेऊन यात्रेत पुढे चालत होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील आदिवासी सांगत होते की, वडिलोपार्जित कसलेल्या जमिनींची मालकी मिळावी, सातबारा नावावर करून मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. त्यासोबत शिक्षण, आरोग्य सारख्या मूलभूत मिळाव्यात या मागण्या घेऊन हजारो आदिवासी महिला पुरुष यात्रेत सहभागी झाले होते.

लाल, भगव्या, साड्या, डोक्यावर पदर तर पुरुषांच्या सफेद कपड्यांवर रंगीबेरंगी फेटे असे दृष्य जागोजागी दिसत होते. भारत जोडो यात्रा मार्गावर भारत यात्री गावात रस्त्यावर उभ्या ग्रामस्थांशी संवाद साधत जात होते. गॅस किती महाग झाला, तुमच्या मुलांना नोकऱ्या आहेत का ? असे प्रश्न विचारत, त्यांना भारत जोडोचा अर्थ समजावून सांगताना दिसत होते.

वडशिंगी येथे सुमारे अर्धा किलोमीटर झेंडूची फुले अंथरून गालिचा बनविला होता. तर रस्त्याच्या बाजूला गावातील प्रमुख महिला हिरव्या साड्या व डोक्यावर भगवा फेटा नेसून, हातात निरंजन आणि फुले घेऊन राहुलजींच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. एका महिलेने सुपात सोयाबीन धान्य घेतले होते. “हे सोयाबीन राहुलजींना देण्यासाठी आहे. आमच्या सोयाबीनला चांगला दर मिळत नाही. पीक बुडाले तरी भरपाई मिळालेली नाही. ते आम्ही राहुलजींना सांगणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.

यात्रेच्या महाराष्ट्रातील चौदाव्या व शेवटच्या दिवशी यात्रा सकाळी सहाला भेंडवळ येथून सुरू झाली आणि दहा वाजता जळगाव (जामोद) येथे पोहोचली. जामोद येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी महिला जमल्या होत्या. दुपारच्या जेवणानंतर आदिवासी महिलांचा एक भव्य मेळावा झाला. महाराष्ट्रात लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहून अनेक भारत यात्रींनी समाधान व्यक्त केले. यात्रेचा उद्देश सफल होत असल्याचे एम. ए. सालम यांनी सांगितले. ते केरळ सेवा दलाचे प्रमुख आहेत. संध्याकाळी यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत गेली. पुढे ही यात्रा बुऱ्हाणपूर या मध्य प्रदेशातील शहराच्या वेशीवर दाखल होईल.

आदिवासींना जल, जंगल, जमीन बरोबरच शिक्षण व आरोग्याचेही अधिकार मिळाले पाहिजेत : राहुल गांधी

0

भारत जोडो यात्रेत आदिवासी कष्टकरी महिलांचा सहभाग.

जळगाव जामोद, दि. 20 नोव्हेंबर
आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजपा करत आहे. आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी आहेत आणि आदिवासीच राहतील. जल जंगल जमीन चा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर शिक्षण व आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असे खा. राहुलजी गांधी म्हणाले.

जळगाव जामोद मध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात ते बोलत होते. राहुलजी पुढे म्हणाले की,
आदिवासींची संस्कृती, इतिहास देशासाठी महत्वाचा आहे, पर्यावरणशी तुमचे नाते घट्ट आहे आणि ते महत्वाचे आहे. आदिवासींची भाषा, कपडे व जगण्याचा अंदाज वेगळा आहे पण तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, आपल्यातीलच आहेत.

काँग्रेसने आदिवासींसाठी पेसा कायदा, वन हक्क कायदा दिला पण ती काही तुम्हाला भेट दिलेली नाही तर तो तुमचा हक्क आहे, अधिकारच आहे.
तुमचा हक्क आहे तोच काँग्रेस सरकारने तुम्हाला दिला.
या जमिनीवर पहिले पाऊल आदिवसांनी टाकले पण पंतप्रधान आदिवासींसाठी नवा शब्द वनवासी उच्चारतात.. आदिवासी व वनवासी या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आदिवासी मालक आहेत तर वनवासी म्हणजे जंगलमध्ये राहणारा म्हणजेच शहरात राहू न शकणारा, शिक्षण न मिळू शकणारे, जंगल संपले तर तुमचे अस्तित्वही संपेल आणि पंतप्रधान तुमच्या हक्काचे जंगल काही उद्योगपतींना देत आहेत. तुमच्या अस्तित्वावर घाला घातला जात आहे.

काँग्रेस पक्षाने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण देऊन राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व दिले. महिला, आदिवासी, दलित, वंचित समाज घटकाला न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भाजपाचा मुली, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बलात्काराला मुलींचे कपडे जबाबदार असल्याचे सांगत मुलींनाच चूक ठरवले जाते. बलात्कार कपड्यामुळे होत नाहीत त्यात मुलीची चुक नसते जर कोणी गुन्हेगार असेल तर तो बलात्कारी.. भाजपावाले महिलांचा सन्मान न करता त्यांचा अपमान करतात.

या मेळाव्याला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खा. दिग्विजयसिंह, महिला काँग्रेस अध्यक्ष नेट्टा डिसुजा, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, योगेंद्र यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवरायांचा अपमान कदापी सहन करणार नाही, भाजपाने माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही.

जळगाव जामोद, दि. २० नोव्हेंबर
भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाच्या प्रवक्तेंनी अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
जळगाव जामोद येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीचा खरपूर समाचार घेतला. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपाल कोश्यारींची जीभ कशी झडली नाही? त्यांच्या अशा विधानातून आरएसएसची मानसिकता दिसून येते. महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? निवडणुकीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून वारंवार त्यांचाच अपमान करता, ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यावेळी म्हणाले की, भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला असून या पदयात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा, नवा उत्साह, नवा जोश निर्माण झाला असून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आगामी काळात चांगली कामगिरी करेल व काँग्रेस पक्षाचे नवे रुप यापुढे दिसेल. भाजपाला जनता कंटाळली असून त्यांना पर्याय हवा आहे आणि काँग्रेसच योग्य पर्याय आहे याची जनतेला खात्री आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले, त्यांचे आभार. पदयात्रेत महिला व तरुणांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ज्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणे थांबवतील त्या दिवशी आम्हीही आरएसएस व भाजपाबद्दल ‘सत्य’ सांगण्याचे बंद करू.
विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रा हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण ठरला आहे. लोकशाहीतील स्तंभ डळमळीत होत असताना ते मजबूत रहावेत यासाठी ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे. याबरोबर जनतेच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम झाले. महागाई, बेरोजगारी याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये नैराश्य असल्याचे दिसले, हे वातावरण बदलले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने पदयात्रेचे उस्फूर्त स्वागत केले. तसेच राज्याच्या काना-कोपऱ्यातून विविध सांस्कृतीचे दर्शन दररोज घडले. शेगावची सभा हा पदयात्रेतील परमोच्च क्षण ठरला, अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी सभेला उपस्थिती लावली.
पदयात्रेत विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सहभाग घेतला त्यात ‘लोकायत’ या संस्थेने भारत जोडो यात्रा कशासाठी आहे, याविषयाची पत्रके वाटून जनजागृती करण्याचे काम केले. पदयात्रा पुढे निघून गेल्यानंतर मागे पडलेला कचरा, पाण्याचा बाटल्या उचलून रस्ता स्वच्छ करण्याचे काम प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने केले. ही दोन्ही कार्य उल्लेखनीय आहेत. जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल थोरात यांनी आभार व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

…तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करावा – अजित पवार

पुणे- महाराष्ट्राच्या राज्यपालपदी 3 वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले की, राज्यपाल महोदयांच्या अनाकलनीय, अनावश्यक, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हटले आहे अजित पवार यांनी ….

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही मा. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना!

कोश्यारीचे वक्तव्य काय?

शिवाजी महाराज जुन्या काळातले विषय आहेत. तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले.

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि.२० : पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, विनोद जगदाळे, अरुण कांबळे, सुनील लोणकर, बाबासाहेब ढसाळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शासन आणि पत्रकार दोन्ही समाजासाठी काम करतात. कोविड काळात शासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी एकत्रितरित्या संकटाचा सामना केला. वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेक आवाहनांना सामोरे जावे लागते. बातमी मिळविताना पत्रकारांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच अधिस्वीकृती समिती लवकरच स्थापन करण्यात येईल. मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी २५ लाख रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

राज्याला पुढे नेण्यासाठी विकास पत्रकारिता महत्त्वाची
मुख्यमंत्री म्हणाले, पत्रकार सकारात्मक दृष्टिकोनातून काम करीत असतात. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. ते सातत्याने समाजाचे प्रश्न मांडतात, स्वातंत्र्यपूर्व काळात दर्पणकारांपासून ही परंपरा सुरू आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकार कठीण परीस्थितीत आपले कर्तव्य पार पाडतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याला पुढे नेताना विकास पत्रकारितेचे महत्वाचे योगदान आहे आणि भविष्यातही राहील.

गतिमान वृत्तांकनात बातमीतील सत्यता राखण्याचे मोठे आवाहन
आज समाज माध्यमामुळे वृत्तांकन गतिमान होत आहे. चहूबाजूने माहितीचा मारा होत असताना बातमीत सत्यता राखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. वाचकाचा विश्वास कायम ठेवण्याचे आवाहनही आहे आणि म्हणून संघटनेची प्रबोधनाची भूमिका महत्त्वाची आहे. चौथा स्तंभ असलेली माध्यमे आणि शासनाने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. शासनाचे जिथे लक्ष जात नाही अशा भागातील समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचे काम पत्रकार करतात, त्यामुळे एकप्रकारे शासन प्रशासनाला मार्गदर्शन होते आणि नागरिकांना न्याय मिळतो.

चार महिन्यात जनकल्याणाचे अनेक निर्णय
गेल्या चार महिन्यात शासनाने घेतलेल्या पेट्रोल दरवाढ, शेतकऱ्यांसाठीच्या योजना यासारख्या चांगल्या निर्णयांना माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. समृद्धी मार्गाचा १४ जिल्ह्यांना लाभ होणार आहे. पुणे रिंगरोड, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प पुणेकरांना उपयुक्त ठरणार आहेत. कात्रज आणि विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी टाळण्याबाबतही प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. सर्वच शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्यची मर्यादा २५ हजारावरून ३ लाखापर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविकात श्री.देशमुख यांनी अधिवेशनसंबंधी माहिती दिली. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न अधिवेशनाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. श्री.कांबळे, शशिकांत झिंगुर्डे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. चित्रकार नंदू शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांचे काढलेले छायाचित्र भेट दिले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते कै. स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे स्मृती आरोग्य पत्रकारिता पुरस्कार संदीप आचार्य यांना प्रदान करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेतर्फे यावर्षीपासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.

पत्रकार विनोद जगदाळे, पिंपरी चिंचवड कर्मचारी संघटनेचे शशिकांत झिंगुर्डे, सुप्रिया चांदगुडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

पदपथावरील अतिक्रमणामुळे बिएमसी ला न्यायालयाची चपराक

0

मुंबई – मुंबई शहराचे नियोजन पादचाऱ्यांसाठी नव्हे, तर वाहनांसाठी तयार करण्यात येत आहे. वाहनचालकांचा मोठ्या प्रमाणावर विचार करून सागरी मार्ग, मेट्रोचे जाळे पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु पायी किंवा सायकलने जाणाऱ्या नागरिकांचे काय ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित करत बृहन्मुंबई महापालिकेला जाब विचारला. तसेच मुंबईतील रस्त्यांवरील पदपथ आणि रस्ते चालण्यायोग्य नसणे ही लाजिरवाणी बाब असल्याचे खडेबोल न्या. गौतम पटेल आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने सुनावले. तसेच याचिकेची व्याप्ती पाहता रिट याचिकेचे जनहित याचिकेत रुपांतर करण्याचे निर्देश न्यायालयाच्या रजिस्ट्रारला दिले.

बोरीवली रेल्वे स्थानकालगतचा परिसरत नेहमी गर्दीने तसेच गजबजलेला असतो. त्यातच बोरिवली (पूर्व) येथील गोयल प्लाझा येथे मोबाईल फोनची गॅलरी चालवणारे पंकज आणि गोपालकृष्ण अग्रवाल या दुकान मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपले दुकान मुख्य रस्त्यावर असूनही फेरीवाल्यांनी उभारलेल्या दुकानांमुळे दुकान झाकोळले जाते. तर पदपथावरील फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे आपल्या दुकानाचा रस्ता अडवला जातो. पालिकेकडून या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. मात्र काही वेळेतच फेरीवाले पुन्हा बस्तान आणि दुकाने थाटतात असा दावा याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे. त्यावर नुकतीच न्या. गौतम पटेल आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी पालिकेच्या वकिलांनी वेळ मागितला. या मुद्यावर उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती खंडपीठाला दिली. परंतु, ना फेरीवाला क्षेत्र चिन्हांकित न करता सर्वत्र फेरीवाल्यांना परवानगी देण्याच्या पालिका प्रशासनाच्या धोरणावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फेरीवाले पदपथावर किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुकाने थाटणार नाहीत याची खबरदारी घेणे पालिकेची जबाबदारी आहे, असे न केल्यास अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न कधीच मार्गी लागणार नाही, असेही न्यायालयाने पालिका प्रशासनाला सुनावले. शहरातील रस्त्यांवरील पदपथ हे सर्वसामान्य नागरिकांसाठी असले तरी शहरातील पथपदावर फेरीवाल्यांचेच वर्चस्व आहे. पदपथ हे फेरीवाला क्षेत्र नाही. त्यामुळेच त्यांना फेरीवाला धोरण लागू होत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सांगून पालिकेकडे येणाऱ्या निधीची वाट अडवत आहोत. मात्र, पदपथावर पुन्हा फेरीवाले आल्यास त्या पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असा गार्भित इशारात न्यायालयाने पालिकेला दिला आणि पालिकेला बांधकाम, दुकाने, पदपथावरील अडथळ्यांबाबतच्या धोरणाबद्दल माहिती सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘ बदला घेण्याच्या’ व दडपशाहीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आता हायकोर्टात रिट याचिका

0

मुंबई: राज्य सरकारकडून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांविरोधात सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल केले जात आहेत. या दडपशाहीला शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव या शिवसेना नेत्यांच्या वतीने अॅड. शुभम काहिटे यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. सप्टेंबर महिन्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोहर मढवी तसेच कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्या तडीपारीचा आदेश काढण्यात आला. जे शिवसेना नेते-पदाधिकारी शिंदे गटामध्ये गेले नाहीत त्यांच्याविरुद्ध नाहक तडीपारीचा आदेश काढून त्रास देण्यात आला. तसेच राजकीय सूडबुद्धीने शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने गेल्या महिन्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला होता. त्या मोर्चाप्रकरणी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांविरुद्ध सीबीडी-बेलापूर पोलीस ठाणे आणि एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे एफआयआर दाखल केले गेले. एकाच घटनेचे दोन एफआयआर नोंदवणे यावरून पोलीस यंत्रणेवरील सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबाव दिसून येत आहे. पोलीस यंत्रणा पूर्णपणे पक्षपाती वागत आहे, असा दावा रिट याचिकेत केला आहे. या याचिकेवर लवकरच द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

याचिकेतील प्रमुख मुद्दे

विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी कायद्याचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर करून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव या शिवसेना नेत्यांविरुद्ध सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यात नोंदवलेला एफआयआर रद्दबातल करण्यात यावा.

फौजदारी रिट याचिका निकाली निघेपर्यंत एफआयआरला स्थगिती देण्यात यावी. तसेच अर्जदार शिवसेना नेत्यांविरुद्व आरोपपत्र दाखल न करण्याबाबत तपास यंत्रणेला सक्त निर्देश द्यावेत.

शिवसेना नेत्यांविरोधातील एफआयआर पूर्णपणे निरर्थक आहे. सरकारच्या दबावाखाली पोलीस यंत्रणेने आपले मूळ कर्तव्य आणि जबाबदारीला हरताळ फासला आहे. केवळ विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच एफआयआर नोंदवले गेले.

उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी- आ.अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबई, दि: १९ नोव्हेंबर २०२२
उद्धव ठाकरेंनी दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवले, आता महापालिकेतून येणारे मार्गही बंद झाल्यामुळे ते अस्वस्थ झालेत. उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी असल्याची घणाघाती टीका भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘जागर मुंबईचा’ या अभियानंतर्गत जाहीर सभेत ते शनिवारी बोलत होते. वर्सोवा येथे भव्य सभा पार पडली. आमदार भारती लव्हेकर, योगीराज दाभाडकर, सरिता पाटील, रंजना पाटील, इंद्रसेन सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना निवडले असताना जनतेशी विश्वासघात करून उद्धव ठाकरे यांनी महाभकास आघाडी स्थापन केली. सत्तेवर आल्यानंतर अडीच वर्षात त्यांनी मुंबईतील चालू विकास कामे बंद पाडण्याचे काम केले. महाविकास आघाडीचे सरकार पांढऱ्या पायाचं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली विकासकामे थांबवण्याचे पाप महाविकास आघाडीने केले. आता जनतेचे सरकार आले आहे. जागर मुंबईचा कार्यक्रम यांच्या डोळ्यात खूपत आहे. आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेतील टेंडरविषयी विचारतात. ५ हजार करोड रुपयांचे सिमेंटचे रस्ते बनवण्याचे काम आमच्या सरकारने हाती घेतले आहे. टेंडरमध्ये कमिशन मिळत नाही याचे दुःख आदित्य ठाकरे यांना आहे. आम्ही आमच्या कामाचा हिशोब जनतेसमोर ठेवतो. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात जनतेला लुटण्याचे काम झाले. कोरोना काळात पालकमंत्री आदित्य ठाकरे गायब होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने जनतेत जाऊन काम केले. मुख्यमंत्री जनतेतही नाहीतच पण मंत्रालयातही गेले नाहीत. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेत जाऊन काम केले. त्यावेळी उद्धव ठाकरे तुम्ही कुठे होता? असा सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला.

मुंबईतील मेट्रो प्रकल्प रखडवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. पर्यावरणाच्या नावावर आरे कारशेडचे काम थांबवले. आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये आरे कारशेडचे काम सुरू झाले. उद्धव ठाकरे यांनी मेट्रोचे काम रोखल्याने मेट्रोच्या खर्चात दहा हजार करोड रुपयांची वाढ झाली. हा वाढीव खर्च उद्धव ठाकरे यांच्याकडून वसूल केला पाहिजे. मंत्रालयात न जाता ते बेस्ट सीएम झाले. मुख्यमंत्री मंत्रालयात जात आहेत ही ब्रेकिंग न्यूज होते ही दुर्दैवाची बाब आहे अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली.