पुणे- महाराष्ट्राच्या राज्यपालपदी 3 वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, राज्यपाल महोदयांच्या अनाकलनीय, अनावश्यक, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके काय म्हटले आहे अजित पवार यांनी ….
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही मा. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना!
कोश्यारीचे वक्तव्य काय?
शिवाजी महाराज जुन्या काळातले विषय आहेत. तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले.